Skip to main content

पुत्र व्हावा ऐसा गुंडा...

लेखक पिलीयन रायडर यांनी बुधवार, 28/08/2013 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा... ह्याचा कवीला जो काही अर्थ अपेक्षित असेल तो असेल.. पण आमच्या लेकरानी शब्दशः घ्यायचा ठरवला आहे. आणि तो बहुदा "गुंडा" सिनेमाच्या हिरो सारखा "गुंडा" हा असावा.. असो.. तर..आमचे सुपुत्र झोपेतुन उठतात तेच मुळी बटन दाबुन मशिन चालु केल्या सारखे.. एकदम धो धो एनर्जी कोसळायला सुरवात होते. तिथुन पुढे दिवसभर ती तशीच कोसळणार असते. दम दिल्या सारखा हाका मारत सुटतो..चावतो..उड्या मारतो..बोचकारतो..लाथा मारतो आणि वर "हा हा" करुन हसतो.. जोवर त्याला बाहेर नेत नाही तोवर हे सगळं चालु असतं..बर गप गुमान नेईल तिकडं जावं तर तसं नाही..पायानी आम्च्या पोटाला लाथा मारुन (घोड्याला कसं पायानी वळवतात्..तस्सचं..), हातानी दिशा दाखवत... "इक्कं..तिक्कं..ऊंम्म... नाईईई.." असं बोंबलत हवं तिकडे नेतो.. खाली सोडलाच तर तरा तरा रांगत जाऊन भांडी खाली पाड.. टिव्ही ओढ्..कचरा खा.. झाडु चोख..खिडक्याशी गाडी गाडी करुन बोटं अडकवुन घे..असले उपद्व्याप चालु होतात. त्याच्या सोबत नक्की खेळावं काय हेच आम्हाला कित्येकदा समजत नाही.त्याच्या खेळण्यां सोबत आम्हीच अर्थहीन खेळ सुरु करतो म्हणजे तो समोर बसुन शांत पणे काही तरी करेल.. पण तो ढुंकुनही पहात नाही. दिवसभर आम्ही सोबत नसतो. आजी एकटी कंटाळुन जाते.म्हणुन मग टीव्ही.. तर आता त्याला सगळ्या मालिकांचे टायटल साँग्स आवडयला लागलेत. होम मिनिस्टर तर ऊड्या मारुन पहातो (कारण त्यात बर्‍याचदा टाळ्या वाजवतात, बॉल चे खेळ असतात..) पण ह्या वेळ घालवण्याला काही अर्थ नाही. तो अजुन चालत (आणि मुद्द्याचं) बोलत नसल्याने इतक्यात त्याला पाळणाघर / प्ले ग्रुप मध्ये टाकु नये असं मत आहे. पोरगं रोज नवीन काही तरी शिकतय.. अक्कल "एक्स्पोनेन्शीयली" वाढत चालली आहे. तेवढ्याच स्पीडनी आमची बुद्धी तोकडी पडत चालली आहे. त्याला खेळायला द्यावं तरी काय? त्याच्या सोबत "काऊ काऊ ये.." च्या शिवाय अजुन काय खेळावं? "केस कुठयत केस? कान कुठय कान" च्या पुढे काय शिकवावं? त्याच्या learning मध्ये भर पडेल असं काय करावं?

वाचने 99978
प्रतिक्रिया 145

प्रतिक्रिया

In reply to by arunjoshi123

___/\___ जमिनीवर पालथं पडुन साष्टांग दंडवत!! प्रिंट आउट काढली आहे.. !!! उगं टेन्शन घ्यायची मुळात गरजच नाहीये.. पोरगं बरोब्बर नीट वाढणार आहे.. आपल्याच फुकाचं डोकं लावायची दिव्य हौस आहे ती कंट्रोल मध्ये ठेवावी लागणारे!!!

खरं आहे गं. माझे पण दोन मुलगे आहेत, पण ते अगदी लहान असताना पण मी नोकरी केली, प्रमोशन्स घेतली . घरी आजी-आजोबा होते आणि ते त्यांच्या परीने बघत पण होते. ही टेंपररि फेज आहे हे लक्षात घे. शक्य नसेल तर नोकरी सोडु नकोस. रुखरुख वाटते , पण इलाज नाही . घरी आई असणं, आजी-आजी-आजोबा नी बघणं , पाळणाघरात ठेवणं सगळ्याचे फायदे-तोटे आहेत. नोकरी सोडली नाहीस तर पुढे शाळेत पण जाणवत रहातं की घरी असलेल्या आया मुला.चे प्रोजेक्ट्स , डान्स यात जास्त पुढे असतात, आपण तितका वेळ नाही देवू शकत, त्याची तयारी ठेव मनाची . अर्थात, त्याने काही फार फरक पडत नाही, मुलं आपोआप शिकत जातात थोडं मोठं झाल्यावर. काही गोष्टी मात्र मी आवर्जून करत असे- १. घरी आल्यावर फ्रेश होवून किमान एक तास तरी मुलां सोबत फक्त बोलायचं. आजी-आजोबांच्या (क्षु ल्ल क असल्या तरी) तक्रारी ऐकायच्या. २. सुट्टी असेल तेव्हा दोघांनी मुलांना घेवून बाहेर जायचं-बाग,झू ,तलावपाळी. ३. वेळ ची भरपाई भारं-भार खेळणी आणुन करायची नाही, त्याचा काही उपयोग नसतो, उलट मुलं लवकर हा दोष ओळखतात आणि त्याचा बरोब्बर फायदा घेतात थोडं मोठं झाल्यावर. ४. स्वत:ची एनर्जी लेव्हल थोडी वाढवायची जेणे करून ऑफिस, प्रवास याचा आपला ताण मुलांना जाणवणार नाही . शक्य असल्यास एखादी मुलगी ठेव दिवसभर घरी , म्हण्जे मूल घरात पण राहील, आजी-आजोबा पण कमी दमतील कारण ती मुलगी त्याच्या बरोबरीने खेळू शकेल.

