Skip to main content

भारतीय प्रसारमाध्यमे आणी विश्वासार्हता

लेखक Jack_Bauer
मंगळवार, 08/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाच्या सुरवातीलाच नमूद करू इच्छितो की हे माझे वैयक्तीक विचार असून लेखाच्या शेवटी घेतलेला निर्णय हा मी माझ्यापुरता घेतलेला आहे. ९० च्या दशकापर्यंत बातम्या मिळवण्यासाठी दूरदर्शन/आकाशवाणी हे एकमेव साधन होते. संध्याकाळी ७ च्या मराठी बातम्या माझे वडील न चुकता पहायचे आणी अजूनही पाहतात. त्या बातम्यांना एक दर्जा होता आणी मुख्य म्हणजे कुठलीही सनसनी निर्माण करणे हा उद्देश नसायचा. पण आज काय स्थिती आहे ? २४ तास दळण दळल्यासारख्या News चानेल्स सुरु आहेत. दर्जाच्या नावानी तर बोम्ब ! कित्येकवेळा १ ओळीची बातमी आणी २० सेकंदांचे फुटेज परत परत परत परत एकदा active voice एकदा passive voice मध्ये सांगून आणी फुटेज repeat मोड वर लावून अर्ध्या तासाचा exclusive प्रोग्राम करतात. उदाहरण : "हे बघा ते येत आहेत " …… परत थोड्या वेळानी " हे पहा ते आपल्याला येताना दिसत आहेत " …… परत थोड्या वेळानी … " फ़क़्त आमच्या channel वरतीच यांना येताना दाखवण्यात येत आहे" …. अरे काय लावलंय ? काही तरी दर्जा ? पण लेखाचा उद्देश हा नाही, मुद्दा हा आहे की पत्रकारांच काम पूर्ण आणी खऱ्या बातम्या देणे हे आहे. पण आज तसे दिसतं नाही. आपण काही उदाहरणे पाहुयात : १. १६ एप्रिल २०१५ : कॅनडाने भारतीयांना वीसा ओन arrival ची घोषणा केली video नीट पाहिला तर इंग्लिश येणाऱ्या कोणालाही कळेल की कॅनडाच्या लोकांसाठी भारताचा हा वीसा ओन arrival प्रोग्राम आहे. Times of India आणी कित्येक अनेक माध्यमांनी ही चुकीची बातमी exclusive च्या नावाखाली रिपोर्ट केली. ह्यामुळे पुढे काही वेगळे पेच निर्माण झाले तर मेडिया जबाबदारी घेणार का ? २. मुस्लिम तरुणीला मुंबईत घर नाकारले : पोलिसांनी पूर्ण तपास केल्यावर ह्या बातमीत कोणतेही तथ्य आढळले नाही. त्या इमारतीत अनेक मुस्लिम राहत होते . ह्या बातमीमुळे जर समाजात तेढ निर्माण झाली आणी त्यातून काही दंगे आणी नुकसान झाल तर त्याला कोण जबाबदार ? ३. जसलीन कौर प्रकरण : The “Pervert” who “molested” Jasleen Kaur अश्या मथळ्याखाली बातम्या प्रसिध्द झाल्या. सत्य काय आहे हे न तपासता एखाद्याला गुन्हेगार म्हणून घोषित करून तसा अख्या जगाला सांगायचं. अनेक प्रत्यक्ष दर्शी लोकांनुसार असे काहीही घडले नाही. न्यायदान केल्यासारख त्या बातमीवर निकाल देणे हे news channels चं काम नाही त्यासाठी न्यायालये आहेत. इथे त्या मुलाने बदनामीला कंटाळून स्वतःचं काही बर वाईट करून घेतलं तर एका मुलाचा आयुष्य हकनाक उध्वस्त केल्याची media जबाबदारी घेणार का ? ४. section १२४ अ : Breaking Now: Maharashtra govt issues draconian diktat. 'Sedition charges for criticising state, central govt.' पण खरी गोष्ट अशी नाहीच आहे. ज्यांना हवा असेल तर महाराष्ट्र सरकारचे मूळ पत्रक इथे वाचू शकतात : ह्यात स्पष्ट लिहिले आहे की ज्यामुळे समाजात हिंसा , द्वेष पसरेल असे वाटेल तेव्हाच हे कलम लावण्यात यावे. ह्यात काय चुकीचे आहे ? media नि कसही बेताल reporting करायचं , वाट्टेल त्या बातम्या खर्याची शहानिशा न करता द्यायच्या आणी ह्यामुळे हिंसा आणी द्वेष पसरला तर कारवाई झाल्यास आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बुडाले म्हणून गळे काढायचे ? म्हणजे ह्यांना अधिकार मात्र हवा पण त्याबरोबर येणारी जबाबदारी मात्र नको. ह्या चुकीच्या बातम्या दिल्याबद्दल एका तरी चानेल ने दिलगिरी व्यक्त केलीये का ? एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चव्हाट्यावर आणून त्या जगाला दाखवायच्या, तेव्हा आपण एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतो हे कळत नाही आणी अश्या बेताल वागणुकीसाठी सरकारने नियम केला की लगेच कोल्हेकुई सुरु. ५. अजित डोवल हे पंतप्रधानाच्या एका दौर्यातील convoy मध्ये होते. ते दौरा सोडून अचानक भारतात परत आले. आपल्या माध्यमातील सो called expert लोकांची लगेच बडबड सुरु झाली . हे आंतरराष्ट्रीय संकेताच्या विरुध्द आहे, हा त्या दुसर्या देशाच्या सरकारचा अपमान आहे ,पंतप्रधानांनी अशी परवानगी दिलीच कशी ? फलाना ठिकाणा … दिवसभर तेच दळण दळत बसले होते , थोड्या दिवसांनी भारतीय सैन्यांनी operation म्यानमार केलं जिथे म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आणी operation planning मध्ये मुख्य होते अजित डोवल ! आपण ह्या माणसाबद्दल काही दिवसांपूर्वीच किती वीष पसरवत होतो हे विसरून भारतीय सैन्याचं गुणगान सुरू , गुणगान अवश्य करा पण आपण आधी जी घाण केली ती साफ कोण करणार ? ६. अनुराग कश्यपनी टाकलेल्या tweat वर कोणतीही शहानिशा न करता भारतीय माध्यमांनी इतक्या कहाण्या report केल्या आणी शेवटी कळलं की अनुराग कश्यप नी डोळ्यांसाठी prosthetics test केली आणी त्याचा तो फोटो होता. इतकी चुकीची बातमी दिवसभर मीठ लावून सांगितल्याबद्दल एकही माध्यमांनी दिलगिरी व्यक्त केली नाही भारतीय प्रसारमाध्यमांच्या double standard चा खरोखर वीट आलाय आणी माझ्या लेखी तरी ही सर्व भारतीय माध्यम त्यांची विश्वासार्हता गमावून बसले आहेत. काही माध्यमे चांगली असतील ही पण ओल्या बरोबर सुक जळले तसा हा काहीसा भाग आहे . आणी त्यामुळे मी माझ्या पुरता असा निर्णय घेतलाय की भारतीय माध्यमातील कोणतीही बातमी ही विदेशी माध्यमातील बातमीबरोबर जुळत असल्यासच त्या बातमीवर विश्वास ठेवायचा. आणी पूर्वी होतं तसं फ़क़्त दूरदर्शनच्याच संध्याकाळच्या बातम्या बघायच्या. आवश्यक ती बातमी आवश्यक त्या प्रमाणात कळते आणी तेही अर्ध्या तासात !

