Skip to main content

कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 02/04/2021 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
ok या विषयाचे आधीचे संदर्भ : १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज .कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य ४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण ........................ पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन ....... 31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे. या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो. ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे : १. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध २. औषधोपचार आणि ३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय. गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत : १. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे. २. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे. दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे. अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत. अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत. कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :

१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते. २. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील. पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा: “लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट). यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही. लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते. करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकीहे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात. शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे: १. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत. २. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत. लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी : १. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली. सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो. 2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील. ३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते. ४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी. महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल. .... तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे. …………………………………………………

वाचने 114782
प्रतिक्रिया 230

प्रतिक्रिया

जगातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. कोरोना महासाथीचा अंत झाला आहे, हे समजण्यासाठी नेमके कोणते निकष, संकेत असावेत याबाबत जागतिक आरोग्य संघटनेत चर्चा सुरू आहे. कोरोना महासाथ संपुष्टात आल्याची घोषणा इतक्यात तरी होणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/world/coronavirus…

सध्याच्या युरोपीय युद्धामुळे युक्रेनचे सुमारे 30 लक्ष निर्वासित अन्य युरोपीय देशांमध्ये जमा झालेले आहेत. त्यापैकी सुमारे निम्मी मुले आहेत. या निर्वासितांच्या अन्य प्रश्नांच्या जोडीने आरोग्य समस्याही हाताळाव्या लागताहेत. त्यादृष्टीने युरोपीय समुदायाने या मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. त्यामध्ये कोविडच्या जोडीनेच क्षयरोग, पोलिओ आणि गोवराच्या लसींचा समावेश आहे. युक्रेनमध्ये पूर्वीसुद्धा या सर्व लसी देण्याचे प्रमाण निर्धारित मानकापेक्षा कमीच होते.

दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा आणि कर्नाटक या राज्य सरकारांनी सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासात पुन्हा एकदा मुखपट्टी वापराची सक्ती केलेली आहे.

In reply to by हेमंतकुमार

कोविड सुसंगत व्यवहार याची डोळसपणे चिकित्सा कुणी करणार आहे की नाही असा प्रश्न पडतो. उदाहरणंच घेऊ या. निर्जंतुकीकरण सक्ती: या मध्ये ठराविक वेळेनंतर मुक्त हस्ताने द्रव फवारले जाते. हे चिकट द्रव अजूनच धूळ आणि सूक्ष्म जीव धरून ठेऊन इतर आरोग्याच्या समस्या निर्माण करत असतील. ऑफिस फर्निचर साबणाच्या पाण्याने पुसून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकता येणार नाही का? लिफ्ट, हॉटेल मधील टेबल, आणि ऑफिस फर्निचर या प्रकारे जास्त स्वच्छ ठेवता येईल. विक्रेता आणि ग्राहक यामध्ये मोठ्या पोलिथिलिनच्या शिटचा पडदा: याने कोंदटपणा वाढून उलट रोग पसरण्यास मदत होईल ना? वातानुकूलन कमी अथवा बंद करने: याने हवेतील ऊच्छवासामुळे निर्माण होणारी आर्द्रता वाढून रोग तीव्रतेने पसरू शकतो. मुखपट्टीची सक्ती: या सक्तीमुळे बाहेर टाकलेली हवाच परत मोठ्या प्रमाणावर शरीरात जाऊन प्राणवायूची कमतरता निर्माण होऊ शकते. मुखपट्टीच बऱ्याचवेळा इतकी मळकी असते की विचारू नका. दोन वर्षानंतर कोविड सुसंगत मार्गदर्शक तत्त्वांची चिकित्सा झाल्यास बरे या हेतूने हा प्रतिसाद देत आहे.

In reply to by सर टोबी

१. निर्जंतुकीकरण सक्ती >>> रसायनांचे उठसूट फवारे अनावश्यक. त्यातून एलर्जीच्या समस्या वाढतात. माझ्या घरी असे कुठलेही रसायन नाही. गेली तीन वर्षे फक्त साबण वापरून हात धुतले आहेत. २. पोलिथिलिनच्या शिटचा पडदा: काही फायदा होतो असे वाटत नाही ३. वातानुकूलन >>> मुळातच यापेक्षा खिडक्या उघड्या व पंखा किंवा कुलर बरे असे माझे मत आणि माझी व्यक्तिगत पसंती. ४. मुखपट्टीची सक्ती >>>या विषयावर मी या लेखमालेत यापूर्वीच्या भागांमध्ये सविस्तर लिहिले असल्याने आता पुनरावृत्ती करत नाही.

बरोबर तीन वर्षांपूर्वी (31/ 12/ 2019) covid-19 या आजाराचे जागतिक पातळीवर नामकरण झाले. आज अखेरीस चीन वगळता अन्य बर्‍याच देशांमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. पुन्हा एकदा थोडीफार प्रवास बंधने, चाचण्या इत्यादी गोष्टी लागू झाल्यात. 2023 च्या उत्तरार्धापर्यंत तरी ही महासाथ पूर्णपणे संपावी अशी सदिच्छा व्यक्त करतो.

१. सध्या जगभरात असलेल्या या आजारात Omicron (XBB.1.5) हा प्रकार सर्वाधिक आढळतो. त्याची संसर्गक्षमता आतापर्यंतच्या सर्व प्रकारांपेक्षा अधिक आहे. २. मात्र त्याने बाधित रुग्णांमध्ये चव आणि वास याच्यावर सहसा परिणाम होत नाही. ३. या प्रकारामुळे अमेरिकेत एकदम रुग्णवाढ झालेली दिसते ४. लांब पडल्याच्या विमान प्रवासांमध्ये प्रवाशांनी मुखपट्टी वापरावीच असा जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला ५. 27 जानेवारीला संघटनेची महत्त्वाची बैठक. त्यात कोविड-19 ‘आणीबाणी’च्या समाप्तीची घोषणा करायची की नाही, यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल.

वर उल्लेख केलेल्या डब्ल्यूएचओच्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत इथे आहे Covid-19 ची महासाथ संध्या संक्रमण अवस्थेत आहे. अजूनही आरोग्य आणीबाणीची परिस्थिती चालू ठेवावी असे त्यात म्हटले आहे.

कोविड्ची फेज उलटुन गेल्यानंतर अनेकांना सांधे दुखीचा त्रास जाणवत आहे असे ऐकीवात आहे . या त्रासाला avascular narcosis असे म्हणले जाते . यामुळे गुडघेदुखी किंवा मानेचे दुखणे अनेकांना झाले आहे .

In reply to by सिरुसेरि

avascular narcosis
सर्वप्रथम हा शब्द सुधारून घेतो: Avascular necrosis (necrosis =पेशींचा मृत्यू) खरे आहे की अशा प्रकारचे काही रुग्ण आढळलेले आहेत. १. प्रामुख्याने हा त्रास अशा रुग्णांना झाला आहे की ज्यांना स्टिरॉइड्स अधिक प्रमाणात आणि अधिक काळ द्यावी लागली होती. अधिकतर हा त्रास मांडीच्या हाडाच्या खुब्यातील भागाला होतो. २. काही रुग्णांच्या बाबतीत ती न देताही समस्या उद्भवलेली आहे. अर्थात यावर अधिक संशोधन झाल्यावरच चित्र स्पष्ट होईल.

माणसांना होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी सुमारे 60 टक्के आजार विविध प्राण्यांकडून सूक्ष्मजंतू संक्रमित झाल्याने होतात ( बहुतांश जंगली प्राण्यांकडून). सध्याच्या महासाथीच्या मुळाशी चीनमधील वटवाघळे (Horseshoe bats) असल्याचे म्हटले जाते. यापुढची महासाथ उद्भवण्याची शक्यता कधी आहे, हा यक्षप्रश्न वैज्ञानिकांना सतावतो आहे. त्या दृष्टिकोनातून वटवाघळांच्या विशिष्ट प्रजातींचा (fruit bats) एक महत्वाकांक्षी अभ्यास हाती घेण्यात आलेला आहे. निसर्गतःच वटवाघळे स्वतःमध्ये विविध विषाणूंचा साठा उत्तम रीतीने करतात. त्या विषाणूंपासून त्यांना आजार होत नाही. मात्र त्यांच्या शरीरातून ते विषाणू माणसात संक्रमित झाल्यास आपल्याला विविध गंभीर आजार होतात. अशा प्रकारचे संक्रमण होण्यास खालील गोष्टी कारणीभूत असाव्यात: १. टोकाचे हवामान बदल २. जंगलतोड आणि तिथे चाललेला एकंदरीत मानवी हस्तक्षेप. अशा हस्तक्षेपामुळे वटवाघळांचे अन्नशोधासाठी मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. प्रस्तुत संशोधन प्रकल्पात जमैकातील वटवाघळे अमेरिकेत आणली जाणार आहेत. त्यांना विविध प्रकारचे खाद्य दिले जाईल तसेच काही प्रकारचे विषाणू त्यांच्या शरीरात सोडले जातील. त्यानंतर त्यांचा सखोल शारीरिक अभ्यास केला जाईल. या सगळ्यातून आपल्याला साथरोगांच्या प्रतिबंधासाठी काय करता येईल याचा अंदाज येईल.. या प्रकल्पात सात देशांमधील सत्तर वैज्ञानिक सहभागी होत आहेत. १. २.

माणसांना होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी सुमारे 60 टक्के आजार विविध प्राण्यांकडून सूक्ष्मजंतू संक्रमित झाल्याने होतात ( बहुतांश जंगली प्राण्यांकडून). सध्याच्या महासाथीच्या मुळाशी चीनमधील वटवाघळे (Horseshoe bats) असल्याचे म्हटले जाते. यापुढची महासाथ उद्भवण्याची शक्यता कधी आहे, हा यक्षप्रश्न वैज्ञानिकांना सतावतो आहे. त्या दृष्टिकोनातून वटवाघळांच्या विशिष्ट प्रजातींचा (fruit bats) एक महत्वाकांक्षी अभ्यास हाती घेण्यात आलेला आहे. निसर्गतःच वटवाघळे स्वतःमध्ये विविध विषाणूंचा साठा उत्तम रीतीने करतात. त्या विषाणूंपासून त्यांना आजार होत नाही. मात्र त्यांच्या शरीरातून ते विषाणू माणसात संक्रमित झाल्यास आपल्याला विविध गंभीर आजार होतात. अशा प्रकारचे संक्रमण होण्यास खालील गोष्टी कारणीभूत असाव्यात: १. टोकाचे हवामान बदल २. जंगलतोड आणि तिथे चाललेला एकंदरीत मानवी हस्तक्षेप. अशा हस्तक्षेपामुळे वटवाघळांचे अन्नशोधासाठी मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. प्रस्तुत संशोधन प्रकल्पात जमैकातील वटवाघळे अमेरिकेत आणली जाणार आहेत. त्यांना विविध प्रकारचे खाद्य दिले जाईल तसेच काही प्रकारचे विषाणू त्यांच्या शरीरात सोडले जातील. त्यानंतर त्यांचा सखोल शारीरिक अभ्यास केला जाईल. या सगळ्यातून आपल्याला साथरोगांच्या प्रतिबंधासाठी काय करता येईल याचा अंदाज येईल.. या प्रकल्पात सात देशांमधील सत्तर वैज्ञानिक सहभागी होत आहेत. १. २.

11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने covid-19 या आजाराची आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. त्याला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. काल अखेरीस ढोबळमानाने परिस्थिती अशी आहे : एकूण संसर्ग झालेल्या व्यक्ती : 68 कोटी आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती : 65 कोटी कोविड संबंधित मृत्यू : 68 लाख

कोविडमुळे बाधितांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम झाल्यास आढळले आहे. या संदर्भात पुण्यातील IISER या संस्थेतील डॉ. निक्सन अब्राहम यांच्या नेतृत्वाखालील चमू आणि बी. जे. मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त सहकार्याने एक महत्त्वाचा संशोधन प्रकल्प पार पडला. लक्षणविरहित असणाऱ्या बाधित 80 टक्के लोकांमध्ये वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झालेला आढळला. या संशोधनादरम्यान वरील चमूने वासक्षमता मोजण्याचे olfactometer हे उपकरण देखील विकसित केले.

कोविड- आरोग्य आणीबाणी आता संपली आहे. WHO ची घोषणा अर्थात अजून काही काळ लोक बाधित होत राहतील; योग्य ती काळजी आवश्यक.

गेल्या 24 तासात बहुतेक इ-वृत्तमाध्यमातून खालील प्रकारचा मथळा झळकतो आहे :
“'डिजीज X' आहे तरी काय? जगावर घोंगावतोय महामारीचा धोका; WHO नं जारी केलाय अलर्ट”
हे वाचून विचलित व्हायचे किंवा दडपून जायचे काही कारण नाही. सन 2018 मध्येच जागतिक आरोग्य संघटनेने, ‘भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या विषाणूजन्य साथींसाठी’ “डिसीज एक्स” (माहित नसलेले) हे नामकरण करून ठेवलेले आहे. हे संबोधन कुठल्याही विशिष्ट एका आजारासाठी नसून संभाव्य आजारांच्या गटासाठी आहे. जसजसे नवे विषाणू सापडत जातील ते सर्व या एक्स पंथातील घटक राहतील. किंबहुना कोविड-19 घडविणारा विषाणू या पंथातील पहिला घटक होता.

30 जानेवारी 2020 रोजी भारतातील खात्रीशीर निदान झालेला पहिला कोविड19 रुग्ण आढळला होता. गेल्या तीन वर्षात कोविडबाधितांची सेवा करताना अनेक डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कर्तव्य बजावताना (आणि रुग्णांनाही) मृत्यू आला होता. त्याप्रित्यर्थ भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध शाखांतर्फे 30 जानेवारी हा कोविड हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. अभिवादन !

In reply to by हेमंतकुमार

अभिवादन. सर्व डॉक्टर, सेवा कर्मचारी, सफाई कामगार, गरजेच्या सेवा देणारे इतर सर्व... सर्वांनाच अभिवादन !

जर्मनीतील एका 62 वर्षीय माणसाने कोविड लस एकूण 217 वेळा घेतल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यापैकी 130 वेळा घेतल्याचा कायदेशीर पुरावा आहे. वैज्ञानिकांनी या माणसावर काही चाचण्या करून त्याच्या प्रतिकारक्षमतेचा सखोल अभ्यास केला. त्यातून असे दिसले, की त्याच्या मूलभूत प्रतिकारशक्तीवर कोणताही परिणाम (चांगला अथवा वाईट) झालेला नाही. हे एक अजब प्रकरण आहे खरे !