विलय - ३ (अंतिम)

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
26 Sep 2010 - 5:45 pm

विलय-१

विलय-२

घरातून बाहेर पडून हंतु आणि सलुरान झपाझप चालू लागले. कुठे जायचं आहे याची अचूक माहिती असल्यासारखं हंतु इकडेतिकडे न पाहता आणि आपल्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे कोणतीही हुंगाहुंगी न करता एका दिशेने लुटुलुटु धावत होता आणि त्याच्या पट्ट्याच्या ताणाचा अंदाज घेत सलुरान त्याच्या मागे मागे लांब लांब ढांगा टाकत चालला होता. सलुरानच्या हातात एक उंच दंडगोलाकार काठी होती आणि ती टेकवत तो झपाट्याने निघाला होता. एका आंधळ्याच्या मानाने त्याचा वेग खरोखरच विलक्षण होता. रस्त्यातले एकूण एक खड्डे उंचवटे ओळखीचे असल्यासारखा तो ठामपणे आणि निश्चिंतपणे चालत होता. त्या दोघांना गाठण्यासाठी त्याला थोडंसं धावावं लागलं. टॉर्चच्या प्रकाशात बर्‍यापैकी दिसत असूनही त्याला पूर्ण वेगात धावता आलं नाही. हळू हळू धावत तो सलुरानच्या पाठीमागे पोचला तेव्हा चढण बर्‍यापैकी जाणवायला लागली होती. डोंगरउतारावर कोणतीही मोठी झाडे नसली तरी झुडपांची गर्दी बरीच होती आणि त्या गडद झुडपांतुन एक पांढरट वाट नागमोडी पुढे चालली होती.
"साधारण किती वेळ लागेल आपल्याला पोचायला?", त्याने सलुरानला विचारले.
"मध्यरात्रीपुर्वी साधारण अर्धातास आपण तिथे पोचू."
"आणि बाकीचे लोक?"
"तेही मध्यरात्रीपर्यंत तिथे पोचतील. मध्यरात्रीलाच समारंभ चालू होतो."
"पण मला तर कोणीच येताना दिसत नाहीय", तो म्हणाला आणि चालता चालता वळून त्याने तो जिकडून आला त्या गावाच्या दिशेने पाहिलं. लांब दाट झाडांच्या काळ्या गर्दीत कुठेतरी आग पेटवल्यासारखा पिवळा ठिपका त्याला दिसला. बाकी सगळा आसमंत काळ्या कभिन्न अंधारात गुडुप झाला होता. त्याने आकाशाकडे पाहिले. चंद्रप्रकाशाअभावी सगळं आकाश काळ्याभोर मखमलीसारखं दिसत होतं आणि त्यावर चमकीसारख्या चंदण्या उठून दिसत होत्या. इतरत्र आकाश निरभ्र होतं पण त्यांच्या डोक्यावरमात्र धुराच्या लोटाचे तुरळक ढग जमा झालेले दिसत होते.
"हम्म्म, तुला दिसत नाहीय म्हणजे कोणी येतच नाहीय असं थोडीच आहे. शिवाय इथला रस्ता त्यांच्या अगदी पायाखालचा असतो. आपल्यासारखं त्यांना बारा-बारा तास आधी निघायची गरज नसते.", सलुरान हसत हसत म्हणाला. त्याला धाप लागल्याचं किंवा त्याचा श्वास फुलल्याचं कोणतंही चिन्ह त्याच्या बोलण्यात दिसलं नाही.
बाकीचे लोक कोणत्या वाटेने चढत असतील की आपल्याच मागून दबक्या पावलांनी येत असतील असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्याला एकदम दुपारी चालताना एक-दोनदा आजूबाजूच्या झुडपांमध्ये जाणवलेली सळसळ आठवली. तो एकदम शहारला आणि आजूबाजूच्या झुडपांवर प्रकाशाचे झोत टाकत निरखून पाहत पाहत चालू लागला. त्याच्या कपाळावर आता घामाचे थेंब जमा होऊ लागले होते.
इकडे तिकडे पाहत चालण्यामध्ये व्यग्र झाल्याने बराच वेळ तो काहीच बोलला नाही. सलुरानही नि:शब्दपणे चालत होता. हंतुच्या जीभ बाहेर काढून चाललेल्या श्वासोच्छवासाचा "हॅ हॅ" असा आवाज आणि त्यांच्या दोघांच्या पावलांचा आवाज सोडला तर बाकी काही आवाजही येत नव्हता. हवेत आता धूरमिश्रीत गंधकाचा वास ठळक होत होता पण हवा थंड थंड होत चालली होती. अंधारात टॉर्चचा प्रकाश पडेल तेवढाच भाग त्याला दिसत असल्याने नक्की वाट कशी चाललीये, कुठे कुठे ते वळाले आणि