मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टाकी उपानह पदे...

नूतन · · दिवाळी अंक

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


टाकी उपानह पदे...




टाकी उपानह पदें अतिमंद ठेवी। केली विजार वरि डौरहि मौन सेवी॥ हस्ती करीं वलय उंच अशा उपायीं। भूपें हळूच धरिला कलहंस पायीं॥


एका सुंदर सकाळी चहाचं आधण ठेवता ठेवता सहजच वरील ओळी ओठांवर आल्या. डोक्याला रिकामपण मिळताच दिवसभरात अनेकदा माझ्या मनात रुंजी घालत राहिल्या. अखेर संध्याकाळी मी एका प्रसिद्ध पुस्तक दालनाकडे माझा मोर्चा वळवला. पाठ्यपुस्तकात अभ्यासलेला हा 'वेचा' रघुनाथ पंडितांच्या 'दमयंती स्वयंवर' या आख्यानातील आहे, एवढं पक्कं आठवत होतं. पुस्तक मिळण्याविषयी मनात शंका होतीच, पण पुस्तक मिळावं असंही वाटत होतंच. मी विचारलं, "आपल्याकडे रघुनाथ पंडितांचं 'दमयंती स्वयंवर' मिळेल का?" "रघुनाथ पंडित?" काउंटरवरच्या माणसाचा प्रश्नार्थक चेहरा! मी समजले, कठीण आहे एकूण! इतक्यात दुकानात काम करणारा दुसरा एक जण माझ्यापाशी येत म्हणाला, "ताई, 'रघुनाथ पंडितांचं' नाही. पण अ.का. प्रियोळकरांचं असंच काहीसं एक पुस्तक आहे. एम.ए. करणारे कुणीकुणी येतात विचारायला. दाखवू आणून?" माझा चेहरा खुलला. प्रियोळकर तर प्रियोळकर, बघू या तरी! मी हो म्हटलं. पुस्तक हातात पडलं आणि मी मनातल्या मनात उडीच मारली. चक्क रघुनाथ पंडितांचंच 'दमयंती स्वयंवर' होतं ते! संपादन श्री. प्रियोळकरांचं होतं. एम.ए. च्या अभ्यासाला लावलं म्हणून मनातल्या मनात मी मुंबई युनिव्हर्सिटीचे आभारही मानून टाकले.

तर अशा या काहीशा विस्मृतीत गेलेल्या, रघुनाथ पंडित विरचित आणि अ.का. प्रियोळकर संपादित काव्याचा अल्प परिचय. हे काव्य प्राचीन मराठी काव्यांपैकी अतिशय महत्त्वाचं आणि रसाळ काव्य. या काव्याचे रचनाकार रघुनाथ पंडित शिवकालीन असावेत, असा अंदाज आहे.

विदर्भ देशचा राजा भीमक याची दमयंती ही अतिशय रूपवती, उपवर कन्या. एकदा दरबारात बसलेली असताना काही ब्राह्मणांकडून "लोकी नसे नलमनस्तुलना विलोकी "अशा शब्दातील नलराजाची स्तुती ऐकून नलालाच वरण्याचा ती मनोमन संकल्प करते. इकडे नलाच्या दूतांनी केलेलं दमयंतीचं वर्णन ऐकून नलाचाही दमयंतीवर जीव जडतो. प्रत्यक्षात न बघता फक्त वर्णन ऐकून परस्परांना वरणार्‍या प्रेमिकांची ही कथा. दमयंतीला अनुकूल करून घेण्याचं कार्य, नलराजा सुवर्णकांती असलेल्या एका राजहंसावर सोपवतो. हा हंसच दोघांतील दुवा होतो आणि अखेर नल-दमयंती विवाहबद्ध होतात. या सार्‍या कालखंडातील घटनांची काव्यबद्ध रचना म्हणजे दमयंती स्वयंवर आख्यान.

एकूण २५४ चरणांच्या या काव्यात वृत्तांची आणि अलंकारांची (व्याकरणातील!) लयलूट आहे. शार्दूलविक्रीडित, गीति किंवा आर्या, दण्डी, मालिनी, शिखरिणी, वसंततिलका, द्रुतविलंबित अशा एकूण १९ वृत्तांचा, तर अतिशयोक्ती, अन्योक्ती, श्लेष अशा २०पेक्षा अधिक अलंकारांचा यात समावेश आहे.

