'रॉयटर'च्या श्री. अलिस्टर स्क्रटन (Alistair Scrutton) यांचा एक लेख
सुमारे महिन्यापूर्वी 'जकार्ता पोस्ट'मध्ये 'रॉयटर'च्या श्री. अलिस्टर स्क्रटन (Alistair Scrutton) यांचा एक लेख आला होता. शीर्षक होते, "As Pakistan stares at India, India eyes the world". हा लेख 'मिपा'कर http://www.reuters.com/article/idUSTRE6590YJ20100610 या दुव्यावर वाचू शकतील.
आपण भारतीय नागरिक परदेशी मीडियात भारताबद्दल साधारणपणे तुच्छतादर्शक मतप्रदर्शन वाचतो व रागावतो. पण या लेखातले भारताबद्दल उदार मतप्रदर्शन वाचून मला साश्चर्य आनंदाचा धक्काच बसला.
भारताने स्वातंत्र्यानंतरच्या साठाहून जास्त वर्षांत अस्सल लोकशाही, कधी-कधी अनागोंदीचीही म्हणता येईल, राबवीत जे कांहीं साध्य केले आहे त्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटतो. आपल्या देशाने कधीही कुणावरही आक्रमण केले नाहीं, अगदी बांगलादेश युद्धातही. कारण लवकरात लवकर भारताने तो नवनिर्मित देश शेख मुजीबुर रहमान यांच्या सरकारच्या हवाली करून आपली सेना परत बोलावली होती.
भारत जरी प्रगतीशील देश असला तरी गरीबच आहे. पण भारताने कधीही भीक मागितली नाहीं. कर्ज जरूर घेतले, पण व्याजासकट फेडले. एक गरीब देश म्हणून भारताने आपली सर्व शक्ती आणि संपत्ती जनतेच्या उद्धारासाठी, तिचे राहाणीमान सुधारण्यासाठी वापरली पाहिजे, तशीच पाकिस्ताननेही. पण कुठलाच देश आपले शेजारी निवडू शकत नाहीं आणि क्वचितच शेजारी राष्ट्रे गुण्यागोविंदाने रहातात, मग ती इंग्लंड-फ्रान्स-जर्मनी असोत किंवा भारत-पाकिस्तान असोत किंवा भारत-चीन असोत. (आणखीही अशी उदाहरणे असतील, पण मला आठवतो तो एकच अपवाद अमेरिका-कॅनडाचा!) त्यामुळे संरक्षणावर दोघांचा अवाच्या सवा खर्च होत आहे.
आज भारत अशा टप्प्यावर पोचला आहे कीं त्याला त्याची जोडी पाकिस्तानबरोबर लावल्यास मत्सर वाटत नाहीं, तो पाकिस्तानकडे एक ज्याच्याशी आपले पटत नाहीं, जो उधळ्या आहे पण कमवत नाही, जो कायम 'मदत' मागून जगतो असा एक शेजारी म्हणून बघतो. महागडी आणि धोकादायक 'खेळणी' जमा केलेला एक शेजारी! पण भारतीयांना त्याच्या सरकारचा जितका राग येतो तितकीच तिथल्या जनतेची कींव येते.
भारताची नजर सध्या खरोखरच खूप दूरवर जागतिक मंचावर लागली आहे.
ऑगस्ट २००९ मध्ये कुठल्या पाश्चात्य 'गोर्या' मीडियाने नव्हे तर अल जझीरा या दुबईस्थित अरबी दूरचित्रवाणीने "कुणापासून त्यांच्या राष्ट्राला सर्वात जास्त धोका संभवतो" या विषयावर पाकिस्तानी जनतेत एक सर्वेक्षण केले होते व त्यात पाकिस्तानी जनमताचा मागोवा घेतला होता. (पहा माझा लेख http://www.misalpav.com/node/8949 या दुव्यावर) सानंदाश्चर्याची गोष्ट अशी कीं फक्त १८ टक्के लोकांना भारतापासून धोका आहे असे वाटले तर ज्या देशाच्या पैशावर पाकिस्तानचा बराचसा खर्च चालतो त्या अमेरिकेपासून धोका आहे असे म्हणणारे ५९ टक्के निघाले. http://tinyurl.co/m65wbh आणि http://tinyurl.com/nwlv99 हे दुवे पहा. याचा अर्थ पाकिस्तानी जनता भारताला सर्वात मोठा धोका मानत नाहीं. भारतीय जनता ही घटना स्वागतार्ह मानत असली तरी पाकिस्तानी सरकारच्या पवित्र्यात जाणवण्याइतका बदल दिसत नाहीं.