डोंगराच्या नक्की कोणत्या बाजूला ते आहेत हे त्याला कळेनासे झाले होते. नक्की आपण कुठे चाललोय असा विचार त्याच्या डोक्यात आल्यावर मात्र तो जरा संभ्रमात पडला. या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण चूक तर नाही ना केली? समारंभ वगैरे सगळ्या भूलथापा मारून हा आपल्याला दुसरीकडेच तर घेऊन नाही ना चालला? अशा बर्‍याच शंका त्याला येऊ लागल्या. एक मन म्हणत होतं की हा माणूस आपल्याला लुबाडणाच्या किंवा इतर काही हानी पोचवण्याचा तर विचार करत नाही ना तर दुसरं मन म्हणत होतं की लुबाडायचं किंवा मारायचं असतं तर त्याने ते खालीच नसतं का केलं, एवढं वर जाण्याची गरज काय? या सगळ्या विचारांनी आणि शंकाकुशंकांनी मन व्यापल्याने त्याचा चालण्याचा वेग मंदावला. खाली मान घालून विचार करत चालताना सलुरानच्या अंगावर धडकल्यावरच त्याला कळालं की तो थांबला आहे.
"तू थोडा थकलेला दिसतोस. इथे थोडं थांबून दम खा, पाणी वगैरे पिऊन घे", सलुरान म्हणाला.
त्यावर काहीच न बोलता त्याने सुस्कारा सोडला आणि बाटली उघडून घोटाघोटाने पाणि पिऊ लागला.
"काळजी करू नकोस. ते लोक अगदी वेळेवर पोचतील. हा समारंभ नाही झाला तर राकसाचा कोप होतो अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे", त्याच्या मनातले विचार ओळखल्यासारखा सलुरान बोलत होता,"एव्हाना खरं म्हणजे त्यांनी आपल्या आगमनाची वर्दी द्यायला पाहिजे होती".
त्याचं बोलणं संपतं न संपतं तोच हवेवर हलक्या आवाजात तालवाद्यांचा डिंडीम अस्पष्टपणे ऐकू येऊ लागला. सलुरान मोकळेपणी हसला. त्याच्याही मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालं आणि खालून येणार्‍या त्या आवाजाच्या दिशेने त्याने एकवार पाहून घेतले. नव्या जोमाने तो पुन्हा सलुरानच्या मागे चालू लागला.
कानावर येणार्‍या डिंडीमाच्या तालावर पुन्हा काहीही न बोलता बराच वेळ चालल्यावर डावीकडच्या खडकांआडून अंधुक प्रकाशाची आभा दिसू लागली. सलुरान थबकला आणि म्हणाला, " आणखी पाच-दहा मिनीटांमध्ये आपण क्रेटरच्या काठावर असू. तू तयार आहेस ना आयुष्यातल्या सर्वात विलक्षण अनुभवासाठी?"
"येस्स. कधी एकदा तिथे पोचेन असं मला झालंय", तो उत्तेजित स्वरात उत्तरला. सलुरान पुन्हा एकदा दात दाखवून हसला आणि पुढे वळून चालू लागला. पुढे थोडं जाऊन ते वळाले आणि दोन मोठ्या खडकांच्या कपारीमधून वर चढत गेले. सलुरान पाठोपाठ त्या कपारीतून तो वर येऊन उभा राहिला आणि समोरचे दृष्य पाहून तोंडाचा आ वासून स्तब्धच झाला. एक महाकाय बशी असावी तसं समोर एक साधारण किलोमीटरभर व्यासाचं खडकांचं रिगण दिसत होतं. कडेला उंच असणारे खडक एखाद्या स्टेडियमच्या स्टँडप्रमाणे हळूहळू खालीखाली उतरत गेले होते आणि साधारण दोन-तीनशे मीटर आत आणि शंभर एक मीटर खाली उअतरल्यावर तिथे ते खडक लाल लाल होत गेले होते. जसं जसं केंद्र भागाकडे जाऊ तसंतसं लाल रंग केशरी आणि केशरी रंग पिवळा होत गेलेला दिसत होता. वरती भेगाळलेल्या काळ्या पदार्थाच्या भेगांमधून लाल पिवळा प्रकाश फाकत होता. हवेत जाणवणारी थंडी जाऊन आता बर्‍यापैकी धग जाणवत होती. कितीतरी वेळ तो ते दृष्य डोळ्यात साठवत राहिला. भान हरपल्यासारखं होऊन त्याला इतर सर्व गोष्टींचा विसर पडला. मोठा मोठा होत जाणारा डिंडीमही त्याला बराच वेळ ऐकू येईनासा झाला होता. सलुरानने त्याच्या खांद्याला स्पर्श केल्यावर तो भानावर आला.
