Skip to main content

माझी फजिती....

लेखक धमाल मुलगा यांनी मंगळवार, 08/04/2008 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी ! काय मोठ्या हौसेने आलात ना वाचायला, धमाल्याची कशी फजिती झाली ते? हं...असा नाही सोडणार तुम्हाला! इथे आपण आपापली झालेली फजिती एकमेका॑ना सा॑गूया! तेव्हढीच मजा! काय? पटत॑य का? चला, सुरुवात मी करतो. इयत्ता ११वी. टवाळपणाला नुकतेच नवे धुमारे फुटलेले. सकाळी कॉलेजमध्ये गेल्यापासून एकही लेक्चर न करता, माझ्या ल॑गोटीयारसोबत आख्ख॑ कॉलेजभर ऊतमात घालत फिरत होतो. जरा क॑टाळा आला की कुठं चहाच पी, कुठं वडापाव खा असा सुखनैव दिनक्रम चालू होता. साधारणतः दुपारचे ४ - ४:३० झाले असावेत.चहाची तल्लफ आली म्हणून कॅंटीनमध्ये शिरलो. ऐटीत ऑर्डर सोडली..."दत्तु, दोन चहा...कप विसळून" सहज म्हणून खिशात हात घातला तर काय, शिल्लक फक्त १.५०/- . पिट्याला, माझ्या मित्राला विचारल॑, "पिट्या, लेका दिडच रुपाया शिल्लक आहे. काय करायच॑?" पिट्या म्हणाला माझ्याकड॑ २.५० रु. उरलेत. म्हणल॑ चला, चहाच॑ बिल तर निघाल॑, पुढच॑ पुढे बघू. दत्त्यान॑ चहा आणून ठेवला. कपात डोकावल॑ तर चहा नेहमीपेक्षा जास्त गोरा दिसला! पिट्या म्हणाला, "च्यायला, दत्त्यान॑ स्पेशल दिला काय?" आता आम्ही दोघ॑ही जरा टरकलो. नविनच होतो कॉलेजात. कँटीनचा मालकही ओळखीचा झाला नव्हता. "आता बहुतेक कपबश्या विसळून पैसे फेडावे लागणार" असे दात काढत विनोदाला "कारुण्याच॑ झालर" लावत तो चहा स॑पवला. दोघेही घाबरतच काउ॑टरपाशी गेलो. आम्हाला बघून दत्त्या ओरडला..."दोन कट्टींग्ग...च्यार रुपै" जे काय हुश्श्य झाल॑ म्हणून सा॑गतो! त्या आनंदात एकमेका॑च्या खा॑द्यावर हात टाकून...अगदी गळ्यात गळे स्टाईल..जोरजोरात स्वतःच्या दोन मिनिटा॑च्या अवस्थेवर खळाळून हसत निघालो. कँटीनच्या दाराशी पोहोचलो खरं, पण ह पिट्या लेकाचा निव्वळ वेंधळा, येड॑ सरळ चालत जाऊन पायर्‍या उतरायच्या सोडून आधीच डावीकड॑ वळाल॑. गळ्यात गळे असल्याने आमचीही वरात त्याच्याबरोबर. पायर्‍या बियर्‍या सगळे मिथ्य असल्याच्या आविर्भावात दोघ॑ही २ सेक॑द हवेत तरंगलो आणि शेवटी धाप्पकन तोंडावर पडलो...पड्लो ते पडलो, हात अजुनही एकमेका॑च्या गळ्यातच. झटक्यात उठलो आणि सगळ्यात पहिल॑ काम केल॑ ते...चुकलात, तुम्हाला काय वाटल॑ कुठ॑ लागल॑ ते पाहिल॑...छट..कुठच्या मुलीन॑ नाही ना पाहिली ही फजिती हे पाहिल॑. त्यान॑तर जे काही हसत सुटलो...अग्ग्ग्ग्ग..आजही आठवल॑ तरी हसु येत॑. ================================ चला, आता कोण लावत॑य न॑बर? सा॑गा सा॑गा...आम्हाला पण हसु द्या, कसे ग॑डलात ते सा॑गा !!!!

