नयन वळविता सहज कुठेतरी - काही चित्रस्मृती
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकानयन वळविता सहज कुठेतरी - काही चित्रस्मृती

सहज कुठेतरी फिरत असता अचानक काहीतरी दृष्टोत्पत्तीस येऊन क्षणभर आपण खिळून जावे, कुठल्यातरी संग्रहालयात पायपीट करताना एकाद्या कलाकृतीने आपले चित्त वेधून घ्यावे, किंवा कधीतरी कुठेतरी कोणीतरी आपले मन मोहून टाकावे... अशा वेळी क्लिकलेली काही स्मृतिचित्रे...
१९१२ साली आदेलीन गिब्सन Adeline Pepper Gibson (१८८३-१९१९) ही तरुणी मधुचंद्रासाठी भारतात गेलेली असताना तिला मदुराईमधील एका मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षांपासून पडून असलेले ग्रॅनाईटचे मोठाले स्तंभ दिसले. तिने ते ६० स्तंभ खरेदी करून अमेरिकेत आणले. पहिल्या महायुद्धयात ही तरुणी फ्रान्समध्ये नर्स म्हणून काम करत असता मृत्युमुखी पडली. १९२० साली प्रख्यात कलामर्मज्ञ आनंद कुमारस्वामी यांनी फिलाडेल्फिया म्युझियममध्ये हा मंडप उभा केला.... सगळेच अतर्क्य आणि अद्भुत.

इ.स. १२७०-८० या काळात फ्रान्समध्ये बांधलेल्या एका ख्रिस्ती मठाचा हा भाग १९२८पासून फिलाडेल्फिया कलासंग्रहालयात आहे. (जगभरातील विविध ठिकाणच्या प्राचीन, मोडकळीस आलेल्या वास्तू खरेदी करून अमेरिकेतील संग्रहालयांमध्ये त्या पुन्हा उभारून आपापली शहरे समृद्ध करण्यासाठी झटणाऱ्या तत्कालीन अमेरिकन नागरिकांचे कौतुक वाटते.)



फिलाडेल्फियामध्ये N.C. Wyeth यांनी १९११मध्ये अठरा एकर जमीन घेऊन बनवलेले घर आणि स्टुडिओ, तसेच त्यांची अनेक चित्रे बघायला मिळाली. त्यांची ३०००हून अधिक चित्रे आणि त्यांनी चित्रित केलेली ११२ पुस्तके आजमितीला उपलब्ध आहेत. १९४५ साली मृत्यूच्या आदल्या दिवशी अपूर्ण राहिलेले चित्र अजूनही ईझलवरच आहे (वरील फोटोत उजवीकडे.)
याच परिसरात 'ब्रॅंडिवाईन' नदीच्या काठी असलेल्या संग्रहालयात वाईथ यांची पुष्कळ चित्रे आहेत. या संग्रहालयाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे या परिसरातील ६३००० (त्रेसष्ट हजार) एकर जमिनीचे आणि पाण्याचे संरक्षण, संवर्धन नियोजन. त्यामुळे या भागाचे कधीही औद्योगिकीकरण होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. याविषयी माहिती :https://www.brandywine.org/
Villa at Caprarola चित्रकार : Claude-Joseph Vernet (१७१४-१७८९) या चित्रासोबत अस्मादिक.
या चित्रात इटलीतील प्रसिद्ध 'फारनेजे' (Farnese) घराण्यात जन्मलेली स्पेनची राणी एलिझाबेथ, इटलीतील आपल्या पूर्वजांचा किल्ला बघण्यासाठी आलेली असतानाचे दृश्य रंगवलेले आहे. हे फारनेजे घराणे अजून रोममध्ये त्यांच्या भव्य प्रासादात निवास करत असून तो Raphael (१४८३–१५२०) या चित्रकाराने केलेल्या प्रचंड भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी हा प्रासाद बघितलेला असल्याने मला या चित्राबद्दल कुतूहल निर्माण होऊन ते जास्त बारकाईने बघितले.


नेपोलियनच्या पराभवानंतर त्याचा अमेरिकेला जाण्याचा बेत फसला, परंतु त्याचा भाऊ जोसेफ (नेपोलियनने जिंकलेल्या तत्कालीन स्पेनचा तात्पुरता राजा) अमेरिकेला जाऊ शकला. त्याने हे चित्र स्पेनहून अमेरिकेत आणले.
राणीच्या या सफरीत चित्रकार मुद्दाम चित्र बनवण्यासाठी सामील झालेला होता. (त्याने स्वतःचे चित्रही डावीकडल्या सावलीच्या भागात रंगवले आहे.) हे चित्र बघितल्यापासून हा किल्ला बघण्याची उत्सुकता जागृत झालेली आहे. विशेषतः हे चित्र कुठे बसून काढले असावे, ते हुडकता आले तर खूपच समाधान लाभेल.
हे चित्र बघून मला गेल्या वर्षीची रोम-भ्रमंती आठवली.






रोमच्या इतिहासातील निवडक मातब्बर घराण्यांपैकी असलेले ‘कोलोना’ घराणे चौदाव्या शतकापासून या भव्य प्रासादात आजतागायत वास्तव्य करून आहे. हा प्रासाद पर्यटकांसाठी फक्त शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ याच वेळात खुला असतो. पुनर्जागरण काळातील वास्तूंची भव्यता, ऐश्वर्य आणि सौंदर्य अनुभवण्यासाठी कोलोना प्रासाद अवश्य बघावा. Gaspard Dughetचे (१६१५–१६७५) एक चित्र. या चित्रकाराने रंगवलेली रोम परिसरातली बरीच निसर्गचित्रे इथे आहेत. ती बघायला मुद्दाम इंग्लंडातून आलेल्या एका वृद्ध जोडप्याशी इथे ओळख झाली.
"गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा.." किंवा "..काहे दिया परदेस, टुकडे को दिल के.." या प्रसंगावरचे रोमन शिल्प.
पॅरिसमध्ये आयफेल टॉवर आणि मोनालिसाभोवती गर्दी करणाऱ्यांना ठाऊक नसलेल्या, केसरी-वीणा वगैरेंच्या खिजगणतीत नसणाऱ्या अनेक शांत, रम्य जागा आहेत. उदाहरणार्थ,

पार्क सँक्लूमधील प्राचीन कारंजे Parc de Saint-Cloud
नोत्रदामपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या लहानशा बागेत जरा विसावा घेऊन संध्याकाळ नदीकाठी फिरत घालवावी...


एकदा असेच एका अनोळखी पायवाटेने निरुद्देश फिरताना एक वळण आले, आणि - "... नयन वळविता सहज कुठेतरी, एकाएकी तूच पुढे ... आज अचानक गाठ पडे..." ---म्हणजे काय, हे साक्षात अनुभवले.



आणखी अशाच काही अनवट जागांची ओळख पुढे कधीतरी....

.png)