"चल", सलुरान म्हणाला आणि चालू लागला. सलुरानच्या मागे जाताना त्याचं मन कृतज्ञतेनं भरून आलं आणि थोड्यावेळापुर्वी या माणसावर आपण संशय घेतला म्हणून त्याला थोडंसं अपराधी वाटलं.
"थँक्यू, सलुरान", तो मोठ्याने म्हणाला.
"माझे आभार कसले मानतोस? तुझं इथे येणं हे विधिलिखीत होतं म्हणून तू इथे आहेस आणि अजून तू खरी गंमत तर पाहिलीच नाहीयेस", सलुरान हसत हसत म्हणाला.
हे ऐकल्यावर त्याने ते ज्या दिशेने निघाले होते तिकडे पाहिले आणि आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. उतरत जाणार्‍या खडकांमध्ये मध्येच एका ठिकाणी खडकांवर खडक साचून एक पन्नास एक फूट वर जाणारा पट्टा निर्माण झालेला दिसत होता आणि त्या सुळक्याच्या वरच्या टोकाला चोच असल्यासारखी खडकाची साधारण दहा-पंधरा फूट लांबीची पट्टी तयार झालेली होती. भारावल्यासारखा सलुरानच्या मागे चालत तो वर चढत गेला आणि थोड्याच वेळात त्या पट्टीवर जाऊन पोचला. आता ते क्रेटरच्या सगळ्यात जवळच्या काठापासून पन्नासएक मीटर अंतरावर होते आणि एखाद्या स्विमींगपूलच्या डायव्हिंग बोर्डवर असल्या सारखे त्याला वाटत होते. तिथे उभा राहून तो केंद्राकडे पाहू लागला. खालून येणार्‍या लालपिवळ्या प्रकाशाने त्याच्या अंगावरचं ते वस्त्र पेटल्यासारखं दिसत होतं. सलुरानही त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याने पहिल्यांदाच आपला काळा चष्मा काढला. त्याने चष्मा काढला हे जाणवल्यामुळे अभावितपणे त्याने सलुरानकडे पाहिले. बाजूने सलुरानच्या लांब पापण्या दिसत होत्या आणि त्याच्या डोळ्यांमध्ये समोरचं दृष्य लालपिवळ्या ठिपक्यासारखं प्रतिबिंबित झालं होतं. तो सलुरानकडे पाहतोय हे कळाल्यासारखा सलुरानने चेहरा त्याच्याकडे वळवला. सलुरानचे डोळे चांगले लांबलचक आणि पाणीदार होते पण त्याच्या डोळ्यात बुबुळंच नव्हती. त्याला एकदम कसंतरीच झालं आणि तो खाली पाहू लागला. आता तालवाद्यांचा आवाज चांगलाच जोरदार येऊ लागला होता. खाली पाहतानाच त्याला दोन्ही बाजूला क्रेटरच्या काठांवर हालचाल जाणवली. त्याने पुन्हा आजूबाजूला पाहिले तेव्हा सलुरान त्याच्या शेजारी नव्हता आणि डावी-उजवीकडे क्रेटरच्या काठावर सगळे आदिवासी जमा होताना त्याला दिसले. पांढरी वस्त्रं नेसलेले ते आदिवासी हात उंचावून नाचत होते. काही काही जण गळ्यात ढोलकीसारखी तालवाद्य घेऊन वाजवत होते. आता समारंभ सुरु होईल आणि आपल्याला इथून जावं लागेल असं त्याला वाटलं आणि त्या आधी एक फोटो घ्यावा म्हणून त्याने अलगद अंगरखा वरती करून खिशातून मोबाईल काढला. इकडेतिकडे पाहून नकळत तो चालू करण्यासाठी तो त्याकडे पाहत असतानाच त्याचा अंगरखा एकाएकी विरू लागला. एकेक धागा निघून सावरीच्या बीच्या पिसार्‍यासारखा गोळा होत हवेत उडू लागला. आश्चर्यातिरेकाने तो वळाला आणि मागे पाहिले. थोड्या अंतरावर हंतु दोन पाय पुढे टेकवून बसलेला होता आणि त्याच्यामागे सलुरान उभा. इतकावेळ हातात असलेली काठी सलुरानने आता उजव्या खांद्यावर उजव्या मुठीत त्याच्याकडे रोखून धरली होती आणि डावा हात सगळी बोटं पसरून बाजूला ताणून धरला होता. त्या काठीच्या टोकाला त्याला इतकावेळ न दिसलेलं लखलखतं भाल्याचं पातं होतं.
विरत जाणार्‍या वस्त्राबरोबरच समोर काय घडतंय ही त्याची जाणीव विलय पावत चालली होती आणि आजूबाजूचे आदिवासी आता अंगात आल्यासारखे अंगाला झटके देत मोठमोठ्याने किंचाळत नाचत होते.

