मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हा "विजय" कुणाचा?

विकास · · काथ्याकूट
आज महात्मा गांधींच्या आठवणी असलेल्या काही वस्तू भारताला परत एकदा मिळाल्या. याचा आनंद झाला आणि तसा होण्याची कारणे अशी:
  1. ऐतिहासीक व्यक्तींच्या वस्तु या त्या त्या राष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा ठेवा आहे. गांधीजींच्या वस्तू या नक्कीच भारतासाठी ठेवा आहेत त्यामुळे त्या भारतात संग्राह्य म्हणून राहणे महत्वाचे वाटते.
  2. एका भारतीय उद्योगपतीने, "विजय मल्या" ने $1.8 million ला ते विकत घेतले.
अर्थात आता कलगीतुरा चालू झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या अंबिका सोनी म्हणाल्या ते आमच्यामुळेच झाले आणि आम्ही सतत त्याच्या (मल्यांच्या प्रतिनिधीच्या) संपर्कात होतो आणि हे "ठरवून" घडवून आणले. अर्थात विजय मल्याने ताबडतोब हे विधान खोडत सांगितले की सरकार (सरकार पक्ष) कडून कोणीही कधीही संपर्क केला नाही आणि त्यांनी हे स्वतःच्या मनाने केले... आता काही प्रश्न मनात आले:
  • गांधीजींच्या या वस्तू सर्वप्रथम भारताच्या बाहेर गेल्याच कशा? गांधींजींच्या वस्तू हे ते गेल्यावर वास्तवीक तत्कालीन सरकार जे अर्थातच गांधीजींचे भक्त होते त्यांच्या अथवा गांधींजींच्या आश्रमात असायला हव्या होत्या. अर्थात कुठल्याही गांधीजींच्या चेल्याच्या/भक्ताच्या ताब्यात असायला हव्या होत्या.
  • गांधीजींच्या गांधीवादात धंदा, जीवन, राहणीमान यांच्या संदर्भात साधनशुचितेला महत्व आहे. तसे असणारे प्रामाणिक गांधीवादी आजही नक्कीच भारतात असतील, जरी ते प्रसिद्धीच्या झोतात नसले तरी. मात्र त्यांना ह्या वस्तु लिलावात विकत घेणे शक्य झाले नाही. तसेच ते गांधीवादी उद्योग घराणे असलेल्या बिर्लासमुहास पण जमले नाही अथवा तसे करावेसे त्यांना वाटले नाही. विजय मल्या नक्कीच गांधीवादी नसावेत. त्यांच्या धंद्यातील साधनशुचिता नक्की कशी आहे ते माहीत नाही. शिवाय त्यांचे उत्पादन गांधीजयंतीस बर्‍याच ठिकाणी साधे विकता देखील येत नाही, त्या दिवशी लोकांनी वापरू देखील नाही अशी अपेक्षा असते. पण अशा विजय मल्यांनी हा लिलाव जिंकून आपला मान परत घरी आणला.
मग मला सांगा हा विजय नक्की कुणाचा?
  1. ज्या गांधीवाद्यांनी ह्या वस्तू देशाबाहेर जायला मदत केली त्यांचा आणि त्यांच्यामुळे आज ज्या परदेशी नागरीकाला $1.8 million मिळाले त्याचा?
  2. ज्या काँग्रेसने आता एका अर्थी गांधीजींच्या संदर्भातील यश स्वत:च्या पदरात खेचून घेत आहे असे असत्य सांगत गांधीवादातील मूळ तत्वालाच धाब्यावर बसवले त्यांचा?
  3. विजय मल्यांचा, ज्यांनी त्यांचा उद्योग, हा उद्योगातील नितीनियम लक्षात घेऊनच चालवला आणि त्यातील यशाचा उपयोग हा परत एका अर्थी ऐनवेळेस धावून देशाला मदत करायला केला त्यांचा? ("एका अर्थी" अशासाठी म्हणले कारण त्यांना यात प्रसिद्धी मिळणार त्याचा ते फायदा घेतीलच. म्हणजे १००% निस्वार्थी नाही, जरी कौतुकास्पद असले तरी)
  4. का गांधीजी आणि गांधीवादाचा? कारण आज ६० वर्षांनी देखील भारतातील जनतेस त्यांचे कसे का असेना पडले होते आणि त्यातील एकाने परत त्यांच्या आठवणी घरी आणल्या.
ह्याचे उत्तर वास्तवीक "कृष्णधवल" नजरेतून पहाता येणार नाही. त्यात अनेक छटा असून शकतात... तुम्हाला काय वाटते?

वाचन 4545 प्रतिक्रिया 0