Skip to main content

नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द

लेखक कौशिक लेले यांनी मंगळवार, 01/04/2014 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या यशस्वी आणि लोकप्रिय उपक्रमानंतर काल गुढीपाडव्याच्या - मराठी नवीन वर्षाच्या - शुभमुहूर्तावर मराठी भाषा विषयक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जो आहे - "नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द". चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!. हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही. या उपक्रमासाठी वेगळा वेळही काढायची गरज नाही. आपल्या रोजच्या मराठी बोलण्यात/वाचण्यात एखादा इंग्रजी शब्द ऐकला-वाचला की Back of the mind त्याचा सोपा मराठी शब्द काय असेल याचा विचार करायचा. आणि असा काही शब्द सुचला की आपल्या फेसबुक ग्रूप वर इतरांना सांगायचा. लोकांना कदाचित तो आवडून जाईल किंवा त्यातून अजून नवीन कल्पना सुचतील. साध्या मराठीत संगायचे तर तुमच्या "क्रिएटिव्हिटी" ला वाव आणि जरा "ब्रेन्स्टॉर्मिंग". रोजच्या धावपळीत ही "क्रिएटिव्हिटी" तुम्हाला "रिफ्रेशच" करेल. एकदम वैज्ञानिक संज्ञांवर उडी न मारता रोजच्या वापरातल्या, इंटरनेट वर वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून सुरूवात करूया. उदा. १) दुकानांवरच्या पाट्या २) टीव्ही वरच्या मराठी मालिकांमधले संवाद. उदा. "मी तुला खूप मिस्‌ करते" ई. ३) मराठी बातम्यांमधले शब्द उदा. ब्रेकिंग न्यूज, बंडखोराला तिकिटाची ऑफर, ई. ४) एफेम रेडीओ वरची रेडिओ-जॉकींची बडबड ५) वर्तमानपत्रांमधल्या. टीव्ही-रेडिओ वरच्या जाहिराती तुम्हाला जाणवलंच असेल की यासाठी भाषातज्ञ, व्याकरणतज्ञ असण्याची काही गरज नाही. साधीसोपी माणसं आणि त्यांचे साधे सोपे शब्द !! तर नक्की या फेसबुक पेजला जॉइन व्हा आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी नातेवईकांनाही जॉईन करायला सांगा. जितके जास्त सभासद तितक्या जास्त कल्पना आणि तितकी अधिक मजा एखादा ऑनलाईन गेम खेळल्या प्रमाणे ! https://www.facebook.com/groups/494409877351095/ आणि या ग्रूप वर चर्चा झालेले शब्द ह्या ब्लॉगवर टाकत जाईन जेणेकरून सगळे शब्द एकत्र बघता येतील. http://navin-marathi-shabda.blogspot.in/ म्हणतात ना -"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे". तुमचा हातही त्यातलाच एक नक्की आहे !!

वाचने 93751
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

सर्कारदर्बारची भाषा अन बोलीभाषा यात फरक नाही काय? मारकुटे यांचे अर्ग्युमेंट बरोबर आहे. शुद्ध-अशुद्ध याचा संबंध तुम्ही कायदेशीर अन कार्यालयीन भाषेशी लावताहात तर मारकुटे भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून बोलताहेत इतकंच. प्रमाणभाषेची गरज कोणीही नाकारत नाहीये, पण कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाही. मी बोलतोय तो तुम्हांला संज्ञांचा फजूलपणे काढलेला कीस वाटत असेल तर त्याला इलाज नाही पण तुम्हां दोघांच्या अर्ग्युमेंटची संदर्भचौकट अंमळ वेगळी असून त्या त्या चौकटीत ते ते अर्ग्युमेंट बरोबर आहे इतकेच सांगायचे होते.

In reply to by बॅटमॅन

कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाही
नक्की शुद्धताच का?? की प्रमाणता.. यावर किती किस पाडु तेवढा कमी आहे.. शुद्ध-अशुद्ध, प्रमाण-प्रमाणेतर, चांगले-वाईट या सगळ्या संज्ञा सापेक्ष (मराठीत - relative terms) आहेत एवढच म्हणू शकतो .. इथे जरा "भावना पोचल्या की झालं" हा नियम लावून पहा !!

In reply to by बाळ सप्रे

होय शुद्धताच. कायदेशीर मान्यता असलेल्या एका बोलीत काही वेगळे शब्द असतील, पण मान्यता नसलेल्या दुसर्‍या बोलीत व्याकरणाचे नियम प्रमाणबोलीतल्यासारखेच पाळले जाऊ शकतात. असो.

In reply to by बॅटमॅन

म्हणजे व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध ?? मान्यता नसलेली बोली अशुद्ध?? मागचे काही प्रतिसाद पाहता 'अशुद्ध' शब्द भाषेच्याबाबतीत तुम्हाला निषिद्ध वाटतोय !!

In reply to by बाळ सप्रे

मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर. व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध. अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये.

In reply to by बॅटमॅन

शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध
वरील दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत.. मला दुसरे विधान पटते.. त्याप्रमाणे.. 'त्याची मदत केली' - अशुद्ध 'त्याला मदत केली' - शुद्ध का इथे बोलीभाषेचा संदर्भ लावून प्रमाणेतर म्हणणार?? व्याकरणाप्रमाणे अशुद्ध म्हटल्यास व्याकरणाचे 'अज्ञान' हे कारण स्वीकारण्यास हरकत नसावी.. इथे 'सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे' ही पळवाट आहे.. काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!

In reply to by बाळ सप्रे

अंमळ गफलत झाली वाट्टे. पण
काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!
हे असलं तरी वेगळ्या बोलींना रेकग्निशन देणे हे कधी होणारच नाही. प्रमाणभाषेपुरते ठीक आहे, बाकी वेगळ्या बोलीचं असू नये असं. व्याकरण ही गोष्ट फक्त प्रमाणबोलीपुरती मर्यादित नाही. थोड्या फरकांसहित पाहिले तर साधारणपणे व्याकरणाचा एकच नियम बर्‍याच बोलींना लागू पडतो म्हणून तो शुद्धतेचा मुद्दा काढला इतकेच. ऑब्जेक्टिव्हलि शुद्ध म्हणून जे काही अस्तित्वात असते अथवा असू शकते ते एका प्रमाण बोलीशी निगडित नसते अथवा नसावे इतकाच मुद्दा आहे.

