Skip to main content

माझे मत

लेखक सविता शिरगावकर यांनी गुरुवार, 05/08/2010 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव ह्या संकेतस्‍थळाशी माझी ओळख झाली ती अगदी अपघाताने. ऑफिसच्‍या कामानिमित्‍ताने आंतरजालावर विहरत असताना सहजच ह्या संकेतस्‍थळाशी गाठभेट झाली. जसजसे मिपा वरील लेख आणि त्‍यावरील प्रतिक्रिया/प्रतिसाद वाचत गेले तसतशी मिपा च्‍या प्रेमात पडत गेले. कित्‍येकदा तर (मी मागेच म्‍हटल्‍याप्रमाणे) मिपा सदस्‍यांनी एकमेकांची घेतलेली फिरकी वाचून मी मनसोक्‍त हसले आहे आणि त्‍यांच्‍या हजरजबाबीपणाला मनोमन दाद ही दिली आहे. मिपाच्‍या सदस्‍यांचे विविध विषयांना स्‍पर्श करणारे लेख, त्‍यांचा अभ्‍यास, कविता आणि त्‍यावरील विडंबने वाचून आपणही ह्या कुटुंबातील एक व्‍हायचेच हे ठरवले होते. त्‍याप्रमाणे सदस्‍यत्‍वासाठी अर्ज केला आणि ते मिळाले देखील. त्‍यादिवशी अगदी एखादा अनमोल खजिना मिळाल्‍यासारखा आनंद झाला होता. सदस्‍यत्‍व मिळाल्‍यानंतर मात्र मिपा ला भेट देण्‍याचा योग दोन दिवसांनंतर आला. आणि एक नवीनच बातमी मिळाली कि माझ्याच प्रमाणे आणखीनही काही सदस्‍य ह्या कुटुंबात प्रवेश करते झाले आहेत. आनंद द्विगुणित झाला. पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही. मिसळपाववर नव्‍या जुन्‍या सदस्‍यांची चाललेली चिखलफेक पाहून मन विषण्‍ण झाले. मी नवीनच आहे त्‍यामुळे कोणालाही सल्‍ला देण्‍याइतपत किंवा मार्गदर्शन करण्‍याइतका मला अधिकार नाही. तरी देखील काही गोष्‍टी नवीन सदस्‍यांना मला आवर्जून सांगाव्‍याशा वाटतात किंवा ही माझी कळकळीची विनंती आहे असे समजा हवं तर -- 1. मिपा हे एक कुटुंब आहे. नवीन सदस्‍यांनी आपल्‍या सदस्‍यत्‍वाची तुलना जुन्‍या सदस्‍यांशी करता कामा नये. 2. मिपाच्‍या जुन्‍या जाणत्‍या सदस्‍यांचा अधिकार कोणत्‍याही परिस्थितीत डावलता येणार नाही. कुटुंबात प्रवेश केलेल्‍या नवीन सुनेलाच कुटुंबातील सर्वांना आपलेसे करावे लागते आणि ते ही प्रेमाने व आपुलकीने. सुनेच्‍या कनवटीला घरादाराच्‍या चाव्‍या लटकण्‍यासाठी काही काळ हा निश्चितच जावा लागतो. 3. जुन्‍या जाणत्‍या सदस्‍यांनी वेळप्रसंगी केलेली कानउघडणी, दिलेला सल्‍ला किंवा केलेले मार्गदर्शन हे तितक्‍याच खिलाडूवृत्‍तीने स्विकारता आले पाहिजे. 4. आपण आपला लेख, कविता प्रकाशित केल्‍यानंतर त्‍यावर कोणत्‍या प्रकारच्‍या प्रतिक्रिया यायला हव्‍यात हे ठरविण्‍याचा अधिकार आपणांस नसतो. देण्‍यात आलेल्‍या प्रतिक्रिया कोणीही वैयक्तिक पातळीवर न घेता त्‍याकडे सकारात्‍मक दृष्‍टीने बघणे गरजेचे आहे. अन्‍यथा न आवडलेल्‍या प्रतिक्रियांना 'सोडून देण्‍याचा' पर्याय प्रत्‍येकाकडे उपलब्‍ध असतोच की. तेव्‍हा लेख प्रकाशित करण्‍याआधी जुन्‍या सदस्‍यांचे लेख व त्‍यावरील प्रतिक्रिया अवश्‍य वाचाव्‍यात. 5. मिपाच्‍या जुन्‍या सदस्‍यांचे एकमेकांशी असलेले नाते हे निखळ मैत्रीचे आहे. तसेच नाते एकमेकांत आणि जुन्‍या सदस्‍यांशी निर्माण करण्‍याची जबाबदारी सर्वथा नवीन सदस्‍यांची आहे. तेव्‍हा मिपा च्‍या कुटुंबात तेढ निर्माण होऊ न देण्‍याची जबाबदारी नवीन सदस्‍यांचीच आहे हे पुन्‍हा एकदा ठामपणे सांगते. उडालेला धुरळा हा काही काळापुरताच राहो आणि मिपाच्‍या कुटुंबातील वातावरण पूर्वीसारखेच हसरे, खेळकर राहो ही मिपाच्‍या सदस्‍यांना विनंती.