वाचने 13240
प्रतिक्रिया 65

प्रतिक्रिया

भारतीय माध्यमांची विश्वासार्हता वादातीत आहे इतकी ती खाली घसरलेली आहे. याचे कारण म्हणजे बातम्या हल्ली वृत्तसंपादकांच्या चाळणीतून जाण्याऐवजी वाहिनीच्या 'क्रिएटिव्ह हेड' नावाच्या बिनडोक व फक्त टीआरपीकडे लक्ष ठेऊन असणार्‍या व्यक्तीच्या मर्जीनुसार दिल्या जातात. याचा अर्थ पाश्चात्य माध्यमे फार निष्पक्षपाती व दर्जेदार आहेत असे अजिबात नाही. तेव्हा माध्यमे कुठलीही असोत, बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहिल्याशिवाय मत बनवणे वा प्रतिक्रिया देणे टाळणे एवढेच सूज्ञ प्रेक्षकांच्या हातात आहे.

In reply to by एस

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पाश्चात्य माध्यमे फार निष्पक्षपाती व दर्जेदार आहेत असे अजिबात नाही हे मान्य पण एखादी बातमी अश्या वेगवेगळ्या sources कडून पडताळून घेतली कि ती बातमी खरी असण्याची शक्यता वाढते. बाकी
'क्रिएटिव्ह हेड' नावाच्या बिनडोक व फक्त टीआरपीकडे लक्ष ठेऊन असणार्‍या व्यक्तीच्या मर्जीनुसार दिल्या जातात.
ह्या करिता +१

दूरदर्शनच्या सातच्या बातम्या या फक्त "बातम्याच" असतात, पण बाकी बऱ्याच चॅनेलवरच्या बातम्या "कार्यक्रम" असतात. -निलम शर्मा, मार्क लीन यांच्या बातम्या कधीकाळी न चूकता पहाणारा!

In reply to by उगा काहितरीच

निलम शर्मा, मार्क लीन यांच्या बातम्या कधीकाळी न चूकता पहाणारा!
ह्या साठी +१

हम्म्म्म..चांगला विषय मांडलात तुम्ही..!! ईन्द्राणी मुखर्जी केसला मिळालेली प्रसिद्धी पाहून असेच विचार मनात आले. हेच जर एखाद्या सामान्य कुटूंबात घडले असते तर पेपरला एखादी छोटीशी बातमी आतल्या पानावर आली असती. एका चॅनलवर तर "ईंद्राणी मुखर्जीने सँडविच खाया" ही एक ब्रेकिंग न्युज होती... आता बोला. खरे म्हणजे या मिडीयाच्या वागण्याला आपणच जबाबदार आहोत. आपल्यालाच असल्या ब्रेकींग न्युज हव्या असतात. परवाच एका पेपर मध्ये वाचले की जेथे शिना बोराचा देह जाळण्यात आला ती जागा म्हणजे पिकनीक स्पॉट बनली आहे. लोकं तेथे जाऊन सेल्फी घेत आहेत. हे वाचून हसावे की रडावे तेच कळेना...डोक्यावर हात मात्र मारून घेतला.. त्यामुळे पुर्णपणे प्रसारमाध्यमांना दोष देऊन उपयोग नाही. थोडा बदल आपल्यात आणला पाहिजे. तुम्ही सुरुवात केली आहे. मी सुद्धा तुम्हाला सहमत ..!! ह्याचा प्रसार केला पाहिजे तरच TRP कमी होऊन चॅनल सुधारतील ही एक थोडीफार आशा..!!

