एक प्रतिसाद - "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" ला
हा लेख श्री. ईश आपटे यांच्या "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" या लेखाचा प्रतिसाद आहे. माझा प्रतिसाद लिहिता लिहिता मूळ लेखापेक्षा मोठा झाल्यामुळे स्वतंत्र लेख म्हणून देत आहे.
१. गेल्या शतक भरात, साधारण १८९३ पासुन भारतभरात नव्या आध्यात्मिक गुरुंची मोठी लाट आली.
अगदी खरंय. नव्हे, तुमचा "लाट आली" हा शब्दप्रयोग खुप काही सांगून जातो. ईंग्रजीमधील "फॅड आलंय" हा शब्दप्रयोग सुद्धा चालला असता. पण... लाट किंवा फॅड हे हे खुप अल्पजीवी असतं. ते येतं, थोडा वेळ राहतं आणि निघून जातं. अध्यात्मिक गुरूंच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. म्हणजे गुरू आले आणि गेले, पण गुरु ही संकल्पना मात्र टीकून राहिली. रोज नवे नवे गुरू बाजारात दिसू लागले. काही स्वयंप्रकाशित तर काही दत्तगुरुंपासून शिर्डीच्या साईबाबांच्या अवताराच्या रुपात.
अर्थात याला आपलं संतसाहित्य बर्यापैकी कारणीभूत आहे. संतसाहीत्यामध्ये अध्यात्मिक गुरुला खुपच महत्व दिलं गेलंय आणि आपण त्या संकल्पनेचा संतांना जो अर्थ अभिप्रेत आहे त्याचा आपण विपर्यास केला आहे. ज्ञानेश्वरी मध्ये जागोजागी ज्ञानदेवाने गुरुबद्दल लिहिलं आहे.
विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥
तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥ ३ ॥
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं । आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥
सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी । समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥
म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं । या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥ ८ ॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी । तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥ ९ ॥
श्री ज्ञानेश्वरी - अध्याय बारावा.
ज्ञानदेवाचा गुरु कोण तर त्याचा सख्खा मोठा भाऊ जो त्याच्यापेक्षा चार पाच वर्षांपेक्षा जास्त मोठा नसावा. आणि तरीही गुरू या संकल्पनेचा पगडा ईतका जबरदस्त की ज्ञानदेवासारख्या ज्ञानियांच्या राजाचीसुद्धा ही अवस्था झाली. अर्थात ज्ञानदेवाचा गुरु हल्लीच्या गल्लेभरु गुरुंसारखा नसल्यामुळे त्याने ज्ञानदेवाला लगेच भानावर आणले.
इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी । म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥ १८ ॥
श्री ज्ञानेश्वरी - अध्याय बारावा.
ज्ञानदेवाचा गुरू म्हणतो, बास झालं गुरुवर्णन. पुढे बोल.
आणि आताचे गुरु? एकेकांचे सुखसोहळे पाहून घ्यावेत.
हरीपाठाच्या पाचव्या अभंगातही ज्ञानदेव गुरुची महती सांगतो,
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
संत तुकाराम म्हणतात,
सदगुरुवाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी
नाही काळ वेळ तया लागी, आपणासारीखे करी तो तात्काळ
लोहपरीसाची न सोहे उपमा, सदगुरू महिमा अगाधची
अगदी रामदासांनी सुद्धा जागोजागी गुरुवर्णन केले आहे. उदाहरणार्थ,
आमुचा तो देव एक गुरुराव । द्वैताचा तो ठाव नाही जेथे ॥१॥
गुरुने व्यापिले स्थिर आणि चर । पहा निर्विकार कोंदलासे ॥२॥
रामीरामदास उभा तये ठायी । माझी रामाबाई निराकार ॥३॥
अर्थात या सार्या संतांना गुरु म्हणजे "सत"गुरु अपेक्षित होता. आपल्या चुका दाखवणारा, आपल्याला सत्याच्या मार्गावर नेऊन सोडणारा, आयुष्य सचोटीने कसे जगावे हे शिकवणारा.
बास, आपण मात्र फक्त गुरु ही संकल्पना उचलली. त्या संकल्पनेमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे हेच आपण विसरुन गेलो. जणू काही गुरु करणे म्हणजे मोक्षाला नेऊन सोडणार्या गाडीचे तिकिट काढणे होय. केला गुरु की झाली मोक्षप्राप्ती. झाली त्या चौर्याएंशीच्या फेर्यातून सुटका.
आणि यातूनच आजच्या या तथाकथित गुरुंचे फावले.