३१. स्वप्ने - आजकालची मुले टीव्ही फार पाहतात. त्यात खूप दुष्ट लोक खूप दुष्टपणे वागतात. छोटा भीम, इ मालिकांतला खलनायक आपल्याला तकलादू वाटला तरी मुलांना तो 'भिकारी' वैगेरे विषयांवर लिहिणारा कोण तो कादंबरीकार, त्याच्या पुस्तकातल्या विकृत लोकांइतकाच खल वाटतो. म्हणून मुलांना खूप जास्त संख्येने आणि खूप घाबरवणारी स्वप्ने पडतात. म्हणून ती सामान्य माणसापेक्षा झोपेतून जास्तवेळ , जास्तदा उठतात, सूसू करतात. पण सकाळी स्वप्न विसरतात आणि आपल्याला सांगू शकत नाहीत. सबब मुलांना आई बाबांनी त्या खलनायकाला कसे ठोकले आहे, त्याला पालक मुलाला कसे स्पर्शही करू देत नाहीत, स्वप्नात त्याचा पाठलाग कसे करू देत नाहीत, त्याला कसे टाइट बांधून टाकतात असे सांगत राहावे. असा व्हिलेन आला आणि बाळाने नुसते 'आई' म्हणून बोलावले तर ती कशी व्हिलेनला एका फटकार्‍यात ढिशूं करून लोळवते याच्या साग्रसंगीत कहाण्या सांगाव्यात. शेवटी मुलाला त्या पटून तो बिनधास्त झोपू लागतो. ३२. श्रद्धास्थान - मुलांचा नेहमी कोणी ना कोणी एक हिरो असतो. त्याने ते फार भारी प्रभावित झालेले असतात. उदा. छोटा भीम, मोगली, बेंटेन, नोबिता, हल्क, इ इ. पालकांनी स्वतः हिरो बनण्याचा प्रयत्न करू नये, ज्या लोकांच्या चूकांचा टेप २४ तास मूलासमोर चालू असतो ते लोक हिरो बनू शकत नाहीत. सध्याला माझ्या ६ वर्षाच्या मुलाचा हिरो 'द ग्रीन हल्क' आहे. त्या हल्कच्या नावावर, आणि त्याच्या मायबापांच्या आमच्या झालेल्या माहितीच्या तथाकथित आदानप्रदानाच्या नावावर मी मुलाला सगळी एरवी त्याची नावडती हिरवी फळे, हिरव्या भाज्या, मसल येण्यासाठी पुशअप्स खपवले आहेत. सबब मुलाचे असे एखादे श्रद्धास्थान बनवावे आणि त्याच्या कल्याणाच्या चार गोष्टी त्याच्या गळ्यात मारायच्या असतील तर त्याला नेहमी नेहमी असा 'निष्पक्ष' संदर्भ द्यावा. या धाग्यावर कव्हर झालेली मुले थोडी लहान आहेत, पण ती लवकरच मोठी होणार आहेत आणि त्यांना १-२ वर्षापासून हे सूत्र लागू पडते. ३३. सुप्तप्रेम - ऑफिसमधे दिवसभर मुलाची चिंता केल्याने मुलाला काही मिळत नाही. मुलांना असे 'अंतःकरणातले प्रेम' कळत नाही आणि नको असते. त्यापेक्षा त्यांना डायरेक्ट प्रेम आवडते. म्हणजे बाबा त्याला सोडून रोज ऑफिसात 'त्याच्या भविष्यासाठी गेले' तर ते त्याच्यामते काही कामाचे नसते. म्हणून सहसा आतड्याला पिळ पाडून प्रेम करणे टाळावे. याउलट ऑफिसातून एखादा फोन टाकून साहेब काय करत आहेत ते जाणावे. उदा. ते नॅशनल जिओवर डायनासोर पाहात आहेत. मग इंटरनेटवरून डायनोसोरचा एक मस्त कलर प्रिंट काढावा व घरी गेल्यानंतर हा 'हे दुर्मिळ चित्र दिवसभर झटून तुझ्यासाठी आणले आहे' असे सांगावे. मग बाबांच्या विरहाचे दु:ख कमी होते आणि आपण त्यांना कामाला जुंपले आहे अशी एक आत्मसन्मानात्मक भावना उभी राहते. सबब सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये आणि ते मुलाला कळावे अशी अपेक्षा तर मुळीच ठेउ नये. अगदी ठळक, ठसठशीत दिसणारे, कृत्यात्मक प्रेम करावे. ३४. लॉजिक - मुले विचित्र विधाने करतात आणि वैचित्र्यपूर्ण प्रश्न विचारतात. त्यांच्या विचारतलं लॉजिक बर्‍याचदा भयंकरच गंडलेलं असतं. उदा. 'हाथी सबसे बडा अ‍ॅनिमल क्यूं होता है?', 'मुझे चिप्स कि भूख क्यूं लगती हैं?'. हा प्रश्न निरर्थक आहे असे सांगू नये. प्रश्न निरर्थक नसतो, तो समजावून घेण्याची समोरच्याची पात्रता सिमित असते. 'प्रत्येक प्राण्याचा आकार वेगळा, त्यांना एका लाईनने मांडले तेव्हा हत्ती सर्वात मोठा निघाला.', 'त्याला खायला प्यायला खूप मिळते म्हणून...', 'तो लहानपणी लहान होता, आता नीट वाढला म्हणून ..' 'व्हेल त्याच्यापेक्षा मोठा असतो', 'जिराफ उंचीने मोठा असतो, हत्ती वजनाने...', 'देवाने प्रत्येकाला एक काम नि त्यानुरुप शरीर दिले आहे' असे कोणतेही उत्तर द्यावे. अगदी वि़ज्ञानाची त्यांच्यामानाने किचकट तत्त्वे सांगीतली मुले गुपचूप ऐकतात (आपणही तसेच करतो म्हणा!). एक दोन तीन चार या क्रमाचे किंवा हजार, लक्ष, कोटी या क्रमाचे भय आणि आदर आणि सहजता त्यांचे ठायी समान असते. सबब मुलांना कळणार नाही म्हणून प्रश्न मोडीत काढू नये, सारवासारवीचे उत्तर देऊ नये. शिवाय मुले खतरनाक असतात. प्रश्न विचारतात आणि उत्तर ऐकतच नाहीत. 'प्रश्न पडणे'च काही मुलांना उत्तरासमान वाटते. तेव्हा उत्तर देताना 'हो ना रे सोन्या?', 'खरे ना बाळा?' असे प्रत्येक वाक्यागणिक विचारावे.

In reply to by arunjoshi123

सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये आणि ते मुलाला कळावे अशी अपेक्षा तर मुळीच ठेउ नये. अगदी ठळक, ठसठशीत दिसणारे, कृत्यात्मक प्रेम करावे.
लहान मुलच काय, मोठ्यांच्या बाबतीतपण हे लागु पडेल.. सतत "समजुन घ्या माझ्या भावना" ह्या मोड वर रहाण्यापेक्षा क्रुतीतुन व्यक्त कराव्या भावना.. बाकी प्रतिसादा साठी- पुन्हा दंडवत..

In reply to by पिलीयन रायडर

माझ्या एक सामान्य पिता म्हणून केलेल्या निरीक्षणांतही बर्‍याच चूका आहेत. जे अस्सल (म्हणजे विदाऊट कंफ्यूजन), नैसर्गिक (पणे वागणारे) आणि फूलटाइम पालक आहेत त्यांची ताण न येऊ देता (कितीतरी) मुले मोठी करायची हातोटी जगावेगळी आहे. सबब अशा दंडवतांस मी पात्र नाही.

