सारण की पुरण??

धनाधीश's picture
धनाधीश in पाककृती
9 Mar 2008 - 4:10 pm

करंज्यांमध्ये जे भरतात, त्याला आम्ही सारण म्हणतो. पण आमच्या शेजारी-पाजारी राहणा-या बहुजन समाजातील कुटुंबांमध्ये यालाच पुरण म्हणतात. माझ्या माहितीनुसार पुरणपोळीत जे असते, त्याला पुरण म्हणतात. मिपावरील खवय्ये याबाबतीत अधिक मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 5:16 pm | विसोबा खेचर

सारण हा शब्द थोडासा पांढरपेशी, उच्चवर्गीय, सभ्य, सुशिक्षित व सुसंस्कृत वगैरे वाटतो. माझ्यासारख्या मनाने बहुजनसमाजवादी असलेल्या माणसाला पुरण हाच शब्द अधिक आपला वाटतो..

असो, इतरांची मते वाचायला आवडतील. चालू द्या..

आपला,
तात्या कोळी.

प्राजु's picture

9 Mar 2008 - 8:25 pm | प्राजु

करंजीच नव्हे, तर मोदक सुद्धा सारण भरलेलेच असतात. समोसा किंवा मटारच्या करंज्या करताना सुद्धा त्यात जे भरले जाते त्यालाही सारण असे म्हणतात.
अगदी नीट सांगायचे तर.. स्टफिंग म्हणजे सारण.
पण पुरण म्हणजे... डाळ आणि गूळ यांचे शिजवून तयात केलेले मिश्रण. लहानमुलांसाठी करताना तूर डाळीचे पुरण करतात. आणि पुरण हे डाळींशीच (हरभरा डाळ / तूर डाळ) संबंधित असते. त्यात बाकी काही प्रकार असल्याचे ऐकिवात नाही. म्हणून तर पुरणपोळी असेच म्हणतात. म्हणजेच पुरण हे विशेष नाम आणि सारण हे सामान्य नाम असे म्हणता येईल.... हुश्श.... किती हे विश्लेषण!!!

- (सर्वव्यापी)प्राजु

पिवळा डांबिस's picture

10 Mar 2008 - 12:38 am | पिवळा डांबिस

कर्नाटकात कडबू (पुरणाच्या करंज्या) करतात. तेथे पुरण हे सारण म्हणून वापरतात...

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 8:32 pm | सुधीर कांदळकर

प्रत्येक अन्नपूर्णेस विचारला आहे. माज्या आईच्या वयाच्या अन्नपूर्णांना. कारण हे शब्द पारंपरिक आहेत. करंजीत भरतात ते पुरण. ज्यात भरतात ते सारण असा अर्थ मला जवळजवळ प्रत्येक अन्नपुर्णेने सांगितला. माझ्या लहानपणी दिवाळीत वा समारंभप्रसंगी करंजीचे, चकल्या गाळण्याचे काम मुलेमुली करीत. चकलीचे पीठ घट्ट झाल्यावर माझ्या टारझन दादाला पाचारण करण्यात येई. आणि तो ते आम्हाला न जमणारे काम लीलया करी. व भरपूर भाव मारी. आम्हाला त्याच्या अचाट शक्तीचे भरपूर कवतिक होते. आमच्या मते माझा मामा, एक मावसभाऊ, हा एक असे सर्व दारा सिंग च्या खालोखाल थोर पैलवान.

खाद्यप्रेमी

प्राजु's picture

9 Mar 2008 - 8:45 pm | प्राजु

करंजीत भरतात ते पुरण. ज्यात भरतात ते सारण असा अर्थ मला जवळजवळ प्रत्येक अन्नपुर्णेने सांगितला.

