Skip to main content

एक धागा...

लेखक दिनेश५७
Published on रवीवार, 30/01/2011
नात्याचा धागा... लातूर जिल्ह्यातल्या भीषण भूकंपाने हजारो संसार उद्ध्वस्त केले. शेकडो बालके अनाथ झाली आणि असंख्य कुटुंबांच्या डोक्यावरची छपरे नष्ट झाली. या भूकंपाने देश हादरला. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात सरसावले. सोलापूरच्या एका शाळेतील काही शिक्षकांनीही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अजित जोशी नावाचा मुलगा तेव्हा दहावीत होता. त्याचे वडील सोलापुरात शिक्षक होते. त्या मदतकार्यात तेही सामील झाले. हजारो हात मानवतेच्या जाणीवेतून एकत्र आले, तर उद्ध्वस्त संसारांना पुन्हा उभारी मिळते, हे त्या दुर्घटनेनंतर अजित जोशीच्या मनावर कायमचे कोरले गेले, आणि वंचितांच्या मदतीसाठी आपला हात कायमचा पुढे राहिला पाहिजे, असे त्याने तेव्हाच ठरवले... महाराष्ट्राच्या मातीत मनाची मशागत झालेला अजित जोशी २००३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाला, आणि त्याची नेमणूक हरियाणात झाली. २००८ मध्ये हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यात कलेक्टर म्हणून रुजू होताच त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचे एक नवे मॉडेल आखले आणि निर्धाराने काम सुरू केले... इथे पानिपतचे पुन्हा महाराष्ट्राशी नाते जडले. त्याआधी २००५ मध्ये, गोहाणा येथे दलित-सवर्ण संघर्षाच्या भडक्यात दलितांची घरे पेटवून दिली गेली होती... ५२ कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली, आणि अजित जोशींनी त्यांच्या पुनर्वसनाचे आव्हान स्वीकारले. फक्त साडेतीन महिन्यांत त्यांच्यासाठी नवी घरे उभी राहिली, आणि या कुटुंबांना नवे, आश्वस्त छप्पर मिळाले... महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी जिल्ह्यांत शेकडो कुटुंबे उदरनिर्वाहासाठी कुटुंबकबिल्यासह गावोगावी हिंडत असतात, हे लहानपणापासूनच पाहिलेले असल्याने, आपण जिथे प्रशासकीय अधिकारी आहोत तेथील कुटुंबांवर अशी वेळ येऊ नये असे त्यांनी तेव्हाच ठरविले आणि या तरुण जिल्हाधिकार्‍याने सोनिपतमध्ये काम सुरू केले. महाराष्ट्रात ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी `साखर शाळां’चा प्रयोग यशस्वी झाला आहे. हरियाणामध्ये वीटभट्ट्यांवर काम करणारी कुटुंबेही राज्यात स्थलांतर करीत असतात. या कुटुंबांमधील मुलांसाठी साखर शाळांच्या धर्तीवर शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव अजित जोशी यांनी हरियाणा सरकारसमोर ठेवला आणि तात्काळ त्याला मान्यताही मिळाली. या प्रकल्पाने आज राज्यात एक नवा आदर्श उभा केला आहे. वीटभट्टी कामगारांच्या मुलांकरिता हरियाणामध्ये आज अडीच हजार शाळा सुरू आहेत. `युनेस्को'च्या `आंतरराष्ट्रीय साक्षरता पुरस्कारा'साठी या प्रकल्पाची निवडही झाली. हरियाणाच्या विकासाचा आलेख मांडताना आज अभिमानाने या प्रकल्पाचा उल्लेख केला जातो. हरियाणातील वंचितांसाठी सुरू झालेल्या या प्रकल्पामागे महाराष्ट्राचीच प्रेरणा आहे, असे अजित जोशी अभिमानाने नमूद करतात... ... अजित जोशींच्या कलेक्टर बंगल्यामागच्या जागेतील त्यांनी स्वत: मशागत करून जोपासलेल्या हिरव्यागार शेतांच्या काठांवर पहाटे मोर बागडू लागतात, पक्ष्यांच्या किलबिलाटाने गावाला जाग येते, आणि सोनिपतचा हा तरुण जिल्हाधिकारी सकाळच्या फेरफटक्यासाठी मोटरसायकल घेऊन बाहेर पडतो. ही एक प्रभात फेरीच असते. या वेळी गावातील शेकडो रहिवासी आपल्या समस्या, गा-हाणी घेऊन एकत्र येतात आणि गावातल्याच एखाद्या मैदानावर, शाळेच्या ओट्यावर `कलेक्टर'चा `जनता दरबार' भरतो... तिथल्या तिथे गावकर्‍याच्या समस्या जाणून घेतल्या जातात, आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचनाही दिल्या जातात... उगवत्या सूर्याबरोबर जिल्हाधिकारी अजित जोशींचे `फिरते कार्यालय' सुरू होते... वर्षानुवर्षांपासून दररोज सकाळचा हा उपक्रम आजही नेमाने सुरू आहे. `सरकारी वेळे'नुसार ते आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होतात, तेव्हाही नागरिकांची रीघ लागलेलीच असते. भेट मिळाली नाही म्हणून पुन्हा यावे लागले, असा अनुभव कुणालाही कधीच येत नाही. सकाळच्या फेरफटक्यातून जनतेसोबत मिसळून जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविणारा अजित जोशी हा बहुधा एकमेव जिल्हाधिकारी असावा. यामुळेच, प्रशासन आणि जनता यांच्यात एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आणि हरियाणा सरकारनेदेखील या नात्याची दखल घेतली. अजित जोशींचे सर्व प्रस्ताव सरकारकडून विनाविलंब संमत होतात, आणि जनता सरकारला दुवा देते. अजित जोशी हा सरकार आणि जनता यांच्यातील अदृश्य दुवा असतो... दोन वर्षांपूर्वी, २००८ मध्ये बिहारमध्ये कोसी नदीला महापूर आला आणि हाहाःकार माजला. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अजित जोशींनी हरियाणा सरकारला प्रस्ताव दिला. एका उद्ध्वस्त गावाचे पुनर्वसन करायचे ठरले, आणि हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्याने बिहारमधील मुसहारी नावाचे एक गाव पुनर्वसनासाठी दत्तक घेतले. एक वेळचे जेवण कमी करून त्याचे पैसे पूरग्रस्तांसाठी द्या, असे आवाहन अजित जोशी यांनी जिल्ह्यातील जनतेला केले, आणि सोनिपतच्या गावकर्‍यांनी लोकवर्गणीतून एक कोटी ४३ लाखांचा निधी अजित जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. त्या निधीतून सोनिपतने बिहारमध्ये उभे केलेले मुसहारी गाव आज आनंदाने नांदते आहे... २२३ घरे उभी राहिली, एक समाजमंदिर आणि एक शाळाही बांधून झाली... ५० शौचालये, ३२ हातपंप आणि गाव हायवेला जोदणारा एक भक्कम रस्ता निर्माण झाला... महाराष्ट्रातील लातूरच्या भूकंपानंतर मदतीसाठी पुढे आलेल्या हजारो हातांनी आखून दिलेल्या आदर्शाची त्यामागे प्रेरणा आहे. अजित जोशी यांनी हा प्रकल्प मोठ्या जिद्दीने पूर्ण केला आहे. `पेपरलेस इलेक्शन' हा जेव्हा एक `विचार' होता, तेव्हा अजित जोशींनी `एस्क्यूएल२०००' नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले... आता त्या जिल्ह्यात होणार्‍या कोणत्याही निवडणुकीसाठी मतदार याद्यांची पुनर्रचना करण्याकरिता, नवे सायास करावे लागत नाहीत... अजित जोशींनी हरियाणात केलेल्या वेगवेगळ्या विधायक कामांतून आपले नाव कोरले आहे... म्हणूनच, हरियाणातले प्रशासकीय अधिकारी अजित जोशी यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करतात, तेव्हा त्यांच्या `मराठी माणूस'पणाचा उल्लेख आवर्जून केला जातो... म्हणूनच, अजित जोशी हा महाराष्ट्र, पानिपत आणि बिहार यांचे तिहेरी नाते जोडणारा धागा ठरला आहे. http://zulelal.blogspot.com ------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3615
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

