यापूर्वीचे लेखन
जागतिकीकरण म्हणजे काय?
मागील भागात आपण जागतिकीकरण म्हणजे काय ते बघितले.आणि ते पूर्णपणे अंमलात आलेले नाही किंबहुना सद्यपरिस्थितीत येऊ शकत नाही हे उघडच आहे. आता या भागात आदर्श जागतिकीकरणाचे फायदे आणि तोटे यांचा विचार करू.या आणि पुढच्या काही लेखांमध्ये अर्थशास्त्रातील काही संकल्पनांचा उल्लेख करावा लागेल आणि त्यासाठी मराठी प्रतिशब्द न सापडल्यास मूळ इंग्रजी शब्दांचाच वापर करणार आहे.समजून घ्यावे ही विनंती.
संकल्पना क्रमांक १: Producation Possibility Frontier
अन्न आणि बंदुका अशा दोन गरजा समाजापुढे आहेत असे समजू. हे दोन शब्द प्रातिनिधिक आहेत. अन्न या शब्दात अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजा आणि शिक्षण,वैद्यकिय सेवा यासारख्या महत्वाच्या गोष्टींचा समावेश करता येईल.तसेच बंदुका या शब्दात संरक्षणसाहित्याबरोबरच चैनीच्या वस्तूंचाही (मॉल वगैरे) समावेश करता येईल. या वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारी समाजाकडील साधनसामुग्री मर्यादित असते. म्हणजे मनात येतील तितक्या बंदुका आणि पाहिजे तितके अन्न आपल्याला मिळू शकत नाही.उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून किती बंदुका आणि किती माप अन्न उत्पादित करता येईल याचा आलेख म्हणजे ’Producation Possibility Frontier’!
Producation Possibility Frontier
या आकृतीतील प्रत्येक बिंदू समाजाकडील सगळ्या साधनसामुग्रीचा वापर करून जास्तीत जास्त किती अन्न (बटर) आणि बंदुका तयार करता येतील याची माहिती देतो. या आकृतीत B,C आणि D हे बिंदू Producation Possibility Frontier वर आहेत. याचा अर्थ समाजाने आपल्याकडील साधनसामुग्रीचा पूर्ण उपयोग केला तर त्या बिंदूंशी संलग्न इतक्या प्रमाणातच बंदुका आणि अन्न तयार करता येऊ शकेल. X हा बिंदू या आकृतीच्या बाहेर आहे. म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी सद्यपरिस्थितीत त्या बिंदूशी संलग्न बंदुका आणि अन्न निर्माण करता येऊ शकणार नाही. तसेच A हा बिंदू या आकृतीच्या आत आहे.याचा अर्थ समाजाने आपल्याकडील साधनसामुग्रीचा योग्य पध्दतीने वापर केलेला नाही आणि त्याकारणाने अजून उत्पादन करायची क्षमता असतानाही उत्पादन तेवढ्या प्रमाणावर होऊ शकले नाही.
या Producation Possibility Frontier या आकृतीचा आकार बाहेर फुगणारा आहे.यामागचे कारण ’Law of diminishing returns'. त्याचे कारण पुढील भागात.
आता या सगळ्याचा जागतिकीकरणाशी संबंध काय? तर योग्य पध्दतीने जागतिकीकरण झाले आणि वस्तू/सेवा आणि मनुष्यबळ यांची अनिर्बंध देवाणघेवाण देशांच्या सीमांपलीकडे होऊ लागली तर प्रत्येक समाज Producation Possibility Frontier वरील A सारख्या आतल्या बिंदूमधून बाहेर पडून त्या आकृतीवर येऊ शकेल.आणि जे समाज यापूर्वीच या आकृतीवर आहेत (B,C,D) ते स्वत:चे Producation Possibility Frontier अधिक वाढवून X सारख्या बिंदूपर्यंत जाऊ शकतील. आता हे कसे घडेल? समजा एखाद्या देशात वाहनउद्योग आहे.वाहनांसाठी लागणारा एखादा भाग (समजा ससपेन्शन सिस्टिम) किफायतशीरपणे उत्पादन करायला लागणारी प्रणाली त्या देशात उपलब्ध नाही.तेव्हा त्या देशातील उद्योगांना तो भाग निर्माण करण्यासाठी अधिक वेळ,पैसा,मनुष्यबळ आणि कच्चा माल खर्च करावा लागेल हे उघडच आहे.जर का असा एखादा भाग इतर देशातून आयात केला तर तो आपल्याच देशात उत्पादित केलेल्या भागापेक्षा अधिक चांगला आणि स्वस्तात मिळू शकेल. तेव्हा आपल्या देशातील मनुष्यबळ,वेळ,पैसा आणि कच्चा माल ज्या गोष्टी अधिक चांगल्या पध्दतीने उत्पादित करता येतील त्यावर खर्च करणे शक्य होईल.म्हणजेच उत्पादन अधिक efficiently करता येईल म्हणजेच समाज Producation Possibility Frontier च्या जवळ जाईल.
