"कूटलिपी - एक विचार" आणि "स्याद्वादा" या लेखांवरील विवेचनातून नाडी ग्रंथांवर प्रकाश

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
1 Nov 2009 - 2:42 pm
गाभा: 

मित्र हो,
आणि श्री.हैयोहैयैयो, श्री.धनंजय यांना विशेषकरून,

मिसळपाव आंतरजालावर नाडीग्रंथांवर हेटाळणीच्या व चेष्टेच्या प्रतिक्रियांवरून वाचकांना ह्या विषयाची गंभीरता वाटत नसल्याचे लक्षात आले. म्हणून मध्यंतरी मी नाडी ग्रंथांवर विचार व्यक्त करायचे टाळत होतो. पण उपक्रम दिवाळी अंक २००९ मधील "कूटलिपी - एक विचार" या श्री. हैयोहैयैयो यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण लेखामुळे मला पुन्हा एकदा नाडीग्रंथांबद्दल विचार व्यक्त करावेसे वाटले. नाडी ग्रंथाच्या कूटलिपी बाबत याठिकाणी काही लेखन झाल्याने येथे चर्चेला ते लावत आहे.
श्री. धनंजय यांनी लिहिलेल्या स्याद्वादा वरच्या लेखाला मी प्रतिक्रिया लिहिली होती. - त्याप्रमाणे नाडीग्रंथांच्या पुर्ण अनुभवातून मिळालेल्या माहितीच्या आधाराने निष्कर्ष काढण्याची गरज मी माझ्या लेखनातून वेळोवेळी अधोरेखित करत आलो आहे. विचारवंतांनी यावर नाडी ग्रंथांची फक्त टिंगलटवाळीने दुर्लक्ष न करता विचार करावा ही नम्र विनंती मी केली होती. त्यावर विविध उदाहरणे देत शेवटी "प्रात्यक्षिकाचे सर्वतोपरी स्थान मला मान्यच आहे, याबाबतीत तुमच्याशी पुन्हा सहमती सांगतो" असे लिहून धनंजयांनी अनुभवाचे श्रेष्ठत्व हेच प्रमाण असल्याचे मान्य केले आहे.

एक अभ्यासक म्हणून धनंजय ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वांना कुतुहल आहे. त्यांनी व्यक्त केलेली वैचारिकता, विद्वत्तापूर्ण टीका- टिप्पण्या जालावरील वाचकांना आपापली मते बनवायला, तपासून पहायला आणि सार्वजनिक मत बनवायला प्रवृत्त करतात. हे सर्व विदित आहे. श्री. हैयो ह्यांच्या लेखाच्या संबंधी त्यांनी नाडी ग्रंथांच्या पट्टयांची छायाचित्रे देता आली असती तर... असे म्हणून त्यांच्याकडे तशी मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हैयोंनी माझा (ओकांचा) उल्लेख करून नाडी ग्रंथांच्या पट्ट्यांचे फोटो किंवा स्कॅन त्यांना वा अन्य कोणालाही सहजासहजी मिळवणे अवघड असल्याचे म्हटले आहे.

श्री. हैयोहैयैयो यांच्या विविध लिपिशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून नाडी ग्रंथांच्या लिपीचा, मजकुराचा शोध घेता आला तर किती बहार येईल. असे वाटून मी त्यांना विनंती करतो की मी माझ्या बाजूने जी काही शोध साहित्याची मदत करता येणे शक्य असेल ती आनंदाने करीन. त्यांनी त्या शोधसाहित्याची फोड करून त्याचा अर्थ व माहिती वाचकांना प्रस्तूत करावी.

श्री. धनंजयांना विनंती, की त्यांनी नाडी ग्रंथलेखनावर अधिक प्रकाश पाडण्यासाठी मदत करावी तसेच ह्याबाबत अधिक काय करता येईल त्यावर त्यांची अभ्यासपूर्ण मते सुचवावीत.

या जालावरील उत्साही वाचकांना नाडीग्रंथाच्या सत्यतेची तपासणी करायला मी आवाहन करतो. त्यांनी त्यांच्या नाडीग्रंथांचे वाचन करावे व त्यांच्या नाडीपट्टीचे छायाचित्र मिळवून तेही लिपीतज्ञ श्री. हैयोहैयैयो यांना सादर करावे. त्यामुळे या विषयाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल.
नाडी ग्रंथ प्रेमी - शशिकांत ओक

प्रतिक्रिया

अवलिया's picture

1 Nov 2009 - 3:31 pm | अवलिया

ओकसाहेब !
तुम्ही ज्या पद्धतीने विरोधकांना न जुमानता अंगिकारलेले कार्य करत आहात, त्या आपल्या तपस्येला सलाम !

आपल्या कार्यास ईश्वर यश देवो !!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

1 Nov 2009 - 3:32 pm | दशानन

नतमस्तक !

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

हैयो हैयैयो's picture

1 Nov 2009 - 3:50 pm | हैयो हैयैयो

मिसळपावाच्या वाचकांसाठी.

उपक्रमाच्या वाचकांस तो लेख ज्ञात असावा तथापि मिसळपावाच्या वाचकांस त्याची माहिती व्हावी म्हणून तो येथे डकवितो आहे.

धन्यवाद.

------------------------------------------------------------------------

कूटलिपी - एक विचार

हैयो हैयैयो!

१. पूर्वपीठिका

आपले मान्यवर सदस्य श्री. समित्पाणी शरद सर ह्यांनी श्री. जेम्स प्रिन्सेप ह्याच्या भारतीय लिपीसंशोधनकार्याबद्दल माहिती देणारा एक लेख लिहिला होता, त्यामध्ये 'देवानां प्रिय, प्रियदर्शिन राज्ञा लिखा' नामक प्रसिद्ध वाक्याचा एक संदर्भ आला होता, त्या लेखावर माझ्याकडूनही काही भाष्यही केले गेले होते. ह्या निमित्ताने श्री. समित्पाणी शरद सरांनी एक-दोनदा 'गुप्त लिपींवर लेख लिहा' असे मला सुचविले होते, तथापि ह्या ना त्या कारणाने ते सहजशक्य झाले नाही. भारतातील गुप्त राजांच्या कार्यकाळात प्रचलित असलेल्या 'गुप्त - कुटिल - कूट' नामक लिपींवर ही चर्चा नव्हे. मध्यंतरी उपक्रमावर झालेल्या नाडिग्रंथ चिकित्साविषयक चर्चेमुळे ह्या नाडिग्रंथातील लिपीबाबत माझी स्वत:ची जिज्ञासा जागृत होवून लिपीशास्त्राभ्यासासाठी एक जिज्ञासा म्हणून त्यातील लिपीबद्दल जो शोध घेतला त्याबद्दल एक विचार मांडणे हे ह्या लेखनाचा उद्देश आहे.

