Skip to main content

शेंगदाणे कुटातली मिरची

लेखक त्रिवेणी यांनी बुधवार, 19/07/2017 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- १०-१२हिरवी मिरची, लसून -७ ते ८ पाकळ्या, भाजलेले शेंगदाणे -१ मोठा बाउल, तेल फोडणीसाठी जरा जास्तच, हळद, जिर, मोहरी, धने जिरे पूड एक चमचा, पाणी - १ ग्लास, मीठ साहित्य --- प्रथम शेंगदाणे भाजून त्याचा लसूण घालून थोडा जाडसर कूट करून घ्यावा.मिरच्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून जिर,मोहरी,हळद घालून चांगल परतवून घ्यावे आणि कापलेल्या मिरच्या घालून पाच मिनिटं तेलात मस्त परतवून घ्याव्यात. आता त्यात गरम पाणी घालून एक उकळी आली की दाण्याचा कूट घालावा. मीठ, कोथंबीर घालून पाच मिनिटं मिरची शिजू द्यावी. आमच्या खान्देशात गोडाच जेवण असेल तर आमच्या सारख्या गोड न आवडणाऱ्या लोकांसाठी हमखास केली जाते ही मिरची तोंडी लावायला.

वाचने 26980
प्रतिक्रिया 61

प्रतिक्रिया

मस्त!! फोटोतून झणझणीतपणा पुरेपूर उतरलाय. पण किती दिवस टिकतं? केल्यावर फ्रिजमधे ठेवायला हवं का?

फ्रिजमध्ये ३-४ दिवस टिकत.बहुतेक बाहेर एक दिवस वैगरेच टिकेल. १०-१२ मिरच्यांचे तीन चार दिवसात संपते माझ्याकडे.

In reply to by आदूबाळ

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. म्हाद्या मोदक म्हणतात तसाच होतो आमच्या इकडेही. भरपूर कांदा आणि लाल तिखट घालून. टाकते त्याच्या फोटो करला की. हिवाळ्यात मिरची+काळी उडीद डाळ+अगदी कमी ह डाळ अशी ही पातळ भाजी होते.

In reply to by त्रिवेणी

ओक्के. म्हणजे यात डाळीचं पीठ + कांदा घातला की महाद्या होतो होय! (आमच्याकडे महाद्या करून लोणच्यासारखी साठवणूक करतात.)

चरचरीत ! बघूनच डोळे आणि जीभ पाणावली !

मस्तच आहे हा महाद्या .......... दोन तीन दिवस लागोपाठ उपास झाले , कि जिभेची धार वाढवायला उत्तम शस्त्र आहे .........

माझा उपवास मी आताच सोडू कि काय असं वाटू लागलंय.. फोटोबरोबर चवपण उतरलीय... त्रिवेणी ताई .. एकदम झक्कास ... हे असले चविष्ट फोटो .. चातुर्मासकरांवर खुलेआम सुड म्हणायचं कि ओ... धन्यवाद ,, सर्व प्रिंट काढली आहे .. आजच रात्री उपवास सोडताना प्लॅन तयार आहे ... बायकोने नीट केले तर ठीक नाही तर हे चित्र डोळ्यासमोर ठेवून जेवण म्हणतो .... कशी वाटली आयडिया ...

In reply to by नावातकायआहे

असते हो दादा. ते तुम्हाला वाटतंय ते वायलं. रेवाक्का म्हणते ते वायलं. आमच्याकडे त्याला मिरच्यामृत पण म्हणतात. नैवेद्याच्या स्वयंपाकात असतं.

In reply to by नावातकायआहे

नो आयडीया सर जी! पुण्यात मध्ये कुठे तरी "फोडणीची पोळी" सुद्धा मिळायची म्हणे. तर हे ही मिळायला पाहिजे पण अवघड वाटतंय. रेसेपी काही मला माहिती नाही कारण मी कधी नैवेद्य बनवलेला नाही अजुन. @ रेवती, आक्के, तुज ठाऊक असेलच ना पाककृती?

In reply to by पिलीयन रायडर

अरे हो! नावातकायआहे साहेबांचा जरा गोंधळ झालाय. पूजेतील पंचामृत- दूध, तूप, मध, साखर, दही नैवेद्यातील पंचामृत- हिरव्या मिरच्या (येथे ढब्बू मिरची, पेरू असे बदलून वापरावे) चिरून एक छोटी वाटी, त्याच मापाने तिळाचे कूट, त्याच मापाने दाण्याचे कूट, त्या मापाने गूळ, मापाच्या वाटीने ओल्या/ सुक्या खोबर्‍याचे काप, पाव वाटी भिजवलेले शेंग्दाणे, फोडणीचे साहित्य, चिंच कोळ. पातेल्यात/ कढईत जरा जास्त तेलाची फोडणी (मोहरी, हिंग, हळद, मेथ्या), त्यात मिरच्या जरा परताव्यात व चार वाट्या पाणी. पाण्याला उकळी आली की सर्व साहित्य घालून जरा शिजवणे. दाटसर झाले की बंद करा. पानात डाव्याबाजूचे तोंडीलावणे आहे.