1

वाङमय अभ्यासकांसाठी तर हे काव्य म्हणजे खजिना आहेच, तसंच माझ्यासारख्या सामान्य वाचकांसाठीही वृत्तविविधतेमुळे तयार होणार्‍या वेगवेगळ्या चाली, त्यातून निर्माण होणारे ध्वनी, अनुप्रासामुळे तयार होणारी गंमत आनंददायक आहे. त्याचबरोबर या संस्कृतप्रचुर काव्यात संस्कृत भाषेचा गोडवा आहे. अर्थात संस्कृत न शिकलेल्यांसाठी (मीही त्यातलीच) अर्थ समजणं थोडसं क्लिष्ट आहे. पण प्रियोळकरांच्या या पुस्तकात दिलेल्या शब्दार्थांमुळे ते सोपं झालं आहे. हा लेख लिहायला घेतल्यावर आणखी थोडंसं संशोधन करताना मला सीताराम विष्णू सरवटे संपादित, याच काव्याचं पण 'नल-दमयंती-स्वयंवराख्यान' नावाचं दुर्मीळ पुस्तक हाती लागलं, ज्यामुळे हे काव्य समजणं आणखीनच सोपं झालं. या काव्यात मध्येमध्ये अरबी, फारसी शब्दांचाही वापर आढळतो. या काव्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नादमय, लयबद्ध आणि चित्रदर्शी शब्दरचना. या काव्याचे नायक-नायिका आहेत नल-दमयंती, पण त्याबरोबरीच कांचनतनू राजहंसाची मोठी भूमिका आहे.

राजहंस पक्षी हा देवलोकातील पक्षी मानला जातो. कैलासातील मानसरोवरात त्याचा वास असून त्याच्याकडे नीरक्षीरविवेक क्षमता आहे. याशिवाय राजहंस आपल्या जोडीदाराशी नेहमी एकनिष्ठ असतो. नल-दमयंतीच्या मिलनात म्हणूनच राजहंस पक्ष्याची निवड केली असावी.

या काव्याची वैशिष्ट्यं लक्षात यावी, तसंच आस्वाद घेता यावा, म्हणून काही निवडक (सार्थ) पद्यचरण प्रस्तुत करीत आहे.

चरण २ : वृत्त गीति/आर्या, अलंकार - नलसती शब्द/श्लेष.

इन्द्रादिक वर असतां कसी नलसतीच होय दमयंती।
सुंदर सकल वधूंते कसली न लसतीच होय दमयंती॥

इंद्रादिक वर असूनही दमयंती नळाचीच पतिव्रता (नलसती) कशी झाली आणि अनेक सुंदर स्त्रिया (वधू) न होता रूपवती, तेजस्वी (लसती) दमयंतीच नळाची वधू कशी झाली, याविषयीची कथा सांगतो.

चरण ६ : वृत्त - शार्दूलविक्रीडित.

वाजीचे मन जाणता सकळही राजी शिपाई जया। याजी होऊनि जो द्विजांसि म्हणतो 'या जी धनें घ्यावया'॥ त्याजी जो धनदापरी सुकृत जें त्या जीव ऐसें गणी। गाजी तो नलभूप हूप धरूनी गा जी गुणांच्या गणी॥६॥

वाजी (घोडा)ची ज्याला उत्तम पारख आहे आणि जो अश्वविद्येत प्रवीण आहे, जो यज्ञयाग करून ब्राह्मणांना दक्षिणा देतो, ज्याच्याकडे कुबेरासारखे धन आहे आणि जो तितकाच त्यागी आणि दानशूर आहे, पुण्यकृत्य करणं हे ज्याला भूषणावह वाटतं (सुकृत), जो पराक्रमी (गाजी) आहे अशा नळराजाचे गुणगान गुणिजनांमध्ये जाऊन करा.

चरण १५ : वृत्त - वसंततिलका, अलंकार - व्यतिरेक/अतिशयोक्ती
हे वामनैकपद भूमि, नसोनि जंघी।
एके दिनींच रविसूत नभास लंघी॥
वार्राशि वानरविलंघित होय तो कीं।
लोकीं नसे नलमनस्तुलना विलोकीं ॥१५॥

वामनैकपद - वामनाचं एक पाऊल
रविसूत - सूर्याचा सारथी अरुण

वामनाने आपल्या छोट्याशा पावलाने सारी पृथ्वी व्यापली. विनतेचा पुत्र आणि सूर्याचा सारथी अरुण हा पंगू असूनही एका दिवसात नभाला पार करतो. एक वानर (मारुती) उड्डाण करून समुद्र लंघून जातो. पण या सगळ्यापेक्षाही विशाल मनाचा आणि पराक्रमी, नळासारखा राजा तिन्ही लोकी दुसरा कुणीही नाही.