तेव्हा योग्य प्रकारे झालेल्या जागतिकीकरणाचा पहिला फायदा म्हणजे सर्व समाजास Producation Possibility Frontier च्या जवळ नेणे.
अशाच योग्य प्रकारे झालेल्या जागतिकीकरणाचा फायदा म्हणजे युध्दखोरी कमी होणे.समजा दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो आणि त्यातून दोन्ही देशांमध्ये रोजगार निर्मिती झाली आहे.अशा दोन देशांमध्ये युध्द होणे म्हणजे दोन्ही देशांनी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे.स्वत:च्या हितसंबंधांना धक्का न लावता कोणताच देश युद्ध करू शकणार नाही आणि यातून युध्दखोरी कमी होईल. (अवांतर: ही तत्वे डोके ठिकाणावर ठेऊन विचार करू शकत असलेल्यांनाच लागू होतात. डोक्यात विष भिनलेल्या तालिबान्यांना ही तत्वे अजिबात लागू होणार नाहीत. अति अवांतर: आणि म्हणून भारताने तालिबान्यांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू करावा असे मी अजिबात म्हणत नाही.तसे करणे म्हणजे संकटाला आपण होऊन आमंत्रण दिल्यासारखे होईल.)
योग्य प्रकारे झालेल्या जागतिकीकरणाचा तिसरा फायदा म्हणजे जगातील सर्व समाजांना जवळपास सारखे राहणीमान जगायला मिळू शकते.घाना हा सध्याच्या काळातील एक मागासलेला देश आहे.पण जगातील कोकोच्या उत्पादनात त्या देशाचा वाटा मोठा आहे.सध्या भारत आणि चीनमधील कंपन्यांची इथियोपियासारख्या देशांमध्ये शेतजमीन विकत घ्यायची चढाओढ लागली आहे.तेव्हा योग्य ते प्रयत्न केल्यास घाना,इथियोपिया यासारखे देश भविष्यकाळात अन्नधान्याची निर्यात करू शकतील.आफ्रिका खंडावर minerals च्या बाबतीत निसर्गाचा वरदहस्त आहे.तेव्हा त्या गोष्टींची निर्यात ते देश करू शकतील. तेव्हा प्रत्येक देशाने आपला Core competence कशात आहे हे लक्षात घेऊन त्यावर सर्व लक्ष केंद्रित केले तर तो देश त्या वस्तूचा निर्यातदार होऊ शकेल. (आठवा माणूस गुहेतून बाहेर येऊन गावात राहू लागल्यावर काय झाले होते? प्रत्येक माणूस आपल्याला जी गोष्ट चांगली करता येते ती करू लागला. तसेच काहिसे देशांच्या बाबतीत) त्यातूनच त्या देशात रोजगाराच्या संधी वाढतील. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला की वस्तूंची मागणी वाढेल आणि इतर उद्योगांना चालना मिळेल.ज्या वस्तू किफायतशीरपणे त्या देशात उत्पादित करता येत नसतील त्या गोष्टी त्या देशाला आयात करता येतील.२०-२५ वर्षांपूर्वी भारतात गाडी,वातानुकुलित यंत्रणा अशा गोष्टी ’चैनी’ समजल्या जात होत्या.पण दरम्यानच्या काळात भारताने स्वत:चा Core competence ओळखला आणि त्यातून अनेक नवे रोजगार निर्माण झाले.त्यातून लोकांच्या हातात पैसा खेळू लागला आणि घरी गाड्या किंवा वातानुकूलित यंत्रणा असणे हे पूर्वीइतके कठिण राहिले नाही.जर गाडी/एसी असणे हे अधिक चांगल्या जीवनशैलीचे लक्षण असेल तर तसे चांगले जीवन भारतातल्या लोकांनाही जास्त प्रमाणावर जगता येऊ लागले आहे.असाच फरक जगात सर्वत्र का होऊ शकणार नाही?अर्थात या गोष्टीला वेळ लागेलच पण जगात सगळीकडे सर्वसमान राहणीमान लोकांना मिळू शकेल. समजा आफ्रिका खंडातील देशांनी शेतीकडे लक्ष द्यायचे ठरवले.आणि त्यामुळे त्या समाजांत इतर क्षेत्रातील मंडळींना (उदाहरणार्थ संशोधन) फारसा वाव नसेल अशी परिस्थिती उद्भवली. पूर्णपणे जागतिकीकरण म्हणजे वस्तू/सेवांबरोबरच मनुष्यबळाचीही देशांच्या सीमांपलीकडे देवाणघेवाण होणे.तेव्हा त्या परिस्थितीत घाना-इथियोपियातील संशोधकांना अमेरिकेत जाऊन संशोधन करायला आडकाठी येऊ नये.
