नमस्कार मंडळी,
माझ्या निवडणुक अंदाजाच्या पुढील भागात आता वळू या पश्चिम भारताकडे. (डिस्क्लेमरः हे अंदाज राजकिय परिस्थितीचे थोडेफार निरिक्षण करून मी बांधलेले अंदाज आहेत. ते किती बरोबर किंवा चुकीचे आहेत यासाठी १६ मे पर्यंत थांबावे लागेल)
१) गुजरात: (एकूण जागा: २६)
गुजरातमध्ये मार्च १९९८ पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. ऑक्टोबर २००१ पर्यंत केशुभाई पटेल मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात भाजपाची नाव बुडती झाल्यावर पक्षाने संघप्रचारक नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवले. गोध्राकांडानंतरच्या दंगलींनंतर मोठया प्रमाणावर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण झाले आणि डिसेंबर २००२ मध्ये झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकींमध्ये मोठे यश मिळवले.२००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची पीछेहाट झाली. २६ पैकी १४ जागा भाजपला १२ जागा काँग्रेसला मिळाल्या. १४ पैकी २ जागा भाजपला ४०० आणि ८०० मतांच्या आघाडीने मिळाल्या. पण त्यानंतर मोदींनी मागे वळून बघितले नाही. त्यानंतर झालेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका मोदींनी पक्षाला एकहाती जिंकून दिल्या. २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळवले. आज गुजरातमध्ये मोदींना टक्कर देऊ शकेल असा नेता काँग्रेस पक्षाकडे नाही.तसेच मोदींनी केलेल्या विकासकामांमुळे भाजपची स्थिती भक्कम आहे असे वाटते. २६ पैकी २० जागा तरी भाजपला मिळतील असे वाटते.
एकूण जागा: २६
भाजप: २०
काँग्रेस: ६
२) महाराष्ट्र (एकूण जागा: ४८)
महाराष्ट्रासाठी दोन वेगळ्या संभावनांचा विचार करून अंदाज करत आहे. पहिली संभावना अशी की राज्यात २००४ प्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरूध्द शिवसेना-भाजप अशी लढत होईल. आणि दुसरी संभावना अशी की राज्यात काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना विरूध्द भाजप अशी तिहेरी लढत होईल.
शक्यता क्रमांक १:
नारायण राणेंचे बंड शमल्यानंतर काँग्रेस पक्षाची स्थिती कोकणात गेल्या अनेक वर्षात नव्हती इतकी भक्कम असेल.त्यातून रामदास कदमांसारखा नेता नाराज आहे अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तर कोकणात युतीची परिस्थिती नाजूक असेल. २००४ मध्ये राजापूर आणि रत्नागिरी या जागा अनुक्रमे सुरेश प्रभू आणि अनंत गीते यांनी सहज जिंकल्या होत्या.पण नारायण राणेंच्या बंडानंतर राणेंनी मालवण आणि राजापूर या विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करवली होती. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव सारखा खंदा वीर शिवसेनेने काही कारण नसताना गमावला आणि आता चिपळूणातही राष्ट्रवादीचा जोर आहे.तेव्हा तळकोकणातील दोन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीलाच मिळतील. रायगडमधून अंतुलेंना तोंड देणारा समर्थ उमेदवार युतीकडे नाही. पूर्वी शेकापतून शिवसेनेत गेलेल्या दि.बा.पाटलांना उमेदवारी शिवसेनेने देऊन पाहिली.पण त्याचा उपयोग झाला नाही.ही जागा शिवसेनेने कधीच जिंकली नाही. जर अंतुले उमेदवार असतील तर काँग्रेसचा विजय नक्की.
