सच्या भावड्या तुझा वाढदिवस आला..... आमच्या साठी २४ एप्रिल हा "सचिन दिवस" ! खोटं नाही सांगत - ह्या दिवशी आम्ही घरी गोडधोड करतो.... तू खेळत नसलास तर तुझ्या खेळींची चित्रफीत बघतो. आणि आम्ही गेल्या वर्षभरात काय काय बरोबर - चूक केलं त्याचा हिशोब मांडून तुझ्यासारखं काहीतरी (आमच्या लायकीनीच रे!) करायचा संकल्प करतो. ह्या वर्षी तर खूप मोठं सेलेब्रेशन होणार ! आयपीएल मध्ये ज्या पद्धतीनी मुंबईचा संघ हाताळलायस, जसा काय खेळलायस... आणि हो की रे ! लेका २०० मारल्यास ..... तुझ्या टीकाकारांना आता कायमचं गप्प केलंस (तुला त्यांचं काही वाटत नाही पण आम्हाला वाटतं ना?)! We have a lot of reasons to celebrate.
जबर्या रे ! तसं न्यूझीलंडमधल्या तुझ्या १६३ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या हैदराबादमधल्या १७५ बघितल्यावर हे कधीतरी होणारच ह्याची खात्रीच होती. पण लेका २०० वॉज म्हणजे जस्ट टू (हंड्रेड) मच! तू तिकडे पॉईंटला बॉल ढकललास आणि आम्ही इथे हापिसात बेहोष झालो ! आमची "मॅनेजेरियल पोझिशन".... तिशीचं वय..... झाटभर 'कर्तृत्त्व'....."प्ले ग्रुप" मध्ये जाणारा पोरगा... किंचित सुटलेलं पोट.....वार्षिक सात आकडी पगार.... सगळ्या सगळ्या गोष्टी विसरलो.... दोन हातांची चार बोटं तोंडात घातली आणि जोरदार शिट्टीनी आख्खं फ्लोर हालवून टाकलं बघ! सsssssssssचिन ....सssssssssचिन म्हणून नाचताना माझा धक्का लागून आमच्या पन्नाशीच्या व्हीपीचा चष्मा उडाला (अर्थात तो तरी कुठे शुद्धीत होता म्हणा) ! काय केलंस रे मित्रा ! अजून एक एव्हरेस्ट सर केलंस. तूच एकटा आहेस जो आम्हाला असं नाचवतोस.. खुषीनी बेहोष करतोस ! एरवी काय ममता बॅनर्जीनी ७५ पैशांनी तिकीट स्वस्त केलं म्हणून नाचायचं.. की कतरीना कैफनी "भूमिकेची गरज असेल तरच अंगप्रदर्शन / चुंबनदृश्य करीन" असं आश्वासन दिलं म्हणून नाचायचं? असो !
तू डब्बल टाकलीस आणि तेव्हाच म्हटलं 'अब्बी तेंडल्यापे लिखना मंगताय'... मस्त बडवायजरचा एक गारेगार कॅन घेऊन बसलो.... शिवराज पाटलांची "१० जनपथ" बद्दल जितकी आहे त्यापेक्षाही जास्त भक्ती अंगात आणली.... म्हटलं आपल्या हातून आज "सच्यालीलामृत" लिहून होतंय ! पण कसलं काय रे ! तुझ्याबद्दल लिहायचं तर नवीन विशेषणं कुठून खणून काढायची बाबा? असं काय लिहायचं राहिलंय तुझ्याबद्दल? तुझ्या खेळाबद्दल लिहीणार्यांची शब्दसंपदा आटून सुद्धा कैक वर्षं लोटली. त्यामुळे तो विषयच संपला. म्हटलं आपला सच्या कसा "ऑल टाईम ग्रेट" खेळाडू आहे... जेसी ओवेन्स, पेले, मॅराडोना, ब्रॅडमन, जिम थॉर्प, नादिया कोमानेसी, मार्टिना नवरातिलोवा, महंमद अली, फेडरर, शूमाकर, मायकेल फेल्प्स ह्यांच्या तोडीचा सर्वोत्कृष्ट "अॅथलीट" कसा आहे.. वगैरे वगैरे लिहावं ! बघ ना... ब्रॅडमन, नादिया, मार्टिना, फेडरर, फेल्प्स ह्यांचे आकडेच डोळे दिपवणारे आहेत - जेसी ओवेन्स आणि महंमद अलीची कहाणीच प्रेरणा देणारी - पेले आणि मॅराडोनाचं देवत्त्व निर्विवादच. पण पुन्हा तेच... किं यत्र समुच्चयम? एकवीस (and counting) वर्षांचं आंतरराष्ट्रीय करियर..... ते डोळे फिरवणारे आकडे... तुझ्या अचीव्हमेंट्स.... ती लोकप्रियता.... एक अब्ज खुळ्या लोकांच्या अपेक्षा.... ते "डेमिगॉड स्टेटस"..... स्वतःचेच विक्रम पुनःपुन्हा मोडीत काढण्याची तुझी न शमणारी तहान.... आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे - एका अबोल, बुजर्या "मला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचंय" म्हणणार्या चमकणार्या डोळ्यांच्या १४ वर्षीय मुलापासून ते २३ वर्षांच्या अति यशस्वी कारकीर्दीनंतरच्या एका अबोल, बुजर्या "मला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचंय" म्हणणार्या चमकणार्या डोळ्यांच्या क्रिकेटच्या सम्राटापर्यंतचा तुझा प्रवास ह्यांपैकी किती लोकांनी केला असेल रे? तेव्हा तो नादही सोडून दिला. आणि शब्दांच्या शोधातच दोन महिने उलटून गेले. म्हटलं तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तरी तू आमच्यासाठी काय आहेस ते तुला सांगावं.
एव्हाना हे ही लक्षात आलं होतं की तू इतर खेळाडूच नाही तर मर्त्य मानवांच्या तुलनेच्या पलिकडे पोचला आहेस. उगाच नसता आटापिटा करण्यात अर्थ नाही. मग म्हटलं त्यापेक्षा ह्या लेखाला थोडा वेगळा टच द्यावा. तुझी तुलना अर्जुनाशी वगैरे करावी.... अजिंक्य, महाबाहू, महाधनुर्धारी पार्थाशी. तुमचा पराक्रम, दिग्विजय, विजिगीषु वृत्ती वगैरे वगैरे. पण तिथेही गोची झालीच. तुला कुठे त्याच्यासारखे भर युद्धात प्रश्न पडतात? मैदानात असो वा मैदानाबाहेर - तुझे विचार नेहेमीच अचल अटल असतात. आजपर्यंत तुला "हाफकॉक" खेळताना बघितलेलं नाही. अमुक फटका मारावा की नको.. धावू की नको अशी द्विधा तुझी कधी होतच नाही गड्या. आणि ऑन अ लायटर नोट... अर्जुन म्हणजे द्रौपदी, उलूपी, चित्रांगदा असताना सुभद्रेच्या पाठीमागे लागणारा... आणि तू म्हणजे बीबीसीवरच्या मुलाखतकाराने "who is the woman of your dreams?" असं विचारल्यावर दुसर्या क्षणी "माय वाईफ" असं उत्तर देणारा ! तुमची काय कंपॅरिझन करणार कप्पाळ??? शेवटी म्हटलं मरूदे.. जे मनात येईल ते ते टंकावं अन काय होतंय ते पाहावं. आता पुन्हा काय वेगळं लिहायचं हे सुचेपर्यंत लिहायला घ्यायचं नाही. पण हा विचार टिकला असता तर आज हे लिहायला बसलो असतो का?