आमचे गुरू कोण तर केवळ "राजदंड" विमानातून नेऊ दिला नाही म्हणून आकांडतांडव करणारे, भगवी वस्त्रे परीधान करणारे तथाकथित धर्माचार्य. अरे तुम्ही गुरु ना, साधू संन्याशी ना? मग तुमच्यात निवृत्ती कुठे आहे? "राजदंडा" सारख्या क्षुल्लक भौतिक गोष्टीमुळे तुमच्या वृत्ती विचलित होतात?
आमचे गुरु कोण तर वह्याच्या वह्या "राम राम" लिहून भरायला लावणारी माणसं. यांच्या नावाने गुगलवर शोध घेतला तर श्रीधर कवींनी त्यांच्या श्रीरामविजय, श्रीहरीविजय आणि पांडवप्रताप या ग्रंथांमधून केलेली विष्णूची वर्णने झक मारतील अशा तेज:पुंज अवतारात अर्थात फोटोशॉप एडिटेड हे दिसतील. हे ईश्वराचे अवतार पण राहणीमान असे की एखाद्या राजालाही लाजवेल असे. लोक पण ईतके भ्रमिष्ट झाले आहेत की, त्यांना पुजेसाठी तेहतीस कोटी देव सुद्धा कमी पडू लागले आहेत. त्या देवांना बाजुला ठेवून आता या सदगुरुंची चित्रे भिंतीवर लटकवायला लागले आहेत.
आमच्या सदगुरुंपैकी कुणावर लहान मुलांवर अत्याचार केल्याचे आरोप, कुणावर समलैगिकतेचे आरोप. कुणी स्वतःला साधू, संन्याशी म्हणवून घेतोय आणि स्वतःच्या हेलीकॉप्टरमधून फिरतोय. पहिल्या रांगेत बसायचे पन्नास हजार घेतोय. रोज टीव्हीवर चमकत आहेत. बाईट्स देण्यासाठी धडपडत आहेत. आपली चित्रे असलेले पेन आणि बिल्ले विकणे हे यांच्या ईश्वरभक्तीचे रुप. हे आमचे सदगुरू.
नुकताच एक ईश्वरी अवतार समाप्त झाला. माझं अवतारकार्य वयाच्या ९६ व्या वर्षी संपवेन म्हणताना ८४ व्या वर्षीच गेला. या भवसागराला तो ईतका विटला की बारा वर्षे आधीच त्याने आपले अवतारकार्य संपवलं. आणि विषेश म्हणजे हा ईश्वराचा अवतार मरणाच्या आधी जवळपास एक महीनाभर त्यानेच उभारलेल्या एका अत्याधुनिक इस्पितळात "लाईफ सपोर्ट सिस्टीम" वर होता. हा आमचा ईश्वराचा अवतार.
झुकती हैं दुनिया झुकानेवाला चाहिये.
अर्थात हे तथाकथित साधू संताच्या नादी आपण का लगलो आहोत याची कारण मिमांसा करण्यासाठी फार खोलात जायची गरज नाही. आपली अवस्था समर्थ म्हणतात तशी झाली आहे,
अनुदिन अनुतापे तापलो रामराया
आजचं आपलं आयुष्य धकाधकीचं झालं आहे. सुखाच्या, समृद्धीच्या मागे धावताना आपण मनाची शांती हरवून बसलो आहे. उजाडणारा प्रत्येक दिवस नवी समस्या घेऊन उगवत आहे. नात्यांमधील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या सार्यांतून सुटका करुन घेण्यासाठी आम्हाला जादूची कांडी हवी आहे. आणि ती कांडी केवळ आमच्याकडे आहे अशी जाहीरातबाजी हे आजचे तथाकथित सदगुरू करत आहेत.
आणि आपण मात्र परमदीन दयाळा निरसी मोहमाया म्हणायच्या ऐवजी या तथाकथित सदगुरूंच्या मायाजाळात अधिकाधिक फसत चाललो आहोत.
२.चार्वाकवादामुळे व पाखंडामुळे , मृत्यूनंतर जीवन संपते हा विचार सर्वत्र फैलावलेला होता. आधुनिक गुरुनी प्रसिध्दी साठी पारंपारिक हिन्दु धर्म पाखंडानुसार अॅड्जस्ट केला, व ते ही बोलू लागले, लोकांनो स्वर्ग-नरक जे काही आहे ते ह्या पृथ्वीवरच आहे, ह्या जीवनातच अनुभवायचे आहे. पारंपारिक अध्यात्म स्वर्ग-नरकांचे मरणोत्तर अस्तित्व सांगत होते.
ईथे मी तुमच्याशी सहमत नाही. तसे स्वर्ग आणि नरक या संकल्पना जगाच्या पाठीवर सगळीकडे प्रचलित असाव्यात. ती आपल्या पारंपारिक अध्यात्माची देणगी नाही कारण तसं नसतं तर ईतर भाषांमध्ये "जन्नत - जहन्नम", "हेवन - हेल" अशा समानार्थी जोड्या नसत्या.