२. विविध स्त्रोत

एक जिज्ञासा म्हणून शोध घेताना नाडिपट्टींची आंतरजालावरील काही चित्रे अभ्यासिली. तेवढ्यानेच काम भागणार नव्हते, त्यामुळे काही स्नेह्यांच्या ओळखीने मुंबईतील काही नाडिवाचकांशी चर्चा करण्याचा योग आला. ही नाडिवाचक मंडळी रूढार्थाने - लौकिकार्थाने थोडी कमी शिकलेली असतात असे प्रथमदर्शनीच लक्षात आले, त्यामुळे त्यामधील लिपीसंबंधी ते स्वत: काही शास्त्रीय माहिती देवू शकतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे हे ध्यानात आले. तथापि मी स्वत: तमिळभाषकही असल्याने त्यांच्याशी सुसंवाद साधणे सुलभ झाले. अधिवक्ता ह्या नात्याने एकदा नाडिवाचकांचा विश्वास प्राप्त करून घेतल्यानंतर पुढे अनेक वेळा लिपीसंबंधी चर्चा करण्याचा योग आला. 'नाडिवाचक म्हणून कार्य करण्याआधी आम्ही स्वत: ही लिपी आणि जुनी भाषा काही वर्षे परिश्रम घेवून शिकतो' असे प्रतिपादन त्यांनी केले तेंव्हा 'नाडिपट्टींमध्ये मुळात काहीही लिहिलेलेच नसते' असा तीव्र आक्षेप मी नोंदविला. ह्यावर त्यांनीही हिरीरीने वाद केला आणि पुरावा म्हणून काही पट्टी दाखविल्या. ह्या योगाने पुढे त्यांच्याकडे अनेक पट्टी बघण्याचा आणि हाताळण्याचा योगही आला. त्याचप्रमाणे त्यांच्या मदतीने मुंबईतील इतरही काही नाडिवाचकांकडे चर्चा करण्याचा योग आला. त्या चर्चांमध्ये साधारणत: जे दृष्टीपथास आले, ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथे केलेला आहे.

३. विचाराची पद्धति आणि लिपीबाबत प्रथमदर्शनी जे लक्षात येते ते :

नाडिग्रंथ-नाडिपट्टी ह्या विषयातील लिपीबाबत अभ्यास करताना त्यातील नाडिभविष्य ह्य भागाकडे सहज दुर्लक्ष करतां येते. लिपीबाबत विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नाही. 'भविष्य' ह्या शब्दास सर्वस्वी दूर ठेवून अशा वस्तुनिष्ठ पद्धतीने केवळ लिपीचा अभ्यास करताना प्रथमदर्शनी असे लक्षात आले की ही हस्तलिखिते मुख्यत्त्वेकरून 'वट्टेळुत्तु' नामक लिपीमध्ये लिहिलेली आढळतात. 'वट्टेळुत्तु' ह्या तमिळ शब्दाचा मराठी अर्थ 'वर्तुलाकृती लेखन' असा होतो. ही लिपी म्हणजे तमिळ लिपीचेच पुरातन स्वरूप असून ती शीघ्रलेखनासाठी सुलभ आहे. ज्या 'वट्टेळुत्तु' ला मराठीभाषेत 'कूटलिपी' असे म्हटले जाते आहे, तिच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होतानाच्या ग्रंथलिपीचा प्रभाव आढळून येतो.

४. ग्रंथलिपी म्हणजे काय :

ही ग्रंथलिपि (तमिळ भाषेत: கிரந்த ௭ழுத்து) दक्षिण भारतात पुरातनकाळापासून (क्रिस्तपूर्व ६०० पासून) विविध रूपांत प्रचलित असलेली अशी एक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण लिपी आहे. सामान्यत: हिची उत्पत्ती ब्राह्मी लिपीपासून झाली असल्याचे विद्वानांचे सर्वमान्य मत आहे. आधुनिक काळातील सर्व दक्षिण भारतीय भाषांच्या स्वतंत्र लिपींवर तसेच सिंहल लिपी, पल्लव लिपी, मोन लिपि, जावा लिपी, ख्मेर लिपी ह्या आणि अशा अनेक लिपींवर ह्या ग्रंथलिपीचा बराच सखोल प्रभाव दिसून येतो. ह्या अनेक लिपींचा उगम हा ग्रंथलिपीमध्येच आहे असेही लिपीशास्त्राभ्यासकांचे सर्वमान्य मत आहे.

५. ग्रंथलिपीचा उपयोग काय कारणाकरिता झाला आणि तिच्या भिन्न रुपांचा विचार :

दक्षिण भारतामध्ये संस्कृत भाषेतील साहित्यलेखन करण्यासाठी देवनगारी लिपीचा उपयोग होण्यापूर्वी ग्रंथलिपीचा उपयोग होत असे. दक्षिण आशियाई तमिळभाषी क्षेत्रांमध्ये जवळजवळ १९ व्या शतकापर्यंत संस्कृत भाषेत साहित्यलेखन करण्यासाठी ग्रंथलिपीचा उपयोग होत आलेला आहे. उदाहरणार्थ : श्रीमद्भगवद्गीतेचे तमिळभाषेतील संस्करण - ह्यात संस्कृत श्लोक ग्रंथलिपीत आढळतील, तर त्यांचे तमिळभाषेतील निरूपण तमिळ लिपीमध्ये आढळेल. असे दोन लिपींमध्ये मुद्रित केलेले ग्रंथ प्रस्तुत लेखकाच्या पाहाण्यात आलेले आहेत.

इंग्रज अभ्यासकांनी मुद्रणकार्यासाठी म्हणून ग्रंथलिपीचे छाप सिद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, परंतु असे करताना त्यांनी केलेल्या छापास एक प्रकारचे प्रामाण्य येवून तिची इतर काही प्रचलित रूपे सामान्यजनांच्या विस्मृतीमध्ये गेली. ग्रंथलिपीची भिन्नभिन्न अशी काही रूपे आहेत. ही भिन्नरूपे साधारणत: दोन मुख्य वर्गांमध्ये वर्गीकृत करण्यात आलेली आहेत.

आकृती:

सुदैवाने ह्यापैकी अनेक रूपे आपणास दक्षिणभारतातील मंदिरांमध्ये भित्तीलेखनाच्या स्वरूपात आजही आढळतात. मैसूरु विश्वविद्यानिलय प्राच्यविद्यासंशोधनालयाने ग्रंथलिपीवर बरेच संशोधन केलेले आहे. प्राच्यविद्यासंशोधनालयाने काही दशकांपूर्वी ग्रंथलिपीचा विकास होतानाची जी अनेक रूपे आहेत तिचा एक तौलनिकदृष्ट्या अभ्यास विस्तृत निबंधरूपाने उपलब्ध करून दिला होता. ही सारी रूपे प्रथमदर्शनी एकमेकांपासून भिन्न जरी दिसत असली, तरीही सर्वसामान्यपणे ह्यास ग्रंथलिपी हेच संबोधन आहे. (जसे देवनागरी लिपीचीही विकसनकालातील अनेक विविध रूपे असूनदेखील सर्वसामान्यपणे त्यांना 'देवनागरी लिपी' असेच वर्गीकृत केले जाते.)

