अखंड तेजीची नको करू कामना - चंद्रशेखर चितळे
दैनिक सकाळ - १९ आक्टोबर २००७
अखंड तेजीची नको करू कामना ।।
(चंद्रशेखर चितळे)
एक आटपाट नगर होते. तेथे प्रजा आनंदाने राहत होती. उद्योजक, व्यावसायिक, सेवा पुरवठादार, नोकरदार... अशी सर्व प्रकारची जनता तेथे होती. तेथे अन्य प्राणी देखील वास्तव्यास होते. गाई-म्हशी, कुत्रे-मांजर पोपट-चिमण्या... आदी सारे होते.
डुकरांची जमातसुद्धा होती. संक्रांतीचा मुहूर्त साधून एका फिरंगी व्यावसायिकाने आटपाट नगरामध्ये टोप्या विकावयाचे दुकान टाकले. सुरवातीच्या कुतुहलामुळे दुकानामध्ये गर्दी जमली आणि हळूहळू साधारण व्यवसाय होऊ लागला. बाजारपेठेमधील डुकरांच्या रहदारी आणि वास्तव्यामुळे सर्वांनाच त्रास होत असे; परंतु प्रजा उदासीन होती. वैयक्तिक चर्चा मुबलक; परंतु सयुक्तिक उपाय शून्य, अशीच परिस्थिती होती.
फिरंगी टोपी विक्रेता मोठा हुशार. त्याने गावाबाहेर मोठे गोदाम भाड्याने घेतले. एका डुकरास १०० रुपये दाम लावले. जाहिरात केली. कामसू आणि रिकामटेकडे बरोबरीनेच कामाला लागले. डुकरांना जेरबंद करून गावाबाहेरील मोठ्या गोदामामध्ये जमा करू लागले. फिरंगी विक्रेत्याकडून डुकरामागे १०० रुपये घेऊ लागले. महिन्याभरात गावामधील डुकरे गोदामामध्ये रवाना झाली. त्यानंतर गावाबाहेरील माळरानामधून डुकरे येण्याची शक्यता लक्षात घेऊन फिरंगी विक्रेत्याने आता डुकरामागे १५० रुपये देण्याचे जाहीर केले. प्रजेचा उत्साह वाढला. आठवड्या-पंधरवड्यात माळरानामधील उरलीसुरली डुकरे गावाबाहेरील गोदामात नांदू लागली. विक्रेत्याने डुकरांचा भाव आणखी वाढवून २०० रुपये केला आणि प्रजा लांबवरून आणखी काही डुकरे पकडून गोदामामध्ये घेऊन आली. पंचक्रोशीमध्ये आता औषधाला देखील डुक्कर उपलब्ध नव्हते.
फिरंगी विक्रेता खूष झाला. त्याने डुकराचा भाव आता ५०० रुपये करून टाकला. दरम्यान, दुकानामधील टोप्या संपल्यामुळे दहा-पंधरा दिवस स्वदेशी जाऊन नवीन टोप्या घेऊन येतो आणि तोपर्यंत आपला विश्वासू नोकर व्यवसाय सांभाळेल, असे त्याने जाहीर केले. शिमग्याच्या दिवशी परतण्याचा वायदा केला.
एका डुकरामागे ५०० रुपयांची कमाई ऐकून प्रजा हुरळून गेली. प्रजेस डुकरे आणि नोटांची बंडले यांची स्वप्ने पडू लागली; पण करणार काय? आटपाट नगरामध्ये एकही डुक्कर नाही. लगतच्या माळरानामध्ये डुकरे नाहीत. लांबवरच्या रानामध्ये देखील डुक्कर नाही. पैसे कसे कमविणार? काही इरसाल तरुणांनी एक शक्कल लढविली. फिरंगी विक्रेत्याच्या नोकराचा यथोचित सत्कार केला आणि त्याचा विश्वास कमावला. मोक्याच्या क्षणी त्या नोकरास या तरुणांनी "ऑफर' दिली, ""गोदामामधील काही डुकरे आम्हास ४०० रुपयांना विक. टोपी विक्रेता परतल्यावर त्याला आम्ही ती ५०० रुपयांना विकू. व्यवहारामधील निम्मी रक्कम तुझी, निम्मी आमची. आहे कबूल?'' नोकर विरघळला. त्या तरुणांकडे काही डुकरे आली.