आता जागतिकीकरणाचे तोट्यांकडे वळू.मी समाजवादी,गांधीवादी,कम्युनिस्ट यापैकी कोणीही नाही.तेव्हा अशा विचारांची मंडळी मी सांगू शकेन त्यापेक्षा अधिक तोटे सांगू शकतील याविषयी कसलीच शंका नाही.
वर उल्लेख केलेले सगळे बदल व्हायला वेळ हा लागणारच आहे. भारताने १९९१ मध्ये नवे आर्थिक धोरण स्वीकारले पण त्याचे फायदे समाजातील सर्वात शेवटच्या थरापर्यंत पोहोचायला अजून ५०-६० वर्षे तरी नक्कीच लागतील.आणि हा मधला बदलाचा काळ मोठा कष्टाचा असतो.
१) मी सांगलीत काही वर्षे राहिलो आहे.त्या शहरातील औद्योगिक वसाहतीतील अर्धे कारखाने १९९६ ते २००० या काळात बंद पडले.सध्या काय परिस्थिती आहे माहित नाही.पण याचे कारण म्हणजे मोठ्या कंपन्यांबरोबरच्या स्पर्धेला तोंड द्यायला त्या छोट्या कारखानदारांना शक्य झाले नाही.पूर्वी बंद अर्थव्यवस्थेत त्यांना फारशी स्पर्धा नव्हती.पण नव्या आर्थिक धोरणामुळे स्पर्धा वाढली आणि त्याचा दुष्परिणाम त्यांच्यावर नक्कीच झाला.
एक देश म्हणून विचार केला तर संगणक क्षेत्रामुळे गेल्या १५ वर्षात २५ लाख रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या.आणि लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे indirectly त्याहूनही अधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.त्यामानाने सांगलीच्या औद्योगिक वसाहतीत (आणि अशा इतर ठिकाणी) छोट्या कारखान्यांवर अवलंबून असलेल्यांचे रोजगार गेलेल्यांची संख्या कमी आहे.पण मधल्या बदलाच्या काळात अशा गेलेल्या रोजगारांचा प्रश्न नक्कीच उभा राहतो.हा प्रश्न अशा उद्योगधंद्यांमध्ये पाहिजे तितक्या प्रमाणावर स्पर्धात्मकता येत नाही तोपर्यंत नक्कीच चालू राहिल.
२) आज भारताचे सकल घरेलु उत्पादन (GDP) २००८ मध्ये सुमारे १.२ ट्रिलियन डॉलर होते.तर एकूण निर्यात १७५ बिलियन डॉलर आहे.याचा अर्थ भारताच्या एकूण सकल घरेलू उत्पादनापैकी सुमारे १५% वाटा निर्यातीचा आहे. समजा हाच वाटा भविष्यकाळात ५०% वर गेला. आणि अमेरिकेत आल्याप्रमाणे आर्थिक संकट आले.तर त्यावेळी भारतीय वस्तूंची मागणी अमेरिकेत नक्कीच घटणार आणि अमेरिकेतील मंदीचा परिणाम भारतावर लगेच होईल.ज्यावेळी मंदी चालू असते तेव्हा हे संकट मोठे वाटते.
३) समजा भारताने सेवाक्षेत्र हा आपला Core competence आहे असे ठरवले आणि संगणकासारख्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले.तर इतर क्षेत्रांमध्ये चमक असलेले लोक नव्या स्पर्धात्मक युगात मागे पडू शकतील.उदाहरणार्थ सध्या यांत्रिकी,रसायन अशा अनेक इतर अभियांत्रिकी क्षेत्रांमधील लोक संगणक क्षेत्रात काम करत आहेत.याचे कारण काय तर त्यांना त्या क्षेत्रात जास्त पैसा मिळवून देतील अशा संधी उपलब्ध आहेत.पण असे आपले क्षेत्र बदलायला जमले नाही तर अशा लोकांना स्वत:कडे बुध्दिमत्ता असूनही डावलल्यासारखे वाटेल.
४) स्पर्धात्मकता हा एकच महत्वाचा घटक झाल्यामुळे कंपनीला आपल्या सेवेची गरज नाही या एकाच कारणामुळे अनेकांच्या नोकर्या जातील.सध्या आलेल्या मंदीत काही लोकांच्या नोकर्या गेल्या त्या ते कामात कमी पडले म्हणून नाही तर सध्याच्या काळात त्यांच्या सेवेची कंपनीला गरज नाही म्हणून! शाश्वत नोकरीची हमी पाहिजे असलेल्यांना मात्र हा काळ नक्कीच कठिण आहे.
