Skip to main content

ऐका हो ऐका - 'टीम अण्णांच्या उपोषणाचा इव्हेन्ट उद्यापासून..!

लेखक कॉमन मॅन यांनी सोमवार, 26/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका हो ऐका... "उद्या मंगळवार दि २७ डिसेंबर पासून मुंबईतल्या एमएमआरडीए मैदानावर टीम अण्णा कंपनीच्या उपोषणाचा इव्हेन्ट साजरा केला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी आपापले कामधंदे सोडून तिथे जमायचं आहे, 'लोकपाल लोकपाल जनलोकपाल..' इत्यादी देशभक्तिपर गीतं गायची आहेत, 'मी म्हणेन तीच पूर्व-आम्ही संसद मानत नाही' आदी मुक्ताफळे उधळणारे देशातील एकमेव हुशार-कायदेपटू-तज्ञ वगैरे वगैरे असलेल्या रा. रा. अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांची भाषणं ऐकायची आहेत..! आमचं मत मात्र केजरीवालांपेक्षा अंमळ वेगळं आहे. आम्हाला आमच्या भारतीय राज्यघटनेचा आत्यंतिक आदर आहे. आपण स्विकारलेल्या संसदीय लोकशाही पद्धतीनुसार (केजरीवालांची कुठली पद्धती आहे, हे आम्हाला ठाऊक नाही..!) कायदा हा केवळ संसदेतच केला जातो. संसदेत सारे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त आहेत अशा भ्रमात आम्ही मुळीच म्हणजे मुळीच नाही.. तरीही आज त्या खासदार मंडळींना आपणच निवडून दिलं आहे आणि आपल्या घटनेने त्यांनाच कायदे बनवण्याचे अधिकार दिले आहेत ही वस्तुस्थिती संपूर्णत: नाकारून किंबहुना अशी संसदीय पद्धती लाथाडून दर दोन-तीन महिन्यांनी उपोषणाचा इव्हेन्ट साजरा करायचा आणि सरकारच्या डोक्यावर पिस्तुल ताणायचं, हे आम्हाला पटत नाही. कुठल्याही वाहिनीवर जेव्हा जेव्हा अरविंद केजरीवालांची क्रॉस झाली आहे तेव्हा तेव्हा ते 'ये हमारी नही, भारत के पुरे जनता की मांग है..' असं ठेवणीतलं उत्तर देतात. आम्हाला हे उत्तर ऐकून असा प्रश्न पडतो की केजरीवाल नक्की कुठल्या भ्रमात वावरत आहेत? मुंबई, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, हैद्राबाद येथील प्रत्येकी - धरून चाला - लाख लाखभर मेणबत्तीबाज अन् टोपीबाज म्हणजे संपूर्ण भारतीय जनता होते का? आम्ही म्हणतो की अश्या जेलभरोत्सुक मेणबत्तीवीरांची व टोपीबाजांची संख्या फार तर १० लाख असेल.. आता, सूज्ञ वाचकांनो, आपणच तुलना करा की कुठे १० लाख अन् कुठे १२५ करोड..! या १२५ करोड जनतेपैकी बहुतांशी जनता तर आजही भारतातल्या खेड्यापाड्यात राहते. परंतु 'सचोटीची पत्रकारिता' हा शब्दही विसरलेल्या बर्‍याचश्या टीआरपीच्या भुकेलेल्या वारांगनावजा वृत्तवाहिन्यांना हाताशी धरून टीमअण्णाचं बोकाळलेपण हल्ली फारच वाढू लागलेलं आहे. शिवाय जनतेचं मत काय, जनता कुणासोबत आहे, हे ठरवायचे निकष देखील संसदेनेच घालून दिलेले आहेत. 'मतदानातून ज्याला बहुमत मिळेल तोच उमेदवार, तोच पक्ष, किंबहुना त्याच पक्षाचा विचार श्रेष्ठ' असा अत्यंत साधा सोपा असा हा मामला आहे. मग त्यात 'सारी भारतीय जनता आमच्या बाजूने आहे, त्यांना आमचंच जनलोकपाल हवं आहे' असं केजरीवाल-बेदी आदी प्रभुती कुठल्या आधारावर म्हणत आहेत? आणि खरोखरंच जर या मंडळींना भष्टाचाराविरोधात अगदी कडक कायदा आणायचा आहे, तर मग ही मंडळी स्वत:चा पक्ष बनवून, सर्व सचोटीच्या मेणबत्तीवीर अन् टोपीबाजांना उमेदवारी देऊन सार्‍या देशातून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकात का नाही उभं करत? आहेत ना सारे देशवासीय तुमच्यासोबत? मग कशाला काळजी करता? संसदेत निर्विवाद बहुमत आणा आणि अगदी तुम्हाला हव्वा तस्सा लोकपाल कायदा घ्या की पास करून..! कुणी मनाई केली आहे? आंदोलनांचे लोकशाहीतील महत्व आम्ही मुळीच नाकारत नाही, परंतु 'आंदोलनाआड दर दोन महिन्यांनी भारयीत घटनेला अन् संसदेला धारेवर धरणे' या मागे आंदोलनामागील प्रामाणिकतेपेक्षा काही अन्य हिडन् अजेंड्याचाच आम्हाला अधिक संशय येतो आहे. आणि हे सगळं 'अण्णा हजारे' सर्वच बाबतीतील स्वच्छ चारित्र्याच्या एका माणसाला पुढे करून, त्याचं बाहुलं करून केलं जात आहे याचा आम्हाला मनस्वी खेद वाटतो..! 'अन्ना नही ये आंधी है, देश का दुसरा गांधी है..' अशी अत्यंत बाष्कळ व भंपक स्लोगन चालवणार्‍यांना उपोषणाचा इव्हेन्ट साजरा करण्यासाठी लाख्खो रुपये भाडं असलेली मैदानं का बरं लागतात? आणि त्यातही सरकारने सूट द्यावी अशी बदमाशीवजा अपेक्षा कशाकरता? गेल्या ऑगस्ट महिन्यातील दिल्लीच्या रामलीला मैदानात अण्णांनी उपोषण केले होते. त्यावेळी देणगीस्वरूप गोळा झालेले लाखो रुपये अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्या एनजीओत जमा झाले होते. मग मुंबईच्या उपोषणाचं भाडं त्यातनंच का नाही भरलं? त्याकरता पुन्हा रोज कुणी १-२ लाख रुपये देणगी देणारा स्पॉन्सरर ही मंडळी (आणि पर्यायाने आमचे बिचारे अण्णा) का शोधताहेत..? टीम अण्णा मधील मयंक गांधी या मुंबईतल्या धनदांडग्या बिल्डरच्या यापूर्वीच्या सार्‍या आर्थिक व्यवहारांबाबत अण्णा नि:शंक कसे काय..? ज्याला पाहूनच 'हा केवळ भामटा असावा..' अश्या कुमार विश्वास नामक इसमावर अण्णांचा इतका विश्वास कसा काय..? रोज उठून संसदेला धारेवर धरणार्‍या, जे सार्‍या भारतीय जनतेचं मुळीच प्रतिनिधीत्व करत नाहीत, किंबहुना ज्यांच्या हेतूंबद्दल निश्चितच शंका आहे आणि अश्या भामट्यांच्या कह्यात अण्णा पूर्णत: गेले आहेत हे पाहून खेद होतो. की दारुच्या किंवा अन्य कुठल्या नशेपेक्षा गर्दीची नशा भयंकर असते आणि बिचारे अण्णा नेमके त्याच नशेच्या जाळ्यात सापडले आहेत असं आम्ही मानायचं? असो.. तेव्हा ऐका हो ऐका, "सर्वांनी अन्ना-टोप्या घालून उद्याच्या उपोषणाच्या इव्हेन्टला मात्र नक्की हजेरी लावा. अहो अगदी मज्जा मज्जा आहे तिथे..!" सुरक्षेची वगैरे फारशी चिंता करू नका. तिथे २००० च्या वर चोख पोलिस बंदोबस्त असेल, रॉ, एटीएस इ. सारा बंदोबस्त असेल, (अर्थात, तो तुम्हाआम्हा जनतेच्याच पैशांतून - हा भाग वेगळा!). काही धनाढ्य उदार मनोवृत्तीच्या बिल्डरांनी तिथे तुम्हाआम्हाकरता अगदी खाण्यापिण्याचीही मुबलक व्यवस्था केली आहे, तेव्हा अगदी यथेच्छ ताव मारायला या..! (अण्णा राहिनात का उपाशी, आपण खाऊ तुपाशी!) शिवाय बॉलिवुड अन् त्यातील काही नट्याही तिथे यायची शक्यता आहे. आहे की नै मज्जाच मज्जा..? आपला, (भारतीय संविधान आणि भारतीय संसद मानणारा) कॉमन मॅन.