६. नाडीपट्टींमध्ये आढळणारी लेखनशैली :

नाडीपट्टींमध्ये आढळणारी ग्रंथलिपीची स्वत:ची विशिष्ट अशी एक शैली आहे. मूळ ग्रंथलिपी ही देवनागरी लिपीप्रमाणे तीन मजली लिपी आहे, तर नाडीपट्टीमध्ये ती दोन मजली असल्याचे आढळते. ह्याचे कारण शीघ्रलेखन सुलभ व्हावे असे आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शीघ्रगतीने लेखन करणे सुलभ व्हावे म्हणून बाळबोध लिपीची अक्षरे हात न उचलता लिहिली जात असत (मोडी लिपी) त्याचप्रमाणे नाडिपट्टींमधील लेखन शीघ्रगतीने व्हावे याकरिता हात न उचलता ग्रंथ लिपीत लिहिण्याची शैली विकसीत केली गेली आहे. असे करत असताना मात्र मूळ ग्रंथलिपीचे आघात (स्ट्रोक्स) हे थोडेअधिक प्रमाणात बदलले जातात, त्यामुळे सामान्य अभ्यासकास ही लिपी प्रथमदर्शनी ग्रंथलिपी न वाटण्याचा संभव आहे. हात न उचलता लिहिण्याच्या शैलीमुळे ही लिपी थोडी दुर्बोध होते. अभ्यासकास ही लिपी ग्रंथलिपी न वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रंथलिपीचे प्रमाणीकरण होण्यापूर्वीची भिन्नरूपे जी त्यांच्याशी परिचय नसणे हे होय.

ह्या प्रकारची लिपी केवळ नाडीपट्टींमध्येच आढळत नसून इतरत्रही आढळते. प्रस्तुत लेखकाच्या पाहाण्यात हितोपदेश, सिद्धऔषधयोजना इ.इ. ग्रंथांची ग्रंथलिपीमध्ये लेखन केलेली हस्तलिखिते आलेली आहेत, त्यातही अशाच प्रकारच्या लिपीचा उपयोग केला गेल्याचे दिसते. महाराष्ट्रातील श्री. एल. एस. वाकणकर तथा श्री. ए. बी. वालावलकर इत्यादि लिपीशास्त्राभ्यासकांनीही अशा हस्तलिखितांचा अभ्यास केल्याचे लिहून ठेवले आहे. 'शीघ्रलेखन सुलभ व्हावे ह्यासाठी लिपीमध्ये बदल करण्यात येतात' हे त्यांचे विस्तृत अभ्यासांतीचे मत आहे, आणि लिपीशास्त्राभ्यासकांचे अशा लेखनाबाबतीत हेच प्रतिपादन असते.

७. हस्ताक्षरवाचनकौशल्य :

नाडिग्रंथ हे हस्तलिखित स्वरूपात असल्याकारणाने अभ्यासकाचे केवळ लिपीचा अभ्यास असून भागणार नाही तर विविध प्रकारची हस्ताक्षरे वाचनाचा सराव असणे आवश्यक आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे शीघ्रलेखनात लिपीचे आघात (स्ट्रोक्स) हे थोडेअधिक प्रमाणात बदलले जातात, ते बदलले जाण्यास शीघ्रगतीने केलेले लेखन हे एक प्राथमिक कारण असून दुसरे कारण म्हणजे असे लेखन हे विविध व्यक्तिंकडून केले गेलेले असणे हे होय. व्यक्तिगणिक आघात बदलतांत आणि त्यामुळे बारकाईने वाचन करणे हे अक्षरे लागण्यासाठी आवश्यक ठरते. महाराष्ट्रीय वाचकांस हा विचार उमगणे कठिण खचितच नसावे, ह्याचे कारण असे की महाराष्ट्रात मोडी लिपीचा अभ्यास असणारे अनेक अभ्यासक आहेत, आणि ह्याबाबतीत त्यांचे मतही हेच आहे. ह्या प्रकारचे लेखन वाचण्यासाठी प्रथमदर्शनी दुर्बोध जरी वाटत असले तरी ते वाचणे अशक्यप्राय निश्चितच नसते.

८. कूटलिपी कां म्हणतांत? शब्दार्थ :

असे असतांना हिला सरळसरळ ग्रंथलिपी न म्हणतां कूटलिपी कां म्हणतांत? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रथम 'कूटलिपी' ह्या शब्दाचा अर्थ काय हे जाणून घेणे आवश्यक ठरते. ह्या लिपीला 'कूटलिपी' असे मराठीभाषेमध्ये संबोधिले जाते आहे. (नाडिवाचक स्वत: त्याला कूट्टेळुत्तु असेही म्हणतात) मराठी शब्दाचा विचार करता एक गोष्ट अशी लक्षात येते की मराठीभाषेमध्ये 'कूट' म्हणजे चूर्ण किंवा कोडे किंवा संकेत. ह्यावरून कूटलिपी म्हणजे सांकेतिक लिपी असा विचित्रार्थ मराठीभाषेमध्ये लावला जातो आहे. परंतु ही लिपी सांकेतिक नक्कीच नाही. आपल्या येथील एका अ-तमिळ सदस्यालाही ह्या लिपीतील अक्षरे विशेष कष्ट न घेता वाचता आलेली आहेत. तरीही ही लिपी कूट (सांकेतिक) असावी काय?

९. कूट्टेळुत्तु आणि युक्ताक्षरे ही संकल्पना :

हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 'कूट्टेळुत्तु' ह्या शब्दाचा अर्थ जाणावा लागेल. ह्यासाठी लिपीशास्त्रातील 'युक्ताक्षर' ह्या संकल्पनेची उजळणी करावी. 'युक्ताक्षर' हा संस्कृतभाषी शब्द आहे. मराठीभाषेमध्ये ह्या शब्दास 'जोडाक्षर' म्हणतात. देवनागरी लिपी आणि इतर तीसदृश लिपींमध्ये अक्षरे एकास एक जोडून लिहिली गेली म्हणजे त्या अक्षरांतून नवीन युक्तचिह्नाक्षरे सिद्ध होतात. ही युक्तचिह्नाक्षरे बरीचशी मूळ अक्षरासारखी दिसणारी परंतु मूळ अक्षरापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी असतात. ह्या अक्षरांनाच सामान्यपणे युक्ताक्षरे असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ: श्री = श् + र् + ई = असे न लिहिता, 'श्री' असे लिहिले जाते. 'श्री' हे युक्ताक्षर होय. लिपीशास्त्राभ्यासकांचे एक आवडते उदाहरण द्यावयाचे झाल्यास, संस्कृत शब्द 'कार्त्स्न्यम्' ह्याची रचना क् + आ + र् + त् + स् + न् + य् + अ + म् अशी असून, तो 'का र्त्स्न्य म्' असा लिहिला जातो. ह्यात 'र्त्स्न्य' हे युक्ताक्षर आहे.

१०. नाडीग्रंथांच्या संदर्भातील युक्ताक्षर ह्या संकल्पनेचे स्थान काय? :

नाडिग्रंथ-नाडिपट्टी आणि नाडिभविष्य ह्या सर्व विषयाच्या संदर्भात युक्ताक्षरांची संकल्पना कशासाठी सांगितली जाते आहे? कारण नाडिग्रंथामध्ये जे तथाकथित भविष्यकथन लिखितस्वरूपामध्ये उपलब्ध आहे असे सांगितले जाते, ते तर तमिळभाषेमध्ये आहे. आणि तमिळभाषेमध्ये युक्ताक्षरांची संकल्पना ही अस्तित्त्वातच नाही! तमिळ लिपीमध्ये अक्षरे एकास एक जोडून लिहिली जातच नाहीत, त्यामुळे युक्तचिह्नाक्षरे - थोडक्यात युक्ताक्षरे - सिद्ध होत नाहीत.

