माझं क्रिकेट जीवन.

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
27 Jan 2011 - 5:10 am

बालपणी ज्या काही गोष्टींच बाळकडू पाजल गेल त्यातील एक प्रमुख म्हणजे क्रिकेट. तेव्हा रेडिओ, ट्रांझिस्टर जरी घराघरांतुन आढळुन येत असले तरी टीव्ही मात्र चैन या प्रकारातच मोडत होता. आम्ही गोरेगावला एका हाउसिंग बोर्डाच्या चाळ वजा इमारतीत रहायचो. मी असेन तेव्हा ४-५ वर्षांचा. घरात आम्ही ५ माणसे. आई, बाबा, दिदि, मी आणि माझा मामा. सगळे क्रिकेट वेडे. इतकच काय अगदी आधीच्या पिढीतली आईची आत्या सुद्धा क्रिकेटची षौकीन. क्रिकेटचा मोसम चालु झाला की तरुणांच्या कानाला ट्रांझिस्टर चिकटलेला दिसायचा. (हो तेव्हा आता सारखं १२ मास क्रिकेट नसायचं.) आपल्या संघाकडुन एखादा चौकार, षटकार (हे फार दुर्मीळ असायचं तेव्हा) पडला वा प्रतिस्पर्धी संघाची विकेट पडली की नुसता जल्लोश व्हायचा. मैदानावरच्या लोकांच्या गोंगाटात केली जाणारी ती आकाशवाणीवरची कॉमेंट्री इतकी जिवंत असायची की आपण जणु प्रत्यक्ष तिथेच आहोत असा भास व्हायचा. म्हणुनच नंतर जेव्हा टिव्ही आला तेव्हा टिव्हीला मुका करुन रेडिओला प्लेबॅकच्या कामगीरीवर बसवल जायच. एकीकडे डोळे सामना पहातायत आणि कान रेडिओला चिकटलेले अस दृष्य मी बरेच ठिकाणी पाहिलय. याचा सगळ्यात मोठ्ठा फायदा म्हणजे टिव्हिवर वरंवार येणार्‍या जाहितींच्या मधले काही मोक्याचे निस्टणारे क्षण टिपता यायचे.
आमच्या घरी बिल्डिंग मधला पहिला टिव्ही आला तेव्हा दर शनिवारी-रविवारी संध्याकाळी जवळ जवळ आख्खा मजला आमच्या घरी असायचा. घराला थेटराचच स्वरुप यायच. :) आणि जेव्हा क्रिकेएटचे सामने चालु व्हायचे तेव्हाचा तर माहोल विचारुच नका. वडिलधारी मंडळी सोफ्यावर खुर्चीवर ठाण मांडायचे. त्यांची मंडळी खाली चटईवर. आणि बाकीची चिल्ली पिल्ली त्यांच्या आकारमाना नुसार कुणाच्या मांडीवर, कुणाच्या पुढ्यात तर काही चटई पुढे लादीवर. कार्यक्रम आटोपला आणि मंडळी आपापल्या बिर्‍हाडी गेली की झाडलोट करताना चण्या-शेंगदाण्याची टरफल हमखास दिसायची.

बालमोहन-शारदाश्रम या शाळांतल्या मुलांसारख, खेळ विभागातल भाग्य आमच्या नशीबी नव्हत. अहो जिथे फुटबॉल/व्हॉलीबॉल मधली हवा लाथा, बुक्क्या मारुन कमी होते असली कारण देउन साध्या साध्या खेळांपासुन आम्हाला वंचीत ठेवल जायच तिथे क्रिकेटच्या बॅट, पॅड, स्टंप असली महागडी साहित्य असलेल्या खेळाच तर नाव काढायची पण बंदी. (अतिशयोक्ती वाटेल वा भाईकाकांच वाक्य चोरतोय अस वाटेल पण हे १००% सत्य आहे.) आम्ही खेळायचो ते केवळ लंगडी, कब्बड्डी, लांब आणि उंच उडी असले शारिरीक खेळ. मधल्या सुट्टीत मात्र आम्ही एखादा चपटा दगड घेउन शाळेच्या ओपन हॉल मध्ये फुटबॉल खेळायचो. तिकडे पण क्लेम लागलेले असायचे. हॉल एकच त्यामुळे अनेक वर्गातली पोर टपलेली असायची. रोज कोणीतर आपल्या डब्याला मुकायचा. कारण मधल्या सुट्टीची घंटा झाली की एक जण सुसाट हॉल कडे पळायचा क्लेम लावायला. बाकीचे मग डब्यातले जिन्नस माकडा सारखे तोंडात कोंबुन मागाहुन यायचे. पुढे मागे काही जण हिम्मत करुन बॅट घेउन येऊ लागले. बॉल काय दप्तरात लपवुन आणाता यायचा. पण बॅट आणण हे खर जोखिमेच असायच. चुकुन जर एखादे दिवशी कुठली काच फुटली तर ओरडा आणि मार बसायचाच. त्याच दु:ख नसायच ते तर पाचविलाच पुजलं होतं. पण सगळ साहित्यसुद्धा जप्त व्हायच. वर घरी हजेरी घेतली जायची ती वेगळी.