वरील प्रतिसाद वाचले नाहीत. ते नंतर वाचीन. एकदम माझ्या मुलाचे बालपण आठवल्याने मनात विचारांची गर्दी झालीये. आमचंही पोरगं अस्स्स्स्स्सच असल्याने लाकडी ब्लॉक्स, लाकडी इतर खेळणी आणाली होती. त्याचा उपयोग खेळण्यापेक्षा फेकण्यासाठी आधी जास्त झाला. घरातल्या सगळ्या फर्निचरवर अगदी दारे खिडक्या, पॉटी असे सगळीकडे स्टिकर्स लावण्यात बराच वेळ खर्ची पडू शकतो. "हां, आज आपण लिव्हिंगरूममध्ये स्टिकर्स लावू" म्हणून सोडून द्यायचे. ते काम होईपर्यंत आपली भाजी चिरून फोडणीला पडते. मग कणकेचा गोळा व एक्ट्रा लाटणे देऊन "हां आता पोळी लाटा" ती पोळी काळी असली तरी भाजून दाखवायची व टाकून द्यायची. ;) माझ्या सासूबाईंनी एका संपूर्ण भिंतभर पांढरा कागद (त्यावेळच्या त्याच्या उंचीप्रमाणे)लावून दिला होता. तिथे क्रेयॉन्स घेऊन चित्रकला (?)चालायची. मग सगळ्या हॉटव्हिल्सच्या कार्स (जवळजवळ १०० होत्या) त्या एका खुर्ची खाली एका ओळीत लावा. तोपर्यंत कुकर लावणे, कोशिंबिरीची तयारी होते. मोठाली फनेल्स आणाली होती. ज्या डब्यात धान्य भरायचे असेल त्यात फनेल ठेवून छोट्या वाटीने पुड्यातून सोडवून दुसर्‍या पातेल्यात ठेवलेले धान्य भरायला सांगायचे (२ वर्षाच्या आसपास असताना). ते घरभर भिरकावले जाणार. आपण वेळेवर उचलून ठेवणे आलेच. कढी खिचडी केल्यास "मलाही तुमच्यासारखीच हाताने खायची आहे." मग सगळीकडे सारवणार. (मुले असे करतातच असे वाचल्याने तो राडा नंतर आवरायचा). डिशवॉशर मधून काचेचे बाऊल्स काढून एकदा फेकून दिले. मी तिथे जाईपर्यंत तीनेक फोडून झाले होते. दणकट पॅकिंगमध्ये मिळणारे सामान आणून तसेच ठेवावे. ते उलटे पाल्टे करून बघण्यात अर्धा तास जातो व आपली कामे पुढे सरकतात. आपल्या मुलाची गार्‍हाणी आईवडीलांना सांगू नयेत. कौतुक म्हणून सांगितल्यास चालतील पण "मग आम्ही कसे पार पाडले असेल?" असा कुत्सित प्रतिसाद मिळण्याची शक्यता जास्त! "तुम्हाला एका मुलाचे करायला जमत नाही आणि आम्ही तीन मुले, सासूसासरे, दिर असे सगळे करायचो. तुम्हाला ना काही जमत नाही. सारखे रडायला सांगा" वगैरे ऐकून तुम्ही अपुरी झोप, हापिसमधील काम, उशिराने चालू केले शिक्षण यात मेलेले असाल. मग "मी विचारतीये काय अन तू सांगतीयेस का?" असा रागाने सवाल गेला तर फोनवर पलिकडे डोळ्यांना पदर लावलेला असतो. आमच्याशी बोलायची ही पद्धत नव्हे वगैरे ऐकून घ्यावे लागते. मागल्या अठवड्यातही मी ग्रोसरी दुकानात असताना तिथे फोन करून "काय आहे का वेळ?" असे प्रेमाने विचारले. "मी ग्रोसरी करतीये, नंतर घरे गेल्यावर फोन करते" झाऽऽऽले! "जन्मदात्यांशी बोलालयला तुम्हाला वेळ नाही का?" यावर आहे ना आहे ना, बोला. असे सगळे आपण शिकत जातो. ;) मुलांचे "हे काय आहे? ते काय आहे?" अश्या प्रश्नांना उत्तरे न देऊन सुटका नाही. आमचे मूल मोठे झाल्याने परवाच "रेप म्हणाजे काय?" हा प्रश्न आला व बर्‍या भाषेत खरे उत्तर द्यावे लागले. त्यापेक्षा काऊ चिऊ बरे असतात.

In reply to by रेवती

छे हो, उलट स्तुतीच केली आहे. चपखल गोष्टी सोदाहरण सांगितल्या म्हणून. गैरसमज नसावा. (स्वगतः आम्हाला काव्यात गती नाही हेच खरे :( )

In reply to by रेवती

वा रेवतीताई.. काय प्रतिसाद आहे!!! मी पण सध्या भांड्यांच्या रॅक समोर बसुन "काय वाट्टेल ते करु देणे" हे सुत्र अवलंबिले आहे.. त्यात त्याचा जो वेळ जातो तेवढ्यात चार कामं होऊन जातात.. मागच्या पिढीच्या रिअअ‍ॅक्शन बद्दल सहमत. अपण वैतागलेले असतो..त्यात ह्यांना ५० प्रश्न आनि १६७२९२९ उपदेश करायचे असतात.. कधी आपला आवाज चढला की लगेच पलीकडले आवाज उतरतात.. आणि अगदी पडेल आवाजात "बरय्..ठिके..हम्म्म..." एवढ्यावर बोलणे येते..म्हणुन मी आजकाल "एक्स्ट्रॉ केअर" घेउन जस्तीत जास्त मधाळ आवाजात बोलते.. म्हणजे पुन्हा मानापमान नको.. पाळणाघरात ठेवायचा विचार पक्का होत आहे. लवकरच जाईल तो. आणि त्याला ते आवडेल अशी मला खात्री वाटतेय.

आता प्रतिसाद वाचत आहे. पाळाणाघरात सोडण्याबाबत ऋषिकेशशी फारच सहमत आहे.मुलगा २ वर्षांचा झाल्यावर अठवड्यातून दोन अर्धे दिवस अशी सुरुवात केली. त्याला ते भयंकरच आवडले. मग पुढील वर्षी पाच दिवस रोजचे ४ तास जाऊ लागला (पाच वर्षांनंतर आवडेनासे झाल्यावर पुन्हा २ दिव्सच जात असे पण तोपर्यंत किंडरगार्टनही सुरु झालेले असते). साधारण २ वर्षांचे वय झाल्यावर त्यांना इतर मुलांमध्ये मिसळण्यास आवडू लागते. पाळाणाघरात सोडण्याबाबत काहीही वाटून घेऊ नकोस. फक्त ते त्याला आवडते ना बघ.

विंदा यांच्या काही कविता तुम्हाला या पुस्तकातून मिळतील , त्या मुलांबरोबर share करा. वाचा, वाहून दाखवा, वाचायला द्या , (वेळ,वय या प्रमाणे ) राणीची बाग एकदा काय झाले, सशाचे कान एटू लोकांचा देश, परी ग परी अजबखाना, सर्कसवाला पिशीमावशी आणि तिची भुतावळ अडम् तडम् टॉप सात एके सात बागुलबोवा इत्यादी इत्यादी

