Skip to main content
लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 14/09/2026 12:40 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी ! 


बघता बघता मिसळपाव डॉट कॉमला १९ वर्षं पूर्ण झाली!
२००७ साली गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर सुरू झालेला हा आपला मिपा आज १९ वर्षांचा झाला, यावर खरं तर विश्वासच बसत नाही. 


या १९ वर्षांच्या प्रवासात मिपाने कितीतरी लेख पाहिले, कितीतरी कविता ऐकल्या, कितीतरी चर्चा रंगवल्या आणि असंख्य काथ्याकूट झेलले.


कधी गंभीर चर्चा झाल्या, कधी मतमतांतरे झाली, कधी तिखट वाद झाले…पण या सगळ्या मिसळीतून एक गोष्ट मात्र कायम राहिली माणसांमाणसातला आपलेपणा


कितीतरी मिपाकर या व्यासपीठावर भेटले. काही लेखनातून जवळ आले, काही प्रतिसादातून, काही खरडफळ्यावरच्या गप्पांमधून… आणि काही तर मिपाच्या आभासी जगातून प्रत्यक्ष आयुष्यातले मित्र झाले. 


आज मागे वळून पाहताना वाटतं, मिसळपाव हे फक्त संकेतस्थळ राहिलं नाही; तो एक अनुभव झाला, एक आठवण झाली आणि अनेकांसाठी आपला एक कट्टा झाला. 


आता १९ वर्षं झाली म्हटल्यावर थोडा काथ्याकूट तर झालाच पाहिजे! 

* मिपावरची तुमची पहिली आठवण कोणती?

* पहिला लेख किंवा पहिला प्रतिसाद आठवतोय का?
* मिपावर भेटलेला एखादा खास मित्र ?
*  कोणता जुना धागा अजूनही लक्षात आहे?
* कोणता मिपाकर / कोणती लेखनशैली आजही आवडते?
* आणि हो… मिपाच्या १९ वर्षांच्या इतिहासातला सर्वात भारी काथ्याकूट कोणता ? लेख ? कविता ? प्रतिसाद ?


जुने मिपाकर असोत, नवे मिपाकर असोत किंवा आजवर फक्त वाचत राहिलेले मूक वाचक असोत, सगळ्यांनी हजेरी लावायची !

 १९ वर्षांचा हा प्रवास असाच पुढे चालत राहो, नवनवीन लेखक जोडले जावोत, चर्चा रंगत राहोत, काथ्याकूट होत राहो आणि या मिसळीतला आपलेपणा कधीच कमी होऊ नये! 
 

मिसळपाव डॉट कॉमला १९व्या वर्धापनदिनाच्या मालक नीलकांत, सहकारी तंत्रज्ञ प्रशांतशेठ,  छुपे संपादक, वाचक, लेखक, सर्वांना  हार्दिक शुभेच्छा ...!

लेख वर्गीकरण

वाचने 557
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

रात्रीपासून चार वेळा शुभेच्छाचं दळन टाकलं. प्रत्येक वेळी मसूदा गेला.  सबमिट केलं की येरर.  आता पाचव्या प्रयत्नात लेख पडला.

 

कोण पाहतं हे तांत्रिक काम ?

 

-दिलीप बिरुटे


सर्व मिपा प्रेमींना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पैजारबुवा, 


मिप वर्धापनदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा, मिपा अव्याहतपणे कुठलाही मोबदला न घेता चालवणाऱ्या मालक प्रशांत, नीलकांत तसेच संपादक मंडळाचे आभार.


मिसळपाव डॉट कॉमला १९व्या वर्धापनदिनाच्या मालक नीलकांत, सहकारी तंत्रज्ञ प्रशांतशेठ,  छुपे संपादक, वाचक, लेखक, सर्वांना  हार्दिक शुभेच्छा ...! 