चरण १९ : वृत्त - मालिनी, अलंकार - यमक (रंजयंती/जयंती).

निषधपतिकथा हे जे सुधेतें जयंती।
परिसुनि दमयंती रंजली रंजयंती॥
नवल मज न भासे चन्द्रवंशैकशाली।
नळ तरि वनमाळी भीमजा हेचि जाली ॥१९॥

निषधपतीची (निषध देशीचा राजा नळ याची) अमृतालाही मागे टाकणारी गोड कथा ऐकून एरवी इतरांना आनंद देणारी (रंजयंती) दमयंती मात्र अस्वस्थ, शोकमग्न झाली. पण तिला खातरी होती की नळ हा वनमाळी कृष्णाच्या चंद्रवंशातील आहे आणि भीमजा रुक्मिणीप्रमाणे आपणही भीमककन्या आहोत. तेव्हा कृष्ण-रुक्मिणीप्रमाणे आपलेही मिलन होणार.

चरण २० : वृत्त - माल्यभारा, अलंकार - श्लेष व दृष्टान्त.

नळराजकथा सुधाचि साजे। दमयंती वरवर्णिनी विराजे॥
मिळणी उभयांसी होय जेथे । अधिकारी अधिकानुराग तेथे॥२०॥

नळराजाची कथा अमृताप्रमाणे (सुधा) तर होतीच, तशीच दमयंतीसारख्या वरवर्णिनीने (उत्तम, गुणी स्त्रीने) ती ऐकली, त्यामुळे साहजिकच हा संगम अधिकानुराग (अधिक प्रीती) निर्माण करणारा होता. अनुरागाचा रंग आरक्त आहे. या चरणात सुधा = अमृत, चुना, वरवर्णिनी = उत्तम स्त्री, हळद व अधिकानुराग = विशेष प्रेम, अधिक तांबडा या शब्दांवर श्लेष असून, 'चुना आणि हळद यांच्या संगमाने जसा लालिमा उत्पन्न होतो तसा.... 'हा दृष्टान्त आहे.

चरण २५ आणि २६ : वृत्त - दण्डी.

असें बोलतां चार समाचारा। करी दमयंती नलमनी विहारा ॥
"नोवरी ते मज होय कशी दारा"। करूं लागला भूप या विचारा ॥२५॥
विभूतीने झांकला अनळसा तो। गुप्त दमयंतीविरह नृपा होतो ॥
नित्य पोटीं वडवाग्नि पेट घेतो। सागरानें तो काय सांगिजेतो ॥२६॥

भीमकाच्या दरबारची खबर घेऊन येणार्‍या चरांनी (हेरांनी) दमयंतीचं वर्णन केल्यावर झालेल्या नलाच्या स्थितीचं अतिशय यथार्थ वर्णन या चरणात केलं आहे.

चरांकडून दमयंतीचं वर्णन ऐकल्यावर नलाच्या मनात दमयंती विहार करू लागते. ही 'नोवरी' म्हणजे उपवर कन्या माझी 'दारा' म्हणजे पत्नी कशी होईल, याची विचारणा नलराजा चरांजवळ करतो. ज्याप्रमाणे आपल्या उदरीचा वडवानल सागर पोटातच दडवतो, तद्वत दमयंती विरहाचा अनळ (अग्नी) त्याने मोठ्या प्रयत्नाने विभूतीने (राखेने) झाकावा तसा झाकला आहे (प्रकट केला नाही).

चरण २७ : वृत्त - वसंततिलका.

मानी मनोजशर हारतुरे फुलांचे
कंदर्पकोपवचन ध्वनि कोकिलांचे॥
राकाशशी मदनदर्पण भाविला. हे- ।
नेघेचि, तो न परिसे, न तयासि पाहे ॥२७॥

मनोजशर (मदनबाण) फुलांचे हारतुरे, कोकीळस्वरातील मदनाचं बोलणं, पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्ररूपातील मदनदर्पण यापैकी हार, स्वर, रूप कशातही नळाचं मन रमलं नाही.

चरण २८ : वृत्त - शार्दूलविक्रीडित.