वाचने 7994
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

खूपच सुंदर लेख. पण कॉमन मॅन आता तुम्ही (आणि तुमचा लेख आवडल्याबद्दल आम्हीपण) भ्रष्टाचाराचे समर्थक ठरणार बरं का! (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पण कॉमन मॅन आता तुम्ही (आणि तुमचा लेख आवडल्याबद्दल आम्हीपण) भ्रष्टाचाराचे समर्थक ठरणार बरं का!
अहो अगदी खरं बोल्लात. आपण लगेच भ्रष्टाचाराचे समर्थक ठरणार हीच तर खरी गोची आहे! :) पण काय करणार, अलिकडे टीम अण्णाचे चाळे आणि वाह्यातपणा इतका वाढला आहे की आम्हाला राहवलं नाही! -- कॉ मॅ

लेख आवडला ... उद्यापासुन गंमतशीर शो पाहण्यास उत्सुक आहे. - छोटा डॉन

आमच्या (लोकशाही मान्य असणार्‍या समस्त देशवासीयांच्या) 'लाडक्या अण्णांची' इभ्रत अशी वेशीला टांगणार्‍या 'कॉमन मॅन'चा निषेढ... - (अण्णांच्या पाठीशी असलेला 'कॉमन मॅन') सोकाजी अवांतरः लेख आवडल्या गेला आहे.

बर असतील अण्णा चुकीचे... तुमच्या कडे काय उपाय आहे मग भ्रष्टाचारा साठी? . . . . . . संसदेत कायदे झाले ना इतके वर्ष.. लोकशाही नी निवडुन पण दिलं इतकी वर्ष सरकार... काय झालं? काय बदलंल?? अण्णा चुकत असतीलही.. पण ह्या सगळ्या "शो" चा परिणाम म्हणुन एखादा भ्रष्टाचार विरोधी बळकट कायदा येत असेल तर काय हरकत आहे??

In reply to by पिलीयन रायडर

असंच म्हणतो. एक गमतीदार लेख म्हणून आवडला. आता मुद्यांबद्दल. परत तेच तेच वाद-प्रतिवाद करून, वाचून वाचकांनासुद्धा कंटाळा आला असेल. पण तरीही.
..तरी आपण सर्वांनी आपापले कामधंदे सोडून तिथे जमायचं आहे
एव्हडे घोटाळे होउन सुद्धा आपल्याच कोषात बसून "चलता है" मनोवृतीच्या मुर्दाड पडून राहिलेल्या पांढरपेशी लोकांना थोडी जाग येते आहे. हे सगळं अगदी आदर्श नसेल पण हे ही नसे थोडके. पण तरी सुद्धा हे तथाकथित विचारजंत आहेतच काड्या घालायला किंवा, श्रेष्ठ संत श्री राजू श्रिवास्तवच्या भाषेत "थोडा कुछ अच्छा हो रहेला है, तो हमेशा बीचमे उंगली करना जरूरी है क्या?" :)
...आणि खरोखरंच जर या मंडळींना भष्टाचाराविरोधात अगदी कडक कायदा आणायचा आहे, तर मग ही मंडळी स्वत:चा पक्ष बनवून
रावदेव बाबाच्या उपोषणाच्या वेळी त्यांचा पॉलिटिकल हिडन अजेंडा आहे म्हणून राळ उठवून दिली.
या १२५ करोड जनतेपैकी बहुतांशी जनता तर आजही भारतातल्या खेड्यापाड्यात राहते.
निवडणुका, खेडी वगैरे सांगू नका भौ. विसुनानांचा हा धागा वाचा.

घरी टिव्ही रेडो बंद केला, तरी इथे मिपावर त्या अण्णांचा त्रास आहेच. नका रे बाबांनो.. त्या अण्णांची सतत दखल घेणे मिपावरती तरी थांबवा. कंटाळा आलाय आता सगळ्याचा. कृपया संपादकांनी काश्मिर सारखाच एक धागा फक्त अण्णा समर्थक आणि विरोधकांसाठी उघडून द्यावा अशी नम्र विनंती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

घरी टिव्ही रेडो बंद केला, तरी इथे मिपावर त्या अण्णांचा त्रास आहेच. नका रे बाबांनो.. त्या अण्णांची सतत दखल घेणे मिपावरती तरी थांबवा. कंटाळा आलाय आता सगळ्याचा.
+१, च्यायला काय वेळ आलीये, ह्या 'शो' च्या निमित्ताने खुद्द पराशी सहमत व्हावे लागणे ह्यासारखे दुर्दैव नाही, तरीही संपुर्ण सहमत आहे. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

शब्दा-शब्दाशी सहमत! दररोज किमान एक ते कमाल कितीही अण्णा-धागा/गे बघून कंटाळा आलाय.

In reply to by स्मिता.

