मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२५ - संपादकीय - विसाव्वं लागलं..

गवि · · दिवाळी अंक
एकोणीस वर्षं पूर्ण! एकोणीस ही संख्या ऐकली की माझ्या डोळ्यांसमोर एक तरुण येतो. मीच म्हणा किंवा तुमच्यापैकी कोणी म्हणा. स्वतःला सगळं जग समजलं आहे याची खातरी झालेला, पण प्रत्यक्षात अजून काहीच न समजलेला. आणि हे समजायला आणखी बरीच वर्षं बाकी असलेला. स्त्री सदस्यांनी एकोणीस वर्षाची तरुणी कल्पावी. लेडीज विरुद्ध जेंट्स असा वाद नको. पुरुष सदस्यांनी एखादी एकोणीस वर्षांची तरुणी कल्पल्यासदेखील हरकत घेणारा मी कोण बापडा! तर ते एक असो. वय एकोणीस म्हणजे अर्धवट घोगऱ्या आवाजात एकही शब्द न बोलता फक्त आवाजाच्या पट्टीतून “मी आता मोठा झालोय! मला अक्कल शिकवू नका..” असं सतत जाहीर करणं आणि तरीही अजून घरच्या मूर्ख आणि जुनाट मोठ्या लोकांकडून खर्चाला पैसे घेत राहावं लागणं. 'बीत गये दिन बचपन के, आये नहीं दिन शादी के.. तो फिर क्यूँ न खाये अमूल चॉकलेट?' असे हे दिवस.. ही जाहिरातदेखील जुन्या खोडांनाच चांगली आठवत असेल. मी ओळी जरा बदलल्या, इतकंच. तर चऱ्हाट वळणं आवरतो आणि काहीतरी गंभीर विषय घेता येतो का, ते बघतो. मिपा आज स्थिर उभं आहे. स्वत:वर, म्हणजेच आपल्या सदस्यांवर आणि वाचकांवर विश्वास ठेवून मिपा श्वास घेतं आहे. वयाने मोठं होत चाललेलं, पण आत अजूनही तोच जुना उत्साही पोरगा असलेलं. मिपाचं बालपण आठवतं ना? तेव्हा इथे शब्दांचे पूर यायचे. कथा-कविता भरभरून वाहात असायच्या. काही वाह्यातदेखील असायच्या. कधी जिलब्या पडत, तर कधी चपला मिळत. कोणी हसता हसता वाईट खपला असं कळत असे आणि प्रतिसादात ईमोजीऐवजी थेट खरेखुरे शब्दच असायचे. आजही मिपावर इतर सोशल मीडियाप्रमाणे ईमोजी नाहीत, पण त्याचा काहीही परिणाम आपल्या संवादावर होत नाही. तरीही... खोटं का बोला? काही काळापासून मनात थोडी धाकधूक होती. आपल्या मिसळीतून सर्जनशीलतेची तर्री आटते आहे का? सकाळचा रस्सा दुपारी दोन वाजता पाणीदार होऊन प्लेटमध्ये येतो, तसा प्रकार तर होत नाहीये ना? कथा, कविता, एकूण ललित लेखन.. हे सगळं जरा कमी.. जरा काय? फारच कमी.. आणि राजकीय मसालेदार वादविवादच जास्त दिसतात का? तो मसालादेखील चव न वाढवता आम्लपित्त वाढवणारा..?! कधी वाटतं, माणसं ललित लिहिणं विसरली की काय? आता फक्त 'यशस्वी कसे व्हाल?' किंवा काहीतरी मोटिव्हेशनल, काहीतरी कामाचं, काहीतरी फायद्याचं.. अशाच लेखनाची चलती आहे का? वीस वीस सेकंदांची रील्स आणि तूनळी शॉर्ट्स वर वर ढकलत आपण त्यात नवीन तर्री शोधतोय का? बदल वाईट असतो असं मी कधीच मानत नाही. नव्या काळात वीस-तीस सेकंदांत किंवा एका मिनिटात जो आपली कथा मांडू शकेल, पोहोचवू शकेल, तो उत्कृष्ट कथाकार ठरेल. कवितेला तर खूपच चांगले दिवस येतील. लेस इज मोअर.. पूर्वी जेव्हा कुणी गोष्ट लिहायचं धाडस करायचं, तेव्हा शंभर लोक “वाहवा!” म्हणायचे.. किंवा 'जिलबी' म्हणायचे. पण आता कुणी गोष्ट लिहिली की मात्र शंका येतात – “स्रोत काय?”, “विचार कुणाचा?”, "तूच लिहिलीस की जीपीटीने?".. तेव्हा वाटतं, आपण इतके ‘तर्ककर्कश’ झालोय की भावनांना आता