विकास यांची एक प्रतिक्रिया
विकास यांचे रा स्व संघाच्या धाग्यात डिस्क्लेमर वाचले. मला स्वतःला विकास यांचे लेखनापेक्षा प्रतिक्रियाच अधिक विचारार्ह वाटतात. त्या पटणे न पटणे भाग वेगळा आहे. विकास यांच्या प्रतिक्रियांच आउटसोर्सिंग विकी यांचे कडे दिले आहे असे मिभो म्हणतात. विकास आपल्या डिस्क्लेमर मधे म्हणतात.
"इतके दिवस गांधीचे मारेकरी असे बोंबलत त्यांच्या विरोधकांनी स्वतःचे (चुकीचे) शस्त्र बोथट केले, परीणामी आता जनतेला त्याचा काही फरक पडत नाही. याचा अर्थ सर्व स्वयंसेवक झाले अथवा संघाचे झाले असा नसून साम्यवादी आणि तथाकथीत समाजवादी यांची खरी प्रतिमा आता जनतेला समजून चुकू लागली आहे. मग आता बाकी कशावरून तरी झोडा असा हा प्रकार आहे."
साधना या समाजवादी विचारांना वाहिलेले साप्ताहिकात १२ जुलै २००८ मधील विकास यांची प्रतिक्रिया या निमित्त वाचा.या प्रतिक्रियेची पोस्टमन गिरी ( आउट सोर्सिंग म्हणा हव तर) आम्ही केली होती म्हणुन ती इथे द्यावीशी वाटते.
प्रतिक्रिया- समाजवाद्यांनी केलेली मोठी चुक
आपल्या १० मे च्या अंकातील डॉ
राहुल वसंत रेवले यांचा "समाजवाद्यांनी केलेली सर्वांत मोठी चूक!" हा लेख वाचनात आला आणि काही विचार/प्रतिक्रीया डोक्यात आल्या त्या आपल्याला कळवाव्याशा वाटल्या.
या लेखात सर्व प्रथम खटकलेला भाग म्हणजे साम्यवादाची केलेली गांधीजींच्या विचारधारेशी तुलना. मार्क्सवाद हा विचार , भारताला केवळ परक्याने सांगीतला म्हणूनच परका आहे अशातला भाग नाही तर त्यातील विचार हे आपल्या हाडामासाशी खिळलेल्या सामाजीक संस्कृतीसाठी पूर्णपणे भिन्न आहेत. मला कधी तरी कॉ. डांग्यांच्या नावाने वाचल्याचे आठवते की स्टॅलीन त्यांना म्हणाला होता की मार्क्सवाद हा भारतात रुजणे शक्य नाही. ह्यात कोण बरोबर कोण चूक हा भाग बाजूस ठेवूया पण त्याचे असे म्हणायचे मूळ कारण इतकेच असावे की भारतीयांची मानसीककता ही मार्क्सवादी विचारसणीत बसू शकत नाही.या उलट स्वतःस सनातनी हिंदू म्हणण्यात कमीपणा न बाळगणार्या गांधीजींचे विचार हे भारतीयांच्या मानसिकतेसाठी जवळ असणारे वाटतात
. वास्तव वेगळे असले तरी, कम्युनिझम तत्त्व म्हणून सर्वांना समान मानते. पण तसे गांधीजींनी आणि म्हणून पर्यायाने त्यांच्या विचारसरणीने मानलेले दिसत तरी नाही. अर्थात येथे सर्वांना समान मानणे आणि समान हक्क असणे यातील ढोबळ फरक लक्षात ठेवावा. म्हणून गांधीवादाला "अहिंसक कम्युनिझम" असे म्हणणे, कुठेतरी अयोग्य वाटले.
गांधीजींच्या विचारांना जगभरातील काही महान चाहते मिळाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यात दोन मोठी व्यक्तिमत्वे आहेत, ज्यांनी गांधीवादाचा सामाजीक संघर्षासाठी उपयोग केला - एक म्हणजे मार्टीन ल्यूथर किंग आणि दुसरे अर्थातच नेल्सन मंडेला. या दोघांनी गांधीजींच्या मार्गावरील चळवळ स्वतःच्या बांधवांच्या हितासाठी चालू केली - काही अंशी त्या मार्गावर ते यशस्वी पण झाले. तरी देखील त्यांच्यासाठी "परकीय विचारसरणी" असलेल्या अशा चळवळीस, स्वकीयांच्या हितासाठी राबवताना त्यांनी समाजाभिमुख आणि कालानुरूप बदल केले. परीणामी चळवळीचे तात्त्विक अधिष्ठान हे गांधीजींच्या विचाराशी प्रामाणिक पण व्यावहारीक आधिष्ठान मात्र स्वकीयांच्या जनसामान्यांच्या व्यावहारीक जगाशी प्रामणिक झाले. थोडक्यात आचारप्रणाली स्वकीयांना साजेशी राहील्यामुळे गांधीजींची विचारप्रणाली तत्त्वतः परदेशी न राहता वैश्विक होऊ शकली.