>>>गे बघून कंटाळा आलाय. ए बाई, असं काही लिहू नकोस. 'धा' लिहायला कंटाळलीस? ;) मनिष तिवारी ,दिग्विजय सिंग आणि पेट्रोलियम मंत्री उगाच आण्णांच्या आंदोलनात असेही लोक असतात असं म्हणतील. पुढं जाऊन आण्णानी लग्न नाही केलेलं आण्णाच.... आहेत असं म्हणायला मागेपुढे बघणार नाहीत. काहीही बरळू शकतात हे लोक्स. ;) - 'स्ट्रेट' आऊट ऑफ कन्टेक्स्ट प्यारे१

In reply to by परिकथेतील राजकुमार

आपण इंचा इंचाने अण्णानपासून माघार घेत आहोत काय? असा प्रश्न पडल्या गेला आहे

आंदोलनाच्या सुरुवातीला, अण्णांबद्दल आदर वाटला होता... त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला माझा ही पाठिंबा होता.. खुप बरोबर असेच वाटत होते ... पण आता खेदाने म्हणावे लागते आहे.. अण्णा तुम्ही खुप अति करत आहात ... प्रत्यक गोष्टीला टाईम दिला पाहिजे ... मान्य सरकार मधील असंख्य लोक चुकीचे आहे.. पण आपण महा चतुर आहे असे वाटणे घोडचुक ठरेन .. आपण स्वता कॉमन मॅन म्हणुन लढता लढता.. सर्व प्रश्नांचे उगमदाते झाल्यासारखे वागता आहेत असे वाटते आहे.. अगदी भारतरत्नाच्या चर्चेपासुन .. खेळाच्या पिच पर्यंत , गाण्यांच्या कार्यक्रमात... सगळीकडे झालेली मध्यस्थी पाहुन असे वाटते आहे .. अण्णा ह्याची गरज नक्कीच नव्हती... शिवाय आम्हाला भाडे कमी करा ही सुद्धा अरेरावीच आहे.. सत्याग्रह वेगळा आणि निव्वळ अट्टाहासा साठी उपोषण वेगळे

पहिल्या सत्रात शिगेला पोहोचलेला 'अण्णा फिव्हर' दुसर्‍या सत्रात मात्र थंडावलेला दिसतो आहे जिथे-तिथे. गेल्या वेळी हिरीरीने समर्थन करणारेही सध्या बचावात्मकरित्या बोलत आहेत. अर्थातच ही परिस्थिती जी वर्णन करतो आहे ती 'सुपरपावर इंडियन आयटी 'मधल्यांची. इतर ठाऊक नाही फारसं. कदाचित हे फलित टीम-अण्णाच्या बेताल वक्तव्यांचं असावं किंवा पध्दतशीरपणे नकारात्मक मार्केटिंग करुन काँग्रेस आणि तत्सम संस्थांनी समाजमनात शंकेचं वातावरण निर्माण केल्याने असावं. काहीही असो, फरक मात्र मोठा पडला आहे हे नक्की. ह्या वेळच्या आंदोलनाला गेल्या आंदोलनाच्या तुलनेत कितपत प्रतिसाद मिळेल ह्याबाबत शंकाच आहे. अवांतरः अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी एके काळी जे जनलोकपाल संदर्भातले मुद्दे मांडले होते आणि ज्यावर उत्तरादाखल प्रचंड गोंधळ घालून संसदेचं कामकाज बंद पाडलं गेलं होतं त्यातले बरेचसे मुद्दे हे अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने दिलेल्या जनलोकपालाच्या प्रस्तावातील मुद्द्यांशी कमालीचं साधर्म्य दाखवतात असे एका न्युज च्यानेलवर पाहिले. खरे खोटे देव जाणे.

भावना पोहचल्या. काही दिवसांपासून चाललेल्या 'लोकपाल' गु-हाळाचा आता कंटाळा येऊ लागला आहे. विविध वाहिन्या, वृत्तपत्रे, चर्चासत्रे, मुलाखती, सतत तोच विषय. सालं मी श्री अण्णांच्या आंदोलनाने खूप भारावलो होतो. पण, लोकपाल निमित्त चालणार्‍या आंदोलनाबद्दल माझाही उत्साह दिवसांदिवस कमी होत चालला आहे. :( व्यवस्थे विरुद्ध चळवळी चालल्या पाहिजेत, व्यवस्थेवर दबाव असला पाहिजे, वगैरे वगैरे पण का कोणास ठाऊक कॉमन.मॅनच्या काही मुद्द्यांशी सहमत व्हाव असंच वातावरण आहे. काळे काका, वाचताय ना ? आपल्या श्री अण्णांचे आंदोलन बरोबर चाल्लंय का ? -दिलीप बिरुटे

In reply to by मराठी_माणूस

मुळात अण्णांनी वर्षभर दबाव आणून काही गोष्टी बर्‍याच पुढे गेल्या आहेत. त्या विचारात न घेता (जणू काहीच घडले नाही असे भासवून) "आम्ही म्हणतो तसेच"चे टुमणे लावले नसते तर हा लेख लिहावा लागला नसता.

In reply to by नितिन थत्ते

"आम्ही म्हणतो तसेच"चे टुमणे लावले नसते तर हा लेख लिहावा लागला नसता. म्हणजे काय ? हा लेख 'कॉमन मॅन' या आयडीने लिहिला आहे असे प्रथमदर्शनी दिसते आहे. मते काहीही असली तरी तुमच्या लिखाणातल्या प्रामाणिकपणाबद्दल आजवर शंका आली नाही. तो आयडी तुमचा नसूंदे म्हणजे मिळवली.

मुळात अण्णांनी वर्षभर दबाव आणून काही गोष्टी बर्‍याच पुढे गेल्या आहेत. हेही कोणीतरी करायला हवेच होते , नुसते लेख लीहुन काही झाले नसते

अण्णांच्या विरोधात बोलणार्‍यांचा, बाजूने बोलणार्‍यांचा आणि कोणत्याही बाजूने न बोलणार्‍यांचा असा एकूण मिळून सगळ्यांचाच निषेध!!!!

संपूर्ण लेखात आरएसएस च्या नावाने कुठेही बोटे मोडल्याचे आढळुन न आल्याने लेख पटला नाही ! ;) (भारतीय संविधान आणि भारतीय संसद मानणारा) हिंदुस्थानच्या संविधानाचे शिल्पकार श्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १० वर्षासाठी आरक्षण दिले होते,मतांसाठी ते ६० वर्षे सुरूच आहे ! ;) आणि संसदेवरील हल्ल्यांच्या आरोपी अफजल गुरु अजुन जिताच हाय बरं ! :(