अरे हो.. तुला एकदम "अरे तुरे" करतोय... पण आपण आईला अन देवाला "अहो जाहो" करतो का? गेली २०-२२ वर्षं तू आमच्या आयुष्यात जो काही राडा घातलायस ना... काही विचारायची सोय नाही. देवाचे थोर उपकार की त्यानी क्रिकेटवेड्या भारतात जन्म दिला आणि तो ही अश्या काळात जेव्हा साक्षात तू क्रिकेट खेळलास. लहानपणी कधीतरी आईबापानी उन्हाळ्याच्या सुट्टीत कटकट नको म्हणून क्रिकेट शिबिराला घातलं आणि एक प्रेमकहाणीच सुरू झाली रे! तशी माझी क्रिकेट कारकिर्द पण थोडीफार तुझ्यासारखीच बरं का! =)) मी पण १२-१४ वर्षांचा असताना क्लब ऑफ महाराष्ट्रला खेळायचो. आपल्याला "अकरा मारुती कोपर्याचा संजय मांजरेकर" म्हणायचे :). तू वकारला खेळलास ना तस्साच मी एस.पी. वर इक्बाल सिद्दिकीला खेळलो होतो. दोन बॉल नाकासमोरून सरसरत गेल्यावर मला ब्रह्मांड आठवणे म्हणजे काय ते समजलं होतं. माझ्यातल्या मांजरेकरचा पार मनिंदर सिंग झाला होता. अबे.... फाटली कशी नाही रे तुझी????? १६ वर्षांचा असताना पाकिस्तानात जाऊन इम्रान, वसीम, वकार आणि कादिरला भिडलास? थोबाड रक्तानी रंगलेलं असताना "मैं खेलेगा" म्हणायची हिंमत त्या वयात कुठून आणलीस रे बाबा? आणि वर कादिर सारख्या कलंदराला त्याच्याच आवतानावरून ठेचलंस? काय माती तरी काय म्हणायची तुझी?
आणि तेव्हापासूनच एका मंतरलेल्या प्रवासाला सुरुवात झाली होती. तुझं पाणी थोरामोठ्यांनी जोखलं होतं. "सचिन तेंडूलकर" नावाचा एक पोरगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवतोय हाच मोठा कौतुकाचा विषय होता. शास्त्री, प्रभाकर, मांजरेकर, सिद्धू, अझर वगैरेंनी नांगी टाकली तरी माझी ९३ वर्षांची पणजी सुद्धा "तेंडूलकर आहे ना अजून?" म्हणून समाधान मानायची. आणि मग हळू हळू तेंडूलकरवर 'अवलंबून' राहाण्याचे दिवस आले. तू ओपनिंगला येऊन धमाल करायला लागलास आणि आमच्या आशा-अपेक्षा वाढायला लागल्या. "तेंडूलकर आहे ना अजून" हे जणू भारतीय क्रिकेटचं ब्रीदवाक्य होऊन गेलं. तू बाद झालास की स्टेडियम ओस पडायचं तिथे टीव्ही बंद करणार्यांची काय कथा? आता विचार करताना कळतं की ह्यामागची आमची भावना एकच होती "विश्वास". आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तू वर्षानुवर्षं तो विश्वास सार्थ ठरवलायस. त्याचं काय आहे ना सच्या... च्यायला आपल्या देशात एकतर "हीरो" ही संज्ञा कोणालाही फार लवकर चिकटते. एक समाज म्हणून आम्ही कोणाच्याही एक-दोन करिष्म्यांवर हुरळून जातो आणि तो माणूस आमचा "हीरो" बनतो. मग तो कुणी घटका-दोन घटका आमची करमणूक करणारा उगाच काहीतरी श्टायली मारणारा नट वा धादांत खोटी विधानं करून आम्हाला चिथवून आमच्यातच भांडणं लावून स्वतःच्या तुंबड्या भरणारा एरवी फुटक्या कवडीची लायकी नसलेला राजकारणी का असेना. आम्हाला ना प्रेम करायला कोणीतरी हीरो हवा असतो. त्यात पुन्हा आमचा हीरो वेगळा आणि 'त्यांचा' हीरो वेगळा. मग आमच्या ह्या 'हीरोंचे' पाय मातीचे निघतात, आम्ही ज्याला आदर्श मानलं, मनाच्या देव्हार्यात ज्याची पूजा बांधली तोच आमचा देव दलदलीत बरबटलेला दिसतो. कधी पैसे खाण्याच्या, कधी घरी शस्त्र लपवण्याच्या, कधी सेक्स स्कँडलच्या तर कधी मॅच फिक्सिंगच्या. अश्या वेळी आम्हा सामान्य नागरिकांच्या आदर्शांचा चक्काचूर होऊन जातो. पण अरे जिथे सकाळी उठल्यावर नळाला पाणी नसल्याने आमच्या चिडचिडीच्या दिवसाची सुरुवात होते आणि रात्री घामाच्या धारा निघत असताना आणि डास चावत असताना दिवे गेले म्हणून तणतणत दिवसाचा शेवट होतो... तिथे आम्ही आमच्या भावनांच्या ह्या भडव्यांना कधी पायदळी तुडवणार रे? मग आमच्या हातात एकच उरतं - दुसरा कोणी हीरो शोधणे.
पण सच्या तू इतकी वर्षं झाली तरी त्या हीरो पदी ध्रुवतार्यासारखा अढळ राहिला आहेस. १९८९ ते ९२-९३ पर्यंत तू क्रिकेटचा "युवराज" होतास... १९९६ च्या विश्वचषकानंतर "राजा" झालास.... ९८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराक्रमानंतर "महाराज" झालास आणि २००० च्या मॅचफिक्सिंग प्रकारानंतर तर आमच्या हृदयाचा "चक्रवर्ती सम्राट" झालास. सीबीआयच्या चौकशीत एका बुकीनी म्हटलं - “ You cannot fix a match until and unless Sachin Tendulkar is out.” आणि खरं सांगतो सच्या... आयुष्यात पहिल्यांदा कोणी सेलेब्रिटी आमच्या विश्वासाला जागल्याचा आनंद आम्हाला दिलास. तुझ्यावरचे संस्कार आणि तुझं "अपब्रिंगिंग" ह्याबद्दल पूर्ण खात्री होतीच रे, पण पैशाच्या मायेनी जिथे भल्याभल्यांना देशद्रोही आणि भ्रष्ट बनताना पाहिलं होतं, तिथे मनात खूप धाकधुक होती. पण आजूबाजूला इतका धुरळा, इतका चिखल उडत असताना तुझ्यावर एक शिंतोडा उडवायची, एक बोट उठवायची कुणाची हिंमतही झाली नाही. आणि आमचा विश्वास दुणावला.
