मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं

राजेश घासकडवी · · काथ्याकूट
लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे. १. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार. परकीय शक्तींबद्दल संशय. परकीयांबद्दल घृणा. २. मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - फॅसिस्ट राज्यकर्त्यांनी आपल्याला जे हवं आहे त्यात मानवी अधिकार, लोकांच्या जिवांची किंमत ही अडचण मानली. प्रचाराची साधनं वापरून होणारे अत्याचार क्षुल्लक आहेत इतकंच नव्हे तर ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत तेच कसे नालायक लोक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अत्याचार भयंकर होत होते तेव्हा गुप्तता, इन्कार आणि अफवा/गैरसमज पसरवण्यात फॅसिस्ट राजवटी वाकगबार होत्या. ३. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व फॅसिस्ट राजवटींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे लोकांना मुख्य प्रश्नांपासून लक्षवेध करण्यासाठी बळीच्या बकऱ्यांचा वापर. यामुळे अपयशांचं खापर फोडण्यासाठी आणि जनतेचं फ्रस्ट्रेशन नियंत्रित दिशेला वळवण्यात या राजवटींना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या समूहांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट, समाजवादी, सेक्युलर, लिबरल, ज्यू, अल्पसंख्यांक, शत्रुराष्ट्रं, परधर्मीय, समलिंगी आणि सर्वसमावेशक आतंकवादी. राजवटींना विरोध करणाऱ्यांना टेररिस्ट/देशद्रोही अशी विशेषणं लावून त्यांचा नायनाट केला जायचा. ४. सैन्याचं, सुरक्षा रक्षण व्यवस्थेचं वर्चस्व - राज्यकर्त्यांनी कायमच मिलिटरीला उच्च स्थान दिलं आणि मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉंप्लेक्सला पाठिंबा दिला. इतर तीव्र गरजा असूनही राष्ट्राच्या बजेटपैकी मोठा हिस्सा मिलिटरीसाठी दिला गेला. मिलिटरीकडे प्रखर राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. ५. तीव्र लिंगभेद - राज्यकर्ते हे मुख्यत्वे पुरुष असल्यामुळे स्त्रियांकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहाण्यात आलं. त्यांची भूमिका घर सांभाळणं, आणि मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करणं इतकीच राहावी असं ठासून सांगण्यात आलं. ६. मीडियावर प्रचंड प्रमाणावर नियंत्रण - काही राजवटींनी मीडियावर मालकी हक्क स्थापन केले तर काहींनी अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवलं. यात लायसन्सेस देणं, आर्थिक आणि राजकीय दबाव टाकणं, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचं आवाहन करणं, सूचक धमक्या देणं वगैरे गोष्टी येतात. ७. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा गंड - राज्यकर्ते जे काही करतात त्याला राष्ट्रीय सुरक्षेचा रंग चढवण्याचं काम या राजवटींनी केलं. विरोधकांना देशविरोधी आणि देशद्रोही ठरवण्याचा या राजवटींचा प्रयत्न राहिला. ८. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - कम्युनिस्टांनी धर्म नाकारला तर फॅसिस्टांनी तो कवटाळला. बहुसंख्येचा धर्माधार स्वीकारून त्या धर्माचे आक्रमक रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. राज्यकर्त्यांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. विरोधक हे धर्मद्वेष्टे आहेत आणि राज्यकर्त्यांना विरोध म्हणजे धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं. ९. मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - सामान्य माणसाचं आयुष्य नियंत्रित केलं जात असतानाच मोठ्या कंपन्यांना हवं ते करण्याचं अमर्याद स्वातंत्र्य दिलं गेलं. यात मिलिटरीसाठी आवश्यक उत्पादनं निर्माण करण्याची क्षमता म्हणून कंपन्यांकडे/कॉर्पोरेशन्सकडे पाहिलं गेलं. इतकंच नाही तर समाजावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा म्हणूनही त्यांना महत्त्व दिलं गेलं. विशेषतः नाहीरे वर्गावर वचक ठेवण्यासाठी. १०. कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं - डाव्या शक्ती, एकत्रित झालेला कामगार वर्ग - कारखान्यातला वा शेतातला - ही आपल्या राजकीय नियंत्रणाला आव्हान समजून फॅसिस्ट राजवटींनी त्यांना पद्धतशीरपणे खच्ची केलं. गरीबांकडे तुच्छतेने पाहिलं गेलं. ११. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - विचारवंत आणि त्यांना अपेक्षित असलेलं विचारस्वातंत्र्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे या राजवटींना त्याज्य होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्तीच्या आदर्शांच्या विरोधक मानलं गेलं. युनिव्हर्सिटींवर कडक नियंत्रण ठेवलं गेलं, राजकीय विरोधक असलेल्या प्राध्यापकांना त्रास दिला गेला किंवा काढून टाकलं गेलं. वेगळे विचार दाबून टाकण्यासाठी त्यांवर हल्ला केला गेला, त्यांची तोंडं दाबली किंवा बंद केली गेली. या राजवटींसाठी कला आणि साहित्य हे केवळ देशाच्या उन्नतीसाठी असायला परवानगी होती. देशाच्या त्रुटी दाखवणाऱ्या कलाकृतींवर व कलाकारांवर हल्ला केला गेला. १२. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - बहुतांश राजवटींनी अत्यंत क्रूर न्यायव्यवस्थेचा पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना तुरुंगात टाकलं. पोलिस व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात सामर्थ्य दिलं गेलं. साधे आणि राजकीय गुन्हे वाढवून-चढवून इतर मोठ्या गुन्ह्यांत गुंफले गेले होते आणि ते आरोप राजकीय विरोधकांवर वापरले गेले. भीती, दहशत आणि देशद्रोह्यांबद्दलची घृणा वापरून पोलिस अधिकारांची व्याप्ती वाढवण्यात आली होती. १३. भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी - उच्च पदांवर असलेल्यांच्या जवळचे आणि आर्थिकदृष्ट्या वरचे, म्हणजे उद्योगपती वगैरे यांचं उखळ पांढरं झालं. सत्ता आणि उद्योग यांचं साटंलोटं साधून प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार साधला गेला. याबाबतीत जनता कायमच अंधारात राहिली. १४. भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - बहुतांश राजवटींमध्ये निवडणुका हा फार्स होता. निवडणुका मॅनेज करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात टाकणं, निवडणुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं, विरोधी मतदारांना धमकावणं किंवा दहशत दाखवणं, खरी मतं नष्ट करणं असे अनेक उपाय वापरले गेले. या व इतर लक्षणांविषय़ी इथे चर्चा अपेक्षित आहे.