प्रचलित नियमांनुसार काही ठिकाणी द्वितीयेचे प्रत्यय 'स', 'ला' हे न लावणे अशुद्ध ठरते. पण तृतीयेचे 'एं','शीं', 'ईं' 'हीं' हे प्रत्यय कालौघात गळून पडले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. रायगड जिल्ह्यात बोलीभाषेत अजूनही ते वापरले जातात पण आपण ते बोलणे अशुद्ध समजतो! 'त्यांईं मला हे घड्याळ दिले' किंवा 'तिएं ओवाळले' किंवा 'काकाहीं वाटणी मागितली' ही वाक्ये कानाला कशी वाटतात? शुद्ध असूनही अशुद्ध वाटतात ना? दक्षिण कोंकणात ताणे, तेणा अशी रूपे आहेत. ही संस्कृत 'तेन' ला अधिक जवळची आहेत. पण ही रूपे अशुद्ध आणि 'त्याने' मात्र शुद्ध. जाता जाता : तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.

In reply to by राही

पुनरेकवार अतिशयच सहमत. तदुपरि
तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.
एक छोटीशी दुरुस्ती: 'ने' हा प्रत्यय प्रत्यक्ष बोलण्यात कधीच नव्हता, फक्त लेखनात होता. अन नी ऐवजी नं हा जास्त ऐकला आहे.

In reply to by राही

प्रत्ययाबाबत मुद्दा लक्षातच घ्यायचाच नसेल तर ठीक आहे. मुद्दा कोणते प्रत्यय गळून पडले नाही पडले हा नाही तर हिंदीच्या अतिरेकामुळे आपण मराठीतील प्रत्यय गाळतो आहे हा आहे. आणि समजा एखाद्याने ते लक्षात आणून दिले तर प्रवाहीपणा, स्त्रोत, वर्गवारी असली फुसकी कारणे देतो हे आहे. म्हणूनच डॉक्टर खरेंशी सहमती दर्शवली आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ही कारणे अजिबात फुसकी नाहीत. तशी ती मानणे म्हणजे आत्मवंचना करून घेणे आहे. मुद्दा प्रत्ययांचा नाहीच. मराठीच्या स्वरूपात वेगाने होत असलेल्या बदलांचा आहे. हे बदल होतच नाहीयेत असे तर कोणी म्हणत नसावे. हे बदल होऊच नयेत, झालेच तर ते 'वर्ज्य' मानावेत, 'स्वीकारार्ह' नसावेत असे मत दिसते; ज्याचे नियमांत रूपांतर होऊन अंमलबजावणी होणे कठीण वाटते. जे फीज़िबल नाही, त्याच्यामागे आपली शक्ती का दवडावी? त्याऐवजी मराठीच्या विकासाचे अन्य मार्ग का हाताळू नयेत? समजा, सध्या हिंदीच्या प्रभावामुळे मराठी नको इतकी बदलतेय, मग आतापर्यंत जे बदल झाले, ते तेव्हा हिंदीचा प्रभाव नसताना(च) झाले(च) ना? म्हणजे हिंदीचा प्रभाव असो वा नसो, मराठीत बदल हे होतच आहेत. यातून एक अर्थ असाही निघू शकतो, की बिगरहिंदी प्रभावांनी बदल झाले तर चालतील, पण हिंदीमुळे मात्र नको. असो. वाढत्या शिक्षणामुळे आणि अभिसरणामुळे होत असलेले बदल खुल्या मनाने स्वीकारणे हा एकच पर्याय दिसतो आणि तो योग्यही आहे, आपद्धर्म नव्हे, असेही मला वाटते.

In reply to by राही

सहमत आहे. अशाच वृत्तीमुळे संस्कृत लयास गेली. पाणिनी नंतर पतंजली झालेले बदल नोंदवतो पण आम्ही अष्टाध्याचीच घोकत बसलो, महाभाष्य उघडून पण पाहिले नाही. हीच अशीच हेच असेच उच्चार आणि प्रत्यय आणि शब्द असल्या वृत्तीमुळे संस्कृत संपली. बरे आहे मराठीबाबत असली अरेरावी इथला समाज फाट्यावर मारतो.

In reply to by राही

भाषा प्रवाही असते.. नवीन शब्द सामावुन घेतल्याने समृद्ध होते वगैरे मान्य. म्हणून लिहिण्या, बोलण्यातील सर्वच अशुद्धता सामावून घ्यावी आणि तोच नियम व्हावा हे अमान्यच.. आणि जास्त लोक तसे बोलतात म्हणून तो नियम व्हावा हे ही अमान्य.. असे असते तर चायनीज्/इतर लोकांमुळे इंग्लिश भाषा कितीतरी बदलली असती!! बर्‍याच वेळा हे चूक, हे बरोबर हे सांगायला कोणी जात नाही म्हणून काय बरोबर काय चूक हे न समजता ते बोलणे लिहिणे पुढे चालत रहाते.. हे कोणी सांगितल्यास अज्ञान मान्य करून सुधारण्यास काय हरकत आहे.. प्रत्येक चुकीला सामावून घ्यायचे असेल तर व्याकरण तरी कशाला शिकवावे शाळेत.. "भावना समजल्या की झाले" याचाही अतिरेक नको.. भावना कधीकधी भाषेशिवायही पोहोचु शकतात! प्रमाण भाषा ही सर्व बोलीभाषांमधील दुवा असते.. भाषेत बदल सामावून घेताना अपरिहार्यता लक्षात घेणेही गरजेचे आहे.. बदल समृद्ध होण्याइतका असावा .. अस्तित्व/ओळख हरवण्याइतका नसावा..