तुझ्याबद्दल लिहितोय खरा पण तुझ्या क्रिकेटबद्दल लिहायचं नाहिये...लायकीच नाही तसं करायची आमची. पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातली सागराची खोली आम्हाला मोहवून टाकते, त्यांचा धीरगंभीर ललत, रोमांचित करणारी तोडी, आषाढमेघांसारखा धीरगंभीर मल्हार, स्वरांचा दरबार उभा करणारा दरबारी आम्हाला दिसतो, पण एका षड्जावर महिनोंमहिने त्यांनी केलेली अथक मेहनत, प्रत्येक स्वर पक्का करण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, तो आवाज मिळवण्यासाठीची त्यांची अविश्रांत तयारी, त्यांची जिद्द, चिकाटी आम्हाला दिसत नाही रे. तसं बापानी पोराला बागेत खेळायला सोडताना हळूच त्याच्या ढुंगणावर हलक्या हातानी मारावं तसा नजाकतीनी मारलेला तुझा स्ट्रेटड्राईव्ह, पृथ्वीतलावर केवळ तूच खेळू शकतोस तसा "राईट हँड ओव्हर लेफ्ट" फ्लिक, कित्येकदा अंगावर काटा आणणारा तुझा पॅडल स्वीप, अपर कट, "ऑन द राईझ" चेंडूला कव्हर्समधून सीमापार धाडतानाची तुझी मूर्तिमंत ग्रेस, चेंडू जेमतेम शॉर्ट पडल्यावरचा तुझा ताकदवान पुल, जिब्राल्टरच्या खडकानी गुण घ्यावा तसा तुझा भक्कम स्टान्स, इतकंच काय - विकेट मिळाल्यावरचा तुझा लहान मुलासारखा निखळ आनंद... आम्हाला हे सगळे अदभुत गुण दिसतात पण त्याच्यामागचे कष्ट आम्ही कुठे बघितले आहेत? तुझं ते दैवी टायमिंग साधण्यासाठी तू केलेली साधना, फील्डिंगमधल्या गॅप्स काढण्यासाठी तू केलेली जीवतोड मेहनत, मॅच टेंपरामेंट विकसित करण्यासाठी उन्हातान्हात तू खेळलेले अगणित सामने, भारतीय संघाची ती निळी टोपी घालण्यासाठी बालपणात तू केलेला त्याग... तुझ्या कष्टांची कल्पना सुद्धा करणं शक्य नाही रे आम्हाला. असं म्हणतात की genius is 1% inspiration and 99% perspiration. आणि आम्ही तर तुझ्या ह्या १ टक्क्यावरच जीव ओवाळून टाकलाय. ज्या वयात आम्ही शाळा कॉलेजं बुडवून मजा मारण्याचा, पोरी पटवण्याच्या गोष्टी करायचो त्या वयात तू मैदानात गुरासारखा राबत होतास.
पण तेंडल्या... कष्ट तर सगळेच करतात.. तू "तू" आहेस ह्याचं कारण आहे तुझ्यावरचे संस्कार आणि तुझी जडणघडण. आज तू क्रिकेटचा आता तर अभिषिक्त बादशहा असताना सुद्धा कधी तुझी कॉलर वरती नसते, तू गॉगल्स घालून खेळत नाहीस, शतक ठोकलंय म्हणून फील्डिंगला आला नाहीस असं कधीच होत नाही (अशी उदाहरणं आम्ही बघितली आहेत ना रे). कारण तू क्रिकेटचा सम्राट असलास तरी "आपला तेंडल्या" ही आहेस. प्रह्लाद कक्करच्या एका मुलाखतीत त्यांनी तुझा एक किस्सा सांगितला होता. पेप्सीच्या "सचिन आया रे भैय्या"ह्या गाण्यावरची अॅड शूट करतानाचा. आधी त्यात असं दाखवलं होतं की तू सामन्यात षटकारांची बरसात करतोयस आणि मैदानाबाहेर चेंडूंचा पाऊस पडतोय... पण रात्री कक्करना तुझा फोन आला..."This gives a feeling that I am greater than the game. One person can never be greater than the game itself"... आणि तू ती अॅड बदलायला लावलीस.. बोटीत बसून स्टंपनी बॉल मारतोयस असं त्यात दाखवलं गेलं. तुझा "पाया" किती भक्कम आहे हे ह्या आणि इतर अनेक प्रसंगांमधून दिसलं. साहित्य सहवासचे तुझ्या बालपणीचे वॉचमन गेले तेव्हा त्यांच्या मुलाला भेटायला तू सपत्नीक आवर्जून गेलास, तुझ्या दानशूरतेबद्दल नेहेमीच तिर्हाईताकडून कळतं, तुझ्या आजूबाजूचा प्रत्येक जण तुझ्या विनम्रतेचे गोडवे गातो... ह्यातच सगळं आलं.
आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुझी consistency. तू खेळायला लागलास तेव्हा कपिल, इम्रान, बॉथम, बोर्डर वगैरे खेळत होते. आता ते आपल्या नातवंडांना तुझे किस्से ऐकवत असतात. तुझ्या बरोबर म्हटलंस तर वसीम, वकार, लारा, वॉ बंधू, डिसिल्वा, वॉर्न, मॅक्ग्रा वगैरे जनता... त्यांना सुद्धा त्यांचा पी एफ आणि ग्रॅच्युइटी घेऊन बरीच वर्षं झाली.... नंतर आले फ्लिंटॉफ (इंग्लंडचं कुठलंतरी नाव घ्यायला हवं ना रे?), दादा, द्रवीड, लक्ष्मण, ब्रेट ली, हेडन आणि बरीच इतर लोकं....त्यातली सुद्धा कित्येक व्हीआरएस घेऊन बसली आणि कित्येकांचा "ले ऑफ" झाला. मग वीरू, युवी, भज्जी वगैरे पोरं जी तुला खेळतांना बघत मोठी झाली आणि आताची कोहली, तिवारी, श्रीवत्स गोस्वामी वगैरे पिल्लावळ ज्यांचे आजी आजोबा तुझ्या मॅचेस बघतांना आपल्या मुलांना स्थळं बघत असतील. तब्बल पाच पिढ्या बघितल्यास तू क्रिकेटर्सच्या आणि तरी सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून उभा आहेस ! आणि नुसता उभा नाहीस तर यशाच्या गौरीशंकरावर उभा आहेस. तुला गोलंदाजी करताना वसीम वकार मॅक्ग्रा वॉर्न अँब्रोज वॉल्शला जे धडधडलं असेल तसंच आज ईशांत शर्मा, बोलिंजर, मलिंगा, अँडरसनला धडधडतं हाच तुझ्या consistency ला सलाम आहे. इतक्या सगळ्या वर्षांत तुझी धावा करण्याची, भारतासाठी सामने जिंकण्याची भूक यत्किंचितही कमी झालेली नाही हे केवढं मोठं आश्चर्य !
