Skip to main content

काय वाचताय ?

लेखक कॉमी यांनी बुधवार, 19/05/2021 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा- मदनबाण यांचा मी सध्या काय पाहतोय धागा. मला वाटते, की सिनेमे, टिव्ही/ओटीटी सिरीज, युट्यूब व्हिडीओज सारखेच पुस्तकं, ब्लॉग्ज, पेपर/नियतकालिकांमधली विशिष्ठ विषयांवरची सदरे किंवा कोणतेही वाचायचे माध्यम यांच्या बद्द्ल देवाणघेवाण सुद्धा मनोरंजक राहील. वाचण्यासाठी नवनवीन गोष्टी समजतील. मी सुरुवात करतो. मी खालील दोन पुस्तके वाचत आहे: १. फ्रॅन्क हर्बर्टची कादंबरी ‘ड्युन’ (Frank Herbert’s ‘Dune’)- १९६५ पृष्ठसंख्या- ४१२

-विज्ञानकादंबर्‍यांमध्ये खुप प्रसिद्ध कादंबरी आहे ही. सर्वोत्तम विज्ञानकथांच्या याद्यांमध्ये हटकून ड्युन दिसत होती. म्हणल ट्राय करुन बघुया. आता जिथपर्यंत वाचून झाली आहे तिथपर्यंत ही कादंबरी फक्त विज्ञानकथा नसून सरळ सरळ एपिक फॅन्टसी सारखी वाटते आहे. पूर्ण नवीन विश्व लेखकाने उभारले आहे. कथा- मानवजात एका इम्पेरियम/साम्राज्यामध्ये एकत्र आहे. साम्राज्याचा प्रमुख म्हणुन एक सम्राट आहे, आणि वेगवेगळ्या ग्रहांवर सम्राटाच्या नावे व्यवस्थापन करणारी घराणी आहेत, (अंतराळातले गेम ऑफ थ्रोन्स म्हणता येईल, फक्त हे GoT च्या आधी प्रकाशित झाले आहे.) तर, आर्टेड्स घराण्याचा, स्पेसिफिकली, पॉल आर्टेड्स या मुलाचा प्रवास आपण पाहातो. त्यांच्या होम-ग्रहावरुन आर्टेड्सना नवीन ग्रहाचे व्यवस्थापन दिले असते- आराकीस नावाच्या ग्रहाचे. ह्या ग्रहाचा ९०%+ वाळवंटी असतो. पाणी इतके दुर्मिळ असते की तेच चलन आणि संपत्ती असते. तिथे खोल वाळवंटामध्ये "मलेन" नावाचा पदार्थ सापडत असतो, जो जिवन वाढवणारा असतो, आणि त्यामुळे अत्यंत मौल्यवान. पण हा पदार्थ गोळा करणे सुद्धा तितकेच अवघड असते, कारण वाळूमधून झटकन प्रवास करु शकणार्‍या राक्षसी अळ्या नेहमी त्या पदार्थांच्या साठ्याच्या आसपास असतात. त्यापुढे, हार्कोनेन घराणे, जे आर्टेड्सचे काही पिढ्यांपासूनचे शत्रू असतात, त्यांनी बरेच वर्ष आराकीस वर राज्य केले असते. त्यामुळे, त्यांनी आर्टेड्स साठी काहीना काही सापळा आराकीस वर रचून ठेवलाय हे नक्की असते. आराकीस वरचे नेटिव्ह लोक म्हणजे फ्रेमेन. हे फ्रेमेन लोक पाण्याच्या दुर्भिक्षात राहाण्यासाठी अ‍ॅडॅप्ट असतात. वाळवंटात फिरताना शरीरातला ओलावा वातावरणात आजिबात निसटू नये म्हणून 'स्टिलसूट' नावाचे वस्त्र वापरत असतात. आणखी मसाला असतो तो म्हणजे 'बेने गेशेरीत' नावाची संस्था असते, जी फ्रेमेन सारख्या "रानटी" किंवा मुख्य धारेतल्या बाहेरच्या लोकांचा पुढे मागे वापर करुन घेण्यासाठी त्यांच्यात, (खोट्या) प्रोफेसीज/भविष्यवाण्या पेरुन ठेवत असते. एकूण, पॉल ह्या भविष्यवाण्यांच्या आधारे स्वतःला मुआ'दीब नावाने फ्रेमेन्सच्या लढाऊ आणि आक्रमक धर्माचा प्रेषित कसा बनवतो, आणि हार्कोनेन घराण्याशी कसा लढतो अशी कथा आहे. ह्यात ईस्लामच्या उदयाशी पॅरॅलल स्पष्ट आहेत. बरेच फारसी शब्द वापरले आहेत. कथेवर तीन वेळा सिनेमा येऊन गेला आहे आणि चौथ्यांदा यावर्षी येणार आहे. टिमोथी कॅल्मेट पॉलच्या भुमिकेत दिसेल. २. द कमिंग ऑफ द थर्ड राईश- रिचर्ड एव्हन्स. (२००४) पृष्ठसंख्या- ६५६