शाळेत जरी क्रिकेटसाठी एकदम प्रतिकुल परिथिती असली तरी घरी तस नसायच. इमारतीच्या गच्ची वर इतकच कशाला गॅलरीत सुद्धा टुर्नामेंट्स भरवायचो आम्ही. एकटप्पा आउट. बॉल मजल्यावरुन /गच्चीवरुन खाली गेला आउट, कुणाच्या काचेला /दरवाज्याला लागला आउट. असल्या कसलेल्या क्ष्रेत्र रक्षकांना चुकवत बॅटींग करायची हे खायच काम नसायच. मग तिकडे अगदी २०-२५ धावा केल्या की शतक ठोकल्याचे भाव चेहेर्‍यावर आसयचे. कॉलेजमध्ये गेल्यावर दिवस पालटतील अस वाटलं होत.
पण तिथे ही फारस प्रसन्न चित्रं नव्हत. पहिल्या दिवशी मोठ्ठ मैदान पाहुन खुश झालो होतो मी. पण लवकरच तो उत्साह मावळला. कँपस मध्ये पण आजु बाजुला कॉलेजेस तरी किती? आर्ट्स, कॉमर्स, सायंस, इंजिनियरिंग, डिप्लोमा, मॅनेजमेंट, आयुर्वेदिक आणि ही सगळी कमी म्हणुन वर शाळा ही. आता इतक्या सगळ्या कॉलेज मध्यला मुलांना मिळुन एक मैदान म्हणजे तुम्हीच विचार करा. एका वेळी मैदानावर १५-२० सामने चालु असायचे. कोण कुणाच्या चेंडु मागे धावतोय काही कळायच नाही.

मध्यंतरी गोरेगाव सोडुन सांताक्रुझला रहायला गेलो होतो. तिथे कॉलनीत मोठ्ठ मैदान होत. पण तिथे जास्त करुन फुटबॉलच खेळलं जायच. कॉलनीतले रस्ते मस्त ऐसपैस होते आणि रहदारी अशी नसायचीच त्यामुळे ते रस्त्यांनाच आम्ही मैदान मानलं. त्याच सुमारास बाबांनी मला काश्मिरवरुन मस्त सिझनची बॅट आणली होती. पण त्या बिचारीने सिझनचा बॉल जन्मात पाहिला नाही. आमचा सगळा कारभार सुरवातीला लाल रबरी चेंडु आणि नंतर टेनीसचा टणक चेंडु यावरच चालायचा. वेग वेगळ्या बिल्डिंगच्या/कॉलनीच्या टिमशी, एक चेंडु आणि २१ रुपये बोली वर मॅचेस लावल्या जायच्या. पुढे चौकात रात्री हॅलोजन लावुन बॉक्स क्रिकेटच्या टुर्नामेंट्स सुद्धा भरवायचो.