छायानायकसा निदाघसमयीं छाया धरी तो विधू ।
पायांहीं हृदयश्रमासि करितो दायादसा हा मधू॥
जाया जे रुचली मनीं तिजकडे जाया न ये की पहा ।
रायाला न गमे न जाय रजनी आयास होती महा ॥२८॥

जिला भेटण्याची इच्छा आहे, तिची भेट होऊ शकत नाही. त्यामुळे नळराजा व्याकूळ झाला आहे. मधुमास (वसंत ऋतू )असूनही मन उल्हासित न होता शिणलं आहे. आकाशीच्या चंद्राचे किरण शीतल न वाटता निदाघसमयी (उन्हाळ्यात) तळपणार्‍या छायानायकाच्या (छायेचा पती जो सूर्य, त्याच्या) उन्हाप्रमाणे राजाला पोळत आहेत. विरहाग्नीमुळे राजाची अशी स्थिती झाली आहे.

चरण ३० : वृत्त - गीति.

रजनीदिवस गमेना नृपास संगीतही सुख गमेना।
मन कोठेंहि रमेना, म्हणूनि 'करूं वनविहार', विरमेना ॥३०॥

दिवसरात्र राजा तळमळत आहे. संगीताचे सूरही त्याचं मन शांत करू शकत नाहीत. कशातही मन रमत नव्हतं, म्हणून अखेर 'वनविहार' करण्यासाठी तो सज्ज झाला.

यापुढील अकरा चरणांत वनविहाराला जाण्यासाठीची नळराजाची सिद्धता, वनसौंदर्याचं वर्णन आणि या काव्यातील प्रमुख भूमिका निभावणार्‍या राजहंसाची भेट याचं अतिशय मनोहार आणि चित्रदर्शी वर्णन केलेलं आहे.

चरण ३१ : वृत्त - वसंततिलका, अलंकार - उपमा (पहिल्या तीन ओळी).

गंगातरंगसम जो निज देहवर्णी ।।
भृंगापरी रुचिर कांति जयासि कर्णी ॥
जंघाल जो पवनसंगतिची सवे घे।
श्रृंगारिला हय तयावरि भूप वेंघे ॥३१॥

गंगातरंगसम (गंगेच्या लहरींप्रमाणे पांढराशुभ्र) असा ज्याचा वर्ण आहे, भृंगापरी रुचिर कांतीसम (भ्रमरासारख्या काळ्याभोर रंगाचे) ज्याचे कान आहेत, म्हणजे हा पांढटया रंगाचा श्यामकर्ण घोडा आहे. तो पवनाप्रमाणे जंघाल (वेगवान) आहे, असा हय (घोडा) शृंगारून, त्यावर राजा आरूढ झाला आहे.

चरण ३२ : वृत्त वसंततिलका.

जो अंबरी उफळतां खुर लागलाहे।
तो चंद्रमा निजतनूवरि डाग लाहे ॥
जो या यशास्तव कसें धवलत्व नेघे? ।।
शृंगारिला हय तयावरी भूप वेंघे ॥३२॥

तो घोडा इतक्या वेगाने पळतो की जणू आकाशातून उडत जातो. असे जाताना त्याचा खूर चंद्राला लागला आणि त्यामुळे चंद्रावर डाग आहे. त्याच्या या पराक्रमामुळे बक्षीस म्हणून त्याला चंद्राचं धवलत्व प्राप्त झालं आहे.

चरण ३३ : वृत्त - दण्डी.

सवें सेना भूपाळ निघालाहे । सीम लंघी उद्यान एक पाहे ॥
रिघे तेतें मित सेवकांसि बाहे । फौज सारी बाहेर उभी राहे ॥३३॥

आधी वर्णिलेल्या घोड्यावर भूपाळ स्वार झाला आहे. राज्याच्या सीमेजवळ असलेल्या (शीव) एका उद्यानाशी तो येऊन पोहोचला. सोबत त्याची सेना आहे. पण आता मात्र तो आपल्या मोजक्याच (मित) सैनिकांना घेऊन उद्यानात प्रवेश (रिघे तेथे) करतो. बाकीची फौज बाहेरच उभी राहते.

चरण ३४ : वृत्त - दण्डी.

फणस जंबू जंबीर विविध निंबे। कुंद चंदन माकंद दाऽलिंबें॥
तुंग नारिंगे विकसली कदंबें। वसति जेथे शुकसारिकाकदंबें॥३४॥

या उद्यानात नानाविध वृक्षवेली आहेत, ज्यांचं वर्णन या चरणात केलेलं आहे.
पनस (फणस), जंबू (जांभूळ), जंबीर (ईडलिंबू) विविध प्रकारची लिंबं, पांढरी सुवासिक चांदणीप्रमाणे दिसणार्‍या फुलांची कुंदलता, चंदन वृक्ष, माकंद (आंबा), सुदाडिंबे (रसदार अशी डाळिंबे) अशा नाना वृक्षांची इथे दाटी आहे. कदंबाला बहर आला आहे आणि त्यावर शुक सारिकांनी दाटी केली आहे. याखेरीज इथे इतरही तुंग (उंच) वृक्षांची दाटी आहे. असं हे अत्यंत रमणीय असं स्थान आहे.