रविवारची सकाळ अशा स्फूर्तिदायक लेखनाच्या वाचनाने भरून जावी यासारखा दुसरा आनंद नाही. "आपण एका जीवघेण्या प्रसंगातून बाहेर पडलो....ही देवाची कृपा" असे मानून आपला चाकोरीबध्द दिनक्रम चालू ठेवणारे अनेक असू शकतात, पण श्री.अजित जोशी सारख्या कल्पक युवकाने त्या अनुभवाच्या शिदोरीवर आपल्या करीअरच्या साहाय्याने समाजसेवेला जे कौतुकास्पद वळण दिले आहे ते महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय बनू शकते. कार्य काय आहे आणि ते प्रशासनाकडून करवून घेणे वेगळे पण स्वतः पहाटे उठून स्टाफच्या अगोदर सर्वसामान्यांच्यात मिसळून, त्यांच्यातीलच एक बनून नेमके दुखणे काय आहे हे समजावून घेण्याचा श्री.जोशी यांचा उपक्रम स्तुत्य आहेच शिवाय तो तेथील युवकांनादेखील आदर्शवत वाटेल असाच आहे. पानिपत युद्धाला २५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्री.अजित जोशी स्वतः प्रत्यक्ष जागेवर गेले होते आणि तेथील अनुभवावर त्यानी केलेले लेखन येथील वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी त्यांची ओळख फक्त सोनिपतचे जिल्हाधिकारी अशी होती...पण आज श्री.दिनेश यांच्या वरील लेखाने श्री.अजित जोशी किती कल्पक प्रशासकीय अधिकारी आहेत हेही समजून आले. समयोचित लेखाबद्दल श्री.दिनेश यांचे अभिनंदन...! इन्द्रा