वाचने 29125 वाचनखूण प्रतिक्रिया 174

In reply to by गामा पैलवान

राजेश घासकडवी Fri, 02/26/2016 - 00:28
त्यातलं दुसरं टोक लोकशाही नसून अराजक (वा निर्नायकी) आहे. असं आपलं माझं मत. निदान जर्मनी अन इटलीमध्ये तरी फ्यासिस्ट हुकूमशहा अराजकातूनच उत्पन्न झालेले आहेत.
कशातून निश्चित काय उद्भवतं यापेक्षा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या राजवटी - खरंतर विचारपद्धतीतला फरक मला म्हणायचा होता. गणितातली व्हेक्टरची कल्पना इथे उपयोगी पडेल. माझं म्हणणं असं की हे चौदा निकष एकाच व्हेक्टरचे चौदा कॉंपोनंट्स आहेत असं समजू. आणि त्या प्रत्येक कॉंपोनंटचं वेगवेगळ्या राजवटींसाठी काहीतरी मोजमाप करून त्याला ० ते १ मध्ये आकडा देऊ. तर आदर्श लोकशाहीत हे सर्व शून्य असतील आणि व्हेक्टर मॅग्निट्यूडही शून्य असेल. याउलट जसजशी या कॉंपोनंट्सची मॅग्निट्यूड वाढेल तसतशी या व्हेक्टरची मॅग्निट्यूड वाढेल. जास्तीत जास्त मॅग्निट्यूड १ असेल. हा बिंदू म्हणजे संपूर्ण फॅसिस्ट राजवट. आता या शून्य ते एक मॅग्निट्यूडमध्ये जसजसे आपण शून्यपासून वाढवत नेऊ तसतसं लोकशाहीचं प्रमाण कमी आणि फॅसिझमचं प्रमाण वाढेल. पांढऱ्यापासून काळ्यापर्यंत जाताना राखाडी रंग काळपट होत जातो तसं. यात कुठे रेष आखायची आणि यापलिकडे फॅसिझम अलिकडे लोकशाही असं सांगणं कठीण आहे. अर्थात ही मांडणी फक्त समजून घेण्यासाठीच आहे. अशी मोजमापं शक्य नाहीत, तसंच ही १४ लक्षणं काही म्युच्युअली इंडिपेंडंट नाहीत.