+१०८

मिसळपाव डॉट कॉमला १९व्या वर्धापनदिनाच्या मालक नीलकांत, सहकारी तंत्रज्ञ प्रशांतशेठ,  छुपे संपादक, वाचक, लेखक, सर्वांना  हार्दिक शुभेच्छा ...!


In reply to by कांदा लिंबू

मिपावर लिहिणाऱ्यांबरोबरच चालवणाऱ्यांचे योगदान मोठे आहे. मिपा असेच बहरत राहो याच शुभेच्छा.

🌹🌸 💐


🙃

बघता बघता मला इथे सहा वर्षे झाली😅

 

मिपावरची तुमची पहिली आठवण कोणती?

-माय फ्रेंड गणेशा ने मला इथला पत्ता दिला.मग काय माझा आंतजाल २.० रुप सुरु झाले.१.० मध्ये केवळ कविता करायचे.मिपामुळे स्फुट  लेखन करु लागले.विचार खुप चौकस झाले.

🙃

* पहिला लेख किंवा पहिला प्रतिसाद आठवतोय का?

बाकी नाही पण कपिलमुनी यांनी काहीतरी तिरकस लिहिले होते.म्हट्ल शोभा नको कशाला इथे लिहायचे....पण मिपा काय भानगड आहे हे समजुन घेउयाच ,हे ठरवल.म्हणुन टिकले. 🤣


* मिपावर भेटलेला एखादा खास मित्र ?

मी अत्यन्त आत्ममग्न प्रकारची नग असल्यामुळे मैत्रीत कायम मागे पडते😅.


*  कोणता जुना धागा अजूनही लक्षात आहे?

-जयंत कुलकर्णी यांचा विजयनगरचा,हे हंपी फिरायला जवळ्पास १ महिनाभर रोज वाचायचे.तसेच 'नथ' अजुनही आठ्वते.

* कोणता मिपाकर / कोणती लेखनशैली आजही आवडते?

सगळ्यांचीच शैली मिपाला भरजरी वैविध्य देते.


* आणि हो… मिपाच्या १९ वर्षांच्या इतिहासातला सर्वात भारी काथ्याकूट कोणता ? लेख ? कविता ? प्रतिसाद ?प्रचेतस यांचा वेरुळ धागा प्रिंट काढुन घेतला.घरच्यांना वेरुळ शिल्प सम्जावुन सांगत होते. अक्षरश: इतर लोकहि आजुबाजुला जमा होऊन ऐकायचे😄

 

इतर सोमि हे 

"घटं भिंद्यात् पटं छिंद्यात् कुर्यात् रासभरोहणम्।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥"
अशा प्रकारचे असतात😉.
पण मिपा हे व्यक्त होत होत शिकायचे माध्यम आहे.चालक ,मालक,सर्व मिपाकर यांचे खुप खुप आभार!!

मिपावरचा माझा पहिला प्रतिसाद मला आठवतो

तो लिहीताना गाडी ऐवजी गादी असे टाईप झाले होते त्यावरून बरेच टोले ऐकून घ्यावे लागले होते.

माझा मिपावरचा पहिला लेख  बहुतेक एकोळी धागा होता कलिंदर या प्राण्याबद्दलचा

त्या नंतर पहिला मिपा पुणे कट्टा : त्याचा वृत्तान्त पोवाडा स्टाईलमधे लिहीला होता. त्या नंतर एप्रील फळ ही सिरीज लिहीली होती. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाले होते.

नंतर 

त्या कट्ट्याला आलेले डॉ दाढे , धमाल मुलगा , इनोबा ,  आनंदयात्री छोटा डॉन हे अगदी चांंगले मित्र झाले. 

खास आठवणारा लेख म्हणजे रामदासांचा त्यांच्या पूर्व भारतात केलेल्या एका प्रवासादरम्यान बस नादुरुस्त होते  एका तळ्याजवळ बसले असताना आलेल्या आठवणी , आणि  अर्थातच एव्हर ग्रीन कविता मोकलाया दाही दिश्या.