धन्यवाद! अजित जोशींच्या कार्याची छान ओळख करून दिलीत. प्रजासत्ताकदिनाच्या आसपास, सगळंच काही विषण्ण करणारंच या देशात घडतं, अशी भावना होती, ती दूर झाली. अशा वृत्तातून उभारी घेऊन असे अनेक अजित जोशी निर्माण व्हावेत, हीच इच्छा!

In reply to by धनंजय

बहुगुणींशी सहमत. श्री दिनेश५७ यांनी समयोचीत असा धागा काढला आणी एका जुन्या म्हणीची आठवण करुन दिली. "अंधाराला नावे ठेवण्यापेक्षा एक मेणबत्ती लावणे चांगले!" धन्यवाद दिनेश!

अप्रतिम मोजक्या शब्दात तुम्ही त्यांच्या कार्याचे यथोचित वर्णन केले आहे . बाकी महाराष्ट्राच्या मातीत मनाची मशागत झालेले अनेक राजकारणी /प्रशासकीय अधिकारी सिस्टम च्या फेर्यात आपली बौद्धिक हजामत करून घेतात . नि मग जीवघेणा खेळ सुरु होतो. पैसा /सत्ता /पॉवर ह्यातून विरक्त राहिलेले असे अधिकारी हे ह्या युगातील संत म्हंटले पाहिजे . जनसेवा हि ईश्वर सेवा हि वाक्य भिंतीवरची वाक्य आयुष्यात आचरणात आणणाऱ्या संतास माझा नमस्कार

अजित जोशींच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे. माझ्या नणदेचे पतीही पंजाबमध्ये (सगळे राजकारण सोसून) अशी कामे करत असतात. त्यांच्या बदल्याही सारख्या होत असतात यामागचे राजकारण न कळण्याइतके आता कोणी अज्ञानी राहिलेले नाही. ते जिथे जातील तिथे शाळेतल्या मुलींचे आरोग्य नीट राहण्यासाठी वेगळा पोषक आहार सुरु करतात. मुलांच्या तब्येतीही फारश्या ग्रेट नसतात पण मुलींपेक्षा बर्‍या असतात. पुढची बदलीची ऑर्डर हातात येइपर्यंत मुलींच्या हिमोग्लोबीनमध्ये बरीच प्रगती झालेली असते.

In reply to by रेवती

या सद् गृहस्थांचाही परिचय करून घेणे आवडेल. रेवतीताई, मनावर घ्या असे सुचवावेसे वाटते.

अहो, जर जिल्हाधिकारी जनतेची कामे करू लागले तर नेत्यानी काय फक्त पैसेच खायचे का? नोकरशहा राजकारणी लोकान्ची कामे करतात आणि नेते जनतेची कामे करतात हा पायन्डा आहे.

छान लेख आणि ओळख. `पेपरलेस इलेक्शन' हा जेव्हा एक `विचार' होता, तेव्हा अजित जोशींनी `एस्क्यूएल२०००' नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले... हे आवडले.

उत्तम व्यक्तीपरीचय. चांगला उपक्रम . श्री जोशीना पुढील सर्व उपक्रमांसाठी शुभेच्छा श्री जोशींसारखे सनदी अधिकारी निर्माण झाले तर कल्याणकारी शासन निर्माण होईल.

धन्यवाद, एका महान व्यक्तिचा परिचय करून दिल्याबद्दल. असे आशादायक, स्फूर्तिदायक कार्य पाहून मनाला बरे वाटते. रोजच्या निराशाजनक बातम्या ऐकून आलेली विषण्णता कमी होते. श्री जोशीना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

श्री. अजित जोशींचा छान परीचय करुन दिलाय तुम्ही.. सरांना प्रत्यक्ष भेटलोय. स्वतः केलेल्या एवढ्या सगळ्या कार्याचा अजिबातही गर्व नसलेले एक उमदे व्यक्तिमत्व..

अप्रतिम.....मी नान्देड ला अजित जोशी यान्चे मार्गदर्शन ऐकले होते....छान प्रशासक आणी वक्ते आहेत