राजयोग
काशिब, तसे भारताच्या नकाशावरील शोधुनही न सापडणारे गाव. इतर कुठल्याही गावासारखेच शांत आणि सुंदर. निसर्गरम्य. गावातुन वाहणारी नदी, दोन्ही तीरावर विस्तीर्ण शेती. गावकरी गरीब पण खाऊन - पिऊन सुखी. स्वातंत्र्यानंतर जी काही स्थित्यंतर झाली, त्याचे पडसाद गावावर पण पडले. अशातच पाटलचा पोरगा सुर्याजी आधी सरपंच मग आमदार झाला आणि गावाने जणु कातच टाकली. सुर्याजीने आणि त्याच्या पूढच्या पीढीने गावाचा नकाशा पार बदलुन टाकला. घरा घरात वीज आली, पक्के रस्ते झाले. गावा बाहेरच्या जंगलाची साफ-सफाई करुन दोन-तीन कारखाने पण आले. गावात एस.टी तर होतीच, पण आता दोन-चाकी, चार-चाकी पण गावात दिसायला लागल्या. मोठं अंगण, पूढे ओसरी, माजघर, स्वयंपाकाची खोली, गुरांचा गोठा, कौलारु छप्पर अशी पारंपारीक घरांसोबत टोलेजंग इमारती पण उभ्या राहील्या. लहानथोराच्या हातात मोबाईल वाजु लागला. एकंदरीत गावाला सुखाचे दिवस दिसु लागले होते. पण या समृध्दीसोबत गावात आली होती, कारखान्यातल्या कामगारांची बकाल वस्ती, वाढलेल्या दारुच्या भट्ट्या, सराईत गुंडगिरी. तसे गावात हे सारे आधीपासुनच होते, पण आता त्यात लक्षणीय वाढ झाली होती, हे मात्र खरे.
या गावातल्या सधन म्हणवल्या जाणाया, नविनच झालेल्या वस्तीतला तो वाडा. चारी बाजुला सहा फ़ूटी दगडी भिंत, उंच लोखंडी गेट, गेटपासुन एक सरळ रस्ता आतमध्ये गेलेला, वीस-पंचवीस पावलांवर झाडीत गडप होणारा. दोन मजली दगडी बांधकाम. नक्कीच शे-दिड्शे वर्षापुर्वीचे. आजुबाजुला वाढलेली दाट झाडी. आतला परिसर एकदम शांत, स्तब्ध. कोणाचाही वावर नसावा. बंगल्याच्या पश्चिमेच्या भिंतीला लागुनच नवा रस्ता झाला होता, त्या रस्त्यावरुन एक खिड्की तेवढी दिसायची. ती खिडकी नेहमी उघडी असायची. हा वाडा पाटलाच्या खानदानीत कुणीतरी शौकीनानी छान शौकीसाठी बांधलेला. पण आता वापरात नसल्याने अवकळा आलेला. वाड्याच्या बाकीच्या अंगानी बरीच मोकळी जागा होती. वाड्याचे गेट मात्र दक्षिणेला, त्यामुळे मुळ रस्त्यापासुन थोडे आत शिरल्यावरच वाड्याचे गेट दिसायचे. वाड्याच्या बाजुला आकर्षक रंगरंगोटी केलेले, कल्पकतेने लॊन, गार्डन केलेले एकसे एक बंगले उठत होते. त्यामुळे आजुबाजुच्या झाडाझुडपाच्या गर्दीत हरवलेला तो वाडा अधिकच भयाण वाटायचा.