In reply to by बाळ सप्रे

प्रमाण भाषा हवीच पण प्रमाण भाषेचे स्वरूप सर्वकाळ तेच हवे हा आग्रह योग्य नाही. भाषा बदलते आहे याचा अर्थ प्रमाण भाषाच बदलते आहे. सर्वच प्रमाणे बदलली. वाल, रती, गुंज जाऊन तोळा, मासा छटाक,शेर आले. तेही जाऊन ग्राम मिलिग्रॅम आले. प्रहर, घटिका पळे, निमिष जाउन सेकंद् ,मिनिटे आली, टीच-वीत-तसू गेले, योजन-क्रोश गेले, फर्लॉग-माइल गेले, यार्ड-फुट-इंच गेले, मीटर-किलोमीटर आले. हे सर्व बदलले आणि हे बदल व्यक्त करणारी 'प्रमाण'भाषा मात्र तशीच राहिली, असे घडेल काय? चिनी भाषेच्या इंग्लिशवरील प्रभावाचे उदाहरण तितकेसे समर्पक नाही. चिनी भूभागावर जिथे जिथे कोपर्‍या-खबदाडीतून (पॉकेट्स) इंग्लिश बोलली जाते तिथे त्या इंग्लिशवर चिनी भाषेचा प्रभाव पडेलच पडेल. पण जोपर्यंत इंग्लिश मेन लँड म्हणजे यू.के.,अमेरिका वगैरे मध्ये चिनी लोक 'साय्ज़ेबल' प्रमाणात नाहीत तो पर्यंत तिथे चिनी भाषेचा प्रभाव पडणार नाही. घरातले उदाहरण द्यायचे झाले तर पूर्व आणि पश्चिम बंगालमधले बांग्लाभाषक मराठीभाषकांपेक्षा संख्येने अधिक आहेत पण ते मराठी मेन्लँड्मध्ये नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या माध्यमांवरही त्यांचा प्रभाव नाही त्यामुळे बांग्ला भाषेचा प्रभाव मराठीवर नाही. बृहन्मुंबई भागात मनोरंजन-वाहिन्या आणि बॉलिवुडमुळे हिंदीचा प्रभाव आहे. बाकी वृत्तावाहिन्यांची मुख्य कार्यालये दिल्लीतच आहेत. हां, आपण एक गोष्ट करू शकतो. बॉलिवुड मुंबईत नको अशी चळवळ उभारू शकतो. किंवा मराठी लोकांनी ह्या वाहिन्या-चित्रपट पाहू नयेत असा शुद्ध मराठमोळा नियमही करू शकतो. हिंदी मनोरंजनाचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर सर्वत्र, अगदी चेन्नैपासून तुर्कस्तानपर्यंत आहे. चेन्नैमध्ये मुली आजकाल हाफ-साडी (पवडै दवनी) ऐवजी सल्वार-कमीज़ वापरतात हे हिंदी चित्रपटांमुळे झाले असे तेथील लोक खेदाने म्हणतात. या पोशाख-क्रांतीने कितीतरी नवे शब्द तमिळमध्ये घुसवले असतील आणि कितीतरी जुन्या शब्दांना डच्चू दिला असेल. आपल्याकडेसुद्धा लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्‍या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'. भाजी, कांदे विळीवर चिरायचे असत, आज सुरीने 'कापतात' किंवा प्रोसेसरमध्ये 'फिरवतात'. 'तू टाक चिरुनी ही मान' हे आता अतिजुने झाले. ही एक प्रकारची समृद्धीच नव्हे तर दुसरे काय?

In reply to by राही

लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्‍या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'
इथे सामाजिक बदलांना अनुसरुन भाषा बदल अपेक्षितच आहे.. पण म्हणून साडी 'घातली' हे अशुद्धच!! तेवढच म्हणायचय मला.. प्रत्येक भाषिक अशुद्धतेची प्रवाहीपणा/समृद्धी याकारणासाठी पाठराखण होउ नये इतकच!! 'त्याला मदत करणे ' हे सुट्सुटित वाक्यरचनेचे रूप माहित नाही म्हणून जास्त हिंदी कानावर पडण्यामुळे 'त्याची मदत करणे' असे केले जाते. इथे सामजिक बदल अथवा कुठल्याही प्रकारची अपरीहार्यता हे कारण नसून अज्ञान आहे हे कारण आहे हे मान्य करायला हरकत नसावी.

In reply to by बाळ सप्रे

आता 'घालणे' हेच जर कपड्यांच्या संदर्भातले योग्य क्रियापद ठरले तर नेसणे आणि घालणे हा भेद रहाणारच नाही. कारण 'नेसण्या'ची कृती करण्याची वेळच येणार नाही किंवा कमीत कमी वेळा येईल.(लुगडी धोतरे वापरातून गेल्यामुळे.) त्यामुळे तो शब्द स्मृतीतून जाईल. आणखी वीस वर्षांनी सारी-ड्रेपिंग हा शब्द रूढ झालेला असेल. आता ड्रेप म्हणजे वस्त्रांनी सजवणे, (भरजरी राजवस्त्रे वगैरे) अंगावर व्यवस्थित चढवणे. साडी हा नित्य वापरातला प्रकार राहिला नसून खास सणासुदींचा पोशाख बनल्यामुळे तो काळजीपूर्वक 'ड्रेप'च करावा लागतो. जुन्या मराठीतली 'लेणे', 'माळणे' ही क्रियापदे हद्दपार झाली कारण त्या क्रियांमागच्या कृती बदलल्या. आज कोणी 'मी शर्ट ल्या(य)लो' किंवा 'मी परकर ल्यायले' असे म्हणत नाहीत. आज कोणी फुले 'माळीत' नाहीत.