In reply to by कपिलमुनी

मोदक Fri, 02/26/2016 - 07:52
समीक्षक म्हणजे तीच जमात ना? चांगले दिसले तरी त्यात मुद्दाम खोट काढणार आणि किरकिर करत बसणार, मूळव्याध, बद्धकोष्ट असल्या विकारांनी पीडीत.. कितीही चांगले कपडे दिले तरी बोहारणीसारखे "यापेक्षा चांगले काही नाही का?" असले विचारणारे? (वरील विधाने पुलं यांची आहेत याची कल्पना आहे)

सायकलस्वार Fri, 02/26/2016 - 02:03
इथे चाललेल्या धुमश्चक्रीत काही काँट्रिब्युट करावं एवढी माझी पात्रता नाही. पण एवढंच नोंदवून जातो...
सर्वप्रथम, इथे अनेकांनी फॅसिस्ट आणि डावी अत्याचारी सरकारं असा भेदभाव केलेला आहे. जणू काही फॅसिस्ट प्रवृत्ती ही केवळ उजव्यांची मक्तेदारी असते. अनेकांनी ही लक्षणं अनेक डाव्या राजवटींना लागू पडतात हे दाखवून दिलेलं आहे. तेही योग्यच आहे. पण पुन्हा तेच, फॅसिस्ट प्रवृत्ती या उजव्या-डाव्या विचारसरणीच्या पलिकडे जातात.
फॅसिस्ट हा शब्द डाव्या / कम्युनिस्ट सरकार / विचारसरणीसाठी कुणीही कधीही वापरलेला मी आत्तापर्यंत ऐकला नाहीये. श्री. गुगल म्हंटात... fas·cism ˈfaSHˌizəm/Submit noun an authoritarian and nationalistic right-wing system of government and social organization. synonyms: authoritarianism, totalitarianism, dictatorship, despotism, autocracy; More (in general use) extreme right-wing, authoritarian, or intolerant views or practice. तेव्हा, फॅसिस्ट सरकारांत लेखकाला डावी रेजिम्सही अभिप्रेत होती हा दावा जरासा 'हा' वाटतो...

In reply to by सायकलस्वार

राजेश घासकडवी Fri, 02/26/2016 - 02:50
बरोबर. फॅसिस्ट हा शब्द केवळ उजव्या राजवटींसाठीच वापरला जातो. मला वाटतं म्हणूनच मूळ लेखकाने फक्त एक्स्ट्रीम राइट विंग असलेल्या राजवटीच घेतलेल्या आहेत. मात्र एक्स्ट्रीम डाव्या असलेल्या राजवटीही तीच तंत्रं वापरताना दिसतात. त्यांच्यासाठी नक्की कुठचा शब्द आहे हे मला माहीत नाही. त्यामुळे मी स्वतःसाठी फॅसिस्ट प्रवृत्तीचा अर्थ लावण्यासाठी 'लोकशाहीच्या किंवा तत्सम आदर्श व्यवस्थेत जी मूल्यं जपली जावीत अशी अपेक्षा असते त्यांपेक्षा दूर जाऊन आपली राज्यावरची पोलादी पकड निर्माण करणारी क्रूर व्यवस्था' असा लावतो आहे. त्यामुळे माझ्यासाठी फॅसिस्ट ते फॅसिस्टच मग ते डाव्या बाजूने जावोत की उजव्या. मी स्टालिनलाही फासिस्टच म्हणेन. एका अर्थाने माझ्यापुरती शब्दाची व्याप्ती वाढवतो आहे.

In reply to by राजेश घासकडवी

गामा पैलवान Fri, 02/26/2016 - 03:03
राजेश घासकडवी, माझ्या मते डावा फ्यासिझम यास टोटलिटेरियानिझम ( मराठीत एकाधिकारवाद ? ) असा शब्द आहे. याबाबत चूभूदेघे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तर्राट जोकर Fri, 02/26/2016 - 03:51
डावा फ्यासिझमः एकाच माणसाच्या मनाने कारभार होत असेल तर त्याला अ‍ॅटोक्रसी -एकाधिकारवाद- म्हणतात. टोटलिटेरियनिझम म्हणजे एक समुहाद्वारे नियंत्रित होनारे राज्य. सगळ्यांमधे तत्त्वतः थोडेथोडे फरक आहेत, व्यक्तिस्वातंत्रय-संकोच, अमानुषपणात मात्र कोणतेच नाही.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम Fri, 02/26/2016 - 11:43
या शब्दाचा वेब्स्टर शब्दकोशात दिलेला अर्थ - A political concept which says that citizens of a state should be absolutely subjected TOTALLY to the powers of the state. यात कुठल्याही विचारसरणीचा उल्लेख नाहीये. याचाच अर्थ हा शब्द डाव्या-उजव्या दोन्हीही हुकूमशाही राजवटींना लागू होतो.तजो, तुम्ही म्हणताय त्याला Junta (उच्चार हुंटा) असा शब्द आहे.