ही बातमी हा हा म्हणता आटपाट नगरामध्ये पसरली. गुप्त खबऱ्यांनी भाव फोडला. आता फिरंग्याचा नोकर ४२० रुपयांच्या भावावर आडला. गटा-तटाने प्रजा नोकरास गुप्तपणे भेटू लागली आणि दोन-चार दिवसांत मोठ्या गोदामामधील शेवटचे डुक्कर ४६० रुपयांस विकले गेले.
आठवड्याच्या उसंतीनंतर शिमगा आला. नटूनथटून रिकामे बटवे आणि भरलेली डुकरे घेऊन आटपाट नगरामधील प्रजा गावाबाहेरील मोठ्या गोदामासमोर उपस्थित झाली. सूर्य उगवल्यानंतर आलेल्या जनतेस खूपच मागे उभे राहावे लागले. कारण काही उत्साही वीर मध्यरात्रीस येऊन डुकरांसह तळ ठोकून उपस्थित होते.
आटपाट नगरामधील प्रजा टोपी विक्रेत्याची आतुरतेने वाट पाहत होती. तो अजून परतलेला नव्हता. मग प्रजेने त्याच्या नोकराचा माग काढला. गावामध्ये त्याचादेखील ठिकाणा नव्हता. दुपार झाली. गर्दीमधील काही चाणाक्ष व्यक्तींनी ४२० रुपयांना घेतलेली डुकरे रांगेमध्येच आधी ४४० रुपये नंतर ४३० रुपये आणि शेवटी ४२० रुपये १० पैशांना विकून घरचा रस्ता पकडला.
एव्हाना संध्याकाळी झाली. ना विक्रेत्याचा पत्ता ना त्याच्या नोकराचा! गर्दीमध्ये हळूहळू डुकरांचे सौदे सुरूच होते; पण जसजसा सूर्य मावळतीकडे कलला, तसतसा डुकरांचा बाजारभाव तुटू लागला. काहींनी आल्या भावास डुकरे विकून टाकली, तर काहींनी नुकसान झेलून डुकरांचा सौदा केला. सरतेशेवटी आटपाट नगरामधील डुक्कर विकत घेतलेल्या सर्वच व्यक्ती येईल त्या भावामध्ये डुक्कर विकण्यास तयार होत्या; पण समोर खरेदी करण्यास ना विक्रेता, ना त्याचा नोकर, ना अन्य कोणी व्यक्ती!
माजलेल्या डुकरांचा शेतीसाठी उपयोग नव्हता, राखणीसाठी उपयोग नव्हता, खाण्याच्याही लायकीची ती नव्हती. उलटपक्षी जवळ बाळगली तर पोसण्याचा खर्च आणि दुर्गंधीची कटकट. शेवटी डुकरांच्या मालकांनी त्यांची स्वतःपासून आणि स्वतःची त्यांच्यापासून सुटका केली. गावामधील डुकरे गावात परतली. माळरानातील डुकरे माळरानात विसावली आणि लांबच्या वनामधील डुकरे वनाच्या दिशेने निघाली.
दिवस शिमग्याचा असल्याने फिरंगी विक्रेत्याच्या मोठ्या गोदामाची होळी करण्याचा डाव गावकऱ्यांनी रचला; पण गोदामाचा मालक आडवा आला. प्रजेने विक्रेता म्हणून एका काठीवर मडके ठेवले. त्याला दगड-गोटे आणि लाथा-बुक्क्यांनी यथेच्छ तुडविले. विक्रेत्याच्या नावाने बोंब ठोकली. त्याच्या पुतळ्याभोवती वाळलेले गवत रचून होळी केली. जड अंतःकरणाने आणि रिकाम्या खिशाने प्रजा घरी परतली. झोपी गेली.अशा रीतीने संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरू झालेली कहाणी शिमग्याच्या आरोळीवर संपली.
मना सज्जन ।।
अखंड तेजीची नको करू कामना ।।
दिवसामागे रात्र येते ।
तेजीमागे मंदी असते ।।
वास्तवाची या असो कल्पना।।
लाभांश-नफ्याची वाजती कामना ।।
गुंतवणुकीकडे पोचली सुख-समाधाना ।।
वाचने
12121
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
कै च्या कैच - गोडूक्करप्रतिपालक
कागदाची किंमत
In reply to कागदाची किंमत by धनंजय
मत
In reply to मत by लबाड बोका
अच्युत गोडबोले
आवडला पण...
अशीच कथा
माकड
कथा आणि श्लोक..
पटत नाही
In reply to पटत नाही by ईत्यादि
/
चपखल कथा
+1
अरे व्वा!
मंदी म्हणजे मागणीत आलेली प्रचंड घट