चरण ३५ : वृत्त - वंशस्थ, अलंकार - सहोक्ति.

लतेतळी रुंद निरुंद कालवे। गळोनि तेथें मकरंद कालवे॥
परागही सांद्र तयांत रंगती। फुलांसवें भृंगतती तरंगती॥३५॥

उद्यानातील वेलींच्या तळाशी निरुंद (अरुंद) कालवे वाहात आहेत. त्यात फुलांतील मकरंद (मध) टपकत आहे आणि कालव्याच्या पाण्यात मिसळत आहे. त्याच पाण्यात परागांनी (फुलांतील केसरांनी ) दाटी केली आहे. त्या केसरांचा रंग पाण्यात उतरला आहे. या पाण्यात पाकळ्यांचीही पखरण आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर या पाकळ्याही वाहत जात आहेत. आणि या सगळ्याने आकृष्ट होऊन भृंगततीही (भुंग्याचे थवे) त्या पाण्यातील मधाची आणि सुवासाची मजा चाखत पाण्याबरोबर तरंगत जात आहेत.

चरण ३६ : वृत्त - गीति, अलंकार - विरोधाभास.

उपरीस कंटक साचे परंतु सांचे जयांत सुरसाचे।
घोंस तसे फणसांचे षण्मासांचे कितेक वरसाचे॥३६॥

वरून सकंटक (काटेरी) असलेल्या, तरी आतून मात्र सुमधुर रसाने युक्त अशा गरांनी जे भरले आहेत, असे असंख्य फणस झाडांवर लागले आहेत. या चरणात 'साचे' हा अक्षरसमूह मोठ्या कौशल्याने वापरला आहे. साचे = खरे, सांचे = गरे, सुरसाचे = मधुर रसाचे, वरसाचे = वर्षाचे (इथे अनेक या अर्थी).

चरण ३७ : वृत्त - उपेन्द्रवज्रा.

तया वनीं एक तटाक तोयें। तुडुंबले तामरसानपायें॥
निरंतरामंद मरंद वाहे। तपांतही यास्तव रिक्त नोहे॥३७॥

या वनात एक तटाक (सरोवर) असून ज्यातील तामरस (कमळं) कधीही कमी होत नाहीत अशा पाण्याने ते भरलेलं आहे. या पाण्यातही अतिशय मंद पण निरंतर अशी पुष्परसाची भर पडत आहे आणि ग्रीष्माच्या तापातही ते कधी रिक्त होत नाही.

चरण ३९ : वृत्त - वसंततिलका, अलंकार - संबंधातिशयोक्ती.

वीतां मरंद उदरंभर बंभरंचें।
जें होय मंदिरहि सुंदर इंदिरेचें॥
तें पद्म जेथिल सहस्र दळां धरी तें।
प्रत्येक सूर्यकिरणास विकासवीतें॥३९॥

या चरणात तळ्यातील कमळांचं वर्णन आहे. हे पद्म (कमळ)) जे इंदिरेचं (लक्ष्मीचं) सुंदर असं मंदिर आहे. (पद्मालया असंही लक्ष्मीचं नाव आहे.) या कमळातून मकरंद स्रवताच (वीतां) उदरंभर (बुभुक्षित) असे बंभर (भ्रमर) तिथे येतात. ही कमळं सहस्रदळांची आहेत, त्यामुळे सहस्ररश्मी सूर्याचा एकेक किरण एकेका कमळदळावरून परावर्तित होतो, एकेक कमळदळाला सुशोभित करतो.

चरण ४०, ४१ : वृत्त - दण्डी.

तया सरोवरि राजहंस पाहे । राजहंसांचा कळप पोहताहे ॥ तयासाठी हे वापिकाच पोहे। नळे केली हे कोण म्हणे नोहे !॥४०॥ तया हंसांचे देह कांचनाचे। पक्ष झळकती वीज जसी नाचे॥ रंग माणीक चंचुचे पदाचे। जसे अधरराग भीमकन्यकेचे॥४१॥

अशा या नळानेच निर्मिलेल्या सरोवरात राजहंसाचा कळप पोहत आहे. त्या हंसांचे देह कांचनासम असून पंख फडकवताच वीज चमकल्याचा भास होतो. भीमककन्येच्या - म्हणजे दमयंतीच्या अधरांप्रमाणे त्यांच्या चोचींचा आणि पायांचा रंगही माणकासारखा आहे.