गड्या तुझ्याकडून खूप खूप शिकलोय बघ. एक तर आमच्या मध्यमवर्गीय मनाला मोठी स्वप्न बघायला आणि ती खरी करण्यासाठी कष्ट करायला शिकवलंस. घरातल्या मारुती ८०० वर समाधान न मानता होंडा, बीमडब्ल्यू, ऑडी अगदी फेरारीची महत्त्वाकांक्षा धरायला शिकवलंस. त्यासाठी कष्टांना पर्याय नसतो हे ही ठसवलंस, आचरेकर सरांसारखा "मेंटर" किती महत्त्वाचा असतो हे कळलं, मिळालेलं यश हे अजून मोठ्या यशाची पायरी आहे हे शिकवलंस, आपली रूट्स कशी जपावीत हे सांगितलंस, देशभक्ती काय चीज असते आणि देशभक्त असण्यासाठी तुम्हाला बंदुक घेऊन सीमेवर लढायला हवं असं नाही हे शिकलो ते तुझ्याकडूनच (तुझ्या किट मधला सिद्धिविनायकाच्या फोटोबरोबर चिकटवलेला तिरंगा पाहिलाय आम्ही), आपलं काम जीव ओतून करायला शिकवलंस (पाकिस्तानविरुद्ध शतक काढून तू बाद झालास आणि आपण हरलो तेव्हा तू "मॅन ऑफ द मॅच" पुरस्कार घ्यायला आला नाहीस. राजसिंग डुंगरपुरांनी नंतर म्हटलं होतं he was crying like a little child), स्वार्थ बाजूला ठेऊन विचार करायला लावलंस (वडील गेल्यानंतरचं तुझं शतक कोण विसरेल रे?), आपल्यावर होणारी टीका "पॉझिटिव्हली" घेऊन आपल्या कर्तृत्त्वानी त्यांना उत्तर देणं काय असतं हे तू आम्हाला दाखवून दिलंस (चॅपल, मांजरेकर आणि तुझ्याबद्दल शंका घेणार्या प्रत्येकाला आज तोंड दाखवायला जागा नाहीये). तू आम्हाला शिकवलंस की आपल्या आवडीच्या क्षेत्राबद्दल पूर्ण माहिती तर हवीच पण "अहेड ऑफ टाईम्स" विचार करता यायला हवा. हर्षा भोगलेनी सांगितल्याचं आठवतंय. "रवी शास्त्री आणि मी सचिनची मुलाखत घेत होतो. तू रनर का घेत नाहीस ह्या प्रश्नावर तो म्हणाला 'रनर कधीही माझ्यापेक्षा २ यार्ड मागे असणार आहे. मी बोलरच्या हातून चेंडू सुटल्याबरोबर त्या चेडूवर मिळणार्या धावेचा विचार करत असतो... रनर मात्र मी बॉल मारल्यानंतरच विचार करणार. शूमाकर पाचव्या नाही तर पहिल्या दिव्यालाच रेस सुरु करतो.... पाचवा दिवा लागल्यावर गाडी पुढे जाणं हा आधीच सुरू झालेल्या रेसचा एक भाग असतो". असा विचार तर मी मी म्हणणार्या क्रिकेट धुरंधरांच्याही डोक्याबाहेरचा आहे रे! तू शिकवलंस की तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्ही काहीही करू शकता. २००३ च्या वर्ल्डकप फायनलच्या वेळी ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान असताना तू टीमला म्हणालास "Can we hit one boundry in an over? That brings it down to 160 runs in 250 balls. Are we not good enough to do that? Let’s give it our best shot". आणि पुन्हा मॅक्ग्राला भिरकावून देण्याची जबाबदारी स्वतःवर घेतलीस. तेव्हा ती योजना यशस्वी झाली नसेल... पण तो अॅटिट्यूड तू तुझ्या सहकार्यांतच नाही... आमच्यातही बाणवलास.
आमच्यासाठी तू एक खेळाडू, एक क्रिकेटपटू, एक हीरो, एक विश्वविक्रमी फलंदाज, एक आदर्श मुलगा, शिष्य, सहकारी, भाऊ, पती, बाप ह्या पलिकडेही खूप काही आहेस. आमच्या आकाशात सचिन तेंडुलकर नावाचा ध्रुवतारा आहे - आम्हाला आयुष्याची दिशा दाखवणारा. तू आम्हाला "जगायला" शिकवलं आहेस... नव्हे शिकवतो आहेस. तू आम्हाला आनंद, जल्लोषाच्या क्षणांपलिकडेही इतकं काही दिलंयस की आज तुझ्या वाढदिवसाला तुला शुभेच्छा देताना शब्द अपुरे पडतायत. बस ! Keep being what you are. And thanks for being what you are.
तुझ्या वाढदिवसाला देवाकडे एकच मागणं आहे..... कधीतरी आयुष्यात तुझ्या पायावर डोकं ठेवायची संधी मिळावी... मग अगदी 'वरून' बोलावणं आलं तरी हरकत नाही.
प्रतिक्रिया
23 Apr 2010 - 1:22 pm | प्रशु
गाडीचा कर भरला का?
23 Apr 2010 - 2:05 pm | मेघवेडा
याला कोणीतरी गपवा रे.. लेखही वाचला नाहिये पूर्ण आणि प्रतिक्रिया देतोय.
बाकी जेपी.. सध्या तरी प्रतिसाद लिहिण्याच्या अवस्थेत नाहिये.. मंत्रमुग्ध झालोय!! शुद्धीवर आल्यावर सवडीने प्रतिसाद लिहितो.
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
23 Apr 2010 - 1:35 pm | विसोबा खेचर
मॉर्गनसाहेब, सचिनराव शतगुणी आहेतच परंतु आपल्याही 'सचिनभक्ति'चे कौतूक वाटते..
एखाद्या संदर्भग्रंथातल्या पानांत सहज समाविष्ट व्हावा असा सचिनच्या समग्र कालखंडात्मक कारकिर्दीचा, त्याच्यातल्या अनमोल गुणांचा सुंदर आढावा/मागोवा घेणारा एक उत्तम लेख..!
माझ्या मते गुणीजनांचं गुणीजनपण दाखवणारेही गुणीच..
गुणीजन जाने गुणकी बात.. अशी आमच्या यमनमध्ये एक बंदिश आहे.. :)
जियो...! :)
आपला,
(सय्यद किरमाणी प्रेमी) तात्या.
23 Apr 2010 - 2:24 pm | अस्मी
सॉल्लिड...खूप भारी.
शब्दच कमी पडतायत सांगायला...
अगदी नक्कीच :)
- अस्मिता
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
23 Apr 2010 - 1:43 pm | भिडू
मस्तच लेख
सच्या ला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेछ्छा
तुम जियो हजारो साल्,साल मे रन्स हो पचास हजार
24 Apr 2010 - 12:01 pm | विसोबा खेचर
खास सचिनसोबतच
त्याच्या वाढदिवसानिमित्त
मँगो मिल्क शेक पिऊया! :)
तात्या.
24 Apr 2010 - 12:09 pm | जे.पी.मॉर्गन
तात्या... आमच्याकडे आज पुरणपोळी आहे ! येताय?
जे पी
23 Apr 2010 - 1:45 pm | मनिष
काय लिहिलस रे, काय लिहिलस गड्या!!!
सचिन जेवढा आवडतो तेवढाच तुझा लेखही आवडला, म्हणजे बघ. खास करून हे तर अगदी मनातले...
.
माणूस आणि त्याची कला, खेळ ह्यात फरक करावा असे म्हणतात. पण तरीही माणूस चांगला असला तर त्याबद्द्लचे प्रेम्/आदर हे शतगुणित होतात हे नक्की! शिवाय म्हणतात ना...
Sport does not only build character, it also reveals it! :)
सच्च्याला हॅप्पी बड्डे!!! :)
अवांतर - ह्या लेखानंतर जर तुम्हाला साप्ताहिक सकाळ, लोकसत्ता कडून क्रीकेट वर लिहायचे आमंत्रण आले तर मला तरी नवल नाही वाटणार! :)
23 Apr 2010 - 1:50 pm | झकासराव
अफाट लेख लिहिलाय :)
23 Apr 2010 - 1:51 pm | चेतन
सच्याला शुभेच्छा.
