Skip to main content

एक तारा जन्मला!

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 24/07/2026 15:34 या दिवशी प्रकाशित केले.

भारतीय रेल्वेच्या अधिकृत लोगोचा पुनर्जन्म होऊन त्यावर अजून एक तारा अवतरला आहे.

भारतीय रेल्वेच्या अधिकृत लाल-पांढऱ्या लोगोभोवती असलेले तारे लक्षपूर्वक पाहिले तर आजवर या लोगोमध्ये १७ तारे होते, परंतु आता तिथे १८ वा तारा समाविष्ट करण्यात आला आहे. हा केवळ डिझाइनमधील बदल नसून, भारतीय रेल्वेच्या प्रशासकीय आणि तांत्रिक व्यवस्थेतील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे.

हा १८ वा तारा म्हणजे नव्याने स्थापन झालेला साउथ कोस्ट रेल्वे हा नवा १८ वा झोन. मात्र, दोन जुन्या झोनची मोडतोड करून एक नवा झोन कागदावरून प्रत्यक्ष रुळावर आणणे हे एक अत्यंत आवाव्हानात्मक काम असणार होते. ३१ मे च्या मध्यरात्री हे तांत्रिक फेरबदलांचे आव्हान झेलले गेले आहे.

आज भारतीय रेल्वेचे बहुतांश कामकाज डिजिटल प्रणालीवर चालते. ‘ईस्ट कोस्ट रेल्वे’ आणि ‘साउथ सेंट्रल रेल्वे’ या दोन झोनचे भौगोलिक भाग वेगळे करून विशाखापट्टणम मुख्यालय असणारा हा नवा झोन तयार करायचा होता. ३१ मे च्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर, म्हणजेच १ जूनपासून हा झोन अधिकृतपणे कार्यरत करण्याचे उद्दिष्ट रेल्वे मंत्रालयाने दिले होते.

हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 'CRIS' Centre for Railway Information Systems या रेल्वेच्या आयटी संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिकीट आरक्षण, मालवाहतूक व्यवस्थापन, कर्मचारी नोंदी आणि सिग्नलिंगशी संबंधित ८० पेक्षा जास्त मुख्य प्रणालींमध्ये एकाच वेळी बदल करावे लागले. ३१ मे च्या रात्रीपर्यंत जे रेल्वे ट्रॅक्स, इंजिन्स, डबे आणि कर्मचारी जुन्या झोनच्या अखत्यारीत होते, ते १ जूनच्या पहाटे नव्या झोनच्या अखत्यारीत आले रातोरात मालकी बदलली! 

सर्वात मोठे आव्हान होते प्रवासात असलेल्या धावत्या गाड्यांचे. ३० मे रोजी जुन्या झोनमधून निघालेली ट्रेन १ किंवा २ जूनला आपल्या गंतव्यस्थानी पोहोचताना तिचा झोन बदललेला होता. तरीही, प्रवाशांची माहिती, गाड्यांचे ट्रॅकिंग आणि लॉजिस्टिक अकाउंटिंगमध्ये कोणताही अडथळा येऊ न देता हे बदल यशस्वीपणे राबवण्यात आले.  म्हणजे  प्रॉडक्षन एन्व्हायरनमेंट मध्ये डायरेक्ट अपग्रेड मारायचा होता आणि तो यशस्वीपणे झाला!

भारतीय रेल्वेच्या टीमने अनेक महिने आधीपासून केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे ३१ मे च्या मध्यरात्री ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. कोणतीही डिजिटल यंत्रणा ठप्प न होता, गाड्यांचे वेळापत्रक न कोलमडता आणि कोणताही अपघात न घडता हे स्थित्यंतर पूर्ण झाले आहे.

झोनचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या झोनच्या औपचारिक कामकाजाची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे अत्यंत धोरणीपणे आणि शांतपणे भारतीय रेल्वेचे स्वरूप बदलत आहेत. हे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार, सेवा पुस्तके आणि प्रशासकीय नोंदी अद्ययावत करण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू असले, तरी मुख्य तांत्रिक आणि वाहतूक यंत्रणा १ जूनपासूनच सुरळीत सुरू झाली. या कामगिरीबद्दल रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाचे व संबंधित यंत्रणांचे विशेष कौतुक आहे.

आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागातील वाहतूक, मालवाहतूक आणि बंदरांची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने 'साउथ कोस्ट रेल्वे'ची निर्मिती करण्यात आली आहे. गतिशक्ती योजनेत हा झोन मोठा महत्त्वाचा ठरेल असे दिसते. नवीन दक्षिण किनारपट्टी रेल्वे झोन आणि बंदर विकास एकमेकांना पूरक ठरावेत. विशाखापट्टणम बंदरावरील ६०% पेक्षा जास्त मालवाहतूक रेल्वेद्वारे होते आहे.

 


वाचने 824
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

निनाद,

 

माहितीबद्दल आभार. कुठलीही अडचण न येता कसलाही खोळंबा न होता नवीन विभाग अलगदपणे सुरू करणं अतिशय आव्हानात्मक आहे. श्री. अश्विनीकुमार वैष्णव यांचे व ज्ञाताज्ञात चमूंचे अभिनंदन.

 

आ.न.,

-गा.पै.


एक नवीन रेल्वे विभाग तयार करायला काय काय सायास पडतात त्याचे उत्तम चित्रण तुम्ही केलेले आहे. लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे. 

रेल फॅनिंग आवडता विषय आहे पण लेखन कला तितकीशी अंगी नाही त्यामुळे पुढे तुमच्याच लेखणीतून ह्या वाहतूक प्रकाराविषयी अजून चमत्कारिक अन् माहितीने ठासून भरलेले लेख वाचायला आवडतील.

 

 

1726058026

 मी वाचलेल्या रेल्वेवरील पुस्तकांपैकी एक उत्तम पुस्तक !


In reply to by वृषभ खोंडे

रेल फॅनिंग आवडता विषय आहे पण लेखन कला तितकीशी अंगी नाही त्यामुळे पुढे तुमच्याच लेखणीतून ह्या वाहतूक प्रकाराविषयी अजून चमत्कारिक अन् माहितीने ठासून भरलेले लेख वाचायला आवडतील.

प्रयत्न करू या. सगळ्यांनी लिहायला हरकत नाही या विषयावर. माझा ही आवडता विषय आहे.

 


In reply to by निनाद

मिपा नव्या रूपात आल्यावर त्या लेखांचे फॉर्मैटिंग गेले आहे आणि एकच मोठा परिच्छेद झाला आहे.

डेक्कन क्वीन

https://www.misalpav.com/story/52965

 

बीबीसीआय ला जीआयपीचा डबा
https://www.misalpav.com/story/41372

 

बाय द वे हे वरती पुस्तक आहे त्याचे लेखक फेसबुकवर आहेत बहुधा. मला काही रेल्वेच्या पोस्ट्स फीडमधे येतात त्यावर नाव पाहिल्यासारखे वाटते.


उत्तम माहिती व चांगला लेख, निनाद. प्रवासपर्यायांत रेल्वे ही माझी पट्टराणी आहे. अर्थात तिचा-माझा काही वेळा रुसवा-फुगवा होत असला तरी एकूणच प्रेमळ संबंधच आहेत! 

 

दक्षिण मध्य रेल्वेच्या या विकीपानावर १९ झोन्स् असा उल्लेख आहे. भारतीय रेल्वेच्या या विकीपानावर मात्र १८ झोन्सची यादी आहे. 


तुमचे माहितीपूर्ण लेख वाचत असतो. लिहीत राहा. 

 

- (रेल्वेप्रेमी प्रवासी) कांदा लिंबू 


In reply to by कांदा लिंबू

तुमचे माहितीपूर्ण लेख वाचत असतो. लिहीत राहा. 

जरूर!

अनेकानेक धन्यवाद!


 मधु दंडवतें सारखा सन्माननीय  अपवाद वगळला तर रेल्वे बरीच वर्षे बिहार बंगाल आणि उ प्र मधील मंत्र्यांकडेच राहीली

त्यातही  दरवर्षी रेल्वेचे स्वतंत्र अंदाजपत्रक असायचे


मस्त माहिती! मधे ऐकले होते की असा नवीन भाग होतोय पण हे डिटेल्स माहीत नव्हते.

