Skip to main content

पूजेची पथ्ये

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 27/02/2010 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच नाडीपरीक्षेवरील एका अनमोल लेखात खालील चमत्काराविषयी वाचले. खालील विधानांकडे टारझन यांच्या एका टिप्पणीमुळे आम्हाला नवीन दृष्टीकोनातून बघता येऊन त्याचा गर्भित अर्थ जाणून घ्यायला मदत झाली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
एका जोडप्याला मुल नव्हते, तेंव्हा महर्षींनी सांगितलेले उपाय केले संतती झाली. पण त्याआधी दैवीउपाय करूनही संततीचा लाभ का झाला नाही याची काही कारणे सांगताना महर्षी म्हणाले, ‘१) पूर्वी केलेल्या पूजा विधीपुर्वक व त्याच क्रमाने केल्या गेल्या नव्हत्या. २) पुजाकरताना पैशाचे गणित मांडून फारच कोतेपणा केला तो नडला. ३) ज्या पुजाऱ्याने मंत्र म्हणून पूजा सांगितली त्याने गडबडगुंडा करून काम आटपले. ४) पुजा करते वेळी स्वच्छता व पावित्र्य पाळले गेले नाही. ’
त्यावरून पूजेची काही पथ्ये ध्यानात आली. ही पथ्ये पाळली नाहीतर अनेक पूजा करूनही संतती होत नाही. मग पुन्हा महर्षींकडे जावे लागते. - पूजा विधीपूर्वक व योग्य क्रमाने कराव्यात - पूजा ठरवताना पैशाच्या गणितात कोतेपणा असू नये - पूजेत गडबडगुंडा करून काम आटपू नये - पूजेत स्वच्छता पाळावी त्यावरून साग्रसंगीत पूजेचे माहात्म्य पटले. एरवी आम्ही आम्हाला जमेल तशी, जमेल तेव्हा पूजा करत आलेलो आहोत पण आता आम्ही खबरदारी घेऊ. अधिक विचार करता मला काही इतर पथ्ये सुचली - पत्नी नसताना एकट्यानेच पूजा करू नये. - पूजा करताना एकमेकांचा विचार न करता आपल्या प्रिय देवदेवता डोळ्यासमोर आणाव्यात - पवित्र आचमनांनी पूजाविधी सुकर होतो - पूजा करताना योग्य आसन वापरणे अनिवार्य आहे. आपल्या पूर्वजांनी अशा आसनांचे वर्णन केलेले आहे. पूजेत पाळायची अशीच आणखी काही पथ्ये कोणी सांगेल काय?

वाचने 116609
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

आमचेकडे पुजाविधीची सर्व साधने व पोथ्या (सप्तरंगीत चित्रांकीत) मिळतील. आसनांना लागणारे फर्निचर, कपडे आदीदेखील पुरवितो. वाजवी दर, योग्य व आनंदी सेवा ही आमची वैशिष्ठ्ये. परदेशातही सेवा देतो. (जास्त साधने घेतल्यास टपालखर्च माफ.) घरी येवून पुजाविधीसाठी भटजी उपलब्ध. सर्व कामे मालकच करतात. (आधीच अपॉइंटमेंट घेणे) (कृपया ओळख दाखवून कमी पैसे देवू नयेत. कोणतीही कुपने चालत नाहीत. सर्व प्रकारची क्रेडीट कार्डांची सोय. आमची दुसरी कोठेही शाखा नाही. - (जाहिरात)

कुठलीही पूजा ही, 'पूज्य' असलेली व्यक्ति वा मूर्ति, समोर असल्याशिवाय सफळ होत नाही.

दशकांपूर्वीचा हा धागा आणि त्यातील प्रतिसाद (माझे धरून) वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद झाला! धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद!!