In reply to by योगी९००

हम्म्म्म..चांगला विषय मांडलात तुम्ही..!!
धन्यवाद आम्ही नेहमीच अन्यायाला, सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडतो.
ईन्द्राणी मुखर्जी केसला मिळालेली प्रसिद्धी पाहून असेच विचार मनात आले.
तुम्हाला विचार करायला प्रव्रुत्त केले हेच आम्हा प्रसरामाध्यमांचे यश आहे.
हेच जर एखाद्या सामान्य कुटूंबात घडले असते तर पेपरला एखादी छोटीशी बातमी आतल्या पानावर आली असती.
जर राजकारणी जनता आणि पोलीस यांच्या दृष्टीने या घटना किरकोळ आणि दखल घेण्यालायक नसतील आम्ही तरी काय करणार तुम्हीच सांगा ???
एका चॅनलवर तर "ईंद्राणी मुखर्जीने सँडविच खाया" ही एक ब्रेकिंग न्युज होती... आता बोला.
पहा म्हणजे आम्ही ती संशयीत आरोपी असली तरी तिला खायला दिले जाते का नाही याची काळजीवजा माहीती घेतो.त्यतून आम्हाला ब्रेड-बटर कंपनीच्या काही जाहीरातीही मिळाल्या आहेत.
खरे म्हणजे या मिडीयाच्या वागण्याला आपणच जबाबदार आहोत.
तेच तर आम्ही सांगतोय की तुम्ही जबाब्दार आहात. कशाचीही जबाबदारी अंगाला लावून घ्यायची नाही हीच तर आम्ची कायम भूमीका आहे.
आपल्यालाच असल्या ब्रेकींग न्युज हव्या असतात.
आता तुम्हीच पहा आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे पुरवठा करतो की नाही उगा आम्हाला दोष लावतात लोक
परवाच एका पेपर मध्ये वाचले की जेथे शिना बोराचा देह जाळण्यात आला ती जागा म्हणजे पिकनीक स्पॉट बनली आहे. लोकं तेथे जाऊन सेल्फी घेत आहेत.
बघा एका दुर्लक्षीत आणि प्रसीद्धीपासून दूर असलेल्या ठिकाणाला आम्ही उजेडात आणले.
हे वाचून हसावे की रडावे तेच कळेना...डोक्यावर हात मात्र मारून घेतला..
तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवायला आम्हालाच शिकवावे लागले याचाच हा स़़ज्जड पुरावा आहे.
त्यामुळे पुर्णपणे प्रसारमाध्यमांना दोष देऊन उपयोग नाही.
तेच तर आम्ही सांगतोय
थोडा बदल आपल्यात आणला पाहिजे. तुम्ही सुरुवात केली आहे. मी सुद्धा तुम्हाला सहमत ..!! ह्याचा प्रसार केला पाहिजे तरच TRP कमी होऊन चॅनल सुधारतील ही एक थोडीफार आशा..!!
नक्कीच आमचे चॅनेल तुम्हाला या कामी मदत करेल (तेव्ह्ढ प्रायोजकांच बघा जरा) तर हा होता योगी यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद आमचे वार्ताहर जि.गु.चांगभलं* यांनी.

काहीपण फेकमत चॅनेलवरील "सपशेलपडलोतरीनाकवर"या कार्येक्रमाच्या एका भागातून साभार

जिकडे गुळखोबरं तिकडं चांगभलं

In reply to by नाखु

_/\_ जि.गु.चांगभलं आमच्या न घेतलेल्या मुलाखतीतुन एवढे विचार मांडलेत. खरोखर मुलाखत घेतली तर "ध चा मा" किंवा ध चा अजुन काहीतरी भयंकर कराल..!!

In reply to by मी-सौरभ

ह. घे. बद्दल बाबा योगीराज यांचे पण हाबिणंदन!! ऑ ??? म्हणजे माझी खेचली होती इथे? मज पामराला कळले नाही हो..!!

In reply to by योगी९००

धन्यवाद , ईन्द्राणी मुखर्जी केसनी तर वैताग आणला ... २६/११ च्या वेळी सुद्धा ताज हॉटेलच्या बाहेर ह्या माध्यमांनी काय तमाशा लावला होता हे आपण जाणताच ...

हे सर्व वाचल्यावर असे वाटते की मराठीत सुद्धा फेकींग न्यूज सारखी वेबसाइट हवी किंवा मिपामधे एखादे बातमीच्या विडंबनाचे दालन हवे.

बाकी लेख चांगला आहे. परंतु खालील वाक्यांशी सहमत नाही.
संध्याकाळी ७ च्या मराठी बातम्या माझे वडील न चुकता पहायचे आणी अजूनही पाहतात. त्या बातम्यांना एक दर्जा होता आणी मुख्य म्हणजे कुठलीही सनसनी निर्माण करणे हा उद्देश नसायचा.
या बातम्यांमध्ये "बातम्या" अगदी तुरळक होत्या. १५ मिनिटांच्या या कार्यक्रमाला "बातम्या" याऐवजी "सरकारी वृत्तांत" हे नाव सार्थक ठरले असते. या तथाकथित "बातम्यां"मध्ये बरीच मिनिटे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोणत्या तरी समारंभाचे उद्घाटन, कोणाच्या तरी एकसष्टी किंवा तत्सम गौरव समारंभाला लावलेली हजेरी, कोणत्या तरी मंत्र्याने केलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम, अजून कोणत्या तरी मंत्र्याने एखाद्या परिसंवादाला लावलेली हजेरी इ. "बातम्यांची" रेलचेल असायची. या तथाकथित बातम्या दाखविताना त्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोण होते, प्रमुख पाहुणे कोण होते, प्रमुख उद्घाटक कोण होते, व्यासपीठावर कोणकोण उपस्थित होते इ. ची नामावळी वाचून दाखविली जायची. दूरदर्शन ही सरकारी वाहिनी असल्याने राज्यसरकारची प्रसिद्धी करणे हा या "बातम्या" कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. हे सरकारी वृत्तांत दाखविताना नुसतीचे चित्र हलताना दिसायची. आवाज ऐकवतच नसत. त्यामुळे एखादा मूकपट पाहिल्याचा भास व्हायचा. भारतात आणि जगात अनेक त्या काळातही अनेक महत्त्वाच्या घडामोडी व्हायच्या. परंतु दूरदर्शनवरील बातम्यात प्राधान्य राज्य सरकारच्या दिखाऊ कार्यक्रमांना असायचे.

In reply to by श्रीगुरुजी

नाद खुळा यांचा अचंबीत करणारे तरीही सुखद हा लेख वाचनात आला आणी त्यातीलच हे वाक्य :
सध्या हाणामारी-राजकीय गदारोळाच्या वाहिन्या पाह्ण्यापेक्षा दूर्दर्शन सह्याद्रीच्या बातम्या पाहणे जास्त चांगले आणि हितावह वाटते. अगदी सरकारी वाहिनी असूनही पुरस्कृत केल्यासार्ख्या आक्रस्ताळी, व मिपा भाषा परीकोषानुसार पालीचा डायनासोर करीत नाहीत. मोजके आणि नेमके.
याचबरोबर खोट्या आणी sesation निर्माण करणाऱ्या बातम्यापेक्ष्या दूरदर्शनवरील बातम्या बर्या असं माझं वैयक्तिक मत आहे.