(समाप्त)

कथाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Sep 2010 - 6:27 pm | पैसा

...

सहज's picture

26 Sep 2010 - 7:02 pm | सहज

वर्षभर ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून वैतागला की तो असं काहीतरी साहस करायला बाहेर पडे. आधी एक-दोन मित्रांना बरोबर घ्यायचा तो प्रयत्न करी पण त्यांचे नखरे, बावळटपणा आणि जीवाला जपून 'साहस' करायची वृत्ती हे त्याला असह्य व्हायचं म्हणून तो या वेळी एकटाच आला होता.

बाब्बौ!!!!!

(नखरे करणारा बावळट भित्रा) सहज

रन्गराव's picture

26 Sep 2010 - 10:28 pm | रन्गराव

विचित्र आहे. पण जगावेगळ आहे म्हणून खूप आवडल.

गोगोल's picture

27 Sep 2010 - 1:22 am | गोगोल

वाचता वाचता काय होणार हा अंदाज आला होता. तरी पण उत्कंठा कमी झाली नाही.

अरुण मनोहर's picture

27 Sep 2010 - 5:52 am | अरुण मनोहर

वर्णन शैली आवडली.

शिल्पा ब's picture

27 Sep 2010 - 6:25 am | शिल्पा ब

छान ...कथा आवडली...साधारण अंदाज आला होता...तो खरा ठरला.

चिगो's picture

27 Sep 2010 - 10:29 am | चिगो

आवडली. पण मला खरच वाटत होतं की एवढ्यात संपणार नाही म्हणून..

राजेश घासकडवी's picture

27 Sep 2010 - 10:40 am | राजेश घासकडवी

पहिला भाग फारच सुंदर झाला होता. उत्कंठा वाढली होती. दुसऱ्या भागात, विशेषतः सलुरान भेटल्यानंतर काहीसं प्रेडिक्टेबल झालं. तरीही नक्की काय होणार, कसं होणार हे वाचण्याची उत्सुकता राहिली होती.

तुमच्या लेखनावर व वर्णनशैलीवर जीएंचा थोडा प्रभाव जाणवला.

अधिक गुंतागुंतीची कथानकं हाताळावीत ही विनंती.