व्यक्त होण्याआधी परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत की काय? मनात एक अंधारलेल्या दमट संध्याकाळीसारखा विचारही आला होता की.. की कधीतरी आपल्यालाच म्हणावं लागेल, “दिवाळी अंकही आता इतिहासजमा झाला आहे. हाच आपला शेवटचा अंक." मिपाचा हा वार्षिक अंक म्हणजे एक नुसती पुरचुंडी नसून सर्वांचा सामूहिक श्वास आहे. वार्षिक लाइफ सर्टिफिकेट उर्फ 'जीवन प्रमाणपत्र' आहे. सगळ्यांना वाट पाहायला लावणारा, निघायला उशीर होणारा. ताण आणणारा.. पण शेवटी एकदाचा प्रकट होणारा.. अजून तरी खातरीशीर.. यंदाच्या वर्षीचा लेखांचा सुरुवातीचा काहीसा संथ प्रवाह पाहून ते मळभ आणखी गडद व्हायला लागलं होतं. पण नंतर जितकं आणि ज्या उत्कृष्ट दर्जाचं साहित्य झोळीत जमा होत गेलं, ते पाहून त्या काळ्या अवकाळी ढगांना आधी शरमून आणि मग आनंदाश्रू बनून कोसळून नष्ट व्हावं लागलं. लोक्स... अजूनही धडधडतंय आपलं हृदय! नो टेन्शन. कधीकधी आपणच आपल्या मिपा परिवाराबद्दल शंका घेतो आणि मिपा उलट आपल्यालाच म्हणतं, "ताण घेऊ नको. तू आहेस तोवर मी आहे.” जे विचार मनात आले, ते मान्य करायला आता मला काहीच लाज वाटत नाही. मी आणि अनेक इतरांनी क्षणिक का होईना, असा संशय घेतला होता. आणि आज मनापासून आनंदाने कबूल करतो.. मिपा जागं आहे आणि असेल. हां.. मिपामध्ये काळानुसार तांत्रिक बदल करत राहण्यासाठी प्रशांत आणि नीलकांत यांना सतत टोचण्या देत राहणं हे तर आलंच. "लवकरच मिपा अपग्रेड करू" या त्यांच्या वायद्यावर विश्वास ठेवणंदेखील आलं. (कधीकधी वाटतं की अपग्रेड न झाल्यानेच मिपाचा आत्मा टिकून आहे की काय??) हे सगळं घडवणारे सगळे हात पुन्हा एकदा, यंदाही, पडद्यामागे आहेत. लेख मागवणारे, डिझाइन करणारे, तपासणारे, दुरुस्त करणारे.. सुधांशुनूलकर, टर्मीनेटर, प्रचेतस, ज्ञानोबाचे पैजार, प्रा.डॉ. दिलीप बिरुटे, गणपा, जव्हेरगंज, चांदणे संदीप.. इतरही अनेक.. तुमच्यामुळेच ही एकोणीस वर्षं सहज पार पडली. आणि पुढचं विसावं वर्ष नक्कीच आणखी एक नवा कोरा अंक घेऊन येणार.. मिसळपाव आता केवळ संकेतस्थळ नाही.. मोठ्ठ्या पुस्तकाच्या पानांत दडवून ठेवून टिकलेल्या जाळीदार आणि नक्षीदार पिंपळपानांचा तो संग्रह आहे. तो फक्त वाचकांचा नाही, तो फक्त लेखकांचा नाही, तो ‘आपल्या’ सगळ्यांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. पुन्हा पुन्हा परत येण्यासाठी.. कोणताही धागा उलगडून परत परत वाचण्यासाठी. दिवाळी अंक म्हणजे त्या कोपऱ्यातली थोडी जास्त झगमगणारी खास पणती. किंवा ठेवणीतला मोठ्ठा भुईनळा म्हणा. प्रत्येक वर्षी आपण तो लावतो. अगदी दिवाळीच्या पहिल्या पहाटे नसेल, थोडा उशिराने का होईना, पण तो भुईनळा आपण पेटवतो. तोही झगमगाट करत बरसतो. आसपास उजेड आणि ऊब तयार करून जातो. आणि मिपाच्या पुढच्या दशकात आपण पुन्हा एकदा म्हणू.. “बुढ्ढा होगा तेरा बाप". एकोणिसाव्या वर्षाचं थोडं शहाणं, थोडं वेडं संपादकीय इथेच आवरतं घेतो आणि अंक वाचण्यासाठी तुम्हाला मोकळं करतो. लेखन पाठवणाऱ्या लेखकांना आणि ते वाचणाऱ्या वाचकांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. - गवि 1

