कधी कधी आयुष्यातल्या दिवसांचे गणित कळतच नाही. कधी कधी सगळं कसं एकाच धाग्यात गुंफल्यासारखं घडत असतं किंवा कधी कधी काहीच घडत नाही बरेच दिवस; नुसतेच दिवस पळत असतात. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कॅलेंडरची पाने बदलावीत त्याप्रमाणे दिवस उडत असतात. देवासमोरच्या आरतीच्या ताटात कापराच्या वड्या भर्रभर्र जळाव्यात आणि काही क्षणांतच तिथे फक्त काळपट काजळी रहावी किंवा गॅसवर ठेवलेल्या कढईतले पाण्याचे थेंब काही क्षणातच नाहीसे व्हावेत तसं काहीतरी आयुष्यातल्या दिवसांचं होतं कधी कधी.
कधी कधी काही दिवस उगीच सगळं बिघडत जातं. अगदी साध्या-साध्या गोष्टी डोक्याला ताप देतात. रात्री जेवणानंतर सकाळी उठल्या-उठल्या आम्लपित्ताचा करपट घाणेरडा ढेकर यावा तसं काहीसं होऊन जातं अशा दिवसांचं. अगदी हेच उदाहरण पहा. शनिवारी दुपारी जेवलो आणि कधी नव्हे ते दुपारी झोपलो. संध्याकाळी उठलो. मस्त संध्याकाळ होती. बायकोसोबत बाहेर फिरायला पडलो आणि एका टेकडीच्या पायथ्याशी येता येता मला पहिला करपट ढेकर आला, नाकातून उष्ण आणि उग्र वाफ आली आणि डोकं दुखायला लागलं. संपलं...रात्री झोपेपर्यंत मला आम्लपित्ताने छळ-छळ छळलं. अशा रम्य वेळी एखाद्या सुंदर टेकडीच्या पायथ्याशी मंद-मंद गार हवा आपल्या चित्तवृत्ती उल्हसित करत असतांना जर करपट ढेकर आला तर काय म्हणावे नशीबाला? शप्पथ सांगतो, आम्लपित्त हे असं दुखणं आहे की इंद्रपुरीची अप्सरा जरी समोर येऊन अवतरली तरी छातीतली जळजळ तुम्हाला तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकण्याशिवाय दुसरं काहीच करू (पाहू) देणार नाही. तिच्या अप्रतिम लावण्याची, कमनीय बांध्याची किंवा अजून कशाचीही जादू करपट ढेकराच्या कडवट-आंबटसर चवीपुढे फिकी पडते. तिच्या डोळ्यात तुम्हाला इनो दिसायला लागतं, गालावर लिंबू आणि तिच्या रसरशीत, अधीर ओठांचा रंग बघून तुम्हाला जेलुसिलची आठवण येते. अशी बरीच सौंदर्यस्थळे मी त्या संध्याकाळी बिनबोभाटपणे नजरअंदाज केली. अगदी "तिच्याकडे बघ, तशी पर्स का नाही घेत तू?" असा प्रश्न विचारायच्या निमित्ताने बायकोसमोर एखादे सौंदर्यस्थळ पारखण्याच्या संधी देखील मी हसत-हसत (?) दवडल्या. यावरून माझ्या त्रासाची कल्पना तुम्हाला आली असेल.
रविवारी उशीरा उठलो. मनात विचार केला की आजचा दिवस मस्त जाईल. पण आम्लपित्ताची नजर खूप भयंकर असते. आमच्या सोसायटीचे मावळते सचिव सकाळी १०:३० च्या सुमारास आमच्या घरी आले. सोसायटीच्या चेअरमनपदाची माळ (लचांड) माझ्या गळ्यात पडल्याने शिक्के, शाईची डबी इत्यादी साहित्य ते माझ्याकडे द्यायला आले होते. कुणीही बकरा न सापडल्याने माझ्या गैरहजेरीत मला चेअरमन बनवून सोसायटीतल्या लोकांनी डाव साधला होता. ते आले तेव्हा माझे दंतधावन सुरु होते. कसेबसे आवरत मी तोंड स्वच्छ करून त्यांच्याजवळ येऊन बसलो. सचिवकाका प्राध्यापक असल्याने गप्पा हाणायला त्यांच्याकडे विषयांची कमतरता नव्हतीच. मग त्यांनी सोसायटीतल्या प्रत्येकाचा येथेच्छ समाचार घ्यायला सुरुवात केली. मग त्यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवायला सुरुवात केली. कुठल्याशा खरेदीत त्यांनी कसे शंभर रुपये वाचवले, सोसायटीचा कारभार सांभाळणे किती अवघड आहे वगैरे सांगून झाल्यावर मी हळूच "नाष्ता झाला का सर तुमचा?" अशी एक गमनसूचक विचारणा केली. पण सचिवकाका हलायला तयार नव्हते. मग चहा वगैरे झाल्यावर मी आत जाऊन बायकोला माझ्या मोबाईलवर फोन करायला सांगीतला. "अरे हो का, बरं बरं, आलोच मी अर्ध्या तासात..." असे म्हणून मी सचिवकाकांकडे पाहिले. सचिवकाका काकूंनी घराबाहेर काढल्याप्रमाणे ठाण मांडून बसले होते. " तुम्ही बसा सर, मी येतो आंघोळ करून. एका ठिकाणी जायचयं..." असं म्हटल्यावर त्यांनी बायकोकडे मोर्चा वळवला. "सप्रेंची मंडळी जरा विक्षिप्तच आहे..." हे वाक्य त्यांच्या तोंडून मी हबकलोच. आता हे बायकांची उणी-दुणी काढत बसणार की काय असे वाटल्याने मी "अगं, माझा टॉवेल कुठे आहे?" वगैरे करून शेवटी सचिवकाकांना बाहेर काढले. पण त्यांनी विरजण व्यवस्थित घातले होते. दुपारच्या १२:४५ ला त्यांनी प्रस्थान ठेवले. डॅमेज आधीच झाला होता. आंघोळ वगैरे उरकून १ वाजत आला होता. दुपारचा आळस अंगात घुसला होता. डॅमेज कंट्रोल म्हणून सोमवारी 'रोबोट' पहायला जायचे असे ठरले.