खरच सध्याच्या काळातला एकमेव भारतिय हिरो
तो खेळतो तेव्हा एक मिनिटहि टीव्ही पासुन उठवत नाही
@प्रशु: माझ्यामाहितीप्रमाणे ती गाडि त्याला भेट म्हणुन दिली होती आणि वाद झाल्यावर ज्यानी भेट दिली त्यानी त्यावरचा टॅक्स भरला होता.
अवांतरः लोकांच्या डोळ्यातिल कुसळे लवकर दिसतात काहिजणांना
चेतन
23 Apr 2010 - 3:37 pm | भारद्वाज
खरंय !!
23 Apr 2010 - 10:23 pm | प्रशु
अहो भरला ना कर, मग झालं तर...
बाकि तुमच्या आनंदात विरजण घातल्या बद्द्ल शमस्व...
सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा...
अवांतर : पुढ्ल्या वर्षी मुंबई कोणाची ? असल्या नसत्या उठाठेवी न करण्याची बुध्दी देव त्याला देवो....
23 Apr 2010 - 2:08 pm | श्रावण मोडक
वा. नाव (तुमचे) पाहिलं आणि लेख वाचला. अपेक्षापूर्ती झाली.
23 Apr 2010 - 2:09 pm | भूंगा
मॉर्गनसाहेबांनी त्यांच्या लेखाद्वारे बार काढून म्हणजेच "गन मारून" छान सलामि दिली त्याबद्दल अभिनंदन
एक वि.सू.
आपण प्रत्येक खासियत लिहितांना जर योग्य ते फोटो घातलॅ असतेत तर एक अतिशय मोठा इतिहास रूपी साहित्य झाले असते असे मला वाटते
भुंगा
23 Apr 2010 - 2:18 pm | अमोल केळकर
जबरदस्त लिखाण !!
सचिनला सलाम !!! आपल्या लेखनालाही
अमोल केळकर
(अवांतर : सध्याच्या आयपील मधील स्टेडिअम बाहेर रंगणार्या सामन्याने हीजास्त मजा आणली आहे.)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
23 Apr 2010 - 2:26 pm | दिपक
मॉर्गनसाहेब धडाकेबाज लिखाण.. सचिनबद्दल कितीही वाचलेतरी
अजुन वाचावेसेच वाटते. तुमच्या लिखाणाला, सचिनभक्तिला ___/\___
तेंडल्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. खरच बापमाणूस
23 Apr 2010 - 2:44 pm | नंदन
सुरेख लेख!
>>> तुझ्याबद्दल लिहायचं तर नवीन विशेषणं कुठून खणून काढायची बाबा?
--- अगदी, अगदी.
खरं तर, साहेबांचं श्रेष्ठत्व सिद्ध करायला द्विशतकाची गरज नव्हतीच; पण २००* ची खेळी ज ब र द स्त होती. त्याबद्दल काय बोलणार, काय लिहिणार?
मर्ढेकरांचे शब्द उसने घेऊन सांगायचं तर -
असे काहीसे होईल, अशी होती फार आशा;
असे काहीसे झालेले, पाहतांच थिजे भाषा
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
23 Apr 2010 - 2:47 pm | श्रावण मोडक
खरंय राव. इथंही शब्द उसनेच घेऊन सांगता येतंय पहा! पूर्ण सहमत आहे!!!
23 Apr 2010 - 2:56 pm | राजेश घासकडवी
जेपीसाहेब,
आपल्या भक्तीने भारून टाकलं. लेख लिहिताना माथा टेकलेला (अंमळ बडवायजरचे तीर्थप्राशन करण्यासाठी वर उचललेला..) जाणवतो. सगळ्यांच्याच सचिनभक्तीला शब्द मोकळे करून दिल्याबद्दल धन्यवाद.
राजेश
23 Apr 2010 - 3:41 pm | विमुक्त
वाचून वेड लागलं... डोळ्यात पाणी आलं... भन्नाट लिहिलयं... तुमच्या भक्तीला आणि सच्याला मानाचा मुजरा...
23 Apr 2010 - 5:52 pm | विशाल कुलकर्णी
+१ ..
२००००००००००००००००००% सहमत. खरच डोळे भरून आलेत. सचीन तर ग्रेट आहेच. पण मित्रा तुझ्यासारखे सचिनभक्त पण एका कडकडीत सॅल्युटचे अधिकारी आहेत.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
23 Apr 2010 - 4:16 pm | भारद्वाज
मॉर्गनसाहेब, सचिनबद्दल लेख लिहिणाऱ्या आवडत्या द्वारकानाथ संझगिरींनंतर आमच्या लिस्ट मध्ये तुमचं नाव घातलं बरं आम्ही ....
अक्षरशः खरं आहे हे.
खुद के साथ बाता :
९८ च्या शारजा कपमध्ये तू ऑस्ट्रेलियाचं केलेलं पानिपत....आईशप्पथ सांगतो...तेव्हा तर असा झालं होतं की म्हणजे हिरोईन जसं हिरोला म्हणते 'मार, अजून मार त्याला...' आणि मग हिरोपण तिची मर्जी राखायला दे मार मारत सुटतो, तसं तू मारत सुटला होतास...केस्प्रोवीचचा तर रेप केला होता नि शेन वॉंर्नची चड्डी पिवळी केली होतीस...
त्यावेळी राजसिंग डुंगरपूरांना ऑस्ट्रेलियाचा कुणीतरी (नाव आठवत नाही) उद्वेगाने म्हटला 'I agree that Sachin is one of the best batsman in the world,but nobody has treated Australia like this before'.....अजून काय म्हणावं यार !!
'तूनळी' वरून ती मॅच पुन्हा पुन्हा पाहतो...प्रत्येक वेळी अंगावर शहारा येतोच येतो....ते वाळूचं सुटलेलं वादळ, त्यानंतर तुझं चौकार- षटकारांचं वादळ ...अहाहा !!!!
अश्या लई आठवनी हायेत...पन आपलं शब्दभांडार अपुरं हाय बघ ....
तेंडल्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
-
(मॅचनंतर D.Y.Patil स्टेडीयम पासून घरापर्यंत चालत यावं लागणारा सचिनप्रेमी)
23 Apr 2010 - 5:22 pm | आंबोळी
>>'तूनळी' वरून ती मॅच पुन्हा पुन्हा पाहतो
लिन्क द्या ना भौ.
>>(मॅचनंतर D.Y.Patil स्टेडीयम पासून घरापर्यंत चालत यावं लागणारा सचिनप्रेमी)
नेरूळच्या का? रहायला कुठे आहे? (पुढच्या गोष्टी खवत करू)
आंबोळी
24 Apr 2010 - 11:01 am | जे.पी.मॉर्गन
हा घ्या दुवा..... हजारो वेळा बघून पण समाधान होत नाही... वॉर्नला छकडी टाकल्यावरचा चेहरा अजून आठवतो !
24 Apr 2010 - 8:50 pm | भारद्वाज
आंबोळीच्या खवत लिंक टाकली...तेव्हा पाहीली...आता तुम्ही इथे लिंक टाकली, पुन्हा पाहीली.
सालं या फे-यातून सुटणं या जन्मी काही शक्य होत नाही बाबा...
घ्या ही एक लिंकपण पाहून घ्या !!!!!!!
http://www.youtube.com/watch?v=5QzPtde639E
सचिनप्रेमी नवी मुंबईकर
23 Apr 2010 - 4:01 pm | इरसाल
“ You cannot fix a match until and unless Sachin Tendulkar is out.”
