Skip to main content

महाराज, बुवा, स्वामी इत्यादि

लेखक शरद
Published on सोमवार, 07/11/2016
महाराज, बुवा, स्वामी इत्यादी मी लहानपणापासून विद्यार्थीच राहिलो.जिथे जिथे जी जी माहिती मिळाली ती ती गोळा करत राहिलो. विज्ञान, साहित्य, धर्म,संगीत.चित्रकला, फ़ोटोग्राफ़ी सर्वात मांजरीच्या पिल्लाप्रमाणॆ ,कुतुहलाने डोकावत राहिलो. जमा काय झाले ते सोडून देऊ, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मार्कंडॆय़ाएवढे आयुष्य मिळाले तरी आपणाला माहित नाही असे बरेच काही राहून जाणार आहे. थोडक्यात,’ ही गोष्ट शक्य नाही, सगळे बुवा भोंदू असतात, हे असेच असते’ अशा प्रकारची विधाने करणे चूक आहे एवढे नक्की पटले. माझ्यापुरते उपनिषदातील पुढील विधान स्विकारणीय आहे. " जो कळले म्हणतो त्याला कळलेले नसते .......... " ही वैयक्तिक माहिती [ज्यात कुणालाच इन्टरेस्ट असावयाचे कारण नाही ] कशाकरिता ? तर, मला आज जे लिहावयाचे आहे त्यावरील प्रतिसादातून मला काही ज्ञान मिळेल, एका निराळ्या विषयावरील अनेकांची मते, अनुभव कळतील एवढीच अपेक्षा. विषय आहे बुवा महाराज,स्वामी इत्यादी. ऐतिहासिक काळातील संत ज्ञानेश्चर, तुकाराम, कबीर यांचे वाड्मय वाचल्यावर मनाला वाटले की यांनी जे लिहले आहे ते लोककल्याणाकरिताच असावे. यात त्यांचा वैयक्तिक लाभाचा विचार नसावा. त्यांच्या आयुष्यातील चमत्कार सोडूनही ते महान होते.. आजच्या काळातही गोंदिवलेकर महाराज, गाडगे महाराज ही त्या श्रेणीतील माणसे..त्यांच्यावर विश्वास ठेवावयास हरकत नाही. आपल्या तुटपुंज्या ज्ञानावर फ़ार भार देण्याऐवजी हे रास्त. हल्ली महाराज,बुवा, स्वामी फ़ारच वाढलेले दिसतात. पूर्वीही असतील पण वर्तमानपत्रे,दूरदर्शन यांच्यातील प्रसिध्दीमुळे हे रोज़च डोळ्यासमोर येऊ लागले आहेत.त्यातील बातम्यांमुळे मनात एक प्रश्नांचे मोहोळ उठले.इतके महाराज, बुवा देशात आहेत [१] त्यामधील [चांगले-वाईट म्हणत नाही]योग्य-अयोग्य कोण, २,] त्यांची पात्रता कोणी व कशी ठरवावयाची, [३] त्यांची अध्यात्मिक पातळी काय असते, [४] लोक त्यांच्याकडे कशाकरता जातात, [५] लोकांना त्यांचा फ़ायदा होतो का, [६] लोक त्यांचासमोर पैसे ठेवत असतील तर लुबाडणे म्हणावे का, [७] जर सर्वाधिक लोक संसारातील अडचणी सोडवावयाला जात असतील तर महाराजांना समुपदेशक समजावे का, [८] महाराजांचे महत्वाचे काम तेच असेल तर दहा पैकी फ़क्त दोघांचे प्रश्न सुटले तरी त्यांची उपयुक्तता मानावी की नाही, आणि [९] या सर्वांना शिव्या घालणाऱ्यांकडे दुसरा पर्याय काय आहे, असे अनेक प्रश्न उभे रहातात. या सर्वांचा अभ्यास केलेला नसल्याने त्यांची उत्तरेही मिळालेली नाहित. सर्व माहिती, वाचलेली, ऐकलेली. आपण तर एकाही महाराजाकडे गेलो नाही, मग आपण कसे काय ठरवणार की य महाराज, क्ष बुवा किंवा ज्ञ बापू कसे आहेत ? हे ज्ञानही परोक्ष मिळवावे लागणार. कशी मिळेल ही माहिती ? हा प्रश्न अचानक सुटला.एका नवीन मित्राची ओळख झाली. विज्ञानशाखेचे निवृत्त प्राध्यापक.बऱ्याच सार्वजनीक कार्यात निरलसपणॆ भाग घेणारे. त्यांचा " अशा " लोकांशी बऱ्यापैकी संकर्प. त्यांना सरळ विचारले, " तुम्ही एखादा माणुस अध्यात्मात पुढे गेला आहे, तो महाराज म्हणवून घेण्यास योग्य आहे हे कशावरून ठरवाल ? तुमचा अनुभव काय ? " त्यांनी दुसऱ्या दिवशी उत्तर दिले. इतके सरळ, स्वच्छ उत्तर मिळेल याची अपेक्षाच नव्हती. ते म्हणाले " ह्याचे उत्तर तुम्हाला मिळालेला अनुभव व अनुभुती यावरूनच ठरवावे लागेल. अनुभुतीबद्दल सांगणे अनुचित ठरेल, मी माझ्या अनुभवापुरते बोलतो. " तुम्ही कुणाही माणसाकडे गेलात तर काहीही बोलाचाल न होता देखील पहिल्या ५ मिनिटात १] तुम्हाला त्याच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचे प्रेम दिसले पाहिजे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले पाहिजे, २] तुमच्या मनांत शांती दाटून आली पाहिजे, ३] तुम्हाला आंतरिक आनंदाची प्रचिती आली पाहिजे, असे घडले तर तो " तुमचा " महाराज. तीच व्यक्ति दुसऱ्या माणसाबाबत ’ महाराज ’ असेलच असे नाही. " संपले ! आता इतरांनी काय लिहले आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. पण तोपर्यंत आपण काय म्हणता ? एखादा माणुस ’ महाराज ’ होण्याकरिता एवढ्या तीन गोष्टी पुरेशा आहेत का ? मला येथे ’महाराज ’ म्हणजे जो लोकांना मार्गदर्शन करू शकेल, जीवनात भेडसावणाऱ्या अडचणींमध्ये दिलासा देऊ शकेल, शास्वत काय आणि अशास्वत काय किंवा उपनिषदांच्या भाषेत बोलावयाचे म्हणजे श्रेयस काय आणि प्रेयस काय यांतील भेद सर्वसामान्याला कळेल अशा भाषेत सांगू शकेल असा माणूस.मग भले तो तुम्हाला अध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शन करणारा असो वा सासंरीक अडचणीत मदत करणारा. तुम्ही तुमची व्याख्या ठरवा. या तीन गोष्टींमधून काय गाळावे,काय मिळवावे ? की मी म्हणतो तसा ’महाराज ’ कोणी नसतोच किंवा समाजाला त्यांची गरजच नाही .नक्की काय ? शरद समित्पाणी अजुन नाही जागी राधा अजुन न्नाही जागे गोकुळ ! अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ !!