चोवीस तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी हा एक अत्यंत खर्चिक प्रकार आहे. पत्रकारांचेही पगार सोडा, बाकी तांत्रिक खर्चही जबरदस्त असतात. परिणामी चॅनेलला जाहिराती आणि प्रायोजक हे लागतातच आणि ते जर जाहिराती देणार म्हणजेच परिणामी पैसे - तर त्यांच्या जाहिराती लोकांनी बघाव्या यासाठी चॅनेल्सना सतत उत्कंठा निर्माण करावी लागते. शिवाय आज कुठलीही वृत्तवाहिनी ही मनोरंजनप्रधान वाहिनीला (GEC) आपली स्पर्धक म्हणून पाहते - दुस-या वृत्तवाहिनीपेक्षाही जास्त. शिवाय टीव्ही या माध्यमाची भूक आणि तिथला वेग हा इतका जबरदस्त आहे की तरुण पत्रकारच तो वेग शारीरिक दृष्ट्या (मानसिक नव्हे) सहन करु शकतात. साहजिकच प्रगल्भता आणि विचार यांना दुय्यम स्थान मिळतं कारण अनुभवाचा अभाव. परिणामी बातम्यांची विश्वासार्हता घसरते. आणि बातम्या सोडा, मनोरंजन पत्रकारितेतही हेच आहे. माझ्या ओळखीच्या एका पत्रकार मुलीने गुलजार यांना कुठलंतरी बक्षीस मिळालं होतं, त्यावर खुद्द गुलजारजींना ' गुलजारना बक्षीस मिळालंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ' असं विचारलं होतं. माझ्या समोर हा प्रसंग घडलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

आपल्या मताशी पूर्ण सहमत. आणी त्यामुळे असे वाटते कि घडलेल्या बातम्या report करायचे सोडून बातम्या तयार किंवा निर्माण करायचा प्रयत्न केला जातो कि काय ?

विश्वासार्हता, चमचमीत बातम्या ह्या फक्त दूरचित्रवाणीवरच दिसतात असे नाही तर छापिल वृत्तपत्रातूनही दिसून येतात. मागे एकदा इचलकरंजीच्या कारागिरांनी मस्कतच्या राजासाठी २५ किलोमिटरचा (शाही विमानतळापासून राजवाड्यापर्यंत) एकसंघ गालीचा बनविल्याची बातमी मराठी वृत्तपत्रातून आली होती. मी इथे मस्कतात गेली ३४ वर्षे आहे. असे कांहीही घडलेले नाही. असे घडले असते तर इथे तो एक मुख्य कार्यक्रम ठरला असता. आणि इथल्या वृत्तपत्रांमध्ये, भारतिय वर्तुळात (आणि पाकिस्तानी वर्तुळातही) ती एक प्रमुख बातमी असती. तद्दन खोटी बातमी. श्री. शिरीष कणेकर पत्रकारि़केत असताना, 'वांद्र्याच्या महामार्गावर एका जोडप्यातल्या पुरुषाला मारझोड करून त्याच्या बायकोला पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ती बाई दुसर्‍यादिवशी घरी आली तिने घडलेली घटना नवर्‍याला सांगितली आणि स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेतले.' अशी चमचमीत (?) बातमी वृत्तपत्रात छापून आली. पोलीस खाते खडबडून जागे झाले आणि त्यांनी तपास चालू केला पण 'तसे' कांही घडलेच नव्हते. पोलीश कमिश्नरांनी कणेकरांना बोलावून घेतले आणि जाब विचारला. तेंव्हा ही बातमी त्यांना त्याच्या एका नाटककार मित्राने पुरविली होती. त्याचा शहानिशा न करताच त्यांनी ती छापली आणि गोत्यात आले होते. पुढे त्या मित्राने खुलासा केला की तो त्याच्या आगामी नाटकाचा 'प्लॉट' होता आणि तसे न सांगता एक बातमी म्हणून त्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी त्यांनी तो कणेकरांना सांगितला होता. कणेकरांनी पोलीस कमिश्नरसाहेबांची माफी मागून प्रकरण मिटवलं होतं. हा किस्सा खुद्द कणेकरांनी एका कार्यक्रमात सांगितला होता.

In reply to by प्रभाकर पेठकर

मागच्या वर्षीची ही बातमी आहे, गूगल गुरुंमुळे सापडली. पण म्हणतात ना "ब्रेकिंग न्यूजतुराणां न भयम् न लज्जा"

In reply to by प्रभाकर पेठकर

या शिरीष कणेकरांच्या पुस्तकात या प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख आहे. तेव्हा कै. विद्याधर गोखले लोकसत्ताचे संपादक होते. जे नाटककार होते त्यांनी त्यांची मुलगी आणि या पीडित स्त्रीची मुलगी एका वर्गात शिकतात वगैरे सांगून ही बातमी खरी अाहे असा भरोसा कणेकरांना दिला (असं कणेकरांनी लिहिलंय) आणि पुस्तकानुसार त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता - आणि इंडियन एक्सप्रेस ग्रुपमध्ये अंतर्गत कारवाईलाही त्यांना सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा बॅ. अंतुले मुख्यमंत्री होते आणि श्री. दिनकर रायकर पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. रायकरांच्या मध्यस्थीमुळे अंतुल्यांनी होम डिपार्टमेंटला सांगून खटला मागे घेतला आणि माफीनामा लिहून घेऊन कणेकरांची सुटका केली. पुस्तकानुसार असा प्रकार घडलेला आहे. कणेकर कार्यक्रमात वेगळं सांगत असतील. शक्यता आहे.

In reply to by बोका-ए-आझम

असेल तसेच. एक तर श्री. कणेकरांचा हा कार्यक्रम मी ८८च्या सुमारास बघितला होता आणि बराचसा तपशिल विस्मरणात गेला आहे. अंदाजाने जेव्हढे आठवले तेव्हढे मी लिहीले. एकमात्र खरे की, पुस्तकात जेव्हढा तपशील दिला आहे तेव्हढा कार्यक्रमात सांगितला जात नाही. अर्थात, प्रत्यक्ष मुलाखत कार्यक्रमात वेळेचे बंधनही असतेच.

