Skip to main content

सैपाकाची पथ्ये

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 04/08/2010 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच झालेल्या चर्चांमध्ये आयटीमधल्या स्त्रियांना स्वयंपाक करता येत नाही, यावा का, यावाच का, वगैरेवर साधकबाधक आणि लंबीचवडी चर्चा झाली. पण मला या बाबतीत विषय थोडा व्यापक करायचा आहे. फक्त आयटी, किंवा फक्त स्त्रियाच का, स्वयंपाक सगळ्यांनाच करता आला पाहिजे. मधुशाला यांनी खालील मत मांडलं आहे, ते पटतं... "स्वयंपाक न येणं ही तुम्हाला एवढी साधी गोष्ट का वाटते? रोज आपण जे खातो ते बनवायला सुद्धा यावं असं का वाटू नये? कमीतकमी प्रयत्न तरी करता येईल की नाही???... आता जर असं असेल की एखादी अवघड गोष्ट येत नाही, उदा. पुरणपोळी, गुळपोळी तर समजू शकतो. पण कुकर सुद्धा लावता येत नाही आणि कधी लावणार सुद्धा नाही या मानसिकतेचं समर्थन कसं करणार???" आता व्यापक अर्थाने बघता काही लोक म्हणतील की आमचं वय झालंय, भूक कमी झाली आहे, आम्ही रोज खातच नाही... पण त्याने प्रश्न बदलत नाही. स्वयंपाक आला पाहिजे हे खरंच. आपला स्वयंपाक रोजच दुसऱ्याने करून द्यायला काय आपण बिल क्लिंटन लागून गेलोय का? (क्लिंटनने तरीही वर एकदा 'मी जेवलोच नाही' हे 'मी धूर आत घेतलाच नाही' च्या थाटात सांगितलं होतंच - अरे पण धूर बाहेर सोडलासच ना गधड्या...) मुळात व्यापकपणे चर्चा करायची झाली तर स्वयंपाक या शब्दालाच आक्षेप घेता येईल. या शब्दाची व्याख्या लोकशाहीच्या व्याख्येच्या अंगाने करता येते. स्वयं + पाक = स्वतः केलेला, स्वतःसाठीचा, फक्त स्वतःचा पाक. ही व्याख्या अर्थातच अत्यंत स्वार्थी आहे हे उघड आहे. स्वयं हा शब्दच सध्या थोडा डागाळलेला आहे - हा त्याच शब्दाचा स्वयंदोष असावा. आता स्वयंसंपादनच घ्याना... त्यातही या स्वार्थी छटा आहेत म्हणूनच संपादकांनी तो अधिकार काढून घेतला आहे. एखाद्या टीनेजरकडून स्वयंपाक करण्याचा हक्क कुणीही पालक काढून घेईलच ना, तसंच. त्यांनी उगाच खोडसाळपणे भलत्या ठिकाणी स्वयंपाक करून ठेवला तर? असो. थोडे भरकटलो. पण स्वयंपाकाऐवजी मी सैपाक हा जास्त घरगुती शब्द वापरणं पसंत करेन. त्याचा अर्थ व्यापक आहे - एकाने एकट्यासाठी, एकाने फक्त दुसऱ्यासाठी, किंवा दोघांनी मिळून एकमेकांसाठी, किंवा अनेकांनी एकत्र या सगळ्यांना तो शब्द सामावून घेतो. चला. व्याख्या तर पुरेशी व्यापक झाली. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. सैपाकाविषयी काही गोष्टी मधुशाला यांच्या प्रतिसादातून स्पष्ट आहेत. -सैपाक सगळ्यांनाच करता आला पाहिजे. येत नसेल तर तो सगळ्यांनी शिकून घेतला पाहिजे. -शिक्षण लग्नाआधीच व्हावं. एकदम लग्न झाल्यावर आता खायचं काय असा प्रश्न पडू नये. चांगल्या शिक्षणासाठी सराव आवश्यक आहे. -गुळपोळी, पुरणपोळी वगैरे जमलं नाही तरी हरकत नाही. किंवा काही व्हेजिटेरियनाना नळीफोड पाककृती जमत नाहीत, ते समजून घेता येतं. -पण कुकर लावता येत नाही, साधी शिट्टी काढता येत नाही आणि मी शिकणारही नाही ही मानसिकता चांगली नाही. यावरून मलाही काही मुद्दे सुचले -सैपाक करताना एकमेकांच्या चवी लक्षात घेऊन त्यानुसार बेत करावेत. शेवटी व्हरायटी हाच मसाला आहे. -सैपाक व जेवण करताना दोघांचंही पोट भरेल अशी सोय पहावी. -सैपाक करणं पुरुषांना देखील व्यवस्थित आलं पाहिजे. किमान योग्य तिथे मदत करता आली पाहिजेत. -आधुनिक उपकरणांनी काही काम सोपं होतं. -पाककृतींची पुस्तकं, व व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ती जरूर वापरावीत. इतक्या व्यापक विषयाचे सगळेच पैलू छोट्याशा चर्चाप्रस्तावात मांडता येत नाहीत. हॉटेलमध्ये खाणे, सैपाकाला बाई ठेवणे, कायम बायकोनेच सैपाक करणे, निरनिराळ्या देशाच्या पाकपद्धती, सैपाक करताना कष्ट कमी व्हावेत म्हणून अर्गोनॉमिकल विचार... या सर्वांविषयी तुम्हाला काय वाटतं ते जरूर लिहा. सैपाकाच्या अधिक पाककृती मिपावर याव्यात का? सैपाकाची कुठची कामं पुरुषांना व कुठची स्त्रियांना आलीच पाहिजेत का? स्त्रीमुक्तीच्या दृष्टीकोनातून या प्रश्नावर काय विचार करता येईल? वगैरे वगैरे... आणि हो, आधीच्या चर्चांमधले काही निवडक प्रतिसाद नव्या दृष्टीकोनातून लोकांनी पहावे असं वाटलं तर तेही डकवा (दुवे नकोत). अशीच आधीची एक उद्बोधक चर्चा या दुव्यावर पहायला मिळेल.