अण्णा टीम किंबहुना रामदेवबाबांनी केलेली काही बेताल विधानं होती त्या धर्तीवरचा किंवा दिग्विजयसिंग जरा सोबर असताना बोलले तर बोलू शकतात तेवढ्या दर्जाच्या विधानांनी भरलेला लेख .. मी या आंदोलनाच्या योग्य बाबींचं समर्थन करतो म्हणजे जन लोकपाल सारखा भ्रष्टाचार विरोधी कायदा असलाच पाहिजे. त्याबरोबर किरण बेदींनी केलेल्या नकला किंवा भूषण यांचं काश्मीर वक्तव्य अशा अयोग्य गोष्टींचा तितकाच विरोध.. पण म्हणून वाटेल ती विधानं करण्यात अर्थ नाही. अण्णा यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्यामुळी मनीष तिवारी यांची हकालपट्टी करण्याची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ काँग्रेसवर आली. देशातील सर्वात हुशार कायदे तज्ञ सिब्बल आणि मोईली काय विधानं करत आहेत हे गेले काही महिने सगळ्यांनी स्पष्ट बघितलं आहे. तेव्हा केजरीवाल यांच्यावर शरसंधान करण्याचंही काही कारण नाही. ज्याला पाहूनच 'हा केवळ भामटा असावा..' अश्या कुमार विश्वास नामक इसमावर अण्णांचा इतका विश्वास कसा काय..? -- आपली माहिती टिआरपी केंद्रित माध्यमांपुरतीच मर्यादित असताना 'पाहून' इसम भामटा कसा वाटतो? आंदोलन झालं आणि उघड उघड आरोप झाले म्हणून केजरीवाल / बेदी असे मॅगसेसे पुरस्कार विजेते लोक हे एकदम नालायक किंवा सवंग लोकप्रियतेच्या मागे किंवा पैसा हडपणारे होतात ? दर तीन चार महिन्यांनी होणारा इव्हेंट -- इतका अखंड उहापोह होऊन काय घडलं ? जर काही घडलं असतं तर हा "इव्हेंट" कदाचित करावा लागला नसता (असा माझा अंदाज आहे) गेली तीस वर्ष या कायद्यावर काय घडलं ? आत्ता गेल्या सहा सात महिन्यात काय पुढे गेलं ? जेपीसी / पी आय सी वरुन वाद झाला. मुरली मनोहर जोशी अध्यक्ष असलेला प्रस्ताव फेटाळला कारण सत्ता काँग्रेसची आहे -- त्यावर संसदेत वाद / चर्चा होऊ शकली असती. आणि अतिशय काठावर बहुमत असलेला नवा प्रस्ताव १६/३१ हा संसदेत पाठवण्यात आला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्द्याची दिशाभूल करण्यासाठी त्यात एक सब-आरक्षण ठेवण्याचं नवं पिल्लू सोडण्यात आलं.. एकी कडे पंतप्रधान कार्यालयातून ज्याच्याशी पत्रव्यवहार होतो त्या व्यक्तिबद्दल त्याच पक्षाचे प्रवक्ते / जनरल सेक्रेटरी काय वाट्टेल ते बोलू शकतात. मग खरं काय ? संसदीय लोकशाही नुसार चर्चा प्रस्तावावर लालूप्रसाद यांनी तास दिड तास भाषण केलं त्याचा काय अर्थ होता.. एक विधान वाचलं -- ' कल ये लोकपाल आयेगा तो एक मामुली दरोगा हमें लाकअप में डाल देगा' -- काय असंच सहज कोणत्याही मोठ्या राजकारण्याला आत टाकता येतं का? मग ही भीती संसदेत बोलून दाखवण्याइतकं यांनी काय केलं आहे? अशा परिस्थितीत एका कायद्यासाठी आंदोलन तेही उपोषण करण्यात काय चूक आहे? या सगळ्या स्थितीचा विचार करता --> लाख लाखभर मेणबत्तीबाज अन् टोपीबाज -- इतकी उथळ विधानं करण्याचं काहीच कारण नाही.. देश का दुसरा गांधी है अशा भंपक विधानांना खुशाल लाथाडा.. अण्णांनी संबंध नसलेल्या कार्यक्रमात जाणं यावर लिहा. पण बळंच आजवर कधीही मोठ्या कारणाशिवाय किंवा ट्रक भरुन आणल्याशिवाय न जमा होणारी जनता लाखोनी एकत्र येते आहे एका चांगल्या कारणासाठी तर येऊ दे की त्यांची मेणबत्ती बाज म्हणून हेटाळणी कशाला... थोडा तरी बदल होत असेल तर बराच आहे की.. आजवर कधी आले होते के देशभरात लोक एकत्र गेल्या साठ वर्षात ? टोपी सारख्या इतर सर्व गोष्टी या मार्केटिंगचा भाग असतात पक्षीय लोकशाहीत जे अति सवंग मार्केटिंग चालतं ते योग्य आणि पक्षापलिकडे असलेलं आंदोलन टोपीबाज? किंबहुना ज्यांच्या हेतूंबद्दल निश्चितच शंका आहे -- हिडन अजेंडा -- याचा बेस काय ? असंच?? मग रोज दिग्विजय / बेनी प्रसाद / मनीष तिवारी जे काही बोलतात त्या हेतूंबद्दल काय ? बंदोबस्त आणि मोठं मैदान -- सोयीसाठी. निवडून येण्याच्या प्रचारासाठी कोटी कोटी खर्चून सभा होतात आणि शेकडो कोटींचा खर्च दर पाच वर्षांनी होतो.. एकूणात अण्णा विरोध म्हणजे भ्रष्टाचाराचे समर्थन नाही पण विरोधाला काही योग्य मुद्दे किंवा दिशा असावी. समर्थन नसेल तर नसू दे. प्रत्येकाला पटलंच पाहिजे असं नाही पण असलाच टी आर पी वाला धागा काढण्यातही काही अर्थ नाही. (कोणत्याही पक्षात किंवा संघटनेत (IAC सह) नसलेला) मैत्र

In reply to by मैत्र

बाय द वे, प्रथम 'ऑगस्ट क्रान्ती', आता 'डिसेंबर क्रान्ती', 'स्वतंत्रता की दुसरी लडाई' इत्यादी वाचाळ भंकपपणा आपल्याला पटतो का? मान्य आहे की आपल्या देशात आजही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे, बर्‍याचदा सरकारी कामात सावळा गोंधळ सुरू असतो.. परंतु ह्या ज्या काही त्रुटी आहेत त्या आपल्याच लोकांच्या आहेत. आज आपण सार्वभौम असून पूर्वीसारखे कुणा ब्रिटिशांचे गुलाम नाही. आणि आपल्याला ही सार्वभौमता दिली आहे हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी..! असे असताना सार्वभौम भारतात 'स्वतंत्रता की दुसरी लडाई' यसारख्या आरोळ्या ठोकणे हा त्या सार्‍या स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे असे आमचे मत आहे.. आणि एवढाच जर भ्रष्टाचाराचा विरुद्ध लढा आहे तर टीम अण्णांचे हे सो कॉल्ड स्वातंत्र्यवीर लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरून बहुमताने (आपल्यासारखे इतरही १२५ करोड पैकी मतदाते असतीलच!) निवडून येऊन आपल्याला हवा तसा कायदा का करत नाहीत..? ही मंडळी 'निवडणुकीच्या मैदानात उतरा..' असं म्हटलं की शेपुट का घालतात..? की फक्त इव्हेन्टवजा/न्युइसन्सवजा फाईव्ह स्टार आंदोलनांच्या नावाखाली संसदेवर सतत पिस्तुल ताणायची आणि देणग्यांचा मलिदा गोळा करून आपापले एन जी ओ पोसायचे..?! बाय द वे, आंदोलनाच्या गर्दीत जमणारे हे टोपीबाज/मेणबतीवीर, बॉलिवुडवाले, मतदानाच्या वेळी मतदान न करता पिकनिक साजरी करत असतात.. जर यांनी मतदान केले तर चांगले उमेदवार बहुसंख्येने निवडून येतील.. कारण तसाही आंदोलनाच्या गर्दीत जमणारे हे टोपीबाज/मेणबतीवीर, बॉलिवुडवाले मतदार म्हणजेच 'सारे देश की जनता' असा केजरीवलांचा दावा आहेच..! कॉमॅ.