In reply to by प्रभाकर पेठकर

कणेकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा खटला ऊभा राहीला होता त्या बातमीवरून (सं: खटलं आणी खटला - ले. शिरिष कणेकर)

In reply to by फेरफटका

मी सांगू का नाव? ते लेखक होते विनोदी. सरकारी नोकरीत असलेले. नाटककार नव्हते. १९९८ च्या सुमारास त्यांचे निधन झाले. सो मेल्यानंतर बदनामी नको, म्हणून कणेकर त्यांचे नाव सांगत नाहीत. अंदाज लढवा जरा.

पण मग रागावर नियंत्रण ठेवून चॅनेल बदलणे आर्थिकदृष्ट्या हितावह वाटते. मी वैतागून काही न्यूज चॅनेल्स व काही सासू सूनांचा मेळावा भरणारी चॅनेल्स डिलीट केली आहेत.

सध्या मुखर्जी केस याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांची काहीही आर्थिक गणिते असली तरी आपणास जी नकीशी आणि विपर्यंस्त माहिती ते देतात आणि आपले मत बनविण्याचा प्रयत्न करतात ते चुकीचे आहे.

मी हा धागालेख आणि सर्व प्रतिसाद वाचलेले नाहीत त्या शिवायच एका असमतोल असलेल्या लेखना कडे लक्ष वेधतो आहे. या आधीकुणी बीबीसीवरील असमतोल लेखन करून भारताबद्दल गैरसमज फैलावू इच्छित एकतर्फी वृत्तांकनाकडे लक्ष वेधले होते. आता ह्या किस्स्यातील द हिंदू हे वृत्तपत्र भारतीयच आहे. त्यांच्या मुख्य संपदक लेखकांच्या यादीतील वसुंधरा सरनेट (का सिरनेट?) बाईने कोणत्याश्या मानवाधिकार एन जी ओचा हवाला देत काश्मिरमधील लष्कराचे केवळ एकतर्फी आणि नकारात्मक चित्रण करण्याचा विडा उचललल्याचे या लेखावरून दिसते. भारत हा एक न्यायप्रिय देश आहे, काश्मिर मधल्या जनतेच्याही मानवाधीकारांची काळजी घ्यावी, त्याबद्दल लिहिण्याचे स्वातंत्र्यही वापरावे त्यात वावगे असे काही वाटले नसते. १५ ऑगस्ट जवळ आलेली आहे, नागा लोकांशी शांततेचा करार होतोय भारताचे पंतप्रधान अरब देशात भेटीवर जाणार आहेत तेव्हा वेळ पाहून जुन्या बातम्यांवर आधारीत वृत्त बायस्ड स्वरुपात जाणीवपुर्वक छापले जाते. यावेळी भारताचे पंतप्रधान सौदी दौर्यावर जाण्याच्या वेळी वेळ पाहून एकांगी वृत्त छापावयाचे. जिथे भारतीय सैनिक चुकले आहेत त्यांना कोर्ट मार्शल करून शिक्षा केल्याची बातमी एका ओळीत संपवायची बाकी पानभर मानवाधिकारांबाबत लेखन वॉशिंग्टनच्या थंड खोलीत बसून करताना भारतसरकारची बाजू काय आहे भारतीय सैन्य अन्याय होऊ नयेत म्हणून काय काय काळजी घेते या बद्दल अवाक्षरही लिहावयाचे नाही. हे समतोल लेखन नव्हे. भारतातील राजकारण कोणत्याही दिशेने जाऊ द्या नेहमीच भारतीय न्यायालये आणि भारतीय सैन्याने त्यांची निष्पक्षता आणि व्यावसायीक मुल्यांची किमान पातळी जपलेली आहे. आणि भारतसरकारचे उच्चस्तरावरील अधिकारी आणि मंत्रीगण केवळ संवेदनशील असतात असे नाही तर राजकीय पातळीवर सध्याच्या काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी भारत सरकारमध्ये गृहमंत्र्याचे पद सांभाळले आहे. भारत असा एकमेव देश आहे जो अतिरेक्यांविरुद्ध कारवाई शक्य तेवढी पोलीस दलांवर अवलंबून ठेवतो. अन्यही अनेक सकारात्मक पाऊले उचलली जातात त्याबद्दल काहीही अक्षरही लिहावयाचे नाही या मागचे गुपीत काय आहे ? वसुंधरा सरनेट (का सिरनेट?) बाई वॉशिंग्टन स्थित कोणत्याशा अटलांटीक काऊंसिल नावाच्या सेल्फस्टाइल थिंकट्यांकाची फेलो आहेत. या अटलांटीक काऊंसिल नावाच्या सेल्फस्टाइल संस्थेचे फंडींग कुठून येते आणि त्याचा वापर कसा होतो या बद्दलचा हा न्युयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट बोलका आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आपल्याला वापरून घेताहेत हे त्यांच्या गावीही नसते अथवा काही लोकांसाठी पैसाच सर्वकाही असते. एनीवे त्यांना सेंसॉर करणे हा उद्देश नाही. त्यांच्या लेखनातील समतोलाचा अभावाकडे लक्षवेधणे आणि सरकारने उचललेल्या सकारात्मक पाऊलांना आपल्याकडून प्रसारीत करणे हा सर्वोत्तम उपाय असावा.

In reply to by माहितगार

भारतातील राजकारण कोणत्याही दिशेने जाऊ द्या नेहमीच भारतीय न्यायालये आणि भारतीय सैन्याने त्यांची निष्पक्षता आणि व्यावसायीक मुल्यांची किमान पातळी जपलेली आहे
+१०००००

In reply to by माहितगार

लेखनातील समतोलाचा अभावाकडे लक्षवेधणे आणि सरकारने उचललेल्या सकारात्मक पाऊलांना आपल्याकडून प्रसारीत करणे हा सर्वोत्तम उपाय असावा
+१ क्या बात

In reply to by Jack_Bauer

माहीतीत "गार" केलं की आम्हाला. देव या ढोंगी मानवता कळवळा वाल्यांना एकदाच (आणि अर्थात शेवटचे) अतिरेक्यांचे तावडीत सापडू देत आणि मग बघू पोपटपंची!!! गपगार नाखु

यांचं Bias नावाचं सुंदर पुस्तक आहे. त्यात त्यांनी पत्रकारांबद्दल जे लिहिलंय ते चिंतनीय आहे - When it comes to utter disregard accountability, abuse of power and arrogance, journalists stand close to politicians and lawyers.