खरंच स्वर्ग आणि नरक अस्तित्वात असावेत? मला नाही वाटत तसं. आपण ते आहेत म्हणून दाखवू शकत नाही. केवळ आपली पुराणं म्हणतात म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा का? या पॄथ्वीतलावर जी काही कोटी लोकसंख्या आहे त्यात आपण एक व्यक्ती दाखवू शकणार नाही की जिने याची देही याची डोळा स्वर्ग किंवा नरक पाहिला आहे.
या केवळ संकल्पना आहेत. या विश्वाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जुन्या समाजधुरीणांनी जन्माला घातलेल्या. सत्प्रवृत्तींना प्रोत्साहन देणार्या, दुष्प्रवृत्तींना मज्जाव करणार्या. चांगले वागलात, स्वर्ग मिळेल. सुखसोयी पायाशी लोळण घेतील. रंभा उर्वशी पाय दाबतील. वाईट वागलात, मेल्यानंतर हालहाल होतील. थोडक्यात काय तर चांगलं वागावं म्हणून स्वर्गाचं आमिष आणि वाईट वागू नये म्हणून नरकाची भीती. आईने पाच सहा वर्षाच्या मुलाने त्रास देऊ नये, अभ्यास करावा म्हणून चॉकलेटचं आमिष दाखवावे आणि द्वाडपणा केलास तर फटके देईन अशी भीती दाखवावी ईतकं सोपं लॉजिक आहे हे.
३.चमत्कार हा पारंपारिक सिध्दत्वाची निषाणी होती. चमत्कार तेथे नमस्कार हा साधा नियम होता. ज्यांच्या जवळ कुठले ही सामर्थ्य नव्हते, अशा गुरुंनी सांगायला सुरुवात केली , चमत्कार म्हणजे हातचलाखी, ते दुय्यम दर्जाचे ! .................. विचार बघा...उच्च मानसिक अनुभव घ्या...समाधि अनुभवा. सर्व पारंपारिक संतांजवळ, योग्यांजवळ असामान्य दैवी सामर्थ्य होते, सिध्दी होत्या. त्याची विस्तृत वर्णने सगळ्या जुन्या चरित्रात उपलब्ध होती. नव्या गुरुंकडे सिध्दींचा अभाव असल्यामुळे , त्यांनी केवळ मानसिक अनुभवांवर भर द्यायला सुरुवात केली
असहमत.
जो चमत्कार करून दाखवतो त्याला साधू, योगी किंवा सदगुरु म्हणायचे?
सत्यसाईबाबा जे करायचे ती हातचलाखी होती की योगबलावर केलेले चमत्कार? अर्थात हातचलाखी. युटयुबवर असलेले व्हीडिओ आपले सारे पुर्वग्रह बाजूला ठेवून पाहीले, बाबा फक्त श्रीमंतांना सोन्याच्या अंगठया हवेतून काढून दयायचे, गरीबांच्या हातावर मात्र राख टेकवायचे ही वस्तूस्थिती ध्यानात घेतली की ते जे काही करायचे ती निव्वळ हातचलाखी होती हे लगेच कळते.
ही चर्चा पुढे नेण्यासाठी आपण ज्ञानदेवाचे उदाहरण घेऊ.
ज्ञानदेव नाथ परंपरेतला एक नाथ. निवृत्तीनाथांचा शिष्य. आता हे नाथ कोण तर चमत्कार करणारे योगी किंवा सिद्ध. ज्यांनी गुरुचरीत्र वाचले आहे त्यांना माझे म्हणणे लगेच पटेल.
आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।1।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।2।।
गहिनीप्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ।।3।।
या सार्या नाथांचे जीवन केवळ चमत्कार कथांनी भरलेले आहे. यातून ज्ञानदेवासारखा ज्ञानियांचा राजासुद्धा सुटला नाही. कारण तोही एक नाथ होता. जेमतेम एकवीस वर्षांचं आयुष्य जगलेला हा अगाध प्रतिभावंत. पण चरीत्र ईतक्या जबरदस्त चमत्कारांनी भरलेले की त्याच्या ज्ञानेश्वरीला प्रमाण मानणार्या बुद्धिनिष्ठांची बोलती बंद व्हावी.
वाघावर भेटीला येणार्या चांगदेवाला सामोरं जाण्यासाठी भींत चालवणे, छोटया बहीणीची गावकर्यांनी केलेली हेटाळणी पाहून जठराग्नी प्रज्वलित करून पाठीवर मांडे भाजून देणे, रेड्यामुखी वेद बोलविणे, प्रेतयात्रेमधील प्रेताला जिवंत करून त्याच्याकडून आपला अजरामर असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून घेणे. काय आणि काय...
