Skip to main content

एक तारा जन्मला!

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 24/07/2026 15:34 या दिवशी प्रकाशित केले.

भारतीय रेल्वेच्या अधिकृत लोगोचा पुनर्जन्म होऊन त्यावर अजून एक तारा अवतरला आहे.

भारतीय रेल्वेच्या अधिकृत लाल-पांढऱ्या लोगोभोवती असलेले तारे लक्षपूर्वक पाहिले तर आजवर या लोगोमध्ये १७ तारे होते, परंतु आता तिथे १८ वा तारा समाविष्ट करण्यात आला आहे. हा केवळ डिझाइनमधील बदल नसून, भारतीय रेल्वेच्या प्रशासकीय आणि तांत्रिक व्यवस्थेतील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे.

हा १८ वा तारा म्हणजे नव्याने स्थापन झालेला साउथ कोस्ट रेल्वे हा नवा १८ वा झोन. मात्र, दोन जुन्या झोनची मोडतोड करून एक नवा झोन कागदावरून प्रत्यक्ष रुळावर आणणे हे एक अत्यंत आवाव्हानात्मक काम असणार होते. ३१ मे च्या मध्यरात्री हे तांत्रिक फेरबदलांचे आव्हान झेलले गेले आहे.

आज भारतीय रेल्वेचे बहुतांश कामकाज डिजिटल प्रणालीवर चालते. ‘ईस्ट कोस्ट रेल्वे’ आणि ‘साउथ सेंट्रल रेल्वे’ या दोन झोनचे भौगोलिक भाग वेगळे करून विशाखापट्टणम मुख्यालय असणारा हा नवा झोन तयार करायचा होता. ३१ मे च्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर, म्हणजेच १ जूनपासून हा झोन अधिकृतपणे कार्यरत करण्याचे उद्दिष्ट रेल्वे मंत्रालयाने दिले होते.

हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 'CRIS' Centre for Railway Information Systems या रेल्वेच्या आयटी संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिकीट आरक्षण, मालवाहतूक व्यवस्थापन, कर्मचारी नोंदी आणि सिग्नलिंगशी संबंधित ८० पेक्षा जास्त मुख्य प्रणालींमध्ये एकाच वेळी बदल करावे लागले. ३१ मे च्या रात्रीपर्यंत जे रेल्वे ट्रॅक्स, इंजिन्स, डबे आणि कर्मचारी जुन्या झोनच्या अखत्यारीत होते, ते १ जूनच्या पहाटे नव्या झोनच्या अखत्यारीत आले रातोरात मालकी बदलली! 

सर्वात मोठे आव्हान होते प्रवासात असलेल्या धावत्या गाड्यांचे. ३० मे रोजी जुन्या झोनमधून निघालेली ट्रेन १ किंवा २ जूनला आपल्या गंतव्यस्थानी पोहोचताना तिचा झोन बदललेला होता. तरीही, प्रवाशांची माहिती, गाड्यांचे ट्रॅकिंग आणि लॉजिस्टिक अकाउंटिंगमध्ये कोणताही अडथळा येऊ न देता हे बदल यशस्वीपणे राबवण्यात आले.  म्हणजे  प्रॉडक्षन एन्व्हायरनमेंट मध्ये डायरेक्ट अपग्रेड मारायचा होता आणि तो यशस्वीपणे झाला!

भारतीय रेल्वेच्या टीमने अनेक महिने आधीपासून केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे ३१ मे च्या मध्यरात्री ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. कोणतीही डिजिटल यंत्रणा ठप्प न होता, गाड्यांचे वेळापत्रक न कोलमडता आणि कोणताही अपघात न घडता हे स्थित्यंतर पूर्ण झाले आहे.

झोनचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या झोनच्या औपचारिक कामकाजाची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे अत्यंत धोरणीपणे आणि शांतपणे भारतीय रेल्वेचे स्वरूप बदलत आहेत. हे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार, सेवा पुस्तके आणि प्रशासकीय नोंदी अद्ययावत करण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू असले, तरी मुख्य तांत्रिक आणि वाहतूक यंत्रणा १ जूनपासूनच सुरळीत सुरू झाली. या कामगिरीबद्दल रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाचे व संबंधित यंत्रणांचे विशेष कौतुक आहे.

आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागातील वाहतूक, मालवाहतूक आणि बंदरांची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने 'साउथ कोस्ट रेल्वे'ची निर्मिती करण्यात आली आहे. गतिशक्ती योजनेत हा झोन मोठा महत्त्वाचा ठरेल असे दिसते. नवीन दक्षिण किनारपट्टी रेल्वे झोन आणि बंदर विकास एकमेकांना पूरक ठरावेत. विशाखापट्टणम बंदरावरील ६०% पेक्षा जास्त मालवाहतूक रेल्वेद्वारे होते आहे.

 


वाचने 278
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

निनाद,

 

माहितीबद्दल आभार. कुठलीही अडचण न येता कसलाही खोळंबा न होता नवीन विभाग अलगदपणे सुरू करणं अतिशय आव्हानात्मक आहे. श्री. अश्विनीकुमार वैष्णव यांचे व ज्ञाताज्ञात चमूंचे अभिनंदन.

 

आ.न.,

-गा.पै.


एक नवीन रेल्वे विभाग तयार करायला काय काय सायास पडतात त्याचे उत्तम चित्रण तुम्ही केलेले आहे. लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे. 

रेल फॅनिंग आवडता विषय आहे पण लेखन कला तितकीशी अंगी नाही त्यामुळे पुढे तुमच्याच लेखणीतून ह्या वाहतूक प्रकाराविषयी अजून चमत्कारिक अन् माहितीने ठासून भरलेले लेख वाचायला आवडतील.

 

 

1726058026

 मी वाचलेल्या रेल्वेवरील पुस्तकांपैकी एक उत्तम पुस्तक !


उत्तम माहिती व चांगला लेख, निनाद. प्रवासपर्यायांत रेल्वे ही माझी पट्टराणी आहे. अर्थात तिचा-माझा काही वेळा रुसवा-फुगवा होत असला तरी एकूणच प्रेमळ संबंधच आहेत! 

 

दक्षिण मध्य रेल्वेच्या या विकीपानावर १९ झोन्स् असा उल्लेख आहे. भारतीय रेल्वेच्या या विकीपानावर मात्र १८ झोन्सची यादी आहे. 


तुमचे माहितीपूर्ण लेख वाचत असतो. लिहीत राहा. 

 

- (रेल्वेप्रेमी प्रवासी) कांदा लिंबू