फिल्म इस्टीट्युट मधल्या विद्यार्थ्यांना गजेंद्र चौहान नको हे प्रकरण तर मिडीयानेच मोठे केले. जेव्हा व्यसनाधीन मुलांच्या मानसोपचार तज्ञांच्या खर्चात कपात केल्याने त्या विद्यार्थ्यांनी पराचा कावळा केला आणि त्या कावळ्याचा मिडीयाने डायनोसॉर केला असे दै. सकाळच्या बातमीत पुढे आले.

२०१५मध्ये भारतीय मीडीयाने प्रसवलेल्या खोट्या-नाट्या, अपूर्ण, अफवात्मक बातम्यांची पद्धतशीर झाडाझडती इथे वाचा. ओपइंडिया डॉट कॉम वाले उघडपणे उजव्या विचारसारणीचे असले तरी ते दर महिन्यात प्रसिद्ध करत असलेल्या माध्यम असत्यांचे अहवाल रोचक असतात. असे प्रयत्न मराठी मीडीयासाठीही करणे गरजेचे आहे. काही ताजी उदाहरणे सांगायची तर डॉनल्ड ट्र्म्प यांनी मुस्लीमांच्या अमेरिकाप्रवेशाबद्दल केलेल्या विधानाचे कवरेज मी मुद्दामहून एनडीटीव्ही व सीएनएन दोन्ही वाहिन्यांवर पाहिले. सीएनएनने या विधानाच्या समर्थनार्थ आणि विरोधात असलेल्या दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया दाखवल्या आणि वर या विधानाची समर्थन करणारे हे 'फ्रिंज एलिमेंटस' नसून सुजाण नागरिक आहेत हेही अधोरेखित केले. याउलट एनडीटीव्हीने अपेक्षेप्रमाणेच सगळे अमेरिकन्स या विधानाविरोधात कसे आहेत हे सांगताना फक्त विरोधातल्या प्रतिक्रिया दाखवल्या. दुसरे उदाहरण म्हणजे जिथे अडीच लाख लोक रस्त्यावर उतरले असे सांगण्यात येते त्या माल्दा इथून नक्की काय घडले हे सांगणारे फिल्ड रिपोर्टिंग फारसे कोणीही केलेले दिसत नाही. तिसरे उदाहरण म्हणजे निर्भया केससंदर्भात इतर वेळी 'बाल की खाल' काढणार्‍या मिडीयाने कन्विक्टेड बालगुन्हेगाराचे नाव का लपवून ठेवले हे कळत नाही. फक्त 'ज्युवेनाईल' असाच उल्लेख सुरू होता.अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. आज सोशल मिडीयात काय व्हायरल आहे हे मोठ्या कौतुकाने सांगणारा भारतीय मीडीया लौकरच या सोशल मिडीयाविरोधात,भाजीबाजारातील भाजीवाले जसे ठरवून भाव वाढवतात तशी टिपिकल भारतीय व्यापार्‍यांना शोभणारी सिंडीकेटछाप भूमिका घेईल असे वाटते. कारण सोशल मिडीयापुढे पारंपरिक मिडीयाला आपला अप्रामाणिकपणा खपवणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.

In reply to by ए ए वाघमारे

>>तिसरे उदाहरण म्हणजे निर्भया केससंदर्भात इतर वेळी 'बाल की खाल' काढणार्‍या मिडीयाने कन्विक्टेड बालगुन्हेगाराचे नाव का लपवून ठेवले हे कळत नाही. फक्त 'ज्युवेनाईल' असाच उल्लेख सुरू होता.अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. कायद्याने नाव घोषित करण्यावर बंदी आहे असे वाटते. बाकी चालूद्या. 21. Prohibition of publication of name, etc., of juvenile involved in any proceeding under the Act.- (1) No report in any newspaper, magazine, news-sheet or visual media of any inquiry regarding a juvenile in conflict with law under this Act shall disclose the name, address or school or any other particulars calculated to lead to the identification of the juvenile nor shall any picture of any such juvenile be published : Provided that for reasons to be recorded in writing the authority holding the inquiry may permit such disclosure, if in its opinion such disclosure is in interest of the juvenile. (2) Any person contravening the provisions of sub-section (1) shall be punishable with fine, which may extend to one thousand rupees. नोशनल लॉस = भ्रष्टाचार असे अर्थ लावणारा मीडिया अलिकडेच लोकांना खोटारडा वाटू लागला आहे हे उदाहरणार्थ रोचक आहे.

In reply to by नितिन थत्ते

कायद्याने नाव घोषित करण्यावर बंदी आहे असे वाटते
आपण म्हणता तसे असेलही. कदाचित हे प्रकरण संवेदनशील असल्याने मीडिया ताकही फुंकून पीत असेल.माझे म्हणणे इतकेच की दहशतवादी हल्ल्यांसारख्या गंभीर प्रकरणाच्या लाईव्ह कवरेज संदर्भात सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करणारे, अनेक न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये मीडिया ट्रायल करणारे याच प्रकरणात कसे सुधरले?असो.
नोशनल लॉस = भ्रष्टाचार असे अर्थ लावणारा मीडिया अलिकडेच लोकांना खोटारडा वाटू लागला
हे मला उद्देशून आहे का? असेल तर मला तसे वाटत नाही हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो.

In reply to by ए ए वाघमारे

>>आपण म्हणता तसे असेलही. असेलही? कायद्यातलं टेक्स्ट डकवलंय की प्रतिसादात. >>हे मला उद्देशून आहे का? नाही. तुम्हाला उद्देशून नाही. एकूणच समाजमाध्यमांतून प्रेस्टिट्यूट मीडिया अशा हेडिंगखाली जे प्रसवले जात असते त्याला उद्देशून आहे.

