✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रस्त्यावरील अपघात

व
विकास यांनी
Wed, 07/21/2010 - 20:07  ·  लेख
लेख
भोचक यांना कधी प्रत्यक्षात जरी भेटलो नसलो तरी, आज हूरहूर लागली आहे. जो काही थोडाफार संवाद झाला तो आधी पण पुरेसा नव्हता, पण आता अधूराच राहणार याचे वाईट वाटत राहील. हे माझ्याबाबतीतच नाही तर अनेकांच्या बाबतीत खरे आहे असे राहून राहून वाटते. पण अशा चांगल्या आणि होतकरू व्यक्तीच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना केवळ श्रद्धांजली म्हणून थांबणे जीवावर येत आहे. अशी शोक व्यक्त करण्याची वेळ का यावी हा प्रश्न टोचत आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये हीच प्रार्थना... ई-सकाळमधील त्याच्या अपघाताच्या बातमीच्या बाजूस संबंधीत बातम्यांकडे नजर गेली तर काय दिसले? * अकोल्याकडे जाणारी बस उलटून २८ प्रवासी जखमी * कुसुंबा, नेरजवळ अपघातात दोन ठार, ३ जखमी * क्रेनसह विहिरीत पडून उंभर्टीत मजुराचा अंत * मोटारसायकलसह दोन तरुण उड्डाणपुलावरून ३० फूट खाली * सायने शिवारात घर कोसळून महिला ठार जेंव्हा कोणीतरी ओळखीतले अशा अपघातात असते तेंव्हा जे जाणवते ते अशा इतर बातम्यांकडे जाणे शक्य नसते, त्यात अपराधीपणाची भावना असण्याची गरज नाही. पण खरेच याला दुर्दैव म्हणून सोडून द्यावे का? हा प्रश्न पडला आणि थोडी जालावर शोधाशोध चालू केली. त्यात भारत सरकारच्या "रोड ट्रान्स्पोर्ट अँड हायवेज" मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून अस्वस्थ करणारी माहीती मिळाली: (दुवा) यातील विदा वापरुन खालील आलेख काढला: traffic accidents fatalities एक २००० सालच्या सुमाराचा अपवाद सोडल्यास रस्त्यावरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढतच चाललेले दिसते. अभिनयच्या अपघाताची बातमी कुठेतरी वाचतानाच असाच अजून एक तरूण पत्रकार गेल्यावर्षी अपघातात गेल्याचे वाचले. जागतिक आरोग्य संघटनेच्या गेल्या वर्षीच्या अहवालाप्रमाणे, भारतात आणि इतरत्र, रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण हे देखील एखाद्या रोगराईसारखे पसरत आहे. भारतात, दर तासाला १३ जणांना अपघातात मृत्यू येतो. शिवाय जाणार्‍या व्यक्तींबरोबर त्यांचे मागे राहीलेले कुटूंबिय आणि उध्वस्त झालेले संसार लक्षात घेतले तर त्याचे प्रमाण हे अधिकच भयावह आणि अस्वस्थ करणारे आहे...