बरेच दिवस फक्त प्रतिसाद वाचतेय... मी एक बघितलय की प्रत्येक मुलाची एनर्जी लेव्हल वेगळी असते आणि आवड/मागणीसुद्धा. त्यामुळे खरं तर प्रत्येक मूल नवीन आव्हान घेउन उभे राहिलय असं वाटतं.. माझी भाची अशीच 'गुंड' होती. तिला गोष्ट सान्गायला लागलं तरी एका जागी बसून ऐकायची नाही , भोवती नाचायची आणि मला मध्ये खांबासारखं उभं करुन गोल गोल फिरायची. मोकळे सोडले तर माकडासारखी झोपाळ्याच्या कड्यांना लटकून छतापर्यंत पोचायची. एकदा मला तिला कडेवर घेउन, उभे राहून लागोपाठ २९ वेळा राष्ट्रगीत म्हणावं लागलं होतं... तिला झोपवायला! ती भिन्तीवर अडकवलेल्या देवघराच्या बाजूला असलेल्या खुर्चीवरुन देवघराला लटकून 'गंपती कूक्क' करत कितीही वेळ खेळायची.. शेवटी देवघराची जागा बदलली आणि गणपतीबाप्पाचा मस्त टाईमपास घालवला. :) एक तास प्ले ग्रुपमध्ये पाठवलं तर मजेत गेली आणि पहिल्याच दिवशी तिथल्या बाईंसकट सगळ्यांच्या नकला घरी येउन करुन दाखवल्या. आणि हे सगळे दीड वर्षाची असताना..... तेन्व्हा लक्षात आले कि हिला एकाच वेळेस हाताला, पायाला आणि डोक्याला बिझी ठेवणारे खेळणं द्यायला हवय.. मग एक दिवस पेटी- हार्मोनियम काढून दिली. त्या वेळे तिला भाता मारायलादेखिल कुणाची लुड्बुड नको होती. एरवी घरभर वादळासारखी धावणारी मुलगी एका जागी एक तास स्वस्थ बसून हवे तसे स्वर वाजवत बसली होती. :) मग तिला आगगाडीचा भोन्गा, कूकरची शिट्टी, चिव-चिव, डिन्ग डॉन्ग बेल.. अश्या आवाजान्च्या जवळ जाणारे आवाज पेटीवर वाजवून दाखवले. मग स्वारी खुश!

In reply to by कवितानागेश

पेटी...अप्रतिम आयडिया..पुढे मागे वापरुन पहाता येईल.. एखादं वाद्य शिकवणे किंवा किमान नुसतं वाजवायला देणे हे खुप छान आहे.

In reply to by कवितानागेश

+१ वाद्य खेळायला देणे अतिशय चांगली कल्पना आहे. मुलीला मी खेळण्यातला डमरू, झांजा, छोटा ड्रम, जत्रेत मिळणारी बासरी आणि कचकड्याचा सेलवर चालणारा कॅसियो वगैरे आणून दिला आहे. (पैकी ड्रम फोडून झाला आहे) सध्या गेले चार दिवस कचकड्याच्या कॅसिओतील सेल संपल्याने तो वाजत नाहिये तर त्याची आठवण झाल्यावर त्याला फटके देऊन "बोल बोल!" असे त्याला 'वा! करणे' चालु असते. आणि वाजला नाही की "ऐकत नाही" असे म्हणते आणि दुसर्‍या खेळाकडे वळते :P

गुंडापुत्र ह्यांना नुकतेच पाळणाघरात पाठवणे सुरु झाले आहे.. आज दिवस दुसरा.. हे माझ्या कंपनीचेच पाळणाघर आहे. त्यामुळे आवारातच आहे. कधीही मुलगा रडला जास्त तर ते बोलवुन घेतात. पहिला दिवस म्हणुन १ तास त्याला तिथे ठेवणे ..आणि त्यापैकी ५ मिन तरी किमान त्याला सोडुन बाहेर जाऊन लपणे असा प्लान होता. पण झालं असं की पोरगं ५ व्या मिनिटाला इतर पोरांमध्ये जाऊन बसलं आणि मायबापाला विसरलं.. मग आम्ही निघुन गेलो.. जवळपास १ तासानी मी जाऊन डोकावुन आले तर निवांत पणे एक बॉल घेउन तो खेळत बसला होता.. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुलं चटकन कुठेही रुळतात.. रुळत नाहीत ते पालक.. इथे माझ्या ममतेच्या गंगा जमुना डोळ्यातुन वहात होत्या.. आणि तिकडे माझा मुलगा मस्त पणे जिंगल्स ऐकत बसला होता.. पुढे मग झोप आली की आई आठवली मग रडापडी सुरू झाली..तेवढं तरी होणारच होत.. पण १ तासासाठी गेलेला ४ तास तिथे राहुन आला... आजही मोजुन १.५ मिनिटाला तो पोरांमध्ये घुसला..मी गेले हे त्याला समजलं पण नाही.. तसा माझा मुलगा मस्तीखोर आहे. घरात तो खुप दंगा करतो. पण पाळणाघरात आल्यापासुन तो शांतपणे बघत बसला होता. कुणी त्याचं खेळणं घेतलं तरी तो फक्त बघत राहीला. एरवी पण दुसर्‍या मुलाने त्याला त्रास दिला तर तो उलट काहीच प्रतिकार करत नव्हता. आम्ही समोर असु तरच हे पोरगं शेर आहे.. नाही तर गप बसतं.. आता हा स्वभाव कसा बदलतो हे पाहण्या सारखे असेल.. मला वाटतं की तो थोडा तरी अ‍ॅग्रसिव्ह होईल.. असं सगळ्यांचच म्हणणं आहे की तो अजुन जास्त सोशल होईल.. एरवी तो त्याचे लाड करणार्‍या मोठ्यांकडे लग्गेच जायचा. पण त्याच्या वयाच्या मुलांसमोर बुजरा व्हायचा. बघु आता काय होतय ते.. तसाही तो तिथे ४ तासच असणारे.. तेवढीच त्याच्या आजीला विश्रांती...

In reply to by पिलीयन रायडर

अरे वा! अभिनंदन! :) आता आराम मिळाल्यावर त्याच्याच त्याच (तथाकथित) गुंडगिरीमुळे त्रास होत नसल्याने (उलट निरागतेची मजाच वाटत असल्याने) त्याच्या कारनाम्यांचे कोण कौतुक महिनाभरात सांगु लागाल बघा ;)

व्वा मस्त वाटलं ऐकून :) ... आणि तुम्ही जे म्हणालात "मुलं चटकन कुठेही रुळतात.. रुळत नाहीत ते पालक" ह्याला +१ माझाही मुलगा १.३ वर्षाचा आहे, तो ११ महिन्याचा होता तेव्हाच त्याला पाळणाघरात टाकणार होतो. का उगीच आज्जी आजोबांना त्रास द्यायचा ह्या एकमेव भावनेतून हा निर्णय घेतला होता. पण मुलाच्या आज्जीच्याच डोळ्यातून गंगा-जमूना वाहू लागल्या आमचा हा निर्णय ऐकल्यावर... आता त्यांची हौस म्हणून १.५-२ वर्षाचा होईपर्यंत घरीच ठेवणार आहोत मग पाळणाघर नक्की...पण त्यापूर्वी इथे पाळणाघराबद्दलचे 'अलमोस्ट' सगळ्यांचेच चांगले मतं वाचून छान वाटले :) माझ्या आईला पण देईन हे वाचायला आणि हो अर्थात तिला पाळणाघर पण दाखवायला नेणार आहे.. तेवढंच समाधान (तिच्या डोक्यात पाळणाघर म्हणजे अश्शी मोठ्ठी खोली त्यात पन्नास एक पाळणे, मुलं रडतायेत, पाळण्यातच शी-शू चालू आहे कोणाचं लक्ष नाही, तिथल्या आया मुलांना शांत बसवण्यासाठी मारताहेत ... हे असलं काहीतरी आहे ..अर्थात त्यांच्या काळी हे असले आधुनिक आणि महागडे पाळणाघरे कुठे होते म्हणा .. तिचा असा गैरसमज साहाजिकच आहे)