उदाहरण: वर दिलेला 'कार्त्स्न्यम्' हाच शब्द तमिळ लिपीमध्ये लिहायचा झाल्यास க் + ஆ + ர் + த் + ஸ் + ன் + ய் + அ + ம் (क् + आ + र् + त् + स् + न् + य् + अ + म्) अशी फोड असली तरीही तो கார்த்ஸ்ன்யம் असाच लिहिला जाईल. ह्याचे कारण असे, की आधुनिक तमिळ लिपीमध्ये युक्ताक्षरांची संकल्पना ही अस्तित्त्वातच नाही. अक्षरे एकास एक जोडून लिहिली न जाता, एकासमोर एक लिहिली जातात. ज्या अक्षरांचा हलन्त उच्चार असेल, त्यांच्या डोक्यावर 'पुळ्ळि' (बिन्दु) देऊन त्यांचे अपूर्णत्त्व स्पष्ट केले जाते.

ह्याच युक्ताक्षरांना तमिळभाषेत 'कूट्टेळुत्तु' असे म्हणतांत. ह्या शब्दात 'कूड' आणि 'एळुत्तल' असे धातु आहेत. 'कूड' म्हणजे 'सह' तर 'कूट्टम' म्हणजे 'संघ'. 'एळुत्तल' म्हणजे 'लेखन' किंवा 'लिहिणे'. कूडऽ एळुदिनदु ஃ कूट्टेळुत्तु = एकत्रितरीतिने लिहिणे / सोबत लिहिणे / एकसारखे लिहिणे असा एकूण अर्थ आहे.

परंतु मुळात तमिळ लिपीमध्ये जोडाक्षरेच नसताना, 'कूट्टेळुत्तु' हा शब्द नाडीग्रंथांच्या लेखनाबाबत काय म्हणून उपयोजिला जातो आहे? ते लेखनदेखील ग्रंथलिपीमध्ये आहे, तर ह्या सर्व विषयाच्या संदर्भात युक्ताक्षरांची संकल्पना कशासाठी सांगितली जाते आहे? ह्याचे कारण असे की कूट्टेळुत्तु ह्या शब्दाचा 'जोडाक्षरे' असा एकमेव अर्थ नसून एकत्रितरीतिने लिहिणे / सोबत लिहिणे / एकसारखे लिहिणे असाही अर्थ होतो. नाडीग्रंथांच्या लेखनाबाबतीत बोलावयाचे झाल्यास ह्यातील ग्रंथलिपी ही बरीचशी मोडी लिपीसारखी हात न उचलता लिहिण्याच्या शैलीमध्ये (पक्षी : एकत्रितरीतिने, सोबत लिहिलेली, एकसारखी अशी) असल्यामुळे 'कूट्टेळुत्तु' असा शब्द तिच्याबाबतीत उपयोजिला जातो. ती लिपी सांकेतिक आहे म्हणून नव्हे!

११. तात्पर्य :

'कूडऽ एळुदिनदु' म्हणजे एकत्रितरीतिने लिहिले गेलेले असे हे लेखन. हे लेखन ग्रंथलिपीमध्ये 'ग्रथित' करून ठेवलेले असते, म्हणून ग्रंथ हा शब्द : नाडिग्रंथ.

१२. पुढील संशोधनाची आवश्यकता :

नाडिग्रंथ-नाडिपट्टीआधारे भविष्यकथन करण्याच्या प्रकारामध्ये "जातकाकडूनच विविध मार्गांनी माहिती काढून, आपण सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेऊन, तीच आपणाला प्राचीन ताडपट्टीतून सांगत असल्याचा बहाणा करण्यात येतो" असा एक संशय नेहमी घेतला जातो. ह्या संशयाचे निराकरण करण्याकरता लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे, जेणेकरून सत्यता काय आहे हे स्पष्ट होऊन निष्कर्षास येता येईल.

खरे पाहता हा सारा विषय समाजाशी संबंधीत असल्याकारणे ह्या विषयावर केवळ वैयक्तिक जिज्ञासापूर्तीसाठी अथवा वैयक्तिक चिकित्सापूर्तीसाठी अभ्यास न होता शास्त्रीय दृष्टीकोनातून अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. परंतु आपल्याकडील अनेक तथाकथित पुरोगामी लोकांचा उत्साह त्यातील 'ज्योतिष' किंवा 'भविष्य' हे शब्द ऐकूनच ढेपाळतो आणि केवळ ह्या अभ्यासाच्या अभावामुळे विषयाकडे दुर्लक्ष होते आहे.

हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.

लेखक मुंबई उच्च न्यायालय येथे अभ्यसनक अधिवक्ता म्हणून कार्यरत. न्यायशास्त्राभ्यासक. समाजशास्त्राभ्यासाची आवड. वैद्यकीय न्यायशास्त्राची आवड. भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांमधील एक 'समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणे' ह्याही तत्त्वाचा खंदा समर्थक. विविध भाषांचे भाषाशास्त्र तथा लिपीशास्त्रावर २० वर्षांचा अभ्यास. डिसेंबर २००९ मध्ये तुळुभाषेसाठी स्वनिर्मित नवी लिपी सादर करणार. द्राविडभाषाकुलातील भाषांच्या व्याकरणाचा मुळातून अभ्यास. मराठीभाषेच्या व्याकरणाचाही अभ्यास. श्री. विश्वनाथ खैरे ह्यांनी मांडलेल्या संमत सिद्धांताचा पुरस्कर्ता. स्वतःच्या आवडीच्या विषयांवर तमिळ - इंग्रजी इत्यादि भाषांमधून लेखन. भविष्यकालात मराठीभाषेतून लेखन करण्याची इच्छा.

हैयो हैयैयो!

प्रकाश घाटपांडे's picture

1 Nov 2009 - 9:42 pm | प्रकाश घाटपांडे

या जालावरील उत्साही वाचकांना नाडीग्रंथाच्या सत्यतेची तपासणी करायला मी आवाहन करतो. त्यांनी त्यांच्या नाडीग्रंथांचे वाचन करावे व त्यांच्या नाडीपट्टीचे छायाचित्र मिळवून तेही लिपीतज्ञ श्री. हैयोहैयैयो यांना सादर करावे. त्यामुळे या विषयाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल.

चांगली कल्पना आहे. शुभेच्छा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

उपक्रम दिवाळी अंकातल्या लेखात जो प्रतिसाद झाला त्यात मी अशी काही भूमिका सांगितली.

(संभवनीयतेच्या) गणितापूर्वीसुद्धा "प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द" या प्रमाणांचा तरतमभाव आणि उपयोग हा नैयायिकांनी चर्चिलाच आहे. प्रत्यक्ष आपोआप जाणवले, तर प्रत्यक्षच ग्राह्य आहे. पण प्रत्येक प्रत्यक्ष अनुभवणे शक्यच नाही. आप्ताच्या शब्दाबद्दल संदेह असला, तर उपमान शोधावे, ते उजवे. उपमानाबद्दल संदेह असला तर अनुमान शोधावे, ते अधिक उच्च प्रमाण. अनुमानाबद्दल संदेह असला तर प्रत्यक्ष शोधावे, ते सर्वोच्च प्रमाण.

...