इथे लिहीता लिहीता मिपाकरांमुळे  माझ्याकडून  दोसतार  कादंबरी लिहीली गेली. क्लीक सारखा कथा संग्रही झाला. ध्रांगध्रा कादंबरीची बीजे इथेच लिहीताना मनात रुजली.

 गद्य लेखनाचे विडंबन < निशःब्द > | मिसळपाव  केले त्याला जे प्रतिसाद आले त्यामूळे तर धम्याच्या भाषेत बोलायचे तर मी हसून फुटलोच होतो.

श्रावण मोडक , बोका एक आझम यांच्या सोबतच्या आठवणी आता आठवणीच होतील.

पेठकरकाका  इथे तर भेटलेच पण परदेशातही आवर्जून  भेटले.

इंग्लंड मुक्कामी असताना  लंडनकर स्वाती राजेश , आदुबाळ आणि ग्यांग ने मस्त दोन ट्रीपा ॲरेन्ज केल्या होत्या

शिकागो मधे इंदुसुता , श्रीरंग जोशी , अनुजा कामत हे  काहीशे किलोमीटर अंतर ड्राईव्ह करून भेटायला आले होते.

त्या भेटीला येता यावे म्हणून तोपर्यंत सदस्य नसलेला लोथार ने सदस्यत्व घेतले होते. सगळे भेटल्यानंतर येणारी धमाल प्रत्येक देशात सारखीच.

माझ्या मुलीची नुकतीच डिलीव्हरी झाली होती. इंदुसुता ने अमेरीकेत असतानाही तीच्यासाठी आवर्जून डिंक लाडू करून दिले होते. 

इतके प्रेम आपुलकी मिपाकरांकडून मिळाली आहे.

१९ वर्षातले सगळ्यात  भारी सांगायचे तर एकमुखाने कौल येईल "मोकलाया दाही दिश्या...."
 

 

 

 


In reply to by विजुभाऊ

विजू भाऊ प्रतिसाद आवडला.

 

बाकी मोकलाया दाही दिश्या..

आपलंही एक नंबरवरच आहे.

 

-दिलीप बिरुटे


गणपा , पेठकर काका ,रामदास , प्रभुमास्तर , तात्या , डॉ दाढे , पैसा ताई , ली माउ जेट , ३.१४ अदिती ( संहीता जोशी ) , असे बरेच मित्र भेटले.

 


मिपा वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
मिसळपाव हे फक्त संकेतस्थळ राहिलं नाही; तो एक अनुभव झाला. १००% सहमत 
प्रवासाची आवड असल्याने मिपावरील भटकंतीचे धागे अर्थातच जास्त वाचले जातात/आवडतात. निवडक गणेश लेखमाला, काही पाककृती, ललितलेख बुकमार्क करून ठेवलेत. मूड/वेळ असला की आवर्जून वाचते.
एक मात्र नक्की मिसळपाव कायमच विशेष राहील. हे मिपा नावाचे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या, घडवणाऱ्या, आणि फुलवणाऱ्या सर्वांचेच अभिनंदन आणि कृतज्ञता !
(इतके बोलून... आपलं लिहून मी माझे आभाराचे भाषण/लेखन संपवते. 😀)  


In reply to by गवि

>>> पण तुम्हीच आमचे पमि. तिखट जहाल वाद झाले तरी आठवण ठेवा.

 

गेल्या 19 वर्षात कितीतरी मिपाकर आयडी, अनेक प्रत्यक्ष ओळखी, अनेक आभासी गप्पा,  न विसरता येणा-या असंख्य गोष्टी. व्यक्तिगत लिहिण्या बोलण्याच्या गोष्टी मिपावर अव्ह्याहतपणे शिकलो. मला कोणाशी ओळखी फार  वाढवायला आवडत नाही. अधुन मधून कधी तरी बरं इतकंच. आपली अशीच भेट झाली. गप्पा रंगल्या, मैफिली झडल्या  ''एक पेग म्हणता म्हणता दोनचार झाले,सश्या सारखे जिणे एकदम बाणेदार झाले'' हळूहळू विरक्ती आली. मी एक तर प्रेमात पडत नाही, पडलो की जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. आपली आठवण येते अधुन मधून...