सन १२७५ ते १२९६ हा ज्ञानदेवाचा जीवन कालावधी. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध. महाराष्ट्रात तेव्हा देवगिरीच्या यादवांचे राज्य होते. रामदेवराय हा धर्मपरायण राजा तेव्हा राज्य करत होता. इकडे ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी पुर्ण करून आपली लेखणी खाली ठेवली आणि तिकडे अल्लाउद्दिन खिलजी केवळ दहा पंधरा हजारांचे सैन्य घेऊन विंध्य पर्वत ओलांडून दख्खनवर चालून आला. देवगिरीचे साम्राज्य त्याने बुडवले.
ज्ञानदेव सिद्धयोगी असूनही त्याने हा सद्धर्मावर झालेला "यवनी" हल्ला का परतवून लावला नाही? ज्याने निर्जीव भींत चालविली, ज्याने रेडयामुखी वेद बोलाविले, ज्याने प्रेतयात्रेतील प्रेताला जिवंत केले त्याला यवनी हल्ला परतवून लावण्यासाठी रामदेवरायाला मदत करणे शक्य नव्हते का?
या प्रश्नांची उत्तरे कुणी देऊ शकणार नाही आणि दिली तरी ती बुद्धीला पटणार नाहीत.
ज्ञानदेवाच्या जबरदस्त चमत्कारांच्या कथा कधी किर्तन, प्रवचनांमध्ये तर कधी छोटयांच्या गोष्टींच्या रुपात पुढच्या पिढीला सांगत, त्याला "अवतार पांडुरंग" असं लेबल लावून, त्याच्या ज्ञानेश्वरीची हरीनाम सप्ताहामध्ये घोकंपट्टी करण्यात आपण धन्यता मानू लागलो. त्याने दिलेली विश्वबंधूत्वाची शिकवण मात्र आपण सोयिस्कररीत्या इंद्रायणीच्या डोहात बुडविली.
हे असं काही वाचलं की मनाच्या गोंधळ उडतो. काय खरं आणि काय खोटं हेच कळेनासं होतं. अशावेळी काय करायचं? याचंही उत्तर या बालयोग्यानेच दिले आहे. हरीपाठाच्या दुसर्याच अभंगात तो म्हणतो,
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥
४. अजुन थोडा काळ गेला, आता समाधी अनुभवायला देणे ही नव्या गुरुंना जमेना, मग त्यांनी ध्येय अजुन खाली आणले. मानसिक शांती, रिलॅक्सनेस, चिन्तामुक्ती , आरोग्य ही नवीन ध्येये बनली
सहमत.
तुम्ही समाधी अनुभवायला देण्याचीच गोष्ट करत आहात. मी तर गुरुंनी समाधी घेण्याच्या शक्यतेचा विचार केला. आणि नजरेसमोरून झरझर वृत्तपत्रांमधील वृत्ते आठवली. अगदी धर्माचार्यांपासून साईबाबांच्या अवतारांपर्यंत सार्यांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. आणि त्या त्या वेळी हे गुरु आपला जीव वाचवण्यासाठी जीव खाऊन पळाल्याचे वृत्तपत्रांमधून वाचले आहे.
ईथे पुन्हा एकदा ज्ञानदेवाचा उल्लेख करावासा वाटतो. जगाला भावार्थदिपीका, अमृतानुभव यासारखं ज्ञानाचं अनमोल भांडार खुलं करून हा ज्ञानसूर्य वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी स्वतःहून अस्ताला गेला.
५. शिष्याला १००% अनुभव देऊन जन्म-मरण चक्रातुन सोडवणे ही भारतीय अध्यात्माची परंपरा. नव्या गुरुंनी अनुभवाची जबाबदारी शिष्यांच्या वरच ढकलायला सुरुवात केली. सर्व प्राचीन व ऐतिहासिक गुरुंनी शिष्याची संपूर्ण जबाबदारी स्वता:वर घेतल्याचे त्यांच्या चरित्रातुन दिसते. नवे सामर्थ्यहीन गुरु नेमके उलटे करु लागले, कारण त्यांना स्वतःलाच आपल्या आध्यात्मिक उन्नती बाबत खात्री नव्हती.
नवे गुरू अनुभवाची जबाबदारी शिष्यांवर ढकलतात ही गोष्ट थोडा वेळ बाजूला ठेवूया.
आपल्या पुरातन, प्राचिन गुरुंनी आपल्या शिष्यांना १००% अनुभव देऊन जन्म मरण चक्रातून सोडवले, याची खात्री कशी करायची? त्यांना निश्चितच मोक्षप्राप्ती झाली याला पुरावा काय? की ईथेही पुन्हा आपली पुराणे म्हणतात म्हणून आपण ते खरं मानायचं?
