मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टोचणी

विनायक प्रभू · · काथ्याकूट
गेली ३५ वर्ष ही अपराधीपणाची भावना काहीकेल्या पाठ सोडत नाही. नकळत झालेली चूक. वय पण लहान. आई मल्टीपल ऑर्गन फेल्युअरने के.ई.एम. मध्ये दाखल होती. आईचा छोटा म्हणुन माझी ड्युटी कायम हॉस्पिटलमध्ये. त्या २१ दिवसात डॉक्टर ह्या संस्थेवरचा विश्वास उडाला. शिकाउ मंड्ळीनी केलेले आईच्या देहाचे हाल याची देहा याची डोळा बघितले. आजही तो एक अविभाज्य भाग असतो डॉक्टर होण्याचा हे माहित असुन राग डोक्यातुन जात नाही. आई जाण्यापुर्वी चार दिवस -रेसिडेन्ट डॉक्टर तपासुन गेले. एक्स-रे आणि इतर तपासणी करता आईला वॉर्डातुन हलवायचे होते. आईला सारखी ग्लानी येत होती. तीला जागे ठेवायची जबाबदारी माझ्यावर आली.वॉर्ड्बॉयने स्ट्रेचर वर आईला दणकवल्यावर राग आवरेनासा झाला. पण त्या राक्षसा बरोबर मी झुरळ काय लढ्णार. तपासणी ला जाता जाता आई परत ग्लानीत जाउ लागली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या गालावर चापट्या मारुन तीला जागे करायचे होते. नक्की माहीत नाही पण कुठ्ली तरी चापटी स्ट्रेचर हलता असल्यामुळे जराशी जास्त लागली असणार. आई जागी झाली. "मला मारु नकोस रे विनायका" हे आईचे वाक्य आज पर्यंत विसरु शकलो नाही. हा प्रसंग मी अगदी जवळ्च्याना पण सांगितला नाही. कदाचित इथे लिहुन मुक्ति मिळेल काय?

वाचन 6604 प्रतिक्रिया 0