वाचने 4859 वाचनखूण प्रतिक्रिया 26

स्वधर्म Mon, 10/20/2025 - 13:54
दिवाळी अंक निघेपर्यंत संपादकांची कशी धाकधूक असेल ते अगदी नेमके मांडलेत आपण. पण आता मिपा तारुण्याने मुसमुसते आहे, तेंव्हा लेट अस एन्जॉय! तुमच्यासह सर्व संपादक मंडळाचे मनापासून आभार _/\_

श्वेता२४ Mon, 10/20/2025 - 14:42
यातील बरेच प्रश्न सर्व साहित्यप्रेमींना पडत असतील. तरी माणसाची सर्जनशीलता कोणतेही एआय़ घेऊ शकत नाही असे मला तरी वाटते.सर्व संपादक मंडळाचे मनापासून आभार _/\_

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान Mon, 10/20/2025 - 18:00
चुकून दोनदा 'काय काय' असं लिहिलं. खरंतर एकदाच लिहायचं होतं. -गा.पै. जाताजाता : कळफलकासमोर दिवाळीचा फराळ घेऊन का बसू नये, हे समस्तांना कळलं असेल.

कंजूस Mon, 10/20/2025 - 19:26
वय वाढलं पण परिस्थिती बदलली. नव्वद टक्के मिपा सभासद सोडून गेले. कुठे गेले? फेसबुक आणि वाटसप त्यांना आपलेसे वाटले. तिकडे शाब्बासक्या मिळतात आणि त्वरित मिळतात. लेखनाला तिरकस , नाखुशी, टीकेचे प्रतिसाद जे सभासद पचवू शकतात तेच राहिले. मराठी शाळा, मराठी वाचन करणारी पीढी संपली हेसुद्धा कारण झाले. राजकीय चर्चांमध्ये मवाळपणाचा jammer लावला हेही कारण बाहेर पडण्याचे. तर आता आहे शिल्लक मिपा आणि शिल्लक उरलेसुरले मावळे. संपादकीयमधली व्यथा पोहोचली. म्हणजे होतीच ती आता पांढऱ्यावर काळी स्वरूपात अवतरली. दिवाळी अंक कल्पना , त्यासाठी लेख, कविता पाठवणारे, तो अंक वेळेत प्रकाशित करण्यासाठी झटणारे सर्वांचे आभार. दोनच मराठी संस्थळं उरलीत आता - मिसळपाव आणि ऐसी अक्षरे.