वाळींबेंचे नाझी भस्मासूराचा उदयास्त न वाचलेल्या दुर्मिळ लोकांपैकी मी एक आहे. तेव्हा हे अगदी क्लीन स्लेट घेऊन वाचत आहे. नाझी जर्मनी वरच्या त्रिधारेतले हे पहीले पुस्तक आहे. त्रिधारा अशी आहे- १. द कमिंग ऑफ द थर्ड राईश २. थर्ड राईश अ‍ॅट पॉवर ३. थर्ड राईश अ‍ॅट वॉर. पुस्तकाची दिर्घ प्रस्तावना खुप उत्तम आहे. नाझी जर्मनीवर इतकी पुस्तके येऊन गेली आहेत, मग आणखी एक लिहायचे प्रयोजन काय? ह्या प्रश्नाचे उत्तर लेखक एव्हन्स ह्यांनी दिले आहे. की नाझी जर्मनीचा संक्षिप्त, किंवा निवडक पैलूंवर प्रकाश टाकणारी बरीच चांगली आणि वाईट पुस्तकं असली तरी, नाझी जर्मनीतल्या नागरीकाला सभोवताली काय दिसत होते ? त्या वेळी काय चर्चा, काय राजकीय प्रश्न होते ? आणि एकूणच नाझी जर्मनीचे सखोल आणि सर्वांगीकचित्रणपाहाण्यास मिळत नाही. ते या त्रिधारे द्वारा देण्याचा प्रयत्न आहे. पहीले पुस्तक जिथपर्यंत वाचून झाले त्यावरुन सखोल महीती मिळणार हे समजले आहे. आत्तापर्यंत बिस्मार्क, कैसर विल्यम दुसरा ह्यांचे शासन, आणि पहील्या महायुद्धानंतर धाधांत अराजकतेनंतर जर्मनी मध्ये पहीले लोकशाही शासन १९१८ मध्ये कसे आले, आणि व्हर्सेलीस करारातल्या अपमानकारक अटींचा राजकारण आणी नागरी जीवन यांच्यावर काय प्रभाव पडला हे सांगितले आहे. जर्मनीत धार्मिक दृष्टीतून ज्यूंचा द्वेष, ते वांशिक दृष्टीतून ज्यूंचा द्वेष हा प्रवास तपशीलवार दाखवला आहे. यापुढे पुस्तक लोकशाही राज्य १९१८-१९३३ दरम्यान कसे चालले, लोकांचा वैचारीक कल कुठे होता आणि तो कसा हळूहळू बदलत गेला, असे जाईल आणि शेवटी १९३३ मध्ये नाझी जर्मनीचा उदय होऊन संपेल. पुस्तक अत्यंत तपशीलवार आहे, आणि ह्या बद्दल रस असल्यास उत्तम पर्याय आहे. तुम्ही काय वाचताय ? (चित्रे आंतरजालावरुन साभार.)

वाचने 43624
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

In reply to by तुषार काळभोर

हो, कारण- धारपांची तळघर (बहुदा? नक्की नाव आठवत नाही.) किंगची ग्रॅनी आणि गानुआजी तिन्ही गोष्टी खूपच समान थीमवर आहेत. धारपांची कथा ग्रॅनी वरच आधारित होती, आणि तुंबाड ऑफिशियली धारपांच्या कथेवर आहे. ग्रॅनी मध्ये थेट हस्तर नाव पण आहे !

जगात अनेक क्रुरकर्मे झाले पण जग अजूनही ज्यात रस घेऊन ज्याच्याबद्द्ल वाचतेय, लिहितेय, चित्रपट बनवतेय, चर्चा करतेय तो म्हणजे हिटलर. हे हिटलर चे यश म्हणावे काय ? मी देखील हिटलर बद्द्लची बरीच पुस्तके (मराठी) वाचलीत, चित्रपट पाहिलेत पण हा विषय लोकांना (आणि मला) देखील नक्की का आकर्षित करतो हे कळाले नाही.