In reply to by कॉमन मॅन

आज आपण सार्वभौम असून पूर्वीसारखे कुणा ब्रिटिशांचे गुलाम नाही. आणि आपल्याला ही सार्वभौमता दिली आहे हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी..! Sovereignty is the quality of having supreme, independent authority over a geographic area, such as a territory. असे विकीपीडियावर वाचले. जर ही व्याख्या खरी असेल तर भारताला सार्वभौम म्हणणे म्हणजे 'सार्वभौम' शब्दाची व्याख्याच बदलण्यासारखे वाटते.

संपूर्णपणे सहमत. लोकपाल ही कल्पना भंपक आहे. अख्ख्या शासनव्यवस्थेवर लक्ष ठेवू शकेल अशी यंत्रणा उभारायची तर एक जगड्व्याळ अशी समांतर नोकरशाही उभी करावी लागेल. त्यातल्या भ्रष्टाचारावर नजर ठेवायला आणखी एक यंत्रणा...मग आणखी एक...वगैरे. आणि ही यंत्रणा राबवणारे लोक आमच्यातूनच येणार ना? तेच आम्ही की जे आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींना निवडून देत आलो आहोत? जे आतापावेतो यंत्रणा राबवीत आलो आहोत? की 'शुद्ध नीतिमत्ता'वाले लोक बाहेरून कुठूनतरी आयात केले जाणार आहेत? आपण तेव्हढे स्वच्छ-सफेद आणि बाकीचे मात्र बरबटलेले हा गंड बाळगणार्‍या या लोकांचा दर्प आता अगदी असह्य झाला आहे.

अण्णा हजारेंच्या विरोधात काँग्रेसने सोडलेले भुंकणारे आणि चावणारे असे दोन्ही प्रकारचे पेड पत्रकार इथेही लक्ष ठेवून असतात ही बाब मराठी संस्थळांच्या वाढत्या प्रभावाचे निदर्शक आहे. मुळात लिखाणाचा हेतूच प्रामाणिक नसल्यामुळे मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याची इच्छाच होत नाही.

महात्मा गांधींसारख्या 'महान आत्म्याने'ही त्यांच्या कार्यकाळात अनेक चुका केल्या होत्या हे अनेक चर्चांमधून पुढे आले आहे. तरीपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांना मानाचे स्थान आहे. संपूर्ण स्वातंत्र्याचे त्यांना प्रणेते मानले जाते. काही चुका श्री. अण्णा हजारेही करीत असतील पण म्हणून त्यांच्या उद्देशावर संशय घेणे अन्याय्य होईल. महात्मा गांधींच्या प्रत्येक सत्याग्रहातही त्या काळची १००टक्के भारतिय जनता सामिल नव्हती. जालियनवाला बाग मघ्ये संपूर्ण भारत जमला नव्हता, दांडीयात्रेत, मीठाच्या सत्याग्रहात किती भारतिय जनता शरीराने सहभागी होती? तरीपण, महात्मा गांधी संपूर्ण भारताचा आवाज म्हणून सरकारशी बोलत होते. ब्रिटीश जनतेसमोर भारताचे प्रतिनिधी म्हणूनच वाटाघाटी करायचे. तेव्हाही महात्मा गांधींचे समर्थक आपला कामधंदा सोडून महात्माजींच्या मागे धावत होते. त्याकाळीही महात्माजींचे काही समर्थक स्वार्थासाठी आंदोलनात उतरले असतील. त्यावर, महात्माजींचेही काही नियंत्रण नसणार. पण सर्वांच्या साथीने त्यांनी आपली आंदोलने, सत्याग्रह चालू ठेवले. शेवटी महात्माजींना यश आले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे संपूर्ण श्रेय कदाचीत महात्माजींचे नसेल पण त्यांचे पुढारीपण, त्यांचे योगदान, त्यांचा उद्देश कोणीही नाकारत नाही. मग, श्री. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यावर एवढी आगपाखड कशा करीता?

In reply to by प्रभाकर पेठकर

काही चुका श्री. अण्णा हजारेही करीत असतील पण म्हणून त्यांच्या उद्देशावर संशय घेणे अन्याय्य होईल.
आम्ही खुद्द अण्णांच्या उद्देशावर कुठेही संशय व्यक्त केलेला नाही. आमचे सर्व लेखन हे केवळ त्यांच्या 'टीम' (केजरीवाल, बेदी, सिसोदिया, मयंक आदी महान प्रभुती) बाबत आहे.
महात्मा गांधींच्या प्रत्येक सत्याग्रहातही त्या काळची १००टक्के भारतिय जनता सामिल नव्हती. जालियनवाला बाग मघ्ये संपूर्ण भारत जमला नव्हता, दांडीयात्रेत, मीठाच्या सत्याग्रहात किती भारतिय जनता शरीराने सहभागी होती?
अगदी खरे..! परंतु गांधींसोबत जे काही सत्याग्रही होते ते कुठेही सतत 'आमच्यासोबत सारा देश आहे' अशा वल्गना करत नव्हते. ते केवळ गांधींच्या चळवळीत भाग घेऊन आपापला वाटा उचलत होते. शिवाय गांधींचा मिठाचा सत्याग्रह हा गांधींच्या सहकार्यांनी कुणाकडूनही लाखो रुपायांच्या देणग्या घेऊन प्रायोजित करून घेतला नव्हता, ना माध्यमांना हाताशी धरून कुणी त्याचे 'लाईव्ह कव्हरेज' मॅनेज केले होते! गांधींचे उपोषण कधी त्याचा जगजाहीर गाजावाजा करून झाले नाही जे सध्या अण्णा नव्हे परंतु त्यांची टीम करते आहे.
त्याकाळीही महात्माजींचे काही समर्थक स्वार्थासाठी आंदोलनात उतरले असतील.
आम्हालाही टीम अण्णांबद्दल हेच म्हणायचे आहे!
त्यावर, महात्माजींचेही काही नियंत्रण नसणार.
टीम अण्णांच्यावर अण्णांचेही काही नियंत्रण राहिलेले नाही हेच आम्हाला आमच्या लेखातून सांगायचे आहे. --कॉमॅ.