वाचने 31853
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

चर्चाप्रस्ताव वाचून करमणुक झाली.
अशीच आधीची एक उद्बोधक चर्चा या दुव्यावर पहायला मिळेल. तो दुवा चाळला (पूजेची पथ्ये). त्याच स्वरुपाची द्वयर्थी चर्चा इथे अपेक्षित आहे असे श्री. घासकडवी यांच्या पुस्तीवरुन वाटते. -- अजानुकर्ण
-- अजानुकर्णाचे मत पाहून चर्चाप्रस्ताव कोणत्या विभागात आहे ते पाहीले. विनोद, विरंगुळा, क्रिडा या विभागात पाहून मजा वाटली ;) शेवटचा दुवा उघडून वाचला नाही. 'कुकरची शिट्टी काढणे' या वाक् प्रयोगाने बरेच मनोरंजन झाले :) कळावे... :)

In reply to by लिखाळ

कुकरची शिट्टी काढणे' या वाक् प्रयोगाने बरेच मनोरंजन झाले
लिखाळ काकांकडुन कुकरची शिट्टी काढण्यात रंजन होते की नाही हे ऐकण्यास उत्सुक. ;-)

In reply to by Nile

या पुर्वी कुकरच्या शिट्टीवर कौल झाला होता. (कौलचा दुवा घ्यावा. ) आमच्य मते हे उर्जा नियोजनासाठी याचा उपयोग खुप होतो. कुकरला शिट्टी नसेल तर कुकरचा स्फोट होउ शकतो. कुकरच्या शिट्टीला मनोरंजन मुल्या पेक्षा सुरक्षिततेचे मूल्य अधिक आहे. उर्जेचे योग्य नियोजन केले तर शिट्टीची वेळ येणारच नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

कौलात दिल्याप्रमाणेच आमचे मत पुन्हा लिहतो. शीटी कडे लक्ष दिलेत तर उर्जाही वाचते अन डाळही शिजते. शिटी न होता शिजवणे लांबवले तर उत्तम. एकाच शिटीस डाळ शिजेल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

काकांचा मुद्दाही पटला. ऊर्जेचे योग्य नियोजन नाही केले तर (कुकरची) शिटी वाजेल!

