मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पंजाबी भरवाँ करेला (भरली कारली)

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्यः ३-४ लहान कारली (व्यवस्थीत सोलाण्याने साल खरवडून घेणे) २-३ चमचे खरवडलेले कारल्याचे साल / खडबडीत भाग (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ कांदा उभा चिरलेला २-३ लसूण पाकळ्या + पेरभर आले चिरुन २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) थोडीशी कोथींबीर १/२ टीस्पून हळद १ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर किंवा चिंचेचे बुटुक ही वापरु शकता) १ टीस्पून पंजाबी गरम-मसाला (रोजच्या वापरातला मसाला ही चालेल) मीठ चवीप्रमाणे . पाकृ: कारल्यांना मधोमध चीर देऊन आतला बियांचा भाग काढून टाकावा. (बिया कोवळ्या असतील तर त्या सारणासाठी घेऊ शकता) कारल्यांना मीठाच्या पाण्यात १५-२० मिनिटे भिजवून ठेवावे, तसेच खरवडलेल्या भागाला ही थोडे मीठ चोळून ठेवावे. १५-२० मिनिटांनी मीठाच्या पाण्यातले कारले स्वच्छ गार पाण्याने धुवून, किचन टिश्युने टिपून घ्यावे. खरवडलेल्या भागाला ही स्वच्छ धुवून , चाळणीत निथळत ठेवावे. . मिक्सरच्या भांड्यात कांदा, हिरवी मिरची, आले, लसूण, कोथींबीर व अनारदाना पावडर (येथे चिंच वापरत असाल तर ती घ्यावी) एकत्र करुन भरडसर वाटून घ्यावे. पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात हे वाटण घालून परतून घेणे. त्यात हळद, पंजाबी गरम-मसाला व मीठ घालून कोरडे होईपर्यंत परतावे. सारण गार होऊ द्यावे. . आता कारल्यच्या कापलेल्या भागात तयार सारण नीट भरावे व कारले दोर्‍याने गुंडाळून घट्ट बंद करावे. पॅनमध्ये थोडे जास्तं तेल गरम करुन सर्व कारली टाकावीत व मंद आचेवर परतावी. मधे एकदा झाकून वाफ काढा व झाकण काढून पुन्हा परतत रहा. कारली बर्‍यापैकी शिजली की ती एका प्लेट्मधे काढावी व त्याच पॅनमध्ये थोडा उभा चिरलेला कांदा परतावा. कांदा जरासा ब्राऊन होऊ लागला की त्यात कारली घालून खमंग परतावी. (कांद्याची स्टेप ऑप्शनल आहे) . सर्व्ह करतेवेळी कारल्याचा दोरा सोडवून सर्व्ह करावीत. मग बघताय काय... या मस्तं आबंट-वरण भात आणी ही भरली कारली जेवायला, आहे की नाही फक्कड बेत :) . नोटः ही कारली तुम्ही भाकरी, चपाती, आमटी-भात कशाहीबरोबर सर्व्ह करु शकता. प्रवासासाठी घेऊन जायची असल्यास कारल्यात भरण्यासाठी कोरड्या मसाल्यांचा वापर करावा. लाल-तिखट, हळद, पंजाबी गरम-मसाला, आमचूर पावडर, बडीशेपपुड, धणे-जीरेपूड व मीठ एकत्र करावे. तेलात कारल्याचा खडबडीत भाग परतणे त्यात वरील सर्व मसाले घालून परतणे व हे सारण भरून कारली शॅलो फ्राय करावी. कोरडी असल्यामुळे साईड डिश म्हणून ही सर्व्ह करु शकता. सारणाचे प्रमाण कारल्यांप्रमाणे बसवावे. ही पाककृती मी आईकडून शिकले आणी आईने तिच्या शीख मैत्रीणीकडून :)

वाचन 15646 प्रतिक्रिया 0