मुंबईत राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना-भाजपची मते काही प्रमाणावर तरी खाईलच. तरीही राम नाईक, मोहन रावले, मनोहर जोशी या ३ जागा युतीला मिळायला हरकत नाही. यावेळी अरूण गवळी बसपचा उमेदवार म्हणून दक्षिण-मध्य मुंबईत उभा राहणार आहे.तरीही तो युतीविरोधी मते फोडायचे काम करून त्याचा फायदा मोहन रावल्यांना मिळेल असे वाटते. तिसरा उमेदवार मते फोडायला नसेल तर युतीला ईशान्य मुंबईची जागा जिंकणे कठिण जाते. १९८९ मध्ये त्यावेळी रिपब्लिकन पक्षात असलेल्या नीलम गोरे यांनी निवडणुक लढविल्यामुळे जयवंतीबेन मेहतांना, १९९६ मध्ये स्वत: रामदास आठवलेंनी निवडणुक लढविल्यामुळे कै.प्रमोद महाजनांना आणि १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या राममनोहर त्रिपाठींमुळे किरीट सोमैयांना विजय मिळवता आला होता. बाकी तिसरा उमेदवार नसताना १९८४,१९९१,१९९८ आणि २००४ मध्ये काँग्रेस पक्षाचे गुरूदास कामत सहज विजयी झाले होते. यावेळी सुध्दा तिसरा उमेदवार असेल असे वाटत नाही. तेव्हा यावेळी गुरूदास कामत बाजी मारायची शक्यता जास्त. प्रिया दत्तची जागा काँग्रेसला नक्की. बाकी २६/११ चा प्रभाव निदान मुंबईत तरी मतदानावर पडेल असे वाटते. तेव्हा दक्षिण मुंबईची जागा युती जिंकू शकेल. तेव्हा मुंबईत युतीला ४ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला २ जागा मिळतील असे वाटते. गोविंदाला उमेदवारी द्यायची कसरत काँग्रेस पक्ष करेल असे वाटत नाही.आणि शाहरूख खाननेही निवडणुक लढविणार नाही असे जाहिर केले आहे. तेव्हा राम नाईकांना ही निवडणुक जिंकता यावी.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे,भिवंडी,कल्याण आणि डहाणू पैकी ठाण्याची जागा युतीकडे नक्की जाईल. कल्याणच्या जागेत बेलापूर आणि उल्हासनगर या राष्ट्रवादीच्या वर्चस्वाचा भाग समाविष्ट आहे.त्यामुळे डोंबिवली-कल्याणमध्ये युती तर बेलापूर-उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला मताधिक्य मिळेल. पण बेलापूरची लोकसंख्या जास्त असल्यामुळे आणि तिकडे गणेश नाईकांनी राष्ट्रवादीचा गड राखला असल्यामुळे कल्याणमधून राष्ट्रवादीचे वसंत डावखरे निवडून येतील असे मला वाटते. डहाणू आणि भिवंडीविषयी सांगणे जरा अवघडच आहे. तरी ढोबळ मानाने प्रत्येकी एक जागा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकेल असे धरतो.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक-धुळे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. तेव्हा तिकडच्या ४ पैकी ३ किंवा अगदी ४ जागाही त्यांना मिळाल्या तर त्यात आश्चर्य वाटू नये. तशीच परिस्थिती भाजपची जळगावात आहे.भाजपचे खासदार प्रश्न विचारण्यासाठी पैसे स्वीकारण्याच्या प्रकरणात गोत्यात आले पण तरीही पक्षाने पोटनिवडणुकीत बाजी मारली. तेव्हा जळगावातील दोन जागा भाजपच्या नक्की असे वाटते.
विदर्भात शेतकरी आत्महत्या प्रकरणांमुळे वातावरण सरकारविरोधी आहे असे दिसत आहे. पूर्वीच्या ११ वरून मतदारसंघ पुनर्रचनेनंतर विदर्भात १० जागा झाल्या आहेत. २००४ मध्ये नागपूर वगळता सर्व जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. त्यावेळी बहुजन समाज पक्षाने मोठ्या प्रमाणावर मते खाल्यामुळे युतीचे काम सोपे झाले. भंडारा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांचा पराभव सुमारे ३ हजार मतांनी झाला. तिकडे बसपाच्या हत्तीने ९१ हजार मते घेतली होती. आता हत्तीचे सामर्थ्य वाढते असल्यामुळे २००४ ची पुनरावृत्ती होईल अशी चिन्हे आहेत. तरीही अनुकूल परिस्थितीचा फायदा शिवसेना-भाजपला कितपत उठवता येईल का हा प्रश्नच आहे. अशीच अनुकूल परिस्थिती असूनही चिमूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभवच झाला होता.तरीही ढोबळ मानाने विदर्भातील १० पैकी ७ जागा युती आणि ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस जिंकेल असे धरतो.
मराठवाड्यात मागच्या वेळी ८ पैकी ६ जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. यावेळी नांदेडमधून केंद्रिय मंत्री सुर्यकांता पाटील यांना मागच्या वेळेप्रमाणेच विजय मिळेल अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले लोकसभेतील संख्याबळ वाढावे म्हणून राज्यातील मंत्र्यांना लोकसभेसाठी उमेदवारी द्यायचे धोरण अवलंबले आहे.त्यात परभणीतून सुरेश वरपूडकर आणि जालन्यातून राजेश टोपे यांना उमेदवारी द्यायचे घाटत आहे.तेव्हा युतीला मराठवाड्यातून निवडणुक मागच्या वेळेप्रमाणे सोपी जाईल असे वाटत नाही. बीड मधून गोपीनाथ मुंडे नक्कीच जिंकतील.तेव्हा ढोबळ मानाने मराठवाड्यातील ४-४ जागा शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असे मला वाटते.