सोमवारी ऑफिसात काही विशेष काम नव्हते. अॅप्रेजलमधल्या गोल्सचा एक भाग म्हणून मला एखादा लेख एखाद्या आंतरराष्ट्रीय फोरमवर प्रसिद्ध करण्याचे काम होते. मी लेख आधीच एका संकेतस्थळाला पाठवला होता. आधी खूप कौतुक करून संपादकाने लेख प्रसिद्ध न करता येण्याविषयी दिलगिरी कळवली होती. सोमवारी सकाळी त्या संपादकाची ईमेल बघून मन खट्टू झाले. बहुधा लेख त्याला बकवास वाटला असावा. एका संकेतस्थळावर साधा एक प्रतिसादही तांत्रिक कारणामुळे प्रसिद्ध होत नव्हता. त्यात माझ्या एका सहकार्याला एका कामाबद्दल शाबासकीचे ढीगभर ईमेल्स आल्याने माझ्या 'क्रियेटीव्ह' मनात 'काहीतरी करायला पाहिजे...' असे अवसान जोर धरू लागले. (या 'क्रियेटीव्ह' अवसानालाच काही दृष्ट आणि अडाणी लोकं मत्सर किंवा ईर्षा किंवा असेच काहीतरी म्हणतात.)
दुपारी लवकर घरी पळून आलो. संध्याकाळी ६:४५ चा 'रोबोट'चा खेळ पहायचे ठरले. मंगलाला गेलो. तिकिट आरामात मिळाले. सिनेमा फुल्ल टाईमपास होता. ९:२५ ला सिनेमा हॉलच्या बाहेर आलो तर धो-धो पाऊस कोसळत होता. आता बाईकवर १०-११ किमी जाणार कसे? अर्धा-पाऊण तास थांबून शेवटी मनाचा हिय्या करून भर पावसात निघालो. जेमतेम मंगलाच्या पुढच्या भागात आलो असू आणि मी भयंकर थंडीने गारठलो. एवढ्या पावसात थंडीत कुडकुडत जाणे शक्य नव्हते. आम्ही तिकिटखिडकीजवळ उभे राहिलो. मी अक्षरशः कुडकुडत होतो. आत जाऊन दोन कॉफी आणि दोन समोसे खाऊन आलो तरी माझी थंडी जात नव्हती. घरी जाणार कसे हा प्रश्न बिकट झाला होता. रात्रीचे ११ वाजले होते. थोड्या वेळाने पाऊस कमी झाला आणि आम्ही निघालो. रस्त्यांच्या जागी नद्या दिसत होत्या. कसेबसे आम्ही ११:४५ ला घरी पोहोचलो.
मंगळवारी ऑफिसात (माझ्यासाठी) काहीच 'उत्साहवर्धक' किंवा 'आश्वासक' घडले नाही. सकाळी ११:३० च्या सुमारास बायकोचा फोन आला. नुकत्याच बसवलेल्या गॅस गिझरचा एक पाईप गळत होता. त्यामुळे भिंत ओली होत होती. दुकानात ७-८ फोन करून देखील कुणीच आले नाही. संध्याकाळी मी पुन्हा फोन केले. ज्याने बसवले होते तोच आंबट चेहरा करून आला. आज सकाळी वॉटर प्युरीफायर बिघडल्याचा फोन आला. पाणी एकदम बंद. फोन करून एकाला घरी जायला सांगीतले. थोड्या वेळापूर्वी सोसायटीचे कॉमन लाईट बिल न भरल्याने विद्युत पुरवठा कापायला माणसे आली होती. वॉचमनने मला फोन केला. "काय करू?" असा प्रश्न त्याने केल्यावर मला कळले की आपण आता चेअरमन आहोत म्हणून आपल्याला फोन आलेला आहे. मी त्याला नव्या सचिवांना फोन करायला सांगीतले. २-३ वेळा फोन करून प्रश्न मिटला की नाही विचारले. सुदैवाने नवे सचिव घरी होते. त्यांनी बिल भरतो असे सांगून पावती आणून दाखवण्याचे वचन दिले आणि प्रश्न तात्पुरता मिटला.