माझे आयुष्य मर्यादित आहे. फारफार जगलो तर शंभरएक वर्षे जगेन, कदाचित हे वाक्य टंकता-टंकताच मरण पावेन. या मर्यादित आयुष्यात प्रात्यक्षिके घेण्यासारख्या कित्येक विलक्षण गोष्टी आहेत. या प्रचंड विलक्षणांच्या यादीत "नाडीग्रंथ किती जागेत किती मावतात त्याचे प्रात्यक्षिक" याचे प्रात्यक्षिक घेण्यास आद्यक्रम द्यायला तुम्ही मला का सांगत आहात? त्यासाठी तुम्ही जो काही युक्तिवाद कराल त्यालाच नैयायिक "संदेह" म्हणतील. आणि तसा काही पटण्यासारखा संदेह दिलात तरच जैन विचारवंतही उंट खाण्याचे प्रात्यक्षिक करतील, असे वाटते.
.
सारांश : (संदेह असल्यास, उपयुक्ततेच्या आद्यक्रमाने) प्रात्यक्षिकाचे सर्वतोपरी स्थान मला मान्यच आहे, याबाबतीत तुमच्याशी पुन्हा सहमती सांगतो.

यात ठळक ठशात दिलेल्या वाक्यामधून संशोधनासाठी काही दिशा मिळू शकेल.
१. संदेह पटण्यासारखा करणारे संशोधन
२. उपयुक्तता आहे, आणि आद्यक्रमाने आहे, असे पटवणारे संशोधन

संदेह :
सध्या माझ्या मते संदेह बलवान नाही.
एकीकडे शब्द, उपमान, आणि अनुमान आहेत. तर दुसरीकडे शब्द आहेत.

प्रमाणाचा प्रकार
नाडीभविष्याच्या बाजूने
नाडीभविष्याच्या विरुद्ध

शब्द
नाडीकेंद्रात चमत्कार अनुभवलेल्यांची साक्ष. तुल्यबल.
नाडीकेंद्रात फसवले गेलो म्हणणार्‍यांची साक्ष. तुल्यबल.

उपमान
जगात कितीतरी विलक्षण गोष्टी आपण प्रत्येकाने अनुभवल्या आहेत, तशी हीसुद्धा विलक्षण गोष्ट आहे. हे उपमान फारच सर्वसमावेशक असल्यामुळे, अन्य विलक्षण गोष्टींपैकी या उदाहरणालाच का लागू आहे, ते सामांतर्य भावत नाही. म्हणून प्रमाण तुलनेने कमजोर पडते.
आपल्याला भविष्याबद्दल काळजी-कुतूहल असताना कोणी (वेगळ्या प्रणालीने) आपल्याला पोकळ दिलासा दिल्याचा, पैसे घेतल्याचा आपला अनुभव. या उपमानाचे "भविष्य सांगणारे" हे सामांतर्य अधिक पटण्यासारखे आहे. म्हणून प्रमाण तुलनेने बलवान होते.

अनुमान
(या बाजूने अनुमान-प्रमाण नाही. म्हणून पारडे येथे रिकामे आहे.)
या बाजूने "इमारतीत पट्ट्या मावू शकत नाहीत" वगैरे अनेक अनुमाने आहेत.

प्रत्यक्ष
माझ्यासाठी नाही. पारडे जड-हलके ठरवण्याचा प्रश्नच नाही.
माझ्यासाठी नाही. पारडे जड-हलके ठरवण्याचा प्रश्नच नाही.

प्रात्यक्षिक घेण्यास कोणी उद्युक्त व्हावे म्हणून उपमानाची आणि अनुमानाची पारडी अधिक भारी करण्याच्या दिशेने संशोधन करावे. शब्दाचेही पटवण्याचे सामर्थ्य वाढू शकते. पट्टीवाचकांच्या पारंपरिक कथेनुसार (इतिहासानुसार) पट्ट्यांमधील माहिती अगस्त्य-भृगु वगैरे ऋषींनी त्रिकालज्ञानाने जाणला. अन्य पुराणांच्या-साहित्याच्या अनुसार हे ऋषी कमीतकमी २०००-३००० वर्षांपूर्वीचे होते. ओकसाहेबांनी मागे कार्बन-डेटिंगबद्दल सांगितले होते, असे अंधुक स्मरते. त्यात पट्ट्यांचे वर ५००-६०० वर्षे होते, असे काही अंधुक स्मरते. असे कधी कोणी सांगितले नसल्यास हे केवळ भावी संशोधनाचे उदाहरण मानावे... असे काही असल्यास पट्टीवाचकांच्या पारंपरिक कथेची सांगड अन्य ऐतिहासिक-पौराणिक शब्दांशी बसत नाही. असे काही असल्यास नाडीवाचकांच्या शब्दाचे पारडे हलके होऊ लागते. जर संशोधन करून असे दाखवले, की पट्ट्यांचे लेखनिक ५००-६०० वर्षांपूर्वीचे कोणी होते, आणि हजारो वर्षे प्राचीन ऋषींशी त्यांचा ऐतिहासिक संबंध काय त्याचे संशोधन केले, तर त्या पारंपरिक कथेचे पारडे भारी होऊ लागेल. वगैरे.

उपयुक्तता :
नाडी या विशेष प्रकाराने भविष्य जाणून उपयुक्तता आहे, असे दाखवणे. म्हणजे आर्थिक, शारिरिक, मानसिक, मनःशांतीविषयक, जो काय फायदा आहे तो स्पष्ट करणे. ही उपयुक्तता इतक्या प्रमाणात आहे, की नाडी-भविष्याच्या प्रात्यक्षिकाचा क्रमांक अन्य अनुभवांच्या यादीत पुढे आणण्यास व्यक्ती उद्युक्त होईल. सध्या अशा प्रकारची अद्यक्रमातली उपयुक्तता माझ्यासाठी स्पष्टपणे दिसत नाही. सध्या जी काय उपयुक्तता सांगितली आहे, त्यामुळे हे प्रात्यक्षिक क्रमाने खूपच खाली आहे. त्यामुळे अर्थातच मी आधी पर्यटन करेन, गिरिभ्रमण करेन, संतसाहित्य वाचेन... अशा सर्व गोष्टी करता-करता, या आयुष्यात नाडीभविष्याचे प्रात्यक्षिक करायची वेळ माझ्यासाठी बहुधा येणार नाही.

सारांश : संशोधनाच्या अनेक दिशांपैकी संभवनीय दोन दिशा वर सांगितल्या आहेत. (१) शब्द-उपमान-अनुमान या प्रमाणांनी संदेह बलवान करून पटवावा, जेणेकरून प्रात्यक्षिक घेण्यास भूमी तयार होईल. (२) उपयुक्ततेचा आद्यक्रम अव्वल आहे, असे पटवणारे काही संशोधन करावे.

- - -

या चर्चेतून तुम्हाला जर संशोधनासाठी दिशा मिळाली तर आनंदच आहे. शुभेच्छा.

हैयो हैयैयो's picture

2 Nov 2009 - 3:29 pm | हैयो हैयैयो

मुद्दे.

श्री. धनंजय,

नमस्कार. श्री. ओक आणि आपण स्वतः ह्या दोघांमधील चर्चेशी माझा स्वतःचा काही संबंध नाही, तरीही मूळ लेखांत माझा उल्लेख आलेला असल्यामुळे, तथा ह्यापूर्वी ह्या विषयावर आपली-माझी थोडी चर्चा झालेली असल्याकारणाने थोडेसे धैर्य करून लिहितो आहे.