वाचने 5371
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

मिसळपाववर नव्‍या जुन्‍या सदस्‍यांची चाललेली चिखलफेक पाहून मन विषण्‍ण झाले.
चिखलफेक ह्या शब्दावर आक्षेप आहे. त्याला धुलवड असे म्हणतात. हि धुलवड कधी घडते तर कधी घडवली जाते. आम्ही मात्र आमच्या मुड नुसार त्यात रंग भरतो ;) रंगीला

हम्म... हल्ली मला इकडुन तिकडुन आभाळातुन प्रश्न ऐकु येत आहे...अगदी मारुती कांबळेच काय झालं? याच टोनमधे. प्रविण भापकरचं काय झाल?

In reply to by सुहास..

अवांतर : पहिलच लिखाण आहे का ? तसे असेल तर दमदार आणी बॅलन्स्ड !!
नाही नाही... ह्या आधी "टार्‍या कांबळेच काय झालं?" हा धागा काढणार्‍या सविताबै त्या ह्याच असाव्यात असे आमचे हेरगीरी खाते आम्हाला सुचवत आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाही हो.........ती ही नव्हेच!!!! ती मी!!!! सद्यस्थिती मध्ये तरी मिसळपाव वर माझा एकच आयडी आहे...पण...सध्याचा ट्रेंड पाहता एक दोन अजून डुप्लिकेट बनवावेत असं वाटायला लागलं आहे! तुमचा डुप्लिकेट आयडी कोणता? किंवा.... कोणकोणते? :)))

In reply to by सुहास..

अगदी, अगदी परा, खरंय तुझं. कारण या लेखातील तिसऱ्याच ओळीत एक कंस आहे. तो नीट 'वाचला' की काही संदर्भ भूतकाळात आहेत हे नक्की होतं.

In reply to by श्रावण मोडक

मी आजवर फक्त एक लेख लिहीलांय.... तो पण टा-याबद्दल....... बाकी फक्त वाचन.... कधी प्रतिक्रिया.... पण लवकरच अजून काही लेख टाकावेत.....असा विचार करतेय....... १) मुंगी होउन साखर खावी पण हत्ती होउन ओझी का उचलु नयेत ? २) जुलाबावर काही घरगुती उपाय आहेत काय ? ३) बायको साडी नेसणारी करावी का ड्रेस घालणारी ? - (माझे वर्जन... मिशीवाला..का सफाचाट असे असू शकेल :) ) ४) पुण्यात सायकलला चांगले स्पोक कुठे लावुन मिळतील ?? हे आणि अजून पण काही काही आहे डोक्यात.... बघूया........