नोकरीला लागल्यावर हे सगळं खेळण कमी कमी होत गेल. पण तोवर सचिन रमेश तेंडुलकर नावाच्या तार्‍याचा उदय झाला होता. स्वतःच्या खेळाची भुक त्याची खेळी पहाण्यावर भागवु लागलो. अश्यात एक दिवस परदेशातुन नोकरीच बोलावण आल. आणि माझा मुक्काम मुंबई वरुन दुबईला हलला. दुबईला मी एका शिपींग कंपनीत आयटी डिपार्ट्मेंट मध्ये लागलो. ८-९ सह-कंपन्या होत्या. सगळ्यांशी ओळख झाली नव्हती. जास्त करुन भारतिय पाकिस्तानी आणि लंकन लोक आमच्या कंपनीत होते. त्यामुळे परदेशात असुनही कधी भारतापासुन लांब असल्याच जाणवत नव्हतं. एक दिवस एक माणुस माझ्याकडे चौकशी करत आला. "आप मुंबईसे हो?.....तो फिर किरकेट तो खेलेही होंगे?" म्हटल हो. "तो फिर आज शाम को काम के बाद रुक जाना थोडी देर." मागाहुन त्याच नाव अमिर आणि तो पाकिस्तानी असल्याच कळल. संध्याकाळी ५:३० ला घरी जायला निघालो. खाली १५-२० माणस थांबली होती. मी गेल्यावर अमिरनं माझी सगळ्यांशी ओळख करुन दिली. त्यान माहिती पुरवली की पुढच्या महिन्यात शिपिंग-ट्रॉफी आहे. दुबईतल्या सगळ्या नावाजलेल्या शिपिंग कंपन्या त्यात भाग घेतात. त्यासाठी आपल्या कंपनीच्या टीमच सिलेक्शन आहे. तेव्हा तु पण चल. माझ्या साठी हा सुखद धक्का होता. ४-५ गाड्यामध्ये आम्ही सगळे कोंबले गेलो आणि गाड्या मैदानाकडे सुसाट निघाल्या.
मैदानावर आल्यावर सगळ्यात आधी मलाच पॅड बांधायला सांगीतल. मी म्हटल पॅड नको मी तसाच करतो बॅटिंग. २ क्षण त्याने माझ्याकडे आदराने पाहिल. "तेरी मर्जी." मी पीच कडे कुच केल. तोवर टाळक्यात प्रकाश पडला नव्हता. पहिला बॉल सुंम्म्म्म्म्म करत कानाच्या बाजुने गेला आणि धाबं दणाणलं.. चक्क सिझनचा बॉल होता. मी तडक किट कडे धाव ठोकली. अमिरची नजर चुकवत पॅड हेल्मेट सगळ घेतलं. बाप जन्मात पहिल्यांदा पॅड बांधले होते. ते सगळ लटांबर सांभाळत चालताना भयंकर अवघडल्या सारख झाल होतं. धावणार कसं हा प्रश्न आवासुन पुढ्यात होता. पण ती नुसतीच नेट प्रॅक्टिस होती त्यामुळे पहिल्याच दिवशी धावाधाव करायची पाळी आली नाही. बरेच जण मारुन मुटकुन आणलेले वाटले. त्यामुळे वासरात लंगडी गाय म्हणुन माझा नंबर लागला. कॉलेज सोडल्या पासुन जवळ जवळ ३-४ वर्षांनी खेळत होतो. पहिले दोन दिवस मजेत गेले. आणि तिसर्‍या दिवशी जी अवस्था झाली की ज्याच नाव ते. हात, खांदे, पाय, कंबर सगळ्यांनी अवयवांनी बंड पुकारल. रुममेट्स दात काढत होते. पुढे नेट प्रॅक्टिससाठी ऑफिस मधुन १ तास लवकर जायची परवानगी मिळाली. आठवड्यातुन ३ दिवस प्रॅकटिसला जायचो. लवकर सटकायला मिळायच म्हणुन मी रुममेट्सना दात दाखवायचो. (ऑफिस मधेले मित्रच रुममेट्स होते.)

तहान लागल्यावर विहीर खणायला घेतली की जी होते तिच गत आमची २००० च्या स्पर्धेत झाली.
अगदीच तळाला नव्हतो, पण आदल्या वर्षीपेक्षा या वर्षी थोडी प्रगती होती. आमच्या कंपनीचा अरबी मालक स्वत: सामने पहायला आला होता. जरी हरलो तरी त्याने कौतुक केलं. आणि पुढच्या मोसमात सुरवाती पासुनच सराव करा असा सल्ला दिला. त्यासाठी आर्थीक पाठबळाचीची तरतुद केली. स्वतः मालक इतका इंटरेस्ट घेतोय म्हटल्यावर आम्हाला अजुन स्फुरण चढल. दुबईतली तेव्हाची बहुतेक सगळी मैदान म्हणजे मरुभुमीवर वसवलेली. एखाद गवताच पात दिसेल तर शप्प्थ. आणि पीच म्हणजे सिमेंटचा कोबा आसायच. फक्त फायनल्स खर्‍याखुर्‍या हिरव्यागार मैदानावर व्हायची. पण तिथे आमचा संघ फक्त प्रेक्षक म्हणुनच जायचा. आमचा संघ म्हणजे भारतीय उपखंडातल्या जागतिक ऐक्याचा नमुना होता. ४ भारतीय, ४ पाकिस्तानी, ३ श्रिलंकन असे मोजुन ११ जण असायचे. १२ वा राखीव खेळाडु दादा पुता करुन आणावा लागायचा.
नुसती नेट प्रॅक्टिस करुन भागणार नव्हत. कारण नेट मध्ये सगळेच शेर असायचे. मग हळु हळु दर शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी आम्ही मॅचेस खेळु लागलो. (याबद्दल लग्न झाल्यावर बायकोच्या कैक शिव्या खाल्यात.) मॅचेस २०-२० षटकांच्याच आसायच्या. कारण दुबईच्या रखरखत्या उन्हात ४० षटक मैदानावर वावरायच म्हणजे खायच काम नव्हत. आम्ही २००१ आणि २००२ मध्ये उप-उपांत्य फेरी पर्यंत पोहोचलो. वर्षागणिक जोष वाढत होता. २००३ मध्ये पहिल्यांदा त्या हिरव्या मैदानावर खेळायच भाग्य लाभलं तेही फ्लड लाईट्स मध्ये. अंतिम सामन्यात हरलो पण तीन वर्षातच अगदी पायथ्यापासुन ते माथ्या पर्यंतचा पल्ला गाठला होता हे आमच्यासाठी खुप होत.