आत्तापर्यंत न्यायशास्त्रातील आपणांस उमगलेले "प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द" हें तत्त्व तेवढेच आपण चर्चिता आहात. नैयायिकांनी ह्याबाबतीत आणखी एका तत्त्वाची चर्चा केलेली आहे तीही आपणांस ठावूक असेल असे गृहित धरून मी त्याची आपणांस सोप्या शब्दांत आठवण करून देवू इच्छितो. "प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द" हें तत्त्व बरोबरच आहे ह्यात शंका नाही. परंतु येथे उद्भविलेल्या प्रसंगामध्ये हे तत्त्व थोडे वेगळ्या रीतीने लागू होते. मी अभ्यासिलेल्या काही टीकांअनुसार कोणताही वितर्क हा एकास एक ह्या पद्धतीने व्हावा. उदा. प्रत्यक्ष अनुभव विरुद्ध प्रत्यक्ष अनुभव असा वितर्क व्हावयास हवा. प्रत्यक्ष अनुभव विरुद्ध अनुमान असा वितर्क होत असेल तर त्या वितर्कास कणमात्र दिशा नाही. असा वितर्क मुळांतूनच अर्धवट आहे, आणि त्यामुळे अभ्यासाकरिता एकार्थाने सर्वथा त्याज्यच आहे. प्रत्यक्षानुभवासमोर अनुमानादि इतर तत्त्वे ही केवळ फुसकी ठरू शकतांत. ह्यामुळे, प्रत्यक्षाबाबत काही वाद निर्माण होत असेल तर तो वाद निष्कारणच वाढविण्यापेक्षा प्रात्यक्षिक करणे अधिक सोपे असते असे आधुनिक न्यायशास्त्र सांगते. त्यातून वादी-प्रतिवादी दोन्ही पक्षांचे शब्द आणि समय वाचविणे आणि तरीही वादामध्ये योग्य त्या मार्गाने प्रगती करणे हे अपेक्षित असते. आपणांसाठीही शाब्दिक वादापेक्षा प्रात्यक्षिक सोपे ठरू शकेल असे मला व्यक्तीशः वाटते.

त्यातही मला असे वाटते की आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे श्री. ओक ह्यांचे आग्रही प्रतिपादन नसावे. मी नाडी ग्रंथांचा अनुभव घेणार नाही, घेण्याची गरजही नाही कारण माझा सैद्धांतिक तर्कांवर पुर्ण विश्वास आहे. असे म्हणणार्‍यांनी आता तरी पुनर्विचार करावा. असे त्यांनी आपल्या स्याद्वादावरील लेखाखालील प्रतिसादात म्हटले आहे. तरीही आपण स्वतः प्रत्यक्षानुभवाचा मुद्दा चर्चेत आणिता आहात. असे करतांना आपल्या सुप्तमनांत 'विलक्षण' नाडिग्रंथांच्या बाबतीत 'विलक्षण उत्सुकता' असेल कदाचित् - ती दिसते. (असणारच, त्याशिवाय आपण श्री. ओक ह्यांच्या लेखास थेट प्रतिसाद लिहिला नसता! हे घडतांना मी तरी प्रथमच पाहतो आहे!) परंतु पुढे 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करतां, आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करतां. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती असे राहून-राहून वाटते. चूकभूल देणेघेणे. श्री. ओक ह्यांनी म्हटल्याप्रमाणे एक अभ्यासक म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचे सर्वांना कुतूहल आहे. आपण व्यक्त केलेली वैचारिकता, विद्वत्तापूर्ण टीका - टिप्पण्या जालावरील वाचकांना आपापली मते बनवायला, तपासून पहायला आणि सार्वजनिक मत बनवायला प्रवृत्त करतात, इत्यादि इत्यादि सर्वविदित आहे. असे असतांना - केवळ 'भविष्य' ह्या शब्दामुळे - एक अभ्यासक म्हणून आपण इतके चाचरत असाल, तर अभ्यासकांच्याबाबतीत केल्या जाणार्‍या 'वैचारिकता, विद्वत्ता' ह्या शब्दप्रयोगांस काही विशेष महत्त्व नाही असे माझे प्रांजल मत आहे. तसेही काय, लोकशाहीत सगळेच वैचारिक आणि सारेच विद्वान! असो.

---

काही विज्ञाननिष्ठ अभ्यासकांची हीच गोची होत असते. मला काही महिन्यांपूर्वी आलेल्या एका निरोपात येथील एका अनामिक विज्ञाननिष्ठ अभ्यासकाने स्वतः नाडिज्योतिषाचा प्रत्यक्षानुभव घेतल्याचे साद्यंत कळवून, मी नाडिज्योतिषावर विश्वास ठेवत नाही असे publicly maintain करणार कारण मी विज्ञाननिष्ठ असून मला माझ्या भूमिकेमध्ये बदल करणे योग्य वाटत नाही - माझी आजपर्यंतची भूमिका तीच होती' असे कळवले होते.

खरे पाहता विज्ञाननिष्ठांनी असे घाबरून, 'काही निष्कर्ष जनतेसमोर मांडता येत नाहीत कारण ते अवैज्ञानिक निष्कर्ष आहेत' असे म्हटल्यास विज्ञानाची प्रगती कदापि होणार नाही. ह्याउलट, अशा निष्कर्षांमध्ये काही विज्ञान आहे काय, असल्यास ते काय ते शोधून काढता येवू शकते.

---

असो. आपण सुज्ञ आहातच. एक अभ्यासक म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचे सर्वांना कुतूहल आहे. आपण व्यक्त केलेली वैचारिकता, विद्वत्तापूर्ण टीका - टिप्पण्या जालावरील वाचकांना आपापली मते बनवायला, तपासून पहायला आणि सार्वजनिक मत बनवायला प्रवृत्त करतात, इत्यादि इत्यादि सर्वविदित आहे. आपण हा शोध घेवून आपले निष्कर्ष उपलब्ध करून दिलेत तर दूरदूरच्या लोकांना वैज्ञानिक दृष्टीने हे ग्रंथ बघता येतील. आपल्या कष्टाचा हा गैरफायदा नाही, तर लोक आपणांस मनःपूर्वक आभारच देतील. मी काय, निव्वळ, विज्ञानावर श्रद्धा असणारा एक साधारण अधिवक्ता आहे. भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांमधील एक तत्त्व 'समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणे' त्याचा खंदा समर्थक असल्याकारणे, विज्ञानाच्या प्रगतीसाठी जेथे योग्य वाटले तेथेच बोलणार.

("अमुक एक पट्टीग्रंथातील मजकूर हा भविष्यनियोजनासाठी असल्याने अभ्यासास उपयोगी नाही" असे एकाद्याने म्हटल्यामुळे इतर विज्ञानाभ्यासकांचे काही बिघडू नये.)

धन्यवाद.
--

श्री. ओक सर, नमस्कार. आपण मला haiyohaiyaiyo@gmail.com येथे लिहू शकता. माझ्या लिपिशास्त्राभ्यासाचा उपयोग माझ्या समाजशास्त्राभ्यासासाठी तसेच समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करण्यासाठी पूरक ठरू शकणार असेल, तर तो तसा करण्यात मला स्वतःला आनंदच आहे.

धन्यवाद.

तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

श्री. हैयो हैयैयो यांनी एक विचारार्ह मुद्दा समोर आणला आहे :
> आपल्या सुप्तमनांत 'विलक्षण' नाडिग्रंथांच्या बाबतीत
> 'विलक्षण उत्सुकता' असेल कदाचित् - ती दिसते.
> (असणारच, त्याशिवाय आपण श्री. ओक ह्यांच्या लेखास
> थेट प्रतिसाद लिहिला नसता! हे घडतांना मी तरी प्रथमच
> पाहतो आहे!)