In reply to by कॉमन मॅन

परंतु गांधींसोबत जे काही सत्याग्रही होते ते कुठेही सतत 'आमच्यासोबत सारा देश आहे' अशा वल्गना करत नव्हते. कुठलीही चळवळ चालविण्यासाठी सोबत जनशक्ती लागते. प्रत्येकाला व्यक्तीगत पातळीवर चळवळीचा उद्देश समजावून चळवळीत सहभागी करून घेणे म्हणजे काळाचा अपव्ययच होईल. त्यामुळेच, 'सर्व जनता आमच्या पाठीशी आहे तुम्ही सुद्धा या' असा नारा देऊनच चळवळ वाढवत न्यावी लागते. गांधीजींच्या सहकार्‍यांनी, गावोगावी फिरून सभा घेऊन हेच आवाहन सर्वांना करून बरोबर घेत होते. शिवाय गांधींचा मिठाचा सत्याग्रह हा गांधींच्या सहकार्यांनी कुणाकडूनही लाखो रुपायांच्या देणग्या घेऊन प्रायोजित करून घेतला नव्हता, ना माध्यमांना हाताशी धरून कुणी त्याचे 'लाईव्ह कव्हरेज' मॅनेज केले होते! गांधींचे उपोषण कधी त्याचा जगजाहीर गाजावाजा करून झाले नाही जे सध्या अण्णा नव्हे परंतु त्यांची टीम करते आहे. गांधीजींचे सहकारी मोतीलाल नेहरू गडगंज श्रीमंत होते. त्यांनी आपले सर्व ऐश्वर्य गांधीजींच्या आंदोलनांवर खर्चिले. असे इतरही अनेक उद्योजक छुपा आर्थिक पाठिंबा देणारे होते. त्याकाळच्या राजकिय परिस्थितीनुरुप गाजावाजा करून पाठींबा देणे सोयिस्कर नव्हते. गांधीजींच्या आंदोलनाचे, उपोषणाचे 'कव्हरेज' भारतीयच नाही तर विदेशी वृतपत्रांनीही केले होते. गाजावाजा झाल्याशिवाय, जनतेचे समर्थन असल्याचे दाखविल्याशिवाय इंग्रज सरकार नमले नसते. एकटे गांधीजी आहेत त्यांच्या सोबत भारतिय जनता नाही असे जाणवले असते तर इंग्रजांनी गांधीजींनाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या असत्या. टीम अण्णांच्यावर अण्णांचेही काही नियंत्रण राहिलेले नाही हेच आम्हाला आमच्या लेखातून सांगायचे आहे. हे, टोकाची विखारी टिका टाळूनही सांगता आले असते. भ्रष्टाचार आहे हे सर्वांनाच मान्य आहे. काही मंत्र्यांचे भ्रष्टाचार तर आकड्यात कागदावर मांडूनही दाखविता येणार नाहीत. सार्वभौम संसदेत जनहितार्थ कायदे करण्यासाठी, सर्वदूर वैद्यकिय सेवा, शैक्षणिक सुविधा पोहोचविण्यासाठी, भारताला जगाच्या स्पर्धेत खंबिरपणे उभे करण्यासाठी भोळीभाबडी जनता लोकप्रतिनिधींना निवडून देते आणि ह्यातलेच भ्रष्ट मंत्री सत्तेचा गैरवापर करीत असतील तर त्यावर अंकुश हवा म्हणून लोकपालाची मागणी करण्यात येत आहे. त्यात काही त्रूटी असतील तर त्या चर्चेद्वारे दूर केल्या पाहिजेत. हे सर्व आम जनतेच्या भल्यासाठीच होत आहे. कुणा एकट्या अण्णा हजारे किंवा त्यांच्या ४-५ सहकार्‍यांच्या फायद्यासाठी होत नाहीए. तेंव्हा ह्या चांगल्या कार्याला आपण समर्थन देऊया. समर्थन द्यायचे नसेल तर निदान त्या कार्याची, सहकार्‍यांची खिल्ली तरी नको उडवूया. माझ्याकडून विषय संपला आहे. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

आपली काही मते पटली. आभारी आहे. परंतु,
काही मंत्र्यांचे भ्रष्टाचार तर आकड्यात कागदावर मांडूनही दाखविता येणार नाहीत.
हे मंत्री कोण निवडून देतो..?
भारताला जगाच्या स्पर्धेत खंबिरपणे उभे करण्यासाठी भोळीभाबडी जनता लोकप्रतिनिधींना निवडून देते
यू सेड इट..! जोवर जनता भोळीभाबडी आहे तोवर असेच चालणार असे आमचे मत आहे. आम्ही पुन्हा पुन्हा हेच सांगतो आहोत की लोकप्रतिनिधी काही आकाशातून पडत नाहीत. ते जनतेपैकीच एक असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेचेच प्रतिबिंब. सबब, आपण जेव्हा सरकारवर किंवा लोकप्रतिनिधींवर बोटे रोखतो तेव्हा इतर बोटे आपल्याकडेच निर्देश करत असतात हे ध्यानी ठेवले पाहिजे. एका हाताने टाळी कधीच वाजत नाही. जेव्हा जेव्हा लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचाराचा आरोप होतो तेव्हा तेव्हा त्याची अर्धी जबाबदारी ही लोकप्रतिनिधींना/सरकारी कर्मचार्‍यांना लाच देणार्‍या जनतेवरच असते. जनता सुधरली तर लोकप्रतिनिधी आपोआपच सुधारतील. जनता जर स्वच्छ चारित्र्याची असेल तर लोकप्रतिनिधीही स्वच्छच मिळतील कारण ते जनतेतूनच उभे राहतात. त्यामुळे सद्य सुरू असलेले जनाअंदोलन हे सरकारला अथवा लोकप्रतिनिधींना धारेवर धरण्यासाठी नसून आम जनतेला सुधारण्यासाठी हवे. आंदोलनापेक्षा प्रबोधनाची आवश्यकता अधिक आहे असे आमचे मत आहे. जनलोकपालमुळे लोकप्रतिनिधींवर काही वचक बसेल आणि रामराज्य येईल ही भोळ्याभाबड्या जनतेची कल्पना तेवढीच भोळीभाबडी आहे असे म्हणावे लागेल. आध्यात्मात असे म्हटले जाते की देव बाहेर इतरत्र नसून तो स्वतःमध्येच असतो, तो स्वतःमधेच शोधावा, ओळखावा. तद्वत जनतेतील प्रत्येक माणूस जेव्हा स्वत:पासूनच भ्रष्टाचाराला नकार द्यायचं ठरवेल तेव्हाच त्या जनतेतून भ्रष्टाचारमुक्त नेतेही मिळतील व भ्रष्टाचाराची कीड दूर होईल. असो, आमच्याकडूनही हा विषय संपला आहे. आपल्या मतांचा आदर आहे.. ता क - काल अण्णा तापाने बरेच आजारी होती, त्यातून पूर्णत: उपाशी. असे असूनसुद्धा मैदानाच्या बाजूने जे जेवणाचे स्टॉल लावले होते त्यात अण्णा-समर्थकांसोबतच रांगा लावून भोळीभाबडी जनताही उभी होती याचे मात्र सखेद आश्चर्य वाटले! असो. सैन्य जसे भाकरीवर चालते असे म्हणतात त्याच चालीवर आंदोलकही भाकरीवरच चालतात असा युक्तिवाद भोळ्याभाबड्या जनतेकडून होऊ शकतो. चालायचंच..! --कॉमॅ.

कॉमन मॅन- ही असली विखारी जळजळ तुम्ही एखाद्या भ्रष्ट पुढार्‍याच्या बाबतीत ओकलेली आठवत नाही! कशी करणार म्हणा- तो पुढारी xxxx वर फटके मारून, हात-पाय तोडायची भीती! अण्णा पडला अहिंसावादी, तिथे ही भीती नाही, मग चालू द्या, काय होतय काहीही बरळलं तर- नाही का? बाकी चालू, द्या. गरळीतले मुद्दे प्रतिवाद करण्याच्या लायकीचे नाहीत.

पण सहमत नाही. आण्णा हजारेंनी लोकांना जागे करण्याचे काम केले आहे. मध्ये मध्ये असे केले नाही तर वित्तीय घोटाळे पराकोटीला जातील. निदान लोकांना समजले पाहिजे व सगळ्यात मुख्य म्हणजे तरुण पिढी. नाहीतर हल्ली, मॅनेजमेन्ट टेकनीक म्हणून भ्रष्ट व अनैतिक आचरणावर टू मॅनेज असे म्हणून शिक्कामोर्तब व्हायचा व तरुण पिढीचे मन अजूनच बोथट व्हायचे.

