इनका क्या करें ?
खूप वर्षांपूर्वी ब्ल्याकँडव्हाईट् च्या जमान्यामधे - जेव्हा टीव्ही थोडे तास असायचा - तेव्हा पाहिलेले काहीही (अक्षरशः काहीही ) टीपकागदाप्रमाणे शोषले जायचे. मनात कायमचे वसतीला येऊन रहायचे. त्याकाळात पाहिलेली एक "फिल्म्स (उच्चारी "फ्लिम") डिव्हीजन की भेंट्"अजून आठवते. फिल्मचे शीर्षक होते : "इसका क्या करें ?" सहलीला गेले असतानाचा कचरा तिकडेच इतस्ततः टाकणार्या एका समूहापैकी एक छोटा मुलगा शेवटी तो कचरा हातात गोळा करतो आणि त्या सर्वाना विचारतो : " हां , चले तो जाते हैं हम यहांसे , लेकिन इसका क्या करें ?" हीच फ्रेम मग शेवटी फ्रिज होते आणि फिल्म संपते.
आधुनिक, वेगवान आयुष्य जगताना - मग तो वेग तुम्हाला मान्य असो की नसो , त्या वेगाबरोबर पळणे अपरिहार्यच - अनेकदा दुर्मिळ झालेल्या निवांत क्षणी मनात त्या फिल्मचे शीर्षक रुंजी घालते. आपल्या भूतकाळात, जडणघडणीच्या वर्षांत आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आवडी-निवडींचे, राग-लोभांचे थोड्याबहुत फरकाने एक गाठोडे जमविलेले असतेच. आपापल्या वकूबाप्रमाणे , अनुभवाप्रमाणे, संवेदनशीलतेप्रमाणे हे गाठोडे लहान-मोठे असायचे. शेवटी "जिसका जितना आंचल था, उतनी सौगात उसे मिली." आज प्रस्तराचे दोन-तीन लेप वयोमानानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार चढल्या-उतरल्यानंतर आपल्या गाठोड्यातल्या गोष्टी उलगडून पाहाव्यात तो मनात प्रश्न येतो "इनका क्या करें ?" त्यापैकी काही गोष्टींचा उहापोह करून मी सुरुवात करतो.
एक काळ असा होता की धाकट्या मंगेशकरांचे अस्मादिक फार मोठे पंखे होते. कॉलेजच्या पाच वर्षांत साधारण पन्नासवेळा त्यांचा कार्यक्रम मी (आणि माझ्या अजून एका मित्राने) पाहिला असेल. काय झपाटलेले दिवस होते ते ! निम्न्-मध्यमवर्गात रहाणार्या एका कॉलेजमधल्या मुलाकरता इतके वेड लागणे खरे तर न परवडणारे . वडीलधार्याना वाटायला लागले होते : याचा बुद्धिभ्रंश झाला ! पण या माणसाने , त्याच्या संगीताने , त्याच्या गायकीने आणि एकूण विदग्ध व्यक्तित्वाने मला एका नवीन जगाची ओळख करून दिली. जी गाणी बालपणी रेडियोच्या रतीबामुळे केवळ सवय म्हणून बर्याचदा कानांवरून गेली होती , पौगंडावस्थेच्या प्रवेशद्वारावर त्या गाण्यांच्या व्युत्पतीची , त्यामागील अर्थाची , आणि पर्यायाने काव्याच्या प्रदेशाची ओळख झाली या माणसामुळे , त्याच्या कार्यक्रमामुळे. आणि काय झाले कोण जाणे , पण या कार्यक्रमाला कुठेतरी दृष्ट लागली. आपल्या निकृष्ट दर्जाच्या मुला-मुलीला ते या कार्यकर्माद्वारे "प्रमोट्" करायला लागले. तालवाद्यातले मातबर साथीदार त्याना सोडून जायला लागले. गाण्यापेक्षा भाषणबाजी , "पुढच्या पिढीचे" भीषण गाणे यात सर्व वेळ जायला लागला. आणि जे कधी घडेल असे वाटले नव्हते ते घडले - मी एक-दोन कार्यक्रमात चक्क उठून आलो. आणि त्यानंतर मी कार्यक्रमाला जायचे कायमचे थांबवले.
आज त्यांचे गाणे , १६-१७ वर्षांचा मी - ज्याने ते गाणे त्या बहराच्या काळात पहिल्यांदा ऐकले , त्या सर्व आठवणी गाठोड्यात आहेत. आज इतक्या वर्षांनंतर आणि हजारो मैलांवर जेव्हा मी त्याचा विचार करतो तेव्हा त्याबद्द्ल एक प्रकारची निर्विकारता येते. "इसका क्या करें ?" या प्रश्नाच्या कक्षेत बसणार्या या सर्व गोष्टी.
तुमच्यापैकी कुणाला अशा प्रकारचा अनुभव कधी येतो काय ?
वाचने
8311
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
काही प्रश्नाची उत्तरे शोधता येत नाही.
अनुभव
माझा..
दोन्ही आठवणी जपून ठेवा.
तेव्हा वाटले तेही बरोबर........
मुद्दा खरा!
पुढच्यास ठेच...
वझं
In reply to वझं by प्रकाश घाटपांडे
तुमचे टिपण
In reply to तुमचे टिपण by मुक्तसुनीत
टिप्पणी
वझं
बदल अपरीहार्य आहे.....
In reply to बदल अपरीहार्य आहे..... by दीपा॑जली
बदल
In reply to बदल by मुक्तसुनीत
मुक्तसुनीत छान विषय,
प्रश्न
बघा