In reply to by सविता

४) पुण्यात सायकलला चांगले स्पोक कुठे लावुन मिळतील ??
हो तुमचं सायकलचं जुनं दुकान गेलं ना आता! ;-) माझ्याकडून आणखी एक विषयः ५. द्व्यर्थी लिहीताना लिखाण हिडीस न होण्याची काळजी कशी घ्यावी. (हलकेच घ्या हो, नाहीतर मस्करीची कुस्करी व्हायची!)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

५. द्व्यर्थी लिहीताना लिखाण हिडीस न होण्याची काळजी कशी घ्यावी. खूपच छाण विषय आहे हो....
(हलकेच घ्या हो, नाहीतर मस्करीची कुस्करी व्हायची!) अगदी अगदी....ह. घेता येईल की नाही याची खात्री नव्हती तोवर फक्त वाचक होते....

पहिलेच लिखाण आहे आणि ते तुमच्‍या प्रशंसेस प्रात्र ठरले त्‍याबद्दल धन्‍यवाद. पण माझा एक प्रश्‍न आहे - तम्‍मनांकित प्रिती चा पुढचा भाग कुठे आहे ?

व्वा! सवितातै, अतिशय संयमित लेखन! मी सुद्धा मिपावर नवीनच आहे, आणि अजून तरी आपलं कुणाशी वाजलं नाहीये. मिपावर काहीही लेखन करण्याआधी इथले नियम आणि धोरण समजावून घेतलं तर आपला प्रवास सुखाचा होऊ शकतो. वैयक्तिक धोरण: कुठलाही प्रतिसाद वैयक्तिक पातळीवर न आणता चेंडू तटवत राहणे! उगाच प्रतिसादपाडू लेख किंवा प्रतिसाद न लिहिणे. माफक चेष्टामस्करी करणे. मिपाकरांशी मैत्री करणे. (मारामाऱ्या करायला नंतर खूप अवधी आहे.) आणि जब्बर (आणि 'चुकार'सुद्धा) चर्चा चालू असतील तिथे पॉप-कॉर्न आणि कोक घेऊन जाणे, एखादं झाड गाठून म्याच बघणे! बाकी ज्यांना मिपावर फेमस व्हायचं आहे त्यांनी 'चोता दोन'चे खालील लेख अमलात आणावेत! भाग १ : http://www.misalpav.com/node/5147#comment-75462 भाग २ : http://www.misalpav.com/node/5164 -- (अभ्यासू ) असुर

तुमच्या पहिल्या लिखाणाला शुभेच्छा.

सविता अग, अंगी नाना कळा असणारे हे पुणेरी विद्वान आपलेच आहेत. आंबे चोखत संस्कृतचे धडे देणार्‍यांची एवढी धास्ती घेवू नकोस. चौपाटीवर जायचे आणि एकमेकांची पाठ खाजवायची ही इकडच्या विद्वानांचा आवडता छंद आहे.खिल्ली उडवण्यामागे लोकशिक्षण करणे हाच त्यांचा हेतु असतों. तुझीच प्रिया

In reply to by प्रिया देशपांडे

"तुझीच " हा शब्द योग्य आहे का? आजकाल लोकांना कुठेही काहीही दिसते म्हणून विचारले इतकेच. प्रचंड नवी शिल्पा

असेल तर उत्तमच विचार आणि लेखन दोन्ही. नसेल तरी छान!

चालू द्यात. कुटुंबातल्या समद्यांची वळख व्हायला लई टाईम लागतोय. उत्खनन चालू ठेवा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुप्या... अरे काय हे.. 'हलकट्ट' शब्द कमी पडेल रे. परत च्यायला साळासूदपणे प्रतिसाद लिवणार तु की नव्या सदस्यांना त्रास देउ नका म्हणुन.