In reply to by गामा पैलवान

राजेश घासकडवी Fri, 02/26/2016 - 07:11
तीच तर गंमत आहे. मला वाटतं शब्द थोडे गंडलेले आहेत. जगाने फॅसिझम - उजव्या राष्ट्रांकडून होणारा टोटॅलिटेरिअझम - आधी पाहिला आणि त्याला फॅसिझम असं नाव दिलं. मग त्यांच्या लक्षात आलं, की डाव्या सरकारांनीही हेच केलं. मग त्याच्यासाठीचा वेगळा शब्द करावा लागला, आणि तो सर्वसाधारण शब्द टोटॅलिटेरिअझम हा वापरला गेला. पण मुळात ही तंत्रं वापरून, कुठच्या का पोथीच्या आधारे जनमानसात आपण विरुद्ध ते अशी दुही निर्माण करून क्रूरपणे राज्यावरची पोलादी पकड राखण्याच्या प्रवृत्तीला सर्वसाधारण नाव नाही. हे थोडं पेडॅंटिक होतं आहे, पण शेवटी नक्की शब्द काय वापरायचा यावरच वाद आहेत. पण शेवटी स्वातंत्र्य, समता, बंधुता, विविधतेशी समन्वय, सहिष्णुता, दयाभावना, कणव ही मूल्यं एका बाजूला आणि कट्टरता, समाजरूढींची जाचकता, आपल्यापेक्षा मोठं काहीतरी असलेल्या एंटिटींसाठी आपण त्याग करण्याची अपेक्षा - असा मूल्यव्यवस्थांचा संघर्ष होतो. लहानपणी 'देव देश अन धर्मासाठी, प्राण घेतलं हाती' हे गाणं आवडायचं. पण 'इमॅजिन देअर्ज नो हेवन, नो हेल, नो कंट्री नथिंग टु लिव्ह ऑर डाय फॉर' हे गाणं भुरळ घालायला लागलं. आदर्श लोकशाही आणि फॅसिस्ट प्रवृत्ती यांच्यातला संघर्ष म्हणा किंवा फरक म्हणा तो हा आहे. सिस्टिम, व्यवस्था, समाजनियम, गावगाडा यांचा वैयक्तिक विचारांची आणि आयुष्यांची कुचंबणा करण्याइतपत शक्तिशाली वापर याला मी फॅसिझम/टोटेलिटेरियनीझम म्हणेन. त्या अर्थाने सरंजामशाही व्यवस्था हीही फॅसिस्ट होती. पण आता पुन्हा आपण शब्दांच्या व्याख्या आणि त्यांच्या मर्यादेपर्यंत पोचतो आहोत.

In reply to by राजेश घासकडवी

सुबोध खरे Fri, 02/26/2016 - 17:39
लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालवलेले राज्य फॅसिझम किंवा टोटॅलिटेरिअझम म्हणजे सरकारने, सरकारचे, सरकारसाठी वापरत असलेले लोक. मग ते डावे असोत कि उजवे. डावे फक्त दावा करतात कि आमचे कामगारांनी, कामगारांचे, कामगारांसाठी चालवलेले राज्य आहे.