त्या वर्षी एका नव्या स्पर्धांची घोषणा झाली. ६-६ षटकांचे सामने. ७ खेळाडुंचा संघ आणि फक्त ६ षटकं. परत त्यात प्रत्येकाने गोलंदाजी केलीच पाहिजे (किपर वगळता) हा नियम आणि एखाद्या खेळाडुने ३१ वैयक्तिक धावा केल्या की त्याला बळजबरीची व्हि.आर.एस. आताशी आमचा संघ जरा बरा खेळु लागला होता. कंपनीत आमचा भाव वधारला होता. म्हणुन ऑफिसमधले बाकीचेही लोकही क्रिकेट खेळण्याकडे ओढले जाउ लागले. संघात वर्णी लावण्यासाठी चुरस वाढली. आणि त्या नादात मी गोलंदाजी सोडुन यष्टिरक्षणाची वाढीव कामगीरी हाती घेतली. त्या स्पर्धेत पहिल्याच एंट्रीत आम्ही उप-विजेते झालो. मालक भलताच खुश झाला. नंतर वेगवेगळ्या स्पर्धांतुन आम्ही खेळलो. पण मुख्य लक्ष्य होत शिपिंग ट्रॉफी. ही शिपिंग ट्रॉफी फिरती आसायची जो संघ सलग तीन वर्ष जिंकेल त्याला ती कायमची मिळणार होती.

२००४ मध्ये आमचा कर्णधार कंपनी सोडुन गेला. उप-कप्तानाकडे सुकाणु आलं. गांगुलीने जे भारतासाठी केल तेच या पठ्यानं आमच्या संघात केलं. शेवटच्या सामन्यात हटकुन नांगी टाकणार्‍या आमच्या संघात एक नवा त्वेष भरण्याच काम त्यान केल. हळु हळु वेगवेगळ्या स्पर्धांतुन निव्वळ हजेरी लावणारे आम्ही, मैदानं मारुन येऊ लागलो. अखेरीस तो सोन्याचा दिवस उगवला. २ एप्रिल २००४ साली आम्ही शिपिंग ट्रॉफी पहिल्यांदा हातात घेतली. त्यानंतर मात्र मग मागे वळुन पाहिल नाही. २००४ ते २००८ सलग ५ वर्ष आम्ही जेतेपद पटकावल. २००६ सालीच शिपिंग ट्रॉफी कायमची आमच्याकडे आली.

नंतर इनस्पोर्ट्स मध्ये शेड वजा स्टेडियम मध्ये इनडोअर क्रिकेट स्पर्धेतही भाग घेतला. हे इनडोअर क्रिकेट पण धमाल असायच. सगळ्या बाजुंनी जाळी. अगदी वर छताला सुद्धा जाळी असायची. १० ते १२ षटकांचे सामने असायचे. एक जोडी मैदानात उतरायची त्यांनी किमान २ षटकं खेळायचीच. बाद झाले तरी परत खेळायचं. पण एकदा बाद झालात की ५ धावा वजा व्हायच्या. बरेच वेळा तर काही संघ (-) निगेटिव्ह धावसंख्या उभारुन यायचे. तिथे पदार्पणातच विजेतेपद पटकावल.