अंगावर शहारा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
23 Apr 2010 - 4:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मॉर्गनसाहेब, सचिनबद्दल वाटणारं कौतुक, प्रेम, आदर... सगळंच तुम्ही लिहीलं आहेत; मी लिखाणाचं कौतुक नक्कीच करेन.
विक्रमादित्यासाठी खास लिहीलेला उत्तम लेख!
अदिती
23 Apr 2010 - 4:21 pm | विसोबा खेचर
सचिनवरील एक चांगले संदर्भ असलेला, एक माहितीपूर्ण लेख म्हणून आम्ही या लेखाचा दुवा मराठी विकिपिडियावरही नोंदवला आहे..
तात्या.
23 Apr 2010 - 5:23 pm | आंबोळी
हे बाकी बेष्ट केलत तात्या...
लेख खरच खुप सुरेख झालाय.
--आंबोळी
24 Apr 2010 - 11:09 am | जे.पी.मॉर्गन
तुम्हाला हा लेख विकिपिडियावर टाकावासा वाटला ह्यातच पावलो ! :)
खूप खूप धन्यवाद
जे पी
23 Apr 2010 - 4:28 pm | बिपिन कार्यकर्ते
क्रिकेटफॅन नसलो तरी सचिनफॅन आहे. थोर माणूस आणि खेळाडूही...
अवांतर: लेख थोडा टोन्डडाऊन केला असता तर अधिक प्रभावी झाला असता. :)
बिपिन कार्यकर्ते
23 Apr 2010 - 5:08 pm | मदनबाण
मॉर्गनराव लयं भारी...फोटु पण क्लास लावलाय.
मी सचिन बद्धलची ही ओळ मनात कोरुन ठेवली आहे :---
if cricket is a religion sachin is god
सचिनला खेळताना पाहण्यासारखे दुसरे सुख या जगात नाही...असचं मला नेहमी वाटत.
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
23 Apr 2010 - 5:06 pm | प्रमोद देव
मॉर्गनशेठ,काय बोलू?
नि:शब्द केलंत.
सचिनबद्दल काय बोलणार....किर्तीच्या उत्तुंग शिखरावर असूनही जमिनीवर घट्ट पाय रोवलेला माणूस...त्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
23 Apr 2010 - 5:15 pm | मेघना भुस्कुटे
आता आणिक काय असणार असून असून सचिनबद्दल - अशा उदासीन विचारानं अजून वाचला नव्हता. आत्ता वाचला.
बरं वाटलं. मजा आली.
इतक्या मनापासून मानलेल्या आभारांबद्दल आभार. :)
23 Apr 2010 - 5:15 pm | वेताळ
कोणतीही क्रिकेट मॅच फक्त सचिन साठीच बघतो
वेताळ
23 Apr 2010 - 6:15 pm | श्रीराजे
मॉर्गनसाहेब जबरी लेख आहे....!
वाचताना प्रसंग अगदी डोळ्यासमोर आले...
सच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
23 Apr 2010 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार
ज ह ब र्या !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
23 Apr 2010 - 6:22 pm | संजा
मस्त लेख.
येकदा जरा आपल्या बेदी, चंद्रा आणि कर्सन घावरी बद्दल काहीतरी येऊद्या
संजा
23 Apr 2010 - 6:56 pm | भोचक
बराच वेळ पाहूनही वाचला नव्हता. म्हटलं नंतर बघूया. एकदा उघडला नि सरसर वाचत गेलो. मस्तच लिहिलाय. तुमची भक्ती ओथंबून वाहत असली तरी ती सचिनसाठी नक्कीच अनाठायी नाही. बाकी तुमचे शब्दलालित्य म्हणजे 'क्या बात है. आमच्याकडून खास सचिनच्या वाढदिवसानिमित्त आणि तुमच्या या लेखाबद्दल आमच्या इंदूरच्या सराफ्यातला 'मूँग का हलवा' आपल्याकडून लागू.केव्हा येताय बोला! :)
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
23 Apr 2010 - 7:02 pm | अनामिक
जबर्या लिहिलंय...
सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
-अनामिक
23 Apr 2010 - 7:15 pm | संदीप चित्रे
शॉट्सवर शॉट्स लावल्यासारखं झालंय हा लेख वाचल्यावर !
जियो मॉर्गन !
23 Apr 2010 - 7:22 pm | नरेश_
शब्द शब्द जपून ठेवावा असा लेख! मॉर्गनसाहेब, आपला शब्दषटकार स्टेडियमच्या पार बरं का! सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
23 Apr 2010 - 7:34 pm | प्रभो
सुंदर....शब्द न शब्द सुंदर....मस्त रे
23 Apr 2010 - 7:58 pm | बेभान
आम्ही भाग्यवानच..!! ज्यांना सचिनच्या शेकडो दैदिप्यमान खेळ्या पाहता आल्या आणि यावर्षीचा २४ फेब्रुवारीचा दिवस सच्यामुळे तो खरा सुवर्णदिन झाला दुस-या दिवशीच्या Times of India ची हेडलाईन- अगदी ठळक अक्षरात- Immortal at 200-
आम्हाला भाग्यवान केल्याबद्द्ल तुझे आभार.
सचिनला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
कधीतरी आयुष्यात तुझ्या पायावर डोकं ठेवायची संधी मिळावी... मग अगदी 'वरून' बोलावणं आलं तरी हरकत नाही.
मॉर्गनसाहेब, आप कतार में है..
23 Apr 2010 - 8:00 pm | योगी९००
मॉर्गन साहेब...लेख मस्त मस्त झालाय..
पण जरा अति कौतूक झाले आहे असे उगीच वाटले..(सचिनचे इतके कौतूक तर संझगिरी सुद्धा करत नाहीत).. हल्लीच्या जमान्यात इतके कौतूक कोणाचेच ऐकवत नाही.
बाकी काही म्हणा सचिनची २००३ world cup ची पाकिस्तानविरूद्धची खेळी माझी सर्वात आवडती आहे. शोएबला मारलेला तो छक्का...वॉव..!!!! खरे तर तो पुर्ण world cup सचिनचाच होता...त्यावेळी ईग्लंडच्या कॅडिकला आणि नंतरच्या मॅचला शोएबला केलेल्या हाणामारीनेच सचिन आमचा जीव की प्राण झाला...!!!!
खादाडमाऊ
23 Apr 2010 - 8:18 pm | घाटावरचे भट
मस्तच लेख...
23 Apr 2010 - 8:20 pm | चतुरंग
सचिनचं असामान्य असं साधेपण, सच्चा माणूस असणं, आपल्या यशाचा सर्वात मोठा वाटा हा कुटुंबियांचा असल्याची कृतज्ञ जाणीव ठेवणं ह्या सगळ्या महिरपीमुळे त्याचा खेळ खुलून दिसतो आणि ह्याच सगळ्या गोष्टींनी तो आज लाखोंच्या हृदयात विराजमान आहे!
सचिनला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
एक दंतकथा उगवती आणि दुसरी अस्ताचलावरती!

(चित्र आंजावरुन साभार)
(सचिनप्रेमी)चतुरंग
23 Apr 2010 - 8:47 pm | चिर्कुट
आमचा साष्टांग __/\__..
सचिन आणि जे. पी. मॉर्गनराव दोघांनाही...
जबर्या लेख..एका जबर्या माणसासाठी!!!
(सायबांचा यड्यागत फ्यान) चिर्कुट
24 Apr 2010 - 1:41 am | ज्ञानेश...
मंत्रमुग्ध केलेत.