In reply to by राजेश घासकडवी

गामा पैलवान Fri, 02/26/2016 - 17:42
राजेश घासकडवी आणि बोका-ए-आझम, तुमचे खुलासे/विधानं वाचोन डोस्क्याचा पार मासळीबाजार झालाय. मला पडलेले प्रश्न : १. डावे म्हणजे काय? २. उजवे म्हणजे काय? ३. संघवाले स्वत:ला उजवे वा फ्यासिस्ट म्हणवून घेत नाहीत. मग त्यांना फ्यासिस्ट कोणी ठरवलं? ४. डावे स्वत:लाच डावे म्हणवून घेतात का? ५. स्वत:ला फ्यासिस्ट म्हणवून घेणारा फक्त मुसोलिनी होऊन गेला. हिटलर स्वत:ला नाझी म्हणवून घ्यायचा. मग तो फ्यासिस्ट धरावा का? ६. वरील प्रश्नाचं उत्तर हो असेल तर मग फ्यासिस्टांना नाझी का म्हणू नये? लेखात उद्धृत झालेली बरीचशी लक्षणं नाझींनाही लागू पडतात. नाझी = न्याशनल सोशालिस्ट. मग नाझी न्याशनल म्हणून उजवे आहेत का सोशालिस्ट म्हणून डावे धरावेत? ७. सर्वात महत्त्वाचा प्रश्न : जर फ्यासिस्ट या संज्ञेने अचूक अर्थ व्यक्त होत नसेल तर दुसरा चपखल शब्द का वापरू नये? उदाहरणार्थ : क्रूर, वंशवादी, भ्रष्टाचारी, खुनी, इत्यादि? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विकास Fri, 02/26/2016 - 17:59
सर्वात महत्त्वाचा प्रश्न : जर फ्यासिस्ट या संज्ञेने अचूक अर्थ व्यक्त होत नसेल तर दुसरा चपखल शब्द का वापरू नये? उदाहरणार्थ : क्रूर, वंशवादी, भ्रष्टाचारी, खुनी, इत्यादि? महत्वाच्या प्रश्नाला मला वाटणारे महत्वाचे उत्तर ;) :- चर्चा प्रस्ताव हा अत्यंत subtle ठेवला कारण वर अनेकदा आल्याप्रमाणे कारण शिंपल होते... काही करून मोदींना आणि भाजपा-हिंदू (राजकीय/सामाजीक)विचारसरणीबद्दल "social awareness" वाढवायचा. मोदींना मौत का सौदागर म्हणून झाले, गुजरात दंगलीला पोग्रॉम म्हणून झाले पण जे आडात नव्हते ते पोहर्‍यात कसे येणार. म्हणूनच भले धुराळा उडवू शकले पण तो खाली बसल्यावर सत्यासत्यता बाहेर आली. (आज कुठे गेली ती टिस्टा सेटलवाड - दंगलग्रस्तांच्या मदतीच्या पैशाचे काय झाले?) थोडक्यात म्हणून "मी नाही त्यातली..." म्हणत असे प्रत्यक्ष क्रूर, वंशवादी, भ्रष्टाचारी, खुनी शब्द वापरणे टाळणे हिताचे होते. तरी देखील पब्लीकने "दुध का दुध और ताक का ताक" दाखवून दिले. मग व्यक्तीगत / अ‍ॅड होमिनिम म्हणायचे. असो.

In reply to by गामा पैलवान

राजेश घासकडवी Fri, 02/26/2016 - 18:36
जर फ्यासिस्ट या संज्ञेने अचूक अर्थ व्यक्त होत नसेल तर दुसरा चपखल शब्द का वापरू नये? उदाहरणार्थ : क्रूर, वंशवादी, भ्रष्टाचारी, खुनी, इत्यादि?
बऱ्याच वेळा शब्द आधी तयार होतात ते विशिष्ट संकल्पनेसाठी आणि नंतर त्यांची व्याप्ती वाढते. मुसोलिनीच्या पक्षावरून हा शब्द उचलला गेला, पण त्याच्या कार्यपद्धतीमुळे तो इतर राजवटींसाठीही वापरला गेला. कम्युनिस्टांनी आपल्या थियरीची पोथी वापरून त्याविरुद्ध बोलणारांना मारलं तर हिटलर, मुसोलिनी इत्यादींनी धर्माची पोथी वापरली. पण कुठल्यातरी पोथीचा वापर करून विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती तीच आहे. आणि म्हणूनच ही लक्षणं अनेक अन्यायकारक कम्युनिस्ट राजवटींनाही लागू पडतात. फॅसिस्ट शब्दामध्ये अनेक 'गुणांचा' समुच्चय असल्यामुळे कुठचाही एक शब्द पुरेसा पडत नाही. दुर्दैवाने त्याच्या व्याख्येत 'एक्स्ट्रीम राइट विंग' हे येत असल्यामुळे तो डाव्यांसाठी वापरला जात नाही. पण लक्षणांचा अभ्यास करून डावे-उजवेपणाचा निकष शिथिल केला तर स्टालिनची राजवट फॅसिस्ट होती, इंदिरा गांधीची आणिबाणीतली राजवट फॅसिस्ट होती असं मी म्हणेन.

