साहित्यः
३-४ लहान कारली
(व्यवस्थीत सोलाण्याने साल खरवडून घेणे)
२-३ चमचे खरवडलेले कारल्याचे साल / खडबडीत भाग
(आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ कांदा उभा चिरलेला
२-३ लसूण पाकळ्या + पेरभर आले चिरुन
२ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
(आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
थोडीशी कोथींबीर
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून अनारदाना पावडर
(आमचूर पावडर किंवा चिंचेचे बुटुक ही वापरु शकता)
१ टीस्पून पंजाबी गरम-मसाला
(रोजच्या वापरातला मसाला ही चालेल)
मीठ चवीप्रमाणे
पाकृ:
कारल्यांना मधोमध चीर देऊन आतला बियांचा भाग काढून टाकावा.
(बिया कोवळ्या असतील तर त्या सारणासाठी घेऊ शकता)
कारल्यांना मीठाच्या पाण्यात १५-२० मिनिटे भिजवून ठेवावे, तसेच खरवडलेल्या भागाला ही थोडे मीठ चोळून ठेवावे.
१५-२० मिनिटांनी मीठाच्या पाण्यातले कारले स्वच्छ गार पाण्याने धुवून, किचन टिश्युने टिपून घ्यावे.
खरवडलेल्या भागाला ही स्वच्छ धुवून , चाळणीत निथळत ठेवावे.

मिक्सरच्या भांड्यात कांदा, हिरवी मिरची, आले, लसूण, कोथींबीर व अनारदाना पावडर
(येथे चिंच वापरत असाल तर ती घ्यावी) एकत्र करुन भरडसर वाटून घ्यावे.
पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात हे वाटण घालून परतून घेणे.
त्यात हळद, पंजाबी गरम-मसाला व मीठ घालून कोरडे होईपर्यंत परतावे.
सारण गार होऊ द्यावे.

आता कारल्यच्या कापलेल्या भागात तयार सारण नीट भरावे व कारले दोर्याने गुंडाळून घट्ट बंद करावे.
पॅनमध्ये थोडे जास्तं तेल गरम करुन सर्व कारली टाकावीत व मंद आचेवर परतावी.
मधे एकदा झाकून वाफ काढा व झाकण काढून पुन्हा परतत रहा.
कारली बर्यापैकी शिजली की ती एका प्लेट्मधे काढावी व त्याच पॅनमध्ये थोडा उभा चिरलेला कांदा परतावा.
कांदा जरासा ब्राऊन होऊ लागला की त्यात कारली घालून खमंग परतावी.
(कांद्याची स्टेप ऑप्शनल आहे)

सर्व्ह करतेवेळी कारल्याचा दोरा सोडवून सर्व्ह करावीत.
मग बघताय काय... या मस्तं आबंट-वरण भात आणी ही भरली कारली जेवायला, आहे की नाही फक्कड बेत :)
नोटः
ही कारली तुम्ही भाकरी, चपाती, आमटी-भात कशाहीबरोबर सर्व्ह करु शकता.
प्रवासासाठी घेऊन जायची असल्यास कारल्यात भरण्यासाठी कोरड्या मसाल्यांचा वापर करावा.
लाल-तिखट, हळद, पंजाबी गरम-मसाला, आमचूर पावडर, बडीशेपपुड, धणे-जीरेपूड व मीठ एकत्र करावे.
तेलात कारल्याचा खडबडीत भाग परतणे त्यात वरील सर्व मसाले घालून परतणे व हे सारण भरून कारली शॅलो फ्राय करावी.
कोरडी असल्यामुळे साईड डिश म्हणून ही सर्व्ह करु शकता.
सारणाचे प्रमाण कारल्यांप्रमाणे बसवावे.
ही पाककृती मी आईकडून शिकले आणी आईने तिच्या शीख मैत्रीणीकडून :)