२००९ मध्ये जॉब सह देश पण बदलला. तव्हा पासुन क्रिकेट खेळण तिथेच थांबलय. मागाहुन कळल की आम्ही दुबईत ज्या मैदानांवर खेळायचो ती सर्व एका मोठ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी बळी गेली.
तो जोष, तो उत्साह, ती रग अजुन आहे. आजही क्रिकेट पहाताना हात सळसळतात. पण सध्या केवळ बेंबिच्या देठापासुन ओरडत भारतीय संघाला प्रोत्साहन देण्या पलीकडे काही करु शकत नाही.

ह्या काही चित्ररुपी आठवणी.

मरुभुमी.

अंतिम सामन्याचा हिरवा गालीचा.

जल्लोष

हीच ती फिरती ट्रॉफी.

हे मानचिन्ह

आमचा संघ मालकांसहीत.

आणि हे ते इनडोअर क्रिकेटच मैदान

क्रीडामौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

असुर's picture

27 Jan 2011 - 5:32 am | असुर

गणपा!!!

__/\__

जबर्‍या लेख! धन्य आहात!!

सुरुवातीला लेख एक नंबरी नॉस्टॅल्जिक वाटत होता, नंतर एकदम 'पुराव्यानिशी शाबीत करीन' म्हणत फटूच टाकले एकदम!!! मस्तच, दुबैला राहून ट्रॉफ्या मारलेल्या एका बल्लवाची गोष्ट वाचून मजा आली. भीमासारखा एखादा खांद्यावर बॅट घेतलेला फटू आला असता तर बहार होती की!!! टाकाच की असा एखादा फटू!!! :-)

--असुर

गोगोल's picture

27 Jan 2011 - 5:43 am | गोगोल

बल्लवाचार्या बरोबर गणपा शेठ बॉलॉचार्य देखील आहेत.

__/\__

जबर्‍या लेख! धन्य आहात!!

असुर्‍याप्रमाणेच म्हणतो. सुरुवातीचं नॉस्टॅल्जिक लेखन वाचतानाही मजा येत होती. चाळीच्या गॅलर्‍यांत खेळलेल्या दोन इनिंग्जच्या टेस्ट म्याचेस, 'हाऊज दॅट' चा उच्चार 'आऊटाय!' असाच होतो ही ठाम धारणा ह्या गोष्टी आठवायला लागल्या. पुढचा शिपिंग ट्रॉफीचा भागही भन्नाट!

आयला गनप्या .. .सह्हीये यार ... ऑस्समंच ..
तुझा हा "रोमेश पोवार" अवतार बघुन लै भारी वाटले .. जियो गणप्या :)

मेघवेडा's picture

27 Jan 2011 - 2:43 pm | मेघवेडा

ज्जे व्वात!! जबर्‍या लेख!! मजा आली. लाडोबा लै फॉर्मात!! इनोचा खप पुन्हा वाढणार आता!!! ;)

चाळीच्या गॅलर्‍यांत खेळलेल्या दोन इनिंग्जच्या टेस्ट म्याचेस, 'हाऊज दॅट' चा उच्चार 'आऊटाय!' असाच होतो

येस्स!! त्याही बॉक्स टेस्ट्स.. चौकोनाबाहेर फूलटॉस आऊट.. नाही रे? 'आऊटाय' लै भारी! असंच म्हणायचो खरं!!

रेडिओ कॉमेंट्री वरून एक किस्सा आठवला. बाबा-काका नेहमी सांगायचे, पूर्वी टीव्ही नसतानाच्या दिवसांत म्हणे रेडिओवर कॉमेंट्री दहा मिनिटं उशीरानं सुरू व्हायची. आपली बॅटिंग असली म्हणजे कॉमेंट्री सुरू होईपर्यंत एक विकेट नक्की गेलेली असायची. कारण तेव्हा सुनील गावस्करसोबत अरूणलाल ओपनिंग करायचा. एकदा एका मॅचच्या दिवशी आजोबांनी खुष
होऊन म्हणे आजीला खीर करायला लावली होती! कारण : अरूणलाल रेडिओ कॉमेंट्री सुरू होईपर्यंत टिकला होता! =)) =))