मला कॉमन मॅनवर संजय राऊत, कुमार केतकरांचा प्रभाव दिसत आहे.

जो गुन्हा करेन .. मग तो भ्रष्टाचार असो, विनयभंग असो, चोरी असो वा अजुन काही असो त्याला प्रखर शिक्षा हवीच हवी.. आणि कायद्याने त्या केसेस लवकर सोडवुन अतिशय कडक निर्यय तत्काळ राबिवले तर असे काम करण्यास लोक हजारदा विचार करतील ... जर लोकपाल अश्या पद्धतीने काम करणार नसेन तर कसलाही कायदा आला तरी त्यातुन सुटणारे आपोआप सुटणारच... बाकी अण्णांच्या अंतिम ध्येयाप्रति आदर असला तरी आत ज्या पद्धतीने त्यांचे बोलणे चालले आहे त्यावरुन खुप उथळपणा जाणवतोय.. वरती गांधीजींचे उदाहरण दिले म्हणुन सांगतो, गांधीजे हे खुप महान होते.. त्यांचे अनुकरण कोणी करत असेन तर ते नक्कीच छान आहे, ते सर्वात अवघड काम आहे.. पण अनुकरण करताना मीच गांधी आहे.. मी म्हणेण तसेच झाले पाहिजे ही अरेरावी योग्य वाटत नाही ... राजकारण्यांच्या विरोधात काहीही केले तरी त्यांच्यात बदल घडवणे फक्त कडक कायदे केले तरच संभव आहे,, फक्त केसेस उभ्या करणे आणि त्या असंख्य काळ चालवणॅ म्हणजे नक्कीच योग्य पद्धत नाही... लोकपाल हे ही उद्याचे राजकारणीच असणार आहेत ... त्यामुळे एव्हडेच म्हणतो कायद्यापेक्षा आधी स्वता: मोठे होउ नका.. नाहितर उद्या कायद्याला काडीची किंमत राहणार नाही...

गांधीजे (गांधीजी) हे खुप महान होते.. हे वादग्रस्त विधान आहे. ह्यावर बराच वाद आधीही झालेला आहे. म्हणून आवरते घेतो. पण अनुकरण करताना मीच गांधी आहे.. श्री. अण्णा हजारे हे गांधीजींचे अनुकरण करीत आहेत असे मी म्हंटलेले नाही. असे त्यांनीही म्हंटलेले नाही. महात्मा गांधी हे त्यांचे आदर्श आहेत असे मत श्री. अण्णा हजारेंनी व्यक्त केले आहे. 'मीच गांधी आहे' असे त्यांनी तरी कुठे म्हंटलेले मी ऐकले नाही. तसा काही पुरावा आपल्या जवळ असेल तर तो मिपावर सादर करावा. मी ही श्री. हजारेंचा निषेध करेन. गांधीजींचे उदाहरण, प्रस्थापितां विरूद्ध लढलेला लोकनेता एवढ्याच संदर्भासाठी घेतलेले आहे. श्री. अण्णाही प्रस्थापितांविरुद्ध लढत आहेत. मी म्हणेण (म्हणेन) तसेच झाले पाहिजे ही अरेरावी योग्य वाटत नाही ... भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना तो निपटण्यासाठी काय काय आणि कसे कसे कायदे असावेत, लोकपालाला कोणकोणते अधिकार देणे गरजेचे आहे, लोकपाल भ्रष्ट झाल्यास त्यावर कारवाई कोणी करावी, लोकपालावर अंकुश कसा ठेवावा आदी बाबींचा विचार लोकपाल मसुद्यात केलेला आहे. त्यावर चर्चा होऊन कार्यवाही व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. राजकारणी नेते आपल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये म्हणून सशक्त लोकपालाला 'अशक्त' बनवायचा प्रयत्न करीत असतील तर ते प्रयत्न हाणून पाडणे म्हणजे 'अरेरावी' होत नाही. पुन्हा सांगतो, श्री. अण्णा हजारे काही बाबतीत चुकतही असतील पण त्यांचा उद्देश चुकिचा आहे असे म्हणता येणार नाही. जर आपण धुतल्या तांदुळासारखे असू तर लोकपालाची भिती कशाला? पण तशी भिती वाटते हेच ह्या राजकारण्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे द्योतक आहे. आणि ह्यातूनच लोकपालाला विरोध सर्वस्तरावर होत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

जर आपण धुतल्या तांदुळासारखे असू तर लोकपालाची भिती कशाला? पण तशी भिती वाटते हेच ह्या राजकारण्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे द्योतक आहे.
सहमत आहे. शिवाय जाताजाता: काँग्रेस हा तत्वतः पक्ष नसून स्वार्थासाठी एकत्र आलेल्या सत्तालोलुप आणि हुजर्‍या लोकांची ती एक झुंड आहे. अशा लोकांचे घाणेरडे पाय आपण संसदेच्या छातीवर गेली पन्नास वर्षं झेलले पण आज काही लोक त्यांना आव्हान देताहेत तर संसदेचे पावित्र्य आठवतेय काय? इतकी तुमची संसद पवित्र आहे तर का नाही उठला कोणी माईचा लाल जेव्हा संसदेत प्रश्न विचारायला खासदार लोकांनी पैसे खाल्ले तेव्हा? जेव्हा संसदेवर हल्ला झाला तेव्हा? जेव्हा सर्वाना समान समजले जावे असे सांगणार्‍या लोकशाहीत लालू सारखे चोर लोक संसदेत बसून खुशाल "एक मामुली दरोगा" असे शब्द वापरतात तेव्हा? या महान संसदेला उत्तरदायी असलेले सरकार सरळ सरळ घटनाबाह्य सत्ताकेंद्रामार्फत चालवले जाते तेव्हा? महात्मा गांधींनी केला तर तो सविनय कायदेभंग आणि अण्णा हजारेंनी केला तर तो संसदेचा अपमान काय? उलट असा कायदा संसदेत पास करा असा आग्रह धरणे म्हणजेच संसदेवर अजून विश्वास आहे हे सिद्ध होत नाही काय? अन्यथा याच संसदेत पास केलेले कित्येक कायदे किती कठोरतेने पाळले जातात ते शेंबडं पोरगंपण सांगू शकेल. अण्णा हजारेंनी पक्ष काढून, निवडून येऊन लोकपाल कायदा पास करून घ्यावा असे म्हणणारे आपल्या या महान प्रजातंत्रातल्या प्रजेच्या नेभळटपणाबद्दल आणि स्वतःच्या निवडणूक तंत्राबद्दल इतके नि:शंक आहेत की अण्णा हजारेंनी पक्ष काढला तरी ते निवडून येऊ शकणार नाहीत यांची त्यांना खात्री आहे आणि म्हणूनच ते असं म्हणतात. एवढे जर अण्णा हजारे चुकीचे आहेत तर का नाही याच महान संसदेत कायदा करून अण्णा हजारेंचे आंदोलन बेकायदा ठरवून त्यांना अटक करत? तसे करणे या राजकारण्यांच्या नीतिहीन कण्याला झेपणारे नाही. त्यापेक्षा स्वतःची बुद्धी वापरता न येणार्‍या लोकांचा बुद्धिभेद करणे सोपे आहे. नाही का?