In reply to by बाळ सप्रे

खरे तर साड्या वापरातून जात चालल्या आहेत म्हणूनच 'नेसणे' हा शब्दसुद्धा वापरातून जात चालला आहे. भाषेच्या बाबतीत 'डेड-लाइन' 'डिमार्केशन' वगैरे असे काही नसते की शेवटची साडी शेवटच्या वेळी नेसली जाईल तेव्हाच अमुक एक शब्द बाद होईल. ही हळू हळू चालणारी आणि 'ओवरलॅपिंग' अशी प्रक्रिया असते.

In reply to by प्यारे१

"साड्या वापरातून जात चालल्या आहेत" असे म्हटले आहे. 'वापरातून गेल्या आहेत' असे नाही म्हटलेले. अर्थ असा की साड्या वापरण्याचा कल कमी होतो आहे. लोकसंख्यावाढीचा वेग कमी होतो आहे म्हणजे लोकसंख्या कमी होते आहे असे नव्हे; अ‍ॅक्सिलरेशन कमी होते आहे म्हणजे स्पीड कमी होतो आहे असे नव्हे. मुंबईत तरी हा कल स्पष्ट दिसतो. साड्यांची दुकाने जाऊन त्या जागी पंजाबी कपड्यांची (किंवा त्याहूनही पुढे म्हणजे वेस्टर्न आउट्फिट्सची) दुकाने दिसू लागली आहेत. पोलक्याच्या कापडाची अनेक दुकाने बंद झाली आहेत. रेल वे फलाटावर विशेषतः कचेर्‍यांच्या वेळात बायकांच्या डब्याशेजारी उभे राहून निरीक्षण केले (आपापल्या रिस्कवर) तर साडीवाल्या बायका कमी दिसतात. ग्रामीण भागातही कित्येक ठिकाणी नवतरुणी आता पंजाबीसूट किंवा मॅक्सी (खरे तर गाउन, हाउस-कोट) घालतात.

सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे. भिन्न संस्कृतीशी आदानप्रदान (किंवा आपण संघर्ष म्हणू या हवे तर ) होताना मूळ संस्कृतीला समांतर किंवा तिचीच एक शाखा अशी एक संस्कृती जन्म घेत असते आणि ती दोन्ही जनक संस्कृतींना समृद्ध करते. गांधारकला हे एक उत्तम उदाहरण ठरेल. सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत. आज हिंदीवर मराठीचा प्रभाव गुजरातीपेक्षाही जास्त आहे तो बॉलिवुडमुळेच. खरे तर जुनी गुजरातीभाखा ही मुळापासूनच राजस्थानीशी आणि पर्यायाने हिंदीशी साधर्म्य राखते. पण आज मात्र हिंदीवरचा मराठी प्रभाव जाणवण्याजोगा आहे. मुंबईमध्ये हिंदी चित्रपट-उद्योग भरभराटीस येणे ही घटना आर्थिक, भाषिक आणि सामाजिक अंगांनी तपासता येण्याजोगी आहे. भाषेवर या सर्व बलांचे कार्य चालते. यात भाषा कधी या अंगाने झुकते तर कधी त्या. अशी मुरडत, वळसे घेत चाललेली भाषा स्वतःचा एक वेव्ह फॉर्म किंवा पॅटर्न स्थापन करीत पुढे वाटचाल करीत असते. ही गति सरासरीने एकदिक् मानता येईल पण काळाच्या एखाद्या छोट्या तुकड्यात ती हेलकावे खाताना दिसू शकते. असो. मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्की.

In reply to by राही

मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्की
हे मान्य.. पण बरेच शब्दप्रयोग डोक्यात जातात हे मात्र खरं.. पण शुद्ध आणि अशुद्ध हा फरक राहाणारच.. प्रत्येक जण आपल्याला वाटेल तसेच बोलणार .. पण त्यात चूक दाखवल्यास वाईट वाटून घेउ नये.. 'शुद्ध आणि अशुद्ध असं काहिच भाषेत नसतं' असं म्हणणं हे देखिल आत्मवंचना करणेच ठरेल.

In reply to by बाळ सप्रे

शुद्ध आणि अशुद्ध ऐवजी प्रमाण-प्रमाणेतर हे शास्त्रीयदृष्ट्या जास्त योग्य ठरावं.

In reply to by बॅटमॅन

भाषेबाबत जास्त आग्रही असणार्‍यांना "शुद्ध आणि अशुद्ध" जास्त योग्य वाटेल.. पण "प्रमाण-प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. :-)

In reply to by बाळ सप्रे

शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे. त्यामुळे प्रमाण आणि प्रमाणेतर हे वर्गीकरण बरोबर आहे.

In reply to by बॅटमॅन

शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते (कारण प्रमाण काय आणि प्रमाणेतर काय यावरदेखिल वाद होउ शकतात) .. मुद्दा एवढाच.. अशुद्ध भाषा म्हटल्यावर राग येउ शकतो.. प्रमाणेतर म्हटल्यास ती शक्यता कमी.. म्हणूनच म्हटलं "प्रमाण - प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. पण हे डावंउजवं राहायचचं..

In reply to by बाळ सप्रे

भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते
पिशी अबोलीबै, ऐकताहात का ;) एनीवेज, हे विधान चूक आहे. ऑब्जेक्टिव्ह कंटेंट भाषाशास्त्रात खच्चून भरला आहे. ते न पाहता प्रमाण भाषेलाच शुद्ध म्हणण्याचा आग्रह रोचक वाटला.

In reply to by बॅटमॅन

अगदी सहमत. खरे तर ह्याच संज्ञा वापरून प्रतिवाद करायला हवा होता पण शुद्ध-अशुद्धाच्या मुद्द्याआधीचे विवेचन करण्यात माझ्याकडून जास्त जागा (वाया) गेली.