सोवळ्यात किंवा ओलेत्याने सैपाक केल्यास सैपाकाचा आनंद जास्त येतो व भूकही छान लागते असा अनुभव आहे. सैपाक करताना दृष्टी, चव आणि गंधाबरोबरच स्पर्श हाही एक महत्वाचा घटक आहे. उदा. कणकेचे गोळे तिंबणे, दाणे कुटणे किंवा नुसती लिंबे हाताने मऊ करणे यात सुद्धा एकप्रकारचा आनंद आहे. काही यांत्रिक उपकणे वापरत असल्यास त्याचा आवाज हा ध्वनिच्या माध्यमातून आनंद देणारा घटक आहे. तर असा पंचज्ञानेंद्रियांना आनंद देणारा सैपाक करण्यास कोणत्याही पुरुषाने मागे राहू नये. ज्याप्रमाणे जेवण हे उदरभरण नसून यज्ञकर्म आहे त्याप्रमाणेच सैपाक हे एक काम नसून कला आहे. मला स्वतःला सैपाकात प्रचंड रुचि असून कोणत्याही स्त्रीसाठी सैपाक करण्यात मला कमीपणा वाटणार नाही.

In reply to by नगरीनिरंजन

सोवळ्यात किंवा ओलेत्याने सैपाक केल्यास सैपाकाचा आनंद जास्त येतो व भूकही छान लागते असा अनुभव आहे.
तुम्हाला प्रचंड भुक लागली आहे अशा वेळी केवळ धार्मिक परंपरा म्हणुन सोवळ्या ओवळ्यानेच वा ओलेत्यानेच सैपाक केला पाहिजे हा अट्टाहास आनंदा पेक्षा दु:ख देणारा आहे. अशा वेळी पारोश्याने जरी सैपाक केला तरी अन्न वेळेवर मिळणे हा भाग अधिक महत्वाचा असतो. पण हा स्खलनशील विचार धर्मपंडितांनी पाखंडी ठरवला आहे.

In reply to by नगरीनिरंजन

नगरीनिरंजनभाऊ, तुम्ही एकदम चोक्कस बात केलीत. सर्वसामान्य पाककृतींच्या पुस्तकांत रुक्ष मोजमापं, पदार्थांची जंत्री व यांत्रिक कृतीचं वर्णन इतकंच असतं. पण पंचेंद्रियांना सैपाकातून आनंद मिळू शकतो हे अगदी खरं आहे. उदरभरण हे केवळ अंतिम ध्येय असतं. खरा आनंद असतो तो तिथपर्यंत पोचण्याच्या मार्गात. एकाच वेळी भूक वाढवण्याचं आणि मग ती भागवण्याचं भाग्य मिळतं त्यात.

In reply to by नगरीनिरंजन

मला स्वतःला सैपाकात प्रचंड रुचि असून कोणत्याही स्त्रीसाठी सैपाक करण्यात मला कमीपणा वाटणार नाही.
वा वा! पारंगत पुरुषानी IT wife असे धागे काढुन रडारड करण्यापेक्षा गरजु स्त्रीला सैपाक शिकवला तर समाजात एकही अडाणी स्त्री राहणार नाही. (व आपल्या आवडत्या स्त्रीला आपणच सैपाक शिकवु या प्रेरणेने एकही अडाणी पुरुष राहणार नाही) ह्या विचाराने केव्हढा सुखावलो. बाकी असेच आमचे मत आम्ही पुर्वीच व्यक्त केले आहे.

In reply to by नगरीनिरंजन

अरसिक माणूस ,ओलेत्याने सैपाक करायचा ? अवांतर : दृष्टी, चव आणि गंध आणि स्पर्श गेले ते दिन गेले..... (तूर्तास बेंच बहाद्दूर) रामदास