रमताराम's picture

28 Jan 2011 - 12:07 am | रमताराम

एकदा एका मॅचच्या दिवशी आजोबांनी खुष होऊन म्हणे आजीला खीर करायला लावली होती! कारण : अरूणलाल रेडिओ कॉमेंट्री सुरू होईपर्यंत टिकला होता! =)) =))
खी: खी: खी:. अशीच गोष्ट रवि शास्त्रीच्या स्ट्राईक रेटची असे. (तेव्हा स्ट्राईक रेट हे प्रकर्ण जरा नव्यानेच उगवलं होतं त्यामुळे जरा त्याचे अप्रूप होतं.) जेव्हा हा स्ट्राईक रेट २५ पेक्षा जास्त होई तेव्हा इक्लेअर्स वाटली जात. साला वन-डे मधे पण चाळीस-पन्नास चेंडू खेळून आठ-दहा धावा जमवायचा. पण फायदा एक होता, सुरवातीच्या फायरिंग ओवर्स पार पाडल्याने मधल्या फळीच्या जिवात जीव यायचा. हेच खूप म्हणायचं.

गुरु गणपा, तुमची फटकेबाजी अशीच चालू राहू द्या.

> (तेव्हा स्ट्राईक रेट हे प्रकर्ण जरा नव्यानेच उगवलं होतं त्यामुळे जरा त्याचे अप्रूप होतं.)
हो हो नवे शब्द - पिंच हिटर, स्ट्राईक रेट, शीट अँकर रोल,

शास्त्रीला ते काम दिले असायचे, "शीट अँकर रोल" एकेकाळी तो श्रीकांत पहील्या १५ ओव्हर्सच्या क्षेत्ररक्षणाचा फायदा घ्यायला बॅटचा वापर गदेसारखा करायचा. आजकाल सेहवाग तुडवतो तर बॉल कुठच्या कुठे जातो. श्रीकांत मारायचा ते जस्ट फिल्डरच्या डोक्यावरुन पडून एक किंवा दोन रन मिळायच्या. ३०-३५ रन झाल्या की श्रीकांतचा श्वास फुलायचा. :-) श्रीलंका विरुद्ध मॅच असली की बरेचदा जिंकायचो. वेस्ट इंडीज, इंग्लंड आले की हरायचो. फास्ट बॉलींग आपल्या लोकांना झेपायची नाही, ऑफ स्टँपच्या बाहेर चेंडूला कुरवाळायचा मोह फलंदाजांना आवरायचा नाही. च्यायला साडेचारच्या अ‍ॅव्हरेजने बँटींग केली तरी आज बरे खेळले की समजले जायचे. पाचच्या अ‍ॅव्हरेजने रन्स, पहील्या इनिंग्ज मधे झाल्या तर तिच टीम जिंकणार हे ठरलेले. आहाहा काय दिवस होते!!

शास्त्री निवृत्त व्हायच्या शेवटच्या चार एक वर्षात, तो क्षेत्ररक्षणाला सीमेनजीक गेला की पब्लीक त्याच्या नावाने 'हाय हाय' करायचे. भले भारत जिंकत असो. :-)

पण पठ्ठ्याने ऑडी जिंकली होती १९८५ मधे.. चँम्पीयन ऑफ चँम्पीयन्स.. पहाटे उठून ती लाइव्ह टुर्नामेंट बघायची मजा काही औरच!

अतिशय धन्यवाद गणपा शेठ, आधीच तुमच्या पाकक्रियांनी प्रभावित होतो तर आता क्रिकेटने पण. तुमच्या सारखा माझा पण या खेळाशी जास्त संबंध नव्हता शाळेत, तिथं फुट्बॉल तर नंतर बास्केटबॉल खेळलो कॉलेजात.

तुफान लेख!! तुझ्यामध्ये आणखी काय गुण आहेत??
मस्तच!

सहज's picture

27 Jan 2011 - 8:44 am | सहज

हेच म्हणतो, गणपा अजुन कशा कशात चँपीयन आहे?

ढब्बू पैसा's picture

27 Jan 2011 - 9:20 am | ढब्बू पैसा

मस्तच आहे लेख!! सुरवातीला आठवणीत रमलेला लेख असा वाटत होता पण हळू हळू सुरेख रंगत गेलाय.
बल्लवाचार्य गणपाचा हा नवा पैलू. जियो :)
(क्रिकेट फक्त बघणारी) ढब्बू

विजुभाऊ's picture

27 Jan 2011 - 11:01 am | विजुभाऊ

लै भारी...आता तिकडे अफ्रीकेत काढ ना एखादी टीम.
मस्त नारळाच्या झाडाला स्टंप बनव आणि बॉल म्हणून एखादा छोटा असोल्या नारळच घे
नारळाची झावळी बॅट म्हणुन चालेल.

