Skip to main content

लाचलुचपत प्रतिबंधक खाते आता फेसबुकवर..

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 18/08/2014 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल वर्तमानपत्र वाचताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्याच्या बर्‍याचशा बातम्या दिसतात. या खात्याचे पोलिस महासंचालक ( Director General) श्री. प्रवीण दिक्षित यांनी नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची वाट न पाहता आपल्याच अधिकार्‍यांना सरकारी कार्यालयात पेरून लाचखोर मंडळींची माहिती काढावयास लावली आणि अटकसत्र आरंभले. तरीदेखील लाच मागण्याच्या घटना कमी होत नाहीत किंवा कार्यालयाबाहेर केलेल्या देवाणघेवाणीचीही अँटी करप्शन ब्युरोला माहिती मिळणे थोडे अवघड होते. त्यातच १०० किंवा १०१ यासारखा पटकन लक्षात राहण्यासारखा संपर्क क्रमांक नसल्यामुळेही इच्छा असूनही लोक तक्रारी करू शकत नाहीत. म्हणूनच अधिक लोकाभिमुख होऊन, सोशल नेटवर्कवरती आपल्या घडामोडींची माहिती देण्यासाठी आणि त्याद्वारे लोकांमध्ये अधिक विश्वास संपादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन ब्युरोने फेसबुकवर पेज तयार केले आहे. https://www.facebook.com/MaharashtraACB येथे या पेजला भेट देता येईल. सध्यातरी इतर लोकांना त्यावरती नव्या पोस्ट्स टाकता येणार नाहीत, मात्र इतर पोस्टवर कमेंट्स-लाईक-शेअर करता येईल. सध्या हे पेज प्राथमिक स्वरूपात आहे. काही माहितीपर पोस्टर्स, बातम्या आणि अँटी करप्शन ब्युरोच्या संस्थळावरील काही माहिती इथे देण्यात आली आहे. त्यांच्या वेबसाईटवरील तक्रारदुव्याखेरीज फेसबुकपेजवरती देखील एक गुगल फॉर्मची लिंक आहे जेणेकरून कुठूनही आपल्याला लाचेच्या मागणीची माहिती ब्युरोला कळवता येईल. अँटी करप्शन ब्युरो संपर्क माहिती:-
  1. १०६४ - ही नुकतीच भारतभर सुरू झालेली सेवा आहे, परंतु काही ठिकाणी अंमलबजावणी होणे बाकी आहे. महाराष्ट्रात ही सेवा सध्या फक्त टेलिफोनवरून (बीएसएनएल्/एमटीएनएल) वरती उपलब्ध असून आठवड्याभरात मोबाईलवरूनही वापरता येईल.
  2. १८००२२२०२१ - ही सुद्धा टोलफ्री सेवा असून या क्रमांकावर केलेला फोन जवळच्या जिल्हा केंद्राला जोडला जातो.
  3. acbwebmail@mahapolice.gov.in या इमेल अ‍ॅड्रेसवरती विरोपाने तक्रार कळवता येईल.
  4. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या संस्थळावरती या दुव्यावर http://acbmaharashtra.gov.in/complaints_traps.asp सुद्धा तक्रार नोंदवता येईल.
  5. गुगलफॉर्मचा दुवा..
अधिक माहितीसाठी http://acbmaharashtra.gov.in/ इथे भेट देता येईल. या संस्थळावर अधिकाधिक माहिती देण्याचा अँटी करप्शन ब्युरोने प्रयत्न केला आहे. सरकारी कर्मचारी कशाकशाबद्दल लाच मागतात याची खातेनिहाय माहिती, तसेच इतरही उपयुक्त माहिती तिथे देण्यात आली आहे. पेजला भेट देऊन काही सुचवण्या असल्यास त्या कृपया व्यक्तिगत निरोपातून/पेजवरील मेसेजेस मधून कळवा. व्यनितून आलेल्या निरोपांचे त्यांचे संग्रहण करून संबंधित अधिकार्‍यांपर्यंत त्या सूचना पाठवण्यात येतील. तसेच पोस्टर्स, घोषवाक्ये किंवा इतर कोणत्याही प्रकारची विधायकप्रकारातील साहित्य, "मी लाच न देता माझे काम करून घेतले" अशा पद्धतीचे अनुभव दिल्यास अधिक मदत होऊ शकेल.

वाचने 9404
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सुंदर उपक्रम ! ... "अच्छे दिन आ रहे है ।" असे वाटण्याजोगा !!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उपक्रम सुंदर तर खराच. पण यात सरकार बदलामुळे फरक झाला आहे असे नाही. प्रत्येक नेत्याची वेगळी कार्यपद्धती असू शकते. नवं सरकार निवडूनयेण्यापूर्वीही या बातम्या येत होत्या. माझ्यामते गेल्या ऑक्टोबरमध्ये नवीन पोलिस महासंचालक आल्यापासून वर्तमानपत्रात अधिक बातम्या येऊ लागल्या होत्या.

जबरदस्त उपक्रम , चेपु वर आवडल्या गेले आहेत .. आता काही निगडीत अनुभव ऐकवायास आवडातील (बहुधा पुढच्या कट्टा येईल तेव्हा)

याचा कितपत उपयोग होतो कळेलच, पण सुरुवात झाली हेही कमी नही!

हा कार्यक्रम बराच काळ चालू राहिला तरच त्याचा काही फायदा दृश्य होईल. अन्यथा सरकारी माणसे पैसे घेत नाहीत आणी कामही करत नाहीत आणी फक्त कालापव्यय करतात. काही काळानंतर सामान्य माणसाला जुने दिवस बरे वाटू लागतात. निदान पैसे देऊन कामे तरी होतात असे वाटते. (मधल्या काळात मायबाप सरकार मध्ये योग्य ठिकाणी "पाणी जिरवले" कि अशा माणसाची बदली केली जाते आणी स्थिती येरे माझ्या मागल्या होते ). यावेळी असे होऊ नये असे वाटते.