माझ्या मते आपलं अध्यात्म ज्याला "अनुभव" म्हणतं त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीच्या खर्या स्वरूपाची जाणिव होणं असा असावा.
कपिलवस्तूच्या राजकुमार सिद्धार्थाला "सा़क्षात्कार" होऊन त्याला सत्याचं ज्ञान होऊन त्याचा गौतम बुद्ध बनला. हाही एकप्रकारे त्याला गुरुविना आलेला "अनुभवच" नाही का?
६.१९४० च्या सुमारास अशांचा उदय झाला की ज्यांनी तत्वज्ञानाच्या नावाखाली मूर्तिभंजन सुरु केले. सर्व अनुभवांना विरोध करुन, शब्दच्छ्ल सुरु केला. स्थितीहीन स्थिती, कालातीत जगणे, वर्तमानात जगणे, हे सोपे असल्याचे लोकांना भासवुन उच्च बौध्दिक वर्तुळात महान तत्वज्ञ म्हणून मिरवायला सुरु केले. अनाकलनीयता व पाखंडीपणा ह्यामुळे विदेशात लोकप्रिय होण्यास ह्यांना फार वेळ लागला नाही.
असहमत.
म्हणजे मी मूर्तीभंजनाशी सहमत आहे असं नाही. पण मूर्तीपुजा म्हणजेच देवपुजा हे मात्र मला मान्य नाही.
खरा देव तर निर्गुण निराकार आहे. या विश्वाला, चराचराला तो व्यापून उरला आहे. प्रत्येक चेतन जीवामध्ये तो आहे. प्रत्येक अचेतन वस्तूमध्ये तो आहे.
ज्ञानदेव हरीपाठाच्या तिसर्या अभंगात म्हणतो,
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥
सगुण निर्गुण गुणाचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥ २ ॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजे ॥ ३ ॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मानी पुण्य होय ॥ ४ ॥
ईश्वर तर अव्यक्त निराकार नाही ज्या आकार असा आहे. मग मुर्तीपुजा आली कुठून?
आपण त्या दगडाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतो, म्हणून तिला देवत्व प्राप्त होते. आपली श्रद्धा त्या दगडाला देवपण देते.
देव जसा देवळातल्या दगडी मूर्तीत आहे तसा तो देवळाबाहेरच्या "माय, पोटाला दोन पैसे दया" म्हणणार्या केविलवाण्या चेहर्याच्या याचकांमध्येही आहे.
आपली ही मूर्तीपुजेवरील चर्चा पुढे नेण्यासाठी आपण पंढरपुरच्या श्रीविठ्ठलमूर्तीचे उदाहरण घेऊया.
स्कंद पुराणांतर्गत येणारे पांडुरंगमाहात्म्य आणि त्यानंतर दोन अडीच शतकानंतर लिहिलेले पाद्म पांडुरंगमाहात्म्य ही पंढरपुरच्यी श्रीविठ्ठलाची सर्वात जुनी चरीत्रे. या दोन्ही चरीत्रानुसार श्रींच्या मूर्तीच्या छातीवर कूट्श्लोकाच्या रुपात अर्थात कोडयाच्या स्वरुपात षडाक्षरी मंत्र लिहीला आहे, ज्या मंत्राची उकल आहे "श्रीकृष्णाय नमः". पण आताच्या पांडुरंगाच्या मुर्तीच्या छातीवर असा काहीच श्लोक नाही. किंबहूना महाराष्ट्रातील फक्त एक मंदिर सोडले तर असा छातीवर मंत्र असलेली श्रीविठ्ठलाची मूर्ती कुठेच नाही. मग ती एकमेव मूर्ती कुठे आहे जी दोन्ही पांडुरंगमाहात्म्यांमधील वर्णनाशी मिळती जुळती आहे? ती आहे पंढरपुरापासून जेमतेम वीस मैलांवर असणार्या सोलापूर जिल्ह्यामधीलच माढे या गावी. सन १६५९ साली अफजलखान महाराष्ट्रात शिवरायांवर चालून आला. तुळजापूर, शिखर शिंगणापूर या देवस्थानांची मोडतोड करत त्याने आपला मोर्चा पंढरपूराकडे वळवला. या सुलतानी संकटापासून श्रीविठ्ठलाची मुर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी ती गुपचुपपणे माढे येथे हलविण्यात आली. पुढे जेव्हा राजांनी अफजलखानाचा वध केला, तेव्हा सारं आलबेल झाल्यावर ही मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणण्यात आली. आणि या घटनेची आठवण म्हणून माढे येथे श्रीविठ्ठल मंदिर बांधले गेले. श्रींच्या मूळ मूर्तींची प्रतिकृती असणारी मूर्ती या मंदिरात बसवण्यात आली. याचाच अर्थ निदान सन १६५९ सालापर्यंत तरी पंढरपुरामध्ये पांडुरंगमाहात्म्यातील वर्णनाशी मिळतीजुळती मूर्ती होती.