आता लेखातील मथळ्यासहीत आणि त्यातील संदर्भासंबंधी मूळ प्रश्न
: "समाजवाद्यांनी नक्की सर्वात मोठी चूक काय?" हे म्हणताना लेखकाने चूक कशा संदर्भात याचे स्पष्टीकरण दिलेले दिसत नाही. लेखकाच्या मते समाजवादी कशात कमी पडले? - समाजपरीवर्तनात? सत्ताग्रहणात? या दोन्हीत, का अजून कशात?
समाजपरीवर्तनात म्हणायचे असले तर समाजवादी गांधीजींच्या विचारापासून दुरावले ही एक चूक होती असे कोणी म्हणाले, तर थोड्याफार फरकाने मान्य होऊ शकेल. पण सत्तास्थानी येण्यात अथवा मिळालेली सत्ता सामान्यांसाठी राबवण्यात आणि तशी राबवता यावी म्हणून टिकवण्यात ते कमी पडले म्हणावेत तर मात्र म्हणावे लागते की याचा संबंध केवळ गांधीवादाशी जोडणे अयोग्य ठरेल. कारण, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या अहींसक चळवळीत गांधीजींच्या नेतृत्वाखालीच गांधीवादाची परीक्षा होऊ शकली आणि म्हणूनच त्यातील बलस्थाने आणि तॄटी यांबाबत आपण आजही लिहू शकतो. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गांधीजींच्या दुर्दैवी निधनामुळे गांधीवाद हा स्वराज्यात त्यांच्या नेतृत्वखाली आणणे शक्य झाले नाही. थोडक्यात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे गांधीजींच्या स्वप्नातील रामराज्य कसे होते, ते तसेच राबवले गेले/प्रयत्न केले गेले का वगैरे, "जर-तर" चे प्रश्न आहेत. त्यांची व्यावहारीक मिमांसा होणे नाही.
तरी देखील, समाजवाद हा केवळ शब्दात राहण्यापुरता आणि बोलताना बरे वाटण्याइतकाच (फील गूड) राहीला असे जर वाटले तर त्याची कारणे काय अथवा त्या संदर्भात समाजवाद्यांची (लहान/मोठी) चूक काय? - यावर प्रतिक्रीया म्हणून वर केलेल्या उहापोहासंदर्भात इतकेच म्हणावेसे वाटते की कुठल्याही वैचारीक चळवळीचे आधिष्ठान हे जनसामान्यांसाठी परके असले तर ती चळवळ कितीही बुद्धीनिष्ठ असली, बुद्धीवादी आणि प्रामाणिकपणे योग्य कारणासाठी असली तरी तीच्या यशाला एकतर मर्यादा तरी येतात अथवा अशा चळवळीसाठी यश हे क्षितीजाजवळ जमिनीस मिळणार्या आकाशासारखे ठरते. कालपरत्वे आणि समाजपरत्वे करावे लागणारे बदल जी विचारसरणी आत्मसात करते ती जिवंत म्हणता येईल, आणि या उलट तसे करत नसलेल्या विचारसरणी या एकतर मृतवत असतात अथवा निद्रीस्त.
"व्यक्ती अथवा समाज हे महत्त्वाकांक्षेविना मोठे होऊ शकत नाहीत आणि महत्त्वाकांक्षा ही चांगल्या अर्थाने पण त्याच वेळेस "डोळस" अहंकार असल्याशिवाय येऊ शकत नाही," हे विधान जर तत्त्वतः मान्य केले तर काय लक्षात येते? कुठेतरी, समाजातील अनिष्ठतेवर कोरडे ओढताना समाजवादी चळवळीने (आणि त्या संदर्भात मार्क्सवादी चळवळीनेदेखील) समाजाचा अहंकार तर दुखावलाच पण पर्याय म्हणून येथील मानसीकतेस रुचतील असे ठोस काहीच सुचवले नाही. जिथे जिथे कुठल्याही विचारसरणीने पर्यायी व्यवस्था दिली नसते तिथे त्या विचारसरणीचा एकतर लोप होतो अथवा त्यातील शहाणे नेतृत्व सिंहावलोकन करत, स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवत विचारसरणी स्थलकालसापेक्ष करते. त्यात विरोधासाठी विरोध नसतो तर स्वतःच्या आणि इतरांच्या उन्नतीसाठीचा राजसीक स्वार्थ असतो.