In reply to by उदय के'सागर

अहो तुमची आईच कशाला..मी १० वेळा ह्या पाळाणाघरात जाऊन सुद्धा अजुन माझं मन तयार होत नव्हतं. मी सुद्धा लहनपणी पाळणाघरात राहीले आहे. पाळणाघर नुसतं म्हणायला.. खालच्या काकुंकडेच आई सोडुन जायची, ते ही फक्त ४-५ तासांसाठी. पण ती माणसंच विचित्र होती. त्यांनी कायम आम्हाला आश्रिता सारखं वागवलं जेव्हा की त्यांना आम्हाला सांभाळण्याबद्दल पैसे मिळायचे. त्याचा माझ्या मनावर खुप परिणाम झाला. पाळणाघर म्हणजे जिथे खुप खुप उदास, परकं वाटतं अशी जागा असं माझं मत होतं.. पण..खुप विचार करुन माझं मत बदललं.. १. मी ज्या पाळणाघरात गेले ते लोक प्रोफेशनल तर नव्हतेच पण चांगली माणसं पण नव्हती. मी १ लीत अस्ल्याने मला आप्लं-परकं ह्या गोष्टी कळत होत्या. माझी ३ वर्षाची बहीणही माझ्या सोबत राहिली. पण तिच्या मनावर असे कोणतेच परिणाम झाले नाहीत. कारण मुळात तिला फारसं काही कळतच नव्हतं. लहान वयात पाळाणाघरात जाण्याचा हा फायदा असतो. पटकन अडजस्ट होतात मुलं. २. जिथे माझा मुलगा जातोय ते कंपनीचे पाळणाघर आहे. तिथे सकाळच्या दुध नाश्ट्या पासुन सगळे दिले जाते. त्यात मुलांचा विचार करुन मेनु आखलेला असतो. आणि तो वेळेवर दिला जातो. घरी सुद्धा जेवण छानचे असते पण आपण रोजचं रोज ठरवुन , विचार करुन बनवत नाही. इथे मुलं नीट जेवतात असा माझा अनुभव आहे. मी मुलाला सारखी जाऊन काचे आडुन बघुन येऊ शकते हा अजुन एक फायदा. दुपारी मी चक्कर मारली तर मुलांचे खेळ चालु होते. बेडुक उड्या, कागद फाडणे, पाणी उडवणे असले ही प्रकार करुन घेतात. बागेत नेतात. गाणी शिकवतात. हे सगळं घरी करुन घेण्या एवढे त्राण आपल्यात नसतात. तिथे २-३ शिक्षिका आहीत खास लहान मुलांचे. आई-बापात पण नसेल इतका अफाट पेशन्स त्या पोरींमध्ये आहे. अत्यंत प्रेमानी चालु असतं सगळं.. नोकरी करणार्‍या आई-बाबांना पाळणाघराशिवाय पर्याय नसतो. किती वर्ष आपण आपल्या आइ-वडिलांना बांधुन ठेवणार मुलांसाठी? त्यांनाही बाहेर जावं वाटतं, समवयस्क लोकांमध्ये गप्पा हाणाव्या वाटतात.. पण मुलांमुळे ते अडकतात. माझ्या ही सासुबाईनी डोळ्यातुन पाणी काढलं.. मी सुद्धा काल त्याला पाळणाघरात झोपवत होते तेव्हा मुसळधार रडुन घेतलं.. हतबलता वगैरे आली होती थोडा वेळ.. पण आज माझा मुलगा मस्त खेळतोय तिथे आणि आपण पालक त्यांची चिंता करत इथे चर्चा करतोय!! शेवटी घर ते घर.. त्याला पर्याय नसतो. पण मुलांनही कधीतरी हे कळतच की सगळं काही मिळत नाही आयुष्यात. घर कधीतरी सोडावं लागतच. माझ्या मुलाला ती जाणिव सव्वा वर्षाचा असताना झाली.. मला पहिलीत असताना झाली.. माझ्या नवर्‍याला १२वी नंतर घर सोडल्यावर झाली... प्रत्येकाची वेळ वेगळी असते.. पण ती येतेच.. आणि ती वेळ येते तेव्हा पिल्लु ओंजळीतुन आकाशात उडायला सोडल्या सारखी साजरी करावी.. त्याचं धडपडणं हे पक्षानी पहिल्यांना पंख फडफडवुन आकाशात भरारी मारण्याचा प्रयत्न आहे असं समजावं.. उगाच अशा प्रसंगान आपण करुणेची झालर लावतो.. आपल्या पिल्लाकडे "बिचारं बिचारं" म्हणुन पाहिलं की आपण,पिल्लु.. परिस्थिती सगळंच बिचारं बिचारं होतं..