In reply to by गामा पैलवान

बोका-ए-आझम Sat, 02/27/2016 - 00:24
१. व्यक्तीला महत्व; खाजगी संपत्तीला, स्पर्धेला, नफ्याला महत्व; बाजारपेठेत सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत असं मानणे; सरकारने व्यापारात कमीतकमी सहभाग ठेवावा असं मानणे आणि एक जी समाजव्यवस्थेची चौकट निर्माण झालेली आहे तिचं जतन करुन ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे ते उजवे किंवा ज्याला आपण उजवा विचार (Rightist thought म्हणतो त्यात हे सगळे येतात. धर्म हा मुद्दा कधी प्रचंड महत्वाचा, तर कधी कमी महत्वाचा असतो. पण पूर्ण नास्तिकता आणि धर्माचं अस्तित्व नाकारणं असं होत नाही. याचा अतिरेक म्हणजे नाझीवाद, फॅसिझम, तालिबान, हेझबोल्लाह वगैरे. २. ही चौकट मोडून काढून नव्या, समतेवर आधारित समाजाची बांधणी करणं शक्य आहे असं मानणं हा डावा विचार किंवा Leftist thought. यात क्रांती घडवून असा विचार प्रस्थापित करणं हा एक महत्वाचा भाग आहे. त्यात समाजवाद - ज्यात व्यक्तीऐवजी समाजाला महत्त्व असतं आणि शास्त्रीय समाजवाद (Scientific Socialism) असेही दोन प्रकार आहेत. आपला देश हा घटनात्मक रीत्या समाजवादी आहे. शास्त्रीय समाजवादाचं दुसरं नाव साम्यवाद किंवा Communism.यात प्रस्थापित जुलमी, शोषक व्यवस्था समूळ मोडून काढून नवीन समानतेच्या तत्वांवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न आहे. याचा रशियन विचारप्रवाह हा कामगारांची हुकूमशाही प्रस्थापित करण्याचं स्वप्न पाहतो. लेनिन हे या मार्गाचे उद्गाते. दुसरा चीनच्या माओचा मार्ग हा शेतकऱ्यांना जागृत करुन त्यांच्यामार्फत क्रांती घडवणं हे उद्दिष्ट ठेवतो. दोन्ही मार्ग सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवतात. याचा अतिरेक म्हणजे नक्षलवाद आणि माओवाद.

In reply to by गामा पैलवान

बोका-ए-आझम Sat, 02/27/2016 - 00:47
५-६ वर येतो. - Fasci या Italian शब्दाचा अर्थ लाठी. मुसोलिनीने Fascisti ही संघटना तयार केली. या संघटनेचा इटलीला पहिल्या महायुद्धात ब्रिटन आणि फ्रान्स यांनी वापरून घेतलं आणि प्रत्यक्ष जेव्हा जर्मन साम्राज्य वाटून घ्यायची वेळ आली तेव्हा हेतुपुरस्सर डावललं यावर विश्वास होता. त्यांनी १९२३ मध्ये रोमवर मोर्चा काढून सत्ता मिळवली आणि १९२५ मध्ये फॅसिस्ट पक्षाची एकाधिकारशाही सुरु केली. FASCISM मध्ये साम्यवादाला विरोध होताच पण वंशश्रेष्ठत्वाचा मुद्दा नाझीवादाएवढा महत्वाचा नव्हता. - नाझी पक्षाचं अधिकृत नाव National Sozialismus Deutsche Arbeiter Partei किंवा National Socialist German Workers' Party. National आणि Sozialismus यातल्या अक्षरांवरुन Nazi हा शब्द बनला आहे. नाझीवादात वंश या गोष्टीला प्रचंड महत्व होतं. मुसोलिनीनंतर तब्बल १० वर्षांनी हिटलर सत्तेवर आला आणि त्याने इटालियन फॅसिझम आणि जर्मन नाझीवाद यांच्यातील नैसर्गिक साधर्म्याला अनुसरून जर्मनी आणि इटली यांनी एकत्र युरोपची वाटणी करुन घ्यायचं ठरवलं. त्याला इतर देशांनी केलेल्या विरोधातून दुसरं महायुद्ध झालं. फॅसिझम आणि नाझीवाद हे दोघेही धर्म या गोष्टीला महत्व देत नाहीत. जर्मनीत कॅथाॅलिकांची परिस्थिती अगदी ज्यूंप्रमाणे भीषण जरी नसली तरी नाझींनी चर्चेसना मिळणारी सरकारी मदत पूर्णपणे थांबवली होती. मुसोलिनीला मात्र व्हॅटिकनच्या दबावामुळे कॅथाॅलिकांची पूर्ण मुस्कटदाबी शक्य झाली नाही.