पश्चिम महाराष्ट्र हा तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे.कोल्हापूरमधून सदाशिवराव मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातून निवेदिता मानेंना विजय मिळवणे सोपे जाईल. हातकणंगले मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी उभे राहिले तर ते कडवी लढत देतील पण तरीही त्यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता येईल असे वाटत नाही.सातारा-कराडमधून तर राष्ट्रवादीला पर्याय नाही.सांगलीतून वसंतदादांच्या पुण्याईवर गेली अनेक वर्षे प्रकाशबापू पाटिल निवडून येत असत.आता त्यांच्या नंतर प्रतीक पाटिल यांना ही निवडणुक जिंकणे जड जाऊ नये.मतदारसंघांच्या पुनर्रचनेत पुणे जिल्ह्यात ४ लोकसभा मतदारसंघ आले आहेत.बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून स्वत: शरद पवार उभे राहणार असे सध्याचे चित्र आहे. तिथून त्यांना पराभूत करणे स्वत: भगवंतालाही शक्य होणार नाही.मावळ मतदारसंघात कर्जत आणि पनवेल हे रायगड जिल्ह्यातील भाग समाविष्ट झाले आहेत.तिकडे शेकापचा जोर असला तरी उरलेल्या ४ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा जोर असल्यामुळे मावळची जागा राष्ट्रवादी जिंकेल असे वाटते. पुणे शहरात मात्र कडवी लढत असेल असे वाटते. शहर मतदारसंघात सदाशिव पेठ आणि कोथरूड हा युतीचे वर्चस्व असलेला भाग समाविष्ट आहे. हडपसर हा पूर्वी शहर मतदारसंघात असलेला भाग आता शिरूर मतदारसंघात गेला आहे.या पार्श्वभूमीवर शहर मतदारसंघातून युतीने तुल्यबळ उमेदवार दिल्यास कलमाडींना निवडणुक कठिण जाऊ शकेल.पण शहरातून बसपने डी.एस.कुलकर्णींना उमेदवारी द्यायचे घाटत आहे.ते डी.एस.के.विश्व सारख्या मोठ्या संकुलांमधून बरीच मते खेचू शकतील.अर्थात विजयी होण्यासाठी ती पुरेशी असतील असे नाही पण ती मते युतीच्या पारड्यातून जाणार असल्यामुळे डी.एस.के. यांच्या उमेदवारीमुळे युती थोडी अडचणीत येईल असे वाटते.तेव्हा पुणे शहराविषयी keeping fingers crossed.
तेव्हा शक्यता क्रमांक १ प्रमाणे निवडणुक झाल्यास पुढील चित्र उभे राहिल असे वाटते.
एकूण जागा: ४८
काँग्रेस: १३
राष्ट्रवादी काँग्रेस: १३
भाजप: १३
शिवसेना: ८
रिपब्लिकन पक्ष: १ (रामदास आठवले)
शक्यता क्रमांक २: (काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना विरूध्द भाजप)
या परिस्थितीत तळकोकणात पूर्वीची राजापूरची जागा काँग्रेस ला नारायण राणेंच्या प्रभावामुळे नक्की. रत्नागिरीची जागा शिवसेनेला मिळू शकेल. कारण रत्नागिरी आणि चिपळूण असे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, भास्कर जाधवांसारखा मोहरा राष्ट्रवादीकडे आहे. रायगडची जागा काँग्रेसला मिळणे जड जाऊ नये.