 

कृष्णाने गवळणी सोडल्या, मित्र सोडले, गोकुळ सोडले; पण पुन्हा मागे वळून पाहिले नाही. मथुरा सोडली, द्वारका सोडली; आयुष्यात पुढे जाताना त्यांनी भूतकाळाला पुन्हा कवटाळले नाही. आपला कृष्ण आदर्श आहे. लै जीव् लावायचा नाही. 

 

आयुष्यही असेच असते…


एकदा पुढे जाण्याचा निर्णय घेतला की, मागे वळून पाहायचे नाही. काही माणसं, काही नाती आणि काही आठवणी आयुष्याच्या प्रवासात मागे राहतात; त्यांना मनापासून स्वीकारायचं आणि पुढच्या वाटेवर निर्धाराने चालत राहायचं.

 

गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी. :(

 

-दिलीप बिरुटे

( गवींचा माजी मित्र )


पासष्टी नंतर मिपाचे सदस्यत्व मिळाले. "मिळाले",कारण खाजगी संस्थळ असल्याने मी फक्त विंनती करू शकत होतो. सदस्यत्व देणे न देणे सर्वस्वी मालक चालकांवर अवलंबून होते.

 

सेवानिवृत्तीनंतर मराठीची तुटलेली नाळ  पुन्हा जोडताना समोर येईल ते मराठी साहित्य वाचत सुटलो. स्वताची पुस्तके खरेदी केली. अनेक ब्लाॅग,संस्थळे वाचली. अकर्षित झालो ते मिपावरील सदस्यांच्या प्रतिसादाने. मोकळे ढाकळे वातावरण आवडले. 

 

पुढे लेख,कवीता लिहायचे दु:साहस केले. शुद्धलेखन आणी लेख कवितांवर मिश्र प्रतिसाद  आले. पुढे रूळलो. 

 

मतमतांतरामुळे तीव्र प्रतिसाद दिले घेतले. अगदी मिळणाऱ्या सेवानिवृत्त वेतन ते कॅन्टीन पर्यंत सदस्यांनी हल्ले चढवले. कुणी इंदूरिकर महाराज म्हणले तर कुणी सलीम अली. कुणी विक्रम वेताळाच्या चौकटीतून हल्ला चढवला. असो. 

 

या सर्व प्रवासात चांगले मित्र जोडले गेले. ज्यांनी माझे वय मला विसरायला लावले. एका सत्त्यांऐंशी वर्षांच्या मिपाकरांनी सदस्यांना आपला पुस्तक संग्रह खुला केला. स्थानिक मिपाकरांच्या समुहाने त्यांना भेट देण्याचे ठरवले. पुर्व ओळख नसताना केवळ मिपाकर म्हणून वयोवृद्ध दांपत्याने आगत्याने,प्रेमाने  केलेले आतिथ्य आणी ते तीनचार तास अनभवून असे वाटले किती तरी जुनी ओळख आहे. 

परदेशातही असेच एका मिपाकर दाम्पत्याने ओळख ना पाळख, स्वता: फोन करून घरी येण्याचे स्टॅण्डिग निमंत्रण दिले.

मिपा संस्थळ नसून कुटुंब आणी मिपाकर परवलीचा शब्द  झाला आहे. 

मिपा वर्धापनदिनाचे हार्दिक  शुभेच्छा.


मिपासोबत कितीतरी मित्रमैत्रिणी आणि कट्टे यांच्या आठवणी जोडलेल्या आहेत!

मिपाला आणि समस्त मिपाकरांना वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


आत्ता कुठे काही महिने झालेत. वाचन मात्र मधून मिसळपाव भरपूर अनुभवले आहे मात्र, बोका ए आझमची (लेखकाला मेल करून रीतसर परवानगी घेऊन) लिहिलेली स्केअरक्रो आवडली होती, मोसाद त्यांनी लिहिलेली आवडली होती, पण त्यावरच्या राजकीय अन् वैयक्तिक अंगाने जाणाऱ्या काही कॉमेंट्स त्या पण काही ठराविक मंडळींनी करून ठेवल्यामुळे झालेला हिरमोड पण आठवतो. 