वाचने 44896
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

मा़झ्या १०वी नंतर १-२ वर्षांची गोष्ट आहे (२००३-२००४). त्या वेळी माझ्या लंगोटी मित्राच्या ताईसाठी मॅट्रिमोनी साईट्स वर रजिस्ट्रेशन वगैरे चं का चाललं होतं. ह्या भ्**ला माझा ई-मेल चा पासवर्ड त्याला माहीत होता. ह्यानी परस्पर माझं अकाऊंट रजिस्टर आणि व्हेरिफाय केलं. वरती घरचा लँडलाईन नंबर देऊन ठेवला. जेमतेम ७-८ दिवसांनी नेमके पिताश्री घरी असताना फोन आला. ते संभाषण असं होतं साधारणं. पिताश्री : नमस्कार, दातार बोलतोय. वधुबंधु वर्तक : नमस्कार. मी अमुक अमुक वर्तक बोलतोय. तुमचा मुलगा लग्नाचा आहे असं कळलय. आमच्या अपेक्षांमधे तुमचा मुलगा बसतोय. पिताश्री (आमरिश पुरींचे वटारलेले डोळे करुन अस्सल सानुनासिक स्वरामधे) : कोणी सांगीतलं आपल्याला? वधुबंधु वर्तक (बहुतेक चपापलेल्या आवाजात) : अहो, अमुक अमुल वेबसाईटवरुन माहिती मिळाली म्हणुन फोन केलाय. पिताश्री : आमचा बैल आत्ता हाप पँटीतुन फुल पँटीत आलाय. बालविवाह मान्य असेल तर भेटु. तुम्हाला चुकीची माहिती मिळालिये हो. आत्ताशिक कार्टं कॉलेजात जायला लागलाय. फोन कट केल्यावर नंतर भलं मोठ रामायण घडलय. अस्सल को.ब्रां.ची जीभ किती तिरकी वळु शकते त्याचा ह्याची देही अनुभव घेतलाय. अकाऊंट डी-अ‍ॅक्टीव्हेट करेपर्यंत अजुन ३-४ फोन येउन गेले वेगवेगळे. शिवाय हे नक्की कसं झालं ते ऑलमोस्ट ६-७ महिन्यानी समजलं. =))

Khupch majeshir , hasun hasun damlo rav . baki eng. Lihalyabaddal sorry , mobile varun Mipa vaprat asalyane marathi lihita yet nahi.

In reply to by Pradip kale

मी तर मोबाईलवरून आक्ख्या लेखांचे मुद्रितशोधन करतो! ;-) सोप्पंय मोबाईलवरून मिपावर मराठी टंकन करणं. इथेच उजवीकडे मदत आहे की. http://www.misalpav.com/node/1312 प्रयत्न करा.

परवा मॉल मध्ये गेलो होतो तर बायका आणि पुरुषांची वेगवेगळी लाईन आत सोडत होते.. मी बायकांच्या लाईन मधुन पुढे आले आणि शेजारुन नवरा पुरुषांच्या लाइन मधुन.. मी पुढे येऊन गडबडीने नवर्‍याचा हात धरायला गेलेच की तो हात एकदम दचकला... तिरप्या नजरेतुन पाहीलं.. मागे नवरा दिसला आणि मी जो हात पकडायला निघाले होते त्याचा मुळ मालक हात छातीशी घेऊन घाबरुन माझ्याकडे पहात होता... नवरा भयानक पेटला होता हे वेगळं सांगायला नको!!! बरं ह्यातुन काही बोध घेऊन जरा ताळ्यावर राहुन जगात वावरावं ना... २ च दिवसानी ऑफिसमध्ये तरातरा वॉशरुम मध्ये घुसले.. समोर एक पुरुष बेसीनसमोर गोठुन आरशातुन माझ्याकडे पहात होता.. "सॉरी..सॉरी.." म्हणत धुम ठोकली... (ह्यात टेक्निकली माझी चुक नव्हती.. आमच्या नव्या हापिसात सगळे फ्लोअर्स अगदी डिट्टो सेम आहेत.. पण स्त्री-पुरुषांचे वॉशरुम मात्र आलटुन पालटुन डावीकडे - उजवीकडे आहेत..हे मला माहित नव्हतं.. मी माझ्या फ्लोअरच्या सवयीने डावीकडे घुसले..!! )