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2011 - 12:13 pm | स्वाती दिनेश

मस्त लेख रे गणपा, आवडला..
टिवीला मुका करुन रेडिओचा प्ले बॅक ही कॉमन गोष्ट होती तेव्हा..
पुढे वाचत गेले आणि तू तर छुपा रुस्तुम निघालास..
स्वाती

खुपच छान. आमच्या घरातल्या टीम मध्ये आम्ही कायमचे फिल्डर असायचो ते आठवल. अन खुप दिवसान 'सिझन बॉल' हा शब्द ऐकला. वाचला काय डोळ्यासमोर तो लाल भडक रंगाचा डबल शिवण असलेला बॉलच आला.

जियो भाय जियो!!

अमोल केळकर's picture

27 Jan 2011 - 12:21 pm | अमोल केळकर

गणपा शेठ आपण तर अष्टपैलू आहात

अमोल

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2011 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे गणपा :)

ह्या क्षेत्रातील मुशाफिरी देखील लै झकास. आमचा गणप्या नुसता झाराच नाहीतर बॅटचा देखील किती छान उपयोग करु शकतो बघा. उगाच बाब्या नाही तो मिपाचा ;)

भडकमकर मास्तर's picture

27 Jan 2011 - 3:17 pm | भडकमकर मास्तर

वा.. मजा आली..
आखातातल्या क्रिकेटच्या आठवणी मस्तच... फोटोही आवडले...
मरूभूमीत फील्डिंग करायची म्हणजे भयंकर.. एकच फोटो पाहिला की कळाले , २० ओव्हरची म्याचच पुरेशी होत असणार...

मराठे's picture

27 Jan 2011 - 6:43 pm | मराठे

मस्त!

ठाण्यात असताना घरापुढच्या ढेंगभर रुंद गल्लीत खेळलेल्या म्याचेस डोळ्यासमोर तरळून गेल्या! त्या वेळेला इन-मीन तीन मुलं होतो आम्ही गल्लीत तेव्हा एक ब्याटिंग , एक बॉलिंग (अंडरार्म) आणि एक बॉलरच्याच मागे उभा राहून फिल्डिंग अशी रचना असायची.. तशात मग पहिल्या दिव्याच्या खांबापलिकडे (तिथे फक्त खांबच होता... त्याचा दिवा लागलेला आयुष्यात कधी बघितला नाही) बॉल गेला की टू-डी आणि थोड्या लांबच्या दुसर्‍या खांबापलिकडे गेला की फोर.. डायरेक पलिकडे पडला सिक्स अशी रन्स काढण्याची सोय होती... गल्लीच्या दोन्ही बाजूंना जुन्या वाड्यांच्या कुंपणांच्या भिंती होत्या .. त्यावरून बॉल पलिकडे गेला की औट (... औट मंजे तिथे खेळच संपायचा कारण बहुदा बॉल परत मिळत नसे. शिवाय रबरी बॉल जरी चार-पाच रुपयांत मिळत असला तरी बॉलसाठी पैसे मिळवण्यासाठी आईला बराच मस्का मारायला लागायचा... त्यात एक दोन दिवस जायचे).. तसंच जर गल्लीत कोणी येत जात असेल तर खेळ थांबायचा.... काही काही जणं मुद्दामच हळूहळू चालायचे (असं आम्हाला वाटायचं) तेव्हा अस्सा राग यायचा.. ... राग आला तरी तो चेहर्‍यावर न दाखवता शांत राहण्याचं बाळकडू तिथे मिळालं....

रंगपंचमीच्या दिवशी सकाळपासून एकेक घरं घेत जायचो तेव्हा घराघरातले काका-मामा (कधी कधी बाबा) पण बाहेर यायचे.. मग सगळे मिळून तशाच अवतारात त्याच गल्लीत क्रिकेट खेळायचो.... तेव्हा त्यांनी तडकवलेले बॉल परत आणण्यासाठी पळापळ करण्याशिवाय लहान मुलांना फारसं काम नसायचं! तशात कधी ब्याटींग मिळालीच तर 'खेळू दे रे त्याला!' म्हणून जेमतेम पाच सहा सोपे बॉल टाकायचे.. त्यात जरा शॉट वगैरे मारून आम्ही पण फुशारकी दाखवायचो.. पण सातव्या बॉलला त्रिफळा उडालेला असायचा (खरं तर स्टंप म्हणजे एक लाकडी फळी होती जिने कित्येक वर्ष इमाने इतबारे आमची बॉलिंग पचवली).. .