मी इथे आल्यापासुन मधून मधून टारझन हे नाव ऐकतो आहे. वरती पण कोणीतरी सविता = टारझन असे काहीतरी लिहिले आहे. त्यांचे जुने लेख पण दिसले. त्यावरुन ते लोकप्रिय असावेत. पण मी आल्यापासून त्यांचा काही उत्तर वगैरे दिसले नाहित. ते मिपा सोडून गेले आहेत का? एका माणसाला दोन नावाने लिहिता येते का? हिंदुराव

In reply to by हिंदुराव धोंडेपाटील

>>वरती पण कोणीतरी सविता = टारझन असे काहीतरी लिहिले आहे हा हा हा. पूर्वी मोंगलांना जिकडे तिकडे संताजी धनाजी दिसायचे. तसा हल्ली मिपावर सगळ्यांना नवीन आय डीत टारझन दिसतो. :) अवांतर : हिंदुराव धोंडेपाटील = टारझन असावे का? =))

In reply to by नितिन थत्ते

संतजी धनाजींनी इथल्या लोकांना पुरेसं छळलेलं आहे. अधिक माहिती करता सद्ध्या जे अभ्यास करत आहेत त्यांना संपर्क करणे. -निळोजी

चांगले लेखन. मात्र पूर्णपणे बॅलन्स्ड आहे असे मी म्हणणार नाही. >> मिपा च्‍या कुटुंबात तेढ निर्माण होऊ न देण्‍याची जबाबदारी नवीन सदस्‍यांचीच आहे हे पुन्‍हा एकदा ठामपणे सांगते. सर्व जबाबदारी नवीन सदस्यांवर कशी टाकू शकता? तेढ निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी मिपा कुटुंबाच्या सर्व सदस्यांवर आहे (जुन्या आणि नव्या). टाळी एका हाताने कधीच वाजू शकत नाही. नव्यांना हे घर आपलेसे वाटणे हे जुन्यांचे काम नाही का?

लेखाचा उद्देश चांगला अन मतितार्थही बरोबर. वाक्यांतील किरकोळ संबंधांबद्दल असहमती आहे.
5. मिपाच्‍या जुन्‍या सदस्‍यांचे एकमेकांशी असलेले नाते हे निखळ मैत्रीचे आहे. तसेच नाते एकमेकांत आणि जुन्‍या सदस्‍यांशी निर्माण करण्‍याची जबाबदारी सर्वथा नवीन सदस्‍यांची आहे.
अधोरेखीत भाग बरोबर नाही. स्वानुभव तरी मला तसे सांगत नाही. नविन टोळीत दाखल झालात की सुरुवातीला 'थोडे दमाने घ्यावे' लागते इतके कळले की पुरे.

अगदी मनातले बोललात... सविता यांनी जे लिहिले आहे त्याचा मतितार्थ व मुख्य म्हणजे हेतु खुपच चांगला आहे.. मी ही ईथे तसा नवाच.. सदस्यत्व सक्रिय होण्याआधी ईथे खुप दिवस ईथले लेख व त्यावरील प्रतिसाद वाचत होतो.. ईथल्या लेखनाचा व त्यावरिल प्रतिक्रिया यांचा दर्जा अतिशय उच्च दर्जाचाच होता व तो राहिल.. (नाव घेणार नाही) पण ईथल्या काहिंचा तर मी पुर्ण फॅन झालो आहे.. प्रतिक्रियांमधून होणारे विडंबन तर मनमुराद आनंद देणारेच.. पण गेल्या काही दिवसांमध्ये पाणी गढूळ झाले होते.. मिसळपाव कुठेतरी हरवत चाललेय असेच वाटत होते.. आवडती भाजी खाताना अचानक खडा लागावा असेच काहीसे वाटत होते.. आशा आहे की मिसळपाव लवकरच परत पुर्वीच्या लयीत येईल.. ईथल्या लेखनाचा दर्जा काय असतो हे बघायचेच असल्यास उदाहरणादाखल (छोटीशी झलक) नुकताच कुणीतरी लोकमान्य टिळकांविषयी एक धागा सुरू केला आहे.. त्याचे लेखन व त्यावरील प्रतिसादांमधून होणारा ऊहापोह हा ऊच्च दर्जाचा आहे व मिसळपावचा दर्जा किती उच्च आहे हे दाखवून देणारा आहे.. तिथे मिसळ्पाव परत गवसलय असेच वाटते.. मिसळपाव च्या वाटचालीस शुभेच्छा...