मी यास असहमत आहे. करंजीत भरतात ते सारणच आणि ज्यात भरतात त्याला आम्ही पारी किंवा लाटी असे म्हणतो.....आणि पुरणपोळीसाठी असते ते पुरण.... १००%.
- (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश's picture

9 Mar 2008 - 9:44 pm | स्वाती राजेश

प्राजुशी सहमत..
सारण म्हणजे कोणतेही स्टफिंग....
मग ते पोळ्यामधील असो किंवा पारी(करंज्यामधील) मधील..

पण पुरण म्हणजे... डाळ आणि गूळ यांचे शिजवून तयात केलेले मिश्रण.
मग ते पारीमधे घातले तर होतात कडबू
पोळी मधे घातले तर होते पुरणाची पोळी

सुधीर पाटील's picture

9 Mar 2008 - 11:10 pm | सुधीर पाटील

सारण म्हणजे जे सारायचे असते ते. आणि पुरण म्हणजे जे पुरक असते ते पुरण. म्हणजे वाडग्यात असते तेव्हा त्याला पुरण म्हणतात आणि मोदकात भरताना त्याला सारण म्हणतात. आता प्राजुताईंसारख्या अभिजनांनाही हे पटेलच की.

प्राजु's picture

9 Mar 2008 - 11:26 pm | प्राजु

वाडग्यात असते तेव्हा त्याला पुरण म्हणतात आणि मोदकात भरताना त्याला सारण म्हणतात

मोदकात जे भरतात ते वाडग्यात ठेवले तरी ते सारणच आणि वाडग्यातले पारित भरायचे असले तरी ते पुरणच...
कारण पुरण हा खास पदार्थ आहे. आणि सारण हे ते ज्यात भरायचे त्यावर तिखट की गोड .. अवलंबून असते. म्हणजे मोदकांत भरायचे ते गोड असते आणि मटारच्या करंजित किंवा समोस्यात भरायचे ते तिखट असते.
पुरणाला गोड -तिखट पर्याय नसतो. ते गोडच असते.
- (सर्वव्यापी)प्राजु

राजमुद्रा's picture

10 Mar 2008 - 10:49 am | राजमुद्रा

पुरणपोळीत भरतात ते पुरण आणि करंजीत भरतात सारण :)

राजमुद्रा :)

आर्य's picture

10 Mar 2008 - 11:13 am | आर्य

पुरणपोळीत भरतात ते पुरण आणि करंजीत भरतात सारण

सारण - गुळ + (ओल्या / सुक्या) खोबर्‍याचे मिश्रण (करंजी करीत / मोदका करीता)
पुरण - गुळ डाळीचे शिजवलेले मिश्रण (पुरण पोळीत / कडबु)

(खवय्या) आर्य

वरदा's picture

10 Mar 2008 - 6:05 pm | वरदा

काय चर्चा आहे...प्राजु एकदम परफेक्ट आहे गं..

चतुरंग's picture

10 Mar 2008 - 9:09 pm | चतुरंग

संच (सेट) थियरी चा आधार घेतला तर 'सारण' हा एक मोठा संच ठरेल आणि 'पुरण' हा उपसंच.
थोडक्यात - 'पुरण हे सारण सुध्दा असतंच पण सारण हे पुरण असतंच असं नाही'. (झाला की नाही मस्त गोंधळ;))

(अवांतर - सारण सारणं आणि पुरण पुरणं अशी एक कोटीही मनात आल्याशिवाय राहिली नाही:))

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Mar 2008 - 9:47 pm | llपुण्याचे पेशवेll

पुरण म्हणजे डाळ + गूळ आणि इतर. पुरण हा एक खास पदार्थ आहे.
पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या's picture

10 Mar 2008 - 9:58 pm | सृष्टीलावण्या

ज्या शिवाय ती वस्तु पूर्ण होऊ शकत नाही ते पुरण आणि जे कुठल्याही पदार्थात सारले जाऊ शकते ते सारण.

पण काय सांगावे महाराजा, एका महाराष्ट्रातल्या गावात मला असे सांगण्यात आले की पोळी म्हणजे
केवळ पुरणपोळी आणि नेहेमी खातो ती चपाती. आता बोला.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।