आज विचार करा जेथे अधुनीक समाजवाद तयार झाला त्या फ्रेंचांचा समाजवाद हा भांडवलशहांच्या विरोधात असेल पण जनसामान्यांपासून ते फटकारून वागतात असे वाचल्याचे निदान आठवत तरी नाही. तेच अमेरिकेत. येथील "डेमोक्रॅटीक" विचारसरणी ज्याला अमेरिकन पारीभाषेत "लिबरल्स" असे संबोधले जाते, ते समाजवादाशी जवळीक असलेले आहेत. पण त्यांची विचारसरणी ही अमेरिकन जनतेस "परकीय" अथवा स्वतःचे खच्चीकरण करणारी वाटत नाही. त्याच वेळेस अमेरिकन सामान्यांच्या भावनांना सांभाळत इथले "लिबरल" नेतृत्व सामाजीक बदल आणायला कमी देखील पडत नाहीत. परत, ते सर्व करत असताना त्यांची वैचारीक निष्ठा ही अमेरिका या देशासंदर्भातच असते. "जगाला प्रेम अर्पण्याच्या" भानगडीत ते पडताना दिसत नाहीत. कदाचीत म्हणूनच अमेरिकन जनसामान्यांना मात्र ते त्यांचे नुसतेच स्वकीय नाही तर तारणकर्ते वाटतात.
म्हणून म्हणावेसे वाटते की समाजवाद्यांनी विचारच करायचा असेल तर आत्मपरीक्षणार्थ काही प्रश्न स्वतःस विचारावेत - आपण जनसामान्यांशी फारकत करून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतोय का? अथवा, आपण देशाचे बळकट नेतृत्व वाटतो, का बलहीन नेतृत्व, जे स्वतः आधी जगाचा विचार करणारे आहे असे वाटतो? आपल्या विधानांतून आणि प्रतिक्रीयातून आपण समाज एकसंध करण्याच्या ऐवजी समाजात जात, धर्म, सामाजीक स्थान आदी संदर्भात भेद, तेढ तर निर्माण करत नाही आहोत ना? मुख्य म्हणजे कालपरत्वे चालत आलेला "समाजवाद" हा आपण "श्रॄती-स्मृती-पुराणोक्त" समजून त्यातच स्थलकालसापेक्ष बदल न घडवता रममाण तर झालेलो नाही आहोत ना?
तात्पर्यः अचूक कोणीच नसते आणि १००% चूकही कोणी नसते. पण त्यात जर काही घोडचूक असेलच तर ती आत्मपरीक्षण करून योग्य बदल घडवणे (करेक्टीव्ह ऍक्शन्स घेणे) ही असते. ती जर होत नसली तर रामदासांनी म्हणल्याप्रमाणे अवस्था होते:
अचूक यत्न करवेना, म्हणोनी केले ते सजेना |
आपुला अवगूण जाणवेना, काही केल्या ||
धन्यवाद
विकास देशपांडे
बॉस्टन
वाचने
7454
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
प्रतिक्रि
In reply to प्रतिक्रि by नितिन थत्ते
माप
चार ओळी
In reply to चार ओळी by मिसळभोक्ता
प्रतिक्रिया म्हणजेच लेख
विकास
In reply to विकास by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गैरसमज
सहमत
जनता
साधनशुचिता
हम्म...मजा आहे तर...
घाटपांडेज
In reply to घाटपांडेज by निमीत्त मात्र
वैयक्तिक
In reply to घाटपांडेज by निमीत्त मात्र
आग्रही
In reply to आग्रही by प्रकाश घाटपांडे
घाटपांडे, न
In reply to घाटपांडे, न by निमीत्त मात्र
निमित्त मात्र,
In reply to निमित्त मात्र, by बिपिन कार्यकर्ते
काही बोलायचे नाही असे ठरवले होते. पण आज राहवले नाही.
In reply to काही बोलायचे नाही असे ठरवले होते. पण आज राहवले नाही. by एकलव्य
विकासरावा
In reply to विकासरावा by निमीत्त मात्र
स्वागत!
In reply to निमित्त मात्र, by बिपिन कार्यकर्ते
आदरणीय
बिपिनशी सहमत
In reply to बिपिनशी सहमत by सहज
निमित्तमा
In reply to निमित्तमा by निमीत्त मात्र
बरेचदा उल्लेख
In reply to बरेचदा उल्लेख by सहज
जसेकी