चरण ४२ : वृत्त - वसंततिलका, अलंकार - स्वभावोक्ति.

तेथील एक कलहंस तटीं निजेला।
जो भागला जलविहार विशेष केला॥
पोटींच एक पद, लांबविला दुजा तो।
पक्षी तनू लपवि; भूप तया पहातो॥४२॥

त्या हंसापैकीच एक कलहंस (राजहंस) विशेष जलविहार केल्यामुळे थकून भागून सरोवराच्या काठावर निजला होता. आपला एक पाय त्याने पोटाशी दुमडून घेतला होता, तर दुसरा लांब केलेला होता. राजाचं त्याच्याकडे लक्ष जाताच त्याने आपला देह पंखात लपवला.

चरण ४३ : वृत्त - वसंततिलका, अलंकार - स्वभावोक्ति.

टाकी उपानह पदें अतिमंद ठेवी।
केली विजार वरि डौरहि मौन सेवी॥
हस्ती करीं वलय उंच अशा उपायीं।
भूपें हळूच धरिला कलहंस पायीं॥४३॥

नळराजाने आपले जोडे (उपानह) काढून ठेवले आणि अगदी मंद, हलकी पावलं टाकत तो पुढे झाला. आपली (विजार) चोळणा वर ओढला आणि डौर म्हणजे आपल्या घोळदार अंगरख्याचा जराही आवाज होणार नाही अशा बेताने तो जाऊ लागला. आपल्या हातातील वलयं (कंकणं/कडी) कोपराच्या दिशेने वर केली आणि अगदी अलगदपणे पुढे जात आपल्या दोन्ही हातांचं कडं करून त्या कलहंसाला हळूच पकडलं.

चरण ४४ : वृत्त - मालिनी.

कलकल कलहंसें फार केला सुटाया।
फडफड निजपक्षीं दाविलीही इडाया॥
नृपतिस मणिबंधीं टोंचिता होय चंचु।
धरिल दृढ जया त्या काय सोडील पंचू ?॥४४॥
तदितर खग भेणें वेगळाले पळाले।
उपवनजलकेली जे कराया मिळाले॥
सजण गवसला जो याचपासीं वसे तो।
कठिण समय येतां कोण कामास येतो!॥४५॥

तावडीत सापडलेला तो हंस सुटकेसाठी धडपडू लागला. त्यासाठी त्याने अगदी नृपतीच्या मणिबंधावर (मनगटावर) चोचीने टोचण्याचाही प्रयत्न करून पाहिला. पण नळाने आपल्या मजबूत पंजात पकडल्यामुळे ती सारी धडपड फोल ठरली. याचा परिणाम असा झाला की जलविहारासाठी जमलेले इतर राजहंस, आपल्या सख्याला सोडून, (भेणे ) भिऊन पळाले. म्हणूनच कवी सत्य सांगतो -
'कठीण समय येता कोण कामास येतो!'

अनेक आर्जवं केल्यानंतर आणि नळराजाला मदत करण्याचं आश्वासन दिल्यावर हंसाची सुटका होते. काय होतं ते आश्वासन?

चरण ६३ : वृत्त - द्रुतविलंबित.

विरहिसा दिसतोसि महा नळा। तरि हरीन तुझ्या विरहानळा॥
चतुर जे तरुणी ह्रुदयंगमा। करवितों तिजसीं तुज संगमा॥६३॥

या चरणात हंस म्हणतो, "हे नळराजा, मला तू विरहाकुल दिसतो आहेस. तू जिच्यासाठी झुरतो आहेस, त्या चतुर, सुंदर रमणीचा आणि तुझा संगम घडवीन आणि तुझा विरह हरीन (दूर करेन).

या अशा आश्वासनानंतर 'बरं, येतो' म्हणून तो नळराजाचा निरोप घेतो. काही दिवसांनी विदर्भदेशाची राजधानी असलेल्या कुंडिननगरीच्या दिशेने तो उड्डाण करतो. वाटेत त्याला काही शुभशकुन होतात आणि लवकरच तो राजधानी कुंडिननगरीत प्रवेश करतो.

चरण ९१ : वृत्त - चूर्णिका.