कंठ दाटून आला वाचत असतांना !
सचिन क्रिकेटचा देव आहे.
आमचे क्रिकेटचा, की आम्ही त्याला 'याची देही याची डोळा' पाहिले !
"...आमच्यासाठी तू एक खेळाडू, एक क्रिकेटपटू, एक हीरो, एक विश्वविक्रमी फलंदाज, एक आदर्श मुलगा, शिष्य, सहकारी, भाऊ, पती, बाप ह्या पलिकडेही खूप काही आहेस. आमच्या आकाशात सचिन तेंडुलकर नावाचा ध्रुवतारा आहे - आम्हाला आयुष्याची दिशा दाखवणारा. तू आम्हाला "जगायला" शिकवलम आहेस... नव्हे शिकवतो आहेस. तू आम्हाला आनंद, जल्लोषाच्या क्षणांपलिकडेही इतकं काही दिलंयस की आज तुझ्या वाढदिवसाला तुला शुभेच्छा देताना शब्द अपुरे पडतायत.
बस ! Keep being what you are. And thanks for being what you are."
=D> =D> =D>
24 Apr 2010 - 5:05 am | मेघवेडा
जेपी.. सकाळी हापिसात ओझरता वाचला लेख आणि तेव्हाच भारावून गेलो.. म्हटलं घरी जाऊन सवडीने प्रतिसाद देऊ. घरी येऊन पुन्हा वाचला आणि पुन्हा थक्क झालो. म्हटलं जेवून वगैरे आरामात देऊ प्रतिसाद. आता पुन्हा वाचला आणि भावनांना वाट मोकळी करून द्यावीच म्हटलं आता. सच्याच्या गुणाबंद्दल आम्ही अजून काय लिहिणार अजून काय लिहिणार असे बरेच जण म्हणतात. आणि त्यात तथ्यही आहे. पण मुळात मनात अपार भक्ती असेल तर लिखाण स्टीरिओटाईप होत नाही. आणि त्याचा एक दर्जेदार नमुना आहे हा लेख. तू नमूद केलेल्या गोष्टी यापूर्वी कुणी मांडल्या नाहियेत का? पण तरी तुझा लेख वेगळा वाटतो, अगदी मुग्ध करतो. शब्दाशब्दातून सचिनभक्ती ओसंडून वाहतेय रे! दोन महिने घेतलेस लेख लिहायला, सार्थकी लागले! अतिशय प्रभावी भाषाशैलीत लिहिलेला एक अफाट लेख. याचा प्रिंट काढून साठवणीत ठेवणार आहे मी. संझगिरी, संजय मांजरेकर, हर्षा भोगले आणि कुणी कुणी सचिनवर लिहिलेले १४-१५ लेख आहेत माझ्याजवळ.. त्यात आणि एकाची भर..!! 'स्ट्रेट ड्राईव्ह तेंडुलकरस्य' पासूनच तुझा फ्यान झालो होतो मी. आता हा लेख म्हणजे कळस आहे अगदी! आज माझ्या मित्रांना, बाबांना या लेखाची लिंक दिली आणि बरोबर 'याचा लेखक जेपी माझा मित्र आहे' हे सांगताना अभिमानानं ऊर भरून आला रे माझा!' मागं एकदा तू मला म्हणाला होतास 'आपल्या गळ्यात एकच माळ आहे आणि कपाळाला एकच टिळा आहे'.. तेव्हा हा प्रतिसाद लिहिण्यामागच्या भावना समजून घेशीलच!
बादवे, तू लेख लिहिणार सचिनवर याची खात्री होतीच पण कल्पनेपेक्षा अफाट लेख लिहिलायस.. त्याला लागून मी माझा सचिनवरचा लेख डिले केलाय बरं का..
असो. आमच्या लाडक्या तेंडल्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. खरंच रे, त्या देवाचे थोर उपकार त्यानं अशा कालावधीत जन्माला घातलं जेव्हा साक्षात सचिन खेळतोय.
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
24 Apr 2010 - 6:43 am | शुचि
खूप पॅशनेट आहात मॉर्गन अन उत्कृष्ट लेखक.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
24 Apr 2010 - 7:10 am | इन्द्र्राज पवार
जे. पी. जी ..... लेख कालच वाचला होता, परत वाचला सायंकाळी, रात्री..... आणि आता "मी भारावून गेलो" हे वाक्य वाचून वाचून तुम्हीही कंटाळून गेला असाल, म्हणून त्याची पुनरक्ती करीत नाही, त्याची गरजही नाही, कारण ज्या ज्या सदस्यांनी आपल्या लेखावर भरभरून लिहिले आहे त्यांनी आपल्या शैलीला तसेच आपल्या सचिन भक्तीला सलाम केला आहे. आता त्यात मी एक ! पण काल प्रतिसाद एवढ्यासाठी दिला नाही, कि आमच्या "बाळ्या" बद्धल लिहायचे तर नेमके त्याच्या वाढदिवसा दिवशीच लिहावे असा एक "बालिश" विचार मनात आला, आणि तो आता पाळत आहे.
आमच्या कोल्हापुरात "सचिन तेंडूलकर" ला कुणी "तेंडल्या" किंवा "सच्या" म्हणत नाहीत ~~ तर या हीरोचे येथील बाळसे आहे "बाळ्या" या नावाने ! अगदी त्याच्या वयाच्या १६ व्या वाढदिवसापासून त्याच्यावर प्रेम करणा-यांनी जणू काय तो आपल्या परड्यात खेळणारा पोर आहे आहे या नात्याने/आपुलकीने त्याचे "बाळ्या" असे नामकरण करून टाकले आहे. कोणताही सामना असू दे, कुठेही असू दे, विचारणारा दुस-याला विचारतो, "बाळ्याचा किती झाला"...... ४, ५ विकेट पडल्या असल्या तरी....चौकशी अशी असते कि, "जाऊ दे, आपल्या बाळ्या हाय ना अजून..?" या "अजून" आशेला फार मोठा अर्थ आहे, एक विश्वास आहे, एक आदर आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक विश्वास आहे, ज्याची तुलना केवळ "देवावर" असलेल्या विश्वासाशी होऊ शकते.
इथे "रंकाळा" तलावावर तेथे रोज पोहायला येणारी मंडळी प्रतिवर्षी "हनुमान जयंती" चा उत्सव मोठ्ठ्या प्रमाणावर करतात, आणि जवळ जवळ दोन हजार लोकांचे भोजन होते. अर्थात हा स्वयंस्फूर्तीने केलेला कार्यक्रम असल्याने वर्गणीची सक्ती नसते, दान पेटी ठेवलेली असते, पोहायला येणारे, देवळाला प्रदक्षिणा घालणारे, बागेत फिरायला येणारी मंडळी आपापल्या परीने दान देत असतात. या दान पेटीत दर वर्षी कुणाचेही नाव नसलेले एक पाकीट पडते, हजार रुपये असतात, व एक छोटी चिट्ठी...ती वर लिहिले असते ~ "आमच्या लाडक्या सचिन तेन्डुलकर साठी ....हनुमाना आमच्या बाळ्याला सुखी ठेव".... क्या बात ही ! २०० च्या विश्वविक्रमानंतर एक पावती झाली ~ 'बाळ्याच्या विक्रमासाठी - सचिनप्रेमी कडून" ---- देणा-याचे नाव नाही. असे देखील प्रेम या महान खेळाडूवर !
