नवीन वर्षाचे संकल्प
आज गुढी पाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक..
कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात करण्यास उत्तम दिवस. सर्व मिपाकरहो, चला काही संकल्प करूया -
१. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी कुठेही कुठल्याही स्वरुपात कचरा न टाकणे. अगदी चॉकलेटचा, मिंट किंवा त्या आकारच्या गोळीचा कागद, रॅपर इतका लहान कागदसुद्धा, प्लॅस्टिक कचरापेटीशिवाय इतरत्र कुठेही न टाकणे.
२. अनेक वेळेस आपण स्ट्रॉ वापरतो. ती कचरापेटीतच टाकणे.
३. गड किल्ले, पर्यटन स्थळे इथे फक्त पाऊलखुणाच मागे सोडणे. आपण नेलेल्या सर्व वस्तु आणि इतर कचरा जसे प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे परत आणणे व कचरा पेटीतच टाकणे.
४. शक्य तिथे खरं तर कायमच प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्ज न वापरणे. कापडी, ज्यूटच्या उत्तम पिशव्या मिळतात त्यांचा वापर करणे. विनाकारण प्लॅस्टिकची पिशवी देणार्या दुकानदाराला पिशवी परत करणे.
५. टिश्यु पेपर्सचा अतिवापर टाळणे. पूर्वीप्रमाणे रुमाल जवळ बाळगून त्याचाच उपयोग करणे. टिश्यु पेपर वापरणे आवश्यक असल्यास त्याचा वापर गरजेप्रमाणे व प्रमाणातच करणे.
६. वेळ व सोय या प्रमाणे शक्य असेल तेव्हा वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा उपयोग करणे.
७. जवळच्या अंतरासाठी (१ किलोमीटर पर्यंत तरी) वाहनाऐवजी चालत जाणे.
८. शक्य तेव्हा २ मजल्यांपर्यंत तरी लिफ्टचा वापर न करणे.
९. गरज नसेल तेव्हा सर्व प्रकारची वीजेवर चालणारी उपकरणे, दिवे इ. बंद ठेवणे.
१०. वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळणे. सिग्नल किंवा जिथे थांबावे लागेल अशा ठिकाणी वाहन बंद ठेवून इंधन वाचवणे.
११. पाण्याचा गरजे पेक्षा जास्त वापर न करणे. पाणी वाया जाऊ न देणे.
१२. अन्न वाया जाऊ न देणे. विशेषतः हॉटेल, कँटिन, मंगल कार्ये अशा ठिकाणी गरजेइतकेच घेऊन संपवणे. हॉटेल मध्ये शिल्लक राहिलेच तर उष्टे नसलेले अन्ने पॅक करुन घ्या. चक्क एखाद्या गरीबाला, रस्त्यावर, फुटपाथवर अर्धपोटी, उपाशी झोपलेल्या भिकार्याला द्या!.
यात कोणाही व्यक्तिला उपदेश करण्याचा अजिबात हेतू नाही. आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि इतरांना सांगा.
सर्व मिपाकर हे सूज्ञ आणि सुजाण नागरिक आहेत यावर माझा विश्वास आहे. यातल्या काही किंवा बर्याच गोष्टी अनेक जण करतही असतील. या यादीत भर घालता आली तर अतिशय उत्तम.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर स्वतःला, समाजाला, महाराष्ट्राला व आपल्या देशाला समृद्ध करण्याचा संकल्प करुया...
नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
वाचन
4809
प्रतिक्रिया
0