आता मुलगा पाळणाघरात रुळला आहे.. काही निरीक्षणे १. १५-२० दिवस त्रास झाला. पण शेवटी मग घट्ट करुन त्याला ५-६ तास ठेवायला सुरवात केली. ह्या मध्ये दिवाळीत बाहेर फिरायला गेलो होतो, तेव्हा तो माझ्या भावाच्या मुला सोबात खुप खेळला. कदाचित तेव्हा त्याला इतर लहान मुलांशी खेळायची मजा कळाली. त्या नंतर जेव्हा परत पाळणाघरात ठेवले तेव्हा तो फार चटकन रुळला. २. १ आठवडा तो नुसता झोपुन रहायचा. नाही तर रडत रहायचा.. पण १ महिन्या मध्ये तो आता इतर मुलांसोबत खेळायला लागलाय. बोलणं लक्षणीयरित्या वाढलय. आता वाक्य बोलतो. "पुली दे" "मला मोबाईल दे" वगैरे.. ३. जाताना रोज रडतो, पण एकदा का पाळणाघरात गेला की खेळतो.. मग त्रास देत नाही. ४. कसं ते कळालं नाही पण त्याची चिडचिड पण कमी झाली आहे. आता तो चावत / मारत नाही. मी इथल्या चर्चे नंतर थोदं ओरडुन / धपाटे घालुन पाहिलं.. आता मी त्याला मारत नाही. तो तसा मला अजिबात घाबरत नाही, पण त्याच्या वडिलांना घाबरतो. त्यांनी आवाज चढवला की ऐकतो, त्यामुळे मारायची वेळ येत नाही. त्याला १-२ दा मारल्यावर मला असं वाटलं की ह्याला अजुनही मुद्दा कळत नाहीये. मग मी खुप पेशन्सनी त्याला समजावुन सांगायला लागले. आता पण आधी त्याच्याशी बोलतो. असं करु नये वगरे सांगतो.. ५. त्याला रात्रि झोपेतुन रडत उठाय्ची सवय होती. ती कमी झाली असली तरी अजुनही मध्येच रडु शकतो. त्याचं काही लॉजिक नाहीये. कदाचित जेव्हा तो खुप पळापळी करतो तेव्हा पाय दुखत असतील.. किंवा मध्ये सर्दी झाली होती तेव्हा श्वास घेताना त्रास होत असेल.. आजकाल तरी रात्री शांतता असते.. ६. खेळ - मोबाईल त्याला आवडतो, थोडा वेळ खेळायला दिला तर तो २ गोष्टी प्रामुख्याने पहातो. १. स्वतःचे जुने व्हीडिओ. ते त्याला खुप आवडतात. त्यात तो माणसं ओळखत बसतो. २. एक अ‍ॅप आहे, त्यात वेग्वेगळे प्राणी , त्यांचे आवाज (बॅकग्राउंडला फार मस्त म्युझिक आहे) वगैरे आहे. त्यात तो प्राणी पाहुन तसे आवाज काढतो. प्राणी ओळखतो. शिवाय स्लाईड केल्यावर पुढचा प्राणी दिसतो हे ही कळालय. प्राण्याच्या तोंडाला टच केलं की तो प्राणी तोंड उघडुन जोरात ओरडतो हे ही कळालय.. त्याला रोज झाडांना पाणी घालायला नेतो. तेव्हा बाहेर जे काही निवडक पक्षी दिसतात ते तो पहातो.. क्रिकेट त्याला खुप आवडतं, म्हणुन त्याचे बाबा-काका-आजोबा त्याला काही ना काही शिकवतात.. आजी शुभं करोती शिकवते.. मी १-२ ओळींच्या गाण्यावर हातवारे शिकवतेय.. भाज्या ओळखायला शिकवतोय. पाळणाघर हे प्ले स्कुल टाईप असल्याने तिथे चित्र वगैरे काढायला शिकवत आहेत. त्याला बाहेर फारसं नेणं होत नाही. पण वेळ काढुन ते ही करायचे आहे (जसे की मंदिर, बाजार वगैरे) एकंदरित बाहेर पडल्यानी जरा धीट झाला आहे. आता तो पटकन कुणाकडेही जातो. घाबरत नाही. आधी बेल वाजली तरी रडायचा. आता मस्त पैकी काका - मावशी असं नातं जोडुन कडेवर जातो. ह्यात एक मुद्दा महत्वाचा असा की त्याच्या कार्डिओलॉजिस्ट च्या मते (त्याची १५ व्या दिवशी ओपन हार्ट सर्जरी झाली आहे. पण आता तो उत्तम आहे.) त्याच्यात आयर्न आणि व्हिट. डी कमी पडल्याने तो चिडचिडा झाला होता आणि पटकन सर्दी वगैरे होत होती. (आता तो तेव्हा पहिल्यांदाच अंघोळ केल्यावर लगेच गाडीवर पाळणाघरात जायला लागला होता, त्यानेही वारं लागुन सर्दी होऊ शकते असं मला वाटायचं. मुळात सिझनल सर्दी कोणती आणि त्या पेक्षा सिरीयस सर्दि कोनती हे मला अजुनही नीट कळत नाही.) उपाय म्हणुन गोळ्या / सप्लिमेंट देणं त्या बाईला मान्य नाही. तिच्या मते खाणं चांगलं हवं. म्हणुन रोज अंड + शक्य तेव्हा पाया सुप + रोज उन्हात १५-२० मिनिटे नेणे + रोज २ भाज्या + १ फळ + दुध बंद (त्याने लोह शोषायला प्रॉब्लेम होतो असं तिचं मत - मी दुध कमी केलं पण बंद नाही) हे आवश्यक आहे. मी पाया सुप दिलं नाही (मी नॉनव्हेज बाबतीत साशंक आहे.. आम्ही खात नाही. त्यानी खावं पण त्याच्या साठि करुन द्यायची माझी हिंमत होत नाहीये..) पण मी अंड + उन्हात नेणे आणि बा़कीच्या गोष्टी नीट पाळल्या. खज्र + ड्राय फ्रुट्स नेमाने सुरु केले. त्याच्या रक्त तपासणी मध्येही विट. डी वाढल्याचे दिसले. आणि खरच चिडचिड कमी झाली आहे. एक आता ते पाया सुप च जमवायचं बघतेय.. अगदीच कुणी नाही मिळालं तर मग किळस बाजुला ठेवुन स्वतः करीन. पण एकंदरीत खाण्यातुन मुलां वर फार फरक पडतो असे माझेही मत झाले आहे. समांतर :- ऐसी वरील ही चर्चा - http://aisiakshare.com/node/2368 आणि विशेष करुन ऋषिकेश चा प्रतिसाद वाचनीय आहेत..

In reply to by पिलीयन रायडर

अभिनंदन! :) इथे नुसतीच चर्चा न करता, त्यातून काही उपाय निवडून केलेल्या उपायांचा परिणामही आवर्जून दिलात याचेही कौतूक वाटले.

परवा मिपावरच कुठेतरी ही लिंक सापडली. आज जरा निवांत चाळुन पाहिली तर खजिनाच हाती लागलाय. बहुदा ह्या विषयी मिपावर चर्चा झाली असावी. अरविंद गुप्तांची खेळणी इथे काय नाहीये…!! पुस्तकांचा अक्षरश: खजिना आहे. वेगवेगळी खेळणी कशी बनवावी ह्याची प्रात्यक्षिके आहेत. तब्बल वीस भाषांमध्ये फिल्म्स आहेत. ह्यातल्या बऱ्याच गोष्टी अजून माझ्या २ वर्षाच्या मुलाला इतक्यात झेपणार नाहीत… पण पुढे जाऊन ही साईट अत्यंत उपयोगी ठरणार हे नक्की. सध्या ह्या साईट वरची पुस्तकं डाउनलोड करून वाचून दाखवता येतील. नक्की हा माणूस कोण आहे म्हणून गुगलल्यावर ही माहिती सापडली :- अरविंद गुप्ता या शिवाय मायबोली वरही हा एक धागा आजच वाचनात आला. पुनश्च उद्योग .... उन्हाळ्याच्या सुट्टीत १० वर्षाचे मुल इतकं काही करू शकतं हे पाहून धक्का बसलाय!!!! आमची प्रगती :- सध्या आम्ही पुस्तकं आणुन चित्रे ओळखणे, गोष्टी तोडक्या मोडक्या शब्दात सांगणे इतपत प्रगती केली आहे. बिल्डिंग ब्लोक्स पासून घर बनवणे (म्हणजे २-४ ब्लोक्स जोडणे) वगैरेही जमायला लागलय. पण कुठलीही गोष्ट आधी तोंडात घालायची सवय (अजुनही) न सुटल्याने चिकणमाती वगैरे देता येत नाही खेळायला. मुख्यत: सगळ्या खेळण्यांनी मारामारी किंवा क्रिकेट खेळणे चालू आहे. तुमच्या कडे काय नवीन?

In reply to by पिलीयन रायडर

तुमच्याकडील प्रगती आवडली. चिकणमाती देता येत नसेल तर प्ले डो मिळतो तो दिल्यास काय होईल? एक सुचवणी. आमच्याकडे शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होतायत. नेहमीचेच क्लासेस चालू ठेवायचा विचार आहे. टेनिस बरे जमतेय असे प्रशिक्षिकेने सांगितले व आता चांगल्यातली रॅकेट आणायला सुचवल्याने ती आणली. परवा तबल्याचे सादरीकरण आहे. प्रेक्षकवर्ग मोजून पंधरा वीस असणारे. क्लासची मुले व आईवडील एवढेच! ;) तरी रोज कुरकुर सुरु आहे कारण लोकांसमोर वाजवायचे नाहीये. नवीन वेबसाईट समजलीये व शिक्षिकेने त्यावरील गणिताची तयारी सर्वांना करण्यास सुचवले आहे. पुढील यत्तेचा अभ्यासक्रम जाहीर झालाय व सुट्टीत त्याची ओळख करून घेण्यास सुचवले आहे. सुट्टी सुरु झाल्यावर आमची मायलेकरू मराठी शिकवणी सुरु होते. गेली ४ वर्षे हे सुरु आहे पण ५ ओळी सलग वाचणे यापेक्षा आमची प्रगती होत नाही कारण मनात एकच गोष्ट आहे की 'मला या भाषेची गरज नाही'. सम्जावून सांगितले पण आता वाद घालण्यात मला स्वारस्य नाही. तसेच शिकवत राहणार. येत्या भारतवारीत दुकानांच्या पाट्या वाचता आल्या की बरे वाटेल अशी आशा! सध्यातरी त्याच्या डोळ्यासमोर भरपूर झोपेची स्वप्ने आहेत व संध्याकाळाचे मैदानावरील खेळणे! सध्या एवढेच मलाही जमेल. ;)

In reply to by पिलीयन रायडर

धन्यवाद! तुमचा आशीर्वाद असल्यावर काय अवघडे म्हणा. (साला तो पैल्या पर्तिसादात ह.घ्या. राहून गेला वाट्टे)

In reply to by कवितानागेश

आज्जी तुम्ही जाग्या व्हा बघू आधी. प्रतिसादसंख्येची सेञ्च्युरी मी केली. बाकी धाग्यात भर घालायला तुम्ही आहातच की.

