मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तांदुळाच्या पीठाची थालिपीठे

शाल्मली · · पाककृती
परवा गणपतीसाठी मोदक केल्यानंतर थोडी पीठी उरली होती. त्याचे काय करावे असा विचार केल्यानंतर सुचले की याची थालिपीठे करुन पहावीत. तशीही इथे आल्यापासून थालिपीठे खाल्लीच नव्हती आणि अशी कशी आपण थालिपीठ भाजणी आणायची विसरलो हा विचार करणंही एव्हाना सोडून दिलेलं होतं. त्यामुळे आता या उरलेल्या पीठाची थालिपीठे करण्याचं पक्कं केलं. हा पदार्थ खूपच छान चविष्ट लागला. म्हणून खास मिपाकर खवय्यांसाठी इथे देत आहे-
तांदुळाच्या पीठाची थालिपीठे
साहित्यः- १ वाटी तांदुळाचे पीठ १ गाजर किसून थोडी कांद्याची पात (ऐच्छिक) २ चमचे मुगाची डाळ २ हिरव्या मिरच्या पुदीन्याची ४-५ पाने बारीक चिरुन (ऐच्छिक) बारीक चिरलेली कोथिंबीर १ इंच आलं किसून ४-५ लसूण पाकळ्या बारीक चिरुन हळद चवीनुसार मीठ तेल कृती:- मुगाची डाळ अर्धा तास भिजवून ठेवावी. एका परातीत तांदुळाची पीठी घ्यावी. त्यात भिजवून ठेवलेली मुगाची डाळ, किसलेले गाजर, बारीक चिरलेली कांद्याची पात, पुदीना, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालावे. थोडे पाणी घालून थालिपीठांसाठी पीठ मळून घ्यावे. गॅसवर तवा गरम करायला ठेवावा. तयार पीठाचा एक गोळा घेऊन बटर पेपरवर किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवर तेलाचा हात लावून थालिपीठ थापावे. गरम तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूंनी थालिपीठ खरपूस भाजावे. सॉस, चटणी किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर गरमागरम चापावे. :) टीपः- मी यात गाजर आणि कांद्याची पात घातली होती. परंतु इतर कोणत्याही भाज्या घालून ही थालिपीठे करुन वैविध्य आणता येईल. थालिपीठ भाजणी घरात नसताना दुधाची तहान ताकावर आणि तेही हिंग, जिरेपूड घातलेल्या आंबट गोड ताकावर भागवता येईल. ;) --शाल्मली.

वाचन 14790 प्रतिक्रिया 0