(१) माझी "विलक्षण उत्सूकता" ही केवळ "कुठल्याही प्रमेयांसाठी सामान्यपणे प्रमाणे काय असावीत?" या विषयाबद्दल आहे. जगातील असंख्य प्रमेयांच्या बाबतीत हे एक उदाहरण आहे. तितपतच कुतूहल.

(२) वरील लेखात त्याबद्दल माझे विचार सांगण्यास येथे नावानिशी विनंती केली आहे. एक मनुष्य म्हणून जर कोणी माझ्याशी संवाद साधू बघितले, तर जितपत वेळ आहे, तितपत मी संवाद साधला पाहिजे. हीच तुमची-माझी समाजप्रियता आहे. हा उपप्रतिसादही नावानिशी काही विचारल्यामुळे आहे.

- - -
परंतु जर माझ्या प्रतिसादातून या विवक्षित प्रमेयाबद्दल मला विलक्षण कुतूहल आहे, असा गैरसमज झाला असेल, तर दिलगीर आहे. माझ्या प्रतिसादाची लांबी बघता, तसा गैरसमज होणे शक्य आहे, हे मला पटू लागले आहे. (माझ्या मते प्रतिसादात मी सामान्य तत्त्वे सांगत होतो, आणि ती विशेष परिस्थितीत लागू करून दाखवत होतो, म्हणून प्रतिसाद लांब होता, हे स्पष्टीकरण.) तसा गैरसमज बळावू नये म्हणून या विषयावर पुन्हा प्रतिसाद मी देणार नाही. माझ्यापाशी उपलब्ध वेळ संपला आहे.

हैयो हैयैयो's picture

2 Nov 2009 - 11:18 pm | हैयो हैयैयो

विचारार्ह मुद्दा.

श्री. धनंजय, नमस्कार.

मला लिहिलेल्या खरडीत ज्या मुद्द्यास आपण 'काहीतरीच' असे संबोधले आहे, तोच मुद्दा 'विचारार्ह' असल्याचे येथे सांगताहात; की माझा काही भिन्न समज होतो आहे?

तिथे मला आलेली आपली पूर्ण खरड खालीलप्रमाणे:

लेखक: धनंजय, सोम, 11/02/2009 - 11:43
काहीतरीच.

>>> आपल्या सुप्तमनांत 'विलक्षण' नाडिग्रंथांच्या बाबतीत 'विलक्षण उत्सुकता' असेल कदाचित् - ती दिसते. (असणारच, त्याशिवाय आपण श्री. ओक ह्यांच्या लेखास थेट प्रतिसाद लिहिला नसता! हे घडतांना मी तरी प्रथमच पाहतो आहे!) <<<

एक मनुष्य म्हणून जर कोणी माझ्याशी संवाद साधू बघितले, तर जितपत वेळ आहे, तितपत मी संवाद साधला पाहिजे. हीच तुमची-माझी माणूसकी आणि समाजप्रियता आहे. आणि येथे तर नावानिशी मला प्रतिसाद द्यायची विनंती केली आहे.

पण तुम्ही म्हणता तेही विचारार्ह आहे. माझ्याकडे वेळ संपल्यामुळे या विषयावर पुन्हा प्रतिसाद द्यायच्या भानगडीत मी पडणार नाही.

» प्रतिसाद द्या | काढून टाका

ती खरड येथील आपल्या प्रतिसादापेक्षा थोडी भिन्न असल्याने माझ्या समजूतीत काही चूक होत असावी. माझ्या खरडवहीत आणि येथे, दोन्हीकडेही लिहितांना लेखनामागील आपले संदर्भ एकच असावेत असे मला वाटते. त्यामुळे आपल्या खरडीचा मी केलेला अर्थ असा: पूर्वी माझ्या विस्तृत प्रतिसादात मी नोंदविलेला (येथे थोडक्यात) "वादी-प्रतिवादी इत्यादि दोन्ही पक्षांचे शब्द आणि समय वाचविणे आणि तरीही वादामध्ये योग्य त्या मार्गाने प्रगती करणे ह्यासाठी "प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द" हें तत्त्व लागू करण्याची रीति: 'कोणताही वितर्क हा एकास एक ह्या पद्धतीने व्हावा' अशी असावी" हा मुद्दा विचारार्ह असल्याचे आपणांस म्हणावयाचे आहे.

असो. आपण नैयायिकांनी चर्चिलेली प्रमाणे त्यांचा उल्लेख केला, त्यांचा एक अभ्यासक ह्याकारणाने मला आवश्यक वाटले ते मुद्दे मी सुचविले. बाकी 'उपलब्ध वेळ' ह्या बहाण्याबाबत अधिक काही टिप्पणी करू इच्छित नाही. वेळ घेतल्याबद्दल क्षमस्व.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

विसोबा खेचर's picture

7 Nov 2009 - 1:32 pm | विसोबा खेचर

ए धन्या, मेल्या तुला रे काय कळतंय रे त्या नाडीग्रंथातलं? :)

shweta's picture

2 Nov 2009 - 2:58 am | shweta

छान चर्चा चालु आहे.
ह्या लेखाचे अभिवाचन टाकता आले तर उपयुक्त होईल.

अर्चिस's picture

2 Nov 2009 - 4:31 pm | अर्चिस

परत तेच?

संजीव नाईक's picture

2 Nov 2009 - 7:18 pm | संजीव नाईक

उत्तम चर्चा, अशा गोष्टी वाचण्यास वेगळा आंनद वाटतो.
मिपाचा संजीव

या विषयावर पुन्हा प्रतिसाद मी देणार नाही.- इति धनंजय
माझे मनोगत हैयोंनी आधीच सुयोग्य शब्दात कथन केले आहे. ते धनंजयना म्हणतात, 'आपण हा शोध घेवून आपले निष्कर्ष उपलब्ध करून दिलेत तर दूरदूरच्या लोकांना वैज्ञानिक दृष्टीने हे ग्रंथ बघता येतील. आपल्या कष्टाचा हा गैरफायदा नाही, तर लोक आपणांस मनःपूर्वक आभारच देतील.'
हैयोंप्रमाणे माझे ही धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.
असो. काही बिघडले नाही.
मात्र एक कळून चुकले की लंब्यालंब्या बाता करणारे कृतीशील नसतात. शाब्दिक शुभेच्छा देऊन निष्क्रीयतेत धन्यता मानणारे श्री. प्रकाश घाटपांडे देखील याला अपवाद नाहीत.
मात्र माझ्यासारख्याला यामधून आणखी जोमाने कार्य करायला प्रेरणा मिळते.
यापुढे मी व या जालावरील अन्य नाडी ग्रंथ प्रेमी हैयोंना आदरपुर्वक आवाहन करतो की आपण नाडी ग्रंथांतील कूट लेखनाचे अनेक नमुने सादर करु ते आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी तपासावे आणि आम्हाला पुढील शोध कार्यात भरीव मदत करावी आणि वेळोवेळी आपले निष्कर्ष सादर करावेत.

शशिकांत ओक

प्रकाश घाटपांडे's picture

3 Nov 2009 - 9:56 am | प्रकाश घाटपांडे

हैयोंप्रमाणे माझे ही धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.