५) जागतिकीकरणाचे युग म्हणजे अत्यंत वेगाने होणार्या बदलांचे युग.आज मोठ्या मागणीत असलेले अनेक व्यवसाय भविष्यकाळात कालबाह्य होऊ शकतात आणि नवे व्यवसाय निर्माण होऊ शकतात.तेव्हा काळाची पावले ओळखून आपली दिशा बदलणे शक्य झाले नाही तर असे लोक नक्कीच संकटात सापडतील.एक उदाहरण द्यायचे झाले तर १९९४-९५ पर्यंत टाईपरायटर हे महत्वाचे उपकरण होते.त्या जोरावर अनेकांची पोटे त्या काळात भरली आहेत.पण नंतरच्या काळात झपाट्याने संगणिकीकरण झाल्याने संगणकाचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे झाले.ते ज्ञान मिळवू न शकलेले लोक संकटात पडले.असाच बदल केबल टिव्ही आणि उपग्रह वाहिन्यांच्या आगमनानंतर व्हिडियो कॅसेट उद्योगावर अवलंबून असलेल्यांवर झाला.
जाणकार मंडळींनी जागतिकीकरणाच्या इतर तोट्यांची माहिती द्यावी ही अपेक्षा.माझ्या मते बदलाच्या काळात याचे चटके अधिक जाणवतील.पण एक समाज म्हणून आपल्याला जागतिकीकरणाचे फायदे नक्कीच झाले आहेत यात शंका नाही.वर उल्लेख केल्याप्रमाणे गेल्या १५ वर्षात २५ लाख नोकर्या एकट्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण झाल्या.लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे लोक गाड्या,कपडे आणि इतर अनेक गोष्टी जास्त प्रमाणावर खरेदी करू लागले.त्यातून या आणि इतर क्षेत्रांमध्ये नवे रोजगार निर्माण झाले. मॉलच्या नावाने खडे फोडणे सोपे आहे पण त्याच मॉल मध्ये विकायला वस्तू ठेवायला लागत असलेल्या ’सप्लाय चेन’ मध्ये अनेक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत हे पण तितकेच सत्य आहे.अशा रोजगाराच्या संधी लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळेच निर्माण झाल्या आहेत हे नाकारता कसे येईल? आमच्या सांगलीत आमच्या घराजवळच एक शिंपी आहे.मधल्या काळात लोकांच्या हातात जास्त पैसा खेळू लागला त्याबरोबर जशी गाड्यांची आणि इतर गोष्टींची मागणी वाढली तशीच चांगले कपडे शिऊन देणार्या शिंप्यांची सुध्दा.त्या काळात त्याने शिंप्याचे दुकान चालू केले. अर्थाअर्थी जागतिकीकरणाशी त्याचा संबंध वाटत नाही.पण त्याचा indirect संबंध नक्कीच आहे.लोकांच्या हातात अधिक पैसा खेळू लागला की अनेक वस्तूंची/सेवांची मागणी वाढते आणि त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात.आणि असा पैसा अधिक खेळू लागला यात नव्या आर्थिक धोरणांचा वाटा नक्कीच आहे हे वर स्पष्ट केले आहे.
आज अनेक ठिकाणची गरीब मुले (उदाहरणार्थ घरोघरी धुण्याभांड्याची कामे करणार्यांची मुले) १०-१२ वी पर्यंत शिकली तर मॉलमध्ये हेल्पर किंवा सेल्समन यासारखी कामे करू शकतात निदान तसा विचार तरी करू शकतात.हे सरसकट विधान नक्कीच नाही पण आपल्या पालकांपेक्षा चांगल्या दर्जाचे आयुष्य जगायची संधी त्यांना हळूहळू निर्माण होत आहे.अशाच रोजगाराच्या संधी निर्माण होऊन पुढील काळात गरीबी कमी होणार आहे.याला वेळ नक्कीच लागेल आणि मधल्या काळात त्रास नक्कीच होईल पण ती किंमत मोजणे हितकारक ठरेल असे मला वाटते.
--विल्यम जेफरसन क्लिंटन
याद्या
43562
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
टू गुड.
भांडवलदारांनी
Core competence
माझा मुद्दा असा आहे की,
प्रमेयसाहेब
In reply to माझा मुद्दा असा आहे की, by प्रमेय
हे झाले केवळ युरोपचे...
In reply to प्रमेयसाहेब by क्लिंटन
वा...
हा जो
Production Possibility Frontier आणि जागतिक व्यापार
In reply to हा जो by नितिन थत्ते
लेख छानच...
In reply to Production Possibility Frontier आणि जागतिक व्यापार by क्लिंटन
फायदे तोटे
जागतिकीकरणाचे इतिहासकार