In reply to by नितिन थत्ते

अहो,'असेलही' म्हणजे तुम्ही डकवलेल्या कायदयाच्या प्रोव्हीजननुसारच त्या बालगुन्हेगाराचे नाव जाहीर केले नसेल असे असेलही -असे मला म्हणायचे होते.इतरवेळी नियम,संकेत,मानके इत्यादींना सेन्सेशनलीझमच्या स्पर्धेत बाजूला ठेवणारा, स्वत:ची चिकित्सा करायची वेळ आली की गुपचूप बसणारा मिडीया अचानकच इतका संवेदनशील,एथिकल कसा झाला एवढीच मला उत्सुकता होती. अवांतर: आपण म्हणता त्या नोशनल लॉस=भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात, नेमके बोलायचे तर 2जी प्रकरणात जोवर राजकारणी आणि नोकरशहा आरोपीच्या पिंजर्‍यात होते तोवर मिडियाने त्यांचा यथेच्छ समाचार घेतला.तो योग्यच होता.पण जसे नीरा राडिया आणि इतर प्रथितयश पत्रकारांची नावे लॉबिंगसंदर्भात पुढे आली तेव्हा त्या अ‍ॅंगलने शोधपत्रकारिता कोणी केलेली दिसली नाही.त्याचप्रमाणे पेड न्यूजसारख्या प्रकरणात आरोपी वर्तमानपत्रांची ,त्यांच्या संबंधित अधिकार्‍यांची नावे कुठे फारशी झळकली नाहीत.पेड न्यूज प्रकरण या शब्दातच 'पेड' हा शब्द आर्थिक देवघेवीकडे लक्ष वेधणारा आहे.एकाही मिडीयाहाऊसने याचा क्रिमिनल प्रोसीजरने तपास व्हावा असा आग्रह केल्याचे निदान मला तरी आठवत नाही.साधा वाहतूक पोलिस १००रू. लाच घेताना पकडला गेला तर निलंबन,बडतर्फीची मागणी करणार्‍या मिडियाने पेड न्यूज प्रकरणात बातमी छापण्यासाठी पैसे घेतले म्हणून किती संबंधितांची चौकशी करून निलंबित वगैरे केले याची माहिती नाही. अशोक चव्हाणांचे मात्र नाव झाले.लोकसत्तासारख्या एखाद्याच वृत्तपत्राने याबाबत फॉलोअप स्टोरीज चालवल्या पण त्यासुद्धा शक्यतो त्या वृत्तपत्रांची नावे न घेता.इथे मी जेव्हा कव्हरेज,बातम्या म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ केवळ उरकल्यासारखे फॅक्चुअल रिपोर्टींग नव्हे तर किमान ४८तास चालवलेल्या ब्रेकिंग न्यूज, आग लागलेल्या पॅनेल चर्चा इ.इ. आजच्या स्टॅंडर्डने घेतलेली दखल असा घ्यावा.असो.चालायचंच.

In reply to by नितिन थत्ते

नोशनल लॉस = भ्रष्टाचार
२जी मध्ये भ्रष्टाचार झालाच नाही असं म्हणताय का थत्ते चाचा? तिथे केवळ नोशनल लॉस हाच मुद्दा होता?

In reply to by अनुप ढेरे

भ्रष्टाचार झालाच. त्यात काही संशय नाही. पण १.७६ लाख कोटींचा नोशनल लॉस हा भ्रष्टाचार नव्हता. परंतु "मेरे देशके एक लाख छिहत्तर हजार करोड रुपये चोरी हो गये; किसके पास गये?" असा त्यावेळचा केजरीवालचा डायलॉग होता आणि तो तेव्हाच्या मीडियाने उचलून धरला होता. बेसिकली "प्रचंड भ्रष्टाचार चाललाय" ही भावना निर्माण होण्यात या दोन आकड्यांचा मोठाच सहभाग होता.

In reply to by नितिन थत्ते

युपीएच्या काळात २-जी तरंगलहरींचे झालेले वाटप रद्द करून नंतर लिलाव झाल्यावर १.७६ लाख कोटींच्या नोशनल लॉस पेक्षा (आणि सिब्बलांच्या दाव्यानुसार झिरो लॉस पेक्षा सुद्धा) प्रत्यक्ष लॉस कितीतरी मोठा असल्याचे सिद्ध झाले.

नुकतेच झालेले उदा देतो "त्या" वकिलानी जो मॉरनिंग वाक् चा सल्ला दिला होता त्यात**नीस तुम्ही सुद्धा असे शब्द टाकून वाहीनीने बातमि दिली आता बोला यावर वकिलानी वाहीनीवर केस करायाला हवी की नाही ?

गेल्या १-२ वर्षांपासून मराठी वाहिन्यांवर व काही हिंदी वाहिन्यांवर सुद्धा एक विचित्र प्रकार दिसतो. मराठी वाहिन्यांवर जवळपास रोजच "सामना" या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात काय छापलेले आहे ते सविस्तर दाखविले जाते. शिवसेनेचे संजय राऊत व उद्धव ठाकरे आपल्या अग्रलेखात विश्वातील कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने तारे तोडत असतात व त्यांची मुक्ताफळे मराठी वाहिन्या ते रोज दाखवित बसतात. मराठीतील इतर कोणत्याही वृत्तपत्राच्या (मटा, लोकसत्ता, सकाळ, पुढारी. लोकमत इ.) अग्रलेखात काय लिहिले आहे हे कधीही वाहिन्यांवर दाखवित नाहीत. फक्त सामनाच्या अग्रलेखाला भरपूर प्रसिद्धी देतात. रोज अग्रलेखाला प्रसिद्धी द्यायला संजय राऊत म्हणजे काय आचार्य अत्रे आहेत का लोकमान्य टिळक? अनेकवेळा हिंदी वाहिन्यांवर देखील "दोपहर का सामना"तल्या अग्रलेखात काय लिहिले आहे ते दाखविले जाते. शिवसेना व या वाहिन्यांचे काही साटेलोटे आहे का असा संशय येत आहे.