In reply to by धर्मराजमुटके

तुर्त इतके म्हणता येइल की हिटलर इतके समर्थ्यवान नसतीलही पण तशी प्रवृत्ती राखणारे लोक आजही आजुबाजुला आहेत तीच गोष्ट हिटलरचा बिमोड करणार्‍यांची... त्यांची प्रवृत्ती राखणारे लोकही आजुबाजुला आहेत आणी हा दोन प्रव्रुत्तींमधील संघर्ष जो वर्तमानातील लोकांमधे अस्तित्वात आहे त्यांच्या बाजुचे अथवा विरोधाचे प्रतीक म्हणुन जे उदाहरण ठळक आहे ते उदाहरण पुन्हा पुन्हा विवीध कारणांनी चर्चेत येते व त्यापेक्षा मोठे उदा तयार होइल पर्यंत पुन्हा पुन्हा चर्चेत येत राहील... हेच कारण आहे महाभारत आजही अमर वाटते त्यातील कथानक अथवा विवीध पात्रे आजही विवीध कांगोरे धुंडाळुन चर्चीली जातात...

In reply to by गॉडजिला

हेच कारण आहे महाभारत आजही अमर वाटते त्यातील कथानक अथवा विवीध पात्रे आजही विवीध कांगोरे धुंडाळुन चर्चीली जातात...
वस्तुतः हि चर्चा महाभारत वा त्यातील कथान अथवा पात्रांबाबत नसतेच मुळी, अंडर दी सरफेस ही चर्चा तुमची माझी व आपल्याबाबतच असते... फक्त आपण ठळक उदाहरण बनलेले नसल्याने अशा चर्चेत आपण आपली नावे घेण्या ऐवजी प्रमुख पात्रांची नावे त्यांची वर्तणुक व त्याचे विश्लेशण करतो... अगदी संतांची उदाहरणे लिहणार्‍यांनाही संतांबाबत त्यांच्या ज्ञानाबाबत काडीची फिकीर नाही म्हणुन त्यांचे कर्तुत्वही दांभिक व फक्त आणि फक्त स्वांत आत्मकेंद्रीत सुखासाठी आहे पण त्यांची कसलीच योग्यता नसल्याने ते ठळक उदाहरणे प्रसिध्द असणार्‍या संताची नावे घेउन स्वताची बोलबच्चन मांडत असतात आणी त्याला ते संतांचा महीमा असा समज करुन पसरवत असतात... वस्तुतः ते तितकेच स्वार्थी, मतलबी आणि आत्मकेंद्रीत असतात जितके स्वार्थी, मतलबी आणि आत्मकेंद्रीत संतांना न मानणारे असतात

नुकतंच 'किशोर शांताबाई काळे' यांचं 'कोल्हाट्याचं पोर' वाचलं. सुरुवात केल्यावर पुस्तक खाली ठेवता आलं नाही, काही तासात सलग वाचलं. काळजाला चटका लावणारं पुस्तक आहे. Against all odds म्हणजे काय ते हे पुस्तक वाचून कळतं. किरकोळ अडचणीमुळे नाउमेद होणार्यांनी जरूर वाचावं. यासारखं एकही पुस्तक पुन्हा लिहिता येऊन नये अशी परिस्थिती निर्माण झाली, तेंव्हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सुधारला असं म्हणता येईल!

In reply to by मनो

या सुधारण्याच्या प्रवासाला आपणच खोडा घालत असतो. एक समाज म्हणून आपल्याला आहे तिथेच रेंगाळण्यात जास्त सुख वाटते का? जेव्हा जेव्हा आपल्यातीलच कोणीतरी आपल्याच एखाद्या उणीवेवर बोट ठेवले तेव्हा आपणच त्याविरुद्ध प्रतिकार करतो. कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाला बंदी घालावी अशी मागणी त्याच समाजातून झाली होती. तेदेखील लेखकाच्या अकाली मृत्यूच्या सहा वर्षांनी. आता काय परिस्थिती आहे, माहिती नाही. पण कोणत्याही पक्षाचे असो, उठसूठ संवेदनशील गळवांच्या उपचारासाठी दिसेल त्यावर बंदी घालणारे सरकार असतेच. तेव्हा अशा पुस्तकांवर आमच्या भावना दुखावल्या किंवा आमच्या समाजाची बदनामी झाली या सबबीखाली बंदी आल्यास आश्चर्य वाटणार नाही. लोकरंग पुरवणीतील २०१३ सालचा एक लेख.

In reply to by तुषार काळभोर

ज्यांना स्त्री ही भोग्यवस्तू म्हणून कायम रहावी असे वाटते तेच लोक याला विरोध करू शकतात. हा लेख इथे दिल्याबद्दल आपले आभार तुषार.

In reply to by मनो

काळजाला चटका लावणारं पुस्तक आहे. हे अंडरस्टेटमेंट झालं. याच्यापेक्षा बरचसं काही जाणवतं. ते शब्दात मांडता येणार नाही. वाचताना जर असं वाटतं असेल तर तो मुलगा आयुष्य कसं जगला असेल. जन्मल्यापासून परवड सुरू झाली. आणि जेव्हा आयुष्याचा आनंद घेता येईल अशी परिस्थिती आली, तेव्हा ते निघून गेले. दुर्दैवाने मरेपर्यंत त्यांचा पिच्छा सोडला नाही. दोन चार अपवाद सोडले तर, प्रत्येक पात्र तिरस्करणीय आहे. कुणाचा स्वभाव वाईट असेल, कुणाची मजबुरी असेल, पण प्रत्येक जण स्पर्धा असल्यासारखं ज्या निष्ठूर आणि नीचपणे वागतो, त्याला तोड नाही. डॉक्टर होणं लांब, हा मुलगा तोपर्यंत जगलाच कसा याचं आश्चर्य वाटत राहतं. भीडभाड न ठेवता त्यांनी ज्याप्रकारे खरी नावे वापरली आहेत, त्यांचा अपघात हा घातपात होता असं जर कधी सिद्ध झालं तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by तुषार काळभोर

एकदा वाचायला चांगले आहे. खूपवेळा अंडरवर्ल्डच्या दादाचे तत्वज्ञानाचे परिच्छेद अगम्य, रटाळ आहेत आणि रिपीट झाले आहेत. मधेच पुस्तक भरकटल्यासारखे वाटते. तरी एकंदरीत चांगलेच आहे.

आज सकाळी मेडिटेशनवर असलेली पॉडकास्ट ऐकताना मुलाखत घेणार्‍या व्यक्तीने ज्या व्यक्तीची मुलाखत घेतली जात आहे त्या व्यक्तीला काही पुस्तके रेफरन्ससाठी विचारली होती... त्यात एका पुस्तकाचे नाव आणि ज्या व्यक्तीने हे पुस्तक लिहले आहे त्या बाबत उत्सुकता चाळवल्याने मी ते पीडीएफ डाउनलोड करुन वाचण्यास सुरवात केली असुन आज त्या पुस्तकाचा १ला धडा [चॅप्टर ] वाचुन पूर्ण केला... आता काही काळ मी हे पुस्तक वाचुन पूर्ण करण्यासाठी देण्याच्या विचारात आहे. पुस्तकाचे नाव :- Many Lives, Many Masters The True Story of a Prominent Psychiatrist, His Young Patient and the Past-life Therapy That Changed Both Their Lives लेखक :- Dr. Brian Weiss हा प्रतिसाद लिहताना मी या डॉक्टरांचा छोटासा व्हिडियो पाहिला. तो खाली देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen Chawla

अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या या ३ कथा वाचल्या : Cat in the Rain The Killers Hills Like White Elephants त्यापैकी "Hills Like White Elephants" आवडल्याने त्यावर स्वतंत्र लेख लिहिलाय.

' इश्क में अजनबी, न रहे तो इश्क नही होता' रवीश कुमार, आजच्या वृत्तांकनाच्या काळात पत्रकार म्हणून त्यांचे वेगळेपण नजरेत भरते. पत्रकार म्हणून केवळ विविध बातम्यांच्या वाहिन्यावर फक्त त्यांनाच ऐकणाराही एक वर्ग आहे. (याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतील) बाकी, माणूस म्हणून तो उत्सुकतेचा विषय वाटला नाही तर नवल नाही. अशा रवीश कुमारचं लघुकथांच्या साखळीत विणलेलं छोट्या छोट्या ओळीतलं प्रेयसी सोबतचा दिल्ली शहरातल्या भटकंती बरोबर समाज, सांस्कृतिक घटनांच्या स्पर्शात लिहिलेलं सुंदर पुस्तक म्हणजे 'इश्कमे शहर होना' कितीतरी वाक्य 'कोट' करावीत अशी आहेत.'जगह की तलाशमें हम इस शहरमें और कितने शहर बदलेंगे' 'इश्क में अजनबी, न रहे तो इश्क नही होता' ' जब कुछ नही भी बचेगा तो इस टिफिन बॉक्स में हम मोहब्बत की दो रोटिया रखा करेंगे' चार-चार तर कधी कधी दहा एक ओळीतलं, सुंदर चित्रांसहित चितारलेले पुस्तक वाचनीय आहे. सलग दोन तास वाचायला बसले की पुस्तक संपते. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाचा, आपापल्या प्रेमाच्या आठवणींचा एक गोड कोपरा असतो. रवीश कुमारच्याही आयुष्यातल्या आपापल्या ठरलेल्या जागा आहेत. विशेषत: दिल्ली. लेडीज होस्टेल समोर उभे राहणे आहे, पाऊस, मंदिर, मशीद, गल्ली, रस्ते, रात्र, पहाट,चाँद, सार्वजनिक आंदोलने, टीव्ही, मीडिया, अण्णाचं आंदोलन, मार्क्स, लोकपाल ते लवपाल असा सुरेख प्रवास आहे. काही काही वाक्य आणि कथा कोट करून लिहावीत अशी आहेत पण सर्वच सांगण्यापेक्षा पुस्तक एकदा वाचायलाच हवं...! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आह्ह्हा, इश्कमे शहर होना. "मगध एक्स्प्रेस बोगी नं एस वन. दिल्ली से पटना लौटते वक्त उसके हाथ में बर्नार्ड शॉ देखकर वहांसे कट लिया. लगा की इंग्लिश झाडेगी. दूसरी बोगीयोंमे घूम घूमकर प्रेमचंद पढनेवाली ढूंढने लगा. पटना से आते हुये कई लडकीयोंके हाथ में गृहशोभा तक दिखा था. सोचते सोचते बेचारा कर्नल रंजीत पढने लगा. लफुआ लोगोंका लॅन्ग्वेज प्रॉब्लेम अलग होता है." . . झीरो टीआरपी वाला अँकर आमच्यासाठी टॉप नंबरच्या वर असतो.

भाऊ पाध्ये यांचे १९६५ मध्ये प्रकाशित झालेले व खूप गाजलेले "वासूनाका" हे पुस्तक वाचले. पुस्तक वाचून खूपच निराशा झाली. अत्यंत सामान्य पुस्तक वाटले.

In reply to by श्रीगुरुजी

वसुनाका फार पुर्वी वाचल होतं आणि आवडल होतं पण तुम्ही म्हणता तसा अनुभव मला भाऊ पाध्येंचच राडा वाचताना आला होता. जेंव्हा ते पुस्तकं आल तेंव्हा त्याचे बरेच काही वाद झाले आणि नंतर ते out of print होत त्यामुळ ते मिळालच नव्हत पण मित्रांकडुन खुप ऐकल होत, मध्यंतरी,ते परत आलं तेव्हा वाचल. तेव्हा मला ही असच वाटल कि किती सामान्य पुस्तक आहे (overrated) पण मग नंतर विचार केला तेव्हा जाणवल कि ते पुस्तक वेगळ्या काळात लिहील होत त्या नंतर बरेच संदर्भ बदलले आहेत बाहेरचे आणि माझे सुध्दा. आपण सुध्दा बरच वेगळ वाचल , पाहिलं वेगळे अनुभव घेतले त्यामुळे ते पुस्तक तेव्हा जसं भिडल असत तस आज भिडत नाहिये, तेव्हाच्या क्रांतिकारक गोष्टी आता सामान्य झाल्यात. म्हणुन पुन्हा वाचायला घेतल तर तेच पुस्तक थोड वेगळ जाणवलं रच्याकान भाउ पाध्येंच "बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर" हे एक अप्रतिम पुस्तक आहे

कायदाविषयक. चौदा वर्षे वकीली आणि नंतर न्यायाधिश झालेल्या रमेश बापट यांनी कायदा आणि विविध खटल्यांचे मजेदार किस्से सांगणारे पुस्तक हल्लीच वाचले.

अधर्मयुध्द हे गिरीष कुबेर ह्यांचे पुस्तक वाचतोय. त्यावरूनच विद्यार्थी ही शशक सुचली. त्या आधी निळू दामले ह्यांचे सीरिया सगळे विरुद्ध सगळे वाचले.