आदूबाळ ह्यांनी लिहिलेली अठरा पावलांचा स्टार्ट आवडती आहे ऑल टाईम फेवरेट. गवि ह्यांनी लिहिलेल्या ब्राऊ आणि और गिटार सुद्धा फार खोलवर रुतल्या आहेत मनात. सोन्याबापूंची अकादमी ही लष्करी लेखमाला (दुर्दैवाने आता ती इथे नाही), डॉक्टर खरेंनी लिहिलेले राजकीय सोडून सगळे वाचता हा माणूस किती जास्त अनुभव समृद्ध असल्याची आलेली भावना, त्यांची शैली स्वतः लेख लिहिण्यापेक्षा इतरांच्या लेखावर प्रसंगोचित कॉमेंट करून अनुभव मांडण्याची सुद्धा आवडते. 

मेंबर झाल्यावर - 

अजून काही लिहायची हिंमत झालेली नाही. तूर्तास खरडफळा आणि ताज्या घडामोडी धाग्यांवर बागडणे सुरू आहे. पुढेमागे सुचेल तसे लिहिण्याचा मानस मात्र प्रामाणिकपणे आहे. 

 

 






-- संपादित -- वैयक्तिक रोख टाळावा. --

व्यवस्थापन 

 

 एकंदरीत तूर्तास बेबी स्टेप्स आहेत तरी पुढे प्रत्येक टेबलवर मिसळ वाटणारा हेड वेटर होण्याची आकांक्षा आहे. सध्या इथे थांबतो भेटूच वेळ मिळेल तसा. मिपाकर जनतेला मिपा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणतो अन् खाली बसतो. 

(कवचकुंडलांचे वजन उतरून सुखद भाव आलेला कर्ण) खोंडे.


In reply to by वृषभ खोंडे

क्षमस्व, जरासा भावनावेगात वहावत गेल्याने अशी चूक झाली. काय करता, जगात आपली बाजू मांडायला, इज्जत राखायला कोणी येत नाही आपण एकटेच असतो हे लहानपणीच शिकलो.  

मिपासाठी काय पण, आज पण उद्या पण.

 

(डोक्याने वृषभ) खोंडे.


मिपावरची तुमची पहिली आठवण कोणती?

* पहिला लेख किंवा पहिला प्रतिसाद आठवतोय का?>>>
हो.


* मिपावर भेटलेला एखादा खास मित्र ?>>>
खूप आहेत, सगळेच मित्र जवळपास.


*  कोणता जुना धागा अजूनही लक्षात आहे? >>
 तुमचा पिशितभुजाच्या कान्दिशिक नर्मदांचे विकल मनोरथहा सर्वात प्रिय धागा आहे, तसेच ती कुणीतरी मराठीदीनाच्या दिवशी लिहिलेली बखर.
* कोणता मिपाकर / कोणती लेखनशैली आजही आवडते? >>> खूप आहेत. मीपावरील १० टक्केही लेखन अजून वाचून झालेले नाही.
* आणि हो… मिपाच्या १९ वर्षांच्या इतिहासातला सर्वात भारी काथ्याकूट कोणता ? लेख ? कविता ? प्रतिसाद ? 

 


* मिपावरची तुमची पहिली आठवण कोणती?

पूर्वी मिपावर प्रतिसादांमधून हास्यविनोद चालायचा ते वाचताना मजा यायची.

* पहिला लेख किंवा पहिला प्रतिसाद आठवतोय का?

एक शशक लिहिली होती स्पर्धेसाठी. प्रतिसाद आवडत्या लेखांना आवडले ही पोच देणे यापुरतेच मर्यादित आहेत शक्यतो.
* मिपावर भेटलेला एखादा खास मित्र ?