पाकिस्तानात खर्या-खुर्या लोकशाहीने मूळच धरले नाहींय्. दोन लागोपाठच्या लष्करशाहीमधील एकादे स्वल्पविराम-पूर्णविरामासारखे चिन्ह एवढीच आतापर्यंत तिथल्या लोकशाहीच्या अस्तित्वाची जाणीव झालेली आहे. उद्या पाकिस्तानात लोकशाही जर रुजली तर परिस्थिती सुधारण्याची शक्यता वाटते कारण मग दोन्ही बाजूची सरकारे आपल्या देशांतर्गत समस्यांना पुढे करून आपापले अपयश लपवू शकणार नाहींत.
भारताने आपल्या परमाणू व प्रक्षेपणास्त्र या विभागातील अग्रणी शास्त्रज्ञाला 'भारतरत्न' देऊन तर गौरवलेच, पण नंतर त्याला राष्ट्रपतीभवनात पाठविले. या उलट दोन वेळा दोन वेगवेगंया राष्ट्राध्यक्षांकडून 'नीशाँ-इ-इम्तियाज़' हा सर्वोच्च मुलकी किताब मिळविलेल्या डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या एकट्याच्या डोक्यावर अण्वस्त्रप्रसाराबद्दलचे संपूर्ण खापर फोडून त्यांना त्यांच्याच घरी कैदेत ठेवण्याचा कृतघ्नपणा पाकिस्तानी लष्करशहाने बिनदिक्कत केला व लोकांनी तो मु़काट्याने सहनही केला!
आज जगातील सर्वात जास्त अपयशी सरकारांची यादी "Foreign Policy" या नियतकालिकाने केली असून त्यात सोमालिया सर्वात जास्त अपयशी सरकार म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे, अफगाणिस्तान, इराक ६व्या व सातव्या क्रमांकावर, पाकिस्तान दहाव्या क्रमांकावर, चीन ६२व्या क्रमांकावर, भारत ७९व्या क्रमांकावर तर नॉर्वे सर्वात यशस्वी राष्ट्र या नात्याने १७७व्या क्रमांकावर आहे. http://tinyurl.com/26lfpa5 या दुव्यावर तपशील वाचा.
पाकिस्तानने आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्यासाठी भारताबरोबरचे उभे वैर संपवून खर्याखुर्या मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. असे केल्यास भारत नक्कीच पाकिस्तानला मदत करायला तयार होईल असे मला वाटते.
बहुतेक सर्व भारतीय नागरिकांना पाकिस्तानी जनतेबद्दल वैरभावनेपेक्षा कींव जास्त आहे. त्यांचे इतके हाल होऊ नयेत असेही वाटते. मग वाटते कीं केंव्हां है वैर संपणार?
जितक्या आधी संपेल तितके बरे.
प्रतिक्रिया
सांगड
पण
पाकिस्तानी जनता व पाकिस्तानी लष्करी सरकार यात गल्लत करू नये!
मला
गल्लत नाही
त्यांनी एक भाग चांगला हातळला आहे.
???
थोडे माझे विचार
तुमच्या अभ्यासू प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार
पाकिस्तान
पाकिस्तान
काश्मीर
ह्या
'ई-सकाळ'च्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या वाचकाचा गमतीदार प्रतिसाद
बा डि स
या लिंक पहा
तुमचे लेख व वाचन पहाता त्या "कापूसकांड्याच्या गोष्टी" नाहीं वाटत
तुमचे लेख व वाचन पहाता त्या "कापूसकांड्याच्या गोष्टी" नाहीं वाटत
लिंक्स
डॉन ची लिंक
(विषय दिलेला नाही)
http://www.dawn.com/wps/wcm/c
विरुद्ध वादळ...
टाईमचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
ज्या
ज्या
'डॉन'मधील हे खालील दोन दुवे वाचनीय आहेत