In reply to by रामदास

सैपाक हे काम नसून कला आहे, हे मान्य करणे ही एक प्रेरणा होऊ शकेल. स्वतःच्याच जिभेचे चोचले पुरवायचे असतील, तर स्वतःच स्वयंपाक करण्यासारखा परमानंद नाही, हेही खरे! (बल्लवाचार्य)बेसनलाडू ओलेत्याने सैपाक करण्यात कसली अरसिकता रामदासकाका? (ओलेत्याने सैपाक करणारा IT WIFE चा नवरा किंवा) नुकतेच अंघोळ करून बाहेर आलेली, कवेत घेतल्यावर काहीशी ऊन, सुगंधी लागणारी, अंग पुसावयाचा टॉवेल केसांच्या बुचड्यावरून बांधून बाथरोबवरच सैपाकघरात पळून आमटी/भाजी फोडणीला टाकणारी बायको हे 'अन्न हे पूर्णब्रह्म' बनण्यातील एक प्रमुख घटक आहे, असे आमचे ठाम मत आहे :) किंबहुना हे सैपाकाचे प्रमुख पथ्य म्हणून पाळले जावे, अशा मताचे आम्ही आहोत ;) (मतदार)बेसनलाडू

In reply to by नगरीनिरंजन

कणकेचे गोळे तिंबणे, दाणे कुटणे किंवा नुसती लिंबे हाताने मऊ करणे यात सुद्धा एकप्रकारचा आनंद आहे. हा अश्लीलपणा नाही का? काही यांत्रिक उपकणे वापरत असल्यास त्याचा आवाज हा ध्वनिच्या माध्यमातून आनंद देणारा घटक आहे डोक्यावरुन गेलं.

ओलेत्याने 'स्वयं'पाक मस्त होतो.

उपाशी राहाण्यापेक्षा बरे गणपाजी.

वगैरे करावं म्हणजे..इतरांचा सैपाक कसा होतो? किंवा एखाद्याची (चा) बायको (नवरा) कशी सुग्रण आहे. याचा पण अनुभव येईल..

पोट भरण्यासाठी काम करावेच लागते. सैंपाक कामच असल्यामुळे सैंपाक शिकणे गरजेचे आहे. मी एकट्याने व मिळून सैंपाक केलेला आहे. पण दोनापेक्षा जास्त लोकांनी मिळून सैंपाक करण्याचा प्रयत्न केल्यास डिश बिघडण्याची शक्यता असते. (आम्ही तसा प्रयत्न अजुन केलेला नाही/ करण्याची शक्यता-संधी दिसत नाही.) पूर्वीच्या आमच्या स्वाक्षरीत अशा एका टूमेनीपणाने बिघडलेल्या पदार्थाबाबत लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे स्मरते.

नुकतेच अन्नपदार्थात होत असलेल्या भेसळीबाबत वाचले. अशा प्रकारच्या भेसळीमुळे सैंपाकावर तसेच पदार्थाच्या अंतिम रूपावर काय परिणाम होऊ शकतात? जाणकारांनी फोकस मारावा.

आजकालच्या डिन्क (डबल इन्कम नो किड्स)च्या आय टी / मॉडर्न जमान्यात एक दोघांच्या स्वयंपाकाचे जरा अतीच कौतुक होते आहे असे मला वाटते बॉ. आयत्यावेळी म्हणजेच पूर्वसुचना न देता येणार्‍या अनेक पाहुण्यांचे आपल्या पाककौशल्याने पोट भरणार्‍या अन्नपूर्णेच्या महान भारतीय संस्कृती मधे हे तर अजिबात पटतच नाही. वरचेवर मोठ्या मेजवान्या आयोजीत करणार्‍यांची पथ्ये, अनुभव ऐकण्यास उत्सुक! महर्षी वेदव्यास यांनी यावर काही प्रकाश टाकला आहे का? नाही म्हणले तरी द्रौपदीला पाच जणांच्या आवडीनिवडी सांभाळायला लागत असतील ना. तर द्रौपदीची पथ्ये यावर कोणी जाणकार प्रकाश टाकेल काय?

In reply to by सहज

वा, द्रौपदीकडे अक्षयपात्र होतं हे तुम्हाला माहीत नाहीसं दिसतंय. (हा शब्द वाचून का कोण जाणे, पण माझ्या एका जुन्या मित्राची आठवण झाली)

च्यायला. सगळ्याच सदस्यांविषयीचा आदर शतपटीने वाढला, ही चर्चा बघुन...