स्कांद पुराणातील पांडुरंग माहात्म्यानुसार मूर्तीची अजून दोन वैशिष्टये आहेत. ती म्हणजे मूर्तीच्या भाळावर तृतीय नेत्र आहे. आणि मूर्ती दिगंबर बाळगोपाळाची आहे. याही दोन गोष्टींशी माढे येथील विठ्ठलमूर्ती मिळती जुळती आहे. पंढरपूरची मूर्ती मात्र अशी नाही.
अजून एक गोष्ट म्हणजे, आपण आता पाहिलेल्या मूळ मूर्ती वर्णनाला दुजोरा देणारा संत सावतामाळी यांचा अभंग आहे.
विठ्ठ्लाचे रुप अतर्क्य विशाळ । ह्रदयकमळ मंत्रसिद्ध ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायीं वाळी मनगटीं ॥
कटीवरी हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलींत ॥
सावता माळी म्हणे शब्दब्रम्ह साचें । नाम विठ्ठलाचें कलीयुगीं ॥
मग ती मूळ मूर्ती आता कुठे आहे?
एकोणविसाव्या शतकात पंढरपूरात श्री काशीनाथ उपाध्याय किंवा बाबा उपाध्ये म्हणून एक प्रख्यात धर्मशास्त्रज्ञ होऊन गेले. आता जी पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात श्रींची जी दैनंदिन पुजाअर्चा होते, तिच्यात सुसुत्रता बाबा उपाध्ये यांनीच आणली.
सन १८०५ साली बाबा उपाध्ये यांनी "विठ्ठलध्यानमानसपूजा" नामक स्तोत्र लिहिले. त्यात श्रींच्या वक्षःस्थळाचे वर्णन बाबांनी खालील शब्दांत केले आहे:
षडक्षरं कृष्णमंत्रं वक्षस्थलगतं स्मरेत ॥
श्रींच्या वक्षःस्थळावर कोरलेला षडक्षर कृष्णमंत्र स्मरावा.
याचाच अर्थ, अगदी सन १८०५ पर्यंतसुद्धा मूळ मूर्ती पंढरपूरात होती. मग ती मुळ मूर्ती आता कुठे आहे हा प्रश्न कायम राहतो.
इ. स. १८७३ साली कुणा माथेफीरुने मूर्तीवर धोंडा फेकला होता आणि त्या आघाताने मूर्तीचा एक पाय भंगला होता. अशी बातमी त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये आली होती. त्यानंतर काय झाले याचा उल्लेख मात्र कुठे नाही. अर्थात हिंदू धर्मशास्त्रानुसार मूर्ती भग्न झाल्यानंतर तिचे विसर्जन करायचे असते, आणि नवी मूर्ती घडवून तिचे विधिवत प्राणप्रतिष्ठा करायची असते. नव्हे हा धर्मशास्त्राचा दंडकच आहे. मला वाटतं श्रींच्या मूळ मूर्तीचे काय झाले या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या घटनाक्रमांमधून मिळते.
मग आता जर श्रींविठ्ठलाची आताची मूर्ती मूळ मूर्ती नाही असं म्हणायला जर जागा आहे तर मग आपल्या, दरवर्षी आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाणार्या लाखो वारकर्यांच्या श्रद्धेचं काय?
तुम्ही कुठलीही शंका मनात न आणता श्रद्धेनं श्रीचरणावर नतमस्तक व्हा. विठ्ठल तिथेच आहे. दगडाची मूर्ती बदलली की काय या शंकेनं विश्वास उडण्याईतका देव हलका नाही.
आणि हो, मूर्तीपुजेचं कितपत अवडंबर माजवायचे हे ही ज्याचं त्याने ठरवायचं...
७.१९८० च्या दशकात काही असे नवे संत जन्मले, जे वेदान्ताच्या नावाखाली बेधडक सांगु लागले, पुनर्जन्म वगैरे काही अस्तित्वात नाही, जे काही आहे आता इथेच . मृत्युनंतर आपण सगळेच सत्यामध्ये परत जाऊ व जन्मापूर्वी ही आपण सत्यच होतो. काही तर तुम्ही ह्या क्षणाला मुक्तच आहात, साधनेची वगैरे कोणती ही गरज नाही इ. बेलगाम असत्य प्रतिपादन करु लागले . असले पाप कृत्य करताना व बरोबर संतत्व मिरवताना त्यांना काही वाटले नाही.