सकलभुवनललामायमाना। मानाधिकविभवधनिकसदनशतविराजमाना॥
कलशजनितमुनिचकितपंचजलधिशरणायितविस्तारपरिखांतरीपायमाना॥
असमाना जीचे सौध-विमाना, गगन धराया स्तंभच माना॥
लाविति जे जलदां निज माना। वासवचाप जयांस कमाना॥
ऐसी कुंडिननामधेय नगरी राजहंसें पाहिजेसी पाहिजेली ॥९१॥

या चरणात कुंडिननगरीचं वर्णन केलं आहे. हा चरण वाचताना लक्षात येते की ही रचना संस्कृत काव्याप्रमाणे आहे. मध्ये खंडित न होणारी लांबच लांब शब्दरचना इथे दिसते.

सकलभुवनात अर्थात त्रिभुवनात, लालामायमाना (भूषण ठरलेली) अशी ही नगरी आहे. इथे मानाधिक (अमित/अगणित) अशी संपत्ती आहे. शेकडो धनिकांची सदनं इथे विराजित आहेत. कलशजनितमुनींना (अगस्त्य ऋषींना) घाबरून पंचमहासागर राहतील एवढ्या मोठ्या विस्ताराचा खंदक असलेल्या या नगरीत पंचमहासागरांनी आश्रय घेतला आहे. त्यामुळे तिला जणू बेटाचं स्वरूप प्राप्त झालं आहे, अशी ही नगरी. इथे असमाना (अजोड अप्रतिम) असे गगनचुंबी सौंध आणि मनोरे आहेत. इतके की ते जणू गगनाला आधार देत आहेत. ते आकाशातील जलदांना (ढगांना) स्पर्श करत असून वासवचाप म्हणजे इंद्रधनुष्याची त्यावर कमान आहे. अशी ही अद्भुत आणि देखणी अशी 'कुंडिन नामधेय'असलेली नगरी राजहंसाने पाहिली.

आपल्या सख्यांसह खेळणारी दमयंती राजहंसाने पाहिली आणि युक्तीने तिला सख्यांपासून दूर घेऊन आला. एकांतात आल्यावर मग नळराजाविषयी तो तिच्याशी संवाद करू लागला आणि शिष्टाई करत म्हणाला,

ddd

चरण १३५/१३६ वृत्त....दण्डी

"जसी रंजलीस तूं निषधभूपीं। तसा तोही रंजला तुझ्या रूपीं॥
दैवघटितें अन्योन्य व्हाल सोपी। तुम्ही नांदाल सत्य मी निरोपीं॥१३५॥
कोण योजावी नोवरी नळाला। ब्रह्मदेवे हा जैं विचार केला॥
तुझा नामाक्षरसंघ घेइजेला। असें भासतें माझिया मनाला"॥१३६॥

तू जशी निषधभूपावर (नळराजावर) अनुरक्त झाली आहेस, तसाच तिकडे नळराजाही तुझ्या रूपावर भाळला (रंजला) आहे. दैवघटिताप्रमाणे तुम्ही अन्योन्य (दोघेही एकमेकांना) सुलभप्राप्त व्हाल, असं मी भाकीत (निरोपी) करतो. नळासाठी कोणती वधू योजावी असा विचार जर ब्रम्हदेवाने केला, तर तोही तुझ्याच नामाक्षरसंघाची (देवयानी या नावाचीच) निवड करील हे निश्चित.
अशा प्रकारे दमयंतीच्या मनातील नळाविषयीची प्रीती अधिकच गाढ केल्यावर हंस म्हणतो,

चरण १४० : वृत्त - मालिनी.

करुनि मज रवाना राजसे तूजसाठीं।
नृपति निरखि माझी वाट आरामवाटीं॥
बसवुनि निजपाठी तूज नेईन तेथें।
परि चुकुर तुझे हे लोक होतील येथे"॥१४०॥

"हे सुंदरी, आपल्या मनातील भाव तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला रवाना करून, उत्तरासाठी अधीर असलेला नृपती आरामवाटिकेत माझी वाट पहात बसला असेल. खरं तर माझ्या पाठीवर बसवून मी तुला आत्ताच तिकडे घेऊन गेलो असतो. पण तू नाहीशी झालेली कळताच राजवाड्यातील सारे जण घाबरे (चुकूर) होतील. तेव्हा आता मी तुझा निरोप घेतो" आणि नळराजाला निरोप देण्यासाठी हंसाने उड्डाण केले.

यानंतर प्रीतिविरहाने दमयंतीची अवस्था अगदी वेड्यासारखी झाली. त्या अवस्थेचे वर्णन १४६व्या चरणात केले आहे.

चरण १४६ : वृत्त - शिखरिणी.

न रंजे कारंजे निरखुनि फणीने फणफणी।
मुदेनें मोदेना नळगुणगणी जे गुणगुणी॥
न बैसे जे सेजेवरि न परिसे जे शुकगिरा।
न नाहे, माना हे न धरि ललना हेतु दुसरा॥१४६॥

एरवी मनाला आनंद देणारे कारंजे बघण्यातही तिचे मन लागत नाही (न रंजे). आपले केस विंचरण्याचीही शुद्ध तिला राहिली नाही की मुदा (केसांचे आभूषण) केसात खोवण्याची इच्छा तिला होत नाही. नळाशिवाय तिला दुसरं काहीच सुचत नाही. सेजेवर (शय्येवर ) बसून तिला चैन पडत नाही की शुकाचं बोलणं तिला मोहवत नाही. (न नाहे) तिला स्नान करण्याचीही शुद्ध नाही. थोडक्यात, तिच्या मनाला काहीच रुचेनासं झालं आहे.

आपल्या मनातील भावना वडिलांपाशी बोलण्याची तिची हिम्मत झाली नाही आणि त्यामुळे तिची प्रकृती बिघडू लागली. एक दिवस ती मूर्छित झाली. सगळीकडे धावपळ सुरू झाली. अनुभवी दासी उपचार करू लागल्या. आई धावत आली. तिला विजणवारा (पंख्याने वारा) करू लागली. या उपचारांनी शुद्धीवर आल्यावर ती आईला हळूच म्हणते,

a

"औषध नलगे मजला"

हे तर श्लेष अलंकाराचं अतिप्रसिद्ध उदाहरण आहे.

आपल्या या उपवर मुलीसाठी वरसंशोधन करायला पाहिजे, याची जाणीव होऊन भीमक राजा तिच्या स्वयंवराची घोषणा करतो. या पुढच्या २४९ चरणांपर्यंतच्या भागात स्वयंवरासाठी इंन्द्रादिक देवता, पराक्रमी राजे इत्यादींना पाठवलेली निमंत्रणं, दमयंती आणि तिच्या सख्यांमधील संवाद, इंद्रादिक देवांनीही नळाचं रूप धारण केल्यामुळे खर्‍या नळाला ओळखण्यासाठी चाललेला दमयंतीचा प्रयत्न इत्यादी वर्णन केलं आहे.
अखेर खर्‍या नळाला ओळखल्यावर दमयंतीच्या मनाच्या स्थितीचं वर्णन २५०व्या चरणात केलं आहे.

चरण २५० : वृत्त - वसंततिलका.

मायेचना सुख मनी, कमनीय बाला।
मायेसही विसरली; न पुसेच बा-ला॥
दूर्वादली कलितबंध-मधूक-माला।
तीणें अलंकृत करी नल-कंठनाला ॥२५०॥

त्या कमनीय बालेच्या मनात आनंद मावेना (मायेचना). त्या आनंदात ती आपल्या (मायेसही) आणि बापाला (बा-ला) विसरली. दुर्वादलांनी आणि कदलीबंधाने (केळीच्या सोपटाने) बांधलेल्या मधुक (मोहाची फुलं) मालेने नळराजाच्या कमळदेठासारख्या गळ्याला अलंकृत (सुशोभित) केलं. अशा प्रकारे नल-दमयंती यांचं मिलन झालं. चार दिवस लग्नसोहळा करून वधुवर मिरवत नेले, नानापरीची मिष्टान्नं खाऊन, भीमकाचा निरोप आणि आशीर्वाद घेऊन दमयंतीसमवेत नळराजा आपल्या नगरीत परतला.

अशा प्रकारे सुखान्त असणारं हे दमयंती स्वयंवर आख्यान.

व्याकरणाच्या दृष्टीने हे काहीसं क्लिष्ट आहे. पण ज्याप्रमाणे मनाला आनंद देणारं, मनाला स्पर्शून जाणारं संगीत ते उत्कृष्ट संगीत - मग त्यासाठी श्रोत्यांना तांत्रिक बाबी ठाऊक नसल्या तरी हरकत नसते, तद्वत या काव्याच्या व्याकरणात न शिरताही हे आपल्याला आनंद देऊन जाईल, हे खचितच!

श्रेयनिर्देश: चित्रे आंतरजालावरून साभार.


20191016-122815
अनुक्रमणिका

वाचन 34129 प्रतिक्रिया 0