In reply to by पिलीयन रायडर

हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड माझ्या हातूनही होत असे. लेडीजसाठी डच शब्द आहे dames आणि जेंटलमेनसाठी शब्द आहे heren. चिन्हं असतील तर प्रॉब्लेम नसायचा. पण नुसते शब्द लिहिलेले असतील तर गोंधळ - dames हा शब्दही स्त्री-निदर्शक (उदा. Dame Judy Dench) आणि heren ही (his and her मधलं her). मग काय, देवाचं नाव घेऊन घुसायचं कुठेतरी!

In reply to by आदूबाळ

स्विडीशमध्ये पण हिच बोंब आहे. 'herr' म्हणजे 'Mr'. सुरुवातीला कळायचंच नाही. कोणी दुसरा माणूस ज्या दरवाजानं जात असेल तर त्याच्या मागोमाग जायचं, असं करावं लागे.

In reply to by पिलीयन रायडर

हा हा हा. डोळ्यासमोर पिराने दुसर्‍या मनुक्षाचा हात धरलाय हे दृष्य आलं आणि फिस्सकन हसले. वॉशरूम बाबत मी अजूनतरी असे काही केले नाहीये पण मुलगा साधारण मोठा झाल्यावर माझ्याबरोबर मॉलमध्ये महिलांच्या रेस्टरुमला येत नसे. त्याचे त्याला पुरुष विभागाकडे जायचे असे. बरे, आपले काम उरकून यावे तर तसे नाही. उगीच याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ असे करत वेळ काढत असे, तर कधी खरेच गर्दी असे. नवरा बरोबर नसला तर पंचाईत! मी वाट बघून नको नको ते सगळे विचार, काळज्या करून झाल्यावर एकदा बाहेरूनच जोरजोरात हाक मारू लागले. सुदैवाने सगळे बाप्ये समजूतदार होते. कोणी हरकत घेतली नाही.

हसुन हसुन बेजार झाले. आजचा दिवस नक्की छान जाईल.

मी आजच चांगली फजिती करून घेतलीये. माझं डेटा पॅक संपत आलं होतं हे मला माहीत होतं. पण काल रात्री तर डेटा चांगलाच शिल्लक होता आणि सकाळपासून मात्र मेन बॅलन्स मधून पैसे जात होते. मी नेहमीप्रमाणे चिडले, आयडियाला शिव्या घातल्या, आणि संध्याकाळी फुल भांडायच्या इराद्याने कस्टमर केअर ला फोन लावला. कधी नव्हे तो कुणीतरी नीट बोलता येणारा माणूस होता. त्याने मागचा रिचार्ज वगैरे माहिती नीट शोधून काढली. वॅलिडिटी सांगताना तो म्हणाला, 'आज १० तारीख आहे'. मी अगदी तोर्‍यात उत्तर दिलं-'आज ९ तारीख आहे, आणि माझी डेटा वॅलिडिटी ९ तारखेपर्यंत होती हे मला चांगलंच माहीत आहे.' तो शांतपणे म्हणाला, 'आज १० तारीख आहे मॅम'. मग माझ्या लक्षात आलं, आज खरोखरच १० तारीख आहे.. ;) त्याला कितीतरी वेळा सॉरी म्हणून मी फोन ठेवला.. आता 'काय काय नमुने फोन करतात' असं तो सगळ्यांना सांगत असेल.. =))