मुंबईत ६ जागांमध्ये भाजपची गुजराती मते आणि शिवसेनेची मराठी मते विभागली जातील.त्यात राज ठाकरेंची मनसे शिवसेनेची मते खाईलच. राष्ट्रवादीची मुंबईत ताकद खूप जास्त नाही.नबाब मलिक आणि सचिन आहिर हे त्यांचे मुंबईतील महत्वाचे नेते आहेत.प्रिया दत्त आणि गुरूदास कामत या दोन जागा काँग्रेसला नक्कीच मिळतील. गुरूदास कामतांचे काम आणखी सोपे होईल कारण मुलुंड-घाटकोपरमधली गुजराती मते भाजपलाच मिळतील.बाकी शिवसेनेची मते आणि भांडुपमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची मते एकत्र केली तरी ती विजय मिळवायला पुरेशी असतील असे वाटत नाही. कारण भाजपची गुजराती मते गमावल्याने झालेले नुकसान मोठे असेल.शिवसेनेच्या मोहन रावलेंना विजय मिळवणे सोपे जाईल. पण २००४ मध्ये त्या जागेवरून राष्ट्रवादीने सचिन आहिर यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांना मतेही चांगली मिळाली होती.त्या जागेवरून दोन पक्षांत भांडणे होणार नाहीत याची काळजी दोन पक्षांना घ्यावी लागेल.मनोहर जोशींना माटुंग्यातून भाजपची हक्काची मते मिळणार नाहीत. तरीही दादर-परळ-लालबागमधील शिवसेनेची मते आहेतच.नेहरूनगरमध्ये राष्ट्रवादीची मते जोशींना मिळतील आणि माटुंग्यातील अमराठी मते गमावावी लागतील ती भरून निघतील.तेव्हा मनोहर जोशींना विजय मिळवणे खूप कठिण जाऊ नये. दक्षिण मुंबईत भाजपचा प्रभाव जास्त आहे.पण तरीही शिवसेना काही मते खाईलच. तेव्हा या जागेविषयी अंदाज व्यक्त करणे खूपच कठिण आहे. राम नाईकांच्या मतदारसंघातून आता गोरेगाव काढले आहे. तेथील शिवसेनेच्या मराठी मतांचा परिणाम आता त्यांच्यावर होणार नाही.तसेच पराभव झाल्यावरही गेल्या ५ वर्षांत नाईकांनी जनसंपर्क कायम ठेवला आहे. तेव्हा राम नाईकांना विजय मिळवणे कठिण जाऊ नये. तेव्हा मुंबईत शिवसेना,काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी २ जागा जिंकेल असे वाटते. शिवसेना-भाजपमधील भांडणाचा फायदा काँग्रेसला व्हायची शक्यता आहे आणि पक्ष तिसरी जागाही जिंकू शकेल.
नाशिक-धुळे भागात राष्ट्रवादीचा जोर आहेच. नाशिकमधून शिवसेनेची थोडीफार मदत होऊन राष्ट्रवादीची स्थिती चांगली होईल.जळगावात सुरेश जैन शिवसेनेत परत आल्यामुळे पक्षाला थोडा तरी फायदा होईलच. तेव्हा भाजपची मते शिवसेना खाऊन त्याचा फायदा काँग्रेसला एका जागी तरी व्हायची शक्यता आहे.
विदर्भात भाजपला दोन परस्परविरोधी गोष्टींना सामोरे जावे लागेल. एक तर शिवसेनेची थोडी मते गमावावी तर लागतीलच. पण त्याच बरोबर शेतकरी आत्महत्या प्रकरणामुळे सरकारविरोधी मते भाजपला मिळतील. विदर्भात मागच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने काही जागा बसपच्या हत्तीमुळे गमावल्या होत्या. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित ताकद होती.आता दोन्ही एकमेकांविरोधात असताना परिस्थिती अजून जटिल बनेल आणि अंदाज व्यक्त करणे म्हणजे तारेवरची कसरत असेल. विदर्भात काँग्रेस पक्षाची ताकद राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहे. त्यात दत्ता मेघे पक्षात परतले आहेत.पक्षाकडे विलास मुत्तेमवारांसारखे ज्येष्ठ नेते आहेत.पण त्याचबरोबर सरकारविरोधी मताचा फटका त्याला बसेल. विदर्भाविषयी अंदाज व्यक्त करणे फारच कठिण आहे. तरीही १० पैकी भाजपला ४,शिवसेना-राष्ट्रवादीला ४ आणि काँग्रेसला २ जागा मिळतील असे वाटते.
मराठवाड्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीला मात्र चांगले यश मिळेल असे मला वाटते. बीडची जागा भाजपाच्या गोपीनाथ मुंडेंना जिंकायला कठिण जाऊ नये. पण जागावाटपात बंडखोरी न झाल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे एकत्रित बळ ८ पैकी ६ जागा जिंकू शकेल असे वाटते. एक जागा काँग्रेस पक्षाला मिळेल असे ढोबळमानाने धरतो.