आमचे मते धनंजय यांनी भौगोलिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या देखील ते सोयीचे नसल्याने असा अनुभव घेणे हे प्राधान्यक्रमावर नाही असे यापुर्वी कुठेतरी लिहिल्याचे स्मरते. संदर्भ शोधावा लागेल.

शाब्दिक शुभेच्छा देऊन निष्क्रीयतेत धन्यता मानणारे श्री. प्रकाश घाटपांडे देखील याला अपवाद नाहीत.

ओक साहेब ती धन्यता नाही मर्यादा आहे. मूळ लेखावर आमची खालील प्रतिक्रिया आहेच

"खरे पाहता हा सारा विषय समाजाशी संबंधीत असल्याकारणे ह्या विषयावर केवळ वैयक्तिक जिज्ञासापूर्तीसाठी अथवा वैयक्तिक चिकित्सापूर्तीसाठी अभ्यास न होता शास्त्रीय दृष्टीकोनातून अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. परंतु आपल्याकडील अनेक तथाकथित पुरोगामी लोकांचा उत्साह त्यातील 'ज्योतिष' किंवा 'भविष्य' हे शब्द ऐकूनच ढेपाळतो आणि केवळ ह्या अभ्यासाच्या अभावामुळे विषयाकडे दुर्लक्ष होते आहे.हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल."

सहमत आहे. आमचे मते नाडी ग्रंथ हे लोकसाहित्य आहे. त्याचे जतन झाले पाहिजे. त्यातील कूटलिपीचे जतन झाले पाहिजे व ते शक्य आहे. मोडी लिपी नामशेष होउ नये म्हणुन पुण्यात इतिहास तज्ञ मंदार लवाटे हे भारत इतिहास संशोधक मंडळात मोडीलिपी वर्ग चालवतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2009 - 11:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या असत्या, पण शुभकामना व्यक्त केल्या तरी ओकसाहेब मलाही जाहीरपणे निष्क्रीय म्हणतील म्हणून फक्त शब्दबंबाळ प्रतिक्रीया!

अदिती

शशिकांत ओक's picture

7 Nov 2009 - 1:26 am | शशिकांत ओक

मित्र हो,

अंनिसच्या कडेवर बसून नाडीग्रंथांविरुद्ध हिरीरीने लिहून पुस्तके प्रकाशित करणारे चिकित्सक, "मर्यादा" म्हणवून अंग काढून घेतात तेंव्हा अशा मर्यादांना सामान्य भाषेत "पळपुटेपणा" तर राजकारणी भाषेत साळसूदपणे घेतलेली "यशस्वी माघार" असे काहीसे म्हणतात. यालाच इंग्लीश मधे having the last laugh असे म्हणतांत. तेच दाखवण्याची धडपड चाललेली आहे असं एकूण दिसतं आहे. असो. धनंजयांनी त्यांच्या सवडीने नाडी ग्रंथ पहावेत त्याला काहीच प्रत्यावाद नाही. आहे तो त्यांच्या आडमुठ्या बहाण्यांचा... ज्यांना पाहायचे नाही त्यांनी पाहू नयेच, पण मग अभ्यासपूर्ण टीका प्रतिवाद इ. इ. करण्याच्या भानगडीतही पडू नये.

शशिकांत

प्रकाश घाटपांडे's picture

7 Nov 2009 - 10:38 am | प्रकाश घाटपांडे

आम्हाला राजा व टोपी याची गोष्ट आठवते.
"राजा भिकारी माझी टोपी चोरली...." टोपी दिल्यानंतर
"राजा भ्याला माझी टोपी दिली..."
असो ; नाडीग्रंथ हे साहित्य आहे त्यातील लिपी जतन करणार्‍यांना शुभेच्छा. करमणुक म्हणुन उपयुक्तता मान्य. अतिरंजित दाव्यांच्या विरोधासाठी मात्र शक्य तेवढा प्रतिवाद/प्रतिसाद

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

7 Nov 2009 - 1:25 pm | विसोबा खेचर

अरे काय रे हे लेको, हे असे मोठमोठे अगम्य प्रतिसाद लिहून तुम्ही मिपाचंही उपक्रम बनवायचं ठरवलं आहे की काय! :)

बरं ते जाऊ दे,

ओक साहेब, मला तुमच्या त्या नाडीग्रंथाच्या साहाय्याने एक सांगा की मला एखादी 'आयटम', 'देखणी', 'फटाकडी' मुलगी केव्हा पटेल? ;)

तात्या.

अवलिया's picture

7 Nov 2009 - 1:35 pm | अवलिया

+१ सहमत आहे.

बाकी तात्या,

अनुष्काशी फाटलं का ? नाही शोध चालु केलास म्हणुन म्हटले.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुप्रिया's picture

7 Nov 2009 - 1:33 pm | सुप्रिया

खरंच् . काय हे मोठेमोठे अगम्य प्रतिसाद!
मला स्वत:ला या नाडिभविष्याचा समाधानकारक अनुभव आला नाही.
आता पुन्हा या वाटेला न गेलेलेच बरे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Nov 2009 - 6:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला स्वत:ला या नाडिभविष्याचा समाधानकारक अनुभव आला नाही.

श्री. ओक यांच्याकडून या प्रतिसादाला उत्तर मिळेल अशी अपेक्षा. याशिवाय श्री ओक "आता तुम्हीच सांगा का मिळालं नाही ते!" अशा आशयाचंही उत्तर देणार नाहीत अशीही रास्त अपेक्षा ठेऊ का?
माझ्या माहितीतल्या आणखी एकांचाही असाच (म्हणजे विनोदी) अनुभव आहे.

बाकी घाटपांडे काकांशी सहमत. साहित्य, जुनी लिपी म्हणून या ग्रंथांचं जतन+अभ्यास व्हावा. भविष्य वगैरे गोष्टी ... जाऊ द्या, उगाच फट्ट म्हणता ... कसं!

अदिती

Nile's picture

7 Nov 2009 - 2:36 pm | Nile

श्री हैयो लिहितातः

खरे पाहता हा सारा विषय समाजाशी संबंधीत असल्याकारणे ह्या विषयावर केवळ वैयक्तिक जिज्ञासापूर्तीसाठी अथवा वैयक्तिक चिकित्सापूर्तीसाठी अभ्यास न होता शास्त्रीय दृष्टीकोनातून अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. परंतु आपल्याकडील अनेक तथाकथित पुरोगामी लोकांचा उत्साह त्यातील 'ज्योतिष' किंवा 'भविष्य' हे शब्द ऐकूनच ढेपाळतो आणि केवळ ह्या अभ्यासाच्या अभावामुळे विषयाकडे दुर्लक्ष होते आहे.

माझ्या ऐकीव माहीती प्रमाणे (तांबरम येथील एक गृहस्थ अश्याच प्रकारचे भविष्यकथन(माझा शब्द नव्हे) करतात असे ऐकुन आहे) ह्या पट्ट्यावरुन कुणाचेही (?) भविष्य सांगता येते.

यापुर्वीचे तुमचे लेख इ. वाचलेले नाही, त्यामुळे, यावरील तुमचे संशोधन वाचायला नक्कीच आवडेल. वरती धनंजय म्हणतात त्या(च)प्रमाणे अर्थातच माझ्या प्राधान्यक्रमामध्ये याला फार वरती स्थान नसेल, पण वेळे मिळाल्यास नक्कीच अधिक जाणुन घेण्याची इच्छा आहे.