In reply to by धमाल मुलगा

पेठकर काका आणि ननि दोघांशी सेंट परसेंट सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकरजी धन्यवाद,
पुन्हा सांगतो, श्री. अण्णा हजारे काही बाबतीत चुकतही असतील पण त्यांचा उद्देश चुकिचा आहे असे म्हणता येणार नाही.
बरोबर आहे.. त्यांच्या अंतिम उद्देशाबद्दल काहीच प्रश्न नाही... त्यामुळे पहिल्या उपोषणाच्या वेळेस त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच लवकर झाले पाहिजे असेच वाटत होते.. आता ही ते तसेच वाटते आहे.. खाली दिलेला नगरीनिरंजन यांचा ही रिप्लाय आवडला.. पण तरीही मनापासुन मला वयक्तीक रित्या अण्णा हजारेंचे आंदोलन काही तरी आणखिन ध्येय समोर ठेवल्यासारखे वाटते आहे.. कदाचीत तसे वाटणे माझा दोष असेन.. आणि मला वाटते तसे नसावे अशी माझी ही इच्छा आहे.. बाकी 'मीच गांधी आहे ' असे स्पष्ट ते बोलले नाहीत , त्यामुळे तुम्ही निषेध करु नका, वयक्तीक रित्या त्यांच्या आताच्या वागण्यातुन.. बोलण्यातुन मला तसे वाटते आहे म्हनुन मला तसे वाटले... अवांतर : बाकी गांधी महान होते या वाक्यांवरुन वाद होणे ही अपुर्ण अभ्यास किंवा दूसरी बाजु जास्त बिंबल्याची निशानी आहे, माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मी ही गांधी विरोधी मतांचा होतो, पण जेंव्हा मित्रांच्या अभ्यासपुर्ण सर्व स्पष्टिकरणामुळे मला योग्य त्या गोष्टी लक्षात आल्या, आणि आपले म्हणणे कसे चुकीचे आहे हे कळाळे. येथे वाद होउ नयेत म्हणुन मी कधीच असे वादग्रस्त धागे येथे काढलेले नाहीत पण ते स्पष्टीकरण देण्याच्या विचारात आहे

In reply to by गणेशा

येथे वाद होउ नयेत म्हणुन मी कधीच असे वादग्रस्त धागे येथे काढलेले नाहीत पण ते स्पष्टीकरण देण्याच्या विचारात आहे
नक्की द्या.. कारण गांधी महान नव्हते आणि त्यांच्या मुळे भारताचं फार मोठं नुकसान झालय असं मला (काहीही अभ्यास नसताना) उगाच वाटत आलय... जर कुणी नीट समजावेल तर मला जो त्रास होतो (एका माणासाच्या अट्टाहासानी देशाच नुकसान झालं ह्या विचारानी...) तो तरी थांबेल..

In reply to by पिलीयन रायडर

हो देइन नक्की ... पण येथे बाकी नेट ब्लॉक आहे, त्यामुळे टाईम लागेन.. मला ही आधी तुमच्यासारखेच वाटायचे.. आता पर्यंत मित्रांच्यात विषय निघाला की मी तरी गांधेविरोधीच बाजु घ्यायचो.. असेच नेट वर वाद विवादात मी लिहिल्यावर , आलेली माहिती माझ्यासाठी थक्क करणारी होती.. प्रत्येक निर्णय का आणि कुठल्या कारणांमुळे घावे लागले हे कळाल्याने, गांधी माझ्या मनात तरी खुप मोठे झाले..

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकरजी,
''संसदेत जे चालू आहे ते खेदजनक आहे. त्यामुळे मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता एकच मार्ग उरला आहे आणि तो म्हणजे, पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रचार करणे
अजुन ऑफिस मध्येच आहे, घरी गेल्यावर बातम्यात निट्से कळेल, पण सकाळ मधील या बातमीत असे स्पष्ट लिहिल्याने, अखेर पर्यंत लढणार ... असेच विधेयक आणणार असे बोलताना एका एकी उपोषण मागे.. सगळे बोलणे फिरल्यासरखे वाटले.. वाईट वाटले.. पण अण्णांची संधिग्ध भुमिका वाटत राहिल्याने ,शेवट असाच होयील हे आधीच माहिती असल्याने त्यांचे मार्ग यावेळेस चुकीचे होते असे म्हंटले होते. जर शेवट पर्यंत लधा देणार तर मग हे काय आहे, निवडनुकात कॉग्रेस विरोध करुन लोकपालचा शेवतपर्यंत लढा कसा होयील. तो सशक्त लोकपाल साठीच पाहिजे होता ना ?

सर्व प्रतिसादींचे आभार. ज्यांना आमच्या लेखातील कुठलेही मुद्दे उत्तर देण्याच्या लायकीचे वाटले नाहीत अथवा आमचा लेख म्हणजे केवळ 'विखारी जळजळ आहे' असे वाटले अशा वाचकांचेही आदरयुक्त आभार. काही जणांनी आम्हाला सरकारी चावण्या-भुंकणार्‍यांची उपमा दिली आहे त्यांचे तर फार फार आभार.. कारण शेवटी सरकार नामक संस्था काही आकाशातून पडत नाही, तर आपणच ती मतपेटीतून निवडून देतो. तात्पर्य, सरकार म्हणजे आपणच! आपल्यातलेच काही लोक नेते बनून निवडणुकांना उभे राहतात व आपण त्यांना निवडून देतो. पुढे संसदीय लोकशाहीतील सरकार स्थापनेच्या प्रक्रियेनुसार ही मंडळी सरकार स्थापन करतात व 'सरकार' नामक संस्थेचा जन्म होतो. आपल्या लोकशाहीमधील सदर संसदीय निवडणूक व सरकार स्थापनेच्या प्रक्रियेबद्दल आदर असणार्‍या सर्व वाचकांचे पुन्हा एकवार मनापासून आभार. --कॉमॅ.

अत्यंत फालतू लेख. पहिल्या चार ओळी वाचून काहि करमणूक होईल अशी आशा होती... ती देखील झाली नाहि. बाकी "कॉमन मॅन" ही आयडी मात्र सार्थक ठरवलीत. भारततला कॉमनमॅन आहेच असा. पहिले तर काहि शिजु द्यायचं नाहि.... शिजलं तर निवेपर्यंत उसंत धरायची नाहि... त्याउपरही काहि पडलच पानात तर त्यात माती कालवायची... आणि वर आपण उपाशी आहोत म्हणुन गळे काढायचे. त्यातही कोण जास्त उपाशी आहे त्यावरुन काँपीटिशन लावायची... आणि सवलती/आरक्षण/पॅकेजच्या गाजराची पुंगी ऐकुन दारु ढोसायची आणि पुढील निवडणुकीपर्यंत बूड वर करुन खाटेवर घोरत ताणुन द्यायची... चालायचच (अरे पण किती...) (सामान्य भारतीय) अर्धवटराव