वाचता वाचता एक सुंदर ब्लॉग सापडलाय... जरुर वाचा... http://mommygolightly.wordpress.com/ त्यातला काही भाग इथे पेस्ट करतेय.. Notes from a teacher to a child The hardest thing about parenting is deciding at what age a child stops being a child. Perhaps children too are always under pressure to “grow up” or “act their age”. Yes, there are reams written about milestones and what a child should know by the time he/she is three, five, ten and twelve. I still get emails on baby milestones from websites years after I stopped reading them. But for lack of a better term, here is a list of what I think every child or student should know: 1. If something doesn’t feel right, it usually isn’t right. Your instincts are more valuable than you think. Grown-ups may look like they have thought things through, but they are mostly relying on instinct. 2. Coloring within the lines is overrated. It is usually the beginning of boundaries. It is usually a trap for other things. Looking like everyone else, talking like everyone else, also thinking like everyone else. Soon they will say, “You can’t do this” or “you can’t do that”. Soon they will say, “you are this” or “you are that”. 3. They may tell you that the sky is the limit, but they may still frown if you paint it purple. The fact is, the sky is whatever color you want it to be. There is enough of blue in our lives anyway. Go paint it orange! 4. Adults can control how you speak or what you wear or what you eat or read, but they cannot control who you are. 5. Books are not fiction, non-fiction, thrillers, fantasies or mysteries. They are things that let you inhabit a world and stay there as long as you want. Don’t label books, let them mark you. 6. There is something about you that is uniquely different from anyone else in this world. Keep it. Cherish it. Learn to love it. And don’t let go of it easily. 7. Happy is not a default state to be. Feeling sad, angry, lonely, jealous is as natural as feeling happy, elated, generous or chirpy. Although people will seldom ask you why you are happy, they will always ask you why you are sad. 8. It’s okay not to have an opinion when everyone else seems to have one. It just means you are still making up your mind on it. Take your time. 9. The teacher is as intrigued by the quiet ones as by the talkative ones. So may be it’s a good idea to conserve your energy sometimes. 10. Adults are people who have been in the universe longer than you. It doesn’t necessarily mean they know more. They are still fumbling around with many things, but they won’t tell you. 11. It is important to laugh, or act silly sometimes. 12. It is totally okay to not love numbers. 13. Or poetry. 14. If you were read to as a child, you probably are luckier than most people in this world. 15. Every time you ask a question an adult laughs at, they probably haven’t had the guts to ask it themselves. Or perhaps they have been caught off guard and never really thought of it and don’t know the answer. Or it perhaps takes them to places they don’t want to go to. 16. The world is a magical, amazing place and there are a lot of secrets you will uncover. Some will make you happy, others will make you sad or angry, but you will always be happier when you find this out on your own. 17. Very often, the things you think you love will not be the things you love when you are 18. That’s what growing up is all about. Finding new things to love. 18. More often, the things your parents think are good for you may not be the things you like. But you don’t have to dislike them just because they came up with the idea. 19. It’s seldom an either/or. Sometimes there is more than one answer to a question. That is how it’s going to be in life. 20. Zero has gravitas. Wear your zeroes proudly. But help them take you someplace you like to belong. 21. You are more powerful than you know. 22. You are going to create more long term memories in people than you possibly imagine. 23. There will always be someone who doesn’t understand your point of view. There will always be someone who does. 24. There will be times when your questions will remain unanswered. That doesn’t mean you stop asking questions. 25. Sometimes, you may touch someone’s life, but they may forget to tell you. But it still happened.

माझा गुंडा ३ वर्षा चा आहे. एकदा मी त्याला म्हंटले कि त्रास देणाऱ्या मुलांना शिंगे उगतात बघ आता तुला शिंगे उगायला लागली आहेत. पण तो यावर म्हणतो कसा उगू द्या शिंगे. त्या शिंगांनी मी मला त्रास देणाऱ्या मुलांना त्रास देईल

त्याच लकडी कि काठी version लकडी कि काठी काठी पे घोडा घोडे के दुम पे जो मारा ततोडा

रात्री झोपताना चित्र दाखवुन वाचुन दाखवता येतील अशी गोष्टींची पुस्तकं कुणी सांगु शकेल का? वय वर्ष ३ साठी हवी आहेत. आणि शक्यतो मराठी असतील तर उत्तम.. इंग्रजी सुचवुन ठेवल्यास हरकत नाही..

In reply to by पिलीयन रायडर


jyotsnaprakashan.com ह्या संकेतस्थळावर माधुरी पुरंदरे ह्यांची बालसाहित्यातली सगळी पुस्तकं खूप छान आहेत. लेखिकेने स्वतः चित्रे काढून अगदी सोप्या भाषेमधे वेगवेगळ्या गोष्टी लिहीलेल्या आहेत. माझ्या भाच्यासाठी मी सर्व पुस्तकं मागवली होती. संकेतस्थळावरून तुम्ही हवी ती पुस्तक ऑनलाईन पेमेंटने घरपोच मागवू शकता. फक्त हवी ती पुस्तकं सध्या उपलब्ध आहेत की नाही त्याची चौकशी एकदा त्यांच्या कार्यालयात करून घ्या आणि त्यानुसार ऑर्डर करा.

मजेदार गोष्टी - शशिकांत कदम एकदम २०-२५ पुस्तके मागवण्या पेक्षा एखाद दुसरेच पुस्तक मागवावे. वरच्या मजेदार गोष्टी या पुस्तकावर आम्ही बरेच दिवस बॅटींग केली होती. जवळजवळ चार पाच महिने. या वयात मुलांना एकच गोष्ट (जी त्यांना माहीत आहे तीच) सारखी सारखी सांगीतली तर ती प्रत्येकवेळा जास्त आवडीने ऐकतात. त्यांना त्याचा अजिबात कंटाळा येत नाही. (हा अर्थात माझा अनुभव आहे, तुमचा अनुभव कदाचित वेगळा शकतो.) परवा अप्पाबळवंत चौकातल्या प्रगती बुक स्टोअर मधे गेलो होतो. (जोगेश्वरीच्या समोरचा) त्या दुकानात तर लहान मुलांच्या पुस्तकांचा जवळजवळ एक मजलाच आहे. लहानमुलांसाठी एवढी पुस्तक बघुन मी पण आचंबीत झालो होतो. सध्या वयोगटा प्रमाणे अ‍ॅक्टीव्हीटी बुक्स पण मिळतात. ती पण दोनचार घेउन बघा. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खरंय.. मी रोज तीच गोष्ट सांगते.. किंवा बनवते.. अत्यंत भक्तिभावानी ऐकतो मुलगा.. पण आता मी कंटाळले! आणि मी सुद्धा ह्या दुकानत जाउन बघेन.. मुलालाच नेते..