रस्त्याच्या पलिकडल्या अंगाला काही टपर्या नव्याने बांधल्या होत्या. त्यातलीच एक महाद्याची. गोळ्या-बिस्किटे, जनरल सामान विकणारा महाद्या एक नंबरचा बेवडा. त्यानेच तीला पहिल्यांदा पाहिली ती संध्याकाळी. खिडकीत उभी राहुन सुर्यास्त पहाणारी ती महाद्याला इंद्रलोकीची अप्सराच वाटली. सुरवातीला महाद्यावर कुणी विश्वास नाही ठेवला. पण नंतर नंतर तीला खिडकीत उभी असलेली बयाच लोकांनी पाहिले. त्या पडीक वाड्यात अचानकच तीचा वावर दिसु लागताच तीच्या विषयी एक भीतीपुर्ण औत्सुक्य आजुबाजुला पसरले होते. ती कधी आली, कुठुन आली या बद्दल कुणालाच नीट माहिती नव्हती. मात्र ती आल्यानंतर गावच्या पाटलानी तीची सर्व व्यवस्था लावली होती, अशी बातमी महाद्यानेच आणली. ती कुणाशीच बोलत नव्हती. चुकुन कधी फीरावयास बाहेर पडली तर दीवस पुर्ण मावळल्यावरच..दीवसा तीला खिडकीत उभी राहीलेली अनेक लोकांनी पाहीली होती, पण तीच्या बद्दलच्या अफवा लोकांना तीच्यापासुन लांब ठेवत होत्या. तशी ती दिसायला ही फार सुंदर वगैरे नव्हती, होती चार चौघींसारखी, नाकी-डोळी नीटस, अगदीच सावळा नाही म्हणता येणार पण थोडाफार उजळ वर्ण, गोल चेहरा... पण सर्वात वेगळे होते ते तीचे डोळे..नीळ्या रंगाचे, तीच्या कडे बघणायाला तीची भिती वाटणेच सहाजीक होते. त्या डोळ्यात एक वेगळेच चमक होती, एक सुप्त आकर्षण होते. ती हसली की तीचे मोत्यांची माळ सांडल्यासारखे वाटायचे, पण तेच हास्य तीच्या डोळ्यातली चमक अधीकच गहीरी करायचे आणि बघणायाच्या जीवाचा थरकाप व्हायचा. त्यामुळेच ती रात्री अपरात्री निर्धास्त फीरायची आणि तिच्या जवळ जाण्याची किंवा तीला छेडण्याची हिम्मत कोणी उलट्या काळजाचा गुंड पण करु धजायचा नाही.
ट्ण...टण...टण.. कोपयावरच्या चर्चच्या घडाळ्याने तीन टोले दिले. तीने जांभई देत आकाशाकडे पाहिले, काळ्याभोर अंधारात चमचमणाया चांदण्या तीला, तीच्या मैत्रिणीच वाटायच्या. त्यांच्याप्रमाणेच एक्कलकोंडे आयुष्य ती जगत होती. आजकाल तीला मध्यरात्रीच जाग यायची, मग वेळ घालविण्यासाठी ती खिडकीत येऊन उभी राहायची. मग तो रस्ता तिच्याशी बोलु लागायचा, तीही त्याच्याशी मनमुराद गप्पा मारायची. कोपयातल्या खांबावर ढणाणा जळाणारा दीवा तीला साथ करायचा. आज पण ती अशीच उभी होती, कुणाची तरी वाट पहात असल्या सारखी... फ़टफ़टायला लागले तशी ती खिडकीपासुन लांब झाली. तिच्या पाठोपाठ ती खिडकीही बंद झाली. बंगलीचा जगाशी असलेला संबंध तुटला होता. खिडकी बंद झाल्याची खात्री होताच, रस्त्याच्या पलिकडील टपरीच्या मागुन एक तरुण बाहेर आला. नुकतेच उजाडले असल्याने, आपल्याला इथे पहाणारे कोणीच नाही याची त्याला खात्री होती. आरामात आळस देत त्याने खिशातुन सिगरेटचे पाकीट काढले. शेवटची सिगरेट शिलगावुन समोरच्या बंगलीकडे बघत त्याने दोन झुरके मारले आणि दोन गल्ल्या सोडुन लावलेल्या बुलेटकडे निघाला. जाता जाता सुध्दा तो त्या खिडकीकडे पहात होता. कोपर्यावर वळुन त्याने खिशातल मोबाईल काढला, बॊसला त्या रात्रीचा एकंदरीत व्रुतांत सांगितला. गेले आठ दिवस तो हेच करीत होता. बॊसला ह्या पडक्या बंगल्यात काय रस आहे, हे त्याला कळतच नव्हते. वृतांत म्हणजे काय, तर अमुक वाजता आलो, रस्त्यावरुन किती गाड्या गेल्या, शेवटची गाडी कितीला गेली, वाड्यात काहे हालचाल वगैरे वगैरे... त्याच गल्लीत तो त्याला या कामासाठी दिलेली गाडी लावायचा. रिपोर्ट केल्यावर गाडीला किक मारुन तो निघाला, त्याला काय वाटले कुणास ठाऊक, प्रथमच तो वाड्याच्या समोरुन गेला, वाड्याला एक गोल फेरी मारली, आतल्या वातावरणाचा अंदाज घेतला आणि निघुन गेला. त्याचे हे वागणे तीला आवडले नसावे, त्याच्या समजुतीप्रमाणे आपण नजर ठेवुन आहोत हे तीला माहीत नव्हते. पण ती त्याला पहिल्या दिवसापासुन पहात होती. आता सुध्दा त्याला वाड्याभोवती फिरताना तीने वरुन पाहीले होते, तीच्या नीळ्या नजरेत तो सारा राग एकवटला होता. बराच वेळ तो गेला त्या दीशेने ती एकटक पहात होती.
सतिश शर्मा उर्फ़ सत्या, उत्तर भारतातील कुठल्याश्या गावातुन नशिब अजमावण्यासाठी बाहेर पडला, तो थेट मुंबईत आला. मुंबईत त्याचे काही मित्र आधीपासुनच काही ना काही काम धंदा करीत होते. त्यांच्या सहाय्याने काही नोकरी-धंदा करण्याचा त्याचा विचार होता. सत्याच्या आईला भविष्य बघण्याचा फ़ार नाद. गावात कोणी साधु आला की ही आपल्या पोराचे भविष्य समजाऊन घ्यायला पळायची. अश्याच एका साधुने तीला सांगितले होते, "तेरे बेटे के नसीब मे राजयोग है, मगर यहॊ नही, बहोत दुर जाना होगा इसे, बहोत दुर" मुंबईत काम करणायाला बराच पैसा मिळतो हे तीला गावातल्या काही लोकांकडुन कळाले होते. मग तीनेच सत्याला कामधंद्यासाठी मुंबईत पाठवले होते. सत्याही आईची ईच्छा पुर्ण करण्याच्या बेताने मन लावुन काम करायला लागला. त्याच दरम्यान काही पोटभरु सत्ताधायांच्या राजकारणामुळे उत्तरभारतीयांची पिटाई व्हायला लागली. म्हणुन आपल्या काही मित्रासोबत सत्या मुंबईतुन बाहेर पडला. मुंबईमध्ये असताना त्याची रामलाल नावाच्या टॆक्सीचालकाशी ओळख झाली होती. ह्याच रामलालने आपल्या एका नातेवाईकाकडे सत्या आणि त्याच्या मित्रांची काही दिवस सोय केली होती. रामलालचा हा लांबचा नातेवाईक रहायचा काशिबमध्ये. सत्या इथे आला आणि त्याला जगाची नवी ओळख झाली. रामलालचा हा नातेवाईक वर वर पहाता दुधवाल्याचे काम करायचा, पण गावातल्या दोन हातभट्ट्य़ात याची भागीदारी होती. ह्याच्या शब्दावर सत्याला आणि त्याच्या मित्रांना काम मिळाले ते बॊसच्या गॆंगमध्ये. सुरवातीला काम तसे साधेच, नजर ठेवण्याचे. याच कामांतर्गत सत्या ह्या वाड्यावर गेले आठ दिवस नजर ठेवुन होता. पहिले दोन-तीन दिवस काही काम नसल्याने सत्याच्या कंपुने सारा गाव पायाखाली घातला होता, तेव्हा ह्या वाड्याची आणि त्या तरुणीची किर्ती त्यांच्या कानावर आली होती.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
क्रमशः
सुरुवात