पुढं काही वर्षांनी जुन्या वाड्यांच्या जागी एकेक करून बिल्डिंगा उभ्या राहिल्या.. तेव्हा आधी खेळायला आता खूप मुलं असतील म्हणून आम्हाला तिघांना फार आनंद झालेला.. आणि मुलं होती सुद्धा.. पण त्याच बरोबर त्या गल्लीत आता चारचाकी गाड्या वाढू लागल्या आणि आमच्या क्रिकेटपीच वर त्यांच अतिक्रमण झालं... मग कुठलं क्रिकेट आणि कुठलं काय!

असो...

शिपिंग ट्रॉफी सलग ५ वर्ष जिंकल्या बद्धल अभिनंदन (जरा लवकरच करतोय ना?;-) )
लेखनही झकास!
सो, गणपा द चेफ, गणपा द क्रिकेटर, गणपा द रायटर... गुड गोइंग !!

प्रीत-मोहर's picture

27 Jan 2011 - 7:19 pm | प्रीत-मोहर

वरच्या सर्वांशी सहमत ....गंपा किती गुण हाय रे तुझ्यात? मी इनो घेउन बसलेय

निशदे's picture

27 Jan 2011 - 9:06 pm | निशदे

झकास जमला आहे लेख.......
<<सध्या केवळ बेंबिच्या देठापासुन ओरडत भारतीय संघाला प्रोत्साहन देण्या पलीकडे काही करु शकत नाही. >>
'हेही नसे थोडके'........प्रोत्साहन देणे कमी समजु नका.....
तुमचे क्रिकेट पुन्हा नवीन जोरात, जोमात सुरु व्हावे यासाठी शुभेच्छा......:)

रेवती's picture

27 Jan 2011 - 9:32 pm | रेवती

छान लेखन.
आपल्याकडचं क्रिकेटप्रम असच असतं.
फोटू आवडले.
तू क्रिकेवरून बायकोकडून बरच ऐकून घेतलयस यावर विश्वास बसतोय.
सध्या माझा भाऊ असं काहीसं दर शनिवारी ऐकून घेतो पण तीन तास क्रिकेट म्हणजे क्रिकेट!

तू क्रिकेवरून बायकोकडून बरच ऐकून घेतलयस यावर विश्वास बसतोय.

त्यावर मग मी एक तोडगा काढला होता. तिलापण मॅच पहायला घेउन जायचो. =))
तुझ्या भावाला सांग हा उपाय. (तुझी वहिनी मिपावर नसेल अशी आशा करतो.)

रेवती's picture

27 Jan 2011 - 9:48 pm | रेवती

अगदी हेच वहिनी म्हणाली.
शनिवारी सक्काळी अडीच वर्षाच्या मुलीचं सगळं आवरून जायचं म्हणजे जरा त्रासदायक असलं तरी ती जायला तयार आहे. एकदा गेलीही.........परत येताना मुलगी घामाने भिजलेल्या आणि मळलेल्या बाबांना म्हणाली कि तुम्ही डर्टी आहात्......तेंव्हापासून तो एकटाच जातो.;)

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jan 2011 - 9:54 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तं रे गणपा. :)

मस्तानी's picture

28 Jan 2011 - 7:25 pm | मस्तानी

गणपा ... तुमचे हात सदैव काहीतरी करायला शिवशिवत असतात नाही का :) तुमच्या हातून असेच चांगले काहीतरी सतत घडत राहो !

sneharani's picture

28 Jan 2011 - 7:37 pm | sneharani

मस्त लेख!!
:)

अभिज्ञ's picture

1 Feb 2011 - 9:34 am | अभिज्ञ

मस्त लेख.

अभिज्ञ.

अँग्री बर्ड's picture

18 Feb 2013 - 1:27 pm | अँग्री बर्ड

सहीच !

लेख वर काढल्याबद्दल रागीट पक्ष्याचे आभार!!!

गणपाशेठ, लै लै लै जब्राट आठवणी !!!!!!!!!!! मानलं तुम्हाला. _/\_

(मिरजेत बळवंतरावच्या फ्रंट ग्रौंडावर खेळताना सरपोतदार डॉक्टरांच्या दवाखान्यातली काच फुटली की पोबारा करणारा) बॅटमॅन.

तर्री's picture

18 Feb 2013 - 2:34 pm | तर्री

लेख आवडला .