बोर्डावर धाग्याचं नाव वाचुनच तोंडाला पाणी सुटलं. असलं काही तरी आमचे बाबा झकास करतात. महाद्या, भुरका, पिठलं असले आयटम्स. करायलाच पायजेल! ती एक बारिक हिरवीगार मिरची असते, ती नाही ना घ्यायची ह्याला? थोडी मोठी (जी कमी तिखट असते) ती घेतली आहे ना? कारण बारिक हिरव्या मिरची घालुन हे मी इमॅजिन सुद्धा नाही करु शकत इतकं तिखट होईल. मी नेमकी ती बारिक मिरचीच आणलीये.. आणि हे करुन तर खावं वाटतंय... काय क्रावे ब्रे?

In reply to by पिलीयन रायडर

त्या मिरच्यांची देठं खुडुन उभ्या चीरा द्या. मग पातेल्यामधे २/३ कप पाणी, १/४ टेस्पु. हळद, १ पळी तेल आणी थोडसं मीठ टाकुन त्यात त्या मिरच्या टाका ४/५ मि. उकळु द्या मग हळु हळु त्यात बेसन टाका नी हलके हलके ढवळा. गोळा व्हायला लागले की अजुन थोडं तेल टाकुन झाकण ठेवुन २/३ मि. शिजवा. चपाती, भाकरी किंवा भात-भाजी बरोबर भारी लागतं आणी तिखटपणा ही नाही जाणवत.

अग मी बारीकच घेतलीय, तू दोनच मिरच्या घे. जनरली मी पण जाडच मिरची घेते पण आज घरात नव्हती जाड मिरची. @सिध्येश्वर करतील हो वहिनी चांगली, पण कशी झाली होती सांगा ह. @मंजू ताई हो भाकरी बरोबर मस्तच लागते त्यात बाजरीची शिळी भाकरी, कढी आणि अशा मिरच्या खूपच भारी बेत होतो. सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

हुच्च रेसिपी आहे. तुम्ही खात असलेल्या तिखटीची पण आठवण आली सौ त्रिवेणी ताई.

मस्त आहे रेसिपी. मला एकदम मीठभुरका अका तिखटीची आठवण झाली.

ही मिरची म्हणजे अहाहा!! पण मी अशी भाजी (?) जरा जाडसर मिरचीची आणि थोडा लिंबाचा रस घातलेली खाल्ली आहे

In reply to by ज्योति केंजळे

आहे माझ्याकडे पण नुसती तुरीची डाळ नसते. मी जी बघितली य ती ह डाळ+उडीद डाळ घालून करतात. हिवाळ्यात केली जाते. टाकेन ती रेसिपी ही बघा तीच आहे का.

In reply to by त्रिवेणी

मला वाटतं त्या दाय (डाळ) गंडोरीबद्दल विचारत आहेत. उ. डाळ + थोडी ह. डाळ शिजवून करतात ती भाजी वेगळी. तिला काही भागात 'फौजदारी' असंही म्हणतात.

नुसता पुस्प्गुच काय देऊन राह्यली पिवडे. मिरचीला उतारा पण द्यावा लागतोय. विसरली का तिखटी ;) पुस्प्गुच आणि राजमंदीरचे पेरू आइसक्रिम देऊन सत्कार करण्यात येत आहे.

मी हि रेसिपी केली .....मस्त झालीये ,,,, घरातले सगळे तुटून पडले होते मला धाग्यावर लोड करायची आहे पण ....... जमत नाहीये

मी imgur android हे अँप डा लो केलंय मोबाईलमध्ये. ते वापरून इमेज अपलोड करते इकडे.मलातरी खूप सोप्प वाटलं ते. धन्यवाद रेसिपी करून बघितल्याबद्दल.

इतके तिखट खात नाही पण जरा प्रमाण बदलून करता येईल. फोटो भारी आलेत, बघूनच खायची इच्छा होतेय.

उद्या करतो, आत्ताच केला असता पण लै रात्र झालीत. मागं एकदा म्हाद्या केला होता, शायनिंग च्या नादात लैच तिखट टाकलं, अर्धा तास घरात ठसका येत होता. फादर लै उचकले :)