Skip to main content

द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल

द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल

Published on 05/01/2011 - 11:02 प्रकाशित मुखपृष्ठ
द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल मंगोलियात घडणारी ही कथा आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते. द स्टोरी ऑफ अ वीपींग कॅमल ही एक माणुस आणि प्राणी यांच्या संबंधांचे नितांत सुंदर चित्रण असलेली कथा आहे. भटक्या लमाणांचा एक तांडा उंटांचा सांभाळ करत फिरत असतो. सांडणींच्या विणीचा हंगाम होऊन त्यांना आता पिले होणार असतात. एक नवीनच आई होऊ घातलेली सांडणी पिलाला जन्म देत असते. पण दुर्दैवाने हा बाळंत होण्याचा काळ दोन दिवस सुरु राहतो. पिलू होते, पण वेदनेतून गेलेली ही पहिलटकरिण सांडणी पिलू स्विकारायला नकार देते. दूध देत नाही. काफिल्यातली एक बाई जी सून आणि आई ही आहे, पिलाची काळजी घेऊ लागते. तिने पिलू स्विकारावे यासाठी धडपड करते. त्यासाठी ते त्यांना माहिती असलेल्या पूजा करतात, झेंडे उभारतात. पण तरीही सांडणी हट्टीपणाने पिलाला स्विकारतच नाही. शेवटी त्या बाईची दोन लहान मुले - भाऊ - पाठवून दूरच्या वस्तीतील लामा वादकांना बोलावले जाते. वादक आपले वाद्य सांडणीच्या वाशिंडाला आपले वाद्य अडकवून ठेवतात. वाहणार्‍या वार्‍यामुळे त्यातून नैसर्गिकरित्या स्वरू घुमू लागतात. काही काळाने हे वादक व्हायोलिन सारखे तंतूवाद्य वाजवू लागतात. त्यासोबतच ही बाई संडणीच्या पाठीवरून आश्वासक हात फिरवत गाऊ लागते. तेच सूर वादक उचलत राहतात. स्वरांची जादू आसमंतात भरत जाते. हळूहळू सांडणी शांत होते. तिचे आईपण जागे होऊ लागते. डोळे पाझरू लागतात. पिलूही हळुहळू आपल्या आई कडे येते आणि दूध पिण्याचा प्रयत्न करू लागते. सांडणीच्या डोळ्यातून अश्रु पाझरत राहतात. साधीशी आणि सुंदर कथा असलेला चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे. उंट अभिनय करतात असे कसे म्हणावे? पण खरोखर यात उंटांनी व्यक्त केलेले भाव किंवा टिपलेले भाव अप्रतिम आहेत. सांडणीने आपल्याला पिलाला जवळ घेतल्यावर आपल्याही खरोखर हायसे वाटते. मंगोलियात घडणारी ही कथा आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते. साध्या-सोप्या मंगोलियन-तिबेटी जीवनाचे विलोभनीय दर्शनही हा चित्रपट घडवतो. हा चित्रपट पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. निसर्गाशी आपला असलेला संबंध विसरून जायला झाले आहे आपल्याला ही जाणीव प्रखरतेने झाली मला हा चित्रपट पाहिल्यावर. शिवाय संगीताची वैश्विक भाषा आहे हे अजून एक सत्य हलकेच जाणवून गेले... कोणताही बडेजाव न आणता, साध्याशा या चित्रिकरणाने आणि संगीताने भारावून टाकले. इंग्रजी नाव - द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल The Story of the Weeping Camel वर्ष - २००४ लेखक दिग्दर्शक - ब्यामसुरेन दावा आणि लुईजी फालोर्नी Byambasuren Davaa, Luigi Falorni अभिनय - जांचीव आयुर्झाना शिमेद ओहिन Janchiv Ayurzana, Chimed Ohin पिलू उंट - बोतोक Botok, सांडणी - इंगेन तेन्ने Ingen Tenne

याद्या 3139
प्रतिक्रिया 16

In reply to by यशोधरा

धन्यवाद! :) चित्रपट http://video.google.com/videoplay?docid=6668096176688447819# येथे जालावर पाहायला मिळेल. शोधाशोध केली तर कदाचित तबकडीही मिळेल. मी आमच्या विद्यापीठाच्या संग्रहातून मिळवला होता.