In reply to by राही

सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत. पाकिस्तानी उर्दूबद्दल माहिती नाही. हिंदी चित्रपटांत हे शब्द सर्रास येत असल्याने, व पाकिस्तानीही ते बर्‍यापैकी बघत असावेत, त्यामुळे अशा एका शब्दाचा मीच अलिकडे येथील एका पाकिस्तान्याशी बोलतांना वापर केला आणि मला काय म्हणायचे आहे ते त्याला अगदी झटकन समजले. पण हा anecdotal evidence झाला. ह्यापुढे प्रत्यक्ष आपापसात बोलतांना हे लोक असे, मराठीतून हिंदी चित्रपटांपुरते गेलेले शब्द वापरतात का, ह्याबद्दल काही माहिती नाही. पण हे शब्द आता सर्रास हिंदी भाषेत गेले आहेत व हिंदीभाषिक जनताही ते नियमीत वापरते, ह्याविषयी मात्र मी साशंक आहे. पुन्हा माझा anecdotal evidence तरी मला हे दर्शवत नाही. वास्तविक हिंदी चित्रपटांचा आपल्या सर्वांगीण जीवनावर प्रभाव अगदी चाळीशीच्या दशकापासून आहे. पण गेल्या पंधरा-वीस वर्षातच आपले पुण्या- मुंबईकडील लोक इतके हिंदाळलेले का बोलू लागले, आणि तसेच लिहूही लागले, ह्याचे मात्र मलातरी सखेदाश्चर्य वाटत राहिले आहे. इतर भाषांतून आपण पूर्वापार शब्द स्वीकारत आलेलो आहोत. पण, ती प्रक्रिया इतक्या वेगाने झालेली नाही. तसेच आपल्या अंवतीभोवती जे असते, त्याचा आपल्या बोलण्याचालण्यावर परिणाम होणे साहजिक आहे. पण तरीही आपले म्हणून जे काही असते ते अगदी 'पातळ' करून टाकायचे का, हा प्रश्न आहे. मला वाटते ह्याला थोडी शिस्त, व आपल्याच भाषेचा रास्त अभिमान असणे जरूरीचे आहे. माझा मुलगा वयाच्या आठव्या वर्षापासून परदेशी वाढला,इंटरनॅशनल शाळेत जावयास लागल्यानंतर त्याच्या मराठीत कधीमधी चुकीच्या वाकरचना येऊ लागल्या, उदा. 'तो मला बसवर भेटला'. अशा वेळी त्याला सौम्यपणे 'मराठीत आपण असे म्हणत नाही,' असे सांगून आपण ते मराठीत कसे म्हणतो, हे सांगून सुधारणा करत राहिलो. माझ्याप्रमाणेच आमच्या येथील अनेक मराठी कुटुंबियांतील मुले अगदी नीट मराठी बोलू शकतात, ते बहुधा अशाच शिस्तीमुळे असावे. इतर भाषेतील विशेषनामे उगाच चमत्कारीक मराठीकरण करून वापरावीत (उदा. 'चेपू', 'तूनळी' इत्यादी) हे मलातरी खुळचटपणाचे वाटते. तसेच ज्या संकल्पनाच परकी आहेत, त्यांना त्या त्या भाषांतील मूळ नावांनीच संबोधावे, ह्याविषयी अजिबात वाद नाही. त्याचबरोबर मराठीतील काही शब्दांना नवे अर्थ देऊन ते वापरणे हेही बेजबाबदारपणाचे वाटते. फार पूर्वीचे सांगत नाही, अगदी ऐशीच्या दशकापर्यंत कुठलाही दर्जेदार कार्यक्रमही 'समाप्त' व्हायचा. (आठवा: "आजचा 'आपली आवड' हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात पुढल्या मंगळवारी, रात्रौ दहा वाजता"). आता गल्लीबोळातला कार्यक्रमही 'संपन्न' होतो. (पूर्वी आमची जीवने कुठल्या ना कुठल्या कारणाने संपन्न व्हायची). हीच गोष्ट 'प्रभावित' ची! 'आलेल्या पुराने अमूकेक क्षेत्र 'प्रभावित' झालेले आहे' म्हणे! तेव्हा भाषेच्या प्रवाही असण्याबद्दल तक्रार नाही. मात्र बेजबाबदार राहून आपण आपली कात भर्र्कन टाकणे कितपत रास्त आहे, ह्याविषयी दुमत आहे.

In reply to by प्रदीप

प्रतिसाद आवडला. मराठीत हिंदी शब्द घुसण्याचं कारण मराठी मानसिकता असावी. तुम्ही तमिळनाडूत गेलात तर तिथले लोक तुमच्याशी हिंदी/मराठी बोलायला येणार नाहीत. पण मुंबईतला मराठी माणूस दुसरा माणूस कुठला आहे हे शोधून त्याच्याशी हिंदी/गुजराती इ. बोलायचा प्रयत्न करतो. गंमत म्हणजे मुंबईत हल्ली सार्वजनिक जागी २ मराठी माणसे भेटली तर हिंदीत बोलतात असे ऐकून आहे. या प्रकारात एक ना धड, भाराभर चिंध्या असली गत होत जाते. सरकारी मराठीबद्दल लिहिलंत तेही पटलं.

In reply to by पैसा

गंमत म्हणजे मुंबईत हल्ली सार्वजनिक जागी २ मराठी माणसे भेटली तर हिम्दीत बोलतात असे ऐकून आहे. माझा असाच अनुभव आहे. एका मुंबईच्या मित्राशी ह्या विषयावर अलिकडेच बोलत होतो. त्याने त्याचा मुंबईच्या आसपासच्या काही गावांतील स्वतःचा अनुभव सांगितला. त्याच्या अनुभवानुसार तिथेही, तेथील स्थानिक गांवकरी, आपण मराठीरून प्रश्न विचरल्यावर, आपणास हिंदीतून उत्तरे देतात. मित्राचे म्हणणे असे की असे हिंदीतून बोलणे, हे आता गावांतून प्रतिष्ठेचे होऊ लागले आहे.