जाता जाता >>> ज्या प्रदेशाशी : शिव छत्रपती....लता मंगेशकर.... भीमसेन जोशी....पु. ल. देशपांडे आणि सचिन तेंडुलकर रत्ने निगडीत आहेत, त्या "महाराष्ट्रात" माझा जन्म झाला याचा मला सार्थ अभिमान वाटतो !
अतिशय सुंदर लेखाबद्दल पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
24 Apr 2010 - 10:24 am | जे.पी.मॉर्गन
सगळ्यांचेच प्रतिसाद केवळ अचाट आहेत ! म्हणजेच सचिन आपल्या सगळ्यांचा किती लाडका आहे पहा ! बर्याच जणांना हा लेख खूप पॅशनेट वाटला काहींना "ओव्हर द टॉप" गेलेला वाटला असेल, काहींना तद्दन बालिश वाटण्याचीही शक्यता आहे. पण खरंच सांगतो गड्यांनो... ह्या लेखात लिहिलेली ओळ न ओळ अगदी मनापासून लिहिली आहे. आम्हाला देवळातल्या देवापेक्षा माणसातल्या देवावर श्रद्धा ठेवायला शिकवणारी हीच लोकं. लताबाई, भीमसेन जोशी, लान्स आर्मस्ट्राँग, फेडरर, बाबा आमटे, पु.लं, रघुनाथ माशेलकर... नावं तरी किती घ्यायची. शाळेत एक कविता होती हेन्री वॅड्स्वर्थ लाँगफेलेची - द साल्म ऑफ लाईफ. त्यात दोन ओळी होत्या
"Life is real ! Life is earnest! And the grave is not its goal;
Dust thou art, to dust returnest, Was not spoken of the soul.
ह्या ओळी अगदी कोरून राहिल्या आहेत मनावर. आणि ही आणि इतर अनेक लोकं आपल्या सुसंस्कृत करून जातात. सचिनबद्दल लिहिण्याचं कारण म्हणजे आपल्याला संगीत अथवा शास्त्रापेक्षा खेळांतली अक्कल थोडी जास्त आहे इतकंच. आज तात्या म्हणाल्या प्रमाणे माझ्यात जर कुठे "गुणग्राही"पणा असेल, जगात जे जे उत्तम उदात्त उन्नत आहे त्याचं appreciation करण्याची थोडीफार कुवत असेल, त्यातून आनंद घेण्याची वृत्ती असेल तर ते ह्या सगळ्यांमुळेच. आणि वैयक्तिकच नव्हे, अगदी व्यावसायिक आयुष्यातही ह्याचा खूप फायदा होतोय. आणि मिपावरच्या सगळ्याच लेखांना मिळणार्या प्रतिसादावरून मी गुणीजनांच्या सहवासात आहे हे तर नक्की ! :-)
सर्वांच्याच प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
जे पी
24 Apr 2010 - 4:00 pm | आशिष सुर्वे
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
24 Apr 2010 - 9:05 pm | कानडाऊ योगेशु
मॉर्गनसाहेब लेख एकदम फर्मास झाला आहे!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
24 Apr 2010 - 9:20 pm | अनामिका
जे पी!
कसल भन्नाट लिखाण केलत्.....सच्च्याची स्तुती करायला खर पाहता सगळा शब्दकोष आपुरा पडेल......त्याची महती आणि कर्तृत्वच अस आहे ...बाकी क्रिकेट मधल्या तांत्रिक बाबी कळोत न कळोत पण सच्च्या मैदानात खेळत असे पर्यंत सगळी काम सोडून टीव्ही समोर चिकटुन बसणे हा माझा अधिकार मानते मी.......सच्च्याने त्याच्या खेळाच्या रुपाने वेळोवेळी दिलेला आनंद शब्दात मांडणे खरच कठीण....त्याच्या भन्नाट खेळींनी कैकवेळा मनावर व बुद्धीवर आलेली मरगळ झटकुन टाकायला मदत केली आहे....काय बोलायचे? या तेंडुलकरांच्या सुपुत्राबद्दल......
"You cannot fix a match until and unless Sachin Tendulkar is out.” या एका विधानात त्याच मोठेपण सिद्ध होतय.....
आजच्या दिवशी"आमचे आयुष्य देखिल याला लाभावे "हिच त्याच्या वाढदिवशी इश्वर चरणी प्रार्थना......
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
24 Apr 2010 - 11:44 pm | मी-सौरभ
=D> =D> =D> =D> =D>
-----
सौरभ :)
25 Apr 2010 - 2:51 am | बहुगुणी
मॉर्गन, लाखात एक लेख लिहिलात.
सचिनवरच्या या लेखातच असं आवाहन करावंसं वाटतं की सचिनने क्रिकेटनिवृत्तीनंतर (ती वेळ इतक्यात येऊ नये असं अर्थातच वाटतं) भारताच्या राजकारणात यावं, आणि ते ढवळून शुद्ध करावं. या साध्या मनाच्या, सच्च्या, प्रामाणिक आणि कर्तृत्ववान माणसाच्या पाठी बहुसंख्येने भारतीय उभे राहतील याची खात्री वाटते. त्याच्या राजकारणातील अपरिपक्वतेची वा लायकीची कारणं कुणी काढायची गरज नाही, सध्याच्या नालायक राजकारण्यांपेक्षा सचिन कितीतरी पटीने चांगला उमेदवार- नव्हे, नेता- असेल.
वरती जेपीं नी उद्धृत केलेल्या बुकीच्या “You cannot fix a match until and unless Sachin Tendulkar is out” या एका विधानावरून सचिनच्या integrity विषयी कल्पना येते. [मराठीत Integrity/moral uprightness ला काय प्रतिशब्द आहे? दुर्दैवाने मला तो याक्षणी आठवत नाही.]
Integrity शी संबंधित हा अॅलन सिंप्सनचा quote आठवला: If you have integrity, nothing else matters, and if you don't have integrity, nothing else matters!"
सचिनने राजकारणात प्रवेश करावा की नाही यावर वाचकांची मतं वाचायला आवडेल.
25 Apr 2010 - 12:22 pm | आवशीचो घोव्
लेख अप्रतिम आहे. संझगिरींची आठवण करून दिलीत. वाचताना कंठ दाटून आला. सचिन बद्दल कितीही वाचलं तरी कमीच वाटतं.
27 Apr 2010 - 11:26 am | चक्रमकैलास
God wanted to play Cricket, then comes Sachin Tendulkar..& that's why these days God is bit busy to answer our prayers...
--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!
24 Apr 2015 - 11:05 am | किसन शिंदे
आमच्या तेंडल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!
24 Apr 2015 - 11:20 am | चिनार
काय लिहिलंय सर !!!
जबरदस्त !!!!!
अगदी २०० टक्के मनातलं बोललात
24 Apr 2015 - 11:59 am | नाखु
24 Apr 2015 - 1:48 pm | तुषार काळभोर
श्री सचिन(भाऊ) तेंडूलकर यांना वाढदिवसाच्या जंगी शुभेच्छा!!!
24 Apr 2015 - 2:56 pm | टवाळ कार्टा
अस्से नक्को करु भै...त्याला आपला सच्च्याच राहूदे :)
24 Apr 2015 - 5:10 pm | तुषार काळभोर
सच्या... ह्याप्पी बड्डे, भावा!!
(कुटं बसायचं सांग)