सुरेख चित्रपट आहे. काही वर्षांपूर्वी 'नॅशनल फिल्म आर्काईव्ह'मध्ये पाहायला मिळाला होता. अर्थात, ज्यांना अ‍ॅक्शन/थ्रिलर सिनेमे आवडतात, त्यांनी याच्या वाटेला न गेलेलंच बरं. पण जवळजवळ भाषारहित असणारा हा चित्रपट 'भाषा न कळताही सिनेमा समजला पाहिजे' असं ज्यांना वाटतं त्यांनी जरूर पहावा. (संदर्भः ही चर्चा) अवांतरः ज्यांना असे चित्रपट पाहायची इच्छा आहे अशा पुणेकरांसाठी: 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' या आठवड्यात चालू होत आहे. 'नॅशनल फिल्म आर्काईव्ह'च्या 'फिल्म क्लब'ची २०११साठीची सदस्य नोंदणी सुरू आहे. रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा. आर्काईव्हमधल्या चित्रपटांची यादी इथे पाहता येईल.

बघायलाच पाहिजे हा चित्रपट एखाद्या निवांत दिवशी! धन्यवाद निनाद, थोडक्यात पण सुंदर शब्दांमध्ये माहिती दिल्याबद्दल!

या आधीच ही माहिती मिपावर येऊन गेलेली आहे. http://www.misalpav.com/node/12266 ही लींक बघा. पण एका सुंदर चित्रपटाची पुन्हा आठवण करून दिली हे चांगलेच केलेत!

In reply to by अरुण मनोहर

अरे खरच की :) माझाही पहायचा राहून गेला अपर्णाने लिहिलेला धागा. तिनेही फार छान लिहिले आहे.

चित्रपट पाहिला होता. छान आहे. विशेषतः शेवट मस्तच. त्या लोकांची चिकाटी जबरदस्त आहे. निसर्गाशी आपला असलेला संबंध विसरून जायला झाले आहे आपल्याला ही जाणीव प्रखरतेने झाली मला हा चित्रपट पाहिल्यावर. शिवाय संगीताची वैश्विक भाषा आहे हे अजून एक सत्य हलकेच जाणवून गेले... कोणताही बडेजाव न आणता, साध्याशा या चित्रिकरणाने आणि संगीताने भारावून टाकले. निनाद यांचे परिक्षण छानच.

काय सुंदर आणि जगावेगळ्या थीमवर काढली आहे फिल्म.. मांजरांच्या बाबतीत हे घडताना घरी पाहिलं होतं. तशीही मांजरं काही महिन्यांत पिलांना सुटी करतात आणि जवळ घेईनाशी होतात. पण एकदा काहीतरी असाच त्रास झाल्यामुळे अगदी जन्मल्या क्षणापासूनच मांजरीने पिलांना टाकलं. त्या दिशेला फिरकतही नव्हती. आम्हीच काळजीत होतो. वरुन दूध पाजत राहिलो. मग आईच पिल्लांशी भांडायला लागली तेव्हा मात्र ती पिल्लं देऊन टाकावी लागली. खरंच्..ओळख करुन दिल्याबद्दल आभार..

पहायलाच पाहिजे तुनळिवर पाहिला. फारच छान वाटला. http://www.youtube.com/watch?v=y6Y7GYZ1dn0

निनाद, खूपच सुरेख चित्रपटाची ओळख करून दिलीत. मी लगेच त्याला 'मस्ट वॉच' यादीत टाऊन दिलाय. अपर्णाताईंनी सुद्धा खूपच सुरेख वर्णन केलंय. त्या आई-पिल्लाच्या अवस्थेचा विचार करूनच मनात चरकलं. पण शेवट चांगला आहे हे वाचून बरं वाटलं.