हे तथाकथित संत काय म्हणतात ते सोडून द्या. थोडा वेळ पुनर्जन्म आहे हे गृहीत धरूया. काय फरक पडतो त्याने आपल्या आयुष्यात? मेल्यानंतर आपण स्वर्गाला जाणार आहोत की नरकाला हा विचार केल्याने काय होईल? या जन्मी तरी स्वर्ग काय आणि नरक काय हे अनुभवायला मिळणार नाही. त्यासाठी मरावेच लागणार. आपल्या शास्त्रानुसार आपण जेव्हा नऊ महिने आईच्या पोटात असतो तेव्हा आपण "रजस्वलेच्या विटाळात" असतो. आपल्या आजुबाजूला कातडी, आतडी आणि पू, दुर्गंधीची खाणी असते. पण जन्म झाल्यानंतर यातल्या कशाची जाणिव आपल्याला राहते? की हा बाबा, तिसर्या महिन्यात मला हात आले, चौथ्या महिन्यात मला पाय आले. सातव्या महिन्यात एक आतडी माझ्या नाकाजवळ आली होती तेव्हा मी गुदमरलो होतो... काही म्हणजे काही आठवत नाही आपल्याला. ना आपल्याला आता त्याच्या काही जाणिवा आहेत. हेच स्पष्टीकरण "मेल्यानंतर काय होते?" या प्रश्नाला लागू होत नाही का?
८.ह्या सर्व नव्या गुरुंमध्ये एक समानता होती, अलौकिकतेला , चमत्कारांना ह्यांचा विरोध होता. कारण ह्यांच्या स्वतःजवळ ते सामर्थ्य नव्हते. सर्व सामान्य लोकांची दु:खे दुर केल्याच्या कोणत्या ही घटना ह्यांच्या चरित्रात दिसत नाहीत. सिध्दीहीन, सामर्थ्यहीन असे हे बोलबच्चन गुरु भारतीय महान योग्यांच्या परंपरेला कलंक बनुन राहिले. योगसामर्थ्य नसणे हे ह्या सर्वांचे कॉमन लक्षण होते.
पुन्हा एकदा आपण या नव्या गुरुंना थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आपल्या महान योग्यांचा विचार करूया.
ज्ञानदेव. नाथ संप्रदायातला एक महान नाथ. वयाने लहान असला तरी कर्तुत्वाने महान होता. नाथ संप्रदायातील चमत्कारांच्या परंपरेला शोभेशे चमत्कार याही नाथाच्या नावावर जमा आहेत. का वाचवू शकला नाही रामदेवरायाचे धर्माचे राज्य अल्लाउद्दिन खिलजीच्या "यवनी" आक्रमणापासून आपल्या योगसामर्थ्याच्या आणि सिद्धीच्या जोरावर?
जगद्गुरु तुकोबाराय आणि संत रामदास हे शिवरायांचे समकालीन. संत रामदास तर शिवरायांचे अध्यात्मिक गुरू. शिवरायांचा "मी या जनतेचा पोशिंदा" हा अहंकार दूर करण्यासाठी त्यांनी दगड फोडून त्यामध्ये जिवंत बेडूक दाखवला.
शिवराय तुकारामांना भेटायला गेले तेव्हा औरंगजेबाचे सैन्य चालून आले. तुकाराम माहाराजांचे किर्तन चालू होते. ईश्वरी चमत्कार झाला, देऊळ फीरले. औरंगजेबाच्या सैन्याला किर्तनामधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये शिवाजी दिसू लागला... हेच तुकाराम महाराज पुढे सदेह वैकुंठाला गेले.
ईतके ताकदीचे आणि अधिकारी पुरुष शिवकालात असुनही औरंगजेब महाराष्ट्राचे लचके तोडत होताच ना?
ब्रिटीशांच्या काळातसुद्धा खुप योगी अधिकारी पुरुष होउन गेले. का त्यांनी आपल्या योगसामर्थ्याच्या जोरावर ही ब्रिटीशांची जुलमी राजवट संपवली नाही? का भगतसिंग सारख्या क्रांतीकारकांना फासावर जावे लागले? का महात्मा गांधींना सत्याग्रह करावे लागले?
आपले संतकवी प्रतिभाशाली विचारवंत होते. भल्याबुर्याची जाण असणारे समाजसुधारक होते. पण त्यांच्या नंतरच्या पिढयांमधील हरदास आणि कथेकर्यांनी संतकवींची चरीत्रे कथा, किर्तने आणि प्रवचने यामधून जनसामान्यांना सांगायला सुरुवात केली. या कथनात रोचकता यावी म्हणून चरीत्रांच्या जोडीने दंतकथा सांगितल्या जाऊ लागल्या. पुढे पुढे या दंतकथाच संतकवींचे चरीत्र होऊन बसल्या. संतांना देवत्व प्राप्त झाले. संतांनी दिलेली शिकवण बाजूला ठेवून लोक या चमत्कारीक कथांमध्येच रममाण होऊ लागले, त्यालाच ईतिहास मानू लागले.