गामा पैलवान Fri, 02/26/2016 - 19:22
राजेश घासकडवी, >> पण कुठल्यातरी पोथीचा वापर करून विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती तीच आहे. एक प्रश्न विचारतो. खरंखरं उत्तर द्या. : विरोधकांना मारायला खरंच पोथीची गरज आहे का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राजेश घासकडवी Mon, 02/29/2016 - 20:23
ते विधान 'धर्मनिष्ठा' या विशिष्ट शब्दाऐवजी 'पोथीनिष्ठा' या जास्त व्यापक शब्दाचा वापर केला तर डावे-उजवे भेद गळून पडतो हे सुचवण्यासाठी होतं. पण अर्थातच, पोथीची गरज नसते हे मान्यच आहे. आता रवांडामध्ये हुतूंनी तुत्सींची कत्तल केली तेव्हा पोथी वगैरे काही वापरण्यापेक्षा 'ते हरामखोर, त्यांना कापून काढलं पाहिजे' एवढंच म्हटलं. मात्र पोथीची गरज नसली, पोथी असणं फायद्याचं ठरतं. 'या पोथीत अमुकअमुक लिहिलेलं आहे, आणि ते हरामखोर त्याविरुद्ध वागतात' असं म्हणत आपली 'पोथी खतरेमे'चा ओरडा करून भावना भडकावता येतात. गंमत अशी की बऱ्याचवेळा त्या पोथ्यांमध्ये 'जगा आणि जगू द्या' 'इतरांवर प्रेम करा' 'तुम्हाला इतरांनी जसं वागवावं अशी अपेक्षा असेल, तसंच त्यांनाही तुम्ही वागवा' 'अखिल मानवजात समान आहे' वगैरे गोष्टीही लिहिलेल्या असतात. पण त्याने काही फरक पडत नाही. अकराव्या बाराव्या शतकात झालेली क्रुसेड्स ही अर्थातच धर्माधिष्ठित होती. पोपने युद्धात भाग घेणारांना देवातर्फे 'तुमची सगळी पापं माफ' करून दिली. दोन शतकं ही युद्धं चालली. त्यांना पोथीचं अधिष्ठान असल्याचा निश्चित फायदा झाला. त्यातही पहिल्या क्रुसेडमध्ये युद्ध मुस्लिमांबरोबर करायचं होतं. पण वाटेत ज्यू आले, तर त्यांचीही कत्तल केली. पुन्हा इथे पोथीभिन्नतेच्या आधारावर हत्या झाली. थोडक्यात, जेरुसलेम ताब्यात घेण्यासाठी म्हणून इतकी युद्धं करणं हे ते शहर पोथीत महत्त्वाचं नसतं तर झालं नसतं.

हाडक्या Fri, 02/26/2016 - 23:16
घासकडवी, एक साधा प्रश्न आणि त्याचा उपप्रश्न (थोडक्यात उत्तर दिलेत तरी हरकत नाही). तुम्ही या लेखावरचे सगळे प्रतिसाद वाचले असतील असं गृहित धरुन विचारतो. १. तुमच्या काही मतांवर, गृहितकांवर काही थोडा फार तरी परिणाम झाला का ? (म्हणजे ते अजूनच घट्ट झाले, ते थोडे बदलले अथवा काहीच नाही ) १अ. वरील प्रश्नासाठी कोणते प्रतिसाद आणि कसे कारणीभूत ठरले (प्रतिसादांचे दुवे दिल्यास उत्तम). हेच उत्तर तुम्हाला ही चर्चा संपली नाही आणि तुम्हाला चर्चा संपली आहे असे वाटेल तेव्हा द्यायचे असल्यास हरकत नाही. फक्त तेव्हा व्यनितून सांगावं म्हणजे कळेल. (उत्तर द्यायचे नसल्यास उत्तर आलेच नाही तर कळेलच.)