टुकुल's picture

27 Sep 2010 - 2:53 pm | टुकुल

पहिला भाग आधी वाचला होताच, दुसरा आणी हा अंतीम भाग आता वाचला, एकंदरीत कथा आणी तुमची लिहिण्याची शैली आवडली.

--टुकुल

आनंद's picture

27 Sep 2010 - 3:42 pm | आनंद

जबरदस्त !!!

लिखान आवडले ..

वर्णन जबरदस्त ... परंतु जेथे समाप्त झाले तेथे पुढे नक्कीच जबरदस्त वर्णन लिहिण्याची वेळ होती असे वाटले.
थोडे अपुर्ण असतानाच समाप्त झाले असे वाटले .

असो .. मला तर मध्ये मध्ये प्रिन्स ऑफ परसिया सारखे .. त्या बियांच्या प्रभावामुळे आधीच दिसते आहे आणि मग शेवटी तो पुन्हा पायथ्याशीच उभा आहे आणि पुन्हा प्रवास सुरु करतोय असे वाटत होते ...

बाकी लिखान उत्तम आणि विषय ही नविन

अनिल हटेला's picture

27 Sep 2010 - 6:58 pm | अनिल हटेला

शैली आवडली !!

शेवट फारसा भावला नाही !!

पू ले शु............. :-)

चतुरंग's picture

27 Sep 2010 - 9:24 pm | चतुरंग

दुसर्‍या भागात जरा संथपणा येतोय काय असे वाटतानाच पुन्हा कथेने उचल घेतली.
जास्त गुंतागुंतीचे कथानक घ्यावेत. वर्णन करण्याची शैली ताकदवान आहे.
कथा आवडली.

किंचित छिद्रान्वेष - सलुरानचे डोळे चांगले लांबलचक आणि पाणीदार होते पण त्याच्या डोळ्यात बुबुळंच नव्हती
डोळे पाणीदार असलेले बुबुळांशिवाय दिसणार नाहीत आणि त्याच्या डोळ्यात आगीचे प्रतिबिंब पडले आहे असेही आधीच्या ओळीत लिहिले आहे... (इतक्या छान कथेत हे खटकले म्हणून सांगावेसे वाटले.)

नगरीनिरंजन's picture

28 Sep 2010 - 10:50 am | नगरीनिरंजन

धन्यवाद रंगाशेठ!
सगळ्यांच्या प्रतिसादाने साधंसरळ कथानक नीट लिहीता येतंय हा विश्वास थोडा येऊ लागलाय, त्यामुळे तुम्ही आणि गुर्जी म्हणाले तसं यापुढे प्रयत्नपूर्वक काहीतरी नवीन आणि जास्त कॉम्प्लेक्स लिहायचं धाडस करीन.
तुमचा छिद्रान्वेष अनाठायी नाही पण डोळ्यातल्या पाण्यात प्रतिबिंब पडू शकेल असं मला वाटलं. असे डोळे मी प्रत्यक्षात पाहिलेले नाहीत आणि इतर कोणीही पाहिले असतील असं वाटत नाही त्यामुळे संशयाचा फायदा मला. :-)

रेवती's picture

27 Sep 2010 - 11:03 pm | रेवती

लेखन अतिषय आवडले.
जरा घाबरगुंडी उडाली आहे.

स्पंदना's picture

28 Sep 2010 - 4:39 am | स्पंदना

थरथराट!

वर्णन करण्याची ताकद जबरदस्त आहे... कथानक आणखी थोडे सस्पेन्स घ्यावे.
शेवटी आणखी वर्णन करणे शक्य झाले असते.

शुचि's picture

28 Sep 2010 - 5:00 am | शुचि

जी एंचा प्रभाव वाटला थोडा.
बळी जाणार ह्याचा अंदाज आला होता पण फारच छान वाटलं वाचायला.
सुरेख लेखनशैली.