आणि हो, यात रेल्वेचे अपघात धरलेले नाहीतच... अनेक अपघातात राजकारण्यांचे (काँग्रेस) अथवा त्यांच्या नातेवाईकांचे (शिवसेना) गेल्याचे आपण वेळोवेळी वाचले आहेत. कालानुरूप त्या बातम्या मागे पडतात, त्यात काही गैर नाही, पण परत असे घडू नये अथवा त्याचे प्रमाण हळूहळू कमी व्हावे यावरून सतत लागणारे लोकशिक्षण आणि स्वाध्याय आपण करत असतो का हे पहायची वेळ आधीपण होतीच आणि अजूनही आहेच आणि प्रमाण कमी झाले तरी कायमच रहाणार आहे. यात केवळ सरकारने काय करावे आणि काय करत नाही इतकाच मुद्दा नसून प्रसारमाध्यमे (ज्यांचे पण त्यांच्यातील व्यावसायिकांच्या जाण्याने नुकसान होते) तसेच समाजसेवी संस्था आणि अर्थातच तुम्ही-आम्ही सगळ्यांचाच विविध स्तरांवर सहभाग लागणार आहे.
  1. गाडीचालकाचा परवाना देताना नक्की काय शिकवले जाते आणि शिकले जाते?
  2. रस्त्यावर शिस्त पाळली जाते का? - सर्व वाहनचालक, पादचारी, सायकलवाले आदी...
  3. आता भारतात गाड्या वाढत आहेत - त्याबरोबर गाड्या चालवत फिरणे देखील. कधी कधी डोळ्यावर ताण येतो तर कधी खूप थकव्याने ग्लानी येते अथवा झोप येते. अशावेळेस कुठलाही पुरूषार्थ न समजता आपण बाजूला थांबून किमान ५-१० मिनिटे डोळ्यांना विश्रांती देतो का? अथवा बरोबर दुसरा/री चालक असेल तर गाडी चालवायला त्यांना देतो का? हे खूप महत्त्वाचे आहे.
  4. मद्य पिऊन गाडी चालवणे हे असेच एक अजून आमंत्रण आहे. त्याच्या मर्यादा सांभाळता येणे महत्त्वाचे आहे. - स्वत:साठी आणि रस्त्यावरील इतरांसाठी देखील.
  5. ट्रान्स्पोर्ट कंपन्यांनाना त्यांच्या ड्रायव्हर्सना (विशेष करून ट्रक ड्रायव्हर) सक्तीचे शिक्षण आणि "झिरो टॉलरन्स" आमलात आणायला लावणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या ट्रान्स्पोर्ट कंपन्यांच्या वाहनांकडून अपघात होतात, त्यांना दंड करणे आणि नावे जाहीर करणे, वगैरे शिक्षांची पण गरज आहे. हे केवळ खाजगीच नाही तर पिएमटी आणि इतर शहरातील तत्सम बस सेवा, एसटी आदींना पण बंधनकारक होणे महत्त्वाचे आहे.
  6. जर कोणी अपघातात अडकलेले दिसले तर जिथे शक्य आहे तेथे मदत पण किमान पोलीसांना फोन करून मदत करायचे काम आपण केले पाहीजे.
म्हणलं तर गोष्टी अगदी साध्या आहेत पण तरी देखील विचार आणि आचारात येयला अवघड जात आहेत. आज हे सगळे सुचायचे कारण वर्षातल्या ८७६० तासातील, एका तासात गेलेल्या तेरा दुर्दैवी व्यक्तींपैकी एकास आपण सगळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओळखत होतो. पण नुसती श्रद्धांजली म्हणत सोडून देण्याऐवजी जर आपण अपघात टाळण्यासाठी स्वतःकडून गाडी चालवत असताना, तसेच इतरांना या संदर्भात सतत सांगून जागे केले तर पुढच्या पाच-दहा वर्षात काहीतरी चांगले परीणाम पहाता येतील असे वाटते. या धाग्यात या संदर्भात उपाय, अनुभव आदींवरून चर्चा झाली तर सगळ्यांनाच माहीती आणि शिक्षण मिळेल.... -------------
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
39551 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