 

झोन बदलला की डब्यांचा मेण्टेनन्स करण्याची जबाबदारीही बदलत असावी. तसेच या बदलाने काही अप गाड्या डाउन होतील (आणि काही उलटे) का ते माहीत नाही. कदाचित ज्या नवीन गाड्या चालू होतील त्या या झोन मधून चालू होतील. या झोन मधे लगेच लोको शेड्स तयार केल्या असतील असे नाही - किंवा काही स्टेशनजवळच्या लोको शेड आता या झोनकडे दिल्या असतील. इंजिनांवर कल्याण, वापी, तुघलकाबाद अशी नावे दिसतात तसे या झोनमधेही एखादे असेल.

 

यात मालवाहतुकीचाही उल्लेख आहे. आता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प सुरू झाल्यावर प्रवासी रेल्वेच्या झोनमधून कितपत मालवाहतूक चालू राहील शंका आहे.


In reply to by फारएन्ड

आता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प सुरू झाल्यावर प्रवासी रेल्वेच्या झोनमधून कितपत मालवाहतूक चालू राहील शंका आहे.

बरोबर आहे स्वरूप तर बदलणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवासी रेल्वेच्या पारंपरिक झोनमधील मालवाहतूक पूर्णपणे बंद होणार नाही, पण तिचे स्वरूप, प्रमाण आणि महत्त्व नक्कीच बदलेल. कोळसा, लोखंड, पोलाद, सिमेंट आणि कंटेनर्स यांसारख्या अवजड अन् लांब पल्ल्याच्या मालगाड्या प्रामुख्याने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर वळवल्या जातील/ जायला पहिजेत. शिवाय कोळसा आणि राख यासाठी काही खास ड्ब्यांची निर्मिती केली जात आहे. हे नवीन डबे आता धूळ उडवत जाणार नाहीत. आणि लोडिंग अन लोडिंग पण वेगवान होईल. हा फार मोठा बदल आहे.

पण डेडिकेटेड फ्रेट कॉ.  हे प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी शहरांना जोडणारे विशेष ट्रॅक्स आहेत. परंतु, देशातील प्रत्येक छोटे शहर किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती ला थेट जोडलेली नाही.  मुख्य डेफ्रेकॉ ट्रॅकपर्यंत माल पोहोचवण्यासाठी किंवा डेफ्रेकॉ वरून स्थानिक बाजारपेठेत माल नेण्यासाठी प्रवासी रेल्वेच्या झोनल नेटवर्कचा वापर अटळ आहे.

मुख्य मालवाहतूक डेफ्रेकॉ कडे गेल्यावर स्थानिक रेल्वे झोन एक्सप्रेस पार्सल सेवा कडे देणार. म्हणजे ऍमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा कुरिअर कंपन्यांचा माल वेगवान प्रवासी गाड्यांच्या पार्सल व्हॅनद्वारे वाहून नेणे रेल्वेसाठी अधिक फायदेशीर व्हायला हवे. आता तर पार्सल व्हॅनचे स्वरूप पन बदलत आहेत.

 


In reply to by निनाद

निनाद,

कुरिअर कंपन्यांचा माल वेगवान प्रवासी गाड्यांच्या पार्सल व्हॅनद्वारे वाहून नेणे

मला वाटतं या कामाकरिता प्रवासी मार्गावर वेगवान मालगाड्या सुरू होणार आहेत. त्याच्या चाचण्या चालू आहेत. त्यापैकी एक वंदे भारत धर्तीची आहे. 

 

हे एक चलचित्र सापडलं. बहुधा खरं असावं : https://www.youtube.com/shorts/mDLPw5Y6c6A 

 

अधिक माहिती ( इंग्रजी ) : https://www.ndtvprofit.com/india/india-s-first-vande-bharat-freight-tra…;

 

आ.न., 

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

गंडलेल्या दुव्याची दुरुस्ती : https://www.ndtvprofit.com/india/india-s-first-vande-bharat-freight-tra…


मुळात या रेल्वे झोन मधील चार डिव्हिजन्स पैकी तीन डिव्हिजन्स मध्ये  लोको शेड आहेतच.

विशाखापटणम, विजयवाडा आणि गुंटकल.

फक्त गुंटूर ला लोको शेड नाही. त्यामुळे नवीन लोको शेड आणण्याची गरज नसावी.      


In reply to by सुबोध खरे

होय अगदी बरोबर. वाटणी झाली आहे! नवीन झोनसाठी काहीही नवीन उभे केले गेले नाही, तर आहे तेच हद्दीनुसार वाटून देण्यात आले आहे.

