Skip to main content

चमचमीत भरली वांगी

लेखक आकांक्षा यांनी शनिवार, 08/11/2008 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ४ लहान वांगी, १ मोठा बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेली कोथिंबीर, तेल, तिखट, हळद, मोहरी, गोडा मसाला, कांदा लसुण मसाला, चवीपुरती साखर (आवडीनुसार), मीठ, दाण्याचा कुट (साधारण पाउण वाटी), ताज दही अथवा लिंबू कॄति: प्रथम वांगी भरण्याचा मसाला तयार करुन घेणे. त्यासाठी दाण्याचा कुटामध्ये दही किंवा लिंबू घालावे, मग कांदा लसुण मसाला, तिखट, गोडा मसाला, मीठ आणि चवीपुरती साखर घालावी व ते व्यवस्थित मळुन घेणे. हे सईल नसावे. आता वांग्याना उभी चिर देऊन त्यात हे मिश्रण भरावे. आता कढईत २ चमचे तेल घ्यावे. गरम झाले की मोहरी घालावी व थोडी कोथिंबीर घालावी. कोथिंबीरीचा सुगंध दरवळला की वांगी सोडावीत. अंदाजे पाणी टाकावे व कढईवर झाकण ठेऊन त्यावर पाणी टाकून मध्यम आचेवर शिजवावे. पर्यायी लहान कुकर मध्येही ही भाजी छान होते. एक शिटटी पुरेशी आहे. फक्त पाणी जास्त घालू नका. ही भाजी, भाकरी किंवा पोळी बरोबर खायला दया. त्या बरोबर कांदा...वा वा...झकास बेत!!! :W माफ करा, फोटो नाही आहे सध्या!!

वाचने 9095
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आकांक्षा, मस्त पाककृती दिलीस. दही, किंवा लिंबु पिळले नाही कधी मी वांग्याच्या मसाल्यामध्ये आता तु सांगतेस त्या प्रमाणे करून नक्की पाहिन. :)

In reply to by शितल

धन्यवाद! त्याची चव फार सुंदर लागते. करुन बघितस की नक्की कळव. :)

सुकं किंवा ओलं खोबरं ही घालते. शिवाय आलं-लसूण एकत्र ठेचून घालते. आलं-लसूण्-कढिपत्ता हे मिक्सर मध्ये एकत्र वाटून जर मसाल्यात मिसळले तर... एकदम सुरेख स्वाद येतो भाजीला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मला वाटतं भरली वांगी न आवडणारे लोक शोधायला लागतील. प्रत्येकाचा आपल्या आवडीचा मसाला असतो आणि सगळे मसाले मस्त लागतात. आकांक्षाताई, मीही अशीच करते भाजी पण दही/ लिंबूरसाऐवजी चिंचेचा कोळ चमचाभर घालते. दुसरों के साथ बातां : लवकरच वांगी आणली पाहिजेत. रेवती

मी दाण्याच्या कुटात खोबरं , मसाले, थोडे तीळ घालते आणि भाजून घेते. मग त्यात चिंच गुळाचं पाणी घालून ते वांग्यामधे भरते..नॉर्मल फोडणी,कांदा, थोडा हा मसाला वरचा.. वांगी घालून किंचित पाणी घालून शिजवते.. आणि वरून कोथिंबीर.. फोडणीत नाही घातली कधी मी.. पण अफलातून होते अशी भाजी! दही/लिंबू घालून केली पाहीजे एकदा..

ही भाजी, भाकरी किंवा पोळी बरोबर खायला दया. त्या बरोबर कांदा...वा वा...झकास बेत!!! ख ल्ला स..! तात्या.

माझी आई एकदम जबरी करते ही भाजी. त्यात काय काय घालते ते माहीत नाही, पण माझी फेव्हरीट डीश आहे. ती चव घ्यायला मात्र मला कोल्हापुरलाच जाव लागत. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

अहो आकांक्षाताई, जरा फोटूही टाका की! वांग्यात भरण्यासाठी तुम्ही दिलेला मसाला तसेच इतरांनी प्रतिसादात दिलेले पर्यायदेखिल चांगले वाटतात. मी स्वतः एक तर गोडा मसाला + दाण्याचे कूट किंवा कांदा-लसूण मसाला असे पर्याय वापरतो. आणि हो, वांग्याला केवळ एक उभी चीर देण्यापेक्षा दोन चिरा दिल्या (म्हणजे वांगे एखाद्या उमललेल्या फुलाप्रमाणे केले) तर मसाला अगदी आतपर्यंत जातो. आणि त्यातही दुसरा पर्याय म्हणजे वांग्याच्या एका बाजूने उभी चीर आणि दुसर्‍या बाजूने त्याला परपँडिक्युलर अशी दुसरी चीर देणे! अजून पाकृ (फोटोसहित) टाकीत चला! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.