.

सहसा मी माझं मत कोणी विचारल्याशिवाय देत नाही. पण इथे तुम्ही एवढ्या आपुलकीने लिहिले आहे म्हणून माझी दोन ठिगळं...
1. मिपा हे एक कुटुंब आहे. नवीन सदस्‍यांनी आपल्‍या सदस्‍यत्‍वाची तुलना जुन्‍या सदस्‍यांशी करता कामा नये.
केली तरी हरकत नसावी. केवळ नवीन जुन्या मुळे नव्हे तर कोण किती विधायक योगदान करतो आहे यावर संबंध अवलंबून असावेत. म्हणजे माझं आपलं असं मत हां...
2. मिपाच्‍या जुन्‍या जाणत्‍या सदस्‍यांचा अधिकार कोणत्‍याही परिस्थितीत डावलता येणार नाही. कुटुंबात प्रवेश केलेल्‍या नवीन सुनेलाच कुटुंबातील सर्वांना आपलेसे करावे लागते आणि ते ही प्रेमाने व आपुलकीने. सुनेच्‍या कनवटीला घरादाराच्‍या चाव्‍या लटकण्‍यासाठी काही काळ हा निश्चितच जावा लागतो.
परत तेच. इथे सगळ्यांचा सारखाच अधिकार आहे... अ‍ॅट लीस्ट टू स्टार्ट विथ. नंतर जो तो आपापल्या कर्माने जगतो किंवा मरतो.
3. जुन्‍या जाणत्‍या सदस्‍यांनी वेळप्रसंगी केलेली कानउघडणी, दिलेला सल्‍ला किंवा केलेले मार्गदर्शन हे तितक्‍याच खिलाडूवृत्‍तीने स्विकारता आले पाहिजे.
सहमत. अगदी १००%. आणि नवीन सदस्यांनी पण योग्य पद्धतीने दिलेले सल्ले वगैरे जुन्यांना बोचयचे कारण नाही.
4. आपण आपला लेख, कविता प्रकाशित केल्‍यानंतर त्‍यावर कोणत्‍या प्रकारच्‍या प्रतिक्रिया यायला हव्‍यात हे ठरविण्‍याचा अधिकार आपणांस नसतो. देण्‍यात आलेल्‍या प्रतिक्रिया कोणीही वैयक्तिक पातळीवर न घेता त्‍याकडे सकारात्‍मक दृष्‍टीने बघणे गरजेचे आहे. अन्‍यथा न आवडलेल्‍या प्रतिक्रियांना 'सोडून देण्‍याचा' पर्याय प्रत्‍येकाकडे उपलब्‍ध असतोच की. तेव्‍हा लेख प्रकाशित करण्‍याआधी जुन्‍या सदस्‍यांचे लेख व त्‍यावरील प्रतिक्रिया अवश्‍य वाचाव्‍यात.
हे म्हणजे माझंच मत मी दुसर्‍या आयडिने मांडले आहे असे वाटावे एवढे सहमत.
5. मिपाच्‍या जुन्‍या सदस्‍यांचे एकमेकांशी असलेले नाते हे निखळ मैत्रीचे आहे. तसेच नाते एकमेकांत आणि जुन्‍या सदस्‍यांशी निर्माण करण्‍याची जबाबदारी सर्वथा नवीन सदस्‍यांची आहे.
वेल... असो. पण नाते निर्मण करण्याची जबाबदारी केवळ नवीन सदस्यांची आहे असे नव्हे. जुन्यांकडूनही तेवढेच प्रयत्न झाले पाहिजेत. एकंदरीतच जुने हे रिलेशनशिपमधले सिनियर पार्टनर आहेत हा तुमचा सूर मला थोडासा चूक वाटतो. पण इथे आल्यावर इथे हळूहळू रूळा, दोन द्या दोन घ्या वगैरे बाबतीत सहमत आहेच. एवढा समंजस प्रतिसाद दुल्याबद्दल खरंच अभार.