In reply to by राही

राही, तुमचेही बरेच प्रतिसाद आवडले. भाषा बिघडत नाही आणि अधोगती होत नाही हे पटले. मात्र अशाच वेगाने मराठी आणि हिंदीचे मिश्रण होत राहिले तर मात्र एका मोठ्या कालखंडाचा विचार केला तर आजचे मराठी साहित्य ४००/५०० वर्षांनी तेव्हाच्या मराठी लोकांना दुर्बोध वाटेल, ज्ञानेश्वरीतली मराठी आज लोकांना कठीण वाटते तशीच. गंमत म्हणजे ज्ञानेश्वरीची भाषा अनेक ठिकाणी आज कोंकणीला जवळची वाटते. काही कोंकणी ग्रुप्स तर ज्ञानेश्वरी कोंकणीत आहे असे ठासून सांगतात. तसेच विचार करा, २५५० सालात कुसुमाग्रजांचे साहित्य तेव्हाच्या एखाद्या मुंबईत रहाणार्‍या तथाकथित मराठी माणसाला अजिबात समजणार नाही. ते पुणेरी बोलीला जवळचे आहे असे तो कदाचित म्हणेल! संस्कृत आणि अनेक प्राकृत भाषांमधून एके काळी अनेक भाषांची उत्पत्ती झाली. आता परत सगळ्या भाषांचे एकीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे म्हणता येईल का? या सगळ्या गदारोळात द्रविड भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवतील का त्यांचीही अशी सरमिसळ होत आहे?

In reply to by पैसा

या सगळ्या गदारोळात द्रविड भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवतील का त्यांचीही अशी सरमिसळ होत आहे?
सरमिसळ त्यांच्यातही होत आहे. पण मुळात फरक बराच असल्याने त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाला तितका फरक पडणार नै. मराठीत हिंदी प्रमाणाबाहेर मिसळली तर कदाचित एक वेगळीच भाषा तयार होईल, पण द्राविडी भाषांची मूळ शब्दसंपदा वेगळी असल्याने तसे होण्याची शक्यता कमीच. अर्थात लाँग रेंजमध्ये काय होईल कुणी सांगावे? मराठीची उत्पत्ती हीच मुळात प्राकृत + द्राविडी भाषांचे मिश्रण म्हणून झाली असे म्हंटात. तसेही होईल.

In reply to by पैसा

गंमत अशी आहे की भाषेच्या विकासाच्या एका विवक्षित टप्प्यावर जेव्हा बदलाचा वेग वाढतो आणि ती भाषा एक वेगळे वळण घेऊन मूळ भाषेहून वेगळी दिसू लागते, तेव्हा त्या संधिकाळात किंवा मेटॅमॉर्फसिसच्या काळात निर्माण झालेल्या साहित्यावर त्या वेळी निर्मितीअवस्थेत असलेल्या आणि पुढे स्वतंत्र बनलेल्या अनेक भाषा हक्क सांगू शकतात. मीरेच्या भजनांवर गुजराती, राजस्थानी, हिंदी या भाषा हक्क सांगतात. तुलसीरामायणाचेही तसेच. भोजपुरी, मैथिली या सारख्या बोलींना भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एका सामाईक साहित्यठेव्याचा वारसा या सर्वांनाच मिळाला आहे. कोंकणी आणि मराठीचेही तसेच आहे. 'चामुण्डराजें करवियले' हे वाक्य कोंकणी लोक आपले मानतात. त्यासाठी 'वियले' या क्रियारूपाचा दाखला देतात की ही कोंकणीची टेंडन्सी आहे. पण अशी रूपे तर विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांपर्यंत मराठीत प्रचलित होती आणि अजूनही कधी कधी काव्यरूपात दिसतात. जसे : लावियलें नंदादीपा, तुवां मंदिरात' किंवा 'बहुत छळियलें, नाथा' वगैरे. उद्या पुणे-सातारा परिसरातली घाटी बोली जर भाषारूप पावली तर शंकर पाटलांच्या कथा हा मराठी आणि ही नवी भाषा यांचा सामाईक वारसा ठरेल.

भाषा हे केवळ संवादाचे साधन असल्याने आपला कोणत्याच भाषेबद्दल / शब्दांबद्दल ह्ट्ट नाही ... जेव्हा जसे जे शब्द सुचतील तेव्हा ते तसे वापरावेत :) अर्थ कळाल्याशी मतलब !! असो. (मराठी भाशेचा पेपर संपल्यावर ) चंगु : अरे तिसर्‍या प्रश्नात , "सात्विक " चा विरुध्द अर्थी शब्द विचारला होता त्याचे तु काय उत्तर लोहिलेस ? मंगु : का रे ? तु काय लिहिलेस ? चंगु : मी लिहिले "सातस्ट्राँग" ... :D मंगु : अरे नाही यार , त्याचे उत्तर आहे "सात खरेदी कर" =)) चंगु : हां .... तरी मी म्हणत होतोच की मराठीच्या पेपरात इंग्लिश प्रश्न कसा काय विचारला ते =))))

बरीच चर्चा झाली. पण इथे नवीन शब्द काही हाती लागले नाहीत. ते असो. ज्यांना इच्छा आहे त्यांनी वर दिलेला फेसबुक गटाचे नक्की सदस्य व्हावे.

युरेका...युरेका...युरेका...! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif मला इंटरनेट कनेक्शनला जो मराठी म्हणून संस्कृतनिष्ठ जालंजोडणी ,हा शब्द वापरतात..त्याऐवजी येक सहजशब्द सुचला!!!

जोडजाळं

अता या शब्दावर माझा कॉपिराइट हां!!! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/winking-victory-sign-smiley-emoticon.gif

उपक्रम चांगला आहे. शुभेच्छा! एका प्रतिसादात म्हटले आहे की आहे ती मराठी नीट बोलणे महत्वाचे आहे. हे देखील बरोबर वाटते. मी एका आठवड्यासाठी बाहेर गावी जातोय >> मी एक वीकसाठी बाहेर जातोय. किंमत आहे एक कोटी रुपये >> किंमत आहे एक करोड रुपये वारांची नावे सहसा इंग्रजीतूनच घेतली जातात आज-काल. "मी संडेला गेलो होतो; मंडेला वापस आलो." बाकी हिंदाळलेले मराठी ऐकायला विचित्र वाटते. "बर्थडे मनवला...", "जेवण बनवले...", "चहा बनवली..", "या, तुमचीच कमी होती..." (अशा नावाचे बहुधा एक नाटकदेखील होते. 'कमतरता' शब्द मोठा म्हणून 'कमी' ला कामाला लावले बहुधा), "तिथे गुफा आहेत" (गुहा हा मराठी शब्द तर जवळ-जवळ आटोपला आहे; सगळेच 'गुफा' म्हणतात), "तिथे मोठी खाई होती" (दरी गेली आणि खाई आली), "त्याला शक आला..." (हे नि:संशय हिंदीच्).....अशी अगणित उदाहरणे आहेत. आणि हे पुन्हा मूळ शुद्ध मराठीवर ओढून आणणे जवळ-जवळ अशक्य आहे. इतका वेळ आहे का असं मराठी बोलणार्‍यांकडे? वाचतात का ते?