एखाद्या कट्ट्याला जाणे झाले नसल्याने नाही, आणि मैत्री समपातळीवर होते, मिपावरचे सगळे दिग्गजच वाटत आले आहेत. आता व्यनि ही बंद आहे 🙃
*  कोणता जुना धागा अजूनही लक्षात आहे?

बरेच आहेत, लेखमाला आहेत, गवि सरांची सोनेरी पूल, विजुभाऊ सरांची ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना, सस्नेह यांची कळते रे, रामदास सर यांची शिलाई मशीन आणखी भरपूर आहेत. पुष्कळ चांगल्या कदाचित अजून वाचल्याही नसतील 
* कोणता मिपाकर / कोणती लेखनशैली आजही आवडते?

कथावाचन जास्त आवडते पण मिपावर कथा कमीच येतात हल्ली. पर्यटन धाग्यांचा भरपूर फायदा होतो.
* आणि हो… मिपाच्या १९ वर्षांच्या इतिहासातला सर्वात भारी काथ्याकूट कोणता ? लेख ? कविता ? प्रतिसाद ?

मोकलाया


 


In reply to by श्वेता व्यास

माफ करा, कळते रे कथा रातराणी यांची आहे, स्नेहाताईंच्या बंडूकथा माझ्या आवडत्या आहेत.


मिपावर लिहायला सुरुवात करुन तब्बल ११ वर्षे झाली. त्याआधी वर्षभर वाचनमात्र होतो. 
पहिले लेखन हे मिपावरच्या पहिल्या शतशब्दकथा स्पर्धेसाठी केले होते ज्यात दुसरा क्रमांक मिळाला होता. बक्षीसरूपाने मिपाने एक नारायण धारप यांचे पुस्तक दिले. त्याविषयी आठवले की गंमत वाटते कारण त्याआधी कधी गद्य लिहिले नव्हते. डायरी सुद्धा कधी लिहीली नव्हती. असो, त्याच लेखनाने अभ्यादादासारखा हरहुन्नरी, मनस्वी कलाकार, मित्र म्हणून जोडला गेला. 

पिंपरी चिंचवडला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रा. डॉ. सरांची भेट विशेष स्मरणात आहे. त्यावेळी त्यांनी पुस्तक छापण्याचा सल्ला दिला जो मी अजूनही प्रलंबित ठेवलेला आहे. माहित नाही का? पण योग येईना. 

असो, पुढे मिपावर आधिक रूळल्यावर साहित्य संपादक म्हणून वर्णी लागली. विशेष काही योगदान दिले नसले तरी मिपा वृद्धींगत व्हावे ही इच्छा सदैव मनाशी असते, राहील. मिपाचे नवीन काहीही नवीन वाचनीय आल्यावर ते जवळच्यांना पोचवणे असा नित्यक्रम आजही चालू आहे. कार्यबाहुल्यांमुळे आताशा लिहिणे होत नाही पण वाचन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुरु आहे. 

खूप काही लिहिण्यासारखे/सांगण्यासारखे आहे पण कामामुळे वेळ जरा कमी आहे.  लवकरच एखादा कट्टा मोशीला व्हावा अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो.

मिपाला आणि समस्त मिपाकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. :)

 

सं - दी - प 


In reply to by चांदणे संदीप

प्रा. डॉ. सरांची भेट विशेष स्मरणात आहे. त्यावेळी त्यांनी पुस्तक छापण्याचा सल्ला दिला जो मी अजूनही प्रलंबित ठेवलेला आहे.

आपल्या कविता चांगल्या आहेत. आपण परिचयाचे आहेत म्हणून म्हणत नाही. पण, अजून पुस्तक झालं नाही, कमाल आहे, मग कधी करणार आहात ? एव्हाना व्हायला पाहिजे होतं. लवकर करा. अडचणी असतील तरी व्यनिमनीने कळवा. मार्गी लावू पुस्तकाचं. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे