नोटबंदी - कायमची बंदी

धर्मराजमुटके काथ्याकूट
नोटबंदी चे काय होणार , त्याचे परिणाम वगैरे सर्व चर्चांचा आता अतिरेक होऊ लागला आहे. मुळात काळा पैसा फारसा रोख स्वरुपात नाहीच. तो अगोदरच सोन्यात, जमिनित कन्व्हर्ट झालाय असेही बर्‍याच लोकांचं म्हणणे आहे. मात्र जादुगार आपल्या पोतडीतून वेगवेगळ्या वस्तू काढून समोरच्याला आश्चर्यचकित करतो तसे आपण देखील रोज कुठुन कुठुन आज अमुक करोड पकडले तर काल तमुक लाख पकडले अशा रोज बातम्या ऐकून आश्चर्यचकित होत आहोत. सरकार जेव्हा काळ्या पैशाचा हिशोब देईल तेव्हा देईल मात्र रोज बातम्यांमधून मिळणार्‍या माहितीवरुन साधारण आज किती बेहिशोबी पैसा जमा झाला याचा अंदाज बांधायला काय हरकत आहे ? कालपर्यंत ठाण्यात एक कोटी पकडले म्हणून माझी छाती ५६" ची झाली मात्र आज पुण्यात बँक लॉकरमधून १० करोडची बेहिशोबी रक्कम मिळताच माझा छातीचा फुगा फुटला. खरेच पुण्याचा नाद नाय करायचा बॉ ! अर्थात नोटबंदीच्या विषयावर वाचून आणि लिहून तुमचा दम आतापर्यंत नाकात आलाच असेल म्हणा ! फिर भी बचेंगे तो और भी बचेंगे ! तर चला बरं रोकडजप्तीच्या तुम्हाला माहित असलेल्या बातम्या इथे चिकटवा चटाचटा. :) :)
वर्गीकरण

13 टिप्पण्या 2,304 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

खटपट्या नवीन

सद्या मोठ्या प्रमाणात पकड्ल्या जाणार्‍या रकमा आश्चर्यचकीत करतायत खर्‍या. पुर्वी एवढ्या धाडी पडत नव्हत्या. आत्ताच कसे एवढे पैसे कसे पकडले जात आहेत? काहीतरी शक्कल लढवलीय सरकार ने...

रामपुरी नवीन

In reply to by अर्धवटराव

काहितरी बरे करतात म्हणून प्रेझेंट तरी करू शकतात. नाहीतर पूर्वीच्या सरकारांचे कर्तॄत्वच असे काही असायचे की प्रेझेंट करण्यापेक्षा लपविण्याकडे कल अधिक.

संदीप डांगे नवीन

In reply to by रामपुरी

धागा काढा राव याच्यावर, तो श्रीगुरुजींचा एक वर्षानंतर वाला धागा काढला. नंतर कायच नाय... दोन वर्षानंतर, अडिच वर्षानंतर असा काही धागा आला पाहिजे. अभ्यासू व्यक्तिंनी घ्यावं मनावर जरा....

सुखीमाणूस नवीन

In reply to by अर्धवटराव

आधीच्या सरकार कडे टिमकी वाजवायला गान्धी बाबा आहेत आताचे सरकार त्यान्चे फोटो असलेल्या नोटा वापरतय...

संदीप डांगे नवीन

In reply to by खटपट्या

असं होत आहे हे मी सुरुवातीलाच बोललो होतो, पण इथले काही सदस्य असे होणे शक्यच नाही असे छातीठोक म्हणत होते.

खटपट्या नवीन

In reply to by संदीप डांगे

कीतीही नियम केले तरी त्यातून आपले उखळ पांढरे करुन घ्यायचे ही भ्रष्टाचार्‍यांची सवय आहे. त्याला आता मोदी आणि सरकार काय करणार? नोटबंदीचा निर्णय तर चांगलाच आहे. कसे का होइना, नोटा मोठ्या प्रमाणात पकडल्या जात आहेत हे काही कमी आहे का?

एस नवीन

अवांतर - कॅशलेस हे एक दुष्टचक्र झाले आहे. मला केलेल्या कामाचे रोख पैसे कोणी देत नाहीत कारण त्यांच्याकडे कॅश नाहीये. माझी कॅशलेस व्यवहाराला मना नाही, पण माझ्याकडे कॅश नाही म्हणून मी इतरांना कॅश देऊ शकत नाही. सध्या सगळाच कारभार उधारीवर सुरू आहे. पण तातडीच्या आणि फक्त कॅशच मागितली जाते अशा खर्चासाठी पैसे जवळ नाहीत. कसा मार्ग काढायचा? हे एकट्यादुकट्याचे काम नाही. संपूर्ण समाज जर कॅशलेसच्या मार्गावर वाटचाल करू लागला तर ते शक्य आहे. पण मधलेअधले कोणी कॅशवर हटून बसले तर संपूर्ण साखळीला वा चक्राला ब्रेक बसतो.

संदीप डांगे नवीन

In reply to by एस

सहमत आहे. आज एका बॅन्केत गेलो होतो, एका मुलाला चौदा हजार कॅश काढायची होती. कॅशीयर कॅश नाही, फक्त चार हजार देऊ शकणार असे सांगत होता. तो मुलगा खूप टेन्शनमधे दिसत होता. बराच वेळ त्याची मिनतवारी चालू होती कॅशियरसोबत. शेवटी चार हजार तर चार हजार म्हणून तो सेल्फचा चेक लिहायला लागला. मी त्याला म्हटलं अरे हा चेक तू थेट त्या व्यक्तिलाच दे ना, ज्याला चौदा हजार द्यायचे आहेत. तो म्हणाला, ते चेकने नाही घेणार पैसे, कॅशच लागतील. तेव्हा मलाही हाच प्रश्न पडला की एखाद्याकडून मला काही घ्यायचे आहे आणि तो रोखशिवाय देत नाही, दुसरीकडे मला ते मिळत नाही तर नक्की काय करणार? ही वस्तू वा सेवा तातडीच्या गरजेचीही असू शकते. बर्‍याच भानगडी, बरेच पैलू आहेत. पण काय करणार, काही लोकांना पटतच नाही.

आजानुकर्ण नवीन

In reply to by संदीप डांगे

आवो तिकडे दुनिया चंद्रावर गेली आणि तुम्ही थुक्की लावून नोटा मोजणाऱ्यांची कसली काळजी करता? पाणी नसलं की दगड मागणार तुम्ही. आम्ही बघा पाणी नसलं की पुसतच नाही!