रेल्वेच्या नियमांनुसार डब्यांची देखभाल झोननुसार नाही, तर प्रायमरी मेंटेनन्स डेपू च्या तत्त्वावर ठरते. एखादी ट्रेन ज्या स्टेशनवरून सुटते ते स्टेशन ज्या झोनमध्ये येते तो झोन त्या ट्रेनच्या डब्यांच्या प्राथमिक देखभालीसाठी जबाबदार असतो. ट्रेन दुसऱ्या झोनमध्ये पोहोचल्यावर तिथे फक्त तिची स्वच्छता, पाणी भरणे आणि ब्रेक तपासणे एवढेच होते. त्यामुळे झोन बदलला तरी ट्रेन ज्या मूळ डेपोची आहे, तिथेच मुख्य मेंटेनन्स होणार. मला नक्की माहित नाही पण बहुदा ईस्ट कोस्ट रेल्वेच्या विशाखापट्टणम डिझेल आणि इलेक्ट्रिक लोको शेड आणि साउथ सेंट्रलची विजयवाडा इलेक्ट्रिक लोको शेड हे दोन्ही मोठे शेड्स आता साउथ कोस्ट रेल्वे च्या मालकीचे झाले. (असावेत) 

डब्यांवर आता हळूहळू जुन्या झोनच्या नावाऐवजी 'साउथ कोस्ट रेल्वे' असे कोड लिहिण्याचे काम सुरू झाले असेल. चालले असेल. याला वेळ लागतो.


इतके प्रतिसाद येतील अशी अपेक्षाच नव्हती, त्यामुळे इकडे आलोच नाही. तुम्हा सर्वांचा रेल्वे बाबतीतला रस पाहून सुखद आनंद झाला. सर्वांचे अनेकानेक धन्यवाद!


लेख आवडला हे वे सा न.

 

मला तर रेल्वे एखाद्या सिक्रेट  मिशन सारखे वाटते. 1973 साली,मी प्रथम रेल्वे वयाच्या साडे सोळाव्या वर्षी बघीतली. त्यावेळेस एक आयताकृती  पुठ्ठ्याचे दोन बोटावर मावेल एवढे मळक्या रंगाचे तीकीट मिळायचे. प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी सुद्धा पैसे लागतात  हे नव्यानेच कळाले. 

प्लॅटफॉर्म एक भूलभुलैया, कुठली गाडी कुठे येणार, कुठल्या दिशेला जाणार सर्व काही गौडबंगाल,  नवीन. गाड्यांचे नंबर, नावे, कंपार्टमेंट वर लागलेल्या दुधारी  पाट्या," पुणे-मुंबई-पुणे" खुपच गोंधळात टाकणारे. प्रत्येक डब्यावर  वेगळी चिंन्हे अक्षरे, नंबर  बापरे....SC,NC,NW वगैरे. 27856,35200 वगैरे....

 

त्यावेळेस झालेला गोंधळ  आज लेख वाचून पुन्हा जागा झाला. जणू कुणी खोडकर मुलाने दगड मारून  मधमाशांचे पोळे उठवले......

 

पहिलटकरणीच्या अनुभव सारखा,  एक चांगली मजेशीर जिल्बी पडू शकते.


ऑसीलेशन टेस्ट, एक्सेल लोड टेस्ट इत्यादी घेतात त्या नेमक्या काय असतात ? कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टीने (सी आर एस) अमुक मेट्रोला सर्टिफिकेट दिले म्हणजे काय ? 

रेल्वे ओव्हर हेड इलेक्ट्रिकल (ओ एच ई) म्हणजे काय ? डिस्टंट, डबल डिस्टंट सिग्नलिंग म्हणजे काय ? कॅटेनरी लाईन म्हणजे काय ? लूप लाईन, सायडिंग, पीट लाईन, वॉश लाईन इत्यादी काय ? 

असे कैक प्रश्न आमच्यासारख्या सामान्य लोकांना कायम पडतात. रोड साईन असतात तशा स्टेशन वर असणाऱ्या साईन, रुळाच्या लगत असणाऱ्या साईन इत्यादी विषयांवर एक फर्मास लेखमाला करा निनाद तुम्ही ! 

 

खूप बहारदार लेखन होईल अन् वाचनाची मजा येईल