दिवसच्या दिवस असे कटकटीत जातात. वरील उदाहरणे तशी साधीच आहेत पण कधी कधी अकारण अशा घटनांची धास्ती बसते. शिवाय प्रकृतीच्या तक्रारी, इतर काही घटना चटका लावून जातात. दिवस दुखर्या जखमेसारखे ठसठसत जातात. सध्या तसे आहेत असे वाटते....
कधी कधी दिवस मनमुराद आनंद देत जातात. पगारवाढीचे पत्र मिळते, पगारवाढ चक्क बरी असते ('चांगली' कधीच म्हणायची नसते; भिंतीलाही कान असतात), दुपारी कुणीतरी सुग्रास पार्टी देतो, ऑफिसातून लवकर घरी जायला मिळते, एखाद्या कामाचे कौतुक होते, आपल्यातही काहीतरी दम आहे असे वाटते आणि हा विचार बरेच दिवस राह्तो. त्या विचाराच्या जोरावर बर्याच उलाढाली यशस्वी होतात. एखादी छान खरेदी होते, एखादी छोटी सहल होते, आत्मविश्वासाची पातळी उंचावते. मित्र भेटतात, पार्ट्या रंगतात, भरपूर गप्पा होतात....असे सगळे कसे मस्त होत असते....पण असे दिवस कमीच!
कधी कधी सगळे शांत असते. अगदी निश्चल! अगदी एखादा सुंदर तलावही नाही तर एखादं घाणेरडं डबकं ही नाही असे दिवस असतात कधी कधी. सकाळ होते, ऑफिसात फक्त ठरलेले तास भरले जातात, तेच ठराविक काम होते, जेवणं होतात, ठराविक बोलणं होतं, ठराविक माणसे भेटतात, सकाळी नेहमीप्रमाणे "मस्त झालाय चहा" म्हटलं जातं, संध्याकाळ होते, टीव्ही लावला जातो, पुन्हा जेवणं होतात आणि मग शेवटी झोप होते. सगळं कसं शिस्तबद्ध, अगदी एखाद्या सरळ रेषेसारखं. कुठेच काही दंगा नाही; आरडाओरडा नाही. खूप आनंदही नाही आणि खूप सलणारं असं दु:खदेखील नाही. मनाच्या विहीरीतल्या भावनांच्या पाण्यावर फारसे तरंग उठत नाहीत. कुठल्याही घटनेचा एखादा दगड या विहीरीत भिरकावला गेला तरी पाणी फारसे ढवळून निघत नाही. सगळं शांत असतं. आम्लपित्त देखील अशा वेळी फारसे वाटेला जात नाही. मन प्रसन्न ही नसतं आणि खिन्न ही नसतं. सगळं कलरलेस, टेस्टलेस, आणि ओडरलेस भासतं.
तर असे हे दिवस...हिशेब मांडायचा म्हटला तर मांडायचा कसा? काय मिळवले, काय गमावले, जे पाहिजे आहे ते मिळवले का, जे नकोय तेच पदरी पडतंय का, जे मिळवण्याचा अट्टहास केला ते मिळाल्यावर समाधान मिळतयं का, जे चाललयं ते कुठेतरी कशाची तरी बेरीज करतयं की वजाबाकी टाळून सरळ भागाकार करून मनाच्या विहीरीतले पाणी गढूळ करतयं....कसं कळणार? कळण्यासाठी काय करायला पाहिजे? आणि चुकीचे उत्तर आल्याचे कळल्यावर गणित बरोबर सोडवण्यासाठी काय करायचं?
कधी कधी फक्त प्रश्नच पडतात...
--समीर
वाचने
2791
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
अतिशय जबर्दस्त पणे लिहिले आहे
खूप आवडलं,,,,,,, जणू माझ्या
सुंदर लेख
मनातले बोललात !!!
मस्त लिहीलय..
अतिशय साधा विषय.. पण फुलवून
सुरुवातीचं ते करपट ढेकराच
धन्यवाद
In reply to सुरुवातीचं ते करपट ढेकराच by शिल्पा ब
मस्त! आवडलं.
सहमत.. तात्या. -- प्रसिद्ध
In reply to मस्त! आवडलं. by शुचि
धन्यवाद!
क्षणचित्र