पश्चिम महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादीला मोठे यश मिळेल.शिवसेना-भाजप मतविभागणीमुळे पुणे शहरातून काँग्रेस पक्षाला यश मिळेल आणि सांगली-सोलापूर या जागा काँग्रेसच्याच असतील. बाकी कोल्हापूर,हातकणंगले,शिरूर,बारामती,मावळ,सातारा,कराड या जागा राष्ट्रवादीला नक्की.
तेव्हा शक्यता क्रमांक २ प्रमाणे महाराष्ट्रात पुढील चित्र उभे असेल असे वाटते.
एकूण जागा: ४८
राष्ट्रवादी काँग्रेस: १७
काँग्रेस: १२
शिवसेना: १०
भाजप: ८
रिपब्लिकन पक्ष: १ (रामदास आठवले)
तेव्हा शिवसेना-राष्ट्रवादी युती झाल्यास फायदा राष्ट्रवादीला मिळेल आणि नुकसान भाजपाचे होईल असे वाटते. पण विदर्भातील निकाल वेगळे लागल्यास चित्र बदलू शकते.
३) गोवा: (एकूण जागा:२)
गोव्यात १९९९ मध्ये भाजपने दोन्ही जागा जिंकल्या होत्या.पण २००४ मध्ये भाजपला एकच जागा जिंकता आली. २००७ च्या निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळवता आले नाही. २००९ मध्येही २००४ सारखेच निकाल लागतील असे मला वाटते.
एकूण जागा: २
काँग्रेस: १
भाजप: १
४) दादरा नगर हवेली आणि दिव दमण (एकूण जागा २)
याविषयी अधिक भाष्य करण्यास योग्य माहिती माझ्याकडे नाही. तरीही ढोबळ मानाने भाजप आणि काँग्रेस एक एक जागा जिंकतील असे मानतो.
एकूण जागा: २
काँग्रेस: १
भाजप: १
५) मध्य प्रदेश: (एकूण जागा: २९)
सोयीसाठी मध्य प्रदेशचा समावेश पश्चिम भारतावरील लेखात करत आहे.
मध्य प्रदेशच्या जनतेने भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांना बहुमताने डिसेंबर महिन्यातच निवडून दिले आहे. तेव्हा राज्यात भाजपचेच वर्चस्व राहिल असे मानण्यास जागा आहे. उमा भारती विधानसभा निवडणुकीत स्वत: पराभूत झाल्यामुळे त्यांचे जनसमर्थन उतरणीस लागले आहे. तसेच काँग्रेस पक्षात दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य, कमल नाथ असे गट आहेत. बहुजन समाज पक्ष आता राज्यात एक महत्वाचा घटक म्हणून उदयास आला आहे. त्यास रेवा भागातील दोन जागा जिंकणे शक्य होईल असे वाटते. एकंदरीत पुढील परिस्थिती राज्यात राहिल असे वाटते--
एकूण जागा: २९
भाजप: १९
काँग्रेस: ८
बहुजन समाज पक्ष: २
तर पश्चिम भारतात पुढील प्रमाणे परिस्थिती असेल असे मला वाटते.
एकूण जागा: १०७
शक्यता क्रमांक १
एन.डी.ए.
भाजप: ५४
शिवसेना: ८
एकूण: ६२
यु.पी.ए.
काँग्रेस: २९
राष्ट्रवादी काँग्रेस: १३
रिपब्लिकन पक्ष: १
एकूण: ४३
इतर:
बहुजन समाज पक्ष: २
शक्यता क्रमांक २
एन.डी.ए.
भाजप: ४९
एकूण: ४९
यु.पी.ए.
काँग्रेस: २८
रिपब्लिकन पक्ष: १
एकूण: २९
इतर:
राष्ट्रवादी काँग्रेस: १७
शिवसेना: १०
बहुजन समाज पक्ष: २
एकूण: २९
वाचने
6010
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटते...
छान लेख
सुधारणा
In reply to छान लेख by भास्कर केन्डे
चिकित्सक विश्लेषण
उहापोह
In reply to चिकित्सक विश्लेषण by सुनील
कोणतेही
वा परत
मतदारसंघाची पुनर्रचना
In reply to वा परत by अमोल केळकर
माझ्या
In reply to मतदारसंघाची पुनर्रचना by क्लिंटन
चूक मान्य
In reply to माझ्या by अमोल केळकर
अतिशय सखोल विश्लेषण आहे आपले.
>>अभद्र
In reply to अतिशय सखोल विश्लेषण आहे आपले. by अनामिका
निवेदन
शक्यता
In reply to निवेदन by क्लिंटन
क्लिंटनसा
मस्तचं