Skip to main content

प्रेमसंबंध

माझे नाव कुठे कुठे अन् कसे माळले नक्की?

लेखक आगाऊ म्हादया यांनी बुधवार, 29/07/2026 11:03 या दिवशी प्रकाशित केले.

रदिफ,काफिया, गझल ह्यातुनी कशावर भाळले नक्की?
रुपाला की तिच्या घाटाला, मी काय चाळले नक्की?

कविता माझ्या, लेखही माझे, अन अस्फुट काही उरलेले
सारे तुला जर पाठच होते, काय जाळले नक्की?

गोठलेला स्पर्श तिचा तो अजून खांद्यावरती आहे,
ओलावा हा स्वतःच सांगे अश्रू कुणी ढाळले नक्की.

तुझ्या नि माझ्या कथेतले ते 'प्रकरण' सुरेख होते,
सारे लिहूनी कमीच काही, काय गाळले नक्की?

गळ्यातल्या त्या सूत्रामध्ये मंगळ काही दिसले नाही,
माझे नाव कुठे कुठे अन् कसे माळले नक्की? 

काव्यरस