Skip to main content

मेथी मटर मलाई

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 20/03/2014 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ जूडी मेथी, पाने खुडून, स्वच्छ धुवून घ्यावी. १ छोटा कांदा बारीक चिरून १/२ टोमॅटो बारीक चिरून १ वाटी मटार (मी फ्रोझन मटार वापरले आहेत, तुम्ही जर कच्चे मटार घेत असाल तर अर्धवट उकडून घ्यावे) ३/४ वाटी फ्रेश क्रीम (ग्रेव्ही कितपत दाट-पातळ हवे त्याप्रमाणे) २-३ लसूण पाकळ्या चिरून पेरभर आले बारीक चिरलेले २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या १ टेस्पून भिजवलेले काजू १ टेस्पून कसूरीमेथी २ मसाला वेलदोडे १/२ टीस्पून जीरे ३/४ टीस्पून गरम-मसाला मीठ चवीप्रमाणे . पाकृ: स्वच्छ धुवून घेतलेली मेथी बारीक चिरून घ्यावी. मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, आले. लसूण, काजू व हिरव्या मिरच्या एकत्र करुन, किंचित पाणी घालून मुलायम वाटून घेणे. . कढईत तेल गरम करुन जीरे व मसाला वेलदोडे घालून परतणे. त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे. आता त्यात बारीक चिरलेली मेथी, मीठ, गरम-मसाला घालून खमंग परतणे. . कसूरीमेथीमधील थोडी मेथी चुरडून घालावी व मटार घालून एकत्र करावे. अगदी थोडेच पाणी घालून, झाकून वाफ काढावी. त्यात आता क्रीम घालावे व उरलेली कसूरीमेथी घालून मिक्स करुन, झाकून ३-४ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. . मेथी मटर मलाई चपाती, फुलके, पराठे, रोटी किंवा नानबरोबर सर्व्ह करावी. . नोटः मेथीचा कडवटपणा आवडत नसल्यास, मेथी थोडी ब्लांच करुन मग बारीक चिरून घेणे. ह्या पाककृतीमध्ये खवा ही वापरु शकता, खवा थोडा परतून घ्यावा व त्यात वाटलेला मसाला घालावा. खवा वापरणार असाल तर क्रिमचे प्रमाण कमी करावे किंवा ग्रेव्ही पातळ हवी असल्यास ३/४ वाटी क्रिमला २ टेस्पून खवा परतून घ्यावा. अशाच पद्धतीने मटारऐवजी पनीर, उकडून तुकडे केलेले मश्रूम घालून पाककृती बनवता येईल. काहीजणं ह्यात हळद, तिखट ही घालतात पण त्याने पदार्थाचा रंग बदलतो. आवडत असल्यास घाला :)

वाचने 13717
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

मस्त आणि सोपी पाककृती. सोबत देशी घी वाले परोठे पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. हळद - तिखट घालून भाजीचा रंग बिघडवू नये. पांढरा-हिरवा रंगमिलाप सुंदर दिसतो.

गुरुवार सार्थकी लागला. (बाकीचे प्रतिसाद नेहमी प्रमाणे, तोंपासू,इनो,जळजळ,छ्ळवाद इ.इ.)

मेथी मटर मलईत तिखट आणि हळद याची कल्पनाही करु शकत नाही, मेमम ही अशीच हवी जशी फोटोत दिसते आहे. लाजवाब. आमच्या मातोश्रींचा या रेसिपीत हातखंडा आहे अर्थात तुमचे सादरीकरण नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

झक्कास्स पाकृ व सादरीकरण. इंजिनिअरींला असताना माझा एक मित्र नेहमी हॉटेलमध्ये ऑर्डर देताना "१ प्लेट M3 लाना" म्हणत असे. :)

माझी आवडती डिश...पण मी टॉमेटो नाही घालत.तू टॉमेटो घातला आहेस तरी रंगात काही फरक पडला नाहीये.आता अशी करून बघते.बाकी फोटो मस्तच..

In reply to by सानिकास्वप्निल

ओके. मेजवानी परिपूर्ण किचन सुगरण स्पर्धा समीक्षक मोड ऑन > खाण्याचा पदार्थ आहे मान्य. पण एकच लाल मिरची कुठून आणायची? का? पदार्थ बनवताना वेगळी नाही ठेवलेली. मेजवानी परिपूर्ण किचन सुगरण स्पर्धा समीक्षक मोड ऑफ लई डोक्यात जातात हे लोक. खा की गप्प. ;) बाकी टाईम अ‍ॅण्ड मनी मॅनेजमेण्ट, जनरल स्कील्स, प्रेझेन्टेशन्स, पदार्थांचा नेमका नि नेटका वापर ह्या गोष्टींसाठी असले शोज बघावेत.

मेथीची भाजी सगळ्यात जास्त आवडीची. या भाजीबरोबर कोणतीही भाकरी पण छान लागते. Eating चला भुक लागली.

सानिकादी नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर पाककृती. तुम्ही क्रीम वापरले नाही म्हणून मला जास्त आवडली मी नक्की प्रयत्न करून पाहीन. माझे पती Dr Akash ह्यांना मेथीची भाजी फार आवडते. माझ्या आई ने आम्हा दोघांना गार्लिक आणि शेंगदाणे वापरून मेथीची भाजी बनवावयास शिकविले आहे आत्ता तुमची पाककृती सुचवून पाहते. बनवली तर नक्की फोटो टाकेन.