धन्यवाद

विकास
गुरुवार, 07/22/2010 - 19:32 नवीन
या चर्चेत सहभागी झालेल्यांचे तसेच वाचकांचे आभार. मला कल्पना आहे की कुठल्याही समाजात कुठलाही (चांगला) बदल करण्यासाठी एक चळवळ पुरेशी नाही की एक कायदा... तर एका चर्चेने काय होणार! पंढरीच्या वारीला जाणारा वारकरी ग्यानबा-तुकाराम म्हणत एक पाउल पुढे एक पाउल मागे असे वरकरणी दिसणारे चालत/नाचत असतो. मात्र एकादशीस तो विठ्ठलाच्या दर्शनास पोचलेला असतोच... तसेच काहीसे लोकशिक्षणाचे असते. एक पाऊल पुढे एक पाऊल मागे होतच असते. नेमके आपण ते मागे बघणारे पाऊल बघतो आणि वाटते, "हम नही सुधरेंगे"! मी आशावादी आहे, सुधारणा नक्की होतील याची खात्री आहे. फक्त सुधारणांची किंमत कमितकमी मोजावी लागावी इतकीच काय ती इच्छा... म्हणून सारखा लोकशिक्षणाचा जप करतो. थोडक्यात, त्या निमित्ताने जरी चार लोकांनी वाचले आणि त्यात आलेला सारांश आचरणात आणला/इतरांपुढे चर्चिला तरी या चर्चेचे इप्सित साध्य झाले. एक प्राण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाचला तर त्यातून एक कुटूंबपण वाचते आता काही प्रतिसादांना थोडक्यात प्रतिसादः अमोद शिंद्यांनी सुचवले तसे मी इतर देशांशी त्यातही अमेरिकेशी तुलना केली नाही कारण या संदर्भात कोणीच शहाणे नाही असे वाटते. फक्त प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. आपल्यापुरते बोलायचे तर शिस्तीची मानसिकता आणि दुसर्‍या मानवी जीवाचे मुल्य समजणे महत्वाचे वाटते. ते ज्या दिवशी येईल त्या दिवशी सुधारणांची सुरवात खर्‍या अर्थाने होईल. ज्ञानेश यांनी दिलेली टक्केवारी पण अस्वस्थ करणारी आहे. सुनील पाटकर म्हणतात तसे विविध सरकारी खात्यांकडून जनजागृतीचे प्रयत्न होत असतात. पण तेच तेच आणि तेही सरकारकडून ऐकून जनतेचे कान बधीर झालेले आहेत. हे प्रयत्न लोकांकडून एकमेकांसाठी होणे महत्वाचे आहे. याच संदर्भात बहुगुणींनी सांगितलेली आणि संजोप रावांनी अनुभवलेल्या एसपिटीएम सारख्या संघटनांचे काम या संदर्भात मोलाचे ठरणार आहे. मला कल्पना आहे की तुम्हाला तसेच स्वच्छंदी पाखरूंनी सांगितलेल्या अनुभवाप्रमाणे, लोकं थट्टा करतात, कुत्सित बोलतात. अशांकडे दुर्लक्ष करतच काम करावे लागते. असे कुठलेही समाजकार्य नसते ज्यात तसे करणार्‍या कुणालाही त्रागा होत (फ्रस्ट्रेशन येत) नाही. मात्र एका गोष्टीचा विचार करणे महत्वाचे वाटते, तो म्हणजे - संवाद कसा होत आहे आणि माध्यमे काय तसेच संवादासाठीचे लक्ष (वयोगट) काय. या गोष्टी शक्यतितक्या तरूण पिढीपर्यंत जाणे महत्वाचे आहे. त्यासाठी माध्यमे देखील तशीच हवीत. एसपिटीएमचे संकेतस्थळ जसे आहे तसेच ते फेसबूक, ट्वीटर, ऑर्कूट आदीचा वापरपण करतात का? कुठला तरी प्रायोजक वगैरे गाठून सणावाराच्या वेळेस (गणपती, दिवाळी, नववर्ष वगैरे) मार्केटींग एसएमएस पाठवता येईल का? वगैरेचा विचार केला नसल्यास करता येईल... शाळेतील मुलांना शिकवणे आणि घरी सांगायला सांगणे... मोठमोठ्या कंपन्यांमधे सेफ्टी फर्स्ट वगैरेच्या पाट्या लावून अमूक दिवस अपघाताविना, असे लिहीलेले असते. जिथे जास्त अपघात होतात अशा ठिकाणी अशा पाट्या लावता येतील अथवा तुमच्या संकेतस्थळावर... असेच बरेच काही असू शकते. संजोपरावांनी म्हणल्याप्रमाणेच पोलीसांच्या भितीने, मदत न करण्यामुळे एका जवळच्या माहीतीतील व्यक्तीला प्राणाला मुकावे लागलेले पाहीलेले आहे. म्हणून जास्तच वाटते... बाकी परवाना देण्याची पद्धत वगैरे माहीत आहे, ते बदलणे म्हणजे राजकारण आहे. लोकं जर जागृक होऊ लागली तर त्यांना पण झक मारत बदलावे लागेल. राजेश म्हणतात तसे मला काही हे शुन्यापर्यंत येईल असे म्हणायचे नाही, तशी आंधळी अपेक्षा देखील नाही. पण जेंव्हा संख्या मोठी असते, तेंव्हा ते शब्दशः "अपघात" नसतात तर नेहमीचाच एक प्रसंग (रुटीन) असतो, काल एकावर तर आज, अजून कुणावर, इतकेच काय ते. भाऊ पाटलांनी म्हणल्याप्रमाणे मोबाईल्स पण घातक आहेत. येथे झालेल्या एका संशोधनाप्रमाणे ब्लू टूथ / हँड्सफ्री वगैरे वापरत गाडी चालवणे पण तितकेच धोकादायक आहे असे लक्षात आले आहे. विसूनाना म्हणतात की सरळ मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवावी... यावर गंभीर चर्चा (मृत्यूदंडाऐवजी कुठली कडक शिक्षा) करण्याऐवजी, हा प्रतिसाद थोड्या हलक्यापद्धतीने (लाईटर मूडमधे) संपवतो. शिस्त पाळत नाहीत म्हणून लोकांना खरेच घाबरवायचे आहे का? मग खालील चित्रात जसे त्या ठिकाणि स्वच्छता ठेवायला अंधश्रद्धेचा उपयोग केला आहे तसा करा! ;) Image removed.From Public Education
  • Log in or register to post comments