लॅपटॉप = मांडीबश्या मोबाईल = कर्णपिशाच्य = कानधर्‍या इयरफोन= कर्णकुंडले मॅनेजर = कामलाव्या अकाऊंट्स टीम= करकापे

In reply to by प्रसाद गोडबोले

=)) मोबाईलला भ्रमणध्वनी असा श्ब्द वापरतात की. आता सेलफोनला काय म्हणायचं ते बघा! बाकी पर्याय एकदम भारीतले आहेत! मॅनेजरला कामलाव्या पेक्षा वाटलाव्या शब्द जास्त बरोबर आहे.

मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर. व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध. अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये. आशयाशी सहमत. पण खालील फरकासहः प्रमाणित भाषा: सांविधिक संस्थेने (statutory body) मान्यता दिलेल्या नियमाप्रमाणे वापरलेली वापरलेली भाषा. अप्रमाणित भाषा: प्रचलित असलेली पण प्रमाणित भाषेशी सुसंगत नसलेली भाषा. अशुद्ध भाषा: सांविधिक संस्थेने मान्यता दिलेले नियम पाळण्याचा प्रयत्न/दावा करून त्या बाबतीतल्या चुका असलेली भाषा. या संदर्भात माझे दोन पैसे: १. बोलीभाषा बोलीभाषा ही रोजच्या वापरातली आणि म्हणून अत्यंत प्रवाही असते. ती वापरली जाण्यार्‍या लोकांत रुजलेल्या सवयी, तत्कालीन प्रचलित आवडी-निवडी (इन थिंग,फॅड, इ); बोलण्याच्या सवयी (हेल, च/ज इ उच्चारण्याच्या पद्धती,इ); इ ने प्रचंड प्रभावित असते. या सर्व गोष्टी काळाबरोबर सतत बदलत असतात आणि त्यामुळेच बोलीभाषा प्रवाही (सतत बदलत राहणारी) होते. एक प्रकारे बोली भाषा ही सतत चालू अवस्थेतले काम (वर्क इन प्रोग्रेस) आणि त्याबरोबर होणारा प्रत्येक बदल त्वरित वापरात आणणारे काम असते. लोकांना पसंत पडलेले / उपयोगी वाटणारे बदल प्रचारात राहतात आणि तसे नसलेले आपोआप कमी कमी वापर झाल्याने प्रचारातून निघून जातात. वरच्या वस्थुस्थितीमुळे कोणतीही बोलीभाषा नियमांच्या एका चौकटीत बसवणे शक्य नाही ... तो एक निष्फळ प्रयत्न आहे. लोक तुमचे मत ऐकतील न ऐकतील, पण त्यांना सोयीचे / आवडेल तसेच बोलतील/ लिहितील. म्हणूनच, अ) बोलीभाषा दर २०-३० किलोमीटरवर वेगळी असते. (याचा अर्थ ती नकाश्यांवर आखलेल्या रेषांच्या पुढेमागे एकदम बदलत नाही, तर एकीतून दुसरीत लोकांच्या गरजेनुरूप सहजपणे रूपांतरित होत जाते.) तसेच, ब) ती कोणत्याही एका स्थानावरही कालप्रवाहाबरोबर सतत बदलत जाणारी असते. क) एवढेच काय तर एकाच स्थानावर (उदा गाव, शहर, भौगोलिक विभाग, इ) आणि एकाच काळी वेगवेगळ्या लोकसमूहातली बोलीभाषा वेगळी असणे सामान्य आहे. हे जाती-धर्माच्या विविधतेने भरलेल्या भारतात प्रकर्षाने दिसत असले तरी तितकीशी विविधता नसलेल्या इतर ठिकाणीही फार अभावाने आहे असे नाही. २. प्रमाण भाषा ही एखाद्या भाषेसाठी नेमलेल्या सांविधिक संस्थेने सद्य काळाकरिता नक्की केलेले नियम वापरून लिहिली-बोललेली स्थिर भाषा असते. याची काही प्रमाणात सॉफ्टवेअर प्रणालीच्या व्हर्शनशी तुलना होऊ शकते. आज जाहीर केलेले व्हर्शन त्यापुढचे व्हर्शन जाहीर होईपर्यंत स्थिर असते. याचा अर्थ भाषेची बदलण्याची प्रक्रिया थांबली असे नाही... ती सतत चालूच राहते. काही काळाने, बहुसंख्य लोकांनी बदललेल्या लिहिण्याच्या-बोलण्याच्या सवयींप्रमाणे झालेले बदल जेव्हा लक्षणीय प्रमाणात होतात तेव्हा प्रमाणित भाषेचे नवीनं व्हर्शन बनविणे भाग पडते. हे मराठीसकट सर्व वापरात असलेल्या भाषांच्या बाबतीत घडले आहे, घडत राहील. उदा. मराठीतले बदललेले र्‍हस्व-दीर्घ आणि अनुस्वारांचे नियम. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या गेल्या काही दशकांतील आवृत्त्या नजरेखालून घातल्या तरी इंग्लिश मध्ये झालेल्या अनेक बदलांचा पुरेसा पुरावा मिळेल. ३. भाषेचा वापर कशासाठी भाषा वापरली जाते यावर कोणती बोलीभाषा / प्रमाणित भाषा वापरायची आणि त्यांचे कोणते (प्रमाणित / अप्रमाणित) व्हर्शन वापरायचे हे बहुतेक वेळा नैसर्गिकपणे ठरते... आणि तेच योग्य आहे. उदा: कट्ट्यात मित्रांबरोबर गंमत म्हणून अप्रमाणित गावरान मराठी वापरणारा माणूस वरिष्ठ अधिकार्‍याबरोबर मराठी बोलताना प्रमाणित मराठी बोलला नाही तर आश्चर्य वाटेल नाही का? साधारणपणे भाषेच्या वापराचे खालील प्रमाणे दंडक आहेत / असावेतः अ) शासकीय / औपचारिक लेखन / बोलणे : प्रमाणित भाषा. ब) खाजगी / अनौपचारिक लेखन / बोलणे : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक ती बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. क) साहित्य : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक तसे बदल करत बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. उदा. जुन्या संस्कृत नाटकांत सामान्य पात्रांच्या तोंडी (संस्कृत नाही तर) प्राकृत भाषा आहे... तसे नसते तर ते हास्यास्पद वाटले असते. कारण जगात कोणत्याही काळी कोणत्याही प्रदेशात १००% लोक प्रमाणित भाषा वापरत नव्हते / नाहीत / नसतील. तसेच ग्रामीण कादंबरीतल्या अशिक्षित पात्रांच्या तोंडी संस्कृतप्रचुर / प्रमाणित भाषा अवास्तविकच वाटेल. ३. परकीय भाषेचा हल्ला परकीय भाषेचा आपल्या भाषेवर हल्ला ही बहुदा "कोल्हा आला रे सारखी" आवई असते. मात्र या आवईमुळे काहीही फरक पडत नाही... तिचे महत्त्व फुसका समस्तरिय दबाव (इनइफेक्टीव्ह पियर प्रेशर) पेक्षा फार जास्त नाही. अ) आज इंग्लिश जगभरात ताकदवान भाषा म्हणून प्रचारात आहे ती तिचे उत्तम विपणन केल्यामुळे नाही किंवा तिच्या संरक्षणासाठी भाषामार्तंडांची फौज असल्यामुळे नाही तर तिच्या योग्य वापरामुळे होणार्‍या निर्विवादी आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांमुळे आहे. जर उद्या मराठीच्या बाबतीत असेच झाले तर मराठीच्या प्रचारासाठी दुसरे काही विशेष करणे जरूरीचे नसेल. ब) परक्या भाषेतले शब्द / शब्दरचना आपल्या भाषेने अंगीकृत करण्यात सारासारविवेकबुद्धी वापरणे नक्कीच आवश्यक आहे, पण हा मुद्दाही इतर काहीपेक्षा भावनिकच जास्त आहे. भाषा-भाषा प्रक्रिया सर्व भाषांत सर्वकाळ होत आलेली आहे व आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांच्या वस्तुस्थितीवर आधारितच ती सर्वस्वी अवलंबून आहे. दुसर्‍या भाषेमुळे आपली भाषा मलिन होईल हा दावाही तसा फोल आहे. कारण भाषा ही ती भाषा वापरणार्‍या लोकांची मालमत्ता आणि ती कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचाच आहे. एखाद्या अनिष्ट गोष्टीची काही काळासाठी "हवा" तयार होऊ शकते. पण सर्वसाधारणपणे, ना लोक त्यांना अयोग्य वाटणारे बदल स्वीकारतील, ना कोणी त्यांच्यावर ते लादू शकेल... लोकांना आवडतील / फायद्याचे असतील तेच बदल जीव धरतील / फोफावतील / शिल्लक राहतील. क) आजच्या जगतील कोणतीच भाषा स्वयंभू असल्याचा दावा करू शकणार नाही. जिला अनभिषिक्त जागतिक भाषा असे समजले जाते, त्या इंग्लिश भाषेत ८०% पेक्षा जास्त शब्द परकीय भाषांतून आलेले आहेत आणि त्यामुळे तिला "उधार-उसनवार भाषा (borrowed language) असे म्हटले जाते. cola (कोला) हा सर्वव्यापी आणि सर्वमान्य शब्द इंग्लिशने पश्चिम आफ्रिकेतील Temne (kola) आणि Mandinka (kolo) या भाषांतून उचलेला आहे. आश्चर्यचकित व्हायचे असेल तर, पुढचा दुवा नुसता वरवर चाळून पहा : इंग्लिशमध्ये उसने घेतलेले शब्द आणि त्यांचा मूळ भाषा इथे सापडतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लैवेळा सहमत. अतिविस्तृत प्रतिसादासाठी खूप धन्यवाद! इंग्लिशसारखे अनेक शब्द मराठी पचवत गेली तर काय बिशाद आहे मराठी मरेल असे म्हणायची? फक्त तो जोर तूर्तास मराठीभाषकांत नाही, इतकेच. तो आला की फरक पडेलच!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसाद अतिशय आवडला. विशेषतः 'परकी भाषेचा हल्ला' विषयीचा परिच्छेद. भाषेची ताकद त्या त्या भाषकांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय ताकदीवर अवलंबून असते याच्याशी जोरदार सहमति. समृद्ध समाजाची भाषाही समृद्धच असते. कारण समृद्ध समाजात दैनंदिन व्यवहार अनेक परींनी होतात. एक साच्याचे नसतात. (म्हणजे एक पिढी कारकुनी तर कारकुनीच करते असे नसते.) वेगवेगळ्या क्षेत्रांत उलाढाल वाढली की ती व्यक्त करणारे शब्दही वाढतात. आणि ह्या उलाढाली जर अभिजनसंमत असल्या (म्हणजे अभिजन वर्गात ह्या उलाढाली/व्यवसाय लोकप्रिय झाले) तर ते शब्दही अभिजनांच्या भाषेत/प्रमाण भाषेत शिरतात. पुन्हा एकदा, प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या.