ह्या संशयात तेव्हढाच दम आहे गुर्जि जेव्हढा कि "महाराष्ट्र भाजपा आणि राष्ट्रवादि खाँग्रेस मध्ये काही साटेलोटे आहे का"

●आज तक-आम आदमी पार्टी,अरविंद कि जय हो!! (अंजनाओम कश्यप→आवरा यार कुणीतरी हिला. पुण्य प्रसून वाजपेयी→प्रेमपुजारी) ●इंडिया टीवी-कट्टर भाजप (रजत शर्मा→स्वतःच आणि मोदींचं बालपण हालाकित गेल्यामुळे मोंदीबाबत विशेष सहानुभूती,आणि त्यातूनच सुरू असलेला भाजप प्रसार.) ●एबीपी न्यूज-खोबरं तिकडं चांगभलं. (सगळे निवडणूक सर्वे भाजपच्या बाजूने झुकलेले,महाराष्ट्रात सेनेच्या 63 जागा पाहून चेहरे पडलेले,बिहारच्या वेळी ही तसेच.) ●झी न्यूज-सुधीर चौधरी DNA(डेली न्यूज अॅनलायसिस)छान विश्लेषण करतो, पण भाजपेयी आहे असं वाटतं. ●एनडीटीवी-बरं हाय (जास्त पाहत नाही त्यामुळे सांगू शकत नाही) ●टाईम्स नाऊ-छान आहे,पण (अर्नब गोस्वामी→ओरडू नका हो;कान फाटले) बाकिचे सगळे लिंबू टिंबू.

In reply to by प्रदीप साळुंखे

एनडीटीवी-बरं हाय(जास्त पाहत नाही त्यामुळे सांगू शकत नाही) म्हणजे ज्याविषयी जास्त सांगितल आहे तुम्हि जास्त तर तेच पाहता. नवल आहे तुम्हि साम मराठि नाहि बघत ? एनडीटीवी ला रविश चे सगळेच प्रोग्राम छान असतात.

In reply to by होबासराव

एनडीटीवी वर रविश असला तरच पाहतो. . . .नवल आहे तुम्हि साम मराठि नाहि बघत ? पाहतो. मी फक्त हिंदी चॅनेलचं सांगितलं. काय हो तुम्ही साम मराठीवाले तर नाहीत ना?

In reply to by होबासराव

●एबीपी माझा-'माझा विशेष' भारी वाटायचं जेव्हा प्रसन्न जोशी असायचा. आता कधी कधी तेच रटाळ विषय चघळत बसतात. बहुतेक मराठीत नं. एक वर आहे. (हिंदीत जसं मोदी-मोदी तसं मराठीत ठाकरे-ठाकरे.शेवटी ट्यार्पी महत्वाचा नाही का?) ●आयबीएन लोकमत-वागळे गेले अन् सगळी मजाच गेली. आजचा सवालमध्ये आपल्या सोयीनुसार चर्चा घडवायचे ते.पण एक पत्रकार म्हणून त्यांना सलाम.ते होते तेव्हा चॅनेल नं.एकवर होतं. (इथेही ठाकरे नामाचा जप असतोच) ●जी 24 तास-उदय निरगुडकर अॅक्टिंग जास्त करतात असं वाटतं,असो हे चॅनेल लांब आहे त्यामुळे जास्त बघणे होत नाही. आयबीएन आणि माझा लागोपाठ आहेत,केबल हाय हो. ●टीवी9 मराठी - नया है यह अजून लै शिकायला पाहिजे.हिंदी चॅनेलचा जसा दिल्ली,यूपी,बिहारकडे जास्त कल असतो तसा यांचा मुंबईकडे.'टीवी 9 मुंबई' असं नाव पाहिजे होतं. निखिला म्हात्रे सोडून दुसरी अँकर नाही वाटतं? ●साम मराठी - त्यामानाने हे बरं वाटतयं.साधेपणा भावतो. (तंत्रज्ञान अजून उच्च वापरायला पाहिजे) असो, ●मी मराठी - खिशात नाही दाणा आणि बाजीराव म्हणा. वागळे आले आणि गेलेही,असो (बातम्या कमी अन् नुस्त्या जाहिरतीच लै.) ●जय महाराष्ट्र - हे चॅनेल आता आमच्यात दिसत नाही.प्रसन्न इकडे आला म्हणे,संपादक म्हणून!!! असो.

बहुतेक हिंदी न्यूज चॅनल्स अगदी बटबटीत पद्धतीने , कोणताही अभ्यास न करता आणि विचित्र गॉसीप करत दवंडी पिट्ल्याच्या पद्धतीने बातम्या देतात. ईंडिया टी व्ही त्यात अग्रणी. ( उदा: देखीये मंगलग्रह पर हसीना..) राज ठाकरे यांच्या कोणात्याच विधानाचा अर्थ समजून न घेता त्याम्च्यावर विखारी टीका या हिंदी चॅनेल्स नी केली. आणखी एक या बहुतेक चॅनेल्स वर उत्तर प्रदेश दिल्ली आणी बीहार च्याच जास्त बातम्या असतात. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या किंवा ग्रीक मधील ढासळत्या अर्थव्यवस्थेपेक्षा त्याना बलीया किंवा किन्नौर मधे सासुने सुनेला बदडले ही बातमी महत्वाची वाटते.

In reply to by विजुभाऊ

अगदी अगदी ... सध्या एखादी घटना घडल्यावर नक्की काय घडले ह्या साठी किमान ४/५ वेगवेगळी न्यूज चॅनल्स बघावी लागलात तेव्हा कुठे पूर्ण बातमी कळते. फ़क़्त एकाच चनल वर पहिला तर अर्धीच किंवा सोयीस्कर / चमचमीत भाग तेवढा कळतो. सगळ्या तिकनहुन असे सगळे चमचमीत भाग गोल केल्यावर मग पूर्ण चित्र उभे राहते.

आहो ना आम्हि सकाळ वाचत ना साम मराठि बघत ●साम मराठी - त्यामानाने हे बरं वाटतयं.साधेपणा भावतो. आमच्या मते तो साधेपणा नाहि तर, असो...स्टाफ सिलेक्शन साठि जि पहिलि अट आहे तिथे त्यामुळे एकदम बारामतित बसुन बातम्या ऐकल्या सारख वाटत ते चॅनेल बघताना.

In reply to by होबासराव

साम आणि सकाळ=पवार आम्ही नाही हं त्यांचे समर्थक आम्ही अपक्ष संधीसाधु आहोत. . . . . ●साम मराठी-राष्ट्रवादी,पवारधार्जिणे साधेपणा दिसतो, तो भावण्यासारखा आहे. तंत्रज्ञानाची कमी आणि बरच काही.सुधारायला पाहिजे अजून. आता खुष का?