Skip to main content

ए आय (प्रॉम्प्टचे दळण)

लेखक वृषभ खोंडे यांनी शनिवार, 13/06/2026 11:20 या दिवशी प्रकाशित केले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही हा हा म्हणता आपल्या रोजच्या जीवनातील एक मुख्य घटक झालेली आहे. म्हणजे अगदी कोअर डेव्हलपमेंट ते कस्टमर केअर चॅटबॉट ह्या तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात शिरकाव केला आहेच. अगदी परवा आमची वय वर्षे आठ असणारी कन्या शाळेतील "महाराष्ट्र आणि सिक्कीम मधील सणांची तुलना" ह्या विषयावर पोस्टर बनवण्याचे आर्ट वर्क घेऊन आली तसे आम्ही नवरा बायको हबकलो असताना छोटीने शांतपणे माझा मोबाईल उचलून जेमिनीला असा अचूक प्रॉम्प्ट दिला की त्याने पंधरा सेकंदात गुढी पाडवा अन् सिक्कीमचा लुसूंग (नवीन वर्ष स्वागत सण) तुलना करणारे इन्फोग्राफिक पोस्टर दिले. पुढे कन्येने आमच्या नाक्यावरच्या मारवाडी स्टेशनरी वाल्याला (माझ्या मोबाईल वरून) ते पोस्टर पाठवून कलर प्रिंट घरपोच मागवली आणि कापून व्यवस्थित चार्ट पेपर वर चिकटवून फायनल केला प्रोजेक्ट. आता एकंदरीत जिओ वापरणाऱ्या जनतेला जेमिनी, एअरटेल वापरणाऱ्या जनतेला पर्प्लेक्सिटी, फुकटात वापरणाऱ्या जनतेला चॅट जीपीटी प्रसंगी ऑफिस वर्क मध्ये नोटबुक एल एल एम सहज रोज भेटत असतात, आपल्या लॅपटॉप, मोबाईल्स इत्यादींचा अविभाज्य घटक झाले आहेत हे सगळे ए.आय. ह्या धाग्याची संकल्पना ही आहे की आपल्याला वापरता येईल असे ए आय प्रॉम्प्ट कसे लिहावे, कोडिंग ते पोस्टर मेकिंग, आणि एखाद किचकट सरकारी कामाचे स्वरूप/ फॉर्म डाउनलोड करणे (पण तिथे शेवटी एखाद मानवी एजंटच कामी येण्याची शक्यता जास्त वाटते ते एक असो), एखाद नवीन संकल्पना सखोल समजून घेणे सगळ्यासाठी गरजेचे आहे अचूक आणि विषयवार नीट प्रॉम्प्ट लिहिता येणे, प्रॉम्प्ट इंजिनियरिंग सुद्धा एक नवीन जॉब शाखा म्हणून झपाट्याने उदयाला येते आहे. तर चला आपल्या मनातील उत्तम प्रॉम्प्ट/ आपण प्रयोग करून एखाद काम अचूक करवून घेण्यासाठी deploy केलेले प्रॉम्प्ट/ तांत्रिक प्रॉम्प्ट/ शेअर analysis करायला असलेले प्रॉम्प्ट/ अकॅडमिक माहिती देणारे प्रॉम्प्ट किंवा एकंदरीतच मजेशीर प्रॉम्प्ट इथे शेअर करूया. एक उत्तम प्रॉम्प्ट repository तयार व्हावी आणि ती इच्छुकांना रेडी रेक्नर म्हणून वापरायला उपलब्ध व्हावी हा पण एक हेतू आहेच.


वाचने 450
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कृबुच्या सुरुवातीपासूनच मी अनेक प्रतिमा रचलेल्या आहेत. त्याबद्दल एकदोन लेखही इथे प्रकाशित केले होते.

या लेखावरील प्रतिसादांमधून धागाकर्त्यास नेमके  काय अपेक्षित आहे, हे नीटसे समजले नाही. 


In reply to by चित्रगुप्त

प्रॉम्प्टची देवाणघेवाण, एखाद एक्सेल शीट ऑटोमेशन, एखाद उत्तम कलात्मक व्हिडिओ किंवा चित्र बनवण्यासाठी द्यायचा प्रॉम्प्ट, किंवा प्रॉम्प्ट through काहीतरी नवीन शिकता येईल असे काही. रोजच्या जीवनातील धकाधकीत एखाद टास्क ऑटोमेट केला असेल कोणी तर त्याचा अनुभव, ए आय वापराचे अनुभव, एकमेकांना प्रॉम्प्ट डिझाइन मधे मदत करणे इत्यादी.


YouTube व्हिडिओ आपल्या प्रतिसादात अन् धाग्यात देणे सगळ्यांनाच आवडते/ आवडावे. पण प्रॉब्लेम हा होतो की मोबाईल वरून मिपावर येत असता ब्राउझर मधून यूट्यूब वर जाणे दुरापास्त होते, कारण यूट्यूब डॉट कॉम म्हणले की डायरेक्ट ऍप लाँच होते अन् ब्राउझर पेज ऍप होम वर redirect होते. ह्याच्यावर इलाज म्हणून मी सरळ जेमिनी वापरले गुगलचे, वापरण्याची पद्धत अतिशय सुटसुटीत. 

 

- यूट्यूब ऍप वर जावे 

- हवा तो व्हिडिओ सिलेक्ट करावा 

- शेअर बटन क्लीक करून त्या व्हिडिओची (शॉर्ट तर शॉर्ट) लिंक copy करावी 

- जेमिनी मध्ये जावे नवीन विंडो मधे लिंक पेस्ट करावी 

- खाली प्रॉम्प्ट लिहावा "Give me full html code for this link" 

- generate झालेला कोड कॉपी करावा, इथल्या मेसेज बॉक्स मधे पेस्ट करावा (iframe कोड मिळतो व्यवस्थित)

 

 


पण माझ्या कामाच्या निमित्ताने त्या केलेल्या आहेत. कामातील पुन्हा पुन्हा येणारा भाग वगळणे हा त्याचा उद्देश. मग तो सर्वांना कसा लागू होईल?

उदाहरणार्थ, मी ज्या ज्या कामांसाठी बाहेर जातो, फिल्डवर , त्यासाठी मला approval हवे असते संस्थेच्या निर्देशकांचे. ते सुद्धा दोन भाषेत. इंग्रजी व हिंदी. मी AI ला सर्व माहिती दिली. आता फक्त पत्र लिहीताना सर्व्हेचे नाव, visit करण्याचा जिल्हा आणि तारीख एवढे सांगतो. उर्वरित पत्र AI लिहून देतं. आता ही prompt मी इकडे देऊन काय साध्य होणार?  

 

तर अशा प्रकारच्या अनेक prompt आहेत. 


In reply to by आगाऊ म्हादया

जर तुमच्या कंपनीच्या नो डिस्क्लोजर अग्रीमेंट मध्ये बसणारे असले तर नका सांगू, असले तर सांगा. आता जसे approval letter sanction आहे generic प्रॉम्प्ट द्या (तुमच्या व्यावसायिक प्रोफाइल मध्ये काही खंड पडणार नसेल तर) कोणालाही चालेल की तो लेटर्स ड्राफ्ट करणाऱ्या प्रॉम्प्ट मधे काय असावे ते पण शिकायला मिळेल. किंवा मजा मजा म्हणून जर एखाद्या कन्सेप्ट वर काम करत असाल तर ती मांडा, काहीतरी ब्रेन स्टॉर्मिंग होईलच.