कालाय तस्मै नम:
हे झालं आपल्या संतांच्या बाबतीत, ज्यांना आपण ईश्वरी अंश मानतो. आताच्या सदगुरुंची थोरवी काय वर्णावी महाराजा. त्यांची कोटीच्या कोटींची उडडाणे ऐकून आपली छाती दडपून जाते. आताचे संन्याशी सशस्त्र सेना उभारण्याच्या गोष्टी करतात. संन्याशी या शब्दाची ईतकी क्रुर थट्टा ईतिहासात याआधी कुणी केली नसेल. आजचे आमचे धर्माचार्य आणि साईबाबांचे अवतार आपली चित्रे असणारे पेन आणि बिल्ले विकण्यालाच धर्मकार्य समजत आहेत. लोकांच्या घरांच्या भींतींवर सहकुटुंब सहपरिवार देवाच्या गेटपमध्ये विराजमान होत आहेत.
पण...
या बाबांच्या आणि सदगुरुंच्या गजबजाटात दिनांक २३ फेब्रुवारी १८७६ साली या महाराष्ट्रात, विदर्भात एक आधुनिक पण सच्चा संत जन्माला आला. डेबुजी त्याचे नांव. दुनिया आज या संताला संत गाडगेबाबा म्हणून ओळखते. आयुष्यभर हा संत अंगावर चिंध्या पांघरून, एका हातात खापर घेऊन महाराष्ट्र सुधारण्यासाठी फीरला. या संताने कसले चमत्कार केले नाहीत. कुणाला आपल्याला नमस्कार करू दिला नाही. कुणाला गुरुपदेश केला नाही. किंबहूना माझा कुणी शिष्य नाही असं लेखी लिहून दिलं. खेडयापाडयातील अडाणी जनतेला शिक्षणाचं, स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी या सिद्धाने देह झिजवला.
या थोर महात्म्याचं चरीत्र वाचलं की आपल्याला आताच्या बुवाबापू बाबामहाराजांची कीव करावीशी वाटते...
असो.
लेख बराच लांबला आहे. तेव्हा आता मूळ मुद्द्याकडे येतो. गुरु कसा असावा, कसा नसावा, गुरु कोणाला म्हणावे याचे छान वर्णन समर्थांनी दासबोधाच्या पाचव्या दशकात, दुसर्या समासात, गुरुलक्षणांच्या समासात केले आहे. मी ते वर्णन विस्तारभयास्तव ईथे देत नाही. जिज्ञासूना ते श्री दासबोध ईथे वाचता येईल.
मायबाप वाचकहो, हा लेख लिहिताना होता होईलतो कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश असणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. लेखन करताना माझे पुर्वग्रह बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांनी आपल्या देव, धर्म, सदगुरू, संत यांच्यासंबंधीच्या कल्पना पुन्हा एकदा चाचपडून पाहाव्यात. खर्या देवाची ओळख करून घ्यावी, सानेगुरुजींनी केलेली "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे" हीच धर्माची खरी व्याख्या आहे हे समजून घ्यावे यासाठी हा लेखनप्रपंच.
याउपरही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो !!!
संदर्भ ग्रंथः
१. श्री ज्ञानेश्वरी
२. श्री ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग
३. श्री दासबोध
४. श्री तुकाराम गाथा
५. विज्ञाननिष्ठ निबंध भाग १ व २ - समग्र सावरकर वाड्मय खंड ६ - वि. दा. सावरकर
६. श्रीविठ्ठलः एक महासमन्वय - डॉ. रा. चिं. ढेरे
७. ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती - ज्ञानेश्वरी: नवे आकलन - डॉ. द. भि. कुलकर्णी
८. मोगरा फुलला - गो. नी. दांडेकर
९. लोकसखा ज्ञानेश्वर - आनंद यादव
१०. दास डोंगरी राहातो - गो. नी. दांडेकर
११. श्री गाडगेमहाराज - गो. नी. दांडेकर
१२. धार्मिक - डॉ. अनिल अवचट
१३. संभ्रम - डॉ. अनिल अवचट
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ते असें !!
तसें नाहीच.
चला तर...
वाक्यं अर्धी तोडून फारसं काही
असो असो !!
+१००
कांही (फुटकळ व कदाचित अवांतर)
यथोचित
+१
"देश-काल-परिस्थिती नुसार
ज्ञानेश्वर रामदेवरायाचे
उत्तर इथे वाचा