In reply to by हाडक्या

राजेश घासकडवी Sat, 02/27/2016 - 20:05
थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर हो. आणि ते माझ्या प्रतिसादांतून मांडलेलं आहे. फॅसिझम हा शब्द केवळ उजव्या राज्यपद्धतींना वापरला जातो. त्यामुळे हा लेख लिहिण्याच्या आधी मला जर कोणी विचारलं असतं की फॅसिस्ट राजवटी कुठच्या? तर मी मुसोलिनी, हिटलर अशी नावं घेतली असती. मात्र या केवळ उजव्या राज्यपद्धतींचा अभ्यास करून लेखकाने जी लक्षणं सांगितली आहेत ती अनेक डाव्या हुकुमशाही राजवटींनाही लागू पडतात हे लक्षात यायला लागलं. मी विशिष्ट प्रतिसादांचे दुवे देत बसत नाही, कारण अनेकांनी म्हटलेलं आहे 'हीच लक्षणं स्टालिनचा रशिया, माओचा चीन इत्यादी कम्युनिस्टांनाही लागू पडतात, मग त्या लक्षणांत व्यवच्छेदक ते काय?' याबद्दल विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की फॅसिस्ट राज्यपद्धती ही डाव्या आणि उजव्यांच्या पलिकडे जाते. ती नुसतीच राजकीय नाही तर एक मानसिक बैठक आहे. आणि ती केवळ राज्यकर्त्यांतच नाही तर जनतेतही असते. 'त्या साल्यांना हाणून काढलं पाहिजे' असं म्हणणाऱ्या सर्वांमध्येच फॅसिस्ट विचारांची मुळं असतात. वेगवेगळ्या वेळी सरकारांनी, नेत्यांनी या विचारांना भडकावून दंगे, अमानुष कत्तली घडवून आणलेल्या आहेत. आणि त्यातून होरपळलेल्या जनतेवर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेतलेली आहे. फॅसिस्ट या शब्दाबद्दल बरीच चर्चा झाली, आणि त्यातून माझ्या मनात तरी हे चित्र जास्त स्पष्ट झालं. अजून काहींना हे पटलेलंही असेल-नसेल. पण मला नक्कीच या चर्चेचा फायदा झाला. याहीपलिकडे फॅसिस्ट प्रवृृ्त्तींचे कोंब घराघरांतून दिसू शकतात का? असाही प्रश्न पडला. जशा राजवटी एका बाजूला लोकशाही आणि दुसऱ्या टोकाला फॅसिझम या स्पेक्ट्रमच्या मध्ये कुठेतरी वावरतात, तशीच कुटुंबं आणि त्यांची मुलांना वाढवण्याची पद्धत यातही एक स्पेक्ट्रम दिसतो. कित्येकांकडून आपल्याला लहानपणी झालेल्या क्रूर शिक्षांबद्दल कौतुकाने ऐकलेलं आहे. आपल्या मुलांना मारून धमकावून शहाणं करावं लागतं, त्याशिवाय ती ऐकत नाहीत, लाज आणतात या पालकपद्धतीला फॅसिस्ट म्हणता येईल का? याउलट मुलांवर जास्त विश्वास ठेवून, त्यांच्याशी खेळीमेळीने वागून त्यांच्यातल्या गुणांना फुलवण्याची पालकनीती ही लोकशाही पद्धती म्हणता येईल का? असे प्रश्नही निर्माण झाले. त्यांची उत्तरं अर्थातच नाहीत. पण हा लेख लिहून, त्यावर आलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याच्या प्रयत्नात माझे विचार किंचित बदलले, वेगळे झाले हे मात्र म्हणायलाच पाहिजे. आमूलाग्र बदल नाही, पण किंचित बदल.

In reply to by राजेश घासकडवी

गामा पैलवान Sun, 02/28/2016 - 14:05
राजेश घासकडवी, >> याबद्दल विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की फॅसिस्ट राज्यपद्धती ही डाव्या आणि उजव्यांच्या पलिकडे जाते. >> ती नुसतीच राजकीय नाही तर एक मानसिक बैठक आहे. मला नेमकं हेच म्हणायचं होतं. तुमचा प्रामाणिकपणा आवडला. आ.न., -गा.पै.

In reply to by राजेश घासकडवी

हाडक्या Mon, 02/29/2016 - 19:04
@राजेश घासकडवी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कोणीही सुरु केलेली असेल तरी चर्चा ही आपल्या मतांच्या पुर्नपरिक्षणासठी चांगली संधी असते असं माझं माझ्यापुरतं मत आहे. तुमची मतं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणे ते मांडण्याची पद्धत आवडली. ते "ताकाला जाऊन .." वगैरे सुरुवातीस वाटलं पण (काही ठिकाणी असहमत असलो तरी) तुमचे विचार संयत आणि स्पृहणीय वाटले. इथे तुम्ही एकाच मुद्द्याबद्दल (फॅसिझम म्हणजे नक्की काय यावरची चर्चा) लिहिलंय पण मला व्यापकपणे मूळ धाग्यातल्या मुद्द्यांबद्दल आणि इथे काहींनी त्याबद्दल पॉईंट स्पेसिफिक केलेल्या प्रतिसादांबद्दल विचारायचं होतं (कारण धागा "फॅसिझम म्हणजे नक्की काय" असा नक्कीच नव्हता अथवा तुम्हाला अभिप्रेत नव्हता असं वाटतं).

In reply to by राजेश घासकडवी

मोदक Mon, 02/29/2016 - 19:15
पण हा लेख लिहून, त्यावर आलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याच्या प्रयत्नात माझे विचार किंचित बदलले, वेगळे झाले हे मात्र म्हणायलाच पाहिजे. आमूलाग्र बदल नाही, पण किंचित बदल. आवडले. :)