हि नोटीस वाचून बर्याच बायका

मम्बाजी सर्वज्ञ
Wed, 02/10/2016 - 22:57 नवीन
हि नोटीस वाचून बर्याच बायका मुद्दाम कचरा टाकायला येतील कदाचित. आणि हे नवर्यांना पण आपलीकेबल आहे (चित्रातला शाप नाव्र्यान्बद्दल लिहिलेला असेल तर).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आपण किती नियम पाळतो?

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/22/2010 - 20:29 नवीन
आपण सर्व ही चर्चा करणारे किती लोक वाहतुकीचे नियम पाळतो? वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणारेच किती तरी सापडतील आपल्यातच. मान तिरकी करुन खांदा व कान यात मोबाईल पकडुन दुचाकी चालवणारे पुण्यात दिसतात. मोबाईलवर बोलता बोलता भान न राहिल्याने धोकादायक पद्धतीने गाडी चालवत जातात. रस्त्याच्या कडेला येउन थांबुन बोलावे अथवा त्यावेळी फोन न घेता नंतर फोन आपण करावा. या साध्या गोष्टी करत नाहीत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

वरील

शैलेन्द्र
गुरुवार, 07/22/2010 - 21:13 नवीन
वरील धाग्यात मुख्यता: शहरातील रहदारीची चर्चा केली गेली आहे, पण शहरातील अपघात तुलनेने सौम्य असतात. खर भयानक प्रकार दिसतो तो महामार्गावर.. या अपघातांची काही सामायिक कारणे आहेत, सगळ्यात महत्वाचे म्हणजे लेनची शिस्त नसणे. इंडीकेतर लाईट चालू नसणे. सतत अप्पर लाईट लावून गाडी चालवणे. अतिशय बेशिस्त दुचाकी स्वार व स्थानिक वाहतूक करणारे जीप / TamTam चुकीच्या पद्धातीने ओव्हरटेक करणे. वाहनाच्या व स्वताच्या मर्यादांची जाणीव नसणे
  • Log in or register to post comments

धागा वाचत

यशोधरा
गुरुवार, 07/22/2010 - 21:44 नवीन
धागा वाचत आहे..
  • Log in or register to post comments

चांगला धागा

सहज
Fri, 07/23/2010 - 14:55 नवीन
चांगली चर्चा
  • Log in or register to post comments

पुन्हा

कपिलमुनी
Tue, 11/11/2014 - 15:06 नवीन
पुण्यामध्ये २ दिवसात १४,००० दुचाकीस्वारांवर हेल्मेट घातले नाही म्हणून कारवाई ! बघू काही फरक पडतो का
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Wed, 02/10/2016 - 18:31 नवीन
जालावर रस्ते अपघात शोधत असताना इथे पोचलो. महत्त्वाचा विषय आहे. मी स्वतःच एक चर्चा सुरु करणार होतो पण आता गरज नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा