मनोहारीदांचे दु:खद निधन
प्रख्यात सॅक्सोफोन-वादक व निपूण संगीत संयोजक मनोहारी सिंग यांचे आज मुंबई येथे
दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
आज खर्या अर्थाने हिंदी चित्रपट संगीतातला ब्रास पोरका झाला; सॅक्सोफोन, की- फ्लूट, बासरी
अशी सर्व प्रकारची फूंक्-वाद्ये लीलया वाजविणारे मनोहारीदा आज पडद्याआड गेले आहेत. गेले काही वर्षे
ते किडनीच्या विकाराने आजारी होते तरीही त्यांचा उत्साह आणि दमसास तरूणाला लाजविणारा होता. ते पंचाहत्तरीत असतांना
मी त्यांचा लाईव्ह शो पुण्यात पाहिला होता ज्यात त्यांनी सुरूवातीलाच 'गाता रहे मेरा दिल' असं काही खणखणीत
वाजविले की आख्खं थिएटर उभं राहिलं होतं आणि टाळ्या जणू थांबणारच नाहीत असं वाटत होतं. तेव्हा एक पुणेरी कॉमेंटही
झालेली आठवते," आपण ज्या वयात फूंक मारून साधी मेणबत्तीसुद्धा विझवू शकणार नाही त्या वयात मनोहारीदा संपूर्ण कॉम्पिटिशन सॉन्ग
(हम किसिसे कम नहिं) वाजवतात..तेही कट टू कट..
मनोहारीदा हे खरे टेकचे आर्टिस्ट होते. जराही चूक त्यांना खपायची नाही. कुठल्याच रेकॉर्डिंगमध्ये एकही रिटेक न करणारा हा एकमेव कलाकार असावा.
मुळातच कलकत्त्याहून मुंबई इंडस्ट्रीत त्यांना आणलं होतं अनवट सुरांचे सम्राट सलिल चौधरी यांनी. सलिलदांनी त्यांची इतर संगितकारांशी ओळख
करून दिली आणि मनोहारीदांनी सलिलदांच्या शब्दाचं चीज केलं. 'सितारों से आगे" ह्या चित्रपटात त्यांनी सचिनदेव बर्मन ह्यांच्याकडे पहिल्यांदा
वाजवलं आणि मग तिथून तो लिजंडरी प्रवास सुरू झाला.
पंचमदांशी त्यांचं खास नातं जुळलं आणि बासू-मनोहारी- मारूती अश्य त्रयीने पंचमदांची पूर्ण अरेंजिंगची जबाबदारी अश्या काही अफलातून
निभावली की त्याला तुलनाच नाही. बासूदा (चक्रवर्ती) स्ट्रिंग सेक्शन (ग्रूप व्हायोलिन, चेलो इ) बनवायचे आणि मारूतराव कीर
र्हिदम सांभाळायचे. मनोहारीदा हे पंचमच्या व दादा बर्मनच्या ब्रासचे सेनापती होते. 'रूप तेरा मस्ताना' मधली अॅकॉर्डियन आणि सॅक्सची जुगलबंदी
आठवते आहे ना? गंमत अशी आहे की ह्या गाण्याचे पीस आधी बनविलेले नव्हते. केर्सी लॉर्ड (अॅकॉर्डियन) आणि मनोहारीसिंगना पंचमने
गाण्याची फक्त थीम सांगितली..' बाहेर तुफान पाऊस, खोलीत फक्त धुंद प्रियकर प्रेयसी आणि विस्तवाची आग..' उरलेलं काम केर्सी
आणि मनोहारीदांचं आहे.. क्या बात हैं!
हम किसिसे कम नहिं मधलं कॉम्पिटिशन साँग तर कुणी विसरूच शकणार नाही. त्याच बरोबर मनोहारीदांच्या ब्रास अरेंजिंगचे बहारदार नमुने
म्हणजे 'आ देखे जरा' (रॉकी), वादा करो नहिं छोडोगी (आ गले लग जा), प्यार करने वाले , दोस्तोंसे प्यार किया (शान), मेहबूबा मेहबूबा, टायटल
म्युझिक (शोले), क्या यहिं प्यार हैं (रॉकी), पिया तू अब तो आजा (कारवां), दुनिया में लोगों को (अपना देश), आने वाला पल (गोलमाल) अशी
लिस्ट खूप मोठी आहे. ह्यातल्या एकेका गाण्यावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. 'पिया तू अब तो आजा मधला सॅक्स मनोहारीदांचाच आहे
आणि 'वादा करो नहिं छोडोगी तुम मेरा साथ' मधली काऊंटर मेलडीचा सॅक्सही त्यांचाच्..पण किती फरक आहे. पहिल्या गाण्यात एकदम
आक्रमक आणि बेधुंद आहे तर दुसर्या गाण्यातला हळूवार रोमॅन्टिक आहे..जणू गालावरून प्रेयसीचा गाल फिरतोय..
हिरोचा प्रेमभंग आणि मग बारमध्ये टुन होऊन त्याने सॅक्स वाजवणं तेव्हा फारच लोकप्रिय दृष्य होतं. पण मनोहारीदा मात्र
थोडेसे वैतागायचे म्हणायचे हे हिरो सॅक्सोफोन हातात नीट धरतसुद्धा नाहीत.. साफ चुकीची बोटं दाबतात. त्यांचं त्या वाद्यावर मनापासून
प्रेम होतं. मी त्यांना त्यांचा सोन्याचं पाणी दिलेला अमेरिकन सॅक्स हाताळतांना पाहिलं होतं.. उपमा द्यायचीच तर आई आपल्या तान्हुल्याला
न्हाऊ माखू घालते तश्या कौतूकाने आणि निगुतीने ते तो सॅक्सोफोन स्वच्छ करत होते..
मुळात सॅक्सोफोन हे वाद्यच रोमॅन्टिक आहे. जणू काळजाचा ठावच घेतं.. इतकं भावनेने ओथंबलेलं आणि आर्त व्याकूळ वातावरण
निर्मिती करणारं वाद्यं मला दुसरं ठाऊक नाही. "तेरे मेरे सपने अब एक रंग हैं' मधले मनोहारीदांनी वाजविलेले दुसर्या व तिसर्या अंतर्यातले
पीस जणू देवानंदच्या मनातलेच भाव व्यक्त करतात. तो पीस ऐकतानांच असं वाटतं की आता हा दोन्ही हात हवेत फेकून वाहिदाला साद घालणार,
तिच्या मनात उचंबळून आलेल्या प्रेमाला आव्हान देणार आणि तिला कवेत घेणार..
साठ सत्तरच्या दशकात त्यांनी तेव्हाच्या आघाडीच्या प्रत्येक संगितकाराकडे हे अवघड विदेशी वाद्यं असं काही वाजवलंय की
ती गाणी आठवली की ते सॅक्सचे पीस आपोआपच कानात रूंजी घालू लागतात..
नुसती ही वेचक लिस्ट पाहिली म्हणजे मनोहारीदांच्या कर्तूत्वाचा आवाका लक्षात येतो..
है दुनिया उसीकी (कश्मीर की कली-ओपी)
तुम मुझे युं भुला ना पाओगे (पगला कहिं का- एस्.जे)
आवाज देके हमे तुम बुलाओ (प्रोफेसर- एस. जे)
तुमने मुझे देखा, आजा आजा मैं हुं प्यार तेरा (तिसरी मंझील),
तेरे मेरे सपने, दिन ढल जायें (गाईड- एस.डी)
खिलते हैं गुल यहां (शर्मिली- एस.डी)
आओ हुजुर तुमको (किस्मत- ओपी)
अजी रूठ कर अब, बेदर्दी बालमा (आरजू- एस्.जे)
तुम्हें याद होगा (पोस्ट बॉक्स नं ९९९-कल्याणजी आनंदजी)
जा रे उड जा रे पंछी (माया- सलिल)
शोख नझर की बिजलियां (वो कौन थी- मदनमोहन)
दिल तेरा दिवाना हैं सनम (दिल तेरा दिवाना- एस.जे)
दिल जो ना कह सका (भीगी रात- रोशन)
जिंदगी कैसी ये पहेली (आनंद- सलिल)
अश्या ह्या अफाट आणि अजरामर कलाकाराला माझा सलाम..
प्रतिक्रिया
दु:खद वार्ता, पण सुखद आठवणी करून देणारा सुंदर लेख!
+१
या महान
या महान
अतिशय सुंदर लेखन!
संगीतकार
वा वा! मौलिक माहिती.
विनम्र श्रद्धांजली !
विनम्र श्रद्धांजली
हेच म्हणतो ...
अरेरे..
सॅक्सोफोन
विनम्र
मनापासून
अरेरे...
व्हिडीओ:
खलास!!!
साष्टांग प्रणिपात
आदरांजली
असेच म्हणतो
अप्रतीम
सुंदर
माझीही श्रद्धांजली
षण्मु
सुंदर श्रद्धांजली
एक आठवण.
चुका
बेदर्दी बालमा..
बॅगपायपर
सुरेख
श्री मनोहारीदांना आदरांजली
डॉ. दाढे साहेब
_/\_ आम्हा
हेच ते
मनोहारि दा
सुंदर लेख
'ओ सजना'
अप्रतिम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मनोहारी मेडली