In reply to by कंजूस

अभ्या.. Fri, 10/24/2025 - 19:04
सबंध प्रतिसादाला मम शेवटच्या वाक्याला असहमती. दोन नाही तीन संस्थळे उरली. मिपासाठी क्रोधागार असलेले (इकडे फारच राग आला, प्रतिसाद तेही अपेक्षित असे येईनासे झाले की जायचे ठिकाण) एक निळे बेट राहिले. तुमच्यासारखे सदा सर्वत्र असलेले काही अपवाद.

अनन्त्_यात्री Tue, 10/21/2025 - 08:37
एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच उरलेल्या मराठी आंतरजालीय संस्थळांना, विशेषतः त्यांच्या दिवाळी अंकांना, उतरती कळा लागलीय ही वस्तुस्थिती आहे.

मारवा Tue, 10/21/2025 - 08:45
दिवाळी अंकाच इतक कल्पक मुखपृष्ठ गेल्या 10 हजार वर्षात पहिलं नाही. नेहमी ते आपलं कुठल्यातरी सुंदरीच्या च हातात दिवा असतो. साधा कोणी एखाद्या बाप्याच्या हातात कधी दिवा दाखवला नाही. इथे चक्क रोबोट च्या हाती ! मान गये भैय्या सारी दिवारे तोड डाली creativity की.

कर्नलतपस्वी Wed, 10/22/2025 - 13:40
दोन्ही गोष्टी यावर्षी "हटके ",आहेत असेच म्हणेन. लेख,कथा,कवीता दालने एखाद्या दिवाळीतल्या झगमगत्या माॅल सारखीच नटली आहेत. वैविध्यपूर्ण आणी निर्विवाद गुणवत्ता. संपादक चमू चे हार्दिक अभिनंदन.

जेपी गुरुवार, 10/23/2025 - 23:48
दिवाळी अंक आवडला. आणी आपलं संपादकीय. लगे रहो. येत राहू.

नंदन Fri, 10/24/2025 - 13:03
संपादकीय आवडलं. नेहमीच्या राजकारणी चर्चा आणि उखाळ्यापाखाळ्या ह्यांतून दिवाळी अंका हा 'विसावा' खराच!

अभ्या.. Fri, 10/24/2025 - 18:57
धन्यवाद गवि, तुमच्या चिकाटीचं कौतुक. काही कथा आणि एक व्यक्तीचित्र प्रचंड आवडले. बाकी चान ललित, कथा आणि काही सर्जनशील लेखनाचा आणि विशेषतः त्यावरील प्रतिसादांचा मिपावरचा दुष्काळ पाहता हे दिवाळे अंकाचे एक ओअ‍ॅसिसच.

टर्मीनेटर Sat, 10/25/2025 - 12:54
मिपावर मनापासून प्रेम करणाऱ्या तमाम वाचक, लेखक आणि सदस्य मंडळींच्या मनातल्या भावना ह्या लेखानातून अगदी तंतोतंत व्यक्त झाल्या आहेत... कमाल संपादकीय लिहिले आहेत हो गविशेठ 👍

गवि - संपादन आवडलं , संपादकीय आवडलं आणि ललित लेखनाची उणीव जाणवते हा उल्लेखही आवडला . आजकाल लोक अशा लेखनाकडे , वाचनाकडे कमी वळतात , असं वाटतं . योग्य आणि उत्तम संपादकीय !

चौथा कोनाडा गुरुवार, 10/30/2025 - 17:30
मिसळपाव आता केवळ संकेतस्थळ नाही.. मोठ्ठ्या पुस्तकाच्या पानांत दडवून ठेवून टिकलेल्या जाळीदार आणि नक्षीदार पिंपळपानांचा तो संग्रह आहे. तो फक्त वाचकांचा नाही, तो फक्त लेखकांचा नाही, तो ‘आपल्या’ सगळ्यांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. पुन्हा पुन्हा परत येण्यासाठी.. कोणताही धागा उलगडून परत परत वाचण्यासाठी. अगदी चपखल ! मिपाचा स्थापनेपासुनचा वाचक अन नंतर मिपाकर झाल्याने हा अनुभव घेतलेला आहे. गवि साहेब, सुरेख संपादकिय !