मी माझ्या मुलाला सध्या शिवाजीमहाराजांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतीये. त्याला त्यातील लढाईचा भाग सोडता काहीच आवडत नाही. त्यातही फायटर विमाने असती तर बरे झाले असते वगैरे ऐकून मी गप्प बसते.

In reply to by रेवती

त्यातही फायटर विमाने असती तर बरे झाले असते वगैरे ऐकून मी गप्प बसते.
टाईम मशीनने मागे जाऊन मराठ्यांना मुघलांविरुद्ध रणगाडे, विमाने, मिसाईल्स, बंदुका, इ. सप्लाय करायला पाहिजेत असे आम्हांलाही लहानपणी प्रामाणिकपणे वाटत असे. तेव्हा यात फार वेगळे असे काहीच नाही. साधारण १९२०-३० च्या सुमारास लहान असलेल्या एका गृहस्थांच्या आत्मचरित्रातही अशा धर्तीची आठवण आहे. लहान असताना ते आणि त्यांचे एक लंगोटीमित्र विचार करतात की इंग्लंडवर हल्ला कसा करावा? मारुतीच्या पाठीवर बसून तिथे जावे अन मारुतीला ते बेट उलटे करून बुडवण्यास सांगावे इ.इ. फक्त त्यातली संपत्ती परत घ्यावी की न घ्यावी याबद्दल डिबेट होता असे त्यात दिलेले आहे. या वयात दुसरे काही आवडणारही नाही. पण अशा गोष्टींनीच आत्मीयता वाढते हे विसरू नका. अन मुळात आत्मीयताच नसेल तर कोण शिवाजी अन कुठला महाराष्ट्र? तेव्हा शक्य तितक्या लढायांच्या गोष्टी सांगायला विसरू नका. फक्त मोटिव्ह आणि शौर्य यांवर भर दिल्यास उत्तम.

In reply to by बॅटमॅन

टाईम मशीनने मागे जाऊन मराठ्यांना मुघलांविरुद्ध रणगाडे, विमाने, मिसाईल्स, बंदुका, इ. सप्लाय करायला पाहिजेत असे आम्हांलाही लहानपणी प्रामाणिकपणे वाटत असे. तेव्हा यात फार वेगळे असे काहीच नाही.
सहमत.

In reply to by बॅटमॅन

माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७) तर पेशव्यांकडुन मस्तानीला उचलुन आणता येईल असं अत्यंत महत्त्वाचं लॉगिक मांडलेलं. अर्थात त्याच्या डोक्यात मस्तानीचा ग्लास होता ही गोष्ट अलाहिदा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

असाच प्रश्न मला आला. फक्त आमच्याकडे वय वर्षे दुप्पट आहे म्हणून बाकी सगळी माहिती आहे. आधी मी महाभारत सुरु केले तर गाडी द्रौपदी वस्त्रहरणाला अडली. मग ते सोडले, शिवाय १०० मुलग्यांचे लॉजीक काय सांगावे हा प्रश्न आला. पांडव जर ५ असू शकतात तर दुसर्‍या पार्टीला कुटुंब नियोजन का जमले नाही? शिवाय आमच्यापेक्षा जास्त माहिती मुलांना! मग रामायण सुरु केले. त्यात सीतेला कांचनमृगाचे कातडे, त्याचे कपडे, हे पटवता येईना. मग शिवाजीमहाराजांना शरण गेले शेवटी.

In reply to by रेवती

शिवाय १०० मुलग्यांचे लॉजीक काय सांगावे हा प्रश्न आला.
मग मूळ कथाच सांगायची. १०० पैकी १४ जणच फक्त धृतराष्ट्र-गांधारी यांचे पुत्र होते, बाकी एकतर धृतराष्ट्र + अन्य स्त्रिया यांचे तरी किंवा अ‍ॅडाप्टेड तरी. कुटुंब नियोजन जमले नाही (रादर त्याची मदत घेतली नाही) कारण भला उसके बेटे मेरे बेटोंसे ज्यादा कैसे इ.इ.

In reply to by रेवती

धृतराष्ट्रानी प्रश्ण ऐकला असता तर डोळे पांढरे झाले असते की त्याचे लिटरली =)) बाकी ते तुपाच्या भांड्यात बुडवुन ठेवलेले अंगुलीएवढे १०१ जीव वगैरे ऐकुन टेस्ट ट्युब बेबीज होते की काय अशी शंका घ्यायला वाव आहे.

In reply to by बॅटमॅन

करेक्ट.. माझ्या मुलाला शिवाजी महाराजांपेक्षा छोटा भीम जास्त शुर वाटतो.. आणि अफझलखानाला सरळ उचलुन गरगर फिरवुन फेकुन दिलं तर जास्त बरं झालं असतं.. कुठं ती वाघनखं वापरायची (त्याला ते कळतच नाही ना..).. सध्या जीवा महाला सय्यद बंडाला फक्त "ढिशुम" करतोय.. पण गोष्ट सांगत रहायची..

In reply to by पिलीयन रायडर

शिवाजी महाराजांनी आरमार (आधी आर्मर आणि आरमारात गोंधळ, मग वाद, मग नेव्ही वगैरे) बनवताना जहाजे तयार करण्याचे वर्कशॉप कुठे होते? याचे उत्तर द्यायचे म्हणजे अवघड आहे.

In reply to by रेवती

शिवाय आरमार या शब्दाची व्युत्पत्तीही सांगा. पोर्तुगीज़ भाषेतील आर्मेर या शब्दावरून तो आलेला आहे. याच्याशी संबंधित इंग्लिश शब्द म्हणजे armada होय. तेवढेच युरोपियन कनेक्शनही डोक्यात बसेल.

In reply to by बॅटमॅन

आधी कल्याणच्या दुर्गाडीत होतं हे माहीत आहे पण नंतर विजयदुर्गच्या वाघोटन खाडीजवळच्या गोदीत सुरु केलं ना?

लहान पोरांना समजेल अन आवडेल अशी ऐतिहासिक पुस्तके लिहिण्याचे मार्केट तसे मोठे आहे असे वाटते. तशी चांगली पुस्तके मराठीत कोणती आहेत?

In reply to by बॅटमॅन

खरंच.. माझ्या लहानपणी कॅसेट्स होत्या.. त्यात खुप मस्त सांगितलं होतं.. हिरकणीची गोष्ट अगदी नीट आठवते मला. शिवाय एक कॅसेट होती त्यात दिलीप प्रभावळवर, निशिगंधा वाड ह्यांच्या आवाजात गोष्टी होत्या.. आहेत का अशा CD / कॅसेट्स? बघते लगेच ऑनलाईन..

खूपच सुंदर धागा आणि उपयुक्त प्रतिसाद!!! चिमुकल्यांच्या गोड गोड विश्वात हरवून जायला झालंय. पूर्ण वाचायला आत्ता वेळ मिळणार नाही. संध्याकाळी सावकाश वाचेन.