नगरीनिरंजन's picture

28 Sep 2010 - 10:39 am | नगरीनिरंजन

आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार! लिहीण्याच्या स्वानंदाबरोबरच कोणी 'आवडलं' असं सांगितल्याने जास्तीचं समाधान मिळतं. :-)

इन्द्र्राज पवार's picture

28 Sep 2010 - 11:12 am | इन्द्र्राज पवार

प्रथम सर्व भाग वाचायचे आणि एकत्रीत अशी प्रतिक्रिया द्यायचे असे ठरविल्याने तसेच आता कथा समाप्तीची नोंद केली असल्याने ... हा प्रतिसाद ~~

प्रथमच हे सांगतो की, जरी तीन भागातील हे कथानक असले तरी प्रत्येक भाग स्वतःची स्वतंत्र अशी ओळख ठेवण्यात यशस्वी झाला आहे, इतकी श्री.निरंजन यांच्या लेखणीची करामत आहे. पुढील भाग केव्हा येईल याची वाचकात उत्सुकता निर्माण करणे हेच लेखकाचे यश म्हटले पाहिजे. जर हीच कथा एकत्रीतरित्या कुठल्यातरी मासिकात व ब्लॉगवर आली असती तर मनावर प्रभाव हाच राहिला असता (जरी मी तो 'धक्कादायक' शेवट काहीसा अपेक्षिला असला तरी....).

लेखकाला जशी प्रवासाची, साहसाची आवड दिसते, तद्वतच कथानकाबरोबर जणू वाचकही दुसर्‍या बाजूने प्रवास करीत त्या दोघांच्या हालचाली निरखीत आहे हे जाणीव सातत्याने राहते. निसर्गातील क्षणोक्षणी होत जाणारे चित्रमय बदल फार बारकाईने टिपले गेले आहेत, शिवाय ते वर्णन करताना ज्या काही सुंदर उपमा "उपड्या द्रोणासारखा दिसणारा तो डोंगर आणि ढगांचा मफलर गुंडाळून बसलेलं, तोंडाचा 'ओ' केल्यासारखं दिसणारं त्याचं शिखर." तसेच "खालून येणार्‍या लालपिवळ्या प्रकाशाने त्याच्या अंगावरचं ते वस्त्र पेटल्यासारखं दिसत होतं." आदी.....अत्यंत प्रखरतेने ते वातावरण साक्षात जिवंत करतात.

श्री.नगरीनिरंजन यांच्या वाचनाची मला माहिती नाही, पण का कोण जाणे, त्यांना 'जी.ए.कुलकर्णी' फार भावत असणार असे वाटत राहिले (वाचले नसले तर तात्काळ त्यांचे सारे कथासंग्रह वाचून काढा...). मी तर असे म्हणतो की 'विलय'चे तिन्ही भाग वाचताना मला सातत्याने जी.एं.च्या "स्वामी", "प्रवासी", "रत्न" या कथांची आठवण येत राहीली. श्री.निरंजन यांचे "त्या गडद झुडपांतुन एक पांढरट वाट नागमोडी पुढे चालली होती.".... जी.ए. नी हे वाक्य असे लिहिले असते, "त्या गडद झुडपांतून पांढरट पोट दाखवत भकास पडलेल्या सापासारखी पुढे नागमोडी वाट चालली होती." ~ इतके सुंदर साम्य आहे या दोघांच्या लिखाण शैलीत.

तसेच "खालून येणार्‍या लालपिवळ्या प्रकाशाने त्याच्या अंगावरचं ते वस्त्र पेटल्यासारखं दिसत होतं." ही तर जीएंच्या 'इस्किलार' च्या हातात हात घालणारी प्रभावी रचना आहे.

लिहा अजून....मराठी भाषेला यातून अजून एक जी.ए., एक उद्धव शेळके, एक नेमाडे मिळेल असे वाटत राहील. एका जातिवंत लिखाणाचा अनुभव दिल्याबद्दल श्री.नगरीनिरंजन यांचे अभिनंदन.

इन्द्रा

sneharani's picture

28 Sep 2010 - 11:20 am | sneharani

मस्त झालेत तिन्ही भाग!
एक वेगळीच कथा... आवडली!

उत्तम झालेत तीनही भाग!! वरती घासूगुर्जींनी म्हटल्याप्रमाणे वर्णनशैलीवरती जीएंचा प्रभाव जाणवतोय.

कवितानागेश's picture

30 Jul 2012 - 2:42 pm | कवितानागेश

माझी आवडती कथा. :)