याद्या 2092
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

की मी म्हणतो तसा ’महाराज ’ कोणी नसतोच किंवा समाजाला त्यांची गरजच नाही .नक्की काय ? -बुवा / स्वामिंना समाजाची गरज असते.

मोठमोठे इतिहास पुरूष, साधुसंत, उद्योजक ,खेळाडू यापैकी कोणालाही विभूति व्हायचे नसते. कार्यकारण भावाची चिकित्सा न करणे हे मानसिक आळसामुळे घडते. जगात जास्तीत जास्त माणसे अशी " आळशी" असतात ती या प्रकारच्या लोकाना विभुतिपद बहाल करतात. त्यांची मंदिरे स्थापन करतात पुतळे उभारतात.

तुम्ही कुणाही माणसाकडे गेलात तर काहीही बोलाचाल न होता देखील पहिल्या ५ मिनिटात १] तुम्हाला त्याच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचे प्रेम दिसले पाहिजे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले पाहिजे, २] तुमच्या मनांत शांती दाटून आली पाहिजे, ३] तुम्हाला आंतरिक आनंदाची प्रचिती आली पाहिजे, मूळ तुमच्या मनात स्वामी महाराज याबद्दल भक्ती असेल तर असे विचार येतील. जर मुळात संशय असेल किंवा सगळे स्वामी म्हणजे भोंदू अशी विचारसरणी असेल तर असे विचार येणारच नाहीत. थोडक्यात मनातील विचाराप्रमाणेच उत्तर मिळेल. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, तुमच्याशी असहमत होण्याचे काही दुर्मिळ प्रसंग येतात. त्यापैकी हा एक आहे. :-) मनात शांती दाटून येणं कुठेही होऊ शकतं. त्यासाठी आदरभाव बाळगण्याची अजिबात जरुरी नाही. स्वानुभव आहे. आ.न., -गा.पै.

मला वाटते मानसिक आधार मिळवण्याचा हा सोपा मार्ग आहे. प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे मार्ग शोधतो.