Skip to main content

असू दे

लेखक गवि यांनी बुधवार, 30/10/2013 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीत फार फार प्रदूषण होतं. पण वात पेटवून दोन्ही कान गच्च दाबत जीव खाऊन दूर पळणारं पोरगं.. वळून वळून पाहात राहतं.. धम्माड स्फोट होतो.. पण आपल्याला काही होत नाही.. या जाणिवेत खूप सुख असतं.. मनगटात बळाच्या मनगट्या चढतात.. पुढे कधीच न चढणार्‍या.. म्हणून असूदेत थोडे फटाके..!! .. तेल तूप बेसन नेहमी महागच होत असतं.. स्वस्त नव्हे.. कितीही काहीही महाग झालं तरी फराळाचे डबे फळीवर चढतातच.. आणि गेल्यावर्षीचे दमट फटाके उन्हात वाळत पडतातच.. पण दिवाळीच्या तोंडावर महाग झालं म्हणून हेडलाईन्स तरी येतात.. अन मध्यमवर्गाचे हाल पुराव्याने शाबीत होतात. म्हणून असू दे थोडी महागाई..!! ... सगळा फराळ तेलातला..आरोग्याला बाधक म्हणतात.. पण शेजारच्या चकल्या हसतात तेव्हा बायाही हसतात.. विकट का होईना पण हसतात तर.. आईच्या शिकवणीचं आपलं मोहन मात्र कसं कडकडीत आणि बरोब्बर... बाया सुखावतात.. म्हणून असू दे थोडा तळकट फराळ..!! ... दिवाळीच्या संध्याकाळी चाकरमानी मन सुट्ट्यांच्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी खंतावून तयार होतं.. "बेंदूर बेंदूर सणाचं लेंढूर".. ने सुरु झालेलं ते सगळं "दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी".. ने संपतं.. आंघोळ तर रोजच करतात लोक.. काहीतर दोनदोनदा.. पण दिवाळीच्या पहाटे पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो.. धुतल्या मनाला दिवाळीच्या दुपारी मनातल्या मनात बांधायला एक तरी किल्ला मिळतो.. म्हणून पुढच्या दिवाळीच्या ओढीसाठी.. असू दे थोडा सुट्ट्यांचा दुष्काळ..!! - गवि
दिवाळी अंक वर्ष

वाचने 39316
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

व्वा दिवाळी सणाचं छान आणि चपखल वर्णन. अभिनंदन.

गविराज, जबरदस्त.. दिवाळी शुभ करणार तुम्ही, नक्कीच.. :-)दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

चाकरमानी मन सुट्ट्यांच्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी खंतावून तयार होतं.. खर आहे राव. बाकी लेख मस्त

छानच.. आता आमच्याकडून दिवाळीच्या गवि तुम्हाला व सर्व मिपाकरांना शुभेच्छाही असू दे म्हणतो ;)

मस्तच गवि... सर्वांना दिपावलिच्या मंगलमयी शुभेच्छा :)

साधु साधु अगदी असेच वाटते दर दिवाळीला.

झक्कास...

झक्कास! सर्वांना दीपावलीच्या हार्दिक आणि मंगलमयी शुभेच्छा! - (दर दिवाळीत 'दिवाळं' निघणारा) सोकाजी

नेहमीसारखंच!! आमच्या मनातलं.. जे आम्हाला बोलताही येत नाही, ते तुम्ही इथे उतरवलंत...

प्रासंगिक आहेच, गवि-टच देखील आहे. "आंघोळ तर रोजच करतात लोक.. काहीतर दोनदोनदा..पण दिवाळीच्या पहाटे पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो.." हे खासच!

खास गवि'टच' मुक्तक! दुसर्‍याच वाक्याला बालपणातल्या दिवाळीच्या सगळ्या आठवणी क्षणात नजरेसमोर आल्या. :)

असेच नेहमीप्रमाणे दिवाळीचे क्षण मस्त असू दे!. सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!

दिवाळीचे अगदी जसेच्यातसे वर्णन! दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

मस्तच!! दिवाळी अंक आल्याशिवाय दिवाळी आली असे वाटतच नाही :)

मान गये उस्ताद..
"बेंदूर बेंदूर सणाचं लेंढूर".. ने सुरु झालेलं ते सगळं "दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी".. ने संपतं..
खरयं, एरव्ही बजेट बजेट करताना दिवाळीत बॅलन्सकडे पार दुर्लक्ष होतं :)

आजच्या जमान्याच्या दिवाळीचे एकदम चपलख वर्णन… सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!!!

एकदम छान वर्णन.......... सर्व मिपाकरांना दीपावलीच्या शुभेच्छा!!! राघवेंद्र

खूपच आवडली. काही काळ काहीच सुचलं नाही. सगळं हातात धरलेल्या वाळूसारखं निसटंत चाल्लंय की काय असं वाटत होत पण "असू दे" असं पुन्हा पुन्हा वाचल्यावर खरंच वाटलं असू दे, सगळीच मजा काही संपलेली नाही. (पुन्हा एकदा आनंदी) रंगा

गविशेठ, भारी लिहिता राव !

आवडलं. नेमक्या शब्दात व्यतीत झालयं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्यवाद हो बुवा. पण आमच्या शाब्दिक बुडबुड्यांपेक्षा तुमची खर्याखुर्या फुलांनी बनवलेली रांगोळी सर्वार्थाने सुंदर आहे. पहाटे उठून तुम्ही ती ज्या निगुतीने बनवली आहे त्याचा जवाब नाही. एक आकार वेडावाकडा नाही की कुठे अंशभर ढोबळपणा नाही. आणि त्यात मिपाप्रेमाखेरीज लाभ किंवा फळाची काही अपेक्षा नसताना. टोपी काढली आहे.

सरस मुक्तक ! दु:खातही सुख शोधायची प्रवृत्ती भावली... म्हणतात ना की "हवं असलेलं मिळण्यात नाही तर मिळालेलं हवं असण्यात सुख असतं."

मुक्तक आवडलं. आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात येतं की दिवाळीचा उत्साह अजिबात कमी नाही. थोडी महागाई, थोडा फराळ, थोडे दमट आणि नवे फटाके, आणि असं सर्व सर्व मुक्तातून स्सहीच पोहचलं. >>>> पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो खासच. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

मजा आली, छान लिहीलंय.

बहुत खूब. वर तिमा म्हणतात त्यच्यशि सहमत.

झक्कास मुक्तक. सर्वाना दिवाळीच्या शुभेछा.

असु दे! असु दे! किती मनापासून उतरलय वास्तव अन सणाची ओढ! काय रोजचा कामाचा धबडगा असतोच, पण दिवाळीचा म्हंटल्यावर कसा हाताला जरा वेग येतो. तोच फराळाचा जिन्नस वर्षात कधी केलातरी असा चविला लागत नाही. चारच म्हणता म्हणता सहासात पदार्थ अस्सेच बनवले जातात. पैसा नाही म्हणता म्हणता चार कपडे खरेदी होतातच. फार छान लिहीलं गवि!